https://goodworld.in A website by Madhav Bhope

Memories-at-Utnoor

लेखक 

श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद 

(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)

Memories at Utnoor

*उतनूरचे दिवस…*

*थरार… (४-ड)*

जनार्दन भाऊंच्या घरून मी बँकेत परतलो तेंव्हा दुपारचा एक वाजून गेला होता. खिन्नपणे यंत्रवत टेबलावरील कागद वर खाली करत बसलो. मात्र मनात उठलेलं के. जनार्दन बद्दलच्या विचारांचं काहूर काही केल्या थांबत नव्हतं. या प्रकरणातील माझी आतापर्यंतची सारी मेहनत वाया गेली होती. हा पराभव माझ्या जिव्हारी लागला होता.

मी असा उदास बसलेलो असतानाच आमचे मॅनेजर डी. कृष्णा बाबू अत्यंत प्रफुल्लित चेहऱ्याने तिथे आले. आल्या आल्या माझ्याशी हस्तांदोलन करीत ते म्हणाले..

“हार्दिक अभिनंदन..! तुमचं ते के. जनार्दन प्रकरण एकदाचं कायमचं मिटलं. आता तुम्हाला त्याच्या बद्दल कसलाही विचार करण्याची गरज नाही. यापुढे ते कर्ज खातं आपल्या बुक्स मध्ये दिसणार नाही..”

मॅनेजर साहेबांच्या बोलण्यातून काहीच अर्थबोध न झाल्यामुळे मी प्रश्नार्थक चेहऱ्याने त्यांच्याकडे पाहिलं. मला असा बुचकळ्यात पडलेला पाहून मॅनेजर साहेब म्हणाले..

“आज सकाळी माझ्या केबिन मधल्या कपाटातील कागदपत्रे व फाईल्स नीट लावीत असताना मला रिजनल ऑफिस मधून आलेलं एक बंद पाकीट सापडलं. कदाचित आधीच्या मॅनेजर साहेबांची बदली झाल्यानंतर ते आलेलं असावं आणि अनवधानाने न फोडता ते तसंच राहून गेलं असावं.

त्या पाकिटात के. जनार्दनचे खाते राईट ऑफ (write off) करण्या बद्दल वरिष्ठ कार्यालयाची परवानगी होती. त्यासाठी मुख्य कार्यालयाने शत प्रतिशत तरतूद (provision) केल्याचाही त्यात उल्लेख होता. मी ताबडतोब क्षेत्रीय कार्यालयाशी संपर्क साधला आणि ही तरतूद अद्यापही कायम असल्याची खातरजमा करून घेतली. त्यानंतर त्वरित ही तरतूद वापरून के. जनार्दनचं प्रतिवादीत (Protested Bills) खातं बट्टा खात्यात टाकून मी राईट ऑफ (Write off) केलं.

शाखेच्या ऑडिट रिपोर्ट मध्ये हे खाते “राईट ऑफ” साठी पाठवावे अशी ऑडिटरने शिफारस केली होती. त्यानुसार आधीच्या मॅनेजर साहेबांनी तसा प्रस्ताव रिजनल ऑफिस कडे पाठविला असावा. काहीही असो, त्या के. जनार्दनचा विषय आता मुळापासून संपला आहे. तुम्ही त्याच्या बद्दलचे सर्व विचार आता मनातून पूर्णपणे काढून टाका.. “

मॅनेजर साहेबांच्या दृष्टीनं जरी ही आनंदाची बातमी होती तरी माझ्या जखमेवर मात्र त्यामुळे जणू मीठच चोळलं गेलं.

के. जनार्दन च्या कर्ज खात्याची कागदपत्रे प्रतिवादीत (Protested Bills) खात्यांच्या फाईल मधून काढून लिखित-बंद (Written off) खात्यांच्या फाईल मध्ये टाकताना मी सहजच ती कागदपत्रे पुन्हा चाळली.

त्यातील ट्रॅक्टर समोर उभे राहून काढलेल्या के. जनार्दनच्या फोटोनं माझं लक्ष वेधून घेतलं. फोटोत ट्रॅक्टरचा रजिस्ट्रेशन नंबर AP- 01- A-19 असा स्पष्ट दिसत होता. मी नुकत्याच पाहिलेल्या के. जनार्दनच्या वाड्या मागील ट्रॅक्टरचा नंबर AP-01-B-313 असल्याचं मला पक्कं आठवत होतं. तसंच मी पाहिलेल्या ट्रॅक्टर वर “फोर्ड” असं लिहिलं होतं, पण या फोटोतील ट्रॅक्टर वर तर ठळक अक्षरात “मॅसी फर्ग्युसन” असं लिहिलेलं दिसत होतं.ford tractor

म्हणजेच के. जनार्दन काहीतरी लबाडी करत होता. बँकेला दाखवण्यासाठी त्याने भंगार मधून ट्रॅक्टर व ट्रॉली खरेदी केलेली दिसत होती. याचाच अर्थ बँकेने फायनान्स केलेला ट्रॅक्टर व ट्रॉली अद्यापही चालू स्थितीत होती आणि जनार्दन भाऊंनी त्यांना अन्य कुठेतरी लपवून ठेवलं असावं.

अर्थात आता या पश्चात बुद्धिनं काढ़लेल्या तार्किक निष्कर्षाचा काहीही उपयोग नव्हता.

त्याच सुमारास उतनूर च्या ससे उत्पादन (Rabbit Breeding) केंद्रा मधून पांढऱ्या शुभ्र सशांची दोन पिल्ले चि. अनिशला खेळण्यासाठी मी विकत आणली होती. त्या सशांसाठी लोखंडी जाळीचा छोटासा पिंजरा तयार करवून घेण्यासाठी उतनूरच्या एका वेल्डिंग शॉप मध्ये मी गेलो होतो. ह्या वेल्डिंग शॉप वाल्याचे पूर्वी शामपुरच्या दामोदर बाजार मध्ये फॅब्रिकेशनचे युनिट असल्याचे त्याच्या बोलण्यावरून समजले. साहजिकच “नक्षल्यांच्या धमकीमुळे ते दुकान बंद केले का ?” असा मी त्याला प्रश्न केला. त्यावर तो म्हणाला..

“नाही साहेब..! नक्षल्यांचा आम्हाला काहीही त्रास नव्हता. त्यांनी आम्हाला कधी धमकीही दिली नाही. खरं म्हणजे त्या कॉम्प्लेक्सचा मालक पी. जनार्दन हा खूप चलाख आणि दगाबाज माणूस आहे. गगन रेड्डी नावाच्या कुर्नुल येथील श्रीमंत व्यापाऱ्या कडून कर्ज घेऊन त्याने आपल्या जमिनीवर हा कॉम्प्लेक्स उभारला. मात्र ठरल्याप्रमाणे मुद्दल रकमेचा हप्ता आणि त्यावरील व्याजापोटी कॉम्प्लेक्सचे अर्धे भाडे या पी. जनार्दन ने गगन रेड्डीला कधीच दिले नाही. गगन रेड्डी हा रायलसीमा भागातील कुख्यात बाहुबली राजकारणी गुंड सुध्दा आहे. त्याने कुर्नुल हुन आपले गुंड आणून तो कॉम्प्लेक्स खाली करवून आपल्या ताब्यात घेतला. तसंच दर महिन्याला शामपुरला येऊन तो आपल्या कर्जाचा हप्ता पी. जनार्दन कडून वसूल करतो.”

बाप रे ! हा के. जनार्दन उर्फ पी. जनार्दन भलताच खोटारडा दिसत होता. त्याला अजिबात असंच सोडून देऊन चालणार नव्हतं. कसं ही करून त्याला चांगलीच अद्दल घडवायचं मी मनाशी पक्कं ठरवलं.

के. जनार्दनच्या कर्ज कागदपत्रात भागवत मुंढे नावाच्या इंद्रवेल्ली येथील एका शेतकऱ्याचा जामीनदार (गॅरंटर) म्हणून उल्लेख होता. पूर्वी, मी त्याच्याबद्दल गावात चौकशी केली होती तेंव्हा तो फार पूर्वीच मरण पावल्याचे समजले होते. आता मी नव्याने त्या जामीनदारा बद्दल कसून अधिक चौकशी केली. त्यातून, त्या दिवंगत गॅरंटरची पत्नी व मुले इंद्रवेल्ली गावातच राहून शेती व अन्य व्यवसाय करीत असल्याचे समजले. त्यांचा पत्ता मिळवून त्यांना गाठले आणि के. जनार्दनचे कर्ज फेडण्याची जबाबदारी मृत जामीनदाराचे वारस या नात्याने आता तुमची आहे, याची त्यांना जाणीव करून दिली.

के. जनार्दनला रजिस्टर्ड व कायदेशीर नोटीसा पाठवणे सुरूच होते. या नोटीसा आता थेट शामपुरच्या पत्त्यावरच पाठवीत होतो आणि जनार्दन भाऊही त्या नोटीसा निमूटपणे स्विकारीत होते. जामीनदार भागवत मुंढेची पत्नी व मुलांनाही रजिस्टर्ड नोटीसा पाठवणे मी आता सुरू केले.

उतनूर, शामपुर व नागापूर येथील शेतजमिनीवर जनार्दन भाऊंनी ग्रामीण बँक, मध्यवर्ती बँक तसेच विविध सोसायट्यां कडून पीक कर्ज घेतले होते. त्या सर्व बँकांच्या व सोसायट्यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना या जमिनीवर आधीच आमच्या बँकेचा बोजा (charge) असल्याची कल्पना दिली. तसेच तुम्ही आमचे “बे-बाकी (No Dues) प्रमाणपत्र” न घेताच या जमिनीवर कर्ज दिले, त्याची जिल्हा अग्रणी बँकेकडे (District Lead Bank) तक्रार करणार असल्याचेही त्यांना सांगितले.

या सर्व बँका व सोसायट्यांनी जनार्दन भाऊंच्या मागे आपल्या कर्ज वसुलीसाठी तगादा लावला. तर इकडे जामीनदार भागवत मुंढेची पत्नी व मुले यांनी देखील जनार्दन भाऊंच्या घरी ठिय्या मांडून ट्रॅक्टरचे कर्ज ताबडतोब भरून टाकण्याचा आग्रह धरला.

अशातच आमच्या बँकेच्या वरंगल येथील रिजनल ऑफिसने आदीलाबाद जिल्ह्यातील सर्व शाखाधिकारी व फिल्ड ऑफिसर्स ची मिटिंग एका रविवारी आदीलाबाद येथे ठेवली होती. मिटिंग CCI (सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) च्या हॉलमध्ये होती. या मिटिंग मध्ये आमच्या मॅनेजर साहेबांचा व माझा रिकव्हरी कॅम्पेन मध्ये प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. मिटिंग संपल्यानंतर थोड्याच वेळाने हॉलमध्येच जेवणाचा कार्यक्रम होता. त्या मधल्या वेळेत जवळपास फेरफटका मारण्यासाठी काही मित्रांसोबत फिरत फिरत मी बाहेरील रस्त्याकडे आलो.

conference hall meeting

सीसीआय सिमेंटची फॅक्टरी तिथून अगदी जवळच असावी. अनेक ट्रक व ट्रॅक्टर त्या फॅक्टरीत ये-जा करीत होते. अचानक एक ट्रॅक्टर आम्हाला अगदी चाटून गेला. त्यामुळे आम्ही रागाने त्या ट्रॅक्टरकडे बघितलं. त्या ट्रॅक्टरचा नंबर AP-01-A-19 असल्याचं पाहताच मी चमकलो.

tractor

हा तोच के. जनार्दनला आम्ही फायनान्स केलेला ट्रॅक्टर होता. त्या ट्रॅक्टर कडे लक्ष जाताच मागचा पुढचा विचार न करता मी एकट्याने पायीच त्या ट्रॅक्टरचा पाठलाग करण्यास सुरुवात केली.

वेगाने जाणार तो ट्रॅक्टर लवकरच मला दिसेनासा झाला. मात्र तरीही मी नेटाने चालतच राहिलो. सुमारे एक दीड किलोमीटर अंतर चालून गेल्यावर मला सिमेंट फॅक्टरीचे गेट दिसले.

मी गेट वर जाऊन ट्रॅक्टरचा नंबर सांगून त्याची चौकशी केली तेंव्हा नुकताच तो ट्रॅक्टर आत गेला असून सुमारे अर्ध्या तासात तो बाहेर येईल असे गेटकीपर म्हणाला.

cci gate

त्यामुळे मी गेट जवळच तो ट्रॅक्टर बाहेर येण्याची वाट पहात थांबलो. खरोखरीच अर्ध्या तासाने तो ट्रॅक्टर बाहेर आला तेंव्हा हातानेच इशारा करून त्याला एका बाजूला नेत थांबवलं. त्या ट्रॅक्टर चालकाकडे ट्रॅक्टरच्या मालकाबद्दल चौकशी केली तेंव्हा आदीलाबादच्या धान्य मार्केट मधील जनार्दन शेठ ने पंधरा हजार रुपये महिना इतक्या भाड्याने तो ट्रॅक्टर त्याला भाड्याने दिल्याचे समजले.

मी ट्रॅक्टरचं निरीक्षण केलं. तो अगदी उत्तम स्थितीत होता. त्याचे चारी टायर नवीन दिसत होते. ट्रॉलीला ही नुकताच रंग दिल्यासारखं वाटत होतं. ट्रॅक्टर आणि ट्रॉली सुस्थितीत असल्याचं पाहून मला हायसं वाटलं. ट्रॅक्टर चालकाचे आभार मानून मी CCI हॉल कडे परतलो तेंव्हा सर्वांची जेवणे आटोपली होती. आमच्या मॅनेजर साहेबांनी “कुठे गेला होतात ?” असं विचारलं तेंव्हा “बँकेतील बॅच मेट भेटला होता व त्याच्या सोबत बाहेरच जेवलो” असं खोटंच सांगून त्यांचं समाधान केलं.

दुसऱ्या दिवशी सकाळी ठीक साडेदहा वाजता आमचे रिजनल मॅनेजर साहेब क्वार्टरली व्हिजिट साठी शाखेत हजर झाले. व्हिजिट आटोपून त्यांना ताबडतोब अन्य दुसऱ्या शाखेत जायचे असल्याने त्यांच्या सहाय्यक अधिकाऱ्याला सरप्राईज इंस्पेक्षनची औपचारिक कार्यवाही लवकर आटोपण्यास सांगून ते आमच्याशी गप्पा मारीत बसले होते. इतक्यात मॅनेजर साहेबांना एक संशयास्पद फोन आला. पलीकडून

“मै रयतु क्रांति, प्रभाकर दलम का कमांडर बात कर रहा हूँ..”

असे शब्द ऐकू येताच मॅनेजर साहेबांनी आम्हा सर्वांना खुणेनेच गप्प राहण्यास सांगितले. पलीकडची व्यक्ती म्हणाली..

“आप का नया फिल्ड ऑफिसर आज कल कुछ जादा ही फुर्ती बता रहा है और फिजुलकी ईमानदारी भी झाड़ रहा है.. हमारे कुछ दोस्तोंको उसने परेशान करके रक्खा है.. उसे कह दो के शामपुर, नागापुर, इन्द्रवेल्ली एरिया में आना जाना बंद कर दे.. वरना हम उसे अपने टार्गेट पे ले सकते है..”

एवढं बोलून पलीकडच्या व्यक्तीने फोन ठेवून दिला. आमच्या मॅनेजर साहेबांना यापूर्वी ही “पोलीस कारवाईच्या निषेधार्थ बँक बंद ठेवण्यासाठी” नक्षली अन्नांचे अनेकदा फोन येऊन गेले असल्याने त्यांनी नक्षली अन्ना चा आवाज अचूक ओळखला. जेंव्हा त्यांनी समोर बसलेल्या रिजनल मॅनेजर साहेबांना नुकत्याच आलेल्या फोन बद्दल सांगितलं तेंव्हा ते हादरून गेले. मला कळवळून समजावून सांगत ते म्हणाले..

“डोन्ट टेक युअर जॉब सो सिरियसली. अरे बाबा, ऐसे खतरनाक एरिया में अपनी जान को सम्हालकर ही काम करना. आपको कोई गोल्ड मैडल नही मिलनेवाला ऐसी रिस्क लेने के बदले.. उलटा, आपको कुछ हुआ तो हम में से कोई भी नही आएगा आपको बचाने के लिए.. जरा अपने बीबी बच्चोंके बारे में सोचो.. यहां तो पुलिसवाले भी आने को डरते है.. इसलिए, आज के बाद, जब बहुत ही जरूरी काम हो तब ही बँक से बाहर जाना.. और बाहर जाते वक्त हमेशा सिक्युरिटी गार्ड को साथ ले जाना..”

रिजनल मॅनेजर साहेब निघून गेल्यावर बराच वेळ मी नक्षली कमांडरने केलेल्या फोन बद्दलच विचार करीत होतो. जनार्दन भाऊंनीच त्यांच्या नक्षली मित्रांना सांगून हा फोन करायला लावला असावा असा मला दाट संशय येत होता.

दोन दिवस वाट पाहून मग मॅनेजर साहेबांना के. जनार्दनच्या भाड्याने दिलेल्या ट्रॅक्टर बद्दल सांगून टाकलं आणि तो ट्रॅक्टर जप्त करून उतनूरला आणण्याबद्दल त्यांची परवानगी मागितली. मॅनेजर साहेबांना माझं कौतुक वाटलं. त्यांनी एका कस्टमरची जीप भाड्याने घेतली आणि ट्रॅक्टरचा एक ड्रायव्हर, बँकेकडे असलेली ट्रॅक्टरची डुप्लिकेट किल्ली व दोन सिक्युरिटी गार्ड सोबत देऊन बँकेचा ट्रॅक्टर खेचून आणण्यासाठी मला आदीलाबादला पाठवलं. तसंच आमच्या आदीलाबाद शाखेच्या चीफ मॅनेजरलाही फोन करून मला या प्रकरणी शक्य ती सर्व मदत करण्याची त्यांनी विनंती केली.

त्यानंतर मॅनेजर साहेबांनी उतनूरच्या पोलीस ठाण्याला फोन केला आणि ट्रॅक्टर खेचून आणण्यासाठी बँकेचा स्टाफ आदीलाबादला जात असल्याची त्यांना कल्पना दिली. दोन दिवसांपूर्वी नक्षली कमांडरने केलेल्या धमकीच्या फोन बद्दल त्यांना यापूर्वीच कळवलेलं असल्याने पोलिसांची एक जीप सुरक्षित अंतर ठेवून आमच्या मागोमाग येत होती.

आम्ही आदीलाबादला पोहोचल्यावर थेट सीसीआय सिमेंट फॅक्टरीवर गेलो. परंतु आज तेथे जनार्दन शेठचा ट्रॅक्टर आलेलाच नव्हता. तेथील काम संपल्याने कदाचित तो ट्रॅक्टर पुन्हा धान्य मोंढ्यात गेला असावा असे फॅक्टरीचा गेटकीपर म्हणाला. त्यामुळे आम्ही धान्य मार्केट कडे आमचा मोर्चा वळवला. सुदैवाने मार्केटच्या गेट जवळच आमचा ट्रॅक्टर उभा होता. सोबत नेलेल्या ड्रायव्हरने डुप्लिकेट किल्लीने ट्रॅक्टर चालू केला. आणि हळूहळू चालवीत तो उतनूरला आणला. वाटेत कोणताही त्रास झाला नाही. उतनूरच्या पोलिसांची जीपही सकाळ सारखीच आमच्या मागोमाग येत होती. बँकेसमोर पुरेशी जागा नसल्याने पोलीस स्टेशन समोरील मोकळ्या जागेतच ट्रॅक्टर उभा केला.

दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजताच के. जनार्दन उर्फ जनार्दन भाऊ उर्फ जनार्दन शेठ बँकेत हजर झाले. ट्रॅक्टर सोबत उतनूर पोलिसांची जीप असल्याचे मोंढ्यातील अन्य व्यापाऱ्यांकडून जनार्दन शेठला समजले होते. त्यामुळेच तो थेट उतनूरला आमच्या बँकेत आला होता. कोणतीही पूर्वसूचना न देता ट्रॅक्टर जप्त केल्याबद्दल सुरुवातीला त्याने माझ्याशी बाचाबाची करून तारस्वरात आरडाओरड करत बँकेत खूप तमाशा केला. ट्रॅक्टरचा तपास लावून बँक एवढ्या तडकाफडकी जप्तीची कारवाई करेल यावर अजूनही त्याचा विश्वासच बसत नव्हता.

जनार्दन शेठच्या त्या आक्रस्ताळी त्राग्याकडे मी अजिबात लक्ष दिलं नाही. उलट, आता वेळ न घालवता आम्ही त्याच्या ट्रॅक्टरचा जाहीर लिलाव करणार आहोत तसेच गॅरंटर वरही ताबडतोब कायदेशीर कारवाई करणार आहोत हे त्याला सांगितलं. बँकेने आपल्या भोवती सर्व बाजूंनी फास आवळला असून चारी बाजूनी आपल्याला घेरलं आहे याची कल्पना आल्यावर तो थोडा शांत झाला. त्याचा स्वरही किंचित नरम झाला.

कदाचित ग्रामीण बँकेच्या, सोसायट्यांच्या व गॅरंटरच्या कुटुंबियांच्या सततच्या तगाद्याला तो ही कंटाळला असावा. कारण थोडा वेळ खाली मान घालून शांत बसल्यावर अचानक अस्पष्ट, खोल गेलेल्या, हताश आणि असहाय्य आवाजात त्याने मला विचारलं..

“एक रकमी किती पैसे जमा केले तर बँक कर्ज-तडजोड (Compromise) करून मला या ट्रॅक्टर लोन मधून कर्ज-मुक्त करेल ?”

एवढा बिलंदर, जुना थकीत कर्जदार अखेरीस कर्ज भरण्यास तयार झाला आहे हे समजताच मॅनेजर साहेबांनी सर्व सूत्रं आपल्या हाती घेतली. कर्ज घेतलेल्या तारखेपासून आजपर्यंतचं व्याज कॅलक्युलेट करून एकूण सहा लाखांची थकबाकी काढून त्यांनी तो आकडा जनार्दन शेठला सांगितला.

बारा गावचं पाणी प्यालेल्या व्यापारी वृत्तीच्या जनार्दन शेठ वर एवढा मोठा आकडा ऐकून काहीही परिणाम झाला नाही. एनपीए (NPA) कमी करण्यासाठी बँका आजकाल “कॉम्प्रमाईज प्रपोजल” च्या नावाखाली कितीही कमी रक्कम घेऊन कर्ज खातं बंद करतात याची त्याला चांगलीच कल्पना असावी.

“व्याजाचं तर सोडाच, मुद्दल रकमेत किती कमी करता ते सांगा..!”

असं मग्रूर, उर्मट प्रत्युत्तर त्याने मॅनेजर साहेबांना दिलं.

“कर्जाची मुद्दल रक्कम तर तुम्हाला द्यावीच लागेल आणि व्याजाचं म्हणाल तर त्यात थोडीफार सवलत तुम्हाला देता येईल, पण त्यासाठी ही अगोदर आमच्या वरंगल रिजनल ऑफिसची मला परवानगी घ्यावी लागेल..”

मॅनेजर साहेबांनी दिलेलं हे परखड व अंतिम उत्तर ऐकताच ताडकन खुर्चीवरून उठून बाहेर निघून जात जनार्दन भाऊ म्हणाले..

“असं आहे तर मग मी स्वतःच तुमच्या त्या वरंगल रिजनल ऑफिसला जातो आणि माझं Compromise proposal मंजूर करून घेतो..”

जनार्दन भाऊ असे तावातावाने बँके बाहेर निघून जात असताना मी उपहासाने त्यांना म्हणालो..

“तुम्ही तुमच्या नक्षली मित्रांना तर बेधडक लाखो रुपयांची खंडणी ताबडतोब पोहोचती करता.. मग बँकेचं कायदेशीर देणं देताना एवढी घासाघीस का करता ?”

मी मुद्दामच “तुमचे नक्षली मित्र” असे शब्द वापरले होते. कारण बँकेत आलेला तो धमकीचा फोन जनार्दन भाऊंनीच त्यांच्या लालची खंडणीखोर नक्षली मित्रांना सांगून करविला होता, याची मला खात्री होती.

