https://goodworld.in A website by Madhav Bhope

सध्या गणेश उत्सवाचा उत्साह ऐन भरात आहे. श्री गणेश हे महाराष्ट्राचे प्रमुख आराध्य दैवत आहे. त्यामुळे हे दहा दिवस साहजिकच गणेश भक्तांसाठी एक पर्वणीच असते. अशा वेळी आपण श्री गणेश पुराणातील गणेशाच्या काही गोष्टींची माहिती करून घेणे अगत्याचे  राहील असे वाटते.

प्राचीन काळी नैमिषारण्यात एकदा 12 वर्षे प्रदीर्घ यज्ञसत्र चालले होते. (आजच्या संदर्भात पाहिले तर नैमिषारण्य हे लखनौ पासून 80 किमी दूर, सीतापूर जिल्ह्यात गोमती नदीच्या डाव्या किनाऱ्यावर असलेले प्रसिद्ध तीर्थ आहे. हे पूर्वीपासून ऋषींचे अत्यंत आवडते तपस्थळ आहे, मार्कंडेय पुराणात याचा अनेक वेळेला उल्लेख, 88 हजार ऋषींच्या तपस्थळी च्या रूपात आलेला आहे. या ठिकाणी आज ही भागवत पारायण इत्यादि सारखे धार्मिक कार्यक्रम वर्षभर चालू असतात.) तर प्राचीन काळी चालू असलेल्या या यज्ञसत्रात शौनकादि ऋषि हे ऋत्विज होते. त्या यज्ञात मध्यंतरात सूत मुनि सर्वांना पुराणातील गोष्टी सांगत होते. त्यावेळी जमलेल्या श्रोत्यांनी त्यांना सर्वांना पावन करणारी अशी कथा सांगायची विनंती केली. त्यावरून सूत मुनींनी सुरूवात केली.

ते म्हणाले की आज मी तुम्हाला श्री गणेशाची कथा सांगतो. अठरा पुराणांचे श्रवण तुम्ही केले आहे. आता उप पुराणांमध्ये मुख्य असलेले गणेश पुराण तुम्हाला सांगतो.

सूत सांगू लागले, श्रोतेहो, गणपती हा शिव पार्वतीचा पुत्र. त्याची सत्ता अगाध आहे. तो चराचराला अंतर्बाह्य व्यापून आहे. तोच सर्वांचा नियंता आहे. तोच सर्वांचे अधिष्ठान आहे. पंचमहाभूतें त्याच्या अधीन आहेत. विधी, हरी आणि हर हे ज्याची आज्ञेने सृष्टीचे नियंत्रण करतात, त्या गणपतीचे माहात्म्य मी काय वर्णन करणार? तथापि त्याची अल्पशी सेवा म्हणून मी त्याचे चरित्र तुम्हाला सांगणार आहे.

गणेशाचे हे परम पावन चरित्र सर्वप्रथम ब्रह्मदेवाने महर्षि व्यासांना सांगितले. त्यांनी ते भृगुला सांगितले, भृगुंनी ते सोमकांत राजाला आणि सोमकांत राजाकडून ते जनकल्याणार्थ सर्वांसाठी प्रकट झाले.

सोमकांताच्या कथेने मी गणेश पुराणाचा प्रारंभ करीत आहे.

सोमकांताची कथा1ca20187f65e03635f6cc35d21219deb

सोमकांत राजाला कुष्ठरोगाची व्याधी

सोमकांत हा एक धर्मशील राजा होता आणि त्याच्या राजवटीत प्रजा आनंदात राहत होती. त्याची तेवढीच धर्मशील पत्नी सुधर्मा नावाची होती, आणि त्यांचा एक कर्तृत्ववान पुत्र हेमकंठ हा होता.

या सोमकांत राजाला अचानक कुष्ठ रोग झाला. या दुर्धर व्याधीमुळे राजाची फार वाईट अवस्था झाली, तो जीवनाविषयी अत्यंत निराश झाला, आणि त्याने सर्वांपासून  दूर, निर्जन अरण्यात जाऊन, उर्वरित काळ ईश्वरचिंतनात घालवायचा  निर्णय घेतला. त्याच्या पत्नी, मुलाने आणि प्रधान इत्यादि सर्वांनी त्याला या विचारापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, पण राजाने पक्के ठरवले होते.

राजाने आपला पुत्र हेमकंठ याला राज्याभिषेक केला, आणि पत्नी आणि दोन प्रधानांसह अरण्याकडे निघाला.

भृगू ऋषींची भेट.

राजा, राणी आणि प्रधान एका निबिड अरण्यातून जात असतांना त्यांना एक स्वच्छ पाणी असलेले सरोवर लागले. त्यांनी तिथे स्नान केले आणि तेथील शीतल पाणी पिऊन, तिथेच एका झाडाखाली विश्रांती घेऊ लागले. त्यावेळी तिथे एक सुंदर तेजस्वी ऋषिकुमार त्याठिकाणी आला. राजाची पत्नी सुधर्मा हिला त्याला पाहून आनंद झाला आणि तिने आदराने त्याला बोलावले व त्याची विचारपूस केली. त्यावर ऋषि कुमाराने आपले नांव च्यवन असल्याचे सांगितले आणि आपण भृगू ऋषी आणि पुलोमा यांचा पुत्र असल्याचे सांगितले. नंतर त्या च्यवन ऋषींनी राजा आणि सर्वांची माहिती विचारली व राजाला काय झाले आहे ते विचारले. त्यावर राणीने आपले नशिबाचे भोग त्याला सांगितले. ऋषि कुमार च्यवन याने फार व्यथित झाले. च्यवन जेंव्हा परत त्यांच्या आश्रमात गेले, तेंव्हा त्याने दुःखी अंतःकरणाने आपले वडील  भृगू यांना हा सर्व वृत्तान्त सांगितला. तेंव्हा भृगूंनीही करुणा युक्त अंतःकरणाने त्या सर्वांना आश्रमात घेऊन यायला सांगितले.

च्यवन ऋषि मग त्या सर्वांना आश्रमात घेऊन आले. आश्रमात गेल्यावर राजा सोमकांताने भृगू ऋषींना आपली व्यथा सांगितली. “हे ऋषि, या व्याधीचे निरसन व्हावे म्हणून मी आजपर्यंत अनेक प्रयत्न केले पण उपयोग झाला नाही. माझ्या पूर्वपुण्याईने तुमचे दर्शन झाले आहे. मी तुमच्या शरण आहे. आता तुम्हीच मला या व्याधीतून मुक्त होण्याचा उपाय सांगा”

सोमकांताची प्रार्थना ऐकून भृगू ऋषि त्याला म्हणाले, “ राजा, पूर्व जन्मीच्या पापामुळेच तुला या व्याधीने ग्रासले आहे. आता काळजी करून नकोस. तू इथे आला आहेस तेंव्हा आता या व्याधीतून तुझी सुटका होणार याविषयी खात्री बाळग. मग ऋषींनी त्या सर्वांना उत्तम वस्त्रे देऊन, प्रेमाने पोटभर जेवू घातले आणि विश्रांती करावयास सांगितले.

सोमकांताचे पूर्वजन्मचरित्रprocess aws

दुसरा दिवस उजाडल्यावर भृगू ऋषींनी, नित्याची कर्मे आटोपल्यावर सोमकांत व सुधर्मा यांना बोलावून घेतले. भृगू त्रिकालज्ञानी होते. त्यांनी राजाचे पूर्व जन्मचरित्र सांगायला सुरूवात केली. ते म्हणाले,

“ विंध्य पर्वता जवळ कोल्हार नावाचे एक रमणीय नगर होते. तेथे एक श्रीमंत वैश्य राहत असे. त्याचे नाव चिद्रूप. त्याची पत्नी सुभगा. त्यांना उशिराने एक मुलगा झाला. त्याचे नाव कामदा. तो अत्यंत देखणा होता. दोघा पती पत्नींनी त्याचे खूप लाडात संगोपन केले. तो मोठा झाल्यावर त्याचे लग्न लावून दिले. त्यांना सात मुले आणि पाच मुली अशी अपत्ये झाली. कालांतराने चिद्रूप आणि त्याची पत्नी मरण पावले.

त्यांच्यानंतर कामदा हाच त्यांच्या संपत्तीचा वारस होता. तो अत्यंत अविचारी होता. त्याने त्या संपत्तीची उधळण करायला सुरूवात केली. अनेक व्यसने करू लागला. आपल्या पत्नीचेही ऐकले नाही. त्याने आपल्या पत्नीला आणि मुलांना तिच्या माहेरी पाठवून दिले. शेवटी व्यसनापाई त्याने राहते घरही विकले.  नंतरच्या काळात तो पैसे मिळविण्यासाठी चोऱ्या करू लागला. लोकांना त्रास देऊ लागला. राजाने त्याला हद्दपार केले. मग तो अरण्यात राहून वाटमाऱ्या करू लागला. यात्रेकरूंना ठार मारू लागला. त्याने आपली टोळी बनवली. अरण्यातच वाडा बांधून तो राहू लागला.

एके दिवशी एक दुर्बल ब्राह्मण त्या जंगलातून जात असतांना त्याला त्याने अडविले आणि त्याच्याकडे पैसे नसल्याने चिडून त्याला मारू लागला. त्यावर त्या ब्राह्मणाने त्याला समजावायचा प्रयत्न केला पण त्याचे काही न ऐकता कामदाने त्याचा शिरच्छेद केला.

अनेक प्रकारची पापकर्मे करून तो निर्दयी झाला होता. पुढे त्याला वृद्धत्व आले. अनेक व्याधी जडल्या. दिसेनासे झाले. कुटुंब त्याचा तिरस्कार करू लागले.

मग तो अहोरात्र पश्चात्ताप करू लागला. मग त्याने दानधर्म करायचे ठरवले. पण त्याचे दान घ्यायला कोणीच त्याच्याकडे फिरकेना. शेवटी त्याने जंगलातील एका पडीक गणेश मंदिराचा जीर्णोद्धार करायचे ठरविले. त्याने एक परिचित ब्राह्मणास बोलावून घेतले आणि त्याच्या मार्गदर्शना नुसार बरेच धन खर्च केले. लोकांच्या सोयीसाठी तेथे चार विहिरी बांधल्या. यातून उरलेले धन त्याने आपल्या मुलाबाळांना वाटून टाकले. काही कालावधीनंतर कामदा मरण पावला. यमदूतांनी भयंकर नरकात घालून त्याचे खूप हाल केले. कालांतराने त्याला यम आणि चित्रगुप्तासमोर उभे करण्यात आले. यमाने त्याला विचारले, तू आधी पुण्य भोगणार की पाप? कामदाचा जीवात्मा म्हणाला, “धर्मराज, मी आधी पूर्वजन्मातील पुण्य भोगू इच्छितो.” त्यानुसार यमाने त्याला पुण्य भोगण्यासाठी सौराष्ट्रातील देवनगरच्या राजाच्या पोटी जन्माला घातले. हे राजन, तो कामदा तूच आहेस. गणेश मंदिराचा जीर्णोद्धार केल्यामुळे तुला राज ऐश्वर्य प्राप्त झाले. पण पुण्यक्षय होताच दुष्कर्मांची फळें भोगण्यासाठी तुला कुष्ठरोगा सारखी महाव्याधी झाली आहे.”

पुढील भागात वाचा:

पुढील भागात, सोमकांत राजाचा आधी ऋषींवर अविश्वास, नंतर दृढ विश्वास, ऋषींचे श्री गणेशाच्या 108 नामांनी अभिमंत्रित केलेले जल राजाच्या अंगावर शिंपडणे,  सोमकांता चे पापमुक्त होणे, मग भृगू ऋषींचे सोमकांत राजाला श्री गणेशाचे माहात्म्य वर्णन करणे, 

त्यापुढील भागात ब्रह्मदेवाकडून व्यासांना एकाक्षरी मंत्राचा उपदेश. 


Discover more from Blissful Life

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Blissful Life

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading