https://goodworld.in A website by Madhav Bhope

लेखक 

श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद 

(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)

*फिरते  “साहित्य”* …

प्राथमिक शाळेत अक्षर ओळख होऊन सलग वाक्य वाचता येऊ लागलं तेव्हा जणू ज्ञानाचा खजिना असलेली अलिबाबाची गुहाच उघडल्यासारखं वाटलं. वाचनाचा आनंद, नाविन्याचं औसुक्य आणि वैविध्याची भूक एवढी जास्त होती की शाळेत येता जाताना जे जे काही लिहिलेलं दिसायचं, मग त्या भिंतींवरील जाहिराती असोत वा घरांवरील नावाच्या पाट्या असोत, ते ते सर्व अधाशासारखं भराभरा वाचून काढायचा नादच लागला.

त्यावेळी वाहनांच्या विशेष करून ट्रकच्या पाठीमागे काही ठराविक शब्द लिहिले असत. “हॉर्न प्लिज”, “हॉर्न दिजीए”, “हॉर्न ओके प्लिज”, “ओके टाटा”, “फिर मिलेंगे” असे थोडक्यात लिहिले असायचे. त्यानंतर सुप्रसिद्ध “बुरी नजरवाले तेरा मुँह काला” चा जमाना आला. माझ्या लहानपणापासून ते आजतागायत गेली साठ सत्तर वर्षे भारतातील समस्त ट्रक चालकांचे हे अत्यंत आवडते वाक्य राहिले आहे. या जगात “नजर” टाकण्याजोग्या इतर अनेक “आकर्षक सजीव” गोष्टी असताना त्या सोडून सर्वजण आपली नजर ट्रक सारख्या निर्जिव अनाकर्षक वाहनाकडेच आणि तीही वाकडी म्हणजे “बुरी”च का टाकत असावेत हे मला अजून न सुटलेलं एक कोडंच आहे.

नंतरच्या काळात काही रसिक ट्रक चालक मनोरंजक शेर शायरी ट्रकमागे लिहू लागले. हळूहळू ट्रॅक्टर, बस, जीप आणि सर्वच खाजगी वाहनांमागे अशा चित्तवेधक ओळी दिसू लागल्या. मला तर सुरवातीपासूनच ट्रक, बस मागे लिहिलेलं हे फिरतं साहित्य वाचण्याचा छंद होता. पुढे कॉलेजात गेल्यावर तर हा छंद वाढत जाऊन त्याचं तात्पुरत्या वेडात रूपांतर झालं. ट्रक, बस मागे लिहिलेलं प्रांतोप्रांतीचं, विविधतेनं नटलेलं आणि अतिशय सवंग पण मनोरंजक असं भरपूर साहित्य मला मुखोद्गत होतं. दररोज वाहनांच्या मागे सायकलवर फिरून असं नवनवीन साहित्य मिळवून आम्ही सारी मित्रमंडळी त्यावर चर्चा करत मस्तपैकी टाईमपास करायचो.main qimg beb03676b796c4586df600b0c149e2c4

एकदा मी कॉलेजातून घरी जात असताना लहान मुलांना शाळेत घेऊन जाणारी एक खाजगी स्कुलबस माझ्या सायकल जवळून पुढे गेली. नेहमीच्या सवयीने मी बसच्या मागे लिहिलेलं काही नवीन साहित्य मिळतंय का हे पाहण्याचा प्रयत्न केला. तेव्हा बसमागे काही अपरिचित ओळी लिहिलेल्या मला अस्पष्ट दिसल्या. पण बस वेगात असल्याने मी त्या ओळी नीट वाचण्यापूर्वीच बस माझ्या दृष्टीआड झाली. त्या अपरिचित ओळींनी माझी उत्सुकता चाळवली गेली. काहीतरी नवीन साहित्याचा लाभ आज आपल्याला होणार या आशेने मी बसच्या मागे वेगात सायकल दामटली.4

दोन तीन किलोमीटर पर्यंत वेगात पाठलाग केल्यावर मला दूरवर ती बस दिसू लागली. मोठया कष्टाने सायकलला टांगा मारत कसाबसा बसपर्यंत पोहोचतो न पोहोचतो, तेवढ्यात बस पुन्हा सुरू झाली. मात्र त्या गडबडीतही मी बसच्या मागे लिहिलेली पहिली ओळ वाचून काढली. ती ओळ अशी होती….

“रंग गया, रूप गया, गई जीवन की लाली”

मी एवढी ओळ वाचतो न वाचतो तोच सायलेंसरमधून धूर सोडत आणि धुळीचे लोट उडवीत बस पुन्हा नजरेआड झाली. मी पाहिलं की पायाखालचा रस्ता आता खूप खडबडीत, कच्चा आणि धुळीने भरलेला होता. डोळ्यात व नाकातोंडात सारखी धूळ जात होती. त्यातून सायकल पंक्चर होण्याचीही भीती होती. रस्ता नीट दिसत नसल्याने मी काळजीपूर्वक, धिम्या गतीने पण नेटाने बसचा पाठलाग सुरूच ठेवला. त्याचवेळी मनातल्या मनात नुकतीच वाचलेली बस मागील पहिली ओळ आठवीत, पुढील ओळ काय असू शकेल याबद्दल कल्पनेला ताण देत विचार करीत होतो.

आतापर्यंत मी गावाच्या बाहेर पडून शहरापासून बराच दूर आलो होतो. घराकडे जाण्याचा रस्ता तर केव्हाच मागे पडला होता. मात्र मला त्याची फिकीर नव्हती. आज कसंही करून ती दुसरी ओळ वाचूनच मग मागे फिरायचं अशी मनात जिद्द पेटली होती. थोड्यावेळाने तो खराब रस्ता एकदाचा संपला. डोळ्यासमोरील धूळ ही कमी झाली. रस्ता स्वच्छ दिसू लागला तसा मी सायकलचा वेग पुन्हा वाढवला.  वाटेवरील गावांत थांबत थांबत, तेथील लहान मुलांना त्यांच्या  घरी पोहोचवणारी ती स्कुलबस मला पुन्हा दिसू लागली. एव्हाना मी सहा सात किलोमीटरचं अंतर पार केलं होतं. माझा स्टॅमिना आता संपत चालला होता. शेवटचा नेटाचा प्रयत्न म्हणून मी जोरात पायडल मारत धपापत्या उराने त्या थांबलेल्या बसपर्यंत पोहोचलो.cyclist

सायकल बसच्या अगदी जवळ नेत मी घाईघाईने ती दुसरी ओळ वाचली.

“रंग गया, रूप गया, गई जीवन की लाली”  नंतरची ती दुसरी ओळ होती….

“अब तो पिछा छोडो, मैं हूं बाल बच्चों वाली”

या ओळी वाचता वाचताच मला जोराचं हसू फुटलं. माझ्या आजच्या अवस्थेला अगदी समर्पक अशा त्या ओळी होत्या. स्वतःची कींव करत हसतानांच अशा निरर्थक गोष्टींच्या मागे एवढी धावाधाव करण्याच्या माझ्या पोरकट स्वभावाचा मला रागही आला.

……त्या दिवसापासून अशी फिरत्या साहित्यामागे फिरण्याची माझी सवय कायमची सुटली आणि मी नियमितपणे लायब्ररीत जाऊन सकस, अभिजात आणि उत्कृष्ट साहित्य वाचू लागलो.

main qimg d5986d7323955bdbc5d35e8381f76650

😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃

kotnis

लेखक परिचय-

श्री अजय कोटणीस हे स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव  असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली.

ते फेसबुकवर  नित्य लिखाण करीत असतात आणि त्यांचे विविध प्रकारचे लेख वाचकांना अतिशय आवडतात.

असेच काही लेख या ब्लॉगवर त्यांच्या परवानगीने  प्रकाशित करीत आहोत.


Discover more from Blissful Life

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Blissful Life

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading