https://goodworld.in A website by Madhav Bhope

आठवणीतील पोळा How pola was celebrated in Maharashtra

महाराष्ट्रातील ग्रामीण भागात पूर्वी साजरा केल्या जाणाऱ्या पोळ्याच्या आठवणी आणि इत्थंभूत वर्णन.

Pola in Maharashtra in old days. श्रावण, भाद्रपद, आश्विन आणि कार्तिक, हे चार महिने सणावारांचे. श्रावणातील पहिल्या पंचमी पासून म्हणजे नागपंचमी पासून जे सण सुरू होतात, ते शीतला सप्तमी, नारळी पोर्णिमा किंवा रक्षाबंधन, गोकुळाष्टमी आणि गोपाळकाला, इत्यादि झाल्यावर श्रावण अमावास्येला साजरा केला जाणारा सण म्हणजे पोळा आणि त्याच दिवशी साजरा केला जाणार मातृदिन. पोळ्याच्या नंतर लगेच गणेश चतुर्थी, महालक्षुम्या, नंतर पितृपक्षानंतर येणारे नवरात्र, दसरा, आणि नंतर दिवाळी, यामुळे, “पोळा, अन सण झाले गोळा”. अशी जुन्याकाळी म्हण होती.

आजकाल शहरात राहतांना हे सण कुठे येतात आणि कुठे जातात यांचा पत्ता लागत नाही. तेंव्हा बालपणी हे सण किती उत्साहाने साजरे केले जायचे हे आठवते. आज पुण्या मुंबई सारख्या शहरात, कॉस्मोपोलिटन भागात राहतांना, मातीचे बैल सुद्धा सहज मिळत नाहीत, आणि मग घरीच बैलांचे चित्र ठेवून त्याचीच पूजा करून कसे तरी मनाचे समाधान करून घ्यावे लागते, तेंव्हा बालपणी ठिकठिकाणी दणक्यात साजरा होणारा पोळा आठवतो.

आधी मातृदिना बद्दल. पोळ्याच्या दिवशी, सकाळी घरी मातीच्या पाच  बैलांचे, आणि गाय गोर्‍याचे रीतसर पूजन करून आई त्यांना खिरीचा आणि पुरीचा नैवेद्य दाखवीत असे. आणि मग आम्हाला ‘वाण’ घ्यायला बोलावीत असे. ‘वाण’ म्हणजे काय, तर आई आम्हाला तिच्या मागे उभे राहायला सांगत असे. तिने सुताच्या धाग्याला चार पदरी करून, हळदीने रंगवून ठेवलेले असे. त्याला ‘पोवते’ म्हणत. आम्ही मागे येऊन उभे राहिल्यावर आई मागे न पाहता आम्हाला विचारीत असे,- “सर्वातीत कोण?” मग आम्ही म्हणायचे, “सर्वातीत मी !” मग पुन्हा आई विचारी, “सर्वातीत कोण?” मग पुन्हा आम्ही म्हणायचे, “सर्वातीत मी !” असे तीनदा कारायचे. मग आई आम्हाला आपला उजवा हात पुढे करायला सांगायची, आणि मागे न पाहता, हातावर ते बंधन (‘पोवते’) बांधायची. आधी साधी गाठ बांधून मग ती मागे वळून आमच्या हाताला ते ‘पोवते’ नीट बांधून द्यायची. मग आम्हाला खीर पुरीचा नैवेद्य द्यायची.

मला यात खूप अर्थ भरलेला वाटतो. आई ही आपली पहिली गुरू असते. त्या आईची शिकवण आपल्याला आयुष्यभर साथ करणारी असते. ही शिकवण ही तशीच उच्च दर्जाची असली पाहिजे. ‘सर्वातीत’ म्हणजे सगळ्याच्या अतीत, म्हणजे पलीकडला. आणि असा सर्वाच्या पलीकडला म्हणजे कोण असतो, तर ‘आत्मा’. म्हणजे आपल्या अपत्याला “तू सगळ्याच्या अतीत असणारा आत्मा आहेस” याची आठवण करून देणारा हा उपदेश आहे. आणि हा प्रश्नोत्तराच्या स्वरूपात, मुलाकडून तीनदा हे वदवून घेतले जाते, की मी सर्वातीत आहे. असा हा मूल आणि माता यांच्यामधील अनन्य संबंध अधोरेखित करणारा हा दिवस आहे, म्हणून, “मातृदिन”.

आमच्याकडे जरी शेती नव्हती, तरी त्याकाळी आम्ही राहत असलेली गावे छोटी छोटीच होती, आणि तिथे बहुसंख्य समाज हा शेतीवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे शेतीवर अवलंबून असणारा होता. मला समजायला लागल्यावर आठवणारा पोळा म्हणजे हिंगोलीचा पोळा. मी त्यावेळी 9 ते 11 वर्षांचा असेल. हिंगोलीला सगळेच सण प्रचंड उत्साहात आणि मोठ्या प्रमाणावर साजरे होत. त्यानंतरची आठवण म्हणजे सिल्लोड या गावची. तिथे अजून वेगळ्या प्रकारे पोळा साजरा होई. पण ठिकठिकाणी साजरा केला जाणारा पोळा हा बर्‍याच बाबतीत सारखा असे. माझ्या बहिणीच्या सासुरवाडीला, म्हणजे डोंगरावर असणार्‍या, सिल्लोड तालुक्यातील हळदा या गावी (त्यांच्याकडे शेती होती अणि ते पूर्णवेळ शेतकरी होते) साजरा होणारा पोळा मला बहीणीकडून ऐकायला मिळत असे.

खेड्यापाड्यात पोळ्याच्या कितीतरी दिवस आधी पासून शेतकर्‍यांची पोळ्याची तयारी सुरू व्ह्यायची. प्रत्येक शेतकर्‍याच्या घरी किती तरी बैल असत. त्यातल्या प्रत्येक बैलाचे आवडीने ठेवलेले नाव असे. तो कोणत्या कालवडी पासून झालेला आहे, कसा वाढला आहे, त्याच्या काय काय सवयी, किंवा ‘खोडी’ आहेत, त्याला काय आवडते आणि काय आवडत नाही, याची त्याच्या मालकाला इत्थंभूत माहिती असे. कोणता बैल गाडीला जुंपल्यावर अगदी शहाण्यासारखा चालतो, आणि कोणता नखरे करतो, पण तो नखरे करणारा बैलच औत ओढायला कसा भारी आहे, हे त्याचा मालक कौतुकाने सांगत असे.

पोळ्याच्या आधी येणारा आठवडी बाजाराचा दिवस बैलांच्या साजशृंगाराची सामग्री खरेदी करणार्‍या शेतकर्‍यांनी गजबजलेला असे. शिंगांना लावण्यासाठी वेगवेगळ्या रंगांचा ‘हिंगुळ’ (जो छोट्या छोट्या पत्र्याच्या डब्यांत मिळत असे), शिंगांना लावायसाठी रंगीबेरंगी बेगडी कागद, गळ्यात बांधायला घंटांच्या माळा, कवड्यांच्या माळा, तसेच नजर लागू नये म्हणून काळ्या रंगांच्या माळा,  रंगीबेरंगी गोंडे, पायात घालायला तोडे, बैलांच्या पाठीवर टाकायसाठी रंगीबेरंगी, वेगवेगळ्या रंगाच्या झुली, असे तऱ्हेतऱ्हेचे सामान बाजारात आलेले असे, आणि बैलांचे मालक आपल्या आवडत्या बैलांसाठी हे सर्व सामान मोठ्या आवडीने खरेदी करीत.pola bazar

पोळ्याच्या आदल्या दिवसापासून बैलांची स्पेशल ट्रीटमेंट सुरू होत असे. त्या दिवशी व दुसऱ्या दिवशी बैलांकडून कोणतेही काम घेत नसत. त्यांना नदीवर आंघोळीला घेऊन जात आणि चोळून चोळून आंघोळ घालीत. त्यानंतर बैलांची ‘खांदे मळणी’ होत असे. म्हणजे बैलांच्या खांद्यांना हळद आणि लोण्याने किंवा तुपाने मालिश करत. संध्याकाळी बैलांना चवळीच्या शेंगांची भाजी आणि पोळी किंवा पुरी खाऊ घालत.

