https://goodworld.in A website by Madhav Bhope

Guest Article by Shri Pandurang Deshpande

प्रत्यय निरूपण

 खालील लेख हा विशेषेकरून श्री समर्थ रामदास स्वामींचा दासबोध ग्रंथ ज्यांनी वाचला आहे, अभ्यास केला आहे, अशा साधकांसाठी आहे. नुसते वाचून, अभ्यास करून काही होत नाही, तर प्रत्यक्ष अनुभव हेच परमार्थाचे उद्दिष्ट आहे, हे या लेखात सांगितले आहे.
dasbodh2
 

दासबोधामध्ये समर्थांनी मानवी जीवनातील भौतिक व आध्यात्मिक पातळीवरील  विविध विषयांचा सर्वस्पर्शी विशालपट  सविस्तरपणे उलगडला आहे.

 पूर्वार्धात समर्थांनी प्रपंच अपूर्ण व दुःखाने भरलेला असून आत्मज्ञान  म्हणजेच खरे देवदर्शन असे सांगून मानवी बुद्धीला दृष्याकडून दृश्य निरसनाकडे ,  स्थूलाकडून सूक्ष्माकडे नेण्याचा मार्ग दाखविला आहे. सत्संगतीत आत्म्याविषयी सतत श्रवण,मनन व निदिध्यास करायला सांगितले आहे. गुरु करायला व त्याचा उपदेश जीवनात  आचरणात आणून त्याच्या कृपेला पात्र होण्यास सांगितले  आहे.

प्रत्यय किंवा प्रचिती यांनी येणारे ज्ञान  हेच खरे असे दासबोधाच्या  पूर्वार्धात शेवटी शेवटी  म्हणजे नवव्या  दशका पासून सांगायला समर्थ सुरुवात करतात. त्याआधी ते मायाब्रह्म निरूपण,दृश्यनिरसन,अनुमान निरसन,संदेहवारण, विकल्पनिरसन आणि भ्रमनिरुपण आदि संकल्पनातून श्रोत्याला, अनुमानाचे किंवा केवल पुस्तकाचे ज्ञान खोटे आहे असे दाखवून तिथून  पुढे  प्रचितीच्या वा प्रत्ययाच्या भूमिकेवर आणतात.

त्यांची  प्रचिती व प्रत्यय याविषयी जगज्योति दशक (समास ८), विवेकवैराग्य दशक (समास २) नामरूप दशक(समास ७) ही तीन स्वतंत्र प्रकरणे  आपण वाचतोच.

भौतिक जीवनाचा संदर्भ घेऊन प्रकरणांचे शेवटी प्रत्यय हीच परमार्थातील अंतिम ज्ञानाची कसोटी आहे असे ते पटवून देतात.

पूर्वार्धातील आत्मवस्तुचा सिद्धांत  व्यावहारिक आणि पारमार्थिक जीवनात कसा आचरणात आणायचा  हे समर्थ उत्तरार्धात सांगतात. संबंध दासबोध हा केवळ प्रचिती व प्रत्ययज्ञानाचा म्हणजेच अपरोक्षज्ञानाचा आदर्श ग्रंथच आहे. परमार्थाला वैराग्यासह विवेकाची जोड अत्यंत आवश्यक आहे हे ते वारंवार सांगतात.तसेच ज्या विवेकाने आत्मानात्म विचार करायचा तो सुद्धा प्रत्ययाच्या म्हणजेच स्वानुभवाच्या पायावर आधारलेला असावा,नाहीतर विवेक केवळ कल्पनारूप उरतो.

त्यांनी प्रत्ययाच्या अनेक ओव्या दासबोधात ठिकठिकाणी लिहिल्या आहेतdasbodh1

 अनुमान निर्शन -पिंडब्रह्माण्डाविषयी –

येथे प्रचित हे प्रमाण ।ना लगे शास्त्राचा अनुमान |   अथवा शास्त्री तरी पाहोन ।प्रत्ययो आणावा ।।(९-५-१४)

जितुके अनुमानाचे बोलणे ।तितुके वमनत्यागें टाकणे ।निश्चयात्मक बोलणे ।प्रत्ययाचे ।।(९-५-३९)

 सगुणभजन निरूपण नाम —

म्हणौन सगुण भजन ।वरी विशेष ब्रह्मज्ञान ।प्रत्ययाचे समाधान ।दुर्लभ जगी ।।(१०-७-३१)

नाना व्रते नाना दाने ।नाना योग तीर्थाटणें ।सर्वांहूनि कोटिगुणें ।महिमा आत्मज्ञानाचा ।।(१०-१०-६४)

या प्रचितीच्या गोष्टी ।प्रचित पाहावी आत्मदृष्टी ।प्रचितीवेगळे कष्टी।होवोची नये ।।(१०-१०-६७)

प्रत्यय निरूपण –

बरे करीत बरे होते ।हें तों  प्रत्ययास येते ।आता पुढे सांगावे ते। कोणास काये ।।(१२-२-२८)

 विवेक वैराग्य –

प्रखर वैराग्य उदासीन ।प्रत्ययाचे ब्रह्मज्ञान ।स्नानसंध्या भगवद्भजन| ।पुण्यमार्ग ।।(१२-४-१८)

 सृष्टिनिरूपण नाम-

पुस्तकज्ञाने निश्चय धरणे ।तरी गुरु कासया करणे ।या कारणे विवरणे ।आपुल्या प्रत्यये  ।।(१२-७-६)

 उभारणी निरूपणनाम –

नवे अनुमानाचे बोलणे ।याचा बरा प्रत्यये  घेणे ।वेदशास्त्र पुराणें ।प्रत्यये  घ्यावी ।।(१३-३-१७)

जे आपल्या प्रत्यया  येना ।ते अनुमानिक घ्यावे ना ।प्रत्ययाविण सकळ जना ।वेवसाय नाही ।।(१३-३-१८)

 कर्ता निरूपण  नाम –

बरे पाहता प्रत्यये आला| तरी का करावा गलबला ।प्रचित आलीयां आपणाला ।अंतर्यामी||(१३-८-३६)

 अखंड ध्यान नाम-

खोटे अवघेंच सांडावे| खरे प्रत्यये वोळखावें ।मायात्यागें समजावे|परब्रह्म ।।(१४-१०-९)

 आत्मदशक –शाश्वतब्रह्म निरूपण

लोकांचे बोली लागला|तो अनुमानेची बुडाला ।या कारणे प्रत्ययाला|पाहिलेच पाहावे||(१५-४-३१)

 सप्ततीन्वय –

पिंडावरून ब्रह्माण्ड पाहावे| प्रचितीने प्रचीतीस घ्यावे|उमजेना तरी उमजावे|विवर विवरो ।।(१६-७-४१)

आणि शेवटी —

 पूर्णदशक-सूक्ष्मनामाभिधान –

उदंड हुडकावे संत ।सांपडे प्रचितीचा महंत ।प्रचितीविण स्वहित । होणार नाही ।।(२०-३-२७)

प्रपंच अथवा परमार्थ ।प्रचितीविण अवघे वेर्थ ।प्रत्येयज्ञानी तो समर्थ ।सकळांमध्ये||(२०-३-२८)

शुद्ध सार श्रवण।शुद्ध प्रत्ययाचे मनन ।विज्ञान पावतां  उन्मन | सहजचि होते|| (२०-१०-२५)

ग्रंथाचे करावे स्तवन|स्तवनाचे  काय प्रयोजन| येथे प्रत्ययास कारण ।प्रत्ययो पाहावा ।।(२०-१०-३३)

याशिवायही अनेक ओव्या आहेत. या ओव्यांचे अर्थ स्पष्ट आहेत.dasbodh3

प्रपंचातील घटना ,वस्तू  अनुभव इंद्रियगोचर असतात  प्रपंचातील ज्ञान पडताळ्याने लगेच तपासात येतो. परंतु  परमार्थातील घटना, आत्मवस्तु व अनुभव हे सर्व अतींद्रिय असतात.  पडताळ्यासाठी इतर सिध्दसाधकांचा अनुभव तेथे कामास नाही. एवढेच काय  पण सद्गुरूंचा अनुभव सुद्धा आपल्या समाधानास पुरा पडत  नाही. तेथे फक्त स्वयंसाधनेने आलेला स्वानुभवच ज्ञानाच्या खरेपणाबद्दल निश्चयवृत्ती करतो … स.भ.प.पु. बेलसरे महाराज सांगतात की  प्रचितीचा दृष्टिकोन  हा प्रपंच आणि  परमार्थात मूलभूत आहे..पण परमार्थात प्रचिती येणे (आत्मसाक्षात्कार होणे )म्हणजे  काय साधते हे सांगणे अवश्य असते..मुंडक उपनिषदामध्ये दुसऱ्या अध्यायात असा मंत्र आहे–

भिंद्यन्ते हृदयग्रंथी: छिन्द्यन्ते सर्व संशया:।क्षीयंते चास्य कर्माणि तस्मिन्द्रष्टी परावरे ।।”

-सर्वत्र समानपणे व्यापून असलेल्या ब्रह्माचे दर्शन झाले की हृदयात वास करणारी अविद्या आणि तिच्यापासून उत्पन्न होणार वासनासमुदाय नष्ट पावतो. मनातील संदेह नष्ट पावतात..प्रत्ययामुळे निश्चळ आत्मनिवेदन होते..पापखंडन  होऊन कर्मक्षय होतो.माणसाचा जन्म मरणाचा फेरा होणे थांबते.

म्हणून समर्थ म्हणतात की ..

पापाची खंडना  जाली  ।जन्मयातना चुकली ऐसी स्वयें प्रचित आली म्हणिजे बरें  ।।(१०-८-२१ ते २३)

परमेश्वरास ओळखिलें ।आपण कोणसे कळले| आत्मनिवेदन जाले म्हणजे बरें ।।

ब्रह्माण्ड कोणे केले| कासयाचे उभारलें | मुख्य कर्त्यास ओळखिले म्हणिजे बरें| ।।

जय जय रघुवीर समर्थ ।

-पांडुरंग  देशपांडे

लेखक- श्री पांडुरंग देशपांडे.

pandurang deshpande
pandurang deshpande

लेखक हे Textile Process Advisor and consultant असून मुंबई येथील UDCT मधून Textile Engineer झालेले आहेत. व्यवसायानिमित्त भारतभर भ्रमण केले आहे. आणि अध्यात्माची आवड असल्याने संत वाङमयाचे अभ्यासक आहेत.


Discover more from Blissful Life

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Blissful Life

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading