https://goodworld.in A website by Madhav Bhope

Navdurga Devi Kavach- The armour of the power of Goddess Durga- सर्व ठिकाणी रक्षण करणारे देवी कवच-भाग-5

भाग-1 वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

भाग-2  वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

भाग-3   वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

भाग-4    वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

मागील भागावरून पुढे चालू 

याठिकाणी, अहंकार, हा शब्द, आपला consciousness, अशा अर्थाने लक्षात घ्यायला हवा. गीतेत अहंकार हा शब्द ५ ठिकाणी आला आहे. त्यातील पाहिला उल्लेख, ७ व्या अध्यायात, चौथ्या श्लोकात आलेला आहे.

भूमिरापोऽनलो वायु: खं मनो बुद्धिरेव च |
अहङ्कार इतीयं मे भिन्ना प्रकृतिरष्टधा||

 भूमि, आप, तेज, वायू, आकाश, ही पंचमहाभूतें, आणि मन बुद्धि आणि अहंकार, या आठ प्रकारांने विभाजित असलेली ही माझी ‘अपरा’ म्हणजे जड प्रकृती आहे.

तसेंच १३ व्या अध्यायात, ५ व्या श्लोकात,

महाभूतान्यङ्ककारो बुद्धिरव्यक्त मेव च |

इन्द्रियाणि दशैकं च पञ्च चेन्द्रियगोचरा: ||

 क्षेत्र क्षेत्रज्ञ योगा मध्ये, क्षेत्राच्या वर्णनात वरील श्लोक आला आहे, पाच महाभूतें, अहंकार, बुद्धि, आणि ‘अव्यक्तम्’ एव, म्हणजे मूल प्रकृति सुद्धा, दहा इंद्रियें, एकम् म्हणजे एक ‘मन’ आणि पञ्च इन्द्रिय गोचरा, म्हणजे पाच इंद्रियांचे विषय, म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे क्षेत्र आहेत असे सांगितले आहे.

मनुष्याचे उद्दिष्ट जरी, सत्व रज, तम या तीन्ही गुणांच्या पलीकडे जाण्याचे असले, आणि मन, बुद्धि आणि अहंकार यांच्या अतीत असलेले तत्व जाणून घेण्याचे असले, तरी, जो पर्यंत ते उद्दिष्ट प्राप्त होत नाही, तोपर्यंत, ही सर्व ‘instruments’ सुस्थितीत रहावीत हीच प्रार्थना देवीकडे केली आहे.

आपण नेहमी वापरतो त्या अर्थाने अहंकार हा शब्द, किंवा त्याचे रूप, गीतेच्या  खालील श्लोकांमध्ये आले आहे, ते जिज्ञासूंनी पाहावे. (अध्याय- श्लोक)

१६-१८; १८-१७;, १८- ५८,५९.

आपण ४२ व्या श्लोकापर्यंत अर्थ पाहिला. देवी कवच एकूण ५६ श्लोकांचे आहे. उर्वरित १४ श्लोकांबद्दल थोडक्यात पाहू.

पदमेकं न गच्छेतु यदीच्छेच्छुभमात्मनः।
कवचेनावृतो नित्यं यत्र यत्रैव गच्छति॥43

 

मनुष्य आपले शुभ इच्छित असेल तर कवचाशिवाय एक पाऊल ही पुढे टाकू नये. (या स्तोत्राचे महत्व अधोरेखित करण्यासाठी हा श्लोक आहे असे वाटते.)

तत्र तत्रार्थलाभश्च विजयः सार्वकामिकः।
यं यं चिन्तयते कामं तं तं प्राप्नोति निश्चितम्‌।

परमैश्वर्यमतुलं प्राप्स्यते भूतले पुमान्‌॥44

 

कवचाने सुरक्षित मनुष्य जिथे जिथे जाईल तिथे तिथे त्याला धन प्राप्ति होईल आणि पूर्ण कामनांची सिद्धि करवणाऱ्या विजयाची प्राप्ति होईल. तो ज्या ज्या अभीष्ट वस्तूचे चिन्तन करेल त्या त्या वस्तूची त्याला निश्चित प्राप्ति होईल. तो पुरुष या पृथ्वीवर तुलनारहित महान ऐश्वर्य प्राप्त करील.

निर्भयो जायते मर्त्यः संग्रामेष्वपराजितः।

त्रैलोक्ये तु भवेत्पूज्यः कवचेनावृतः पुमान्‌॥45

 

कवचाने सुरक्षित मनुष्य निर्भय होतो. युद्धात त्याचा पराजय होत नाही आणि तो तीन्ही लोकांत पूजनीय होतो.

इदं तु देव्याः कवचं देवानामपि दुर्लभम्‌।
यः पठेत्प्रयतो नित्यं त्रिसन्ध्यं श्रद्धयान्वितः॥46

 

देवीचे हे कवच, देवांनाही दुर्लभ आहे. जो रोज नियमपूर्वक तीन्ही संधीकाळी (सकाळ, दुपार, संध्याकाळ) श्रद्धेने या स्तोत्राचा पाठ करतो,

दैवी कला भवेत्तस्य त्रैलोक्येष्वपराजितः।
जीवेद् वर्षशतं साग्रमपमृत्युविवर्जितः॥47

 

त्याला दैवी कला प्राप्त होते, आणि तो तीन्ही लोकांमध्ये कधीही पराजित होत नाही. तो अपमृत्यू पासून रहित होतो, आणि शताधिक वर्षेंपर्यंत जीवित राहतो.

नश्यन्ति व्याधयः सर्वे लूताविस्फोटकादयः।
स्थावरं जंगमं चैव कृत्रिमं चापि यद्विषम्‌॥48

 

(लूत आणि विस्फोटक हे व्याधींचे प्रकार आहेत) या व्याधी नष्ट होतात त्याच्यावर, स्थावर, जंगम आणि कृत्रिम विषाचा काहीही परिणाम होत नाही. [कण्हेर, भांग, अफू, धत्तुरा, आदींचे ‘स्थावर’ विष म्हटले जाते. साप, विंचू इत्यादि विषारी प्राणी चावल्यामुळे चढलेले म्हणजे, ‘जंगम’ विष, आणि, अहिफेन (अफू) आणि तेल यांच्या संयोगाने किंवा, तत्सम विविध वस्तूंच्या संयोगाने बनलेले कृत्रिम विष]


अभिचाराणि सर्वाणि मन्त्रयन्त्राणि भूतले।
भूचराः खेचराश्चैव जलजाश्चोपदेशिकाः॥49

 

या पृथ्वीतलावर मारण, मोहन आदि जितके अभिचार प्रयोग आहेत, तसेंच अशा प्रकारचे जितकेही मंत्र यंत्र आहेत, ते सर्व, या कवचाला हृदयात धारण केल्याने त्या मनुष्याला पाहताच नष्ट होतात. पृथ्वीवर विचरणारे ग्रामदेवता, आकाशचारी देवविशेष, जलदेवता, उपदेश मात्राने सिद्ध होणारे निम्न कोटीचे देवता,

 

सहजा कुलजा माला डाकिनी शाकिनी तथा।
अन्तरिक्षचरा घोरा डाकिन्यश्च महाबलाः॥50

 

ग्रहभूतपिशाचाश्च यक्षगन्धर्वराक्षसाः।
ब्रह्मराक्षसवेतालाः कूष्माण्डा भैरवादयः॥51

 

नश्यन्ति दर्शनात्तस्य कवचे हृदि संस्थिते।
मानोन्नतिर्भवेद् राज्ञस्तेजोवृद्धिकरं परम्‌॥52

 

आपल्या जन्माच्या बरोबर प्रकट होणारे देवता (सहजा) कुलदेवता, माला (कंठमाला इत्यादि), डाकिनी, शाकिनी, अंतरिक्षामध्ये विचरणाऱ्या घोर डाकिनी, ग्रह, भूत, पिशाच, यक्ष, राक्षस, गंधर्व, ब्रम्हराक्षस, वेताळ, कूष्मांड आणि भैरव आदि अनिष्टकारक देवता सुद्धा हे कवच हृदयात धारण केलेल्या मनुष्याला पाहूनच पळून जातात. कवचधारी पुरुषाला राजासमान वृद्धि प्राप्त होते.

(वरील विवरणात दिलेल्या ‘कुलदेवता’ या शब्दाचा आपापल्या कुलदेवते सोबत गल्लत करू नये. वरील सर्व क्षुद्र देवता म्हणवल्या जातात, आणि निरनिराळ्या योनितल्या देवता आहेत, ज्या की त्या त्या पातळीवर exist होतात.)

यशसा वर्धते सोऽपि कीर्तिमण्डितभूतले।

जपेत्सप्तशतीं चण्डीं कृत्वा तु कवचं पुरा॥53

यावद्भूमण्डलं धत्ते सशैलवनकाननम्‌।
तावत्तिष्ठति मेदिन्यां संततिः पुत्रपौत्रिकी॥54

 

कवचाचा पाठ करणारा पुरुष आपल्या कीर्तीने विभूषित भूतलावर सुयशासाहित वृद्धीला प्राप्त होतो. जो प्रथम कवचाचा पाठ करून मग सप्तशतीचा चण्डी पाठ करतो तो, जोपर्यन्त वन, पर्वत, आणि काननासाहित ही पृथ्वी टिकून रहाते, तोपर्यंत त्याची पुत्र, पौत्र आदि संतान परंपरा कायम राहते.

देहान्ते परमं स्थानं यत्सुरैरपि दुर्लभम्‌।
प्राप्नोति पुरुषो नित्यं महामायाप्रसादतः॥55

 

नंतर, देहाचा अंत होतो, तेंव्हा, तो पुरुष भगवती महामायेच्या प्रसादाने त्या नित्य परम पदाला प्राप्त होतो, जे की देवांलाही दुर्लभ आहे.

लभते परमं रूपं शिवेन सह मोदते॥ॐ॥56

तो सुंदर दिव्य रूप धारण करतो आणि शिवासहित आनंदाचा भागीदार होतो.

आजकालच्या मनोविज्ञानात सकारात्मक विचारांचे महत्व अधोरेखित केलेले आहे. आपली संस्कृति पाहिली, तर पावलोपावली, मनाला नकारात्मक विचारांपासून परावृत्त करून  सकारात्मक विचारांकडे जाणीवपूर्वक घेऊन जाण्याचा प्रयत्न दिसतो, जो की खूप महत्त्वाचा आहे. आजकाल आपल्या अवतीभोवती सगळीकडे आसुरी विचार आणि आचार बोकाळलेले दिसतात, आणि तेच कसे नॉर्मल आहेत असे उदात्तीकरण केले जाते. अशा काळात, अशा मंगल आणि सकारात्मक विचारांनी भरलेल्या आपल्या पुरातन ठेव्याचे आपण जतन केले पाहिजे असे प्रकर्षाने वाटते.  

ॐ शांतिः शांतिः शांतिः!

माधव भोपे


Discover more from Blissful Life

Subscribe to get the latest posts sent to your email.