https://goodworld.in A website by Madhav Bhope

येन बद्धो बली राजा दानवेन्द्रो महाबल:। तेन त्वामनुबध्नामि रक्षे मा चल मा चल।।

Raksha Bandhan 2024

Raksha Bandhan 2024

आज आपण महाराष्ट्रात जी राखी पोर्णिमा साजरी करतो, ती, आणि काही वर्षांपूर्वी म्हणजे साधारण 1970 -1980 या दशकातील महाराष्ट्रातील राखी पोर्णिमेचे स्वरूप हे खूप वेगळे होते! 

मला विशेषतः खेड्यातील राखी पोर्णिमा जी आठवते ती अशी-

आम्ही त्यावेळी 12 ते 15-16 वर्षांचे असतांना, राखी पोर्णिमे मध्ये बहीण भावांचा सण वगैरे असे काही स्वरूप नव्हते. या दिवशी गावातील भट मंडळी यांना आदर पूर्वक घरी बोलावले जात असे. किंवा काही भट मंडळी स्वतः ही नेहमीच्या ओळखीच्या घरी स्वतः हून जात. त्यांच्या जवळ लाल हिरव्या पिवळ्या गोंड्याच्या राख्यां चे बंडल असे.rakhhi e1724057917674 किंवा गावातील एखाद्या मंदिरातही त्यातील काही मंडळी बसलेली असत आणि जो येईल त्याला राखी बांधण्याचा कार्यक्रम करीत. लहान थोर सर्व मंडळी त्यांच्या समोर बसून आपला उजवा हात पुढे करीत. मग गुरूजी, वरील मंत्र म्हणत त्यांच्या हाताला राखी गुंडाळत, आणि तिच्या दोऱ्याची गाठ बांधून देत. मग राखी बांधून घेणारी व्यक्ति त्यांच्या हातावर श्रद्धेने दक्षिणा ठेवत- दक्षिणा किती- तर चार आणे , दहा पैसे, पाच पैसे सुद्धा. क्वचित एखादी सुस्थितीतील व्यक्ति आठ आणे किंवा बंदा रुपया ठेवत. आणि श्रद्धेने त्यांच्या पायावर डोके ठेवत. गुरूजी घरी आलेले असतील तर घरातील सर्वांची राखी बांधून झाल्यावर गुरुजींना काही गोड धोड दिले जाई आणि ते पुढच्या घराकडे वळत. 

अशा वेळी पुरोहित मंडळींची छोटी छोटी मुलेही हातात राख्यांचा गठ्ठा घेऊन बाहेर पडत. आणि जो दिसेल त्याला वरील मंत्र जसा येईल तसा म्हणत म्हणत राखी बांधत. बरेच लोक एकदा राखी बांधून घेतलेली असली तरी अशा अनेक मुलांकडून पुन्हा कौतुकाने राखी बांधून घेत. त्यासाठी खिशात पाच किंवा दहा पैशांच्या नाण्यांची चिल्लर मुद्दाम हून ठेवत.  आर्थिक परिस्थिती बेताची असणाऱ्या अशा मुलांना या पर्वकाळात अशा रीतीने मिळणाऱ्या छोट्याशा उत्पन्नामुळे त्यांचे पुस्तकांचे किंवा तत्सम छोटे छोटे खर्च भागवायला मदत होत असे. आणि त्यात कुणालाही काही वावगे वाटत नसे. 

बारा बलुतेदारांच्या  समाज व्यवस्थेत त्याकाळी पूजा आणि पंचांग सांगून पोट भरणारी भिक्षुक  मंडळी ही समाजाच्या दुर्बल घटकात मोडत असे. आणि शेतकरी राजा हा क्षत्रिय म्हणजे सबल, आणि सर्वांचा पोशिंदा मानला जात असे. त्यामुळे दुर्बलांचे रक्षण सबल असलेल्यांनी करावे असा एकूण भाव होता.  

बहिणीसुद्धा भावाला राखी बांधत. पण त्याचा अग्रक्रम नंतरचा असे. आणि फक्त राखी बांधणेच असे. ओवाळणे वगैरे त्यावेळी नाही, दिवाळीच्या- भाऊबीजेच्या दिवशी.  आणि बहिणीने राखी बांधल्यावर तिला काही ‘गिफ्ट’ देणे वगैरे प्रकार नव्हता. 

मला तरी त्यावेळची आठवणारी राखी पोर्णिमा अशी होती.

हळू हळू वरील प्रथा केंव्हा बंद होत गेली, समजले नाही.  कालांतराने सिनेमाच्या प्रभावामुळे, आपल्याकडे उत्तर भारतातील प्रथा रुजू लागल्या. उत्तर भारतात हा दिवस मुख्य करून बहीण भावाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. अर्थात त्याच्याही बऱ्याच कथा आहेत. कॅडबरी च्या जाहिरातीमध्ये बहीण भावाचे रूसणे, मग भावाने बहिणीला कॅडबरी चा मोठ्ठा पॅक देणे, ही जाहिरात आपल्यावर खूप परिणाम करून गेली. वेगवेगळ्या प्रकारच्या फॅन्सी आणि मोठमोठ्या  राख्या आल्या. किती मोठी राखी बांधली याच्यावर चर्चा होऊ लागल्या. काही काही तथा कथित ‘भाऊ’, ‘दादा’ आपल्या मनगटावर आपल्या तथाकथित ‘बहीणींकडून’ बांधून घेतलेल्या शे-पन्नास राख्या बांधून मिरविण्यात धन्यता मानू लागले.  आता तर महाराष्ट्रात उत्तर भारतातील काही प्रथा लग्न इत्यादि समारंभातही इतक्या रुजल्या आहेत, आणि त्या योग्य की अयोग्य याचा कुणी विचार करतांना दिसत नाहीत.  असो.66c2c60393375 raksha bandhan 2024 date history and significance 181522239 16x9 1

तर  रक्षा बंधन किंवा राखी  पोर्णिमा याच्याबद्दल पूर्व काळीचे काही संदर्भ आहेत ते पाहू. पण त्याआधी वरील मंत्राचा अर्थ पाहू-

येन बद्धो बली राजा दानवेन्द्रो महाबल:।
तेन त्वामनुबध्नामि रक्षे मा चल मा चल।।

अर्थात, ज्या रक्षा सूत्राने दानवांचा राजा बली हा वचनबद्ध आहे, ते रक्षासूत्र मी (पुरोहित) तुम्हाला (यजमानाला) बांधत आहे. आणि नंतर त्या रक्षा सूत्राला प्रार्थना केली आहे ‘रक्षे’ म्हणजे रक्षा सूत्र. की तू स्थिर रहा. ‘मा चल’, ‘मा चल’ (मा म्हणजे नको- चल म्हणजे चलायमान)

सामान्यतः या मंत्राचा अर्थ असा आहे की, रक्षासूत्र बांधताना ब्राह्मण किंवा पुजारी आपल्या यजमानांना सांगतात की, ज्या रक्षासूत्राने दानवांचा पराक्रमी राजा बळी याला धर्माच्या बंधनात बांधले गेले होते, ते म्हणजे, ते धर्मात वापरले होते, मी तुम्हाला त्याच रक्षासूत्राने बांधले आहे, म्हणजेच मी धर्माला बांधील आहे. यानंतर पुजारी रक्षासूत्राला म्हणतात की हे रक्षा, तू स्थिर राहा, स्थिर राहा. अशा प्रकारे, रक्षा सूत्राचा उद्देश ब्राह्मणांना त्यांच्या यजमानांची धर्मासाठी उपासना करण्यासाठी प्रेरित करणे आणि त्यांचा वापर करणे हा आहे.

पंचांगकर्ते मोहन दाते यांनी रक्षा बंधना बद्दल दिलेली माहितीही खूप उपयुक्त आहे- श्री मोहन दाते म्हणतात-

Raksha Bandhan 2024

१९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन दिवसभरात कधीही करता येईल.


पूर्वीच्या काळी रक्षाबंधनाचा अर्थ बहिणीने भावाला राखी बांधणे एवढाच अभिप्रेत नव्हता, इंद्राच्या पत्नीने इंद्राला रक्षा सूत्र बांधलेले होते, राखी म्हणजे रक्षा सूत्र कोणी कोणास व कोणत्या हेतूने बांधावयाचे असते ? याचा ही विचार रक्षा बंधन साठी महत्वाचा आहे. त्याकाळी रक्षाहोम करून रक्षासूत्र तयार करून ते राजाला बांधले जायचे, अशा पद्धतीने रक्षाबंधन विधिवत करणाऱ्यांनी भद्राकाल वर्ज्य करावा.


राखी पौर्णिमा अर्थात बहिणीने भावाच्या हाताला राखी बांधणे. याकरिता भद्रा वर्ज्य नाही आणि राखी बांधण्यासाठी कोणत्याही वेगळ्या मुहूर्ताची आवश्यकता नाही. त्यामुळे भद्राचा विचार न करता 19 ऑगस्ट 2024 रोजी सोमवारी नेहमी प्रमाणे राखीपौर्णिमा साजरी करावी असे आमचे मत आहे.

 

तसेच रक्षाबंधन हा मुंज, विवाह, वास्तु प्रमाणे मंगल कार्यासारखे नसून सामाजिक व कौटुंबिक उत्सव असल्याने भद्रा असतानाच्या काळात म्हणजे दिवसभरात आपल्या सोईने केंव्हा ही करता येईल असे आमचे मत असल्याने दाते पंचांगात रक्षाबंधनाची वेळ दिलेली नाही . सध्याच्या काळात फक्त पौर्णिमेस रक्षा बंधन करतात असे होत नाही १-२ दिवस आधी किंवा नंतरचे रविवारी सुध्दा करतात धर्मशास्त्रा तील वचनानुसार
ज्यांना रक्षाबंधन विधिवत् करावयाचे आहे त्यांनी खालील प्रमाणे विधी करावा व त्यासाठी भद्राकाल वर्ज्य करावा म्हणजे दुपारी १ वाजून ३३ मिनिटानंतर रक्षाबंधन करावे.

 


रक्षाबंधन विधी – तांदूळ, सोने व पांढऱ्या मोहऱ्या किंवा दूर्वा , अक्षता, केशर, चंदन, मोहरी चे दाणे एकत्र करून त्यांची रेशमी कापडात पुरचुंडी बांधून त्याला रंगीत दोरा बांधून रक्षा अर्थात् राखी तयार करावी आणि ती देवघरात कलशावर ठेऊन तिची पूजा करावी. नंतर पुढील मंत्र म्हणत ती राखी बांधावी.
येन बद्धो बलीराजा दानवेन्द्रो महाबलः । तेन त्वामपि बध्नामि रक्षे मा चल मा चल ।।
सध्याच्या काळात
मात्र या शिवाय प्लास्टिक, स्पंज, इत्यादी पासून तयार केलेली बाजारात मिळणारी वेगवेगळ्या प्रकारची फॅन्सी राखी बांधावयाची असेल तर भद्राकाळात सुध्दा असे रक्षाबंधन करता येईल.
असा हा बहीण – भाऊ, मित्र, समाज बांधव यांच्यातील सामाजिक सलोखा राखणारा हा रक्षाबंधन उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करावा.🙏
मोहन दाते 

याबाबीत काही पौराणिक आणि ऐतिहासिक संदर्भ आता पाहूत. 

इंद्राची कथा 

एकदा देव आणि दानव यांच्यात युद्ध सुरू झाले, आणि ते बारा वर्ष पर्यन्त चालले. असुरांनी देवांना आणि इंद्राला पराजित केले. इन्द्र आणि इतर देव अमरावतीला  गेले. इकडे असुरांनी तिन्ही लोकात घोषणा केली की इथून पुढे त्यांचीच पूजा केली जाईल. कोणीही यज्ञकर्म इत्यादि काही करू नये. त्यावेळी हतबल होऊन इन्द्र, बृहस्पतींच्या जवळ जाऊन त्यांना यातून बाहेर काढण्याची प्रार्थना केली. बृहस्पतीने इंद्राला ‘रक्षा विधान’ करायला सांगितले.  श्रावण पोर्णिमेला वरील मंत्राने रक्षा विधान संपन्न करण्यात आले.  इंद्राची पत्नी इंद्राणी हिने वरील प्रकारे द्विज यांच्याकडून विधान करवून रक्षा तंतु घेतला आणि इंद्राच्या उजव्या हाताला बांधून मग त्याला युद्धाला पाठविले.  रक्षा तंतूच्या प्रभावामुळे इंद्राला युद्धात विजय प्राप्त झाला.

कृष्ण आणि द्रौपदीची कथा 

कृष्णाने जेंव्हा शिशुपालाचा वध सुदर्शन चक्राने केला, तेंव्हा कृष्णाच्या हाताला सुदर्शन चक्र लागून जखम झाली आणि त्यातून रक्त येऊ लागले. ज्यावेळी  द्रौपदीने ते पाहिले तेंव्हा तिने ते रक्त थांबवण्यासाठी तिच्या भरजरी शालूला मागचा पुढचा कुठलाही विचार न करता एक चिंधी फाडून ती श्रीकृष्णाच्या हाताला बांधून रक्त थांबविले. द्रौपदी ही कृष्णाची मानलेली बहीण. नंतर पुढे जेंव्हा कौरवांच्या भर सभेत तिचे वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न झाला, त्यावेळी जेंव्हा अनन्य होऊन तिने कृष्णाचा धावा केला, तेंव्हा कृष्णाने तिला वस्त्रे पुरवून तिची लाज वाचविली , आणि तिने बांधलेल्या चिंधीची अशा प्रकारे परतफेड केली.  असे म्हणतात की तेंव्हा पासून भावाने बहिणीचे रक्षण करण्यासाठी त्याला राखी बांधायची अशी प्रथा सुरू झाली.

राणी कर्णावती आणि हुमायूँ ची कहाणी.

एकदा राजपूत मुस्लिमांच्या विरूद्ध लढत होते. त्यात आपला पती राणा संग याच्या मृत्यू नंतर त्याची वीर पत्नी राणी कर्णावती ही मेवाड मध्ये लढत होती.  त्यावेळी गुजरातच्या बहादुर शाह ने मेवाड वर दुसर्‍यांदा आक्रमण केले. कर्णावती ने त्यावेळी हुमायूँ ला राखी पाठवून आपली रक्षा करण्याविषयी विनंती केली. हुमायूँ त्यावेळी दुसर्‍या युद्धात होता. पण राणीची ही हाक ऐकून त्याने आपली फौज मेवाडकडे पाठविली. दुर्दैवाने त्याचे सैनिक वेळेवर पोचू शकले नाही, आणि तोपर्यंत राणी कर्णावतीने जौहार करून प्राण त्याग केला होता. पण हुमायूँ च्या सैन्याने चित्तोड मधून शाह च्या सैन्याला हाकलून लावले आणि कर्णावती चा मुलगा विक्रमजीत याला राज्यावर बसविले, अशी कथा आहे.images 27

अशा प्रकारे श्रावण मासात येणार्‍या या पवित्र सणाला, भारताच्या विविध भागांत विविध इतिहास आहे. अशा या पावन पर्वा निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा!

आपणास ही पोस्ट आवडली असल्यास या ब्लॉग ची लिंक सर्वांना तसेच आपल्या सर्व ग्रुप्स मध्ये माझ्या नावासकट फॉरवर्ड करायला काहीच हरकत नाही.

माधव भोपे


Discover more from Blissful Life

Subscribe to get the latest posts sent to your email.