पोळ्याच्या दिवशी सकाळी किंवा दुपारी बैलांना आंघोळीसाठी नदीवर घेऊन जात. तिथून आल्यानंतर त्यांना सजवायला सुरूवात करीत. तांदुळाच्या पिठापासून आणि अन्य वस्तूंपासून तयार केलेल्या रंगाने बैलांना रंगवीत. त्यामध्ये बैलांच्या अंगावर बटाट्यापासून किंवा लाकडापासून बनवलेल्या छापयांनी छापे काढीत. तसेच हातांनीही छापे काढीत. बैलांची शिंगे खरबरीत झालेली असल्यास आधी त्यांना चाकूने नीट तासून घेत, जेणे करून शिंगांवरील डेड भाग निघून जाईल. नंतर शिंगांना हिंगुळ लावीत. हिंगुळ म्हणजे एक प्रकारचा रंगच असे. नंतर काही जण त्या हिंगुळावर, तो ओला असतांनाच बेगड चिकटवीत. बैलांच्या गळ्यात आदल्या दिवशी आणलेल्या घुंगरांच्या माळा(ज्यांना घागरमाळा सुद्धा म्हणतात) कवड्यांच्या माळा, आणि काळ्या रंगाच्या ‘केसरी’  माळा घालीत. पोळ्याच्या दिवशी बैलाच्या नाकात घालणारी ‘नथ’ किंवा ‘नथणी’ सुद्धा बदलतात आणि नवीन घालतात.  शिंगांना दोन्ही बाजूंनी अडकवून गोंडे समोरच्या बाजूला कपाळावर येतील असे बांधीत. तसेच छान तयार केलेले बाशिंग बांधीत.

अशा प्रकारे छान सजवलेले बैल घेऊन मग घराबाहेर पडत, घरी अनेक बैल असल्यानंतर (ते सहसा असतच.) घरातील माणसे एकेक बैल घेऊन बाहेर पडत. तसेच आणखी बैल असतील ते घेऊन सालदार बाहेर पडत.bail2

गावातील घरोघरचे सगळे बैल घेऊन मग सर्वजण एका मोठ्या मैदानात जमत. काही ठिकाणी हे ठिकाण नदीच्या पल्याड असे. काही जण तिकडे जाण्या आधी बैलांना मारूतीचे दर्शन करून आणीत.

पोळा ‘फुटायची’ वेळ सहसा आधीच गावकऱ्यांनी सर्व सहमतीने ठरवलेली असे. गावातील पोळ्याच्या मैदानावर सर्व मातब्बर मंडळी जमलेली असे. मैदानावर एका ठराविक ठिकाणी एक सजवलेली दोरी  तोरण म्हणून दोन्ही बाजूंनी ताणून धरलेली असे. जमलेले बैलही या वातावरणाने खूप उत्तेजित होऊन फुरफुरू लागत. आणि आपल्या मालकाच्या हातातील दाव्याला हिसडा देऊन पुढे जायचा प्रयत्न करीत. ठरलेल्या वेळेच्या खूप आधी वाजवणारी मंडळी जोरजोरात डफडे वाजवायला सुरूवात करीत. पोळा फुटल्यानंतर पहिल्यांदा पुढे जाणारा बैल कोणाचा हे आधीच ठरलेले असे. काही ठिकाणी गावातील प्रमुख व्यक्ति, पाटील इत्यादींना हा मान असे. काही ठिकाणी ज्यांनी नवीन जमीन घेतली आहे अशा मालकाला हा मान दिला जाई, तर काही ठिकाणी या मानाचा ‘लिलाव’ करून, जास्तीत जास्त बोली लावणाऱ्याला हा मान दिला जाई आणि त्याच्या कडून मिळणारे पैसे गावाच्या विकासासाठी वापरले जात.

आणि मग पोळा फुटायची वेळ येई, आणि एका क्षणी ते तोरण बाजूला घेतले जाई आणि सगळ्यात पहिल्यांदा मानाचा बैल ऐटीत पुढे निघे. आणि त्याच्या मागे लगेच इतर बैलांचे मालक आपापले बैल दामटीत. शेकडो बैल आणि त्यांचे मालक एकाच वेळी पळत सुटल्याने सगळीकडे त्यांच्या पायांनी उडणारी धूळ, बैलांच्या मालकांनी आपल्या बैलांना दिलेले आवाज, या सर्वांनी वातावरण भरून जात असे.pola festival

मग त्यातील बरेच जण आपल्या बैलांना मारुतीच्या मंदिरात घेऊन जात आणि  मारूतीचे दर्शन करून आणीत. मग त्यातील बरेच जण आपल्या घराकडे जाण्याआधी गावातील सर्व घरांच्या समोर घेऊन जात. त्या ठिकाणी घरातील मंडळी सजून धजून बैलांच्या स्वागतासाठी उभेच असत. मग घरातील स्त्रिया त्या बैलांना ओवाळीत, हळदी कुंकू वाहीत, त्यांच्या पायावर पाणी घालीत, तसेच ज्याने बैल धरला आहे त्याच्या सुद्धा पायावर पाणी घालीत, आणि बैलाला पुरणपोळीचा घास भरवीत. बैलही मोठ्या आनंदाने हा पुरणपोळीचा नैवेद्य स्वीकारीत.pola14 pola15 pola16

एखाद्या एखाद्या घरी मात्र बैल काही केल्या पुरणपोळी घेत नसत. तोंडाजवळ पोळी नेली तरी आडवी मान हलवीत. मग अशा वेळी बैल रूसला आहे असे म्हणत. मग त्याचा मालक त्याच्या विनवण्या करी, तेंव्हा कुठे तो बैल तो नैवेद्य स्वीकारी. गावात त्यादिवशी पूर्ण उत्सवाचे आणि उत्साहाचेच वातावरण असे. सगळीकडे जाऊन आल्यानंतर मग बैलाचा मालक जेंव्हा त्याला घेऊन घरी येई, तेंव्हा त्या दोघांचे खूप उत्साहाने स्वागत होत असे. काही काही जण आधी घरी जाऊन मग सगळीकडे बैल फिरवीत. घरी बैलाला घरातील स्त्रिया ओवाळीत, त्याच्या पायांवर पाणी घालीत, हळदी कुंकू वाहून नमस्कार करीत, आणि त्याला पुरणपोळी खाऊ घालीत.

आपल्या घरी आपले सगळे बैल परत आल्यानंतर मग सगळ्यांना पुरणपोळीचे जेवण असे. त्यात सालदार, घरगडी, बैल धरणारे, शेजारी पाजारी, नातेवाईक, असे सर्व संमिलित असत आणि मोठी पंगत असे.

नाग हा विषारी प्राणी असूनही, शेतातील धान्य फस्त करणार्‍या उंदरांना मर्यादित ठेवतो, अणि जीवन साखळीचा तो एक आवश्यक भाग आहे,म्हणून आपली संस्कृती त्याच्याप्रतिही, नागपंचमीच्या सणाच्या निमित्ताने कृतज्ञता व्यक्त करते, त्याचे पूजन करते. त्यानिमित्ताने स्त्रिया बाहेर पडत, सामूहिकरित्या गावाबाहेरच्या मोकळ्या हवेत, वारुळावर जात, आणि नागाचे पूजन करत. यात निसर्गाच्या एका घटकाविषयी कृतज्ञतेचा भाव तर आहेच, पण अशा अनेक निमित्ताने  सगळ्यांचे एकत्र येणे, निसर्गाच्या जवळ जाणे, हे एक खूप मोठे मानसिक औषध ही आहे. तसेच बैल हा शेतीचा अविभाज्य घटक असून त्यावर शेतकर्‍यांचे अणि पर्यायाने इतर समाज घटकांचे जीवन अवलंबून असल्याने, नागपंचमी काय किंवा, बैलपोळा काय, हे आपले सण हे निसर्गाच्या अणि त्यातील घटकांच्या प्रति आपला कृतज्ञ भाव व्यक्त करणारी अप्रतिम व्यवस्था आहे.

 ज्याच्यावर आपले पोट, आपली शेती अवलंबून आहे, ज्याच्या श्रमामुळे आपण शेती करू शंकतो, त्या मुक्या जनावराच्या प्रति,  नुसते जनावर म्हणून नाही तर घरातील एक सदस्य म्हणून बघण्याची आणि त्याच्याप्रति कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्याची ही पर्वणी,  म्हणजे बैलपोळा.

अजून महाराष्ट्रातील ग्रामीण भागात बर्‍याच प्रमाणात पोळा हा वरील स्वरूपात साजरा केला जातो. पण शहरात राहणार्‍यांना मात्र बैल पोळा वरील स्वरूपात अनुभवायला मिळत नाही. आमच्या मुलांनी काही प्रमाणात हा अनुभव घेतला, पण नातवंडांना मात्र हा अनुभव देणे हे आता स्वप्नवतच झाले आहे.

असो. आज पोळ्याच्या अणि मातृदिनाच्या निमित्ताने जुन्या सगळ्या स्मृतींची उजळणी झाली. या पोळ्यानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा, आणि मातृदिनानिमित्त सर्व मातांना वंदन!

हा लेख आवडला असल्यास हा ब्लॉग जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आपल्या मुलांनाही हा ब्लॉग वाचू द्या, जेणेकरून त्यांना आपल्या संस्कृतीची ओळख होईल. 

माधव भोपे


Discover more from Blissful Life

Subscribe to get the latest posts sent to your email.