Guest Article by Shri Pandurang Deshpande
आपण वेगवेगळ्या संतांच्या साहित्याचा अभ्यास केल्यास असे जाणवते, की जेवढे म्हणून संत झाले आहेत, त्या सर्वांची अनुभूति एकच असते. फक्त त्यांच्या वैयक्तिक परिस्थितीनुसार आणि त्या त्या काळानुसार, त्यांची व्यक्त होण्याची पद्धत थोडी थोडी वेगळी असते, किंवा त्या त्या वेळच्या परिस्थितीनुसार त्यांच्या कडून त्या त्या वेळेला आवश्यक असलेल्या गोष्टीला थोडे जास्त महत्व दिले जाते. वरवर पाहिले तर कदाचित त्यांच्या विचारांमध्ये फरक वाटू शकतो, पण त्यांच्या पातळीवर जाऊन पाहिल्यावर दोन्हीमधील एकवाक्यता लक्षात येते.
असेच महाराष्ट्रातील दोन संत म्हणजे संत तुकाराम महाराज आणि आणि समर्थ रामदास.
हे दोघेही संत साधारण एकाच कालखंडात झाले. (तुकाराम महाराज- इ.स. 1608 ते 1650, आणि समर्थ रामदास इ.स. 1608 ते 1682). दोघांचाही परमार्थात मोठा अधिकार होता, आणि जगाच्या कल्याणा संताच्या विभूति असेच दोघांचे वर्तन होते. तुकाराम महाराज जिवंतपणीच ब्राह्मी स्थितीला पोहोचलेले तर समर्थ हे त्यांच्या प्रदीर्घ आणि प्रखर साधनेने ‘रामदास’ बनलेले. या दोघांना सहस्रदल अशा भारतीय तत्त्वज्ञानाच्या कमलपुष्पाच्या दोन पाकळ्यांची उपमा शोभून दिसेल.
सनातन भारतीय तत्त्वज्ञान हे आत्मोद्धार हेच आयुष्याचे ध्येय मानणारे आहे.
पण वित्तेषणा (धनाची इच्छा) दारेषणा (स्त्रीची इच्छा) आणि लोकेषणा (प्रसिद्धीची इच्छा) यांच्याबरोबर मोक्षेच्छा ही सुद्धा एक ईषणा म्हणजे इच्छा आहे असे मानून त्याही पलीकडे जाणा-या तुकोबांना मोक्षाचे महत्त्व वाटत नाही, तर मोक्ष प्राप्ती नंतरही त्यांना भगवद्भजनच करावे वाटते.
प्रेममय भक्तीचे ते पथिक होते आणि मुक्ती त्यांना दासीप्रमाणे होती. मुक्तीनंतर सर्व इच्छा नष्ट झाल्या तरी एक उरतेच ती म्हणजे भगवंताचे सुख उपभोगावे हीच. तुकोबा असेही म्हणतात की ख-या भक्तीचा आरंभच मुळी ब्रह्मानुभवापासून (मुक्ती लाभल्यावर) होतो.
सामान्यतः माणूस पुनर्जन्माला घाबरून असतो.पण तुकोबांना याची भीती वाटत नाही.देवाची साथ म्हणजेच स्मरण असेल तर कितीही जन्म घ्यावे लागले तरी ते दु:ख खोटे आहे यावर त्यांचा विश्वास आहे.म्हणून तर ते म्हणतात..
हेचि दान देगा देवा ।तुझा विसर न व्हावा।
पुढे ते म्हणतात..गुण गाईन आवडी …
—
(सक्तीने नाही हो! मनापासून..!!)
(अत्यद्भूतं तच्चरितं सुमंगलं गायन्तआनंदसमुद्रमग्न: ।।भागवत अष्टमस्कंध)
—
हेचि माझे सर्व जोडी।।
न लगे मुक्ती धन संपदा .।
(आणि दुर्मिळ असा )
संतसंग देई सदा.।।
…जो देवसुद्धा इच्छितो…!
तुका म्हणे गर्भवासी।सुखे घालावे आम्हांसी ॥
तुकोबा चतुर आहेत…
ते म्हणतात..गर्भवासी सुखे घालावे…
कारण..गर्भात दु:ख आहे हे त्यांना माहीत आहेच..पण हरी सखा जवळ असेल,स्मरणात असेल तर ते दु:खच राहणार नाही हे ते जाणत होते.साक्षात हरीच आपणाला पालखीतून जन्मांतराच्या वाटेवरून घेऊन जाणार असेल तर पायी चालणा-यांना होणारे वाटेवरचे त्रास जाणवणार नाहीत.
दु:ख त्याला भोगावे लागते ज्याची चित्तवृत्ती देहाला चिकटली आहे.पण ज्याची चित्तवृत्ती नामस्मरणात रंगते त्याचे देहात्म्यच सुटते.त्याला दु:ख कोठून असणार ? त्याची पालखी उचलायला देव तयारच आहे.
आता या पार्श्वभूमीवर, समर्थ रामदासांचे विचार पहिले, तर समर्थांना सामान्यजन गर्भवासाच्या दु:खातून याच जन्मात मुक्त व्हावेत याची तळमळ होती.कारण जन्मजन्मांतरीचे नित्यकल्याण करण्याचे साधन असणारा नरदेह हा दुर्लभ आहे
‘लाधलो हा देह काकतालीन्याये।
न घडो उपाये घडो आले ।।’
पापपुण्य समान झाले तरच नरदेह मिळतो.
नाथ महाराज म्हणतात..
सुकृतदुष्कृत समानसमी । तैं पाविजे कर्मभूमि ।।
तेचि जैं पडे विषमी।तैं स्वर्गगामी कां नरक ।।(एक.भा.अ. २-२१७ )
इतर पशु आदी जन्मात पापपुण्य नाही पण येरझाऱ्या आहेत.
आणि आम्हा सामान्यांना प्रपंचासक्ती व वित्तदारेषणा (वासना),इतक्या घट्टपणे चिकटलेल्या आहेत की सर्वांची पूर्ति करतांना आम्हाला प्रचंड दु:ख होते.. जन्म वाया जाऊनही मरणानंतरही हे सुटत नाही मग जन्ममरणाच्या येरझाऱ्या,गर्भवासाचे दु:ख सहन करणेही अटळ..त्याची अत्यंत भीतीही वाटते..
मातेचिया उदरकुहरी ।पचुनी विष्ठेचिया रात्री ।।
उकडूनि नवमास वरी । जन्मजन्मोनी मरती ।।(ज्ञा.९-३३१)
दासबोधात समर्थ लिहीतात..
वोकानरकाचे रस झिरपती ।ते जठराग्नीस्तव तापती ।
तेणे सर्वही उकडती।अस्तीमांस।(३-१-३०)
असा हा शोककारी,दु:खकारी गर्भवास…
म्हणून मनाच्या श्लोकामध्ये रामदास स्वामी म्हणतात..
मना वासना चुकवी येरझारा I मना कामना सांडी रे द्रव्य दारा I
मना यातना थोर हे गर्भवासी ।मना सज्जना भेटवी राघवासी ॥
(येथे वासना ही षष्ठी विभक्ती) .वासनेच्या येरझाऱ्या असा अर्थ.
दोन्ही महापुरुषांना एकच गोष्ट सांगायची आहे..
हेचि दान देगा देवा..तुझा विसर न व्हावा
आणि
मना सज्जना भेटवी राघवासी
असे झाल्यास गर्भवास झाले तरी दु:ख होणार नाही किंबहुना ते होणारच नाहीत कारण राघवाची भेट त्याचा विसर न झाल्याने होणार आहे .वासना ,कामना,द्रव्य दारा लोकादी ईषणा नष्ट झाल्यामुळे,मन सज्जन झाल्यामुळे हे होणार आहे..तो भेटल्यावर पुन्हा जन्म कसचा..? नामस्मरणातच मुक्ती आहे..विस्मरणात मरण आणि पुन्हा जन्म आहे.
थोडेसे विषयांतर..
प्रत्येकाला कितीदा जन्म घ्यावा लागेल हे माहीत नाही.
विवेकानंदांनी एक गोष्ट सांगितली आहे..
एका साधूला त्याचे मुक्ती साठी दोन जन्म बाकी सांगितल्यावर तो निराश झाला पण एका सहज फिरणा-या माणसाला मुक्तीसाठी झाडावरच्या पानांइतके जन्म घ्यावे लागतील म्हणाल्यावर तो आनंदाने नाचू लागला..तर त्याला तात्काळ मुक्ती मिळाली.. कारण तो मुक्तच होता..
तेव्हा बंधन आणि मुक्ती या पण संकल्पनाच आहेत,त्या देहबुद्धीमुळे निर्माण होतात स्वस्वरुप ज्ञान करवून घेऊन त्यांचे निरसन करुन घ्यावे असे समर्थ दासबोधात म्हणतात.(७-६-५०)
आता, राघवाची भेट कशासाठी हवीय किंवा तुकोबांना देवाच्या स्मरणाचेच दान का हवे.. ? तर..
तद्प्राप्य तदेवावलोकयती तदेव श्रुणोती तदेव भाषयती तदेव चिंतयती ।।(नारदभक्तीसूत्र ४-५५)
भगवन्ताच्या प्रेमाला प्राप्त झाल्यावर भक्त फक्त त्याच्याचकडे पाहतो,त्याच्याबद्दलच ऐकतो,बोलतो,सदैव त्याचेच चिंतन करतो.
ही प्रेमभक्तीची उच्चतम अवस्था त्यांना निरंतर हवी आहे..(काही तत्त्वज्ञ मुक्तीचे १६ ते २० प्रकार मानतात..तरीही हीच सर्वोच्च अवस्था असे मी मानतो)
शेवटी..आणखी एक श्लोक घेऊन विवेचन संपवतो.
देह्यादिक प्रपंच हा चिंतियेला I
परी अंतरी लोभ निश्चित ठेला I
हरीचिंतने मुक्तीकांता वरावी I
सदा संगती सज्जनांची धरावी..II
सदैव प्रपंचाचेच चिंतन व त्याचा लोभ सोडून मनाने मुक्ती साधावी,का? तर हरिचिंतन करता यावे म्हणून.यासाठी सज्जनांची संगती धरावी.तुकोबा संतसंगत मागतात तर समर्थ सज्जनांची.दोन्ही एकच. समर्थ तर मनालाच सज्जन म्हणून हाक मारतात.समर्थांचे याविषयी मनाचे श्लोक किती म्हणून सांगावेत..?
एकूण काय, तर कोणतेही संत त्यांच्या अनुभवाच्या आधारावर, एकाच गोष्ट, वेगवेगळ्या शब्दांत, वेगवेगळे दृष्टान्त देऊन सांगतात. फक्त समजून घेणारा पाहिजे.
संत साहित्य वाचतांना सहज सुचलेले हे विचार, समविचारी लोकांबरोबर शेअर करावे असे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच!
पांडुरंग देशपांडे
Related
Discover more from Blissful Life
Subscribe to get the latest posts sent to your email.