मागील लेखावरून-पुढे
श्रीराम आणि सीतेच्या ध्यानानंतर, रामरक्षा स्तोत्र सुरू होते.
त्यापुढील पहिल्या श्लोकात रामाच्या चरित्राची आणि नामाची महती सांगितलेली आहे:-
चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् ।
एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम् ॥1॥
ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनम् ।
जानकीलक्ष्मणोपेतं जटामुकुटमंडितम् ॥2॥
श्रीरामाचे चरित्र हे ‘शत कोटी’ श्लोकांमाध्येही वर्णन करून संपणार नाही, इतके मोठे आहे.
इथे श्रीरामाला ‘रघुनाथ’ म्हटले आहे. अर्थात, रघुवंशातील सर्वोत्तम पुरूष, किंवा रघु वंशाचा ‘नाथ’.
भगवंताने, रघुकुलामध्ये अवतार घेतल्यामुळे, त्या कुळाचा उध्दार झाला. श्री शंकर हे श्री रामाचे नि:सीम भक्त. एक कथा अशी आहे, की एकदा, तीन्ही लोक, म्हणजे देव, दानव आणि मानव हे शंकराकडे गाऱ्हाणे घेऊन गेले. विषय होता, निरनिराळ्या मंत्रांचे योग्य वाटप. असे शंभर कोटी मंत्र होते. त्यावर, भगवान शंकरांनी तिघांनाही ३३ कोटी,३३ लाख ३३ हजार तीनशे तेहतीस मंत्र वाटून दिले. एक मंत्र राहिला, ज्यात ११ अक्षरे होती. शंकरांनी त्या मंत्रातील ३-३ अक्षरे तिघांना वाटून दिली. राहिली २ अक्षरे: “रा” आणि “म”. तेंव्हा शंकराने सांगितले, की ही दोन अक्षरे मात्र मी माझ्याच हृदयात ठेवणार.
रघुनाथाच्या चरित्रामधील एक- एक अक्षर हे मनुष्याच्या महान पापांचे नाश करणारे आहे.
‘नीलोत्पल’- उत्पल अर्थात कमळ. ‘नीलोत्पल’ म्हणजे नील कमल. श्री रामाचा वर्ण नील कमलाप्रमाणे ‘नील’ ‘श्याम’ आहे. नील + श्याम. श्याम वर्ण म्हणजे काळा नव्हे. श्याम रंगाचे तेजच वेगळे आहे. श्री कृष्णाचे वर्णन ‘घनश्याम’ असे ही केले जाते. पुढे रामाचे ‘राजीव लोचन’ असे वर्णन केले आहे. राजीव लोचन म्हणजे कमला प्रमाणे नेत्र असलेला. वरील दोन्ही वैशिष्टये डोळ्यासमोर आणून श्रीरामाचे ध्यान करून पाहावे.
‘जानकीलक्ष्मणोपेतं’ म्हणजे ज्याच्या आजू बाजूला जानकी आणि लक्ष्मण आहेत असा. आणि जटा रुपी मुकुटाने मंडित झालेला, असा तो श्रीराम. जणू काही सुरुवातीच्या ध्यानाच्या श्लोकात श्री रामाच्या रूपाचे वर्णन करून कवीचे मन भरले नसावे! म्हणून या श्लोकात ‘नीलोत्पल श्याम’, ‘राजीवलोचन’, ‘जटा मुकुट मंडित’ अशा प्रकारे श्रीरामाचे ध्यान करून कवीने श्रीरामाच्या रूपाचे अजून बहारदार वर्णन केले आहे.
सासितूणधनुर्बाणपाणिं नक्तंचरांतकम् ।
स्वलीलया जगत्त्रातुमाविर्भूतमजं विभुम् ॥3॥
संस्कृत मधील श्लोकांचा अर्थ समजावून घेतांना, संधि विच्छेद करून, शब्द सुटे सुटे करून घेतल्यानंतर त्यातील अर्थ लवकर लक्षात येतो. वरील श्लोकाचा संधि विच्छेद खालील प्रमाणे आहे:
स= सहित , असि= तलवार, किंवा खड्ग,
(आपण असिधारा व्रत हा शब्द ऐकला आहे. त्याचा अर्थ: असिधारा व्रत- तलवारीवर चालण्यासारखे कठीण व्रत)
तूण= बाण ठेवण्याचा भाता, धनु:= धनुष्य, बाण= बाण, पाणि=हात
नक्तम्+चर = नक्त म्हणजे रात्र. चर म्हणजे चालणे, हिंडणे(उदा. गोचर, वनचर, दिनचर, निशाचर) नक्तंचर- रात्री हिंडणारे अर्थात, राक्षस ; अन्तकम्= अंत करणारा.
