लेखक
श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद
(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)
*रानभूल..*..(१)
अधिकारी पदावरील पदोन्नती नंतर पहिलीच पोस्टिंग तेलंगणा (पूर्वीचा आंध्र प्रदेश) राज्यातील आदिलाबाद ह्या आदिवासी बहुल जिल्ह्यातल्या उतनूर नावाच्या अतिदुर्गम गावात झाली, तेंव्हाची ही गोष्ट..
फिल्ड ऑफिसर पदाचा कार्यभार दिला असल्यामुळे कर्जवसुलीसाठी नेहमीच आसपासच्या छोट्या छोट्या गावांत, गावाबाहेरील वस्त्यांत, शेतातील वाड्यांमध्ये जावं लागायचं. सर्वत्र साग, अर्जुन, हिरडा, बेहडा, चिंच, आवळा व मोह वृक्षांची दाट झाडी असलेला उंच सखल डोंगर पर्वतांच्या रांगांचा हा अवघड वाटा वळणांचा प्रदेश होता.
विशाल आकाराची पाने असलेल्या अती उंच साग वृक्षांच्या सावल्यांमुळे दुपारी चार पासूनच जंगलातील अरुंद पायवाटांच्या रस्त्यावर अंधार पडायला सुरवात व्हायची. त्यामुळे कर्जवसुली व अन्य कामांसाठी निघताना सकाळी लवकर निघून शक्यतो दुपारी तीन पर्यंत उतनुरला परत यायचो.
उतनुरच्या चोहिकडील सुमारे पंचवीस किलोमीटरच्या परिसरातील सुदूर जंगलात वसलेली प्रामुख्याने आदिवासी वस्ती असलेली छोटी छोटी गावे हे आमच्या बँकेच्या शाखेचे कार्यक्षेत्र होते.
त्या दिवशीही नेहमीप्रमाणेच सकाळी आठ वाजता नाश्ता करून घरातून निघालो. रमेश नावाच्या बँकेच्या तरुण चपराशालाही सोबत घेतले होते. स्थानिक तेलगू भाषेसोबतच मोडकी तोडकी हिंदी व अर्धवट मराठीही त्याला बोलता येत असे.
उतनुरच्या दक्षिणेकडील जन्नारम रस्त्यावरील बिरसाई-पेट व भू-पेट या दोन गावांना आज भेट द्यायची होती. वाटेतील आठ किलोमीटर अंतरावरील दंतनपल्ली गावाजवळील झोपडीवजा टपरीवर थांबून चहा घेतला, रस्त्याच्या कडेला असलेल्या एक दोन कर्जदार दुकानदारांकडून कर्जाचे हप्ते वसूल केले आणि चार किलोमीटर पुढे असलेल्या बिरसाईपेटकडे निघालो.
रस्त्याला लागूनच असलेल्या बिरसाईपेट गावात भरपूर कर्जवसुली झाली. गावात लवकर पोहोचल्यामुळे बहुतेक सर्व कर्जदार घरीच भेटले. सर्वांच्या घरी जाऊन पीक कर्ज नविनीकरण व अन्य कर्जाबद्दल हिंदी व मराठीतून माहिती दिली. तेथील बऱ्याच गावकऱ्यांना हिंदी प्रमाणेच थोडी थोडी मराठीही समजत असे. ज्यांना फक्त तेलगू भाषा समजायची त्यांच्यासाठी रमेश दुभाषी म्हणून काम करीत असे.
अपेक्षेपेक्षा खूप कमी वेळेत बिरसाईपेट मधील सर्व कामं आटोपल्यामुळे त्या उत्साहातच तेथून डावीकडे चार किलोमीटर आत जंगलात असलेल्या भूपेट गावाकडे निघालो. या गावात फक्त पंधरा वीसच जुने थकीत कर्जदार रहात होते. त्या सर्वांची घरे रमेशला ठाऊक होती.
तो दिवस आमच्या दृष्टीने खूपच चांगला होता, कारण भूपेट गावातही बरीच वसुली झाली. नुकतेच तेथील शेतकऱ्यांकडे पीक विक्रीचे पैसे आले होते. आम्ही त्यांच्याकडे वेळेवर पोहोचल्यामुळे त्यांनी कोणतेही आढेवेढे न घेता अगदी सहजपणे कर्ज हप्त्याची रक्कम आमच्या हातात ठेवली. एक दोन खूप जुन्या थकीत कर्जदारांनी सुद्धा कर्जाची बाकी चुकविल्यामुळे आम्ही खूपच आनंदात होतो.
दाट जंगलातील भूपेट गावच्या अवघड पायवाटेच्या रस्त्याने अतिशय काळजीपूर्वक मोटसायकल चालवीत आम्ही दुपारी बारा वाजेपर्यंत पुन्हा बिरससाईपेट गावाच्या मुख्य रस्त्याला लागलो. आमचं आजचं नियोजित सर्व काम खूप लवकर आटोपलं होतं. बँकेतही परत जाऊनही आज काही विशेष करण्याजोगं काम नव्हतं. मग आता एवढ्या लवकर उतनुरला परत जाऊन काय करायचं ? असा मनाशी विचार करीतच होतो, तेवढ्यात रमेश म्हणाला..
“साब, रस्ते के दाहिनी ओर के जंगलमें चार किलोमीटर अंदर बालमपुर गांव है.. वहां हमारे दो बहुत पुराने बडी रकम के डिफॉल्टर बॉरोअर रहते है.. मैं कुछ साल पहले वहां गया था.. बहुतही सुंदर जंगल का रास्ता है.. रास्ते में कई झरने, तालाब है.. एक नदी भी क्रॉस करनी पड़ती है.. अगर आप चाहो तो हम अभी वहां जाकर चार बजे के पहले वापस आ सकते है..!”
रमेशची ही सूचना मला लगेच पटली. बालमपुर गावातील त्या दोन जुन्या मोठ्या थकीत कर्जदारांबद्दल मला माहिती होती. आजचा दिवस शुभ होता. योगायोगाने जर त्या दोन जुन्या कर्जदारांकडूनही कर्ज वसुली झाली असती तर ती आमच्यासाठी फार मोठी अचिव्हमेंट ठरली असती.
आम्ही दुपारच्या जेवणाचे डबे सोबत आणले होते. ते भूपेट गावात खाऊन मग ऊतनुरला परतायचे, असे पूर्वी ठरले होते. पण आता बालमपुरला जाऊनच जेवण करायचे असे ठरवले आणि मोटर सायकल उजव्या बाजूच्या जंगलातील उतारावरील पायवाटेकडे वळवली.
रमेशने म्हटल्याप्रमाणे हे जंगल खरोखरीच खूप रमणीय होते. खूप वेगळ्या जातीची सुंदर रानफुले पायवाटेच्या दोन्हीकडे फुललेली होती. जंगलातील वृक्षही जरा वेगळे, मंद, मोहक, सुवासिक असे भासत होते.
जवळच कुठेतरी एखादा लहानसा ओढा किंवा झरा वाहत असावा. त्याचा हलकासा मंद खळखळाट पैंजण घातलेल्या नर्तिकेच्या पदरवासारखा मधुर, मंजुळ भासत होता. मधूनच एखाद्या पक्ष्याने सुरेल शीळ वाजवत घातलेली साद व त्याला अन्य पक्ष्यांनी नाजूक चिवचिवाट करीत दिलेला तितकाच गोड प्रतिसाद एक वेगळीच अनुभूती देऊन जात होता.
आवळा, चिंचा, बोरं तसेच अन्य जंगली फळझाडांच्या पिकलेल्या फळांचा सुवास सर्वत्र दरवळत होता. जागोजागी मोहाच्या फुला व फळांचा सडा पडलेला दिसत होता. त्यांचा मादक गंधही वातावरणात भरून राहिलेला होता. बाहेरचे कडक ऊन जंगलातील हिरव्यागार वनश्रीेत सुखद, उबदार भासत होते.
