नवरात्र म्हणजे शक्तीची उपासना
Navdurga Upasana
हिंदू धर्मातील बहुतेक सर्व सण आणि व्रतें ही निसर्ग चक्राशी जोडली गेलेली आहेत असे दिसते. पावसाळ्याचे चार महिने (जून ते ऑक्टोबर) वातावरणातील ओल, दमटपणा, सूर्यदर्शनाचा अभाव, त्यामुळे होणारी रोगजंतूंची वाढ, इत्यादींपासून बचाव करण्याच्या दृष्टीने, चातुर्मासाच्या निमित्ताने वेगवेगळ्या व्रतांची आणि उपवासांची योजना केलेली असल्यामुळे या काळात आपोआपच आरोग्याची काळजी घेतली जाते. चातुर्मासातील शेवटचा एक महिना, म्हणजे आश्विन महिना (साधारण ऑक्टोबर महिना सुरू झाल्यामुळे ऑक्टोबर हीट जेंव्हा सुरू झालेली असते), हा शरद ऋतू आणि हेमंत ऋतू यातील संधिकाल असतो. शरद ऋतू हा आरोग्याच्या दृष्टीने तसाही प्रतिकूल मानला गेला आहे. आणि त्यात भाद्रपद महिना संपल्यावर, आश्विन महिना लागतो तेंव्हा शरद ऋतू संपून हेमंत ऋतू सुरू होण्याचा काल, म्हणजे ऋतुसंधी, त्यामुळे या काळात आरोग्याची जास्त काळजी घेणे, आणि पुढे येणाऱ्या अनुकूल काळासाठी म्हणजेच हिवाळ्यासाठी शरीराला तयार करणे, या दृष्टीने दुर्गादेवीच्या नवरात्री व्रताची योजना असावी असे वाटते. या काळात, उपवास करून, ब्रह्मचर्य पालन करून, व्रतस्थ आणि संयमाने राहून, शरीर आणि मन दोन्हींना शुद्ध करून पुढे येणाऱ्या काळात शक्तिसंचय करण्यास तयार केले जाते असे दिसते. म्हणजेच शक्तीची उपासना करायला सुरूवात या काळापासून होते.
हिंदू धर्मातील सर्व देव, देवी आणि देवता हे, क्वचित काही अपवाद वगळता, शस्त्रधारी आहेत. निसर्गातील प्रत्येक शक्तीचे, शक्तीच्या प्रत्येक रूपाचे, व्यक्तिकरण (personification) केले गेले आहे. तसेच देवीच्या विविध रूपांत शक्तीच्या विविध रूपांचे व्यक्तीकरण केले आहे.
आजपासून सुरू होणारे देवीचे नवरात्र हे म्हणूनच, शक्तीची उपासना आहे.
नवरात्रामध्ये देवीच्या, म्हणजेच शक्तीच्या नऊ रूपांची नवदुर्गांच्या रूपात उपासना केली जाते. जाणून घेऊयात कोणत्या आहेत नवदुर्गा
दुर्गा सप्तशती ग्रंथांतर्गत देवी कवच स्तोत्रातील पुढील श्लोकांमध्ये अनुक्रमे नवदुर्गां ची नावे दिली आहेत –
प्रथमं शैलपुत्री च द्वितीयं
ब्रह्मचारिणी।
तृतीयं चन्द्रघण्टेति कूष्माण्डेति चतुर्थकम् ।।
पंचमं स्कन्दमातेति षष्ठं कात्यायनीति च।
सप्तमं कालरात्रीति महागौरीति चाष्टमम् ।।
नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गा: प्रकीर्तिता:।
उक्तान्येतानि नामानि ब्रह्मणैव महात्मना ।।
शैलपुत्री
दुर्गादेवी तिच्या पहिल्या रूपात ‘शैलपुत्री’ म्हणून ओळखली जाते. ती नवदुर्गांपैकी पहिली दुर्गा आहे. तिला ‘शैलपुत्री’ हे नाव पडले कारण तिचा जन्म पर्वतराज हिमालयाच्या घरात झाला होता. (शैल म्हणजे पर्वत). नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तिची पूजा केली जाते. तिचे वाहन वृषभ आहे, म्हणून तिला वृषारूढा असेही म्हणतात. या देवीच्या उजव्या हातात त्रिशूळ आहे आणि डाव्या हातात कमळ आहे. काही ठिकाणी तिच्या डाव्या हातात डमरू आहे असेही सांगितले जाते. तिला सती असेही म्हणतात.
शैलपुत्रीची कहाणी
एकदा सतीचे वडील प्रजापती दक्ष यांनी यज्ञ केला तेव्हा त्यांनी सर्व देवांना आमंत्रित केले, परंतु त्यांचे जावई भगवान शंकर यांना बोलावले नाही. सती आपल्या वडिलांच्या यज्ञाला जायला उत्सुक होती. शंकरांनी सतीला समजावले की बोलावणे नसतांना जाणे योग्य नाही. पण सतीचे समाधान झाले नाही. सतीचा हट्ट पाहून शंकरांनी तिला यज्ञाला जाण्याची परवानगी दिली.
सती दक्ष प्रजापतींकडे पोहोचल्यावर तिची उपेक्षा झाली. दक्षाने शंकरांबद्दल अपमानास्पद शब्दही बोलले. यामुळे सतीला खूप राग आला, पतीचा हा अपमान तिला सहन झाला नाही आणि तिने यज्ञकुंडात योगाग्नीद्वारे स्वतःला जाळून घेतले.
शंकरांना हे कळल्यावर ते भयंकर रागावले, आणि आपल्या जटांपासून त्यांनी वीरभद्राची निर्मिती केली आणि दक्ष प्रजापतीच्या यज्ञाचा नाश करण्यासाठी त्याला हजारो गणांसह पाठवले. त्यांनी त्या यज्ञाचा नाश केला. हीच सती पुढील जन्मी शैलराज हिमालयाची कन्या म्हणून जन्मली आणि तिला शैलपुत्री म्हटले गेले. शैलपुत्री पार्वतीजींच्या कठोर तपश्चर्येनंतर, लोककल्याणाच्या भावनेने तिचा भगवान शंकराशी पुन्हा विवाह झाला.
नवदुर्गांपैकी पहिली आणि सर्वात प्रमुख, शैलपुत्रीला खूप महत्त्व आहे आणि तिचे वैभव अनंत आहे. नवरात्राच्या पहिल्या दिवशी तिची पूजा केली जाते. या दिवशी, साधकाने मूलाधारावर आपले मन एकाग्र ठेवावे. हा त्यांच्या आध्यात्मिक अनुशासनाचा प्रारंभ बिंदू आहे. या दिवशी जप करावयाचा मंत्र: ओम शैलपुत्रये नमः.
या दिवशी श्री दुर्गा सप्तशतीच्या पहिल्या अध्यायाचे पठण करावे.
नवदुर्गा मधील इतर नावांविषयी जाणून घेऊयात यापुढील लेखांत त्यासाठी दररोज पुढील लेख नक्की वाचा
********* माधव भोपे*********
Discover more from Blissful Life
Subscribe to get the latest posts sent to your email.