नक्तंचरांतकम्= निशाचर असलेले म्हणजे राक्षस, यांचा अंत करणारा.
स्वलीलया= स्वतःच्या लीलांनी
जगत्+त्रातुम्+आविर्भूतम्+अजम्(जो अज आहे, अर्थात ज्याचा जन्म झालेला नाही असा तो श्रीराम )+विभुम् (सर्व व्यापक, महान)- अर्थात, जगाला तारण्यासाठी जो आविर्भूत झाला आहे, जो अजन्मा आहे, जो विभू, म्हणजे सर्वव्यापक आहे.
या श्लोकात श्रीरामाची आणखी ठळक वैशिष्टये वर्णन केली आहेत.
रामाचे रूप लक्षात आणतांना, सर्वात ठळक बाब म्हणजे रामाचे आजानुबाहू; पण त्यानंतर लक्षात येणारी गोष्ट म्हणजे रामाचा बाण. राम म्हटला की त्याच्या पाठीवर बाणाचा भाता, त्यात असलेले बाण, आणि एका हातात खड्ग हे आपल्या नजरे समोर येते. आपल्या दीर्घ बाहूंनी वरील शस्त्रें समर्थपणे चालवून राक्षसांचा नायनाट करणारा आणि भक्तांचे रक्षण करणारा असा राम.
परब्रह्माचा ‘जन्म’ होत नसतो, तर ते आविर्भूत होत असते. ते विभु म्हणजे सर्वव्यापक जरी असले , तरी भक्तांच्या संरक्षणासाठी आणि दुर्जनांचा नाश करण्यासाठी मनुष्य रूपात आविर्भूत होत असते.
आतापर्यंत आपण रामरक्षेतील सुरुवातीचे ३ श्लोक पाहिले. त्यात श्री रघुनाथाच्या चरित्राचा विस्तार, आणि जगाच्या उद्धारासाठी रामाचा झालेला ‘अविर्भाव’ यांचा उल्लेख आहे.
आता यापुढील श्लोक- या श्लोकापासून ‘राम कवच’ सुरू होते.
रामरक्षां पठेत्प्राज्ञः पापघ्नीं सर्वकामदाम् ।
शिरो मे राघवः पातु भालं दशरथात्मजः ॥4॥
‘प्राज्ञ’ म्हणजे विद्वान लोक ‘पापघ्नीं’ म्हणजे पापांचा नाश करणारी, आणि ‘सर्व कामदां’ म्हणजे सर्व कामना पूर्ण करणारी अशी रामरक्षा पठण करतात.
इथून पुढच्या ओळीपासून रामरक्षा कवच सुरू होते. यात शरीरात सगळ्यात वर असणारे ‘शीर’ म्हणजे डोक्या पासून सुरुवात करून(‘शिरो मे राघवः पातु”) सर्वात खाली, म्हणजे आपल्या पायापर्यंत, (‘पादौ बिभीषण: श्रीद:”) आपल्या शरीराच्या सर्व अवयवांचे श्रीराम रक्षण करो अशी प्रार्थना केली आहे.
आपण काळजीपूर्वक पाहिले, तर या सर्व श्लोकांमध्ये, श्रीरामाचे पूर्ण चरित्र, कालक्रमानुसार आलेले आहे, असे दिसून येते.
श्रीराम हे रघुवंशी, म्हणून सुरुवातीला त्यांचा, राघवः असा उल्लेख आला आहे. आणि त्यानंतर दशरथाचा पुत्र, म्हणून दशरथात्मज. रघुवंशी ‘राघव’ माझ्या डोक्याचे रक्षण करो, तर दशरथाचा पुत्र असलेला श्रीराम माझ्या ‘भालाचे’ म्हणजेच कपाळाचे रक्षण करो.
कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्रप्रियः श्रुती ।
घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः ॥5॥
वडिलांनंतर आईचे अर्थात कौसल्येचे नाव येते. आणि आईच्या नंतर विश्वामित्रांचे नांव येते. कौसल्यापुत्र श्रीराम माझ्या ‘दृशौ’ म्हणजे डोळ्यांचे रक्षण करो.
विश्वामित्रांना प्रिय असणारा श्रीराम माझ्या श्रुती म्हणजे कानाचे रक्षण करो.
इथे ‘नेत्र’ किंवा ‘कर्ण’ म्हटले नाही, हे लक्षात घ्यावे. ‘दृशौ’ म्हणजे दृष्टी म्हटले आहे. डोळे म्हणजे केवळ पाहण्याचा बाह्य अवयव आहे. दृष्टी मध्ये डोळे आणि आतील दृष्टीचे ज्ञानेंद्रिय दोहोंचा समावेश आहे. तसेच ‘श्रुती’ मध्ये कान आणि आतील कर्णेन्द्रिय दोन्हींचा समावेश आहे. तसेच ‘घ्राण’ म्हणजे नाक आणि आतील घ्राणेन्द्रिय दोन्हीचा समावेश आहे.
आपणास माहित आहे, की जेंव्हा राम आणि लक्ष्मण थोडे मोठे झाले, वसिष्ठ ऋषींकडे विद्या प्राप्त करून आले, तेंव्हा ऋषि विश्वामित्र दशरथाकडे आले, आणि दशरथाला म्हणाले, “हे राजा, सांप्रत राक्षसांनी खूप धुमाकूळ माजवलेला असून, ते ऋषींना यज्ञ करू देत नाहीयेत. त्यामुळे राक्षसांचा निःपात करण्यासाठी आणि यज्ञ रक्षणासाठी तुझे हे दोन राजकुमार माझ्यासोबत दे” श्रीराम आणि लक्ष्मणाने विश्वामित्र ऋषींना या कामात सहकार्य केले, आणि ते त्यांना प्रिय झाले, म्हणून “विश्वामित्रप्रियः”
‘मखत्राता’- ‘मख’ म्हणजे यज्ञ. (लग्नात किंवा कुठल्याही शुभकार्यात ‘ग्रहमख’ करतात- ते म्हणजे नऊ ग्रहांना प्रसन्न करण्यासाठीचा यज्ञ.) मखत्राता म्हणजे ‘यज्ञाचे रक्षण करणारा’
त्यानंतरचे नांव ‘सौमित्रिवत्सल’ असे आहे. सौमित्री म्हणजे सुमित्रेचा पुत्र लक्ष्मण. सौमित्रिवत्सल म्हणजे लक्ष्मणावर वात्सल्य असलेला. श्रीरामाचे आपली कनिष्ठ भावावर, नुसते ‘प्रेम’ नव्हते तर ‘वात्सल्य’ होते हे लक्षात घेण्यासारखे आहे. वात्सल्य म्हणजे जे आईचे किंवा वडिलांचे मुलाप्रत असते, त्याला आपण वात्सल्य म्हणतो. तसेच वात्सल्य श्रीरामाचे आपल्या लहान भावाप्रति होते. रामायणात आदर्श नातेसंबंध कसे असावेत याचा वस्तुपाठ श्रीरामांनी घालून दिलेला आहे.
कौसल्यापुत्र श्रीराम माझ्या दृष्टीचे रक्षण करो; विश्वामित्रांना प्रिय असणारा राम माझ्या श्रुतीचे रक्षण करो; यज्ञाचे रक्षण करणारा श्रीराम माझ्या ‘घ्राणाचे’ रक्षण करो; आणि लक्ष्मणावर वात्सल्य असणारा श्रीराम माझ्या मुखाचे रक्षण करो.
जिंव्हा विद्यानिधिः पातु कण्ठं भरतवंदितः ।
स्कंधौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकार्मुकः ॥6॥
त्यानंतर येणाऱ्या जिंव्हा या महत्वाच्या अवयवाचे रक्षण करण्यासाठी ‘विद्यानिधि’ श्रीरामाची प्रार्थना केली आहे.
त्यानंतर येणाऱ्या ‘कंठ’ या अवयवाचे रक्षण भरताने वंदन केलेल्या श्रीरामाने करावे अशी प्रार्थना केली आहे.
कंठ हा अवयव भावनांचे स्थान आहे. मनुष्य भावनावश झाल्यानंतर त्याचा कंठ अवरुद्ध होतो, घशात आवंढा दाटून येतो. भरताची श्रीरामाप्रत भक्ती ही अशा प्रकारची होती. श्रीराम लंकेहून अयोध्येला परत आल्यानंतर भरताशी झालेली गळाभेट आठवा. म्हणून या ठिकाणी कंठा साठी ‘भरत वंदित’ हे विशेषण अगदी योग्य वाटते.
स्कंध अर्थात खांद्यांसाठी ‘दिव्यायुध’ हे विशेषण तसेंच ‘भुजा’ अर्थात दण्ड किंवा बाहू यासाठी ‘भग्नेशकार्मुक’ हे विशेषण असेच चपखल बसते. रामाचे मुख्य शस्त्र हे धनुष्यबाण होते. आणि बाणाचा भाता खांद्यावर असतो.
विश्वामित्रांनी राम लक्ष्मणाकरवी आधी त्राटिकेचा वध करविला. तसेच इतर अनेक राक्षसांचा वध दोन्ही बंधूंनी केला. तदनंतर जनक राजाकडून आलेल्या आमंत्रणावरून विश्वामित्र ऋषी दोन्ही बंधूंना सीता स्वयंवराला घेऊन घेले. तिथे श्रीरामांनी शिवधनुष्याला प्रत्यंचा लावतांना ते तुटले, म्हणून भग्नेशकार्मुक असे नाव आले. ‘भग्नेशकार्मुक’ भग्न+ ईश+ कार्मुक; ईश अर्थात ‘शंकर’, ‘कार्मुक’ अर्थात धनुष्य. अर्थात, ज्याने श्री शंकराचे धनुष्य भग्न केले- तोडले- तो श्रीराम.
या श्लोकात श्रीरामाचे शिवधनुष्य भंगापर्यन्तचे चरित्र आले आहे.
आता त्यापुढील श्लोक:
करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्न्यजित् ।
मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः ॥7॥
जनकाच्या दरबारातील स्वयंवरात श्रीरामाने सीतेचे वरण केले. तो सीतापति श्रीराम माझ्या हातांचे रक्षण करो. लग्न करणे- म्हणजे “हात हातात देणे” वधूवर एकमेकांना हाताने माला घालतात, म्हणजेच “वरतात”. या दृष्टीने इथे सीतापती श्रीराम माझ्या हातांचे रक्षण करो अशी प्रार्थना योग्य वाटते.
श्रीराम जानकीशी स्वयंवर करून परत निघाले असतांना वाटेत जमदग्नीचा पुत्र परशुराम ‘जामदग्न्य’ याने श्रीरामाला शिवधनुष्य तोडल्यामुळे रागावून आव्हान दिले. त्यावेळी झालेल्या युद्धात परशुरामांना, श्रीराम हे श्रीविष्णूचे अवतार असल्याची खात्री झाल्यानंतर, त्यांच्या मुखातील अवतार ज्योती श्रीरामाच्या मुखात शिरली अशी कथा आहे. जामदग्न्याला म्हणजेच परशुरामांना जिंकणारा म्हणून जामदग्न्यजित्.
श्रीराम सीतेशी विवाह करून अयोध्येला परत आले, नंतर कैकेयीच्या दुराग्रहामुळे वनवासात गेले. वनवासात सीता आणि लक्ष्मण त्यांच्या सोबत होते. श्रीराम पंचवटीला असतांना, रावणाची बहिण शूर्पणखा तेथे आली. लक्ष्मणाने शूर्पणखेचे नाक कापले. शूर्पणखेचा आक्रोश ऐकून त्रिशिर, खर आणि दूषण हे राक्षस (जे की रावणाचे दूरचे भाऊ होते) चौदा हजार सैन्यासह धावून आले. रामाने त्या सर्वांचा वध केला. म्हणून ‘खरध्वंसी’ हे विशेषण येथे आले आहे.
नंतर, सीता हरणाचा प्रसंग झाल्यानंतर, सीतेच्या शोधात असतांना, हनुमान, नळ, नीळ, सुग्रीव आणि जांबुवंत यांच्याशी श्रीरामाची भेट झाली. जाम्बुवन्ताला आश्रय देणारा, म्हणून ‘जाम्बवदाश्रयः’ हे विशेषण आले आहे.
“ खर राक्षसाचा वध करणारा श्रीराम माझ्या मध्य भागाचे रक्षण करो. जाम्बुवन्ताला आश्रय देणारा श्रीराम माझ्या ‘नाभि’ चे रक्षण करो.”
सुग्रीवेशः कटी पातु सक्थिनी हनुमत्प्रभुः ।
उरू रघूत्तमः पातु रक्षःकुलविनाशकृत् ॥8॥
यापुढील श्लोकात सुग्रीवाचा ईश श्रीराम माझ्या कमरेचे रक्षण करो अशी प्रार्थना केली आहे. सुग्रीवाची कथा आपल्या सर्वांना माहिती आहे.
यापुढील शब्द आहे ‘सक्थिनी’. सक्थिनी हा शब्द आपल्या जास्त परिचयाचा नाही. मराठी मध्ये एकवचन आणि बहुवचन असते. पण संस्कृत मध्ये एकवचन, द्विवचन आणि बहुवचन असे तीन प्रकार आहेत. ‘सक्थिन’ म्हणजे कंबर आणि जांघ यांच्या मधील भाग. जांघ हा शब्द मराठी आहे, तो संस्कृत मधील ‘जंघा’ पेक्षा वेगळा आहे. ‘सक्थिनी’ हे सक्थिन या शब्दाचे द्विवचन आहे. “हनुमंताचा प्रभु असलेला श्रीराम माझ्या सक्थिनी चे रक्षण करो.”
संस्कृत मधील ‘उरू’ म्हणजे मराठीतील ‘जांघ’ किंवा ‘मांडी’. “राक्षसांच्या कुळाचा नाश करणारा श्रीराम माझ्या मांड्यांचे रक्षण करो.”
जानुनी सेतुकृत्पातु जंघे दशमुखान्तकः ।
पादौ विभीषणश्रीदः पातु रामोऽखिलं वपुः ॥9॥
मांडीच्या खालचा अवयव म्हणजे गुडघा. “जानु” म्हणजे गुडघा. जानुनी म्हणजे दोन्ही गुडघे. (जसे सक्थिन चे द्विवचन सक्थिनी होते, तसेच, जानु चे द्विवचन जानुनी झाले. ) त्यापुढील अवयव “जंघा”. संस्कृत मधील “जंघा” हे मराठीतील “जांघ” पेक्षा वेगळे आहे. संस्कृत मध्ये “जंघा” म्हणजे “पोटरी”
ज्याने सेतू बांधला, असा श्रीराम माझ्या “जानुनी” म्हणजे गुडघ्यांचे रक्षण करो; आणि दशमुख रावणाचा वध केला तो श्रीराम माझ्या पोटऱ्यांचे रक्षण करो.
ज्या रामाने बिभीषणाला “श्री” म्हणजे वैभव आणि राज्य दिले, तो श्रीराम, माझ्या पावलांचे रक्षण करो.
एतां रामबलोपेतां रक्षां यः सुकृती पठेत् ।
स चिरायुः सुखी पुत्री विजयी विनयी भवेत् ॥10॥
एतां म्हणजे अशाप्रकारे. श्रीरामाचे बल युक्त असणारी अशी ही (एतां) रक्षा जो पुण्यवान मनुष्य पठण करेल, तो चिरायु, सुखी, पुत्रवान, विजयी आणि विनयी होईल.
याठिकाणी रामरक्षेतील मुख्य भाग म्हणजे ”कवच” संपले.
विशेष: – आपल्याला एखादे वेळी बाका प्रसंग असेल, संकटात सापडलो असू, जिवाची भीती असेल, आणि पूर्ण रामरक्षा म्हणण्याइतका वेळ नसेल, तर नुसते हे “कवच” म्हटले, तरी कार्यभाग होतो, संकटातून रक्षण होते हा अनुभव आहे.
माधव भोपे
क्रमशः
या पूर्वील लेख वाचण्यासाठी खालील लिंक क्लिक करा
Related
Discover more from Blissful Life
Subscribe to get the latest posts sent to your email.