ही जंगलातील बालमपुरच्या दिशेने जाणारी पायवाट पालापाचोळ्याने झाकून गेली होती. बहुदा ह्या रस्त्यावर फारशी वहिवाट नसावी. जंगलातील आसपासचा परिसर कुतूहलाने न्याहाळीत अतिशय संथ गतीने व निःशब्दपणे आमचा प्रवास सुरु होता.
वाटेत अनेक मोठे खड्डे, खाच खळगे लागले. अशावेळी गाडीवरून खाली उतरून गाडी ढकलत पुढे न्यावी लागायची. काही छोटे मोठे स्वच्छ पाण्याचे उथळ नालेही लागले. ते मात्र मोटर सायकलवर बसूनच ओलांडले.
आम्ही जसे जसे जंगलाच्या आत आत खोल जात होतो तसे तसे ते जंगल अधिकाधिक निबीड, दाट होत चालले होते. मोठ्या आकाराच्या दाट पानांमुळे फार कमी सूर्यप्रकाश आत पोहोचू शकत होता. झाडांना लटकुन खालपर्यंत आलेल्या जंगली रानवेली चेहऱ्याला चाटून जात होत्या. कमी, अंधुक प्रकाश व झाडांच्या लांब लांब सावल्यांमुळे संध्याकाळ झाल्याचा भास होत होता.
रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी चार पाच फूट उंचीची मोठी मोठी वारुळे होती. कोणत्याही क्षणी त्यातून फणा काढलेला नाग बाहेर येईल अशी भीती वाटत होती. एवढंच नव्हे तर पायवाटेवरील पालापाचोळ्याच्या खालीही एखादं जनावर असू शकेल असं वाटत होतं.
असा बराच वेळ त्या अनोळखी रस्त्याने प्रवास झाल्यावर पाठीमागे बसलेल्या रमेशला विचारलं..
“क्या टाईम हुआ होगा..?”
“एक बज कर बीस मिनट..!”
मनगटावरील घड्याळाकडे पहात रमेश उत्तरला.
“ठहरो साब.. ठहरो !”
अचानक काहीतरी आठवल्यासारखं करीत रमेश म्हणाला..
“कुछ तो गड़बड़ है..! पिछली बार जब हम बालमपुर गए थे तो सिर्फ आधे घंटेमे गाँव के अंदर पहुंचे थे.. रास्ते में एक नदी भी लगी थी.. लगता है हम गलत रास्ते से जा रहे है..!”
रस्ता चुकल्याची थोडी थोडी शंका मला देखील येत होती. पण आतापर्यंत आम्ही अगदी सरळ सरळ पायवाटेनेच येत होतो. ही वाट कुठेही दुभागली नव्हती किंवा तिला कोणताही दुसरा फाटाही फुटला नव्हता.
आम्ही बिरसाईपेटहुन उजवीकडील जंगलात शिरताना तिथे गावाचे नाव लिहिलेली वन खात्याची एक तेलगू भाषेतील पाटी देखील होती, हे आठवलं.
“रमेश, तुमने वो बोर्ड ठीकसे पढ़ा था नं.. ?”
“हां साब..! बोर्ड पर बालमपुर ही लिखा था.. पास ही में वेलफेयर डिपार्टमेंट और इरिगेशन डिपार्टमेंट का बोर्ड भी था.. उस पर भी बालमपुर ही लिखा था..!”
रमेश छातीठोकपणे म्हणाला.
.. मग कसला तरी कानोसा घेत तो म्हणाला..
“लगता है वो नदी पास ही में है.. !”
खरोखरीच थोडं पुढे जाताच सुमारे तीस चाळीस फुटाचे खूपच उथळ पात्र असलेली एक नदी वाहताना दिसली. मोटर सायकल उभी करून नदीच्या काठावरील एका मोठ्या दगडावर आम्ही दोघेही बसलो. नदीला जेमतेम फुटभर खोल पाणी होतं. नदीच्या पात्रात अनेक उंच झाडे मोडून आडवी पडली होती. त्यांच्यामुळे नदीवर लाकडी पूल असल्यासारखे वाटत होते. स्वच्छ पाण्यात नदीतील वाळू, गोटे अगदी स्पष्टपणे दिसत होते.
“हम शायद दूर के रास्ते से आए, लेकिन गांव तक तो पहुंच गए..! बस, अब नदी के उस पार.. बहुत ही नजदीक बालमपुर गांव है !”
सुटकेचा निःश्वास टाकीत रमेश म्हणाला.
मोटर सायकलवर बसून उत्साहातच नदी पार केली. आता आम्हा दोघांनाही कडाडून भूक लागली होती. बालमपुरला गेल्यागेल्याच आधी डबा खाऊन घ्यायचा आणि मगच त्या दोघा कर्जदारांबद्दल चौकशी करायची असं ठरवलं.
नदी पार करून बरेच पुढे आलो तरी बालमपुर गावाचा काहीच थांगपत्ता नव्हता. उलट पायवाट जंगलात आणखी खोल खोल जात चालली होती. जंगलही अधिकाधिक दाट झाल्यासारखं वाटत होतं. आम्ही जात होतो ती पायवाट, ते जंगल ओळखी ओळखीचं वाटत होतं. या वाटेवरून आपण पूर्वीही कधीतरी गेल्याचं पुसटसं आठवत होतं.
असाच आणखी अर्धा एक तास गेला असावा.
“रमेश, क्या टाईम हुआ..?”
काहीतरी विचारायचं म्हणून म्हणालो.
“एक बज कर बीस मिनट.. अरे..! बंद पड़ गई शायद मेरी घड़ी..!”
मनगटावरील घड्याळ कानाजवळ नेत टिकटिक ऐकण्याचा निष्फळ प्रयत्न करीत रमेश म्हणाला.
तितक्यात.. मोहाच्या झाडावरून खाली लटकणाऱ्या एका लांबलचक वेलीने रमेशच्या चेहऱ्याला तडाखा दिला आणि रमेश किंचाळत ओरडला..
“रुको.. रूको.. साब !”
मी गाडी थांबवली.
“यहीं पर.. यहीं बेल..घंटा भर पहले मेरे चेहरे से टकराई थी.. वो देखो.. ईप्पु पुव्वा, ईप्पु पंडु..!!”
उत्तेजित होऊन रमेश ते मोहाच्या झाडाखाली असलेले फुलांचे व फळांचे ढीग दाखवीत होता. मोहाच्या झाडाला तेलगू भाषेत “ईप्पु” असे म्हणतात. फळाला “पंडु” तर फुलाला “पुव्वा” असे म्हणतात.
तासाभरापूर्वी हेच मोहाच्या फुलांचे व फळांचे ढीग रमेशने मला दाखविले होते. त्यावेळीही त्याला असाच लटकणाऱ्या वेलीने तडाखा दिला होता.
आम्ही नीट निरखून सभोवताली पाहिलं. नक्कीच… इथूनच गेलो होतो आम्ही तासाभरापूर्वी.. हीच अशीच झाडं होती तेंव्हा.. अगदी याच क्रमाने.. ते कोवळ्या सागाचं पाच फूट उंचीचं झाड.. त्याच्या बाजूचं ते आवळ्याचं झाड.. ते तिरपं उगवलेलं हिरड्याचं झाड.. अगदी तसंच..
पण.. हे कसं शक्य आहे..? आम्ही तर कुठेच वळलो नाही.. सरळ सरळ पुढे पुढेच जात आहोत. मग असे गोलाकार..मागे वळून पुन्हा त्याच रस्त्यावर कसे आलो..?
पूर्वी जेंव्हा याच वेलीने रमेशच्या तोंडावर तडाखा दिला होता तेंव्हा चेहऱ्याला लागलेला वेलीचा चीक, गाडी साफ करायच्या कपड्याने पुसून तो कपडा रमेशने तिथेच फेकून दिल्याचं आठवलं. म्हणून थोडं पुढे जात तो कपडा शोधून पाहिला. आणि काय आश्चर्य..? तो फेकलेला कपडाही अगदी तिथेच होता.
हा काय प्रकार आहे ? आम्ही तिथल्या तिथेच गोल गोल तर फिरत नाही आहोत ना ?
तो खाली पडलेला कपडा उचलून घेतला आणि खूण म्हणून तिथल्याच पाच फूट उंचीच्या कोवळ्या सागाच्या झाडाला बांधला.
आता आम्ही सतर्क, सावध झालो होतो. काळजीपूर्वक, आजूबाजूचे चौफेर, चिकित्सक निरीक्षण करीत सजग राहून अगदी हळू हळू पुढे जात होतो. कुठेही कुणा माणसाची, प्राण्याची किंवा पक्ष्याची जराशीही चाहूल लागत नव्हती. फक्त शांत स्तब्ध असलेल्या.. खाली वर.. चोहीकडे पसरलेल्या वृक्ष वेली..
पूर्वी ऐकला होता तसा नदीच्या वाहण्याचा आवाज पुन्हा ऐकू आला. आम्ही गाडी थोडी पुढे नेली.. तो काय..?
आमची गाडी त्याच नदीकाठच्या त्याच मोठ्या दगडाजवळ उभी होती, ज्यावर बसून आम्ही मघाशी विश्रांती घेतली होती. नदीत मोडून आडवी पडलेली तीच उंच झाडे आणि स्वच्छ पाण्यात चमकणारे तसेच वाळू, गोटे..
किंकर्तव्यमुढ होणं म्हणजे काय ? याचा प्रत्यक्ष अनुभव घेत नदीकाठी बराच वेळ उभे होतो. पुढे जावे की मागे फिरावे ? पण.. मागच्या रस्त्याने तर आम्ही सावधपणे येतच आहोत.. मग..पुन्हा नदी ओलांडून पहावी काय..?
त्या नदीकाठच्या मोठ्या दगडाजवळ बराच वेळ उभे असूनही पुन्हा त्या दगडावर बसण्याची यावेळी आमची हिंमतच झाली नाही. अन्य दुसरा कोणता मार्गच नसल्यामुळे पुढे जाण्यासाठी पुन्हा नदीत मोटर सायकल घातली. तत्पूर्वी खूण म्हणून आसपासचे दगड गोळा करून नदीकाठी त्याचे छोटे छोटे ढीग करून ठेवले. तसेच काही वेली तोडून एक दोन झाडांभोवती त्यांच्या गाठी बांधून ठेवल्या.
काही तरी चमत्कार होईल आणि नदी पार करताच बालमपुर गाव आमच्या दृष्टिपथात येईल अशी भाबडी आशाही कुठेतरी मनात होतीच.
🙏🌹🙏
(क्रमशः)
श्री अजय कोटणीस हे बँकेतील माझे सहकारी असून, स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानकावर खिळवून ठेवतात.
अशीच एक सत्यकथा त्यांना तेंव्हाच्या आंध्र प्रदेश मधील आदिलाबाद जिल्ह्यातील उतनूर या ठिकाणी पोस्टिंग असतांना आलेला अनुभव वर्णन करणारी आहे. ही कथा 3 भागांमध्ये क्रमशः आहे. ही यापूर्वी त्यांच्या फेसबुकवर प्रसिद्ध झालेली आहे, आणि आता त्यांच्या परवानगीने या ब्लॉगच्या वाचकांसाठी इथे देत आहोत.
Related
Discover more from Blissful Life
Subscribe to get the latest posts sent to your email.