माझे शब्द जनार्दन भाऊंना झोंबले, मात्र माझ्याकडे केवळ रागाचा एक तीक्ष्ण कटाक्ष टाकून मोटारसायकलला जोरदार किक मारून जनार्दन भाऊ निघून गेले.

दोनच दिवसांत आमच्या रिजनल ऑफिसातून आपलं Compromise proposal मंजूर करून जनार्दन भाऊ विजयी मुद्रेने उतनूरला परत आले. एकूण दोन लाख रुपयांत त्यांचं मॅटर सेटल झालं होतं.

अर्थात या दोन दिवसात रिजनल ऑफिस सतत आमच्या संपर्कात होतं आणि कर्ज वसुलीचे चान्सेस, ट्रॅक्टर विकल्यास येणारी संभाव्य रक्कम, त्यात होणारा कालापव्यय अशा सर्व गोष्टी विचारात घेऊन आणि आमच्या शाखेकडून तसं compromise proposal फॅक्स द्वारे मागवून मगच त्यांच्याद्वारे हे प्रपोजल मंजूर करण्यात आलं होतं.

बँकेत रोख दोन लाख रुपये भरून बे-बाकी प्रमाणपत्र (No Dues Certificate) घेतल्यावर आपला ट्रॅक्टर सोडवून घेऊन शामपुरला परत जाताना जनार्दन भाऊंनी मला कोपरापासून नमस्कार केला..

सर्वोत्तम कर्ज-वसुली प्रित्यर्थ हैदराबाद येथे होणारा आमच्या शाखेचा सत्कार समारंभ अवघ्या दोन दिवसांवर आला होता. या कार्यक्रमाचं निमंत्रण फक्त वरिष्ठ नियंत्रक व शाखाधिकारी (Controllers & Branch Managers) यांनाच होतं. परंतु आमच्या मॅनेजर साहेबांनी रिजनल मॅनेजरना विनंती करून मला ही समारंभास सोबत घेऊन जाण्याची विशेष परवानगी मागितली आणि रिजनल मॅनेजर साहेबांनीही अत्यंत सहर्ष ती दिली.

प्रत्यक्ष समारंभात आमच्या शाखेला ट्रॉफी प्रदान केल्यावर आमच्या मॅनेजर साहेबांनी मलाही स्टेज वर बोलावण्याची इच्छा आमच्या मॅनेजिंग डायरेक्टर साहेबांकडे प्रकट केली. या प्रसंगी आमच्या रिजनल मॅनेजर साहेबांनी आमच्या शाखेने नुकत्याच केलेल्या अशक्यप्राय अशा Written Off खात्यातील कर्ज वसुलीचा किस्सा थोडक्यात सांगितला.

त्यानंतर एमडी साहेबांनी माझ्याशी हस्तांदोलन करून माझ्या पाठीवर शाबासकीची जोरदार थाप मारल्यावर झालेला टाळ्यांचा कडकडाट आजही माझ्या आठवणीत ताजा आहे.

felicitation ceremony

(समाप्त)

ajay kotnis photo1

श्री अजय कोटणीस हे स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३७ पेक्षा जास्त  वर्षांचा प्रदीर्घ अनुभव  असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्याआधी त्यांनी मराठवाडा ग्रामीण बँकेतही  सेवा केली.  त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानकावर खिळवून ठेवतात.  

त्यांच्या सेवाकाळात त्यांनी आंध्र प्रदेश मधील (आताचे तेलंगणा) आदिलाबाद या नक्सलग्रस्त जिल्ह्यातील, उतनूर या दुर्गम गावी पोस्टिंग असतांना त्यांना आलेल्या अनुभवावर  आधारित, नवीन लेखमाला- “उतनूरचे दिवस” ही सुरू केली आहे. सदर लेख त्यांच्या फेसबुक पेज वरून त्यांच्या परवानगीने साभार घेऊन, त्यात कथेस अनुरूप अशी चित्रें आणि व्हिडिओ टाकून, सदरील लेखमाला या ब्लॉगच्या वाचकांसाठी प्रस्तुत करीत आहोत.


Discover more from Blissful Life

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Blissful Life

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading