https://goodworld.in A website by Madhav Bhope

लेखक 

श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद 

(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)

Memories-at-Utnoor-1

*उतनूरचे दिवस..*

*थरार… (१)*

उतनूरचा अवघा परिसर घनदाट जंगलाने वेढलेला होता. उंच सखोल डोंगर दऱ्यांच्या मधून जाणाऱ्या अरुंद, निर्मनुष्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मोठमोठ्या हिरव्यागार पानांचे विशाल उत्तुंग सागवृक्ष होते.

teak forest

 भर दुपारी या सागवृक्षांच्या गर्द सावल्या रस्त्यावर पडल्या की सूर्य प्रकाश अंधुक होऊन संध्याकाळ झाल्याचा भास होत असे. हिंस्त्र, रानटी पशुंचा या जंगलात मुक्त वावर असल्याने त्यांच्या भयामुळे दुपारनंतर रस्त्यावरील रहदारी मंदावत असे. संध्याकाळ नंतर तर कुणीही या रस्त्याने जाण्याचे धाडस करीत नसे.utnoor-8

उतनूरला येऊन मला आता दोन महिने होत आले होते. इथल्या शांत, सुंदर, निसर्गरम्य वातावरणात मी आता चांगलाच रमलो होतो. फक्त दीड ते दोन किलोमीटर लांब रुंद पसरलेल्या त्या छोट्याशा गावाची लोकसंख्या जेमतेम दहा हजार इतकी असावी. तालुक्याचे ठिकाण असल्याने राज्य सरकारच्या सर्व विभागांची कार्यालये तिथे होती. वनक्षेत्र असल्याने फॉरेस्ट खाते तसेच आदिवासी क्षेत्र असल्याने “एकात्मिक आदिवासी विकास संस्था” (Integrated Tribal Development Agency – ITDA) यांची कार्यालयेही त्या गावात होती.

उतनूरच्या ITDA कडे गावातील बराच मोठा भूभाग होता, ज्यावर बोटॅनिकल गार्डन, मधुमक्षिका पालन, रेशीम उत्पादन व ससे प्रजनन (rabbit breeding) असे विविध प्रकल्प राबविले जात. माझा अडीच वर्षांचा मुलगा चि. अनिशला खेळण्यासाठी पांढऱ्याशुभ्र सशांची दोन गोजिरवाणी पिल्ले येथीलच ससे पालन केंद्रातून मी विकत आणली होती.two white rabbits

मी रहात असलेल्या घराला कंपाऊंड वॉल असली तरी कंपाउंडच्या चारी बाजूला भरपूर मोकळी जागा होती. या जागेत वावरणारे नाग, साप, विंचू असे अनेक विषारी, घातक प्राणी नेहमीच कंपाऊंडच्या गेट मधून आत घुसून अंगणात तसेच दरवाज्या समोरील पायऱ्यांवर निर्धास्तपणे पहुडलेले दिसायचे. त्यामुळे निसर्गाच्या सान्निध्यात राहणे जितके आनंददायी तितकेच धोकादायक सुद्धा आहे याची जाणीव होत होती.

सशाची पिल्ले आणण्यापूर्वी चि. अनिश साठी एक मांजराचं पिल्लूही मी घरी आणलं होतं. शेजारीच राहणाऱ्या माझ्या घरमालकाकडे पूर्वीपासूनच एक धिप्पाड कोंबडी पाळलेली होती. त्याच सुमारास घरमालकाचा मुलगा एकदा जंगलातून मोराचं अंडं घेऊन आला. त्या पाळलेल्या कोंबडीने ते अंडं उबवलं आणि एक देखणं मोराचं पिल्लू त्यातून बाहेर आलं.hen

घराच्या गच्चीवर भलं मोठं पाण्याचं टाकं होतं. वेगवेगळ्या जातीचे मासे, खेकडे, विचित्र दिसणारे बेडूक त्या टाक्यात होते. रस्त्याच्या कडेने जात असलेली कासवाची तीन पिल्लेही एकदा घरमालकाच्या त्या मुलाने उचलून आणून त्या टाकीतील पाण्यात सोडली होती. घराभोवतीच्या अंगणात गोडलिंब, शेवगा, गुलमोहर अशी झाडे तसेच गुलाब, चाफा, केवडा, मोगरा, कर्दळी आणि विविधरंगी आकर्षक रानटी फुलांची झाडे होती. निसर्गातील अवघा फ्लोरा आणि फौना (flora & fauna) जणू आमच्या त्या छोट्याशा जागेत एकवटला होता.

जवळपासच्या शेतांतील गलेलठ्ठ उंदीर रोजच रात्री घराच्या व्हेंटिलेटरच्या खिडकीतून आत घुसून खुडबुड करायचे. त्यांच्या मागोमाग त्यांची शिकार करण्यासाठी साप, नाग व रानमांजरं सुद्धा कंपाऊंड मध्ये शिरायची. एकदा एक दहा फूट लांबीचा जाडजूड काळा कभिन्न नाग घरामागील बाथरूम जवळ दिसून आला. आसपास राहणाऱ्या सर्व लोकांनी आरडाओरडा करीत जमून त्याला मारण्याचा खूप प्रयत्न केला. पण ते जनावर खूपच चपळ होते. आम्हा सर्वांचे लाठ्या काठ्यांचे प्रहार चुकवीत क्षणार्धात तो नाग एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे विजेच्या वेगाने सळसळत जायचा. कधी चिडून फणा काढून “हिस्स” असा फुत्कार सोडायचा तर कधी एखाद्या फुलांच्या कुंडीमागे बेमालूमपणे असा निपचित पडून राहायचा की जणू तो हवेतच विरून अदृश्यच झाला असावा असा भास व्हायचा. अखेरीस सगळ्यांना गुंगारा देऊन तो भुजंग अंगणातच कुठेतरी काट्याकुट्यात जो दडून बसला तो शेवटपर्यंत कुणालाच सापडला नाही.

माझा एलटीसी (Leave Travel Concession) चा ब्लॉक 15 डिसेंम्बरला expire होत असल्याने दक्षिण भारतातील आंध्रप्रदेश, कर्नाटक, केरळ व तामिळनाडू या राज्यात फिरून येण्याचे ठरवले. योगायोगाने त्याच सुमारास माझे आई, वडील, भाऊ व वहिनी आपल्या मुलांसह मला भेटण्यासाठी उतनूरला आले होते. तेंव्हा त्यांनाही सोबत घेऊनच ही दक्षिण भारताची सहल करावी असे ठरवले. त्यानुसार प्रवासासाठी गावातीलच एक टेम्पो ट्रॅक्स गाडी ठरवली आणि येत्या रविवारी दुपारी बारा वाजता उतनूर हून निघून संध्याकाळ पर्यंत हैदराबादला पोहोचायचे असा प्लॅन केला.

ठरल्याप्रमाणे रविवारी दुपारचे बारा वाजण्यापूर्वीच जेवणं खाणं आटोपून आम्ही सारे गाडीची वाट पहात बसलो. मात्र, सकाळी सर्व्हिसिंग साठी आदीलाबादला गेलेली गाडी संध्याकाळ झाली तरी उतनूरला परत आली नव्हती. शेवटी वाट पाहून कंटाळून आम्ही रात्रीची जेवणंही उरकून घेतली. रात्री आठ वाजता गाडी गावात परतली. गाडीच्या मागच्या दरवाजाचे काम अजूनही अर्धवटच राहीले असल्याने तो उघडाच ठेवावा लागत होता. त्यामुळे सोमवारी पुन्हा आदीलाबादला जाऊन दरवाजाचे हे काम पूर्ण करावे आणि मंगळवारी प्रवासाला निघावे किंवा आजच लगेच हैदराबादला निघावे आणि दरवाजाचे राहिलेले काम उद्या म्हणजे सोमवारी हैदराबाद इथेच करून घ्यावे असे दोन पर्याय ड्रायव्हर कृष्णाने आमच्यापुढे ठेवले.

आधीच मोठ्या मुश्किलीने मला आठ दिवसांची सुट्टी मंजूर झाली होती. त्यामुळे इथे थांबून दिवस वाया घालवण्यापेक्षा आत्ता लगेच निघून उद्या सकाळपर्यंत हैद्राबादला पोहोचावे असा निर्णय घेतला. रात्री नऊ वाजता आम्ही गावातून निघालो. मी समोरच्या सीटवर ड्रायव्हर शेजारी बसलो होतो. गावापासून जेमतेम दोन किलोमीटर दूर गेल्यावर लगेच तुरळक जंगलाला सुरवात झाली. छान टिपूर चांदणं पडलं होतं. त्याच्या चंदेरी प्रकाशात रस्ता उजळून निघाला होता. नुकतीच दिवाळी होऊन गेलेली होती. नोव्हेंबर महिना असला तरी थंडीला अजून सुरवात झालेली नव्हती. बाहेरील वातावरण उबदार आणि अत्यंत सुखद होतं. लहान मुलांची बडबड आणि आमच्या आपसातील गप्पा ह्याच्या नादात आम्ही दाट किर्र, निबिड भयाण जंगलात कधी प्रवेश केला ते ध्यानातही आलं नाही.

जंगलातील त्या सुनसान रस्त्यावरून आमची गाडी सुसाट वेगाने पळत होती. गाडीचा मागील दरवाजा उघडाच असल्याने त्यातून अधून मधून वारा आत घुसत असे. बाहेर एवढा मिट्ट काळोख होता की गाडीच्या लांबवर जाणाऱ्या प्रकाश झोतात दिसणारा निर्मनुष्य रस्ता सोडला तर आजूबाजूचं काहीही दिसत नव्हतं. आपण एखाद्या अतिखोल, अंधाऱ्या विवरातून किंवा कधीही न संपणाऱ्या एकाकी,भीषण काळोख्या बोगद्यातूनच प्रवास करीत आहोत असा भास होत होता. बाहेर सर्वत्रच अस्वस्थ, भयावह आणि गूढ शांतता पसरली होती. मुलांची बडबड आणि आमच्या गप्पा आता आपोआपच थांबल्या होत्या. फक्त चालत्या गाडीच्या इंजिनाचा आवाजच त्या भयाण शांततेचा भंग करीत होता.forest

आमच्या गाडीचा ड्रायव्हर कृष्णा हा अंदाजे पंचवीस वर्षे वयाचा हसमुख, उमदा तरुण होता. आतापर्यंत तो ही आमच्या गप्पांत अधून मधून भाग घेत होता, प्रवासातील मनोरंजक अनुभव, किस्से आम्हाला सांगत होता. मात्र हे घोर घनदाट जंगल सुरू होताच तोही निःशब्द होऊन अतिशय सावध नजरेने अवतीभवती पहात काळजीपूर्वक गाडी पुढे नेत होता. एखादा धांदरट, घाबरट ससा मधेच टुणकन उडी मारून रस्ता ओलांडून जायचा तर कधी एखादा बुटकासा कोल्हा तिरप्या मानेने गाडीकडे पहात पहात चपळाईने रस्ता क्रॉस करून पलीकडच्या झाडीत अदृश्य व्हायचा. कितीतरी छोटे मोठे साप नागमोडी वळणं घेत लगबगीने वळवळत गाडीच्या चाकांना चुकवत बाजूच्या काळोखात गडप व्हायचे तर माकडे, हरीण, मोर यासारखे प्राणी रस्त्याच्या कडेला थांबून आमची गाडी निघून जायची वाट पहात असलेले दिसायचे.

रस्ता जसा जसा जास्त दाट अरण्यातून जात होता तशी तशी रातकिड्यांची किरकिर वाढलेली जाणवत होती. दूर जंगलातून रानटी कुत्रे, लांडगे, तरस यांच्या टोळ्यांचे भेसूर आवाजातील हेल काढून एकसुरात सामूहिक रडणे, ओरडणे ऐकू येत होते. उंच झाडाच्या फांदीवर बसलेला एखादा टिटवी सारखा पक्षी साऱ्या आसमंतात घुमणारी कर्णकटु सांकेतिक शीळ घालायचा तेंव्हा तो कुणाला तरी इशारा करतोय किंवा आम्हाला सावध तरी करतोय असं वाटायचं. अचानक मधूनच अनोळख्या जंगली श्वापदाचा जीवघेणा आर्त चित्कार कानावर पडायचा आणि काळजाचं पाणी पाणी व्हायचं. आपण विनाकारणच जीव धोक्यात घालून रात्रीच्या वेळी अशा सुनसान भीतीदायक जंगलातून प्रवास करण्याचा मूर्खपणाचा निर्णय का घेतला याचा आम्हा सर्वांनाच आता मनोमन पश्चाताप होत होता.

आमच्या डोळ्यांतील झोप तर पार उडाली होती. मुलंही कावऱ्या बावऱ्या चेहऱ्यानं समोरच्या डांबरी रस्त्यावर नजर खिळवून भयमिश्रित कुतूहलाने श्वास रोखून बसली होती. काहीतरी आगळं वेगळं, अप्रत्याशित, अकल्पित घडणार आहे किंवा पहायला तरी मिळणार आहे अशी अंतर्मन सतत सूचना देत होतं. आम्ही जिथून जात होतो तो अवघा परिसरच मंतरलेला, जादूने भारलेला, फसवा, मायावी वाटत होता..

अचानक अनुभवी कृष्णाच्या सावध नजरेनं दूर अंतरावरील सागवृक्षांच्या विशाल पानांमागची कसली तरी हालचाल टिपली. गाडीचा वेग कमी करत त्यानं रस्त्याच्या मधोमध गाडी उभी केली. रस्त्यावर कुणीच नव्हतं. मी कृष्णाला काही विचारणार इतक्यात त्यानं तोंडावर बोट ठेवीत मला शांत राहण्याची खूण केली. त्यानंतर तब्बल तीन चार मिनिटं आम्ही सारे तोंडातून एक शब्दही बाहेर न काढता, कसलीही हालचाल न करता रिकाम्या रस्त्याकडे पहात तसेच आपल्या जागी बसून होतो. डोळे फाडफाडून बघितलं तरी आम्हाला कुठेही काहीच दिसत नव्हतं. कृष्णाची नजर मात्र उजव्या बाजूच्या खोलगट जंगलाकडेच रोखलेली होती. अशीच आणखी दोन तीन मिनिटं स्तब्धतेत गेली. माझा संयम आता सुटू लागला होता..

“आपण कशासाठी थांबलो आहोत इथं..?”

अखेर न राहवून मधल्या सीटवर बसलेल्या माझ्या मोठ्या वहिनींनी अस्पष्ट, कुजबुजत्या हलक्या सुरात विचारलंच..

कृष्णानं मागे वळून दोन्ही हात जोडून त्यांना “अजिबात बोलू नका.. शांत राहून पुढे पहात रहा..” अशी बोटानंच खूण केली. तोच..

बाजूच्या खोलगट भागातून दमदार मंदगती पावले टाकीत एक रुबाबदार, अंगावर काळे पिवळे पट्टे असलेला, धष्टपुष्ट वाघ हळूहळू प्रगट झाला. आमच्या गाडीकडे नजर रोखून डौलदार चालीत आपलं एक एक ठाम पाऊल अगदी सावकाशपणे उचलीत अंदाजे आठ ते नऊ फूट लांबीचं ते राजबिंडं जनावर रस्त्याच्या मध्यभागी येऊन आमच्याकडे एकटक पहात स्तब्ध उभं राहिलं. त्याचा पिंगट, तांबूस, तपकिरी पिवळा रंग गाडीच्या हेड लाईट्स च्या प्रकाशात सोन्यासारखा चमचमत होता. त्यावरील दाट काळ्या रंगाचे तिरपे उभे पट्टे तर अतिशयच खुलून दिसत होते. शौर्य आणि सौंदर्याचं मूर्तिमंत प्रतीक असलेला तो जंगलचा अनभिषिक्त राजा एखाद्या अप्रतिम अलौकिक शिल्पासारखा आमच्या पुढे उभा होता. अनिमिष नेत्रांनी, अवाक् होऊन आम्ही सारे ते दृश्य पहात होतो. ब्युटी क्वीन काँटेस्ट मधील सौंदर्यवती तरुणी रॅम्प वॉक करताना थोडंसं चालून क्षणभर थांबते आणि मग वळून परत फिरण्याआधी कमरेवर हात ठेवून एक पोझ देते ना, अगदी तस्साच तो वाघ आम्हाला पोझ देतो आहे असंही क्षणभर वाटून गेलं.tiger at night

तो धिप्पाड देखणा वाघ गाडीच्या हेड लाईट्स च्या प्रखर प्रकाश झोतासमोर सिनेमातील एखाद्या हिरो सारखा स्टायलिशपणे आम्हाला आव्हान देत उभा होता. अंधाराला सरावलेल्या त्याच्या डोळ्यांवर एवढा सर्च लाईट सारखा पॉवरफुल प्रकाश पडूनही त्याचे डोळे दिपून गेल्याचे अजिबात जाणवत नव्हते.tiger staring

त्यावरून त्याला अशा प्रकाशाची सवय असावी असे वाटत होते. अद्यापही तो डोळे मोठे करून आमच्या गाडीकडेच निरखून पहात होता. मनात विचार आला.. त्या वाघाला गाडीत बसलेले आम्ही सारे दिसत असू का ?

त्या वाघाच्या अशा अचानक रस्त्यावर येण्यामुळे आजूबाजूच्या वातावरणातही एक अनोखा बदल घडून आल्याचा भास होत होता. पक्ष्यांचा कलकलाट, किलबिलाट, प्राण्यांचे हुंकार, चित्कार अचानक थांबले होते. रातकिड्यांची किरकिरही आता ऐकू येत नव्हती. एवढंच काय, सळसळत वाहणारा रानवारा देखील अगदी स्तब्ध, थंड झाला होता. जणू जंगलातील सारे प्राणी, पक्षी, कीटक, जंतू, वृक्ष, वनस्पती आणि वारा देखील श्वास रोखून आता पुढे काय होतंय याची उत्सुकतेने प्रतीक्षा करीत आहेत असं वाटत होतं.

आम्हा सर्वांचे डोळे त्या व्याघ्रराजा वर घट्ट खिळले असले तरी ड्रायव्हर कृष्णाची सावध नजर मात्र अवती भवतीचा कानोसा घेत होती. कुणाला नकळत माझ्या हाताला हलकासा चिमटा घेऊन त्यानं मला त्याच्या जवळ सरकण्याची खूण केली. त्यानुसार मी त्याच्या जवळ सरकल्यावर तो माझ्या कानात कुजबुजत म्हणाला..

“किसीं को समझे बगैर, आपकी बाजूवाले साईड मिरर में झांक के, रस्तेके पीछे की ओर देखो.. और प्ली sss ज, मुंह बिल्कुल बंद रख्खो.. किसी को कुछ भी पता न चले..”

डाव्या बाजूला सरकून मी साईड मिरर मध्ये डोकावलं. तिथे मला काहीतरी हालचाल दिसली. दोन तीन लहान मोठ्या आकृत्या रस्त्यावर बसल्या सारखं दिसत होतं. ते नेमकं काय आहे याची नीट, स्पष्ट कल्पना न आल्यामुळे अभावितपणे मी चक्क मान मागे वळवून गाडीच्या मागील बाजूच्या रस्त्याकडे बघितलं. गाडीचा मागचा नादुरुस्त दरवाजा तसाच सताड उघडा होता. त्यावेळी तिथे मला जे दृश्य दिसलं ते पाहून भीतीने माझी बोबडीच वळली.

आमच्या गाडीच्या मागे जेमतेम पंचवीस तीस फुटांवर एक अजस्त्र आकाराची वाघीण आपल्या दोन लहान बछड्यांसहित आरामात रस्त्याच्या मधोमध ठाण मांडून बसली होती. एवढंच नाही तर त्या वाघिणीच्या मागील बाजूने आणखी दोन मध्यम आकाराचे तरुण वाघ खालच्या खोलगट जंगलातून रस्त्याच्या दिशेने येत होते. जणू त्या वाघाच्या संपूर्ण फॅमिलीनेच आम्हाला पूर्णपणे घेरून टाकलं होतं.

बापरे ! गाडीच्या मागच्या भागात बायका आणि लहान मुलं बसलेली आहेत आणि दुर्दैवाने गाडीचा मागील दरवाजा बिघडला असल्याने बंद करता येत नाहीए.. चुकून आमच्यापैकी कुणी मागे पाहिलं आणि हे दृश्य पाहून त्यांनी आरडा ओरडा केला तर ? ही क्रूर, चपळ श्वापदं आमच्या गोंगाटानं जर बिथरली तर केवळ एका झेपेतच ती आमच्या पर्यंत पोहोचू शकतील या कल्पनेनेच माझ्या अंगावर काटा आला.

सुदैवाने मी व ड्रायव्हर कृष्णा वगळता गाडीतील अन्य सर्वजण समोर दिसणाऱ्या त्या दिव्य व्याघ्रमूर्ती कडे एकटक पाहण्यात एवढे गुंग होऊन गेले होते की आणखी कुठेही पाहण्याचे त्यांना भानच नव्हते. माझी घाबरलेली अवस्था कृष्णाने ओळखली. अर्थात आंतून तोही माझ्या इतकाच घाबरलेला असावा. तरीही मला धीर देत हलकेच कुजबुजत तो म्हणाला..

“सब्र रखो साब..! सिर्फ शांति बनाए रखो.. सब ठीक हो जाएगा..!”

एकमेकांच्या आमने सामने उभे ठाकलेले गाडीतील आम्ही आणि तो वाघ.. जणू परस्परांना जोखत होतो, दुसऱ्याच्या शक्तीचा, संयमाचा, पुढील हालचालीचा अंदाज घेत होतो. पलीकडून, वाट अडवून उभा असलेल्या त्या वाघाच्या मागून, विरुद्ध दिशेने एखादी गाडी यावी आणि आमची या डेड लॉक मधून सुटका व्हावी असाच मनोमन देवाचा धावा करीत होतो. जसाजसा वेळ निघत चालला होता तसातसा माझा धीरही सुटत चालला होता. गाडीच्या मागे जमा झालेलं वाघाचं ते आख्खं कुटुंब आत्ता नेमकं काय करतं आहे हे पाहण्याचं तर किंचितही धैर्य माझ्यात उरलं नव्हतं. भीतीनं व्याकुळ होऊन गाडी तशीच पुढे दामटण्याची ड्रायव्हर कृष्णाला मी कासावीस नजरेनंच विनंती केली. मात्र कृष्णा कडे जबरदस्त संयम होता. कदाचित यापूर्वीही अशा प्रसंगांतून तो गेलेला असावा. “धीर धरा.. शांत रहा.. मी आहे ना..” अशी त्याने डोळे व हातांनी मला खूण केली. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून गाडीतील स्त्रिया आणि मुलं यांनी देखील आतापर्यंत जे सावध, घट्ट मौन धारण केलं होतं ते सुद्धा खरोखरीच कौतुकास्पदच होतं.

आमच्या सुदैवाने वाघालाच आता या स्टेलमेटचा कंटाळा आला असावा. पुढील पाय लांबवून कंबर झुकवून शरीराला आळोखे पिळोखे देत त्याने एक दीर्घ आळस दिला. अचानक त्याच्या चेहऱ्यावरील निर्विकार भाव बदलून त्याजागी दुष्ट, क्रूर, हिंस्त्र, शिकारी भाव दिसू लागले. थोडं पुढे सरकून तो रस्त्याच्या कडेला गेला आणि अचानक त्यानं आपला रोख गाडीच्या दिशेनं केला. तो आता आमच्यावर हल्ला करण्याच्याच तयारीत आहे अशी माझी जवळ जवळ खात्रीच झाली. त्याचवेळी जवळच्या झाडावरील माकडांनी अचानक भयसूचक गोंगाट करायला सुरुवात केली. कुण्या अनोळखी पक्ष्याची भयावह, थरकांप उडवणारी किंकाळी सदृश कर्णभेदक तान लकेर एकाएकी आसमंतात घुमली. अचानक माजलेल्या या कोलाहलामुळे त्या वाघाचे लक्ष जरासे विचलित झाले. हाच इशारा, हीच योग्य वेळ समजून अगदी त्याचवेळी कृष्णाने एक्सलरेटर दाबून भरधाव वेगानं गाडी पुढे काढली.

त्यानंतर सतत तासभर, एखादं भूत पाठीमागे लागल्यागत, जराही मागे वळून न पाहता, वारं प्यालेल्या वासरा सारखा कृष्णा गाडी पुढे पुढे दामटीत होता. नंतर जाणवलं की नोव्हेंबरच्या त्या थंडीतही गाडीतील आम्ही सारे जण भीतीने घामाघूम झालो होतो. अतिनिकट, खुल्या व्याघ्रदर्शनाच्या त्या विलक्षण रोमांचक, जिवंत अनुभवामुळे एखादं दुष्ट स्वप्न पाहिल्यागत आम्ही सारे इतके भयचकित, मुग्ध, अबोल बनलो होतो की त्या घटनेबद्दल साधी चर्चा करण्याइतकी हिम्मत देखील आम्हा कुणामध्येच उरली नव्हती.

दुसऱ्या दिवशी सकाळी हैद्राबादला पोहोचल्यावर सर्वप्रथम गाडीचा मागील दरवाजा तातडीने रिपेअर करून घेतला.

श्रीशैल्यम्, तिरुपती, मदुराई, रामेश्वरम्, कन्याकुमारी, त्रिवेंद्रम्, उटी, म्हैसूर, बेंगलोर, हैद्राबाद अशी आठ दहा दिवसांची दक्षिण भारत सहल आटोपून उतनूरला परतलो. नंतर सहज एकदा आमचा बँकेतील अष्टपैलू व हरहुन्नरी प्युन रमेशला उतनूरच्या जंगलातील व्याघ्र दर्शनाबद्दल सांगितलं तेंव्हा तो म्हणाला..

“यहाँ जंगलमें रात के समय शेर का दिख जाना तो आम बात है। लेकिन यहां एक गांव ऐसा भी है जहाँ शेर दिनदहाड़े गांव में घुस जाता है। हमारे कुछ पुराने कर्जदार उस गांव में रहते है। चलो, कल हम आप को उस गांव में ले चलते है..! और.. सच कहूं तो साब, आपने अब तक “असली शेर” तो देखा ही नही है.. !!”

“असली शेर ? मैं कुछ समझा नही..?”

बुचकळ्यात पडून मी विचारलं..

त्यावर गूढ हसत रमेश म्हणाला..

“असली शेर याने “अन्ना..” ! वो खूंखार नक्सलाईट लोग, जिनका सिर्फ नाम सुनते ही इस पूरे एरिया के लोगोंको सांप सूंघ जाता है.. उन से भी मुलाकात होगी आपकी कभी ना कभी.. लेकिन फिलहाल.. याने की कल.. हम चलेंगे शेरों के गांव.. पुलीमडगु.. !!”

(क्रमशः 2)

 

ajay kotnis photo1

श्री अजय कोटणीस हे स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३७ पेक्षा जास्त  वर्षांचा प्रदीर्घ अनुभव  असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्याआधी त्यांनी मराठवाडा ग्रामीण बँकेतही  सेवा केली.  त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानकावर खिळवून ठेवतात.  

त्यांच्या सेवाकाळात त्यांनी आंध्र प्रदेश मधील (आताचे तेलंगणा) आदिलाबाद या नक्सलग्रस्त जिल्ह्यातील, उतनूर या दुर्गम गावी पोस्टिंग असतांना त्यांना आलेल्या अनुभवावर  आधारित, नवीन लेखमाला- “उतनूरचे दिवस” ही सुरू केली आहे. सदर लेख त्यांच्या फेसबुक पेज वरून त्यांच्या परवानगीने साभार घेऊन, त्यात कथेस अनुरूप अशी चित्रें आणि व्हिडिओ टाकून, सदरील लेखमाला या ब्लॉगच्या वाचकांसाठी प्रस्तुत करीत आहोत.


Discover more from Blissful Life

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Blissful Life

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading