लेखक
श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद
(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)
ही लेखमाला श्री कोटणीस यांच्या फेसबुक पेज वर नुकतीच त्यांनी प्रसिद्ध केली आहे आणि तिला वाचकांचा भरभरून प्रतिसाद नेहमीप्रमाणे मिळतो आहे. इथे ही लेखमाला या ब्लॉगच्या वाचकांसाठी, श्री कोटणीस यांच्या परवानगीने प्रसिद्ध करीत आहोत.
गाडीत मागच्या बाजूला बसलेले रविशंकर, सुनील सैनी, शेख रहीम आणि बेबी सुमित्रा हे चौघे अजूनही गोंधळलेल्या मन:स्थितीतच होते. स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये जाण्यासाठी निघालेलो आपण औरंगाबादला कशासाठी चाललो आहोत हाच प्रश्न चौघांनाही पडला होता परंतु माझ्या चेहऱ्यावरील गंभीर चिंतेचे भाव व RM साहेबांशी माझे होत असलेले बोलणे, यावरून कसलं तरी सिरीयस मॅटर असावं याचा त्यांनी मनाशी अंदाज बांधला होता.
आमची गाडी वैजापूर पासून जेमतेम चार पाच किलोमीटर अंतरावर पोहोचली असेल नसेल तोच माझा मोबाईल वाजला. पलीकडून इंस्पे. माळी बोलत होते..
“अहो साहेब, तुम्ही निघालात की नाही अजून ? फक्त पाचच मिनिटांचं काम आहे. फिर्यादीने बँके विरुद्धची तक्रार मागे घेतली आहे. त्यासंबंधीच्या तडजोडीच्या कागदपत्रांवर तुम्हा सर्व स्टाफच्या सह्या हव्या आहेत. त्या करून तुम्ही लगेच बँकेत परत जाऊ शकता.. तेंव्हा लवकर निघा..”
“हो साहेब, निघालोच..!”
असं तुटक उत्तर देऊन मी कॉल कट केला.
पाच सात मिनिटांनी पुन्हा मोबाईलची रिंग वाजली. या वेळी मात्र ठाण्यातून सब इंस्पे. हिवाळे बोलत होते..
“काय राव, आम्ही केंव्हाची वाट पाहतोय.. हातातलं काम टाकून जसे असाल तसे लगेच निघा बरं.. !
कमाल आहे हं तुमची ! तुमच्या विरुद्ध ठाण्यात फिर्याद नोंदली गेली आहे, फिर्यादी सकाळ पासून ठाण्यात हजर आहे, आम्ही तुम्हाला मदत करायचा प्रयत्न करतोय.. फिर्यादीचं मन वळवतोय.. आणि तुम्हाला तर काही गांभीर्यच दिसत नाही या प्रकरणाचं.. !
ध्यानात घ्या, जर फौजदार साहेब चिडले नं, तर सारा मामलाच बिघडून जाईल.. त्यामुळे, निघा लवकर !!”
शेवटचे “निघा लवकर !” हे शब्द दरडावल्यासारखे उच्चारून माझ्या उत्तराची वाट ही न पाहता हिवाळेंनी फोन कट केला.
एव्हाना आम्ही वैजापूर पासून पंचवीस तीस किलोमीटर दूर आलो होतो. पोलीस आम्हाला पाठलाग करून गाठण्याची आता फारशी शक्यता नव्हती, त्यामुळे थोडा निर्धास्त झालो आणि मागे वळून स्टाफकडे पहात म्हणालो..
“हमे पुलीस स्टेशन बुलाकर धोखेसे अरेस्ट करनेका पुलिसवालों का प्लान था, इसलिए हमें इस तरह जल्दबाजी में वैजापूर छोड़ना पड़ा.. अब अरेस्ट से बचने के लिए हमें तुरंत एंटीसिपेटरी बेल के लिए कोर्ट में अर्जी करनी होगी और जब तक बेल की दरख़्वास्त मंजूर नही होती तब तक पुलिस की नजरों से दूर कहीं चोरी छिपे रहना होगा.. फिलहाल तो RM साब ने अपने ट्रेनिंग सेंटर में हमारे रहने का इंतज़ाम कर दिया है और हम सीधे वहीं पर जा रहे है..”
माझ्या बोलण्या नंतर काही क्षण गाडीत गहन गंभीर शांतता पसरली.. मग हळूहळू एकेकाच्या प्रतिक्रिया यायला लागल्या.
“ओ माय गॉड !” इति रविशंकर..
“अरे बापरे.. !” इति सैनी..
“या खुदा..! तेरी रहमत !” इति रहीम चाचा..
अल्लड, अवखळ बेबी सुमित्राच्या चेहऱ्यावर मात्र कसलाच तणाव दिसत नव्हता. अवघ्या तीन महिन्यांपूर्वी सुदूर छत्तीसगडच्या आदिवासी भागातून वैजापुरात आलेली हसरी, खेळकर बेबी जणू हे टेन्शन, ही भीती सुद्धा एन्जॉय करत होती. अचानक तिच्या चेहऱ्यावर मिश्किल भाव उमटले..
“मतलब.. सर, आज से हम सब लोग दुनिया की नजरों मे *फरार* है.. ! है ना ?”
आणि मग खळाळून हसत दोन्ही हातांनी टाळी वाजवत ती म्हणाली..
“हाऊ एक्सायटिंग ! हाऊ थ्रिलिंग !”
बेबीचं हे बोलणं थोडंसं बालिश वाटलं तरी तिच्या उत्साही मुद्रेवरील खेळकर आणि निरागस उस्फुर्त आनंद पाहून गाडीतील सर्वांचाच ताण एकदम हलका होऊन गेला. नकळत आम्हालाही खुदकन हसू आलं.. बेबी सारखंच आपणही स्वतःवर हसून हे संकट एन्जॉय कां करू शकत नाही ? असाच विचार आमच्या मनात येऊन गेला.
इकडे सब इंस्पे. हिवाळे मघापासून मला सारखा फोन लावीत होते. बराच वेळ घाबरून मी फोन उचललाच नाही. नंतर ती फोनची सतत वाजणारी रिंग असह्य झाली म्हणून एकदाचा तो फोनच स्विच ऑफ करून टाकला.
आता गाडीतील अन्य चौघांचेही मोबाईल वाजणं सुरू झालं. सारेच नंबर्स अनोळखी होते. हे सारे फोन पोलीस स्टेशन मधूनच येत आहेत हे न समजण्या इतके कुणीही खुळे नव्हते. त्यामुळे कुणीच फोन उचलण्याच्या भानगडीत पडलं नाही.
अशातच बेबीचा फोन वाजला आणि आमच्या “नकोss ! उचलू नकोss !” च्या खाणाखुणांकडे दुर्लक्ष करीत तिने तो चक्क उचलला..
“हॅलोss !”
“कौन ? बेबी सुमित्रा..?”
“हां, मै बेबी सुमित्राही बात कर रही हूँ..”
“आप अभी तक थाने क्यों नही पहुँची ? अगर पाँच मिनट में आप सब लोग थाने नही पहुंचे तो हमे मजबूरन बैंक में आना पड़ेगा.. आपके मैनेजर साब तो फोन भी नही उठा रहे.. उन से कह दो, हम से कोई चालबाजी मत करो, वरना बहुत महँगा पड़ेगा..!”
पलीकडून उर्मट आवाजात दरडावण्यात आलं..
लाडिक, मधाळ, खोडकर स्वरात बेबी उत्तरली..
“अरे क्याsss साब ! आप तो खामख्वाह नाराज हो गए.. हम तो रास्ते में ही थे.. ये लीजिये..! पहुंच गए हम सब आपके थाने ! जरा उठकर बाहर आकर तो देखिए.. क्या हमे लेने गेट तक भी नही आओगे ? !!”
.. एवढं बोलून बेबीनं फोन कट केला आणि “अब ढूंढते रहो हमें पागलों की तरह, थाने के बाहर, इधर उधर.. !” असं म्हणत पोट धरधरून मोठ्यानं हसत सुटली.
मी डोळे मोठे करून तिच्याकडे रागानं बघितलं तेंव्हा स्वतःला सावरून घेत ती म्हणाली..
“सर, वो लोग इतना बडा झूठ बोलकर हम से दगाबाजी कर सकते है तो हम इतना सा झूठ बोलकर उन को उल्लू भी नही बना सकते क्या ?”
बेबीच्या हिंमतीला आणि विनोदबुद्धीला मनोमन दाद देत मी गप्प बसलो.
औरंगाबाद आलं.. ट्रेनिंग सेंटरच्या हॉस्टेल मध्ये आमच्यासाठी चार खोल्या राखून ठेवण्यात आल्या होत्या. माझं घर तिथून अगदी जवळच होतं. घरी जाऊन बायकोला ओढवलेल्या प्रसंगाची थोडक्यात कल्पना दिली आणि घरातील दोन चार लुंगी पायजामे व बेबी साठी बायकोचा नाईट ड्रेस घेऊन हॉस्टेल वर परतलो. रात्री जेवणं झाल्यावर एका खोलीत एकत्र जमून आम्ही गप्पा मारत बसलो.
“तुम्हाला काय वाटतं..? तो दुसऱ्या चेकबुक मागणीचा अर्ज फायलिंग मधून कुणी गायब केला असावा ? ती व्यक्ती बँकेतीलच आहे हे तर नक्की..! पण कोण करू शकेल असं ?”
माझ्या या प्रश्नावर रहीम चाचा म्हणाले..
“जी व्यक्ती बँक संपल्यावर म्हणजेच सर्व जण घरी गेल्यावर देखील बँकेत थांबते अशीच व्यक्ती हे काम सहज करू शकते. मला वाटतं की आपले पाच सेक्युरिटी गार्ड्स हे रात्री बँकेतच असतात, त्यांच्या पैकीच कुणाचं तरी हे काम असावं..”
“नाही, मला ते पटत नाही. गेली सात वर्षं मी त्यांना पाहतो आहे. ते सारेच अतिशय कर्तव्यदक्ष आणि इमानदार आहेत. ते असं काही करतील याची तिळमात्र ही शक्यता नाही..”
रविशंकर ठामपणे म्हणाला..
“मग दुसरं कोण ? नंदू तर नाही ? कारण तो सकाळी सहा वाजल्यापासून बँकेतच असतो, आणि तेंव्हा बँकेत कुणीच नसतं..”
रहीम चाचांनी शंका व्यक्त केली.
नंदू हा माळी काम व बँकेची साफसफाई करणारा टेम्पररी (आऊट सोर्सिंग) कर्मचारी होता. सकाळी सहा वाजता बँकेत येऊन तो बागेतील झाडांना पाणी टाकणे, बाहेरील कंपाउंड झाडून काढणे, हॉल व आतील टाईल्स झाडून पुसून स्वच्छ करणे अशी कामे करीत असे. याशिवाय दिवसभर बँकेत थांबून तो प्युनची अन्य कामे सुद्धा करीत असे.
प्रचंड कष्टाळू, नम्र व अबोल असलेला नंदू हा अत्यंत पापभिरू होता. पहाटे पाच ते सहा या वेळेत तो स्वेच्छेने व विना मोबदला गावातील दत्त मंदिराची साफसफाई करीत असे. म्हाताऱ्या आई वडिलांची मनापासून सेवा करणारा व नातेवाईकांनी वडिलोपार्जित संपत्ती लुबाडली तरी त्यांच्या बद्दल कोणतीही कटुता न बाळगणारा कुटुंबवत्सल नंदू हा माझा आवडता कर्मचारी होता. त्याचे आई वडीलही त्यांच्या तरुणपणी दीर्घकाळ पर्यंत आमच्या बँकेतच साफसफाईचे काम करीत होते. नंदू असं काही कृत्य करेल हे माझ्या दृष्टीने next to impossible होतं. त्याच्या प्रामाणिकपणाबद्दल मी निश्चितच पक्की खात्री देऊ शकत होतो.
मग आता कोण उरलं ?
बँकेच्या तीन पर्मनंट प्युन्स पैकी दोघा जणांना आत्यंतिक मद्य प्राशन करण्याची घाणेरडी सवय होती. दारूमुळे त्यांचं शरीर पोखरलं गेलं होतं. ते दोघेही वारंवार आजारी पडत आणि त्यामुळेच कामावर नेहमी गैरहजर रहायचे. गेले काही दिवस तर ते दोघे ही खूप आजारी असल्याने अंथरुणावरच होते. तिसरा प्युन रोज वेरूळ येथून वैजापूरला जाणे येणे करीत असे. सकाळी खूप उशिरा कामावर येणे आणि संध्याकाळी.. नव्हे दुपारीच खूप लवकर बँकेतून निघून जाणे हा त्याचा नित्यक्रम होता. पनिशमेण्ट वरच त्याची वेरूळहुन वैजापूरला बदली झाली होती. वारंवार ताकीद देऊन ही कुणालाही न जुमानता तो बँकेतून रोज लवकर निघून जात असे. मात्र त्यामुळेच तो या कट कारस्थानात सामील असण्याची शक्यता खूपच कमी होती.
“रुपेश के बारे में क्या खयाल है, सर ? पिछले चार साल से मैं उसे देख रहा हूँ, लेकिन अभी भी उसे ठीक तरह पहचान नही पाया हूँ..”
डोक्यावरील केसांतून हात फिरवीत रविशंकर म्हणाला.
खूप ठेंगणा, रापलेल्या चेहऱ्याचा आणि बलदंड शरीराचा रुपेश जगधने हा पंचवीस सव्वीस वर्षांचा तरुण होता. वैजापूर पासून दोन किलोमीटर अंतरावरील घायगाव इथे त्याची दहा एकर बागायती जमीन होती. फावल्या वेळेत तो होम गार्ड ची ड्युटी ही करीत असे. बँकेचे सिक्युरिटी गार्ड्स जेंव्हा रजेवर जात तेंव्हा त्यांच्या रजेच्या कालावधी पुरते त्यांच्या जागी लष्कराचे रिटायर्ड जवान किंवा होमगार्ड यांना रोजंदारीने पगारी ड्युटी देण्याचा बँकेचा नियम आहे. होम गार्ड असलेला रुपेश असा तात्पुरता सिक्युरिटी गार्ड म्हणून बँकेत अधून मधून ड्युटी करायचा.
तल्लख बुद्धीच्या रुपेशने कॉम्पुटरचा कोर्सही केलेला होता. पूर्वीच्या मॅनेजर साहेबांनी त्याला “सिग्नेचर स्कॅनिंग” चे काम शिकून घेण्यास सांगितले. लवकरच रुपेश त्या कामात तरबेज झाला आणि दररोज बँकेत येऊन सिग्नेचर स्कॅनिंग चे काम करू लागला. ग्राहकांकडून अकाउंट ओपनिंग चा फॉर्म भरून घेणे व अन्य छोटी मोठी कामे ही तो करीत असे. त्याला बसण्यासाठी बँकेत एक स्वतंत्र काउंटरही देण्यात आले होते.
रुपेश जसं आणि जिथून बोलावणं येईल त्याप्रमाणे कधी बँके बाहेर सिक्युरिटी गार्ड म्हणून उभा राहायचा तर कधी नवरात्र, उरूस, गणेशोत्सव काळात होमगार्ड म्हणून पोलीस बंदोबस्ताला जायचा.. कधी सिग्नेचर स्कॅनिंग साठी बँकेच्या आत काउंटर वर बसायचा तर कधी आपल्या स्वतःच्या शेतात राबायचा. काही महिन्यांपूर्वी त्याला पाईप लाईन साठी कृषी कर्ज हवे असल्याने त्याच्या शेतीचे इन्स्पेक्शन करण्यासाठी गेलो असता त्याच्या घायगाव येथील घरीही गेलो होतो.
आई बापाचा एकुलता एक मुलगा असलेल्या रुपेशने मोठ्या कष्टाने शेती खूप छान फुलवली होती. वृद्ध आईवडिलांची सेवा करीत सुस्वरूप पत्नी व दोन वर्षांच्या गोंडस मुलासह घायगावात बांधलेल्या पक्क्या घरात तो आनंदाने रहात होता. बँकेतील सर्वच प्रकारच्या कामांत तो तरबेज असल्याने गर्दीच्या वेळी प्रत्येकच कर्मचारी त्याला आवर्जून मदतीला बोलावून घेत असे. रुपेशही अगदी मनापासून सर्वांना त्यांच्या कामात मदत करीत असे.
रुपेशचे हस्ताक्षर खूप सुन्दर आणि वळणदार होते. मी वैजापूर शाखेत जॉईन झालो तेंव्हा तेथील रजिस्टर्सवर सुबक अक्षरात लिहिलेली नावे पाहून हे सुरेख अक्षर कुणाचे आहे याची चौकशी केली होती. त्यावेळी हे रुपेशचे हस्ताक्षर असून सध्या तो होमगार्डची ड्युटी करण्यासाठी औरंगाबादला गेला असल्याचे नंदू कडून समजले.
पुढच्याच आठवड्यात नंदू रुपेशला घेऊन माझ्या केबिन मध्ये आला.
“साहेब, हा रुपेश.. रुपेश जगधने. घायगावला राहून शेती करतो. बारावी पास आहे. कॉम्पुटर मधील सगळं काम येतं ह्याला. होमगार्ड म्हणून इथल्या पोलीस स्टेशनमध्ये काम करतो. कधी कधी आपल्या कडे टेम्पररी सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करतो तसंच गेल्या दोन वर्षांपासून आपलं सिग्नेचर स्कॅनिंगचं ही काम करतो. साहेब, तुम्ही त्या दिवशी रजिस्टर वरील ज्याच्या सुंदर अक्षराबद्दल चौकशी केली होती तोच हा रुपेश..”
“अरे वा ! खूप छान.. !!”
रुपेश कडे कौतुकाने पहात मी म्हणालो.
“साहेब, ह्या रुपेशच्या अंगात विविध प्रकारच्या कला आहेत.”
नंदू म्हणाला..
“अच्छा..?”
कचरा कुंडीतील एक पाठकोरा कागदाचा तुकडा घेऊन नंदू म्हणाला..
“साहेब, ह्याच्यावर तुमची सही करा..!”
मी प्रश्नार्थक नजरेने नंदू कडे पाहिलं..
“असं संशयाने पाहू नका साहेब, फक्त एक गंमत दाखवायची आहे तुम्हाला.. आधी तुम्ही तुमची सही करा इथे..!”
हा काय पोरकटपणा आहे ? अशा मुद्रेने अनिच्छेनेच मी त्या कागदावर सही केली.
“आता बघा गंमत..” असं म्हणत नंदूने तो कागद रुपेशकडे दिला.
रुपेशने आपल्या खिशातील पेन काढला.. क्षणभर कागदावरील माझ्या सहीकडे बघीतलं, आणि चट्कन माझ्या सहीखाली अगदी हुबेहूब माझ्या सही सारखीच सही केली. दोन्ही सह्या इतक्या एकसारख्या दिसत होत्या की मी देखील ते पाहून चकित झालो.
“मानलं पाहिजे..! खरंच विलक्षण कला आहे.. ! पण जपून, ह्या कलेचा चुकूनही दुरुपयोग करू नकोस.. नाहीतर एके दिवशी तुरुंगात जावं लागेल.. !”
मी रुपेशला म्हणालो.
जीभ बाहेर काढून दोन्ही कानांना हात लावीत रुपेश म्हणाला..
“साहेब, मी स्वप्नातही असं कधी करण्याचा विचारही मनात आणणार नाही. ही तुमची सही सुद्धा नंदूने फारच आग्रह केला म्हणून खूप नाईलाजाने फक्त यावेळ पुरतीच केली आहे..”
कालांतराने ही गोष्ट मी पार विसरून गेलो होतो. आज रुपेशचं नाव निघाल्यावर अचानक हे सारं आठवलं. खरं म्हणजे रुपेशच्या या “हस्तकलेच्या जादू” बद्दल स्टाफ मधील सर्वांनाच माहिती होती. तरी देखील एवढी महत्वाची गोष्ट आतापर्यंत आपल्यापैकी कुणालाच कशी काय “क्लिक” झाली नाही याचंच सर्वांना राहून राहून आश्चर्य वाटत होतं.
जसे जसे संशयित गुन्हेगार म्हणून रुपेश बद्दल आम्ही विचार करत गेलो तसा तसा त्याच्या वरील आमचा संशय अधिकच पक्का होत गेला. CCTV च्या रेंज बाहेर राहून ते चेक बुक डिलिव्हर करणं केवळ रुपेश सारख्या चाणाक्ष व्यक्तीलाच शक्य होतं. तसंच चेक बुक मागणी अर्ज फाईल मधून गायब करणं ही त्यालाच सहज साध्य होतं. सर्वात महत्वाचं म्हणजे सिग्नेचर स्कॅनिंग करीत असल्यामुळे त्याला कुणाचीही सही पाहणं सहज शक्य होतं आणि हुबेहूब सही गिरवण्यात तर त्याचा हातखंडाच होता.
अशा तऱ्हेने इतके दिवस न सुटणारं कोडं अचानक सुटलं होतं. मधूनच अस्पष्ट दिसून दाट धुक्यात लुप्त होणारा, हुलकावणी देत हाती न येणारा तो धूर्त, कपटी, कारस्थानी चेहरा आता जाहीर झाला होता.
आता कधी एकदा लवकरात लवकर कोर्टातून जामीन मिळवून वैजापूरला परत जातो आणि रुपेशला बोलतं करून गुन्हेगारांच्या टोळीचा पर्दाफाश करतो असं आम्हाला झालं होतं..
गप्पांच्या नादात रात्रीचे बारा वाजून गेले होते. रात्री नऊ पूर्वीच झोपायची सवय असलेले वयोवृद्ध रहीम चाचा मघापासून जांभया देत होते. एकमेकांना “गुड नाईट” करून समाधानानं आम्ही आपापल्या खोलीत जाण्यासाठी निघालो तोच दारावर कुणीतरी हलक्या आवाजात “टकटक” केलं.
इतक्या रात्री कोण आलं असावं बरं ? कदाचित हॉस्टेलचा केअर टेकर “तुमच्या बोलण्यामुळे हॉस्टेल मधील ट्रेनिंग साठी आलेल्या अन्य स्टाफला डिस्टर्ब होतोय.. कृपया जास्त जागू नका.. आता झोपा..” असं सांगण्यासाठी आला असावा, असं वाटून मी रुमचं दार उघडलं.. तो काय..
डोक्यावर कॅप, अंगात कडक इस्त्रीचा युनिफॉर्म, कमरेला सर्व्हिस रिव्हॉल्व्हर, हातात पोलिसी दंडुका आणि चर्येवर क्रुद्ध भाव असलेले सब इंस्पे. हिवाळे दारात उभे होते..
(क्रमशः 6)
श्री अजय कोटणीस हे बँकेतील माझे सहकारी असून, स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानकावर खिळवून ठेवतात.
त्यांना मराठवाड्यातील एका गावी बँकेत शाखा प्रमुख असतांना आलेल्या अनुभवावर आधारित, एक प्रसंग त्यांनी त्यांच्या खास शैलीत वर्णन केला आहे
Related
Discover more from Blissful Life
Subscribe to get the latest posts sent to your email.