अचानक झालेल्या या गर्दी गोंधळामुळे क्षणभर गांगरून मी अचंभित झालो.
“आत्ताच्या आत्ता आमचे पैसे परत करा.. !!”
उजव्या हाताची मूठ वळून ती माझ्या टेबलावर जोरजोराने आपटीत रत्नमाला ओरडत होती. तिचा पती व मुलगा हे दोघेही रागारागाने हातवारे करून तारस्वरात ओरडत तिला साथ देत होते. हा सगळा तमाशा करीत असताना अधून मधून ते आपल्या मागे पुढे, सगळीकडे नजर फिरवून बँकिंग हॉल मधील ग्राहकांचे लक्ष आपल्याकडे वेधले गेले आहे की नाही याची खातरजमा करून घेत होते.
जागीच उभा रहात दोन्ही हात उंचावून त्यांना शांत राहण्याची खूण करीत म्हणालो..
“शांत व्हा.. शांत व्हा.. ! तुम्ही काय म्हणताय ते मला अजिबात समजत नाहीये.. कुठल्या पैशाबद्दल बोलताय तुम्ही..? इथे नीट बसून मला सविस्तरपणे समजावून सांगा..”
यावर डोळे मोठ मोठे करीत रागारागाने सुखदेव किंचाळला..
“काय साहेब नाटक करताय ? काल आमच्या खात्यातून एवढी मोठी रक्कम गेली आणि तुम्ही म्हणताय की तुम्हाला काहीच माहीत नाही.. ? ते काही नाही.. आम्ही इथे बसायला आलेलो नाही.. बऱ्या बोलाने ताबडतोब आमचे पैसे देता की नाही ते सांगा.. !”
सुखदेव आणि रत्नमाला यांची ती बेभान अवस्था बघून मी त्यांच्या तरुण मुलाला.. बबनला म्हणालो,
“बबन, तू तरी सांग नेमकी काय तक्रार आहे तुमची ? काल दुपारपर्यंत मी बँकेतच नव्हतो. त्यामुळे खरंच काल काय झालं याची मला काहीही कल्पना नाही..”
“परवाच मी आईच्या खात्यात सहा लाख रुपये जमा केले होते आणि काल कुणीतरी त्यातून पाच लाख ऐंशी हजार रुपये काढून घेतले आहेत. आमच्या खात्यातले पैसे तुम्ही असे दुसऱ्या कुणालाही कसे देऊ शकता ?
बबनने एकदाचा खुलासा केला.
“काही नाही रे बबन, हे आपल्याशी खोटं बोलत आहेत.. ह्या बँकेतल्या साऱ्या कर्मचाऱ्यांनी मिळूनच आपले पैसे गिळंकृत केले आहेत.. आणि आता आपली दिशाभूल करीत आहेत.. एका स्वातंत्र्य सैनिकाच्या असहाय्य कुटुंबाची ते अशी घोर फसवणूक करीत आहेत.. यांना चांगला धडा शिकविलाच पाहिजे..”
रागाने लालबुंद होत तावातावाने सुखदेव बबनला म्हणाला.
आश्चर्य म्हणजे सुखदेव सोबत आलेले आठ दहा अनोळखी लोक कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त न करता माझ्या केबिन मध्ये शांतपणे नुसते उभे होते.
ताबडतोब अकाऊंटंट, फिल्ड ऑफिसर आणि हेड कॅशिअर या तिघांनाही माझ्या केबिन मध्ये बोलावले आणि “हे लोक काय म्हणताहेत..? तुम्हाला याबद्दल काही माहिती आहे काय ?” असं विचारलं. त्या तिघांनीही नकारार्थक मान डोलावत त्यांना याबद्दल काहीही माहीत नसल्याचे सांगितले.
मग मात्र माझं डोकंच चक्रावून गेलं. जर स्टाफ पैकी कुणालाच अशा कोणत्याही घटनेची माहिती नाही तर मग ह्या बोडखे कुटुंबाला त्याबद्दल कुणी सांगितलं.. ?
दरम्यान रत्नमालाबाईं कडून त्यांच्या खात्याचं पासबुक घेऊन अकाऊंटंट साहेब त्या खात्यात आतापर्यंत कोणकोणते व्यवहार झाले आहेत हे तपासायला घेऊन गेले होते. तोपर्यंत चपराशा कडून जास्तीच्या खुर्च्या मागवून केबिन मध्ये आलेल्या सर्व मंडळींची बसण्याची व्यवस्था केली. सर्वजण खुर्च्यांवर शांतपणे बसलेले पाहताच संजू चहावाल्याने लगबगीने सर्वांसाठी फक्कडसा चहा करून आणला.
आता सुखदेवही बराच शांत झाला होता. आत्मविश्वासाने सगळ्यांकडे पहात आपल्या बरोबर आलेल्या मंडळींचा त्याने परिचय करून दिला. ती मंडळी म्हणजे चार पत्रकार, दोन वकील, तीन राजकीय पक्षांचे स्थानिक पदाधिकारी व एक दोन सामाजिक कार्यकर्ते होते.
सर्व जण अकाऊंटंट साहेब परत येण्याची वाट पहात होते. सुखदेवने हातातील पिशवीतून कागदांची एक सुरळी काढून त्यातील एक कागद माझ्या समोर ठेवला. तो रत्नमाला बोडखे यांनी त्यांच्या खात्यातून काढले गेलेले पाच लाख ऐंशी हजार रुपये परत मिळावे या साठी मला उद्देशून लिहिलेला अर्ज होता. त्या अर्जाच्या प्रतिलिपी (copies) आमच्या बँकेचे चेअरमन, रिजनल मॅनेजर, पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी यांच्यापासून ते थेट राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, रिझर्व्ह बँक गव्हर्नर यांना अग्रेसित (forward) केलेल्या होत्या.
“आणखी तीन वर्षांनी मी रिटायर होणार आहे.. मला पेन्शन नाही.. मुलाला नोकरी नाही.. घरी वृद्ध वडील आहेत, त्यांना स्वातंत्र्य सैनिकाची पेन्शन मिळते. त्याचाच काय तो आधार आहे. निवृत्तीनंतर शेती करून उदर निर्वाह करावा अशा विचाराने बायकोचे दागिने मोडून शेती विकत घेण्यासाठी हे पैसे उभे केले होते. पण तुम्ही बँकवाल्यांनी ते खाऊन टाकले, त्यामुळे माझे शेती घेण्याचे स्वप्न चक्काचूर झाले. माझे व माझ्या कुटुंबियांचे भविष्य तुम्ही अंधःकारमय केलेत..”
एखाद्या सराईत वक्त्या प्रमाणे छापील पोपटपंची करीत सुखदेव बोडखे बोलत होता. जणू जमलेल्या पत्रकारांना पेपरात छापण्यासाठी तो तयार वाक्येच पुरवीत होता.
“जर आमच्या आयुष्यभराची पुंजी, जी तुमच्या कर्मचाऱ्यांनी हडप केली आहे, ती आम्हाला दोन दिवसात परत मिळाली नाही तर मी हे प्रकरण पोलिसांत देईन, माझ्या पत्रकार मित्रांतर्फे वर्तमानपत्रांत याबद्दल आवाज उठविन.. ! हा अर्ज घ्या.. आणि ह्या दुसऱ्या कॉपी वर Received लिहून सही शिक्का मारून द्या..”
सुखदेवचे बोलणे सुरू असतांनाच अकाऊंटंट साहेब रत्नमाला बाईंच्या खात्याची चौकशी करून केबिन मध्ये परत आले होते..
“सर, परवा या खात्यात सहा लाख रुपये जमा करण्यात आले होते आणि काल चेक द्वारे त्यातून पाच लाख ऐंशी हजार रुपये काढून घेण्यात आले आहेत. आज रोजी खात्यात फक्त वीस हजार रुपये शिल्लक आहेत.. तसंच, ही पाहा कालची व्हाऊचर्स.. ! त्यातील ह्या पाच लाख ऐंशी हजार रुपयांच्या चेक वर रत्नमाला बाईंचीच सही आहे आणि त्यांना दिलेल्या चेक बुक मधीलच हा चेक आहे..”
एका दमांतच अकाऊंटंट साहेबांनी घडाघडा सर्व माहिती सांगून टाकली.
“हा चेक तुम्हीच पास केला असेल ना ?”
मी अकाऊंटंट साहेबांना विचारलं..
“नाही साहेब ! गेले दोन दिवस मी रजेवर होतो. माझ्या जागी रविशंकर बसला होता, त्यानेच पास केला आहे हा चेक..”
“ठीक आहे.. तुम्ही जा, आणि कृपया
रविशंकरला इकडे पाठवून द्या..”
अकाऊंटंट साहेब निघून गेल्यानंतर लगेच आधी माझ्या कॉम्प्युटर वरून रत्नमाला बाईंच्या सहीचा नमुना चेक केला. तो चेकवरील सहीशी तंतोतंत जुळत होता. तसेच तो चेक ही त्या बाईंना दिलेल्या additional चेक बुक मधील असल्याचे कॉम्प्युटर दाखवीत होता.
“बघा.. !” रत्नमाला बाईंना तो चेक दाखवीत मी म्हणालो..
“हा चेक तुम्हाला दिलेल्या चेक बुक मधीलच आहे आणि त्यावरील सही सुद्धा तुमचीच आहे. या बेअरर चेकचे पेमेंट करण्यात आमच्या कर्मचाऱ्यांकडून कोणतीही चूक झाल्याचे मला तरी दिसत नाही.. !!”
माझ्या या ठासून बोलण्याचा रत्नमाला बाईंवर काहीएक परिणाम झाला नाही. तितक्याच निर्धारपूर्वक ठामपणे ती म्हणाली..
“पण मुळात ही सही मी केलेलीच नाही आणि हा चेक सुद्धा मला दिलेल्या चेक बुक मधील नाही..!”
आमचं असं संभाषण चालू असतांनाच तरुण, हसमुख रविशंकरने केबिन मध्ये प्रवेश केला. बिहारी बाबू असलेला रविशंकर अत्यंत शांत, सहृदय आणि समंजस कर्मचारी होता. गेल्या काही वर्षांपासून तो वैजापूर शाखेतच हेड कॅशियर पदावर काम करीत होता. नुकतीच त्याची अधिकारी पदावर पदोन्नती झाली होती.
“रविशंकर, ये चेक आपने पास किया है ना ? कुछ याद है, किसने लाया था ये चेक..?”
“जी हां साब ! कोई नया ही आदमी था चेक लानेवाला.. पिछले सात साल से मैं वैजापुर में रहता हूं.. यहां के लगभग सभी लोगों को मैं अच्छी तरह पहचानता हूं.. लेकिन उस आदमी को मैने पहली बार देखा था.. हो सकता है के शायद किसी दूसरे गांव का हो.. लेकीन.. प्रॉब्लेम क्या है साब.. ?”
रविशंकर आतापर्यंत बँकेच्या मागील बाजूस असलेल्या डायनिंग रूम मध्ये दार लावून शांतपणे पीक कर्जाची डॉक्युमेंट्स तयार करीत बसला असल्याने बाहेर चाललेल्या गोंधळाची त्याला काहीच कल्पना नव्हती.
“ये डिपॉझिटर मॅडम कहती है के उन्होंने ऐसा कोई चेक कभी किसी को भी दिया ही नहीं था..”
“ओ माय गॉड ! लेकीन ये कैसे हो सकता है ? चेक तो मॅडम को इश्यू किए गए चेक बुक में से ही था.. और चेक पर जो सिग्नेचर था वो भी scanned speciman signature से हुबहू मेल खा रहा था।”
बिचारा रविशंकर..!! अधिकारीपदी प्रमोशन झाल्यानंतर पहिल्यांदाच “पासिंग” ला बसला होता. त्याला या प्रकाराचं विलक्षण आश्चर्य वाटत होतं.
“लेकीन मॅडम.., आपको दिया गया चेक बुक किसी दूसरे के हाथ कैसे लग सकता है ? जरूर आपने चेक बुक अच्छी तरह सम्हालकर नही रखा.. ये आप की ही लापरवाही का नतीजा है के चेक गलत हाथों में पड़ा..!!”
रविशंकरच्या या बोलण्याचा उलटाच परिणाम झाला. सुखदेव बोडखे रागाने ताडकन खुर्चीवरून उठला आणि म्हणाला..
“उगीच तुमच्या चुकीचं खापर आमच्या डोक्यावर फोडू नका हं साहेब.. बँकेतून नेलेलं चेक बुक आम्ही कपाटात नीट सुरक्षित ठेवलंय. आत्ताच तपासून आलोय मी. त्यातील दहाचे दहा चेक तसेच आहेत..”
“अहो पण तुम्ही एक जास्तीचं चेक बुक सुद्धा घेतलं होतं ना त्या खाजगी बँकेत देण्यासाठी.. ?”
… माझे हे शब्द पूर्ण होण्या अगोदरच सुखदेव त्याच्या बरोबर आलेल्या मंडळींना म्हणाला..
“चला रे.. ! यांचा आज तरी पैसे परत करण्याचा इरादा दिसत नाही.. यांना काय गोंधळ घालायचाय तो घालू दे, काय चौकशी करायचीय ती करून देत.. उद्या पर्यंत जर आमचे पैसे परत मिळाले नाहीत तर यांच्याविरुद्ध पोलिसांत जाण्याशिवाय अन्य मार्ग मला दिसत नाही..”
“हे बघा, आधी आपण कालचं सीसीटीव्ही फुटेज चेक करू. ज्या कुणी हा चेक प्रेझेंट करून पैसे नेले आहेत तो माणूस तुमच्या ओळखीचा आहे कां ते बघा. तसंच आधी आम्हाला आमच्या वरिष्ठांना या घटनेबाबत कळवावं लागेल आणि त्यांच्या सुचनेनुसारच पुढची पाउले उचलावी लागतील. माझी नम्र विनंती आहे की या तपासात तुम्ही सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं..”
परंतु माझ्या या विनंतीचा सुखदेव आणि त्याच्या कुटुंबियांवर काहीएक परिणाम झाला नाही. त्यांचं तमाशा करून बँकेत गोंधळ घालण्याचं आणि धमकी देण्याचं काम पूर्ण झालं होतं.
“तुमच्या तपासाशी आम्हाला काहीच देणंघेणं नाही. हे सारं नाटक आहे. गरिबांचा तळतळाट घेऊ नका साहेब, ताबडतोब आमचे पैसे परत करा. वाटल्यास तुमच्या वरिष्ठांना आजच वैजापूरला बोलावून घ्या. कारण मी फक्त उद्यापर्यंत थांबेन. आणि उद्या संध्याकाळ पर्यंत माझ्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत तर मात्र नाईलाजाने मला हे प्रकरण पोलिसांकडे द्यावे लागेल.. विचार करा आणि त्वरित निर्णय घ्या..”
“चला रे ! उद्याचा दिवस आपण वाट पाहू आणि मग आपलं ठरल्याप्रमाणे करू..”
सुखदेवने इशारा करतांच एक ही शब्द न बोलता केबिन मधील सर्व जण उठले आणि आज्ञाधारकासारखे सुखदेव मागोमाग निमूटपणे बँकेबाहेर निघून गेले.
ते लोक जाताच रविशंकरला शेजारी बसवून घेत सीसीटीव्हीचा माउस हातात घेऊन कालचं रेकॉर्डिंग चेक करू लागलो. सकाळी ठीक साडे दहा वाजता एक अदमासे तिशीच्या आसपास असलेला गृहस्थ काउंटर क्लार्ककडे चेक देताना दिसला. त्याला पाहताच उत्तेजित होऊन रविशंकर म्हणाला..
“यही है.. ! यही है साब.. वो पांच लाख अस्सी हजार के चेकवाला..”
थोडा वेळ काउंटर क्लार्कशी बोलून टोकन घेऊन तो माणूस कॅश काउंटरच्या रांगेत उभा राहिलेला दिसला. रांगेतील अन्य लोकांशी तो माणूस जुनी ओळख असल्यागत हसून बोलत होता. त्याचा नंबर आल्यावर कॅशियरशी एक दोन शब्द बोलून तो रिकाम्या हातीच परत फिरून सरळ बॅंकेबाहेर गेलेला दिसला.
“हम स्ट्रॉंग रूम में से जादा कॅश नही निकालते. सुबह बगलका पेट्रोल पंप जो कॅश जमा कराता है उसीमें से सभी पेमेंट किये जाते है। कल पेट्रोल पंप की कॅश आने में थोडा समय था, इसलीये कॅशियर साब ने ऊस आदमी को दोपहर दो बजे आने को कहा था..”
रविशंकरने खुलासा केला.
त्यानंतर तो माणूस पुन्हा दुपारी अडीच वाजता बँकेत आलेला दिसला. पण त्या वेळी कॅशियर लंचला गेला असल्यामुळे थोडा वेळ हॉल मध्येच थांबून मग तीन वाजता पुन्हा काउंटर सुरू झाल्यावर तो काउंटर वर गेला आणि पाच लाख ऐंशी हजार घेऊन जाताना दिसला. अशा प्रकारे सकाळी साडे दहा ते दुपारचे तीन या दरम्यान तो माणूस बँकेत दिसत होता.
मी लगेच सर्व स्टाफ मेंबर्स तसेच बँकिंग हॉल मधील सर्व ग्राहकांना आत बोलावून त्यांना सीसीटीव्हीत दिसणारा तो कॅश नेणारा माणूस दाखवला. मात्र तो माणूस कुणाच्याच ओळखीचा नव्हता. आम्ही दिवसभर ही शोध मोहीम राबविली. मोंढ्यातील मुनींमांच्या हातात असते तशी थैली त्या माणसाकडे दिसत होती, म्हणून आमच्या मोंढ्यातील सर्व कस्टमर्सना फोन करून बँकेत बोलावून घेतले. पण कुणालाच तो माणूस ओळखता आला नाही.
दुसऱ्या चेकबुक बद्दल सुखदेव काहीच बोलण्यास तयार नव्हता म्हणून मला शंका आली. मी सेव्हिंग बँक क्लर्क बेबी सुमित्राला बोलावून विचारलं..
“सुमित्रा, आपनेही रत्नमाला मॅडम को दूसरा चेकबुक इश्यु किया था नं ?”
“जी हां साब. “
“आपने दुसरा चेक बुक देने से पहले उनसे अर्जी ली थी नं..?”
“जी हां साब.. अर्जी लेने के बाद मैने पहले सिग्नेचर व्हेरीफाय की और दूसरा चेक बुक सिस्टिम में फीड करने के बाद ‘चेक बुक इश्यु रजिस्टर’ में लिख कर रविशंकर साब के पास चेकिंग के लिए भेज दिया..”
बेबी सुमित्राने खणखणीत आवाजात उत्तर दिलं. छत्तीसगडच्या आदिवासी भागातून आलेली बेबी सुमित्रा अवघ्या तीन महिन्यांपूर्वीच बँकेत लागली होती. साधी, सरळ बेबी जितकी मेहनती आणि कष्टाळू तितकीच निर्भीड व स्पष्टवक्ती होती.
“बहुत अच्छा ! वो अर्जी और चेकबुक इश्यु रजिस्टर यहां लेकर आओ..”
“अभी लाई, सर !” असं म्हणत बेबी सुमित्रा लगबगीने रेकॉर्ड रूमकडे निघाली.
दरम्यान, कॉम्पुटरचं काम करणाऱ्या गावातील टेक्निशियनला सीसीटीव्हीचं त्या दिवशीचं फुटेज पेन ड्राईव्ह मध्ये घेऊन त्याची सीडी तयार करायला सांगितलं. तसंच फुटेज मधून त्या संशयित व्यक्तीचा वेगवेगळ्या अँगल मधून फोटो घेऊन तो एनलार्ज करून त्याच्या भरपूर कॉपीज प्रिंट करायलाही सांगितलं. अवघ्या तासाभरातच सीसीटीव्ही फुटेजची सीडी व संशयिताचे फोटो त्याने बँकेत आणून दिले. सीडी अलमारीत सुरक्षित ठेवून संशयिताच्या फोटोच्या कॉपीज सगळ्या वॉचमन, प्युन व कर्मचाऱ्यांना दिल्या. बँकेत येणाऱ्या प्रत्येक कस्टमरला तो फोटो दाखवून “कुणी त्याला ओळखतं का ?” याचा शोध सुरू झाला.
बराच वेळ झाला तरी बेबी सुमित्रा अद्याप तो दुसऱ्या चेकबुक साठीचा अर्ज व चेकबुक इश्यु रजिस्टर घेऊन आली नसल्याने ती काय करते आहे हे पहायला मी रेकॉर्ड रुम मध्ये गेलो. बेबी सुमित्रा तिथल्या डस्ट बिन मधील फाडलेले, चुरगाळलेले कागद एक एक करून तपासून पहात होती. फायलिंगचं काम करणारा प्युन (दप्तरी) देखील तेच करीत होता.
“ये क्या कर रही हो सुमित्रा ? वो अर्जी तो फायलिंग में ही मिलेगी ना ?”
“सर, फायलिंग में सिर्फ वो ही अर्जी नही मिल रही.. ऊस दिन की बाकी सभी चेक बुक रिक्विझिशन स्लिपस् ठीक ढंग से फाईल कि हुई है.. मुझे तो ये किसीने जानपुछकर, इरादतन किया हुआ काम लगता है..”
बेबी सुमित्राच्या म्हणण्यात तथ्य दिसत होतं. तरीही तिला तो अर्ज शोधणं सुरूच ठेवायला सांगून मी चेकबुक इश्यु रजिस्टर मागवलं. त्यात रत्नमाला बोडखेला दिलेल्या चेक बुकचा नंबर, खातेदाराचे नाव व खाते क्रमांक, चेकिंग ऑफिसरची सही इत्यादी तपशील व्यवस्थित लिहिला होता. त्यानंतरच्या कॉलम मध्ये चेक बुक नेणाऱ्याची सही देखील होती. ते पाहून मी सुटकेचा निश्वास सोडला.
“चला..! आपल्याकडे त्या बोडखेने बँकेतून दुसरं चेकबुक नेल्याचा लेखी पुरावा तर आहे.. !!”
मी मनाशीच म्हणालो..
मात्र ती सही रत्नमालाची वाटत नव्हती. त्यामुळे दुसरं चेकबुक घ्यायला काउंटरवर कोण आलं होतं याबद्दल बेबीला विचारलं तेंव्हा सुखदेव बोडखेचा मुलगा बबन हा आपली आई रत्नमालाला घेऊन चेकबुक नेण्यासाठी आल्याचं समजलं. चेकबुक द्यायला फक्त पाच मिनिटे उशीर झाला तेंव्हा हा बबन स्टाफशी भांडण करीत अपशब्दही बोलला असल्याचं बेबी सुमित्राला चांगलंच आठवत होतं.
“म्हणजे ही चेकबुक नेल्याची सही बबनची आहे तर..” मी स्वतःशीच पुटपुटलो.
“नाही सर !”
माझं पुटपुटणं ऐकतांच अकाऊंटंट साहेबांनी लगेच खुलासा केला.
“ती सही बबनची नाही. त्या अगोदरचं चेकबुक ज्यानं नेलं त्याची आहे. चुकून त्याने एक ओळ खाली, म्हणजे रत्नमाला बाईंच्या नावासमोर सही केली आहे. नीट काळजीपूर्वक पाहिल्यावरच ते समजून येतं..”
ते ऐकून मी हादरलोच. अरे बापरे ! एकतर दुसऱ्या चेकबुक साठीचा अर्ज गहाळ आणि चेकबुक इश्यू रजिस्टरवर कस्टमरची सही सुद्धा नाही.. म्हणजेच रत्नमालाबाईंना दुसरं चेकबुक दिल्याचा कुठलाही पुरावा बँकेकडे नाही. म्हणूनच तर तो सुखदेव एवढ्या आत्मविश्वासाने बोलत होता..
आता काय करायचं ? अशा प्रसंगी शाखेच्या पातळीवर जे जे काही करता येणं शक्य होतं ते ते करून झालं होतं. त्यामुळे वरिष्ठांच्या कानावर आता हे प्रकरण घालायलाच हवं असा विचार करून रिजनल मॅनेजर साहेबांना फोन करून थोडक्यात त्यांना संपूर्ण प्रकरणाची कल्पना दिली.
“मी उद्या शिर्डीच्या दिशेने जाणारच आहे, तेंव्हा वाटेत सकाळी थोडावेळ वैजापूरला थांबेन.. त्यावेळी बोलू. जमल्यास त्या तक्रारदारालाही मला भेटण्यासाठी बँकेत बोलावून घ्या.”
एवढं बोलून रिजनल मॅनेजर साहेबांनी फोन ठेवला.
तो दिवस खूपच तणावपूर्ण धावपळीत गेला. शाखेतील सर्वच कर्मचारी एकदिलाने या आकस्मिक संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज झाले होते. त्या संशयिताचे फोटो घेऊन प्रत्येक कर्मचारी जो भेटेल त्याच्याकडे चौकशी करीत होते. काही जण बस स्टँड, रेल्वे स्टेशन, लॉज, हॉटेल्स, पानाचे ठेले अशा गर्दीच्या ठिकाणी जाऊन त्या इसमाचा ठावठिकाणा शोधण्याचा प्रयत्न करीत होते. दिवसभर शोधूनही दुसऱ्या चेकबुक साठीचा “तो अर्ज” अजून सापडला नव्हता. सीसीटीव्हीचे फुटेज अनेकदा पाहून झाले होते. काही तरी महत्वाचा “क्लु” अगदी नजरे समोरच आहे पण हाती येत नाहीये असं राहून राहून जाणवत होतं.
उद्या सकाळी नऊ वाजता रिजनल मॅनेजर साहेब येणार असून त्यांना भेटण्यासाठी शाखेत लवकर येण्याबाबत सर्व स्टाफला कळविले. तसेच सुखदेव बोडखे यालाही फोन करुन तसा निरोप दिला. रात्री उशिरापर्यंत सर्व जण काळजीपोटी बँकेतच थांबले होते. कुणीतरी खूप विचारपूर्वक प्लॅन करून बँकेची फसवणूक केल्याची सर्वांनाच मनोमन खात्री पटली होती. काही जण सुखदेव बोडखेच्या कुटुंबाबद्दल माहिती गोळा करण्यासाठी गावात गेले होते. त्यांनी आणलेली माहिती धक्कादायक होती.
घटनेचा तिसरा दिवस उजाडला. सर्वजण सकाळी साडेआठ वाजताच बँकेत येऊन RM साहेबांची वाट पहात बसले होते. इतक्यात संजू चहावाला घाईघाईत बँकेत येताना दिसला. त्याच्या चेहऱ्यावर चिंतेचे भाव दिसत होते. केबिन मध्ये येऊन मला नमस्कार केल्यावर त्याने हातातील वर्तमानपत्रे माझ्या समोर ठेवली. दैनिक लोकमत, दै. सकाळ, दै. पुण्य नगरी अशा प्रमुख वर्तमानपत्रांचे ते आजचे अंक होते. आणि त्या सर्व पेपरात एकच बातमी ठळक अक्षरात छापून आली होती..
*”वैजापूरच्या स्टेट बँकेत प्रचंड रकमेचा अपहार.. कर्मचाऱ्यांनी संगनमताने हडप केले गरीब कुटुंबाचे पाच लाख ऐंशी हजार रुपये.. प्रकरण पोलिसांकडे..”*
श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद
(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)
ही लेखमाला श्री कोटणीस यांच्या फेसबुक पेज वर नुकतीच त्यांनी प्रसिद्ध केली आहे आणि तिला वाचकांचा भरभरून प्रतिसाद नेहमीप्रमाणे मिळतो आहे. इथे ही लेखमाला या ब्लॉगच्या वाचकांसाठी, श्री कोटणीस यांच्या परवानगीने प्रसिद्ध करीत आहोत.
श्री अजय कोटणीस हे बँकेतील माझे सहकारी असून, स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानकावर खिळवून ठेवतात.
त्यांना मराठवाड्यातील एका गावी बँकेत शाखा प्रमुख असतांना आलेल्या अनुभवावर आधारित, एक प्रसंग त्यांनी त्यांच्या खास शैलीत वर्णन केला आहे