मार्गशीर्ष पंचमी या दिवसाला महाराष्ट्रात खास महत्व आहे. या दिवशी नागदिवे लावून नागदिवाळी साजरी करण्याची परंपरा आहे. काही भागात मार्गशीर्ष पंचमी विवाह पंचमी म्हणून साजरी करतात.
नागदिवाळी हा मार्गशीर्ष शुद्ध पंचमीला साजरा केला जाणारा हिंदू सण आहे. या दिवशी नागप्रतिमेची पूजा करण्याची व घरात जेवढे पुरुष असतील त्या प्रत्येकाच्या नावाने पक्वान्न करून त्यावर एकेक दिवा लावण्याची प्रथा महाराष्ट्रात काही ठिकाणी आहे.
आपल्याकडे दिवाळी, देव दिवाळी आणि यानंतर नाग दिवाळी साजरी करण्याची परंपरा असून, यात महत्वाचे म्हणजे दिवे आहे. आपल्या जीवनातील अंधकार दूर होऊन प्रकाश यावा हीच यामागील श्रद्धा आहे.
नागदिवाळीला लावण्यात येणारा दिवा हे दीर्घायुष्याचे प्रतीक व नाग हे कुलाच्या मूळपुरुषाचे प्रतीक मानतात. या मूळपुरुषाच्या कृपेने घरातल्या हयात पुरुषांना दीर्घायुष्य लाभावे असा हेतू असतो.
स्कंदपुराणात म्हटल्याप्रमाणे
“शुक्ला मार्गशिरे पुण्या श्रावणे याच पंचमी ।
स्नानदानैर्बहुफला नागलोकप्रदायिनी ॥”
या वचनानुसार श्रावण शुद्ध पंचमीप्रमाणेच मार्गशीर्ष शुद्ध पंचमीलाही नागांची पूजा केल्याने आणि व्रत केल्याने फलप्राप्ती होते, सुख-समृद्धी ऐश्वर्य प्राप्त होते.
नागदिवाळी पूजा पद्धत
नागदिवाळीला नागदिवे बनविले जातात. पुरणाचे, किंवा कणकेचे तर काही ठिकाणी बाजरीच्या पिठाचे हे दिवे तयार केले जातात. आपआपल्या परंपरेनुसार कोणी १ तर कोणी ५ दिवे लावतात, तर काही ठिकाणी घरात जितके पुरूषमंडळी आहेत तितके दिवे लावण्याची पद्धत आहे. या दिव्यासह हरभऱ्याची, मेथीची भाजी, वांग्याचे भरीत, भात असा नैवेद्य अर्पण करतात.
नागदिवाळीचे विदर्भासह महाराष्ट्रात विशेष महत्त्व आहे. विशेषतः मराठवाडा, विदर्भ, कोकण यातील ग्रामीण भागात हा सण साजरा केला जातो. शेतकरी वर्गात याचे विशेष महत्त्व आहे. खरीपाचे धान्य शेतकऱ्याच्या घरी आल्यानंतर त्याचा आनंद साजरा करण्याशीही याचा संबंध जोडतात.
Discover more from Blissful Life
Subscribe to get the latest posts sent to your email.
खूपच उपयुक्त माहिती..🙏👍👍