https://goodworld.in A website by Madhav Bhope

खालील रचना आज होळीच्या निमित्ताने एका WhatsApp ग्रुपवर आली आणि खूप आवडली. 

त्यामुळे ती इथे देत आहे. 

सदरील रचनेचा इंटरनेट वर शोध घेतला असता, यू ट्यूब वर सदरील रचना गायलेला एक व्हिडीओ ही मिळाला, त्याची लिंक येथे देत आहे, मूळ यू ट्यूब क्रिएटर यांना त्याबद्दल काही हरकत नसेल असे गृहित धरून. 

तसेच ही रचना संत जनाबाईंची आहे असे प्रथमदर्शनी वाटते, पण वरील व्हिडीओच्या कॉमेंट्स मध्ये खुद्द क्रिएटरनी  केलेल्या खुलाशाप्रमाणे, ही रचना डॉक्टर प्रसाद वाळिंबे यांची आहे . तर त्यांचीही परवानगी गृहित धरून सर्वांपर्यंत ही रचना पोचवण्याचा प्रयत्न करीत आहे. 

 

 

कराया साजरा ।
होलिकेचा सण ।
मनाचे स्थान ।
निवडीले ।।

ऐसे ते स्थान ।
साधने सरावले ।
भक्तीने शिंपिले ।
केले सिद्ध ।।

त्या स्थानी खळगा। समर्पणाचा केला।
त्यात उभा ठेला ।
अहंकार एरंड ।।

रचलीया तेथे।
लाकडे वासनांची ।
इंद्रीयगोवऱ्याची।
रास भली ।।

गुरुकृपा तैल ।
रामनाम घृत ।
अर्पिले तयात ।
ऐसे केले ।।

रेखिली भोवती । 
सत्त्कर्म रांगोळी ।
भावरंगाचे मेळी ।
शोभिवंत ।।

वैराग्य अग्नीसी ।
तयाते स्थापिले ।
यज्ञरूप आले ।
झाली कृपा ।।

दिधली तयाते।
विषय पक्वान्नाहुती ।
आणिक पुर्णाहूती ।
षड्रिपु श्रीफळ।।

झाले सर्व हुत ।
वैराग्य अग्नीत ।
जाणावया तेथ ।
नूरले काही ।।

वाळ्या म्हणे जनी ।
व्हावी ऐसी होळी ।।
जेणे मुक्तीची दिवाळी।
अखंडित ।।

 

होळीपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.


Discover more from Blissful Life

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Blissful Life

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading