श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद
(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)
ही लेखमाला श्री कोटणीस यांच्या फेसबुक पेज वर नुकतीच त्यांनी प्रसिद्ध केली आहे आणि तिला वाचकांचा भरभरून प्रतिसाद नेहमीप्रमाणे मिळतो आहे. इथे ही लेखमाला या ब्लॉगच्या वाचकांसाठी, श्री कोटणीस यांच्या परवानगीने प्रसिद्ध करीत आहोत.
बँकस्य कथा रम्या..
“स्थितप्रज्ञ आणि उलटलेला डाव..”
अगदी एखाद्या रहस्यमय कादंबरीत शोभावी अशी एक घटना मी वैजापुरच्या स्टेट बँकेत व्यवस्थापकपदी असताना घडली, त्याचीच ही चित्तरकथा.. नव्हे चित्तथरारक कथा.. !!
सुखदेव बोडखे नावाचा साधारण पन्नास पंचावन्न वर्षे वयाचा बँकेचा एक जुना खातेदार एके दिवशी आपल्या बायकोला घेऊन बँकेत आला. त्याला बायकोच्या नावाने चेक बुक सुविधा असलेले खाते उघडायचे होते. तो स्वतः औरंगाबादला कुठल्यातरी सरकारी खात्यात चपराशाची नोकरी करीत होता. त्याला स्वत:च्या मुलासाठी मोटारसायकल घ्यायची होती. नोकरीचा कालावधी पाच वर्षांहून कमी उरल्याने त्याला त्याच्या ऑफिसमधून कर्ज मिळू शकत नसल्याने बायकोच्या नावाने खाजगी बँकेतून तो कर्ज घेणार होता.. आणि त्या खाजगी बँकेला देण्यासाठी त्याला चेक बुक हवे होते.
सुखदेव बोडखेचे आमच्या बँकेत खाते असल्याने त्याच्या introduction ने लगेच त्याची बायको रत्नमालाच्या नावाने खाते उघडून दिले. अवघ्या अर्ध्या तासात नवीन खात्याचे पासबुक व चेकबुक हातात पडल्याने खुश होऊन माझ्या केबिनमध्ये येऊन दोन्ही हात जोडून नमस्कार करून माझे आभार मानीत आनंदी चेहऱ्याने सुखदेव बँकेतून निघून गेला. अतिशय नम्र आणि मृदुभाषी असलेल्या सुखदेवचे ते आभार मानण्याचे gesture मला खूप आवडले आणि आतून मनोमन सुखावुनही गेले.
सुमारे आठ दिवसांनी सुखदेव बायकोला घेऊन पुन्हा बँकेत आला. “आपण दिलेल्या चेकबुक मध्ये फक्त दहाच चेक आहेत आणि त्या खाजगी बँकेला कर्जास तारण म्हणून किमान वीस कोरे (Blank) चेक द्यावे लागतात.. म्हणून मला दहा चेकचे आणखी एक चेकबुक द्या..” असे तो म्हणत होता.
नियमानुसार रत्नमाला बोडखेच्या नावाने additional चेकबुकसाठीचा अर्ज घेऊन ताबडतोब त्याला दुसरे चेक बुक देण्यात आले. Additional चेकबुक चार्जेस संबंधित खात्याला डेबिट टाकण्यात आले. याही वेळी तत्पर सेवेबद्दल अदबीने मान झुकवून माझे आभार मानीत सुखदेव बायकोसह निघून गेला. त्याचा तो नम्र, शालीन, विनयशील स्वभाव अंतर्यामी मला खूपच भावला..
तो गेल्यानंतर मी सहज स्वतःशीच विचार करीत बसलो. एव्हाना वैजापुरला येऊन मला वर्ष होत आलं होतं. सुरवातीचं नवखेपण सरून बँकेच्या दैनंदिन कामकाजावर माझी आता चांगलीच पकड बसली होती. डिपॉझिट आणि कर्ज वाटपाची वर्षभराची सर्व टार्गेट्स मी मुदतीपूर्वीच अचीव्ह केली होती. भरपूर कर्जवसुलीमुळे अनुत्पादक कर्जाचे (NPA) प्रमाणही खूप घटले होते. भरीस भर म्हणून इन्शुरन्सचा मुख्य (?) बिझिनेसही पुरेसा केल्यामुळे वरिष्ठही माझ्यावर प्रसन्न होते.
सुदैवाने शाखेतील सर्व स्टाफ खूप कष्टाळू व आज्ञाधारक होता. एक दोन जुने सिनियर वगळता बहुतांश कर्मचारी तरुण, उत्साही होते. वैजापुरलाच रहात असल्याने सर्वांच्या घरी जाऊन मी त्यांची आपुलकीने विचारपूस करीत असे. या ना त्या निमित्ताने अधून मधून सर्वांना बाहेर जेवायला घेऊन जात असे. कधी जवळच असलेल्या शिर्डीला दर्शनासाठी तर कधी एखाद्या शेतकऱ्याचा शेतावर हुरडा खाण्यासाठी लहान लहान सहली काढीत असे. त्यामुळे सर्व स्टाफशी खूप जवळीक निर्माण झाली होती.
एकंदरीत बँकेत सर्वच स्तरावर अत्यंत खेळीमेळीचं, मित्रत्वाचं आणि परस्पर विश्वासाचं वातावरण होतं. कुणाही मॅनेजरला सदैव हवंहवंसं वाटणारं स्थैर्य, शांती आणि चिंतामुक्त समाधान मला आता कुठे नुकतंच लाभू लागलं होतं.
मात्र ही वादळापूर्वीची शांतता होती. क्रूर नियतीने आमचं सौख्य हिरावून घेण्यासाठी केंव्हाच फासे फेकले होते. येणाऱ्या अकल्पित संकटाच्या यातनाचक्रात आम्ही सारे भरडून निघणार होतो. आमच्या दिशेने घोंगावत येणाऱ्या या आगामी भीषण भयकारी झंझावाताची त्यावेळी कुणालाही सुतराम कल्पना नव्हती.
ज्या दिवशी सुखदेव बोडखे दुसरे एक्स्ट्रॉ चेक बुक घेऊन गेला त्याच दिवशी दुपारी माझा जालन्याचा जिवलग मित्र अरुण भालेराव याचा फोन आला. हा माझा मित्र जालन्या जवळील आनंदगडच्या महाराजांचा शिष्य होता. दरवर्षी प्रमाणे हे महाराज आपल्या शिष्यांसह पालखी घेऊन वारीसाठी निघाले होते. वाटेत ते “कोली” नावाच्या गावात सकाळी थोडा वेळ थांबणार होते. तिथे गावकऱ्यांतर्फे सर्व वारकऱ्यांना फराळ दिला जाणार होता.
कोली हे गाव वैजापूर पासून फक्त पंधरा किलोमीटर दूर होते. तसेच ते भालेरावचे पैतृक गाव ही होते. भालेरावचे वडील बंधू निवृत्ती नंतर तेथील घरात राहून वडिलोपार्जित शेती पहायचे. माझा त्यांच्याशी जुजबी परिचय होता. अनायासे मी कोली गावापासून जवळच रहात असल्याने महाराजांचे स्वागत करण्यासाठी मी आदल्या दिवशीच कोली गावात जावे आणि त्यांच्या भावाकडे रात्री मुक्कामास रहावे असा भालेरावने आग्रह धरला.
योगायोगाने कोली गावाजवळील खंडाळा येथील एका गृह मालमत्तेवर जप्तीची ताबा नोटीस (Sarfaesi) सर्व्ह करण्यासाठी दुसऱ्या दिवशी सकाळी मला जायचेच होते, तेंव्हा.. आज रात्री कोली गावात मुक्काम करावा व उद्या सकाळी खंडाळ्याची ताबा नोटीस सर्व्ह करून दुपार पर्यंत बँकेत यावे असं मी ठरवलं. त्याप्रमाणे रिजनल ऑफिसला फोन करून यासाठी त्यांची परवानगीही घेतली.
संध्याकाळी सहा नंतर मोटार सायकल घेऊन कोली गावाकडे निघालो. अर्ध्या तासातच गावात पोहोचलो. गाव मुख्य रस्त्याला अगदी लागूनच होतं. भालेरावांचे घर शोधून त्यांच्या घरात प्रवेश केला तेंव्हा तिथे गावातील काही वयोवृद्ध जाणकार मंडळी सतरंजीवर बसून ज्ञानेश्वरीचे पठण करीत होती. मला पाहताच भालेरावांनी उठून उभे रहात माझे स्वागत केले व उपस्थितांशी माझा परिचय करून दिला.
समोर असलेले ज्ञानेश्वरीचे जाडजूड पुस्तक मी सहज चाळून पाहिले. ती साखरे महाराजांची सुलभ ज्ञानेश्वरी होती.
“तुम्ही ज्ञानेश्वरी वाचली आहे काय ?”
भालेरावांनी उत्सुकतेने विचारले..
“होय. संत ज्ञानेश्वरांनी प्राकृत मराठी भाषेत लिहिलेली “भावार्थ दीपिका” म्हणजेच ज्ञानेश्वरी समजण्यास जरा कठीण आहे. कारण त्यातील बरेच शब्द आता प्रचलित नाहीत. ज्ञानेश्वरांनी गीतेतील कठीण श्लोकांचा अर्थ समजावून सांगण्यासाठी
दैनंदिन जीवनातील अनेक उदाहरणे (दृष्टांत) दिले आहेत.
सोनोपंत उर्फ मामासाहेब दांडेकरांची सुलभ ज्ञानेश्वरी मी वाचली आहे. ज्ञानेश्वरी म्हणजे श्रीमद् भगवदगीतेवरील टीका.. अशीच टीका लोकमान्य टिळकांनी “गीता रहस्य” नावाने लिहिली. त्यांच्यापूर्वी मध्वाचार्य, रामानुजाचार्य, पंडित त्रिविक्रम, आदिशंकराचार्य यांनीही गीतेवर भाष्य केले आहे. आचार्य विनोबा भावे यांनी “गीताई” तसेच “गीता प्रवचने” यातून अतिशय रसाळ भाषेत गीतेचे निरूपण केले आहे. या सर्वांनी आपापल्या दृष्टिकोनातून गीतेचा वेगवेगळा अर्थ लावला आहे. यापैकी काही पुस्तके, ग्रंथ मी वाचले आहेत. पण तरीही प्रत्येक वेळी गीता वाचताना तिचा वेगळाच, नवीन अर्थ समजतो.”
माझे उत्तर ऐकून जमलेले सर्व जण चकित झाल्यासारखे दिसले. मी कोणी फार विद्वान, प्रकांड पंडित असल्याचे भाव त्यांच्या चेहऱ्यावर उमटले. गीतेबद्दल, ज्ञानेश्वरीबद्दल काही अत्यंत साध्या तर काही थोड्या जटिल शंका मग त्यांनी विचारल्या. माझ्या तुटपुंज्या पुस्तकी ज्ञानाच्या जोरावर यथामती मी त्यांचे समाधानही केले.
“द्वैत अद्वैत म्हणजे काय ? ब्रह्म, प्रकृतीपुरुष, वेदांत, मोक्ष म्हणजे काय ? अशा विविध विषयांवर सखोल चर्चा झाल्यानंतर..
“स्थितप्रज्ञ” म्हणजे कोण ? आणि संसारात राहून आपण स्थितप्रज्ञ राहू शकतो काय ?”
असा प्रश्न भालेरावांनी विचारला.
उत्तरादाखल मी म्हणालो..
“ज्या पुरुषाची बुद्धी स्थिर झाली आहे अशा पुरुषाला स्थितप्रज्ञ असे म्हणतात. अशा माणसाला कोणतीही आशा, अभिलाषा नसते. तो सदा तृप्त असून सुख व दुःख यांमुळे त्याला आनंद किंवा उद्वेग होत नाही.
कासव ज्याप्रमाणे आपले अवयव (डोके व हात, पाय) स्वतःच्या इच्छेनुसार आवरून घेते किंवा बाहेर काढते त्याप्रमाणे त्याची इंद्रिये त्याच्या पूर्णपणे ताब्यात असतात. आत्मबोधाने तो सदा संतुष्ट असतो.”
माझ्या उत्तराने सर्वांचे समाधान झाल्यासारखे दिसले. मात्र “तुम्ही स्थितप्रज्ञ अवस्था अनुभवली आहे काय ?” या एका गावकऱ्याच्या पुढील प्रश्नावर..
“आतापर्यंत तरी नाही. परंतु यापुढे जेंव्हा भलं मोठं संकट पुढे उभं ठाकेल त्यावेळी मात्र स्थितप्रज्ञ राहण्याचा जरूर प्रयत्न करेन..”
असे थातुर मातुर उत्तर देऊन वेळ मारून नेली.
चर्चा बरीच रंगत गेल्यामुळे रात्री झोपायला खूप उशीर झाला. खेड्यातील लोक आपण समजतो तसे निरक्षर, अडाणी नसतात तर शहरी लोकांपेक्षा जास्त वाचन-अनुभवसंपन्न आणि अभ्यासू विचारवंतही असतात याची मला नव्यानेच प्रचिती आली.
ठरल्याप्रमाणे आनंदगडची पालखी सकाळी आठ वाजता कोली गावात आली. गावकऱ्यांनी वारकऱ्यांच्या न्याहरीसाठी पोटभर उपमा व गोड बुंदीची व्यवस्था केली होती. न्याहरीनंतर महाराजांनी अर्ध्या तासाचे प्रभावी प्रवचन करून गावकऱ्यांना मंत्रमुग्ध केले. दहा वाजता पालखीने गावातून प्रयाण केल्यावर सर्वांचा निरोप घेऊन मी ही खंडाळ्याच्या दिशेने निघालो.
खंडाळ्याचे काम पूर्ण होण्यास अपेक्षेपेक्षा खूपच जास्त वेळ लागला. आधी तर बॅंकेची ताब्याची नोटीस (Sarfaesi) घरावर लावून घ्यायलाच तो थकीत कर्जदार तयार नव्हता. कसेबसे त्याला समजावून चार लोकांसह नोटीस लावलेल्या घराचे फोटो काढून घेतले. तोपर्यंत जेवणाची वेळ झाली असल्याने बस स्टँड वरील हॉटेलात जे मिळेल ते खाऊन घेतले. अधून मधून बँकेत फोन करून दैनंदिन कामाबद्दल विचारपूस करीतच होतो. बँकेत पोहोचलो तेंव्हा दुपारचे साडेतीन वाजले होते.
तोपर्यंत बँकेतील गर्दी ओसरली होती. टेबलावर बसल्यावर दिवसभराचं साचलेलं काम भराभर हातावेगळं करू लागलो. सर्वात आधी फिल्ड ऑफिसरने तयार केलेल्या पीक कर्जाच्या पन्नास एक डॉक्युमेंट्सवर सह्या केल्या, महत्त्वाची डाक पाहिली, Sundry, Suspense, IBIT, DP या सारख्या ऑफिस अकाऊंटस् वरून एक नजर फिरवली, काही मोठ्या थकीत कर्जदारांना वसुलीसाठी फोन केले, रिजनल ऑफिसला NPA reduction, Crop loans, Personal loans, Housing loans disbursed, SB/CA a/cs opened, SBI Life इत्यादी दैनंदिन माहिती कळवली. त्यानंतर कॅश स्क्रोल बंद करून हेड ऑफिसची साईट उघडून महत्त्वाची सर्क्युलर्स काळजीपूर्वक वाचून काढली.
ही सर्व कामं करीत असतांनाही काल रात्रीची ज्ञानेश्वरी वरील चर्चा आणि एका गावकऱ्यांने विचारलेला स्थितप्रज्ञ अवस्थेबद्दलचा तो प्रश्न सारखा आठवत होता. “खरोखरीच, आपण पराकोटीच्या सुख-दुःखातही अजिबात विचलित न होता संयम राखू शकतो का ? यशाने उन्मत्त न होता आणि संकटांनी घाबरून न जाता मानसिक संतुलन कायम टिकवून ठेवू शकतो का ?”… मी स्वतःशीच विचार करीत होतो.
स्ट्राँग रूम क्लोज करून कॅशियर व अकाऊंटंट साहेब “गुड नाईट” करत निघून गेले. बाकीचा स्टाफ आधीच बाहेर पडला होता. फिल्ड ऑफिसर उद्या वाटप करायच्या पीक कर्जाची कागदपत्रे तयार करीत बसले होते. रात्रीचे दहा वाजल्यावर ते ही काम आवरून केबिन मध्ये आले, तेंव्हा मी सीसीटीव्हीच्या दिवसभरातील रेकॉर्डिंगवर धावती नजर फिरवीत होतो.
भिंतीवरील घड्याळाकडे पहात खुर्चीवरून उठलो आणि त्यांच्या सोबत बाहेर पडलो. जेवण झाल्यावर फिल्ड ऑफिसर म्हणाले..
“साहेब, रोजच्या सारखे आता पुन्हा बँकेत जाऊन काम करत बसू नका.. दिवसभराच्या दगदगीने थकले असाल, रूम वर जाऊन मस्त आराम करा.. उद्या सकाळी पुन्हा उठून बँकेत यायचेच आहे..”
त्यांचा काळजीचा सल्ला मानून रूमवर आलो. पलंगावर पडून झोपेची आराधना करीत असतानाही “विपरीत परिस्थितीतही आपण खऱ्या अर्थाने स्थितप्रज्ञ राहू शकतो काय ?” हाच विचार मनात घोळत होता.
दुसऱ्या दिवशी रोजच्याप्रमाणे पहाटे उठून मॉर्निंग-वॉक झाल्यावर अंघोळ करून मारुती मंदिरात दर्शनासाठी गेलो. तिथून सरळ बँकेत आलो. बँकेत शिरताना मेन गेट जवळील संजू चहावाल्याच्या दुकानाच्या पायरीवर सुखदेव बोडखे आपल्या बायकोसह बसलेला दिसला. एवढ्या सकाळी त्याला बँकेसमोर पाहून आश्चर्य वाटलं. त्याच्याकडे पहात हसत हसत म्हणालो..
“आज एवढ्या सकाळी बँकेत काय काम काढलंत..?”
माझ्या या प्रश्नावर सुखदेवने काहीच उत्तर दिलं नाही, उलट आपली मान विरुद्ध दिशेला फिरविली.
बहुदा त्याला मी बोललेलं नीट ऐकू गेलं नसेल असं वाटून पुन्हा म्हणालो..
“अरे वा ! मोटार सायकलचे पेढे द्यायला आलात वाटतं ? झालं ना तुमचं कर्जाचं काम ? कि आणखी तिसरं ही चेक बुक लागतंय त्या खाजगी बँकेला ?”
माझ्या या बोलण्यावर सुखदेवने काहीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. माझ्या बोलण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून तो बायकोला उपरोधिक स्वरात म्हणाला..
“ए, तू रस्त्यात काय बसलीस.. बाजूला सरक, साहेबाला जाऊ दे.. कामाची माणसं आहेत ती.. आपल्या सारखी भिकार, रिकामटेकडी थोडीच आहेत.. “
सुखदेव सारख्या विनम्र माणसाकडून असं हेटाळणीपूर्ण वागणं मुळीच अपेक्षित नव्हतं. तरी देखील माणुसकी म्हणून त्याला म्हणालो..
“बँक उघडायला अजून दीड तास अवकाश आहे.. काही अर्जंट काम होतं का ?”
“जा नं साहेब गुमान.. उगीच आमच्या नादी का लागता ? आधीच आम्ही आमच्या परेशानीत आहोत.. तुम्ही तुमचं काम बघा, विनाकारण आमच्यात नाक खुपसू नका..”
सुखदेवच्या तोंडचे ते तुसडे शब्द ऐकून मला धक्काच बसला. चपराशाची नोकरी करणाऱ्या त्या य:कश्चीत माणसाने माझ्याशी असे अरेरावीने बोलावे याबद्दल वाईट वाटून किंचित रागही आला. अपमान गिळून गेट उघडून मी बँकेत गेलो आणि खिन्न होऊन खुर्चीवर बसलो. सुखदेवच्या त्या दुर्व्यवहाराने मी चांगलाच दुखावलो होतो. माझी कोणतीच चूक नसताना त्याने माझ्याशी असे का वागावे ? नकळत माझे डोळे भरून आले आणि बायको नेहमी बजावते ते शब्द आठवले..
“तुम्ही नको तिथे माणुसकी दाखवायला जाता आणि अपमान करून घेता.. कोणत्याही माणसाशी त्याच्या पायरी नुसारच वागायला हवं.. हाताखालच्या माणसांवर तुमचा धाक असला पाहिजे. नोकरांना नोकरासारखंच वागवायला हवं, नाहीतर ते डोक्यावर बसतात. अति परिचयात अवज्ञा..! उठसूठ कुणालाही मान देत बसू नये. अशाने लोक तुमची किंमत करीत नाहीत..”
माझ्या केबिनच्या मागच्या खिडकीतून संजू चहावाल्याची टपरी दिसत होती. तिथे बसून सुखदेव कुणाची तरी वाट बघत होता. त्याचे विचार बाजूला सारून टेबलावरील कामात गुंगून गेलो. सव्वा दहा वाजता रखवालदाराने बँकेचे शटर उघडल्यावर कस्टमर्सचा लोंढा आत शिरला. सर्व काऊंटर्स पुढे रांगा लागल्या. माझ्या केबिनमध्येही पीक कर्जासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली. इतक्यात संजू चहावाला चहा घेऊन आला.
पूर्वाश्रमीचा सराईत गुंड आणि आता सन्मार्गाला लागून बँकेसमोर चहाची टपरी टाकून मेहनतीची कमाई खाणारा संजू चहावाला हा बँकेप्रती अतिशय कृतज्ञ होता. स्थानिक राजपूत समाजाचा एक नेता आणि वैजापूरच्या रिक्षा युनियनचा अध्यक्ष असलेल्या संजूचे पोलिसांशी तसेच गावातील सर्वच प्रभावशाली व्यक्तींशी जवळीकीचे संबंध होते. बँकेचा कट्टर समर्थक आणि पाठीराखा असलेला संजू प्रत्येक लहानमोठ्या अडचणीत स्वतःहून बँकेच्या मदतीला धावून येत असे.
कपात चहा भरून तो माझ्या समोर ठेवताना संजू माझ्या कानात हळूच कुजबुजला..
“साहेब, सावध व्हा ! तुमच्या विरुद्ध बाहेर काहीतरी भयंकर कट शिजतोय. काही गावगुंड, रिकामे लीडर आणि पत्रकार बाहेर गोळा झाले आहेत. बँकेत गोंधळ घालायचा म्हणत आहेत.. तुम्ही शांतपणे त्यांचं म्हणणं ऐकून घ्या. अजिबात राग येऊ देऊ नका.. आधी मॅटर काय आहे ते जाणून घेऊन मगच आपण त्यातून मार्ग काढू या..”
संजूचं बोलणं संपतं न संपतं तोच रागारागाने आरडाओरड करीत रत्नमाला बोडखेने आपला पती सुखदेव आणि मुलगा बबन यांच्यासह केबिनमध्ये प्रवेश केला. त्यांच्या मागोमाग आठ दहा अनोळखी माणसेही केबिनमध्ये घुसली.
(क्रमशः 2..)
श्री अजय कोटणीस हे बँकेतील माझे सहकारी असून, स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानकावर खिळवून ठेवतात.
त्यांना मराठवाड्यातील एका गावी बँकेत शाखा प्रमुख असतांना आलेल्या अनुभवावर आधारित, एक प्रसंग त्यांनी त्यांच्या खास शैलीत वर्णन केला आहे