https://goodworld.in A website by Madhav Bhope

पितृपक्ष- कृतज्ञतेचा पंधरवडा

Remembering our forefathers and ancestors

हा लेख बराच मोठा असला, तरी जिज्ञासूंनी आणि धर्मशास्त्रात विश्वास असणाऱ्यांनी  सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचावा अशी विनंती आहे.
माधव भोपे 

कृतज्ञता

भारतीय संस्कृतीचा सगळ्यात सुंदर पैलू म्हणजे कृतज्ञता. आपल्या जगण्याला, आपल्या अस्तित्वाला ज्या व्यक्ति, प्राणी, निसर्गातील घटक प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे सहाय्यभूत होतात, त्या सर्वांच्या प्रति कृतज्ञतेचा भाव असणे, आणि तो व्यक्त करणे, त्यांची थोड्या तरी प्रमाणात परतफेड करणे, हे भारतीय संस्कृतीचे मूलभूत अंग राहिले आहे. निसर्गापासूनही ओरबाडून घेणे हे आपल्या संस्कृतीत कधीच मान्य नव्हते. निसर्गापासून काही घेतले, तर त्याला तेवढे परतही करायचे असे संस्कार आपल्याला ठायी ठायी आढळतात. पूर्वी एखादा वाटसरू आपली तहान भागवण्यासाठी एखाद्या सरोवरापाशी गेला, त्यातून ओंजळभर पाणी प्याला, तर त्या सरोवरातून मूठभर माती किंवा गाळ काढून बाजूला टाकावा असे शास्त्र होते. सरोवरात गाळ साचून ते भरून जाऊ नये ही प्रत्येकाचीच जबाबदारी आहे, आणि आपण जेंव्हा त्याचे पाणी पितो, तेंव्हा सरोवराने आपल्याला दिलेल्या पाण्याच्या बदल्यात, त्याच्या उपकाराची परतफेड म्हणून आणि सामाजिक जाणीव म्हणून एक मूठ गाळ काढून बाजूला टाकायचा.

वैद्य लोक जेंव्हा औषधांसाठी वनस्पतींची पानें, फुलें किंवा इतर भाग तोडीत, तेंव्हा त्या वनस्पतीची प्रार्थना करीत, क्षमा मागीत, नंतर ती वनस्पती तोडीत. आणि पाहिजे तेवढीच तोडत.

आपली संस्कृति 

सकाळी उठून जमिनीवर पाय ठेवण्याच्या आधी ‘विष्णुपत्नी नमस्त्युब्धम् पादस्पर्शं क्षमस्व मे’ असे म्हणून त्या धरित्री मातेची, तिच्यावर पाय ठेवण्याबद्दल क्षमा मागून मगच तिच्यावर पाय ठेवण्याची आपली संस्कृति आहे.remembering our forefathers दररोज सकाळी उठून स्नान करून सूर्याला ‘श्री सूर्याय इदं अर्घ्यं दत्तं न मम’ असे म्हणून अर्घ्य देणे हा त्याच संस्कृतीचा उदात्त पैलू आहे. भोजन करण्याआधी केला जाणारा वैश्वदेव हा सुद्धा निसर्गातील सर्व घटकांच्या प्रति व्यक्त केला जाणारा कृतज्ञता भावच आहे. खरं तर सगळीकडेच परतफेड करतांना, ‘न मम’- हे माझे नाही, तर तुझेच तुला अर्पण करतो आहे हा भाव आपल्या संस्कृतीत रूजला आहे. गंगा पूजन, सूर्यनमस्कार, अशा अजून कितीतरी प्रथा सांगता येतील, ज्या आपल्या संस्कृतीच्या कृतज्ञतेचा भाव अधोरेखित करतात.

आपले सगळे सण तर या कृतज्ञतेच्या भावनेचे मूर्तिमंत प्रतीक आहेत. बैल पोळा असो, नागपंचमी असो, हे सर्व सण, त्या त्या प्राणीमात्रांप्रति कृतज्ञतेचा भाव व्यक्त करणारे आहेत.

मग ज्यांनी आपल्याला प्रत्यक्ष जन्म दिला, ज्यांच्या शरीरापासून आपले शरीर बनले, एका असहाय्य मांसाच्या गोळ्यापासून ज्यांनी आपल्याला एक परिपूर्ण माणूस बनविले, त्या आई वडिलांच्या प्रति तर आपली संस्कृति सर्वोच्च कृतज्ञता भाव शिकविते यात काही नवल नाही. ‘मातृ देवो भव, पितृ देवो भव, आचार्य देवो भव’ ही शिकवण लहानपणापासून देणारी आपली संस्कृति आहे. आई वडील, त्यांचे आई वडील, त्यांच्या आई वडिलांचे आई वडील यांचेही आपल्यावर अनंत उपकार असतात. आपले भाऊ, बहिणी, चुलते, मामे, गुरू, शिष्य, सगळ्यांचे आपल्यावर अनंत उपकार असतात. आई वडील  हयात असतांना तर त्यांना देवाचा दर्जा असतोच, पण ते गेल्याच्या पश्चातही त्यांच्या उपकाराचे आपण हयात असेपर्यन्त  स्मरण ठेवायचे असते.Matru Pitru 320

Remembering our forefathers and ancestors

काही काही लोक ‘ आमच्या आईवडिलांनी आमच्यासाठी काहीच केले नाही, ते असेच होते, तसेच होते’, असे जेंव्हा म्हणतात तेंव्हा वाईट वाटते. आई वडिलांमुळे हे शरीर मिळाले हाच त्यांचा सगळ्यात मोठा उपकार असतो. भलेही त्यांचा उद्देश काही असो. पण त्यांच्यामुळेच हे शरीर मिळाले, लहानपणी आपल्याला जिवंत ठेवण्यात त्यांचाच सहभाग होता, एवढे तर कमीतकमी मानावेच लागते. ईश्वर प्राप्तीचे साधन म्हणून मनुष्य शरीराचे महत्व ज्याला समजले, तोच हे समजू शकतो. ईश्वर प्राप्ति फक्त मनुष्य शरीरातच होऊ शकते.

तर जे आता हयात नसतील, अशा आपल्या पूर्वजांचे स्मरण करण्यासाठी, त्यांच्या विषयी आदर भाव व्यक्त करण्यासाठी भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील पंधरा दिवस हे आपल्या संस्कृतीत राखीव ठेवले आहेत. शरीर नष्ट झाल्यानंतर सर्व संपते असे आपली संस्कृति कधीच मानत नाही. एका शरीरातून दुसऱ्या शरीराकडे, एका योनीतून दुसऱ्या योनिकडे असा हा प्रवास, माणसाला आत्मबोध होईपर्यंत चालू राहतो.

शरीरं यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः ।

गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानिवाशयात्‌-  गीता ॥ १५-८ ॥

शरीर सोडल्यानंतर, वारा वासाच्या वस्तूतून वास घेऊन स्वतःबरोबर नेतो, तसाच देहादिकांचा स्वामी जीवात्माही ज्या शरीराचा त्याग करतो, त्या शरीरातून मनसहित इंद्रिये बरोबर घेऊन नवीन मिळणाऱ्या शरीरात जातो. ॥ १५-८ ॥images 43

पण एक शरीर सोडल्यानंतर, दुसरे शरीर धारण करीपर्यंत किती काळ लागू शकतो हे कोणीच सांगू शकत नाही. त्या मधल्या काळात त्यांचे अस्तित्व ‘पितृ’ योनीत असते. आणि असे मानले गेले आहे की माणसांचे (किंवा पृथ्वीवरील) एक वर्ष म्हणजे पितृलोकातील एक दिवस असतो. पितृ योनि मध्ये आपल्यासारखा भौतिक आहार नसतो, तर पितर हे नुसत्या वासाने, आणि भावनेने तृप्त होतात असे सांगितले आहे.  अशा या आपल्या, पितृ योनीत असणाऱ्या पूर्वजांना, त्यांचा पुढील प्रवास सुखकर व्हावा म्हणून त्यांच्या प्रति कृतज्ञ भावनेने, संकल्प करून घातलेले भोजन, म्हणजे महालय श्राद्ध होय.

इथे संकल्पाला खूप जास्त महत्त्व आहे. आपण पितरांच्या नावाने नुसतेच कुणाला खाऊ घातले, तर त्याचा काही उपयोग नाही. दररोजच्या देवपूजेत असो, किंवा इतर कुठल्याही धार्मिक कार्यात असो, खालील गोष्टींचा उच्चार नक्की करावा लागतो. प्रथम सगळे देश, काल  यांचे coordinates define करायचे- म्हणजे- अद्य ब्रह्मणो द्वितीये परार्धे, विष्णुपदे, श्री श्वेतवाराह कल्पे, वैवस्वत मन्वंतरे, कलियुगे, कली प्रथम चरणे, भरतवर्षे, भरत खंडे, जंबुद्वीपे, दंडकारण्ये देशे, गोदावर्‍या: उत्तरे तीरे, शालिवाहन शके, क्रोधी नाम संवत्सरे, दक्षिणायने, शरद ऋतौ, भाद्रपद मासे, कृष्ण पक्षे, अद्य अमुक तिथौ अमुक वासरे  अमुक दिवस नक्षत्रे, अमुक योगे, अमुक करणे, वर्तमाने चंद्रे अमुक स्थिते, श्री सूर्ये अमुकस्थिते, देवगुरौ अमुकस्थिते, शेषेशु ग्रहेशु, यथा यथं राशीस्थान स्थितेशु सत्सु शुभनाम योगे शुभ करणे,एवम गुण विशेषण विशिष्टायां शुभ पुण्यातिथौ मम- अमुक गोत्रोत्पन्न अमुक शर्मणां आत्मना: श्रुति स्मृति पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम- यथा ज्ञानेन यथा मिलितोपचार द्रव्य्ये: अमुक अमुक कार्यं ब्राह्मण द्वारा करिष्ये-images 42

याच्यात- सध्या कुठले परार्ध चालू आहे, कुठला कल्प चालू आहे, कुठले मन्वंतर चालू आहे, कुठले युग चालू आहे, त्याचे कुठले चरण चालू आहे- या सर्वांमध्ये –‘काला’ ची व्याख्या केली. नंतर कुठला भाग, कुठला खंड, कुठले द्वीप, कुठले अरण्य, नंतर कुठल्या नदीच्या कुठल्या बाजूला (दिशेला) राहून हे कार्य करीत आहे, यात ‘देशा’ ची व्याख्या केली. नंतर पुन्हा, कालाची अजून विस्तृत व्याख्या करण्यासाठी- कुठले शक चालू आहे, कुठले संवत्सर चालू आहे, त्यातील कुठले अयन (दक्षिणायन/ उत्तरायण), कुठला ऋतु, कुठला महिना, त्यातील कुठला पक्ष- (शुक्ल अथवा कृष्ण), कुठला वार, आणि कुठली तिथी चालू आहे- यात कालाचे अधिक नेमकेपणाने वर्णन केले आहे. नंतर आकाशस्थ ग्रहांची सध्याची परिस्थिति- जसे सूर्य, चंद्र, गुरू या ग्रहांची स्थिती कुठल्या नक्षत्रात आहे- इतके सगळे co-ordinates वर्णन करून मग आपण कोण आहोत, कुठल्या गोत्रातील आहोत,यांचे वर्णन करून, नंतर आपण कुठले कर्म करू जाणार आहोत, त्याचा उद्देश काय, कुणाच्या द्वारे करणार आहोत- इतके सगळे डिटेल्स उच्चार करून मग ते कर्म सुरू करायचे असते.

याची तुलना आपण आजकालच्या कायद्याच्या भाषेशी करू शकतो. कायद्यातही प्रत्येक गोष्टीची व्याख्या करावी लागते- आपण आपल्याला मिळालेल्या कोणत्या अधिकाराअंतर्गत आपण हे कार्य करीत आहोत तो सांगावे लागते- तेंव्हाच ते कार्य किंवा ती आज्ञा कायदेशीर होते.

इतके डिटेल्स आणि इतके नेमकेपण मला नाही वाटत अन्य कुठल्या धर्मात असेल.

तर एवढे सगळे डिटेल्स देऊन नंतर ते कर्म शास्त्रात सांगितल्याप्रमाणे केले, तरच ते आपल्या पितरांना पोंचते. पण एवढे सगळे करणे ज्यांना शक्य नसेल, त्यांच्यासाठीही शास्त्रात पद्धती  सांगितलेल्या आहेत. पण आजकाल, आम्ही आमच्या पितरांच्या पुण्यतिथीला कुठे आश्रमाला दान देतो, भिकाऱ्यांना खाऊ घालतो, भावगीतांचा कार्यक्रम करतो, अनाथाश्रमात दान देतो, असे जे आधुनिकपणाच्या नावाखाली करतात, त्याचा आपल्या पितरांना काहीही उपयोग होत नाही. वरील सर्व कामे चांगली आहेत. निश्चितच चांगली आहेत. ती आपल्याला शक्य असेल तेंव्हा नक्कीच करावी. पण पितरांच्या नांवे, आणि श्राद्धकर्माच्या ‘ऐवजी’ नक्कीच नाही. सविस्तर श्राद्ध कर्म शक्य नसेल तर त्याचे अनेक सोपे पर्याय हे शास्त्रातच सांगितले आहेत, जसे की हिरण्य श्राद्ध, आमान्न श्राद्ध, आणि काहीच शक्य नसले (खरोखरच), तर घरापासून लांब जाऊन दक्षिण दिशेला तोंड करून , दोन्ही हात वर करून पितरांना हे सांगणे, की माझी इच्छा आहे पण मी करू शकत नाही- आणि चक्क दोन्ही हात तोंडावर नेऊन ‘बोंब’ मारणे-हाही शेवटचा उपाय शास्त्रात सांगितला आहे. त्यामुळे आपल्या मनाला वाटेल तसे न करता, शास्त्रात सांगितले ते केले तरच ते फलदायी होऊ शकते. यात मुख्य महत्त्व हे भावनेला आहे.

पितरांना अन्न कसे पोंचते?

आता नवविचार लोकांकडून व्यक्त केले जातात की माणूस गेल्यानंतर त्याला दुसरा जन्म मिळतो. एखाद्याला मुक्ती मिळते तर दुसरा जन्म कुठला मिळाला आहे सांगता येणार नाही. आम्ही सर्वांनाच अन्नोदक देतो. पिंडही अन्नाचेच असतात. पण त्याला सापाचा जन्म मिळाला असेल, एखाद्याला कृमी-कीटकाचा मिळाला असेल त्यांना अन्न चालणार नाही. पण विधात्याने त्याचीही व्यवस्था केलेली आहे. त्यांच्या मदतीला वसू, रुद्र, आदित्य, अर्यमा, देवता त्यांना दिलेले अन्न त्यांच्या त्यांच्या खाद्य पदार्थांत रूपांतर करून देण्याचे कार्य करतात. काहींना अमृत रूपाने, काहींना गवतरूपाने, काहींना वायुरूपाने ते देतात. उदाहरण म्हणून सांगायचे झाल्यास जसे दुसर्‍या राष्ट्रात राहणार्‍या आपल्या नातेवाइकाला आम्हाला पैसे पाठवायचे असतील तर आपण बँकेमध्ये रक्कम भरतो. ती रक्कम त्या माणसाला त्या राष्ट्रातल्या चलनात मिळते किंवा तिकडून इकडे रक्कम पाठवायची असेल तर तिकडे बँकेतून भरलेली रक्कम आमच्या चलनामध्ये आम्हाला मिळते. त्याप्रमाणे ही व्यवस्था आहे. आणि आपल्या पितरांना जर मुक्ति मिळाली असेल, तर ते अन्न किंवा त्याचे फळ हे आपल्यालाच मिळते, जसे की एखाद्याला मनीऑर्डर पाठविली, ती व्यक्ति तिथे नसेल तर पाठवणाऱ्याला परत येते, तद्वतच.

आपली कृतज्ञता व्यक्त करण्याची थोर परंपरा चालू ठेवणे फार गरजेचे आहे. म्हणून महालय श्राद्ध करणे जरुरीचे आहे. आपले जे कोणी मृत झालेले, त्यांचाच उल्लेख विधीचेवेळी करायचा आहे. श्राद्ध हे पवित्र कर्तव्य आहे. महालय महिना अन्य कशाकरिताही वर्ज्य नाही.

