श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद
(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)
ही लेखमाला श्री कोटणीस यांच्या फेसबुक पेज वर नुकतीच त्यांनी प्रसिद्ध केली आहे आणि तिला वाचकांचा भरभरून प्रतिसाद नेहमीप्रमाणे मिळतो आहे. इथे ही लेखमाला या ब्लॉगच्या वाचकांसाठी, श्री कोटणीस यांच्या परवानगीने प्रसिद्ध करीत आहोत.
बॅंकस्य कथा रम्या..
स्थितप्रज्ञ आणि उलटलेला डाव..
( भाग : 4 )
जयदेव खडके… ! होय, हेच नाव होतं त्या पाच लाख ऐंशी हजार रुपयांच्या तथाकथित बनावट सहीच्या चेकवर..
उभट चेहरा, गहू वर्ण, मध्यम उंची, किंचित बसकं नाक, डोक्यावर विरळ केस, काळ्या रंगाच्या पँटीत खोचलेला दंडापर्यंत बाह्या फोल्ड केलेला पांढरा शर्ट आणि सतत भिरभिरणारे कावरे बावरे डोळे.. अतिशय साधारण आणि निरुपद्रवी वाटणाऱ्या त्या व्यक्तिमत्वात तसं पाहिलं तर चट्कन लक्षात रहावं असं काहीही नव्हतं.. पण सध्या तरी तोच अतिसामान्य चेहरा रहस्यमय बनून “टॉक ऑफ द टाऊन” झाला होता.
जयदेव खडके असे नाव सांगणाऱ्या त्या माणसाचे हॉलमधील CCTV कॅमेऱ्यांच्या वेगवेगळ्या अँगल मधून घेतलेले सुमारे दोनशे मोठ्या आकाराचे फोटो काढून आम्ही ते पोलीस स्टेशन, बस स्टँड, रेल्वे स्टेशन परिसर व मोंढ्यातील दुकानदार, आसपासच्या गावातील बँकेचे ग्राहक यांच्यापर्यंत पोहोचविले होते. त्यांच्या मार्फत फोटोत दिसणाऱ्या व्यक्तीची व्यापक चौकशी सुरू होती. बँकेच्या मुख्य प्रवेशद्वारा जवळच एका मॉनिटर स्क्रीनवर घटनेच्या दिवसाचे CCTV रेकॉर्डिंग दाखवून बँकेत येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाकडे जयदेव खडकेची चौकशी केली जात होती.
पोलिसांतर्फे तो फोटो नजीकच्या जिल्ह्यांतील सगळ्या पोलीस स्टेशन्सना सर्क्युलेट करणे अपेक्षित होते. परंतु तसा कोणताही प्रयत्न त्यांच्यातर्फे होत असल्याचे दिसत नव्हते. हुबेहूब अशीच दिसणारी व्यक्ती नाशिक व अहमदनगर येथे पाहिली असल्याचे आठवते असे काही कस्टमर म्हणाले. त्यामुळे ती ही गोष्ट आम्ही सब इंस्पे. हिवाळेंच्या कानावर घातली. संशयित गुन्हेगाराचा एवढा स्पष्ट फोटो हातात असूनही अद्याप पोलीस त्याला का हुडकून काढू शकत नाहीत ? याचे सर्वांनाच आश्चर्य वाटत होते.
एवढ्या मोठ्या रकमेचा चेक पोस्ट करण्यापूर्वी काउंटर क्लर्क शेख रहीम याने खातेदाराला फोन लावून त्याचे कन्फर्मेशन का घेतले नाही ? असा प्रश्न बँकेतर्फे अंतर्गत चौकशी करण्यासाठी आलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विचारला होता. त्यावर रहीम चाचा म्हणाले..
“सभी बडी रकम के चेक जारी (issue) करनेवाले कस्टमरोंको फोन करके अनिवार्य रूप से मै उनका कन्फर्मेशन लेता हूँ.. ठीक उसी तरह वो चेक पोस्ट करने से पहले भी मैंने रत्नमाला बाई को फोन किया था, लेकिन उनका फोन उस समय स्विच ऑफ था. चेक लानेवाले जयदेव खड़के से मैंने उसका आधार कार्ड मांगा, लेकिन उसने ‘कार्ड घर पर है’ ऐसा जवाब दिया. फिर मैंने उसे उसका मोबाईल नंबर मांगा ताकि वह चेक के पीछे लिख के रख सकूँ.. लेकिन उसने कहाँ की ‘मेरे पास मोबाईल नही है..’ “
“चेक लानेवाला शख्स खुद को मोंढें के सबसे बडे व्यापारी मंगल सेठ का मुनीम बता रहा था.. उस के हाथ में मोंढे के मुनीमों के पास रहती है वैसी लंबी थैली भी थी और बैंक में मौजूद दूसरे मुनीमों के साथ वह जिस तरह हँस के बातें कर रहा था उसे देख मुझे उसपर कोई शक नही हुआ !”
“काउंटर पे भीड़ बढ़ती जा रही थी, और वैसे भी चेक बेअरर था, इसलिए मैंने चेक पोस्ट किया और पासिंग को भेज दिया..”
रहीम चाचा यांनी कितीही योग्य रीतीने व प्रामाणिकपणे आपल्या कृतीचे समर्थन केले असले तरी बँकेने मात्र सखोल चौकशीअंती, कर्तव्यपालनातील हलगर्जी पणाबद्दल (negligence of duty) त्यांना दोषीच मानले. असो..
आज घटनेचा सहावा दिवस होता. सकाळी साडेदहा वाजतांच सब इन्स्पेक्टर हिवाळे दोन कॉन्स्टेबल सह बँकेत आले. रत्नमाला बोडखे यांनी बँकेविरुद्ध केलेल्या तक्रारीचा तपास करण्यासाठी आलो असल्याचं सांगून त्यांनी तो बनावट सहीचा चेक, चेकबुक इश्यु रजिस्टर व चेकबुक मागणीचा अर्ज मागितला. अर्ज सापडत नसल्याचे सांगून चेक व चेकबुक इश्यु रजिस्टर त्यांना दाखविले. घटनेशी संबंधित बँकेतील कर्मचाऱ्यांचे स्टेटमेंट घेऊन व चेकबुक इश्यु रजिस्टर आणि तो चेक जप्त करून सब इंस्पे. हिवाळे निघून गेले.
पोलिस गेल्यानंतर लगेच RM साहेबांना फोन केला आणि पोलिसांनी केलेल्या चौकशीबद्दल त्यांना सविस्तर माहिती दिली. “सध्या मी श्रीरामपूर शाखेत ब्रँच व्हिजिट साठी आलो असून संध्याकाळी वैजापूर मार्गे परत जाताना तुमच्या शाखेत थोडा वेळ थांबेन तेंव्हा बोलू..” असं म्हणून त्यांनी फोन ठेवला.
सकाळी जेंव्हा सब इंस्पे. हिवाळे साहेब केबिन मध्ये बसून माझ्याकडून प्रकरणाची माहिती घेत होते तेंव्हा त्यांचा सूर अगदी नम्र आणि मित्रत्वाचा होता. त्यांच्या सोबत आलेले दोन कॉन्स्टेबल सुद्धा चौकशी करताना व स्टेटमेंट घेताना बँकेच्या सर्वच कर्मचाऱ्यांशी अतिशय आदराने व स्नेहभावाने वागत होते. पोलिसांची ही सौहार्दपूर्ण वर्तणूक आम्ही जी कल्पना केली होती त्याच्या अगदी विपरीत होती. “घटनेच्या संपूर्ण दिवसाचे CCTV फुटेज पाहण्यासाठी रात्री आठ वाजता बँकेत येईन..” असंही जाता जाता हिवाळे सांगून गेले होते.
तो दिवस तसा शांततेतच गेला. ठरल्याप्रमाणे संध्याकाळी पाच वाजता AGM राणे साहेब बँकेत आले. बँकिंग हॉल मध्ये गोलाकार खुर्च्या टाकून त्यांनी स्टाफची छोटीशी मिटिंग घेतली. एक अकाऊंटंट, दोन फिल्ड ऑफिसर, दोन ट्रेनी ऑफिसर, एक हेड कॅशियर, दहा काउंटर क्लर्क, तीन पर्मनंट प्युन्स, दोन टेम्पररी (आऊटसोर्सिंग) प्युन, पाच सिक्युरिटी गार्ड्स असा माझ्या सहित एकूण सत्तावीस जणांचा स्टाफ मिटिंगला हजर होता.
स्टाफला संबोधित करतांना RM साहेब म्हणाले.. “चौकशीला आलेल्या पोलिसांची आजची स्टाफशी वागणूक ही माणुसकीपूर्ण होती असं समजलं. ही आनंदाची गोष्ट असली तरी एव्हढ्यावरून तुम्ही हुरळून जाऊ नका. अद्याप पोलिसांनी FIR दाखल केलेला नाही एवढाच त्याचा अर्थ. जर कुठल्याही दबावाखाली पोलिसांनी बँकेविरुद्ध FIR फाईल केला तर या प्रकरणाशी संबंधित सर्वच कर्मचाऱ्यांना अटक करण्याचा ते नक्कीच प्रयत्न करतील. त्यामुळे सावध रहा. पोलिसांच्या गोड बोलण्यावर कदापिही विश्वास ठेवू नका. पोलीस स्टेशन मध्ये जाण्याचेही शक्यतो टाळा. माझ्या अंदाजाप्रमाणे आधी, तो तक्रारदार सुखदेव बोडखे, तडजोड करण्यासाठी एकदा तरी पुन्हा बँकेत येऊन जाईल. त्यामुळे निदान तोपर्यंत तरी तुम्ही अगदी निश्चिन्त रहा.”
पोलिसांनी आपला जबाब (स्टेटमेंट) नोंदवून घेतला, आवश्यक तो मुद्देमालही जप्त केला, त्यामुळे आपल्या मागे लागलेल्या या नसत्या झेंगटातून आता आपली मुक्तता झाली असं समजणाऱ्या सगळ्याच संबंधित स्टाफला RM साहेबांच्या या बोलण्याने धक्काच बसला. तो सुखदेव बोडखे लवकरात लवकर पुन्हा बँकेत यावा आणि काहीतरी तडजोड करून बँकेविरुद्धची तक्रार त्याने मागे घ्यावी अशीच सर्वजण मनातल्या मनात प्रार्थना करू लागले.
“रिजनल ऑफिस या प्रकरणात तुमच्यामागे भक्कमपणे उभं आहे. त्यामुळे न घाबरता आणि कसलीही काळजी न करता, मन लावून आपलं काम करीत रहा..” एवढं बोलून मिटिंग संपवून RM साहेब परत निघाले. ते हॉलच्या दरवाजाकडे जात असतानाच अचानक त्या पापग्रहाने.. सुखदेव बोडखेने, रागीट चेहऱ्याने घाईघाईत बँकेत प्रवेश केला.
“हे काय RM साहेब ? मला न बोलावता, न भेटता तसेच गुपचूप निघून चालला होतात की काय ?”
“मी आता एक क्षण ही जास्त थांबू शकत नाही. तुम्ही मॅनेजर साहेबांना माझ्या खात्यात आजच्या आज तीन लाख रुपये जमा करायला सांगा. बाकीची रक्कम तुमची चौकशी पूर्ण झाल्यानंतर व्याजासहित परत करा. तुम्ही एवढं केल्यास मी बँकेविरुद्धची तक्रार मागे घेईन..”
“नाही, ते शक्य नाही !”
RM साहेब ठामपणे म्हणाले.
“ठीक आहे.. मग पुढील परिणाम भोगायला तयार रहा..”
खुर्ची वरून उठत खुनशी हास्य करीत सुखदेव शांतपणे म्हणाला.
“उद्या सकाळी पोलीस FIR दाखल करून घेतील. सर्व संबंधित कर्मचाऱ्यांना अटक होईल. बँकेची प्रचंड बदनामी होईल. पोलीस कर्मचाऱ्यांवर खटला भरतील. हा खटला किमान पंधरा वीस वर्षे चालेल. या संपूर्ण कालावधीत शेकडो वेळा कर्मचाऱ्यांना कोर्टात तारखेला हजर रहावे लागेल. हजर न झाल्यास वॉरंट निघेल. वर पोलीस वेळोवेळी त्रास देतील, पैसे लुबाडतील ते वेगळंच..! सबळ पुराव्या अभावी अनेक वर्षांनी कदाचित तुमचा स्टाफ निर्दोष सुटेलही परंतु तोपर्यंत कोर्टात नेहमी त्यांचा आरोपी म्हणूनच उल्लेख होईल. शेजाती पाजारी व नातेवाईकांत त्यांची बदनामी होईल. पोलीस नवीन नवीन कलमे लावतील. जामीन मिळविण्यासाठी त्यांना धावाधाव करावी लागेल. कोर्ट कचेरी आणि वकीलासाठी पाण्यासारखा पैसा खर्च होईल.. ! आज मला फक्त दोन लाख रुपये देऊन तुम्ही हे सारं टाळू शकता..”
केबिन बाहेर उभे राहून उत्कंठेने आतील संभाषण ऐकीत असलेल्या स्टाफच्या डोळ्यासमोर बोडखेने आगामी वास्तवाचे भीषण चित्रच उभे केले होते.
RM साहेबांनी मात्र बोडखेच्या बोलण्यावर कसलीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. दोन क्षण वाट पाहून सुखदेव म्हणाला..
“तयार रहा मग उद्या तोफेच्या तोंडी जायला..!”
तरातरा पावले टाकीत बोडखे निघून गेला.
“उद्याचा दिवस तुमच्यासाठी कठीण दिसतो..! हा माणूस पूर्ण तयारी करून आलेला दिसतोय. उद्याची माझी या भागातील ब्रँच व्हिजिट सकाळी लवकर आटोपून दुपारी तीनच्या सुमारास पुन्हा एकदा तुम्हाला भेटायला शाखेत येऊन जातो..”
अशाप्रकारे कर्मचाऱ्यांना आश्वस्त करीत RM साहेब निघून गेले. जाताना त्यांच्या अनुभवी, गंभीर चेहऱ्यावरील चिंतेचे भाव पाहून हे प्रकरण आपण समजतो तितकं साधं सरळ नाही याची सर्वांनाच जाणीव झाली.
ठरल्याप्रमाणे रात्री आठ वाजता सब इंस्पे. हिवाळे CCTV रेकॉर्डिंग पाहण्यासाठी आले. रेकॉर्डिंग मध्ये नवीन काही पाहण्यासारखं नव्हतंच. नाही म्हणायला तो पैसे काढणारा इसम थोडा वेळ एका अन्य कस्टमरशी बोलताना दिसत होता. तो कस्टमर कोण आहे हे पाहून त्याला उद्या बँकेत बोलावून घेऊन त्याची चौकशी करायला त्यांनी सांगितलं. मात्र रेकॉर्डिंग पाहताना हिवाळेंशी खूप गप्पा झाल्या, त्यांच्याशी एकप्रकारे दोस्तीच झाली. कुणीतरी खूप हुशारीने ही घटना घडवून आणली आहे, बँक कर्मचाऱ्यांची यात कोणतीही चूक किंवा निष्काळजीपणा नाही, तसेच तो पैसे काढणारा इसम अन्य गावचा असावा याबद्दल हिवाळेंना खात्री पटली.
सुखदेव बोडखेचा मुलगा बबन हा मवाली टाईप असून गेल्या वर्षी त्याने चक्क इथल्या पूर्वीच्या इन्स्पेक्टर साहेबांच्या कॉलेजात शिकणाऱ्या मुलीचीच छेड काढली होती. त्या प्रकरणी त्याला अटक करून भरपूर चोप दिल्याची माहितीही हिवाळेंनी दिली. ते असंही म्हणाले की..
“ते इन्स्पेक्टर साहेब नुकतेच इथून बदलून गेले आहेत म्हणून बरंय, नाहीतर त्यांनी त्या बोडखेची तक्रारच नोंदवून घेतली नसती..”
रात्री बाराच्या सुमारास हिवाळे बँकेतून परत जाण्यास निघाले तोपर्यंत सर्व स्टाफ बँकेतच थांबला होता. उद्या काय होणार याची चिंता प्रत्येकाच्याच चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होती.
घटनेचा सातवा दिवस उजाडला. कसला तरी सण असल्याने आज बँकेत विशेष गर्दी नव्हती. सकाळीच एक साध्या वेशातील व्यक्ती पोलीस स्टेशन मधून आलो असल्याचे सांगून काही व्यक्तींची संपूर्ण नावे लिहून घेत होती. विवादित चेक बुक इश्यू करणारी क्लर्क बेबी सुमित्रा, काउंटर वर चेक घेऊन टोकन देणारे सिनिअर क्लर्क रहीम चाचा, चेक पास करणारा अकाउंटंट रविशंकर, चेकचे पैसे देणारा कॅशियर सुनील सैनी अशा चौघांची नावे त्या माणसाने लिहून घेतली.
काल सांगितल्यानुसार दुपारी दोन वाजता ब्रँच व्हिजिट आटोपून औरंगाबादला परत जाताना RM साहेब दोन मिनिटांपुरते बँकेत आले.
आल्या आल्या त्यांनी विचारलं..
“आज काही विशेष ? Any further development in the matter ? पोलीस स्टेशन मधून काही फोन वगैरे ?”
“अद्याप तरी काही नाही..”
मी थोडक्यात उत्तर दिलं.
“ठीक आहे ! मी निघतो मग.. काही काळजी करण्या सारखं वाटलं तर लगेच फोन करा मला..”
RM साहेबांनी आपली कार बाहेर रस्त्यावरच उभी केली होती. त्यांना सोडण्यासाठी बाहेर रस्त्या पर्यंत गेलो. ते कार मध्ये बसताच अचानक कुठून तरी सुखदेव तिथे प्रकट झाला. RM साहेबांना नमस्कार करून तो म्हणाला..
“साहेब, पाच जणांच्या नावे उद्या अटक वॉरंट निघणार आहे. त्यांच्याकडून प्रत्येकी चाळीस हजार घेऊन मला आजच्या आज दोन लाख रुपये द्या. मी तक्रार मागे घेतो. ही शेवटचीच संधी समजा. तुमच्या स्टाफ बद्दल सहानुभूती वाटते, त्यांच्या लेकरा बाळांची चिंता वाटते म्हणून मी हा चान्स देतोय तुम्हाला..”
एकाएकी RM साहेबांच्या चेहऱ्यावरील भाव बदलले. त्यांना या साऱ्या प्रकाराचा उबग आला असावा. आवाज वाढवून कडक स्वरात ते म्हणाले..
“खबरदार, यापुढे असले पोरकट चाळे कराल तर.. ! तुमच्या असल्या धमक्यांना मी भीक घालीत नाही. तुम्हाला काय करायचं असेल ते करा. आमच्या स्टाफची काळजी घ्यायला आम्ही समर्थ आहोत. या प्रकरणात जे काही होईल ते बँकेच्या नियमानुसारच होईल. यापुढे जर बँकेत पाय ठेवलात तर सरकारी कामात अडथळा आणला म्हणून तुमच्याविरुद्धच पोलिसांत तक्रार करण्यात येईल.”
नंतर माझ्याकडे पहात ते म्हणाले..
“यापुढे जर हा माणूस बँकेत येऊन बडबड करू लागला तर सिक्युरिटी गार्ड करवी धक्के मारून याला हाकलून लावा..”
RM साहेबांनी गाडीची काच वर केली आणि त्यांची कार औरंगाबादच्या दिशेने निघाली.
सुखदेव बोडखे RM साहेबांच्या आकस्मिक उग्रावताराने स्तंभित होऊन अजून जागच्या जागीच उभा होता. नंतर भानावर येऊन डिवचल्यागत, चिडून पाय आपटीत तो सरळ पोलीस स्टेशनच्या दिशेने निघून गेला.
बँकेत परत आल्यावर मी घड्याळात बघितलं तर दुपारचे पावणेतीन वाजले होते. स्टाफ पैकी काहीजण लंच आटोपून आपापल्या काउंटर वर जाऊन बसले होते. मी ही घाईघाईत माझा लंच बॉक्स उघडला तेवढ्यातच टेबलावरील फोन खणाणला. पलीकडून वैजापूर ठाण्याचे ईंचार्ज इन्स्पेक्टर माळी बोलत होते.
“नमस्कार ! वैजापूर पोलीस स्टेशन मधून ठाणेदार इंस्पे. माळी बोलतोय. तुमच्या स्टाफ विरुद्ध आमच्या ठाण्यात सुखदेव बोडखे यांनी फिर्याद नोंदविल्याचे तुम्हाला माहीतच असेल. त्याच संदर्भात आम्ही त्यांना समजावले असून मोठ्या मुश्किलीने ते आपली तक्रार मागे घेण्यास तयार झाले आहेत. तरी तुम्ही ताबडतोब बेबी सुमित्रा, शेख रहीम, रविशंकर व सुनील सैनी या चार जणांना घेऊन पोलीस ठाण्यात या, म्हणजे त्यांचे एक छोटेसे स्टेटमेंट व सही घेऊन प्रकरण मिटवून टाकता येईल. कृपया जरा लवकर या, आम्ही तुमची वाट पहात आहोत.”
इंस्पेक्टर साहेबांचे बोलणे ऐकत असताना माझ्या मस्तकात भीतीची एक थंडगार लहर उमटून गेली. जणू माझा मेंदू मला अनामिक संकटाचा इशाराच देत होता.
“येस सर, सध्या आम्ही लंच घेत आहोत. लंच झाल्यावर सर्वांना घेऊन लगेच तिकडे येतो. थँक यू व्हेरी मच, सर !”
थरथरत्या हातांनीच मी फोन खाली ठेवला. वाघाच्या गुहेत जाण्याची वेळ आली होती. बेबी, रविशंकर, रहीम व सैनी या चौघांना केबिन मध्ये बोलावून घेऊन त्यांना इंस्पे. माळींच्या फोन बद्दल सांगितलं.
“पोलीस स्टेशन मध्ये किती वेळ लागेल ते सांगता येत नाही, म्हणून आपल्या काऊंटरचे काम दुसऱ्यांना देऊन जा..”
असं सांगून पोलीस स्टेशन मध्ये जाण्यासाठी मी जागेवरून उठलो. कॅश टॅली करून काउंटरचा चार्ज दुसऱ्याला देण्यास सुनील सैनीला थोडा वेळ लागला. त्या मधल्या वेळेत RM साहेबांना ही रिसेन्ट डेव्हलपमेंट कळवावी म्हणून मोबाईल वरून त्यांच्याशी संपर्क साधला. एव्हाना ते औरंगाबादच्या अर्ध्या वाटेपर्यंत पोहोचले होते. त्यांना इंस्पे. माळींच्या फोन बद्दल सांगताच त्यांनी ताबडतोब आपली कार जागीच थांबवली..
“हा पोलिसांचा ट्रॅप आहे. तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये जाताच ते तुम्हाला लागलीच अटक करतील. त्यांना बोलण्यात गुंतवून ठेवा आणि मिळेल त्या वाहनाने ताबडतोब औरंगाबादकडे निघा. तोपर्यंत मी तुमची इथे राहण्याची व्यवस्था करून ठेवतो. तिथून निघाल्यावर पोलीस स्टेशनच्या कुठल्याही कॉल ला उत्तर देऊ नका..”
… युद्ध सुरू होण्यापूर्वीचा शंखनाद झाला होता. लवकरच आमने सामने प्रत्यक्ष युद्धाला सुरवात होणार होती. सुदैवाने आसपासच्या शाखेतून कॅश नेण्या-आणण्यासाठी वैजापूर शाखेत कॅश व्हॅन ची व्यवस्था होती. त्या व्हॅन मध्ये सर्वांना बसवलं. आपण व्हॅन मधून पोलीस स्टेशनला चाललो आहोत असंच ड्रायव्हर सहित सर्वांना वाटलं. व्हॅन गेटच्या बाहेर निघाल्यावर मी ड्रायव्हरला म्हणालो..
श्री अजय कोटणीस हे बँकेतील माझे सहकारी असून, स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानकावर खिळवून ठेवतात.
त्यांना मराठवाड्यातील एका गावी बँकेत शाखा प्रमुख असतांना आलेल्या अनुभवावर आधारित, एक प्रसंग त्यांनी त्यांच्या खास शैलीत वर्णन केला आहे