श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद
(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)
ही लेखमाला श्री कोटणीस यांच्या फेसबुक पेज वर नुकतीच त्यांनी प्रसिद्ध केली आहे आणि तिला वाचकांचा भरभरून प्रतिसाद नेहमीप्रमाणे मिळतो आहे. इथे ही लेखमाला या ब्लॉगच्या वाचकांसाठी, श्री कोटणीस यांच्या परवानगीने प्रसिद्ध करीत आहोत.
बँकस्य कथा रम्या..
स्थितप्रज्ञ आणि उलटलेला डाव..
(भाग : 3)
सगळा स्टाफ डोळे विस्फारून वर्तमान पत्रात आलेली ती बातमी अधाशासारखी वाचून काढीत होता. मी मात्र कालपासून एखाद्या त्रयस्थाप्रमाणे या सगळ्या घटनाक्रमाकडे पहात होतो. वर्तमानपत्रात अशी बातमी येणार याचा मला अंदाज होताच, पण ती इतक्या लवकर येईल हे मात्र अपेक्षित नव्हतं. माझ्या केबिनमध्ये जमलेल्या स्टाफला उद्देशून म्हणालो..
“पेपर मधील या बातमीने विचलित होऊ नका. आजपासून लोकांच्या तुमच्याकडे पाहण्याच्या नजरा बदलतील.. काही खवचट कस्टमर तुम्हाला या बातमीच्या संदर्भात नाना प्रकारचे अपमानास्पद प्रश्न, कुत्सित शंका विचारतील.. टोमणे मारतील.. त्या सर्वांकडे दुर्लक्ष करायचं.. चिडचिड न करता संयम राखून शांतपणे आपलं काम करायचं.. कुणाशीही वाद घालायचा नाही.. तसंच आपल्या कुठल्याही अंतर्गत बाबींची बाहेर कुणाशीही चर्चा करायची नाही..”
आमचं असं बोलणं सुरू असतानाच रिजनल मॅनेजर साहेबांनी बँकेत प्रवेश केला.
बँकिंग हॉलमध्ये RM साहेबांनी स्टाफची एक छोटीशी मिटिंग घेतली. सुरवातीला कालच्या घटनेबद्दल थोडक्यात सांगुन झाल्यावर आम्ही तो चेक RM साहेबांना दाखवला. तसंच चेकबुक इश्यु रजिस्टर मधील दोन्ही चेकबुकच्या नोंदी दाखवून दुसऱ्या चेकबुकसाठी घेतलेला अर्ज फायलिंग मधून गहाळ झाला असल्याचंही सांगितलं. सीसीटीव्हीचं फुटेज व संशयिताच्या फोटो प्रिंट्स पाहिल्यावर RM साहेबांनी चेक वरील सही स्कॅन केलेल्या सहीच्या नमुन्याशी ताडून पाहीली. घडलेल्या प्रकारात स्टाफची कोणतीही चूक किंवा निष्काळजीपणा नाही याची त्यांना खात्री पटली.
रत्नमालाबाईंना दुसरं चेकबुक कुणी सुपूर्द (handover) केलं ? या त्यांच्या प्रश्नावर कुणीच उत्तर दिलं नाही. सामान्यत: काउंटर क्लार्क किंवा प्युन हे काम करायचे. मात्र रत्नमालाबाईंना दुसरं चेकबुक दिल्याचं कुणालाही आठवत नव्हतं. कामाचा कितीही रश असला तरीही चेक बुक दिल्यावर कस्टमरने रजिस्टरवर नीट सही केली किंवा नाही याची खात्री करून घेतलीच पाहिजे असं RM साहेबांनी स्टाफला बजावलं.
त्यानंतर ते फायलिंगचं काम करणाऱ्या रामदास प्युन (दप्तरी) कडे वळले. या प्युनचं काम अत्यंत अपटुडेट होतं. चेकबुक इश्यु रजिस्टर समोर ठेवून त्यातील सिरीयल नंबर नुसार Cheque Book Requisition Slips फाईल करण्याची त्याची पद्धत होती. त्याने चेकबुकच्या अर्जांची फाईलच RM साहेबांना दाखविली. त्याचं चेकबुकच्या सिरीयल नुसार केलेलं गेल्या काही महिन्यातील फायलिंग साहेबांनी चेक केलं. इतकं व्यवस्थित फायलिंग पाहून त्यांनी रामदास दप्तरीच्या कामाचं कौतुक केलं.
रामदास म्हणाला..
“साहेब, मी खात्रीपूर्वक सांगतो की रत्नमालाबाईंचा दुसऱ्या चेकबुकसाठीचा अर्ज मी व्यवस्थित फाईल केला होता. त्यानंतरच तो फाईलमधून गहाळ करण्यात आला आहे.”
स्टाफची मिटिंग आटोपल्यावर RM साहेब माझ्या केबिनमध्ये येऊन बसले. काल रात्री उशिरापर्यंत जागून काही महत्त्वाचे मुद्दे मी लिहून काढले होते, ते थोडक्यात असे होते..
.१. मुलासाठी मोटार सायकल घ्यायची असून, त्यासाठी खाजगी बँकेकडून कर्ज घ्यायचे असल्याने चेक बुक हवे आहे असे सांगून सुखदेव बोडखेने बायकोच्या नावाने खाते उघडून चेक बुक घेतले होते. मात्र आता तो शेती घेण्याबद्दल सांगतो आहे.
.२. खाते उघडुन ज्या दिवशी दुसरे चेक बुक घेतले त्याच दिवशी खात्यात सहा लाख रुपये जमा करण्यात आले. आणि लगेच दुसऱ्या दिवशी त्यातून पाच लाख ऐंशी हजार रुपये काढून घेण्यात आले. यावरून हा सर्व प्लॅन अत्यंत घाईघाईत, एकही दिवस वाया न घालवता त्वरित अंमलात आणण्यात आल्याचे दिसते.
.३. ज्या अर्थी दुसऱ्या चेकबुक बद्दल बोडखे कुटुंब काहीही बोलण्यास तयार नाही, त्या अर्थी या घटनेत त्यांचाही सहभाग असू शकतो.
.४. चेकवरील सही ओरिजिनल सहीशी तंतोतंत जुळते. याचाच अर्थ चेकवर सही करणारी व्यक्ती बोडखे कुटुंबाच्या निकटच्या परिचयाची असावी, ज्याला रत्नमालाबाईंची सही कशी आहे याबद्दल माहिती आहे.
.५. ही निकटच्या परिचयाची व्यक्ती म्हणजे त्यांचा मुलगा बबन बोडखे असू शकते. कारण दुसरे चेकबुक घेण्यासाठी तोच बँकेत आला होता. तसेच त्याला आपल्या आईची सही माहीत असणे अत्यंत साहजिक आहे.
.६. चेकबुक इश्यु रजिस्टरवर रत्नमालाबाईंची जाणूनबुजून सही न घेणे तसेच दुसऱ्या चेकबुक साठीचा अर्ज फाईल मधून गहाळ होणे यात बँकेतीलच कुणातरी कर्मचाऱ्याचा हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
.७. सर्वात महत्वाचे म्हणजे आदल्या दिवशी दुपारी तीन वाजता त्या अनोळखी व्यक्तीने रत्नमालाबाईंच्या खात्यातून पैसे काढून नेल्यावर लगेच त्या घटनेची माहिती बोडखे कुटुंबाला कशी मिळाली ? कारण त्यांच्यापैकी कुणीही दुपारनंतर खात्यातील बॅलन्सची चौकशी करण्यासाठी बँकेत आलेले नव्हते. तसेच ताबडतोब घटनेच्या दुसऱ्याच दिवशी सकाळी बोडखे कुटुंबाने बँकेत येऊन आरडाओरड केली होती. याचा अर्थ त्यांना खात्यातून पैसे काढले गेल्याबद्दल आदल्या दिवशीच समजले होते.
.८. पत्रकार, राजकीय नेते गोळा करणे, खात्यातील पैसे परत मागण्यासाठी बँकेला दिलेला अर्ज लिहून तो टाईप करणे.. ही सर्व कामे सुखदेव बोडखे याने निश्चितपणे आदल्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी खात्यातून पैसे काढले गेले त्याच दिवशी केली असली पाहिजेत. यावरून त्यांना या घटनेची पूर्वकल्पना होती असेच दिसते.
वरील सर्व मुद्दे मी RM साहेबांच्या निदर्शनास आणून दिले. आपल्या खात्यातून एवढी मोठी रक्कम काढून नेल्याचे जर एखाद्या स्त्रीला समजले तर तिची पहिली सहज, नैसर्गिक प्रतिक्रिया म्हणजे झालेल्या प्रचंड आर्थिक नुकसानीमुळे जबर धक्का बसून तिला अपार दुःख होईल, डोळ्यांतून पाण्याच्या धारा लागतील.. ती पैसे परत करण्याची बँकेला विनंती करेल. परंतु याच्या विपरीत रत्नमालाबाई तर भांडण करण्याच्या तयारीनेच बँकेत आली होती. तिला जराही दुःख झाल्याचे दिसत, जाणवत नव्हते.. या बाबीकडेही मी RM साहेबांचे लक्ष वेधले.
आमची चर्चा चालू असतानांच सुखदेव भेटायला आल्याची सिक्युरिटी गार्डने वर्दी दिली.
जणू सर्वस्वच लुटल्यासारखा भयाण, उध्वस्त चेहरा करून सुखदेवने केबिनमध्ये प्रवेश केला. अबोलपणे आदरार्थी नुसती मान झुकवत RM साहेबांना नमस्कार करून त्यांच्याकडे भकास, दीनवाण्या नजरेने पहात तो हात जोडून उभा राहीला. RM साहेबांनी त्याला खुर्चीवर बसायला सांगितलं.
वेळ न घालवता थेट मुद्द्यालाच हात घालत RM साहेब म्हणाले..
“हे पहा सुखदेवजी, तुमच्या पत्नीची बनावट सही करून तिच्या खात्यातून कुणा अपरिचित व्यक्तीने मोठी रक्कम काढून नेल्यामुळे धक्का बसून तुमची जी दुःखद मानसिक अवस्था झाली आहे, त्याची मला जाणीव आहे. तुम्हाला लवकरात लवकर तुमचे पैसे परत मिळावेत अशी आमचीही इच्छा आहे.. तरीपण अशा प्रसंगी बँकेचेही काही नियम, काही कार्य पद्धती असते. आमची बँक ही एक सरकारी संस्था असल्याने सर्व नियमांचे काटेकोर पालन आम्हाला करावेच लागते. संबंधित चेकवरील सही ही खऱ्या सहीशी हुबेहूब जुळत असल्याने हस्ताक्षर तज्ज्ञांकडून तिचे परीक्षण करून घेणे आवश्यक आहे. जर ती सही बनावट, (forged) असल्याचे सिद्ध झाले तर बँक तुम्हाला तुमचे पैसे नक्की परत करील. कृपया तोपर्यंत धीर धरा आणि बँकेला या घटनेच्या तपासात सहकार्य करा..”
सुखदेवने आतापर्यंत खाली घातलेली मान वर केली. त्याचे डोळे अश्रूंनी डबडबले होते. संमतीदर्शक मान डोलावीत आणि आपले थरथरते हात RM साहेबांपुढे जोडून कापऱ्या आवाजात तो म्हणाला..
“ठीक आहे साहेब.. तुमचे म्हणणे मला मान्य आहे. तुमचा तपास पूर्ण होईपर्यंत थांबायला मी तयार आहे. परंतु या पैशांतून जी जमीन मी विकत घेणार होतो तिचा मालक एक दिवसही थांबायला तयार नाही. हा सौदा फिस्कटला तर जमीन तर हातातून जाईलच पण ईसार म्हणून दिलेले पन्नास हजारही बुडतील. त्यामुळे तुम्ही माझ्यासाठी तुमचा विशेष अधिकार वापरून किमान दोन लाख रुपये मला आजच्या आज देण्याची व्यवस्था करावी. म्हणजे ते पैसे जमीन मालकाला देऊन मी सौद्याची मुदत वाढवून घेऊ शकतो..”
सुखदेव बोडखेच्या करुण चेहऱ्यावरील हतबल, दीन, लाचार हावभाव इतके अस्सल होते की क्षणभर मलाही त्याची दया आली. मात्र त्याचे कालचे कांगावखोर, कपटी, कावेबाज रूप पाहिले असल्याने त्याच्या जातीवंत कसलेल्या अभिनयाला मनोमन दाद देत मी गप्प राहून RM साहेब त्याला काय उत्तर देतात हे उत्सुकतेने ऐकू लागलो..
निनाद राणे.. आमचे तरुण तडफदार रिजनल मॅनेजर हे खूप धाडसी, निर्भीड व चाणाक्ष अधिकारी होते. अशा धूर्त, मतलबी, ढोंगी लोकांचा त्यांना चांगलाच अनुभव होता.
“बँकेच्या नियमांचे उल्लंघन न करता जी काही मदत तुम्हाला करता येईल ती सर्व आम्ही निश्चितच करूच.. पण त्यापूर्वी काही महत्वाच्या बाबींचे स्पष्टीकरण मला तुमच्याकडून हवं आहे..”
RM साहेबांनी असे म्हणतांच सुखदेवचे कान ताठ झाले.. सावधपणे तो म्हणाला..
“बोला ना साहेब.. कोणत्या बाबी.. ?”
“तुमच्या खात्यातून पैसे काढले गेल्याचे तुम्हाला कसे समजले ? कारण दुपारी तीन वाजता त्या व्यक्तीने पैसे काढून नेल्यावर तुमच्या कुटुंबातील कोणीही बँकेत खात्याची चौकशी करण्यासाठी आलं नव्हतं असं सीसीटीव्ही रेकॉर्डिंग वरून दिसतं. मग लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी बँक उघडण्यापूर्वीच तुम्हाला तुमच्या खात्यातून कुणीतरी पाच लाख ऐंशी हजार रुपये काढले आहेत हे कसं समजलं ?”
RM साहेबांचा बिनतोड प्रश्न ऐकतांच सुखदेवच्या चेहऱ्यावरील भाव झरकन बदलले.. बहुदा त्याने या प्रश्नाची अपेक्षाही केली असावी. कारण निर्ढावलेल्या, उद्धाम स्वरात तो म्हणाला..
“ते मी तुम्हाला कशाला सांगू ? म्हणजे तुम्ही विनाकारण त्या सांगणाऱ्या व्यक्तीला त्रास देणार.. ! आणि.. आम्हाला कुणी का सांगेना, खात्यातून पैसे गेले आहेत ही गोष्ट तर खरीच आहे ना ?”
सुखदेव मुरलेला चाणाक्ष, बिलंदर होता. RM साहेबांचा हा तीर वाया गेला होता. सुखदेवकडे रोखून पहात RM साहेब म्हणाले..
“ठीक आहे, तुमची मर्जी..! पण तो चेक तुम्हाला दिलेल्या दुसऱ्या चेकबुक मधील आहे. आणि ते चेकबुक स्वतः तुमची पत्नी व मुलगा यांनी बँकेतून नेल्याचे सीसीटीव्हीत दिसते आहे. त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे ?”
RM साहेबांनी टाकलेला हा फसवा गुगली चुकवणं सुखदेवला शक्यच नव्हतं. खरं म्हणजे दुर्दैवाने बोडखे कुटुंबाला दुसरं चेकबुक देतांनाचे कुठलेही रेकॉर्डिंग सीसीटीव्ही फुटेजमध्ये नव्हते. बहुदा अतिशय हुशारीने सीसीटीव्हीच्या रेंजबाहेर उभे राहून त्यांनी ते चेक बुक घेतलं असावं. मात्र ही बाब सुखदेवला माहीत असण्याची शक्यता नव्हती.
“हे पहा साहेब, तुम्हाला असं वाटत असेल की ते चेकबुक खरंच आम्ही नेलं असेल तर तसं सिद्ध करा. आमचा अर्ज, रजिस्टरवर सही, सीसीटीव्ही रेकॉर्डिंग काहीही दाखवा आम्ही ते मान्य करू. पण जर तुमच्याकडे यापैकी काहीही पुरावा नसेल तर मात्र वेळ न घालवता आम्हाला आमचे पैसे देऊन टाका. मी माझी तक्रार मागे घेऊन हे प्रकरण मिटवून टाकेन.”
सुखदेवच्या चेहऱ्यावर आता कुटील, बेरकी हास्य होतं. निरुत्तर होऊन RM साहेब उपरोधाने म्हणाले..
“अरे वा ! बॅंकेतील अंतर्गत बाबींची तुम्हाला स्टाफ पेक्षा ही जास्त माहिती असल्याचं दिसतंय.. ही घटना कशी घडली किंवा कशी घडवून आणली गेली याची थोडी थोडी कल्पना येतेय मला..”
“नुसत्या कल्पना करीत बसू नका..” खुर्चीवरून उठून उभा रहात RM साहेबांकडे बोट रोखीत त्वेषाने सुखदेव म्हणाला..
“एक दिवस..! आणखी फक्त एक दिवस मी थांबेन.. आणि तेही तुम्ही खास मला भेटायला इथवर आलात म्हणून केवळ तुमचा मान राखण्यासाठी.. पण त्यानंतर मात्र एक सेकंदही न थांबता थेट पोलीस स्टेशनची पायरी चढेन.. आणि.. पोलिसांचं काम तर तुम्ही जाणताच.. स्टाफचा छळ, अटक, जामीन, कोर्टात फेऱ्या, बँकेची बदनामी.. आत्ताच सारं काही बोलत नाही.. उद्या संध्याकाळ पर्यंत तुम्हाला मुदत देतो.. तुमच्या स्टाफची तुम्हाला खरोखरीच काळजी असेल तर विचारपूर्वक योग्य तो निर्णय घ्या.. येतो मी !”
दोन्ही हात उंचावून नमस्कार करीत झपाझप पावले टाकीत सुखदेव बँकेतून निघून गेला. तो गेल्यावर निश्वास सोडीत RM साहेब म्हणाले..
“काय डेंजरस माणूस आहे हा.. ! खात्रीने सांगतो, यानेच पैसे काढले आहेत आणि आता उलट्या बोंबा मारतो आहे.. पण तुम्ही घाबरू नका.. रिजनल ऑफिस तुमच्या पाठीशी आहे.. तसं मी DGM आणि GM साहेबांच्या कानावरही घालून ठेवतो हे प्रकरण.. पुढील दोन दिवस Branch व्हिजिट साठी मी याच परिसरात आहे, तेंव्हा काही काळजी करण्यासारखं वाटलं तर लगेच फोन करा.. मी येऊन भेटून जाईन..”
केबिन बाहेर येऊन RM साहेबांनी स्टाफचा निरोप घेतांना त्यांची पाठ थोपटून त्याचं कौतुक केलं..
“यू आर डुईंग गुड जॉब.. असंच एकजुटीने राहून काम करा.. आणि निश्चिन्त रहा.. आमचा तुम्हाला फुल सपोर्ट आहे..”
कारमध्ये बसल्यावर RM साहेबांनी मला जवळ बोलावून हळू आवाजात सांगितलं..
“ते paid instrument (चेक), चेकबुक इश्यु रजिस्टर आणि सीसीटीव्ही रेकॉर्डिंग हे सारं तुमच्या Safe Vault मध्ये नीट सुरक्षित ठेवा. त्या अर्जाप्रमाणेच या गोष्टी सुद्धा गहाळ केल्या जाऊ शकतात..”
त्यानंतरचे दोन दिवस शांततेत गेले. फक्त एक दिवस थांबून मग पोलीस केस करण्याची धमकी देऊन गेलेला सुखदेव हे दोन दिवस बँकेकडे फिरकलाही नाही. रत्नमाला बाईंचा पैसे परत करण्याची मागणी करणारा अर्ज मी या आधीच रिजनल ऑफिसला पाठवून दिला होता. प्रकरणाची चौकशी करण्यासठी क्षेत्रीय कार्यालयातर्फे एक वरिष्ठ अधिकारी शाखेला भेट देऊन गेले. अकाऊंटंट रविशंकर, चेकबुक देणारी बेबी सुमित्रा, चेक घेऊन टोकन देणारे सिनियर काऊंटर क्लर्क रहीम चाचा व फायलिंग करणारा दप्तरी प्युन रामदास.. या चौघांना नियमांची काटेकोर अंमलबजावणी न करून कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याबद्दल स्पष्टीकरण (explanation) विचारण्यात आले.
अशातच, सुखदेव बोडखे गेले दोन दिवस पोलीस स्टेशनमध्येच बसला असून फौजदार साहेबांशी अर्थपूर्ण वाटाघाटी करीत असल्याचे वृत्त संजू चहावाल्याने आणले. बहुदा, सुखदेवच्या तक्रारीवरून पोलिसांनी बँक कर्मचाऱ्यांविरुद्ध FIR दाखल केला असावा असा त्याचा अंदाज होता. वैजापुरातील रिक्षावाले अवैध वाहतुकीबद्दल पोलिसांना द्यावा लागणारा हफ्ता संजूकडेच जमा करीत असत. ती रक्कम देण्यासाठी संजू नेहमीच पोलीस स्टेशनमध्ये जात असे. त्यामुळे त्याला पोलीस स्टेशन मधील हालचालींची अपटुडेट बित्तंबातमी मिळत असे.
RM साहेब रोज संध्याकाळी फोन करून प्रकरणातील ताज्या घडामोडींची माहिती घेत असत. सुखदेवने बॅंकेविरुद्ध पोलीस स्टेशन मध्ये तक्रार केली असल्याची शंका त्यांना बोलून दाखवतांच ते म्हणाले..
“हे तर अपेक्षितच होते. आता पोलिस बँकेत येऊन चौकशी करतील. ते जी माहिती मागतील ती देऊन त्यांना तपासात सहकार्य करा. कोणत्याही परिस्थितीत घाबरून जाऊन सुखदेवशी संपर्क साधू नका. पोलीस येऊन गेल्यावर तो स्वतःच बँकेत येईल..”
माझं मन नुसतं बेचैन झालं होतं. विचार करून करून डोक्याचा भुगा झाला होता. कुणी घडवून आणलं असावं हे सारं ? रात्री उशिरापर्यंत CCTV चं घटनेच्या दिवसाचं रेकॉर्डिंग सारखं डोळे ताणून पुन्हा पुन्हा काळजीपूर्वक बघत होतो. पण कुठलाच अगदी पुसटसा धागा दोरा ही गवसत नव्हता.
हा सुखदेव बोडखे अजून एवढा शांत का ? त्याचा पुढचा प्लॅन काय असावा ? बँकेतील कर्मचाऱ्यांना त्याच्या पूर्वेतिहासाबद्दल जी माहिती समजली होती त्यावरून तो अत्यंत धूर्त, नीच आणि कोडग्या मनोवृत्तीचा होता. या पूर्वी वैजापुरातील अन्य बँकांतील कर्मचाऱ्यांना केवळ पोलिसांची व बदनाम करण्याची धमकी देऊन लुबाडण्यात तो यशस्वी झाला होता. आमच्या दुर्दैवाने त्याची शिकारी वक्रदृष्टी आता आमच्या बँकेतील कर्मचाऱ्यांकडे वळली होती.
आपण कोणतंही चुकीचं गैरकृत्य केलेलं नाही त्यामुळे “कर नाही त्याला डर कशाला” या उक्तीनुसार आपल्याला घाबरण्याचे काहीच कारण नाही, असे जरी मनाला समजावीत असलो तरी लवकरच काही तरी विपरीत, अशुभ, अघटित घडणार आहे अशी आतून हुरहूर लागून राहिली होती.
त्यातून अजून त्या *जयदेव खडके* चा काहीच ठावठिकाणा लागत नव्हता..
श्री अजय कोटणीस हे बँकेतील माझे सहकारी असून, स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानकावर खिळवून ठेवतात.
त्यांना मराठवाड्यातील एका गावी बँकेत शाखा प्रमुख असतांना आलेल्या अनुभवावर आधारित, एक प्रसंग त्यांनी त्यांच्या खास शैलीत वर्णन केला आहे