मागील लेखावरून-पुढे
काल आपण 24 व्या श्लोकापर्यंत विवेचन केले होते. 24 व्या श्लोकात, श्रीरामाचे नांव जपणाऱ्यास अश्वमेध यज्ञा च्या पुण्यापेक्षा ही अधिक पुण्य मिळते असे सांगितले आहे. आता त्यापुढील श्लोक:
रामं दूवार्दलश्यामं पद्माक्षं पीतवाससम् ।
स्तुवन्ति नामभिर्दिव्यैर्न ते संसारिणो नराः ॥25॥
दूर्वादला प्रमाणे श्याम वर्ण असलेला, कमलाप्रमाणे डोळे असलेला, पीत वस्त्र नेसलेला अशा श्रीरामाची विविध दिव्य नामांनी जे स्तुति करतात, ते नर ‘संसारिणो’ म्हणजे साधारण संसारी पुरुष राहत नाहीत.
रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं
काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकम् ।
राजेन्द्रं सत्यसंधं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं
वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिम् ॥26॥
वरील श्लोक हा श्रीरामाच्या विविध विशेषणांनी युक्त आहे आणि त्यातील शब्द हे अतिशय सोपे आहेत. त्यातील सत्यसंध शब्दाचा अर्थ सत्याने बांधलेला.
श्रीरामाचे वर्णन करतांना “करुण”, “शान्त”, ही विशेषणे बऱ्याच ठिकाणी येतात. तसेच “लोकाभिराम” हे विशेषणही खूप ठिकाणी येते. “अभिराम” म्हणजे आनंदकर .श्रीराम हे “लोकाभिराम” आहेत, लोकांना आनंद देणारे आहेत. अभिरामस्त्रिलोकानाम् आहेत.
रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे ।
रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः ॥27॥
आपण यापूर्वी पाहिले होते की रामरक्षा कवचाच्या नंतरचे श्लोक हे भक्तिरसाने ओथंबले आहेत. वरील श्लोकात श्रीरामाला विविध नावांनी संबोधले आहे. राम, रामभद्र, रामचन्द्र, रघुनाथ(रघुकुलाचा नाथ), सीतेचा पती. वरील शब्दांमध्ये, वेधसे हा एक शब्द आला आहे, जो की आपल्या नेहमीच्या ओळखीचा नाही. वेधस् म्हणजे, विधाता, ब्रह्मा, सृष्टिकर्ता. वेधसे म्हणजे त्या विधात्याला.. तसेच वरील सर्व नामांनी वर्णन केलेल्या त्या श्रीरामाला नम: अर्थात नमस्कार असो.
श्रीराम राम रघुनन्दन राम राम
श्रीराम राम भरताग्रज राम राम ।
श्रीराम राम रणकर्कश राम राम
श्रीराम राम शरणं भव राम राम ॥28॥
भरत अग्रज अर्थात भरताचा मोठा भाऊ. आणि हा राम करुणामय आणि सुकुमार जरी असला, तरी “रणकर्कश” आहे. रणामध्ये तो सुकुमार वगैरे नाही, तर अत्यंत कर्कश, शत्रूच्या मनात धडकी भरवणारा असा आहे. अशा या श्रीरामाला मी शरण आहे.
श्रीरामचन्द्रचरणौ मनसा स्मरामि
श्रीरामचन्द्रचरणौ वचसा गृणामि ।
श्रीरामचन्द्रचरणौ शिरसा नमामि
श्रीरामचन्द्रचरणौ शरणं प्रपद्ये ॥29॥
श्रीरामाचे चरण मी मनाने स्मरण करतो, श्रीरामाच्या चरणांची महती मी वाचेने “गृणामि” म्हणजे वर्णन करतो. श्रीरामाच्या चरणांना मी माझ्या शिराने वन्दन करतो, आणि श्रीरामच्या चरणांना मी शरण जातो. “शरणं प्रपद्ये”.
माता रामो मत्पिता रामचन्द्रः
स्वामी रामो मत्सखा रामचन्द्रः ।
सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालुर्नान्यं
जाने नैव जाने न जाने ॥30॥
माझी, माता, माझा पिता रामचन्द्र आहे. माझा स्वामी रामचन्द्र आहे, माझा सखाही रामचन्द्र आहे. माझे सर्वस्व दयाळु रामचन्द्र आहे. न+ अन्यं+ जाने- मी इतर कुणालाही ओळखत नाही. न+ एव+ जाने- “नाहीच ओळखत मी इतर कुणाला”, हे ठासून सांगितले आहे. पुन्हा पुन्हा सांगितले आहे. “नैव जाने न जाने”
दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा ।
पुरतो मारुतिर्यस्य तं वंदे रघुनन्दनम् ॥31॥
ज्या रामाच्या उजव्या बाजूला लक्ष्मण आहे, डाव्या बाजूला जनकात्मजा म्हणजे सीता आहे, “पुरतो” म्हणजे समोरच्या बाजूला मारुती आहे अशा त्या श्रीरामाला मी वंदन करतो.
लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथम ।
कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये ॥32॥
लोकाभिराम अर्थात लोकांना प्रसन्न करणारा, रणामध्ये धीरोदात्त असणारा, राजीव म्हणजे कमळासारखे नेत्र असणारा, रघु वंशाचा नाथ, करुणेचे साक्षात रूप असलेला, करुणा करणारा, असा जो श्रीराम, त्याला मी शरण जातो.
यापुढील श्लोकात श्रीरामाच्या परम सेवक असलेल्या श्री हनुमंताला वंदन आहे.
मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम् ।
वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ॥33॥
वरील श्लोक आपण नेहमी, मारुतीच्या मंदिरात गेल्यानंतर, मारुतीच्या स्तुतीसाठी, म्हणतो. श्रीरामाच्या स्तोत्रात, त्यामुळे, मारुतीचा उल्लेख होणे अपरिहार्य आहे.
मारुति हा पवनपुत्रही म्हणवला जातो. हनुमान पुराणात आलेल्या कथेनुसार, वानरराज केसरी सोबत विवाहापश्चात, अंजनी (जी की एक अप्सरा होती आणि एका शापानुसार तिला पृथ्वीतलावर जन्म घ्यावा लागला होता) ला बरेच वर्ष पुत्रप्राप्ति न झाल्यामुळे, तिने, मतंग ऋषींच्या सांगण्यावरून वायुदेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी तप केले. वायुने तिला आशिर्वाद दिला की तो स्वतःच तिच्या पोटी जन्म घेईल. तदनंतर एकदा अंजनी बागेत बसली असतांना अचानक तिच्या शरीराला तीव्र वायूचा स्पर्श झाला. अंजनीला वाटले कोणी राक्षस माझे शील हरण करत आहे म्हणून तिला क्रोध आला. परंतु इतक्यात वायुदेव तिथे प्रकट झाले आणि त्यांनी सांगितले, की त्यांनी अव्यक्त रूपाने, मानसिक संकल्पाने तिला पुत्र प्रदान केले आहे. मग यथावकाश अंजनी गर्भवती होऊन तिला पुत्र प्राप्ति झाली
मनोजवं= मनोजवंचा समास विग्रह – मन:+इव+ जवः (इव म्हणजे, “च्या सारखा” जव म्हणजे स्फूर्तिवान, त्वरित इकडून तिकडे जाणारा, किंवा वेग)
अर्थात, ज्याचा वेग मनासारखा आहे किंवा जो मनासारखा स्फूर्तिवान/ त्वरित इकडून तिकडे जाणारा आहे
मारुत हे वायूचे एक नांव आहे. मारुततुल्य वेगं अर्थात, ज्याचा वेग वाऱ्यासारखा आहे. जितेन्द्रिय अर्थात ज्याने इंद्रियांवर विजय प्राप्त केलेला आहे. आणि जो बुध्दिमंतांमध्ये वरिष्ठ आहे. जो वातात्मज म्हणजे वायूचा पुत्र आहे आणि वानर यूथ म्हणजे वानरांच्या समूहाचा मुख्य आहे, अशा त्या श्रीरामाच्या दूताला मी शरण आहे.
यापुढील वाल्मिकींच्या स्तुतीचा श्लोक तर खूपच बहारदार आणि काव्यमय आहे.
कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् ।
आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम् ॥34॥
वरील श्लोकाचा अर्थ अतिशय सोपा आहे, पण त्यातील कल्पना खूपच बहारदार आहे.
कवितारूपी शाखेवर आरूढ होऊन, राम राम याप्रमाणे मधुर अक्षरांचे कूजन करणाऱ्या वाल्मिकिरूपी कोकिळाला मी वंदन करतो.
महर्षि वाल्मिकींना आद्य कवि म्हटले जाते. एकदा वाल्मीकि एका क्रौंच (सारस) पक्ष्यांच्या जोडप्याला पहात होते. ते जोडपे प्रेमालापात मग्न होते, त्यावेळी एक पारधी (निषाद) तेथे आला आणि त्याने त्याच्या बाणाने त्यातील नराचा वध केला. तेंव्हा त्या क्रौंच पक्षाची मादी दु:खातिरेकाने विलाप करू लागली. त्या वेळी वाल्मिकींचे मन करुणेने द्रवले, आणि त्यांच्या मुखातून अनायास शब्द बाहेर पडले:
मा निषाद प्रतिष्ठां त्वमगमः शाश्वतीः समाः।
यत्क्रौंचमिथुनादेकम् अवधीः काममोहितम्॥’
हे दुष्टा, तू प्रेम मग्न क्रौंच पक्ष्याला मारले आहे. तुला कधीही प्रतिष्ठा प्राप्त होणार नाही. तुलाही असाच वियोग सहन करावा लागेल.
त्यानंतर त्यांनी प्रसिध्द महाकाव्य “रामायण” रचले, जे की वाल्मिकी रामायण म्हणून ओळखले जाते.
यापुढील श्लोक:
आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदाम् ।
लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् ॥35॥
आपदाम्+ अपहर्तारम अर्थात, आपदांचे हरण करणारा, “दातारं सर्वसंपदाम्” अर्थात सर्व संपदांचा दाता, लोकाभिराम, अर्थात लोकांना प्रसन्नता देणारा, जो श्रीराम, त्याला मी “भूयो भूयो” अर्थात, वारंवार नमन करतो.
भर्जनं भवबीजानामर्जनं सुखसम्पदाम् ।
तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनम् ॥36॥
भर्जनं+ भव बीजानां+ अर्जनं सुखसंपदाम
राम राम रूपी गर्जना ही भव बीजाचे “भर्जन” करणारी, म्हणजे भाजणारी. [भव रूपी बीजाची भाजून लाही केली म्हणजे पुन्हा जन्माला येणे होत नाही. “ बीज भाजुनी केली लाही, आम्हा जन्म मरण नाही”- संत तुकाराम]. (कुठल्याही धान्याचे बीज मातीत टाकल्यावर त्याला अंकुर फुटतो, पण तेच बीज जर भाजून मातीत टाकले, तर त्याला अंकुर फुटत नाही, मग कितीही पाणी टाका किंवा काहीही करा. )सुख आणि संपदांचे अर्जन (प्राप्ती) करणारी, यमदूतांना तर्जन करणारी म्हणजे भयभीत करणारी , अशी आहे.
रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे
रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः ।
रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं
रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर ॥37॥
राम जो की राजमणि अर्थात राजांचा मणि आहे, ज्याचा सदा विजय होतो, अशा रामाला, रमेशाला मी भजतो. रामेण + अभिहतां= रामेणाभिहता. अभिहत म्हणजे प्रहार करणे.
निशाचर म्हणजे राक्षसांच्या चमूंवर “अभिहता” म्हणजे प्रहार करणारा जो राम आहे त्याला मी नमस्कार करतो. “तस्मै नम:”
रामान्नास्ति= रामात्+न+ अस्ति
परायणं= आश्रयस्थान
परतर= इतर,
म्हणजे रामाशिवाय इतर आश्रयस्थान नाही.
रामस्य दासोऽस्म्यहं= रामस्य दासोस्मि अहं = मी रामाचा दास आहे.
माझे चित्त सदा रामातच लय पावो म्हणजे रत असो. हे राम, माझा उद्धार कर!
वरील श्लोकात “राम” या अकारान्त पुल्लिंगी एकवचनी शब्दाच्या सर्व विभक्ति आल्या आहेत. संस्कृत मध्ये एखादा शब्द “चालवणे” हा प्रकार संस्कृत व्याकरण शिकणाऱ्यांना ज्ञात असेल. तसा “राम” हा शब्द “चालवल्यास” खालीलप्रमाणे प्रथमा ते सप्तमी, आणि संबोधन या विभक्ति वरील श्लोकात येतात.
रामो राजमणिः सदा विजयते (रामः – प्रथमा, रामो = रामः)
रामं रमेशं भजे (रामम् – द्वितीया)
रामेणाभिहता निशाचरचमूः (रामेण – तृतीया)
रामाय तस्मै नमः । (रामाय – चतुर्थी)
रामान्नास्ति परायणंपरतरं (रामात् – पञ्चमी,रामात्+न+अस्ति = रामान्नास्ति)
रामस्य दासोस्म्यहं (रामस्य – षष्टी)
रामे चित्तलय: सदा भवतु मे (रामे – सप्तमी)
भो राम ! मामुद्धर ॥ (राम ! – सम्बोधन प्रथमा)
[[रामरक्षेतील शेवटचा श्लोक बघण्याआधी, भगवान श्री शंकराने पार्वतीला रामनामाचे महत्व कसे सांगितले याबद्दल एक छोटीशी गोष्ट इथे सांगता येईल
एकदा शंकर भगवान यांनी कैलास पर्वतावर, पार्वतीकडे भोजन मागितले. पार्वती विष्णू सहस्रनामाचा पाठ करीत होती. पार्वतीने शंकरांना पाठ होईपर्यंत थोडे थांबायला सांगितले. शंकर म्हणाले यात तर खूप वेळ जाईल. तू संत लोक ज्याप्रमाणे सहस्र नामाला छोटे करून घेतात आणि नित्य जप करतात तसे का करीत नाहीस? त्यावर पार्वतीने विचारले, असा कोणता उपाय आहे, मला सांगा.
त्यावर शंकराने पार्वतीला सांगितले, फक्त एक वेळ राम नाम घेतले तर विष्णूचे सहस्र नाम घेतल्याचे पुण्य तुला मिळेल.
एक राम नाम हज़ार दिव्य नामांच्या बरोबर आहे.
पार्वत्युवाच
केनोपायेन लघुना विष्णोर्नाम सहस्रकं|
पठ्यते पण्डितैर्नित्यम् श्रोतुमिच्छाम्यहं प्रभो।।
ईश्वर उवाच
श्री राम राम रामेति, रमे रामे मनोरमे।
सहस्र नाम तत्तुल्यम राम नाम वरानने।।]]
राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे ।
सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने ॥38॥
वरानने= वर+आनने; वर म्हणजे श्रेष्ठ, उत्तम, सुन्दरतम. आनन म्हणजे मुख. इथे शंकराने पार्वतीला उद्देशून वरानने म्हणजे सुंदर मुख असलेली असे संबोधन वापरले आहे.
मनोरमे हे संबोधन सुद्धा पार्वतीला उद्देशून म्हणले आहे.
भगवान श्रीशंकर रामनामाची महति पार्वतीला सांगत आहेत, हे मनोरमे, “राम, राम, राम” या नामामध्ये मी रमतो. रामाचे एक नाम हे सहस्र नामांच्या (विष्णू सहस्रनाम) तुल्यबळ आहे.
पूर्ण रामरक्षेचे सार या एका श्लोकात आले आहे असे म्हटले तरी चालेल.
राम राम राम.
॥ इति श्रीबुधकौशिकविरचितं श्रीरामरक्षास्तोत्रं सम्पूर्णम् ॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥
बुधकौशिक ऋषींनी रचलेले श्रीराम रक्षा स्तोत्र संपूर्ण झाले.
श्री सीता रामचंद्राला अर्पण असो.
अशा प्रकारे रामरक्षा स्तोत्राचे हे विवेचन, माझ्या अल्पबुद्धि ला जसे समजले तसे इथे मांडले आहे. हा प्रयास म्हणजे एखाद्या बालकाने आपल्या वडिलांना घास भरविण्याचा प्रयत्न करण्या सारखे आहे. पण त्यानिमित्ताने तेवढेच श्री रामनामाचे स्मरण घडले हे महत्त्वाचे.
माधव भोपे
या पूर्वील लेख वाचण्यासाठी खालील लिंक क्लिक करा
श्री रामरक्षा स्तोत्राचे अंतरंग-1
श्री रामरक्षा स्तोत्राचे अंतरंग-2
श्री रामरक्षा स्तोत्राचे अंतरंग-3
Buy Kudej Desi Hallikar Cow A2 Ghee, Healthy and traditional aroma, Best for kids
30% off on 500 ml. bottle on Amazon. Offer for limited period only.
Related
Discover more from Blissful Life
Subscribe to get the latest posts sent to your email.