महालय विधी 

भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते अमावस्या खरे तर रोज महालय श्राद्ध करायचे असते. परंतु तसे करणे शक्य नसेल तर वडिलांच्या तिथीला करावे. न जमल्यास पितृपक्षातील चतुर्दशी सोडून अन्य कुठल्याही तिथीला करता येते. महालय श्राद्धाचा कालावधी हा भाद्रपद वद्य प्रतिपदेपासून जेंव्हा सूर्य कन्या राशीत प्रवेश करतो, तेंव्हापासून ते  सूर्य वृश्‍चिक राशीत  जाईपर्यंत असतो. पण मुख्य काळ भाद्रपद वद्य प्रतिपदेपासून अमावस्येपर्यंत आहे. हा पितरांचा अपरान्ह काळ आहे. आपले एक वर्ष म्हणजे पितरांचा एक दिवस आहे. म्हणजे वर्षश्राद्ध व महालय श्राद्धामुळे पितरांना रोज जेवण मिळते. सर्वसामान्यपणे पितृपंधरवडा मुख्य काळ असतो.  संपूर्ण पितृपक्षात महालय श्राद्ध करणे शक्य न झाल्यास सूर्य तूळ राशीत असण्याच्या कालावधीत(या वर्षी १६ नोवेंबर पर्यन्त सूर्य तूळ राशीत आहे, त्यानंतर वृश्चिक राशीत प्रवेश करतो.) करता येते.

पितरांना मंगल कार्यामध्ये स्थान आहे. सर्व मंगल कार्ये, अनुष्ठाने यामध्येही श्राद्ध केले जाते. याला नांदीश्राद्ध असे म्हणतात. ज्याप्रमाणे आपण एखाद्या कार्यक्रमामध्ये श्रद्धांजली वाहतो तोच प्रकार आहे.Remembering our forefathers and ancestors

महालय श्राद्ध आणि प्रति सांवत्सरिक श्राद्ध यात काय फरक आहे?

प्रति सांवत्सरिक श्राद्ध हे एकाच व्यक्तिला उद्देशून केले जाते तर महालय श्राद्ध आपल्या नात्यातील विशिष्ट सर्व मृत व्यक्तींना उद्देशून केले जाते.

महालय श्राद्धात कोणा कोणाला पिंड दिले जातात?

महालय श्राद्धात कुटुंबातील दिवंगत व्यक्तींचे पिंडरूपाने स्मरण –पूजन करण्याची परंपरा आहे. हे श्राद्ध, पितृत्रयी – पिता, पितामह, प्रपितामह (म्हणजेच वडील, आजोबा, पणजोबा) ; मातृत्रयी – माता, पितामही, प्रपितामही म्हणजेच आई, आईची सासू, आणि तिची सासू (म्हणजेच आई, आजी, पणजी) , सापत्‍नमाता, मातामह(आईचे वडील), मातृपितामह(आईच्या वडिलांचे वडील), मातृप्रपितामह(त्यांचे वडील),मातामही(आईची आई) , मातृपितामही(आईच्या आईची सासू) , मातृप्रतिपामही(आईच्या आईच्या सासूची सासू), पत्‍नी, पुत्र, कन्या, पितृव्य, मातुल, बंधू, आत्या, मावशी, बहीण, पितृव्य(म्हणजे काका) – पुत्र, जावई, बहिणीचा मुलगा, सासरा, सासू, आचार्य, उपाध्याय, गुरू, मित्र, शिष्य या सर्वांच्या उद्देशाने करायचे असते. यामध्ये दिवंगत आई, वडील, आजी, आजोबा, पणजी, पणजोबा, सावत्र नातेवाईक, भाऊ-बहीण, काका-काकू, मामा-मामी, मावशी, आत्या, सासू-सासरे, व्याही, विहीण व अन्य नातेवाईक या सर्वाना उद्देशून पिंडदान करतात. आपण विविध गुरूंकडून आयुष्यभर काहीना काही शिकत असतो, आणि काही लोकांना आपण शिकवत असतो. त्यामुळे या निमित्ताने निधन पावलेले आपले गुरू आणि शिष्य त्यांचेही आपण स्मरण करतो. आपले हितचिंतक, स्नेही, अन्य आप्त, आपल्या घरी मदतनीस म्हणून राहिलेल्या व्यक्ती, आपल्या घरातील पाळीव प्राणी हे दिवंगत असतील तर त्यांचेही यात स्मरण होते. याखेरीज जगाच्या पाठीवर दिवंगत असलेल्या आपल्या ओळखीच्या एवढेच नव्हे तर, अनोळखी असलेल्या दिवंगत व्यक्तीना उद्देशूनही हे श्राद्ध करतात. जे कोणी जिवंत असतील ते वगळून इतरांच्या नावाचा उल्लेख करतात.

पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर या चार दिशांना चार धर्मपिंडे देण्याची पद्धत या श्राद्धात  विशेषकरून आहे. चार दिशांना मृत झालेल्या ज्ञात-अज्ञात जीवांसाठी यजमान हे पिंडदान करतात.

महालय श्राद्धात क्षणदान, अर्घ्यदान, पूजा, अग्नौकरण, पिंडदान, विकिरदान, स्वधावाचन वगैरे विधी करावयाचे असतात.

चतुर्दशीचे दिवशी मृत झालेल्यांचा महालय चतुर्दशीचे दिवशी करु नये शस्त्राने हत झालेल्यांचे श्राद्ध चतुर्दशीचे दिवशी करावे असा नियम आहे. याकरिता प्रतिवार्षिक श्राद्धावाचून इतर श्राद्ध चतुर्दशीचे दिवशी करण्याबद्दल निषेध आहे. याप्रमाणे पौर्णिमेचे दिवशी मृत झालेल्याचाही महालय पौर्णिमेचे दिवशी करू नये. कारण कृष्ण पक्ष नसल्यामुळे पौर्णिमेचे दिवशी महालय प्राप्त होते नाही. चतुर्दशी अथवा पौर्णिमा या दिवशी मरण पावलेल्यांचा महालय द्वादशी, अमावास्या इत्यादि तिथीचे दिवशी करावा.

अविधवा नवमी

भाद्रपद वद्य नवमीला अविधवा नवमी म्हणतात. या दिवशी अहेवपणी (नवरा जिवंत असताना) मृत झालेल्या स्त्रीचे श्राद्ध करण्याचा किंवा सवाष्णीला भोजन घालण्याचा प्रघात आहे. गुजरातेत या नवमीला डोशी नवमी म्हणात.

सर्वपित्री अमावास्या

भाद्रपद अमावास्येला मातामह श्राद्ध (आईच्या वडिलांचे श्राद्ध) असतेच, पण या शिवाय, या दिवशी ज्यांचा मृत्युदिन नक्की माहीत नाही त्या सर्वच पितरांचे श्राद्ध करण्याचाही प्रघात आहे. तसेच महालयातील विशिष्ट तिथींना करण्यात येणारे श्राद्ध कोणत्याही कारणाने किंवा अडचणीमुळे राहिले असेल तर ते या दिवशी करता येते.

पितरांची यादी

अशा प्रकारे आपण विधिपूर्वक महालय श्राद्ध करण्याचे ठरविल्यानंतर, सर्व पितरांची एक यादी करून ठेवणे सोयीचे ठरते. त्यात पितरांची नांवे, नाते, गोत्र, आणि ते सपत्नीक निधन पावलेले आहेत, की स्त्री असेल तर सभर्तृक (म्हणजे पतीसह) निधन पावलेले आहेत, एखादी स्त्री सवाष्ण असतांना गेलेली आहे का, इत्यादि नोंदी ठेवल्यास, पिंडदान करतांना उच्चार करायला सोपे जाते, आणि सवाष्ण स्त्रीच्या पिंडावर हळदी कुंकू वाहावे लागते.

पूर्वीच्या काळची आठवण 

खेड्या पाड्यात सर्व जातीत अजूनही हा पितृ पंधरवडा सर्व जातींत  पाळला जातो. त्याला ग्रामीण बोलीत ‘पित्तरपाटा’ असे म्हणतात.

पूर्वीच्या काळची अजून एक आठवण म्हणजे पुढे येणार्‍या दसरा आणि दिवाळी या मंगल सणांसाठी, या काळात, घरांची डागडुजी केली जात असे, भिंती सारवल्या जात असत, छताची शाकारणी केली जात असे, फुटलेली, तुटलेली कौले बदलली जात असत, आणि घराची रंगरगोटी केली जात असे.

समारोप 

असो. अशा प्रकारे पितृ पक्षा बद्दल या लेखात सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.

वरील पूर्ण लेख हा स्वलिखित आहे. त्यातील फक्त काही माहिती ही धार्मिक पुस्तकें, किंवा अन्य स्रोतांतून घेतली आहे.

ज्यांना ह्या विषयात रस आणि श्रद्धा असेल, त्यांनी हा लेख जतन करून ठेवायला हरकत नाही, तसेच इतर समविचारी मंडळींना अवश्य पाठवावा.

माधव भोपे


Discover more from Blissful Life

Subscribe to get the latest posts sent to your email.