भगवान श्रीराम हे आपल्या भारतीयांच्या रोमा रोमात वसलेले आहेत. आपल्या बोलण्यात, ठायी ठायी ‘राम’ येतो.
रामरक्षा स्तोत्र हे बहुसंख्य भारतीयांच्या घरात म्हटले जाणारे स्तोत्र आहे. आणि या स्तोत्राच्या दिव्य शक्तीचा अनुभव लोकांना वेळोवेळी येत असतो.
आमच्या इथे अनेक पिढ्यांपासून हे स्तोत्र दररोज संध्याकाळी म्हटले जाते, जसे की ते अनेक घरांमध्ये म्हटले जाते.
साधारण ४-५ वर्षांपूर्वी, यावर विचार करत असतांना, याबद्दल लिहावे, अशी प्रेरणा, झाली, आणि या स्तोत्राबद्दल, आमच्या फॅमिली whatsapp group वर, काही भागांमध्ये, लिहिण्यात आले. त्या लिखाणामध्ये निरनिराळ्या ठिकाणाहून घेतलेली माहिती आहेच, पण माझ्या मनाला भावलेले, सुचलेले, असे काही विचारही मांडले आहेत. त्यावेळी आणि त्यानंतरही, बऱ्याच जणांनी, हे लेख खूप उपयुक्त झाले असल्याचे कळविले. काही जणांनी ते सगळे एकत्र करून सेव्ह करून ठेवले. रामरक्षा हे स्तोत्र कालातीत आहे. त्यामुळे, आज तेंव्हा ग्रुपवर टाकलेले भाग, काही सुधारणांसहित तसेच काही बदलांसहित या ठिकाणी, ब्लॉगवर प्रकाशित करत आहे, जेणेकरून जास्तीत जास्त श्रीराम भक्तां पर्यन्त ते पोचतील.
रामरक्षा स्तोत्र हे मंत्र म्हणून तर प्रभावी आहेच, पण भक्तिरसामध्ये ओतप्रोत असे एक काव्य आहे. त्यामुळे याचा आस्वाद घेतांना, घाई करून चालणार नाही. तर जशी आपण आपली आवडती वस्तू , डोळे बंद करून, तिचा स्वाद घेत, चाखत चाखत खातो, त्याप्रमाणे, यातील एकेक काव्यपंक्तीचा, कल्पनांचा, उपमांचा आस्वाद घेत घेत या स्तोत्राचे पठण-स्मरण केले तर अगदी ब्रह्मानंदी टाळी लागू शकते. म्हणून आपण या स्तोत्राचा आस्वाद अनेक भागांमध्ये घेणार आहोत. पण त्याचबरोबर, सरते शेवटी, हे सर्व लेख एकत्र, एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावेत म्हणून, शेवटच्या भागात, सगळ्या लेखांचे एकत्र असे एक pdf देणार आहोत, जे की ज्यांना पाहिजे त्यांना डाउनलोड करून घेऊन, आपल्या मोबाईल किंवा लॅपटॉप वर सेव्ह करून ठेवता येईल.
आज त्या लेखमालेतील पहिला भाग प्रकाशित करीत आहे.
सर्वप्रथम, संदर्भासाठी, श्रीराम रक्षा स्तोत्र शुद्ध स्वरूपात खाली देत आहे.
श्रीरामरक्षास्तोत्रम्
अस्य श्रीरामरक्षास्तोत्रमन्त्रस्य बुधकौशिक ऋषिः। श्री सीतारामचंद्रो देवता । अनुष्टुप् छंदः। सीता शक्तिः। श्रीमान हनुमान् कीलकम् । श्री सीतारामचंद्रप्रीत्यर्थे रामरक्षास्तोत्रजपे विनियोगः ।
अथ ध्यानम्
ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं
पीतं वासो वसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नम् ।
वामाङ्कारूढ सीतामुखकमलमिलल्लोचनं नीरदाभं
नानालङ्कार दीप्तं दधतमुरुजटामंडलं रामचन्द्रम् । ।
इति ध्यानम्
चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् ।
एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम् ॥1॥
ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनम् ।
जानकीलक्ष्मणोपेतं जटामुकुटमंडितम् ॥2॥
सासितूणधनुर्बाणपाणिं नक्तंचरान्तकम् ।
स्वलीलया जगत्त्रातुमाविर्भूतमजं विभुम् ॥3॥
रामरक्षां पठेत्प्राज्ञः पापघ्नीं सर्वकामदाम् ।
शिरो मे राघवः पातु भालं दशरथात्मजः ॥4॥
कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्रप्रियः श्रुती ।
घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः ॥5॥
जिह्वां विद्यानिधिः पातु कण्ठं भरतवंदितः ।
स्कन्धौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकार्मुकः ॥6॥
करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्न्यजित् ।
मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः ॥7॥
सुग्रीवेशः कटी पातु सक्थिनी हनुमत्प्रभुः ।
ऊरू रघूत्तमः पातु रक्षःकुलविनाशकृत् ॥8॥
जानुनी सेतुकृत्पातु जङ्घे दशमुखान्तकः ।
पादौ विभीषणश्रीदः पातु रामोऽखिलं वपुः ॥9॥
एतां रामबलोपेतां रक्षां यः सुकृती पठेत् ।
स चिरायुः सुखी पुत्री विजयी विनयी भवेत् ॥10॥
पातालभूतलव्योमचारिणश्छद्मचारिणः ।
न दृष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः ॥11॥
रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन् ।
नरो न लिप्यते पापैर्भुक्तिं मुक्तिं च विन्दति ॥12॥
जगज्जैत्रैकमन्त्रेण रामनाम्नाऽभिरक्षितम् ।
यः कण्ठे धारयेत्तस्य करस्थाः सर्वसिद्धयः ॥13॥
वज्रपञ्जरनामेदं यो रामकवचं स्मरेत् ।
अव्याहताज्ञः सर्वत्र लभते जयमङ्गलम् ॥14॥
आदिष्टवान्यथा स्वप्ने रामरक्षामिमां हरः ।
तथा लिखितवान्प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः ॥15॥
आरामः कल्पवृक्षाणां विरामः सकलापदाम् ।
अभिरामस्त्रिलोकानां रामः श्रीमान्स नः प्रभुः ॥16॥
तरुणौ रूपसम्पन्नौ सुकुमारौ महाबलौ ।
पुण्डरीकविशालाक्षौ चीरकृष्णाजिनाम्बरौ ॥17॥
फलमूलाशिनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ ।
पुत्रौ दशरथस्यैतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ ॥18॥
शरण्यौ सर्वसत्त्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्मताम् ।
रक्षःकुलनिहन्तारौ त्रायेतां नो रघूत्तमौ ॥19॥
आत्तसज्जधनुषाविषुस्पृशावक्षयाशुगनिषङ्गसङ्गिनौ ।
रक्षणाय मम रामलक्ष्मणावग्रतः पथि सदैव गच्छताम् ॥20॥
सन्नद्धः कवची खड्गी चापबाणधरो युवा ।
गच्छन्मनोरथोस्माकं रामः पातु सलक्ष्मणः ॥21॥
रामो दाशरथिः शूरो लक्ष्मणानुचरो बली ।
काकुत्स्थः पुरुषः पूर्णः कौसल्येयो रघुत्तमः ॥22॥
वेदान्तवेद्यो यज्ञेशः पुराणपुरुषोत्तमः ।
जानकीवल्लभः श्रीमानप्रमेयपराक्रमः ॥23॥
इत्येतानि जपन्नित्यं मद्भक्तः श्रद्धयाऽन्वितः ।
अश्वमेधाधिकं पुण्यं सम्प्राप्नोति न संशयः ॥24॥
रामं दूवार्दलश्यामं पद्माक्षं पीतवाससम् ।
स्तुवन्ति नामभिर्दिव्यैर्न ते संसारिणो नराः ॥25॥
रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं
काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकम् ।
राजेन्द्रं सत्यसंधं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं
वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिम् ॥26॥
रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे ।
रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः ॥27॥
श्रीराम राम रघुनन्दनराम राम
श्रीराम राम भरताग्रज राम राम ।
श्रीराम राम रणकर्कश राम राम
श्रीराम राम शरणं भव राम राम ॥28॥
श्रीरामचन्द्रचरणौ मनसा स्मरामि
श्रीरामचन्द्रचरणौ वचसा गृणामि ।
श्रीरामचन्द्रचरणौ शिरसा नमामि
श्रीरामचन्द्रचरणौ शरणं प्रपद्ये ॥29॥
माता रामो मत्पिता रामचन्द्रः
स्वामी रामो मत्सखा रामचन्द्रः ।
सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालु-
र्नान्यं जाने नैव जाने न जाने ॥30॥
दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा ।
पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनम् ॥31॥
लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथम ।
कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये ॥32॥
मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम् ।
वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ॥33॥
कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् ।
आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम् ॥34॥
आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदाम् ।
लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् ॥35॥
भर्जनं भवबीजानामर्जनं सुखसम्पदाम् ।
तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनम् ॥36॥
रामो राजमणिः सदा विजयते रामं रामेशं भजे
रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः ।
रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं
रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर ॥37॥
राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे ।
सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने ॥38॥
इति श्री बुधकौशिकविरचितं श्रीरामरक्षास्तोत्रम् सम्पूर्णम् ।
आता त्यावरील विवेचन:
श्री रामरक्षा स्तोत्र
श्री रामरक्षा स्तोत्र आपणा सर्वांनाच माहित आहे आणि त्याचे महत्त्वही आपणास माहित आहे.
रामरक्षा स्तोत्र हे ‘स्तोत्र मंत्र’ आहे. स्तोत्र हे सहसा एखाद्या देवतेचे गुणवर्णन करणारे काव्य असल्याचे दिसून येते. पण मंत्र म्हणजे शक्तिशाली अक्षर समूह. आपल्या संस्कृतीमध्ये असंख्य मन्त्र आहेत हे आपणास माहित आहे. आपण अशा स्तोत्र रूपी मंत्रांकडे कडे नीट लक्ष दिले तर आपणास असे दिसून येईल, की, प्रत्येक स्तोत्राचा एक ‘ऋषि’ असतो; म्हणजे, ते स्तोत्र रचणारा, किंवा, ज्याच्या द्वारे ते स्तोत्र प्रकट झाले, तो. तसेच प्रत्येक स्तोत्राची एक ‘देवता’ असते. तसेच, स्तोत्राच्या सुरुवातीला, ते स्तोत्र, कुठल्या ‘छंदात’ रचले गेले आहे, त्याचा उल्लेख असतो. तदनंतर, त्या स्तोत्राची ‘शक्ति’ कोण आहे याचा उल्लेख असतो. त्यानंतर, त्या स्तोत्राची , किंवा मंत्राची , ‘कीलक’ असलेली देवता कोणती आहे, याचा उल्लेख असतो. कीलक म्हणजे किल्ली. स्तोत्र किंवा मंत्ररूप हा खजिना जर उघडायचा असेल तर त्याची किल्ली लावणे आवश्यक आहे. या रामरक्षा स्तोत्राची, हनुमान ही देवता कीलक आहे. आणि सरते शेवटी, त्या स्तोत्राचा ‘विनियोग’ म्हणजेच ‘उपयोग’ कुणा किंवा कशा प्रीत्यर्थ करण्याचे योजले आहे, याचा उल्लेख असतो.
आपणा ‘श्री सूक्तामध्ये’ ‘जपे विनियोग:’ किंवा ‘अभिषेके विनियोग:’ असा, प्रसंगानुसार उच्चार करतो. श्री सूक्ता’ ने अभिषेक करणार असू, तर ‘अभिषेके विनियोग:’, किंवा, श्री सूक्ताचा जप करणार असू तर, ‘जपे विनियोग:’.
अस्य श्रीरामरक्षास्तोत्रमन्त्रस्य बुधकौशिक ऋषिः। श्री सीतारामचंद्रो देवता । अनुष्टुप् छंदः। सीता शक्तिः। श्रीमद् हनुमान् कीलकम् । श्री सीतारामचंद्रप्रीत्यर्थे जपे विनियोगः
रामरक्षा स्तोत्राचे रचयिता, ‘बुधकौशिक’ ऋषि आहेत. बुधकौशिक ऋषि नक्की कोण होते, याबद्दल वेगवेगळे मतप्रवाह आहेत. काहींच्या मते, महर्षि वाल्मिकी म्हणजेच बुधकौशिक ऋषि होत. रामरक्षा स्तोत्राच्या १५ व्या श्लोकात,
आदिष्टवान्यथा स्वप्ने रामरक्षामिमां हरः ।
तथा लिखितवान्प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः ॥15॥ असे म्हटले आहे, अर्थात, हर म्हणजे महादेव यांनी स्वप्नात येऊन संगीतल्याप्रमाणे, सकाळी बुधकौशिक ऋषींनी ही रामरक्षा लिहिली, असा उल्लेख आहे. काहींच्या मते, बुधकौशिक ऋषि म्हणजे विश्वामित्र ऋषि होत. असो.
सध्या तो विषय बाजूला ठेवू.
या स्तोत्राचे ‘श्री सीता रामचंद्र’ हे देवता आहेत. आपल्याकडे सर्व मुख्य देवता या जोडीजोडीनेच येतात. आणि त्यातही, स्त्री देवतेचे स्थान प्रथम असते, हे लक्षणीय आहे. एखाद्या स्तोत्रात जी देवता मध्यवर्ती असते, किंवा ज्या देवतेचे गुणवर्ण त्या स्तोत्रात केले असते, ती त्या स्तोत्राची ‘देवता’.
त्याच्यानंतर, ते स्तोत्र हे मुख्यता: कुठल्या ‘छंदात’ रचले गेले आहे, याचा उल्लेख येतो.
अनुष्टुप् छंद हा संस्कृत काव्यामध्ये सर्वाधिक वापरला जाणारा छंद आहे. वेदांमध्ये याचा वापर झालेला आहे. रामायण, महाभारत, भगवद्गीता यांतील अधिकांश श्लोक हे अनुष्टुप् छंदामध्ये आहेत. या छंदात ८- ८ वर्णांचे चार पाद, असे एकूण ३२ वर्ण असतात.
प्रत्येक स्तोत्राची/ मंत्राची, एक ‘शक्ति’ असते. या स्तोत्राची, ‘सीता’ ही शक्ति आहे.
आता ‘कीलका’ विषयी: कीलक म्हणजे किल्ली. प्रत्येक मंत्राची, एक कीलक देवता असते. त्या देवतेचे स्मरण केल्याशिवाय ते स्तोत्र फलीभूत होत नाही. रामरक्षा स्तोत्राचे कीलक म्हणजे ‘हनुमान’ आहे. हनुमान हा रामाचा परम भक्त होता. हनुमानरूपी देवतेची ‘किल्ली’ लावल्याशिवाय, हे स्तोत्र ‘उघडणार’ नाही.
सरते शेवटी, ह्या स्तोत्राचा ‘विनियोग’ म्हणजेच ‘उपयोग, कशा प्रीत्यर्थ, किंवा कुठल्या देवतेच्या प्रीत्यर्थ केला जात आहे, त्याचा उल्लेख.
बहुतेक स्तोत्रांमध्ये, सुरूवातीची ही प्राथमिक आणि आवश्यक माहिती देऊन झाल्यानंतर, पुढील श्लोकामध्ये, त्या देवतेच्या, रूपाचे ‘ध्यान’ असते. म्हणून यापुढील श्लोकात, या स्तोत्राच्या देवतेचे, म्हणजे श्री रामचंद्राचे, व सीतेचे ध्यान केले आहे.
अथ ध्यानम्:
ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं ।
पीतं वासो वसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नम् ॥
वामांकारूढसीतामुखकमलमिलल्लोचनं नीरदाभं ।
नानालंकार दीप्तं दधतमुरुजटामंडनं रामचंद्रम् ॥
श्रीरामाच्या आकृतीचे स्मरण करतांना, आपल्याला त्यातील सर्वात प्रभावशाली गोष्ट लगेच डोळ्यासमोर येणारी कुठली असेल, तर ती म्हणजे रामाचे दीर्घ आणि बलशाली बाहू!.‘जानु’ म्हणजे ‘गुडघा’ ‘आ’ म्हणजे पर्यंत. ज्याचे बाहू त्याच्या गुडघ्यां पर्यंत लांब आहेत, तो श्रीराम. असे ‘आजानु बाहू’ पुरूष हे लाखो करोडोंमध्ये एखादेच असतात. आपण जेंव्हा रामरक्षा ‘कवच’ म्हणतो, तेंव्हा, रामाचे विशाल बाहू आपले संरक्षण करताहेत, ही भावना आपोआपच आपल्या मनात येते . रामाचे आजानुबाहू हे त्याच्या धनुर्विद्येसाठी वरदान होते.
‘धृतशरधनुषं’ अर्थात, हातात धनुष्य आणि बाण घेतलेला. ‘बद्धपद्मासनस्थं’ अर्थात, बद्धपद्मासन घातलेला. पीत वस्त्र नेसलेला,
ज्याचे नेत्र, नुकत्याच उमललेल्या कमला सोबत स्पर्धा करतात आणि ज्याच्या मुखावर ‘प्रसन्न’ भाव आहे.
ज्याच्या ‘वाम’ म्हणजे डाव्या अंकावर म्हणजे मांडीवर सीता विराजमान आहे.
(हातात धनुष्य बाण घेतलेला, आणि बद्ध पद्मासन घातलेला आणि डाव्या मांडीवर सीता बसलेली आहे, या तीन्ही गोष्टी एकाच वेळी कशा शक्य आहेत हे अजून मला समजले नाही. बद्ध पद्मासनामध्ये, पद्मासन घालून, आपले हात पाठीच्या मागून नेऊन नंतर दोन्ही पायांचे अंगठे हाताने पकडायचे असतात. अशा वेळी हात मोकळे नसतांना धनुष्य बाण कसे धरणार? तसेंच अशा अवस्थेमध्ये, सीतेला डाव्या मांडीवर कसे घेणार? या विषयी काही खुलासा कुठे मिळतो का याचा शोध घेत आहे. मध्य प्रदेशातील हरदा येथे श्रीरामाची मूर्ती, डाव्या मांडीवर सीता बसलेली, अशी आहे. इतर कुठे अशी मूर्ति दिसत नाही.)
आणि डाव्या बाजूला बसलेल्या सीतेच्या मुख कमलाकडे कडे ‘मिलल्लोचनं’ म्हणजे ज्याचे डोळे खिळले आहेत. आणि डोळे कसे, तर ‘नीरदाभं’ म्हणजे पाण्याने भरलेल्या काळ्या मेघांसारखे. नाना+ अलंकार +दीप्तं म्हणजे विविध अलंकारांनी दीप्त झालेला; दधतम् म्हणजे धारण करीत असलेला, काय? तर ‘उरु जटा’ उरु म्हणजे मांड्या. ‘उरु जटामंडनं’ म्हणजे मांड्यांपर्यंत रुळणाऱ्या जटांनी मंडित झालेला असा तो रामचंद्र. या ठिकाणी ‘जटामंडलं’ असेही काही ठिकाणी पाहण्यात येते. ‘जटामंडलं’ असा शब्द घेतल्यास ज्याच्या भोवती मांड्यांपर्यंत रुळणाऱ्या जटांचे ‘मंडल’ आहे असा घेता येतो. मला व्यक्तिशः ‘जटामंडनं’ अधिक योग्य वाटते.
रामरक्षेला सुरुवात करतांना डोळे मिटून, अशा प्रकारे श्रीरामाचे रूप डोळ्यासमोर आणल्या नंतर, भाव समाधि लागणार नाही तर काय! या इथे ‘ध्यान’ समाप्ति होते. ‘इति ध्यानम्.’ …..
क्रमशः
पुढील येणारे भाग अवश्य वाचा, आणि सर्वात शेवटी येणाऱ्या भागात दिले जाणारे पीडीएफ डॉक्युमेंट सेव्ह करून ठेवा.
श्री रामरक्षा स्तोत्राचे अंतरंग- bhag 2
Related
Discover more from Blissful Life
Subscribe to get the latest posts sent to your email.