Shri Guru Dattatreya दत्त जन्माची कथा
आज दि. 14 डिसेंबर- आज मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमा- या दिवशी दत्त जयंती साजरी केली जाते.
महायोगीश्वर दत्तात्रेय भगवान हे भगवान विष्णूंचे अवतार आहेत. त्यांचे अवतरण मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला प्रदोष काळी झाले.
दत्तात्रेय हे भगवान विष्णूंच्या 24 अवतारांपैकी एक मानले जातात. मार्कंडेय पुराणाच्या 9 व्या आणि 10 व्या अध्यायांमध्ये भगवान दत्तात्रेयांच्या जन्माची कथा सांगितली आहे.
दत्तात्रेय नांवाची कथा
तसेंच श्रीमद्भागवतात आले आहे की पुत्र प्राप्तिच्या इच्छेने महर्षि अत्रींनी व्रत केले तेंव्हा ‘दत्तो मयाहमिति यद् भगवान् स दत्तः’ मी माझ्या स्वतःलाच तुम्हाला देऊन दिले आहे, असे म्हणून भगवान विष्णूच अत्रीच्या पुत्राच्या रूपात उत्पन्न झाले, आणि ‘दत्तो’ म्हणून दत्त आणि अत्रिपुत्र झाल्यामुळे आत्रेय, अशा प्रकारे दत्त आणि आत्रेय यांच्या संयोगामुळे यांचे दत्तात्रेय हे नांव प्रसिद्ध झाले.
मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव साजरा केला जातो.
दत्तांच्या जन्माची कथा
अत्रिमुनीची पत्नी अनुसूया ही अत्यंत पतिव्रता व साध्वी स्त्री होती. ती आश्रमात पतीच्या सान्निध्यांत राहून पतीची उत्तम प्रकारे सेवा करित असे. तसेच आश्रमात येणाऱ्या प्रत्येक अतिथीचें मोठ्या प्रेमाने व आदराने स्वागत करी. वेळीअवेळी आलेला पाहुणा अनुसूयेच्या आश्रमांतून कधी उपाशी पोटी गेला नाही किंवा खाली हाताने गेला नाही. तिचा हा आचार पाहून प्रत्यक्ष सूर्यदेवसुद्धा तिच्यापुढे शीतल होई. पवन तिच्यापुढे नम्र होई. एवढा तिच्या पातिव्रत्याचा प्रभाव होता.
पतीबद्दल तिच्या ठायी असलेल्या अनन्य भक्तिमुळे तिचे नाव ‘साध्वी व पतिव्रता स्त्री ‘ म्हणून सर्वतोमुखी झाले. ही वार्ता नारदमुनींच्या सुद्धा कानावर पडली. त्यांनी ही वार्ता वैकुंठाला जाऊन ब्रम्हा, विष्णू, महेश यांच्या पत्नी सावित्री, लक्ष्मी, पार्वती यांना सांगितली. तेव्हा त्यांना या अनुसूयेबद्दल मत्सर वाटू लागला. तेव्हा तिचे सत्व हरण करावे असा त्यांच्या मनात विचार आला आणि हा विचार त्यांनी आपापल्या पतींजवळ बोलून दाखविला.
त्रैमूर्ति म्हणजेच ब्रह्मा-विष्णु-महेश यांनी आप आपल्या पत्नीला समजविण्याचा प्रयत्न केला पण त्या ऐकेनात. त्यामुळे आपआपल्या पत्नींच्या हट्टामुळे ही तिन्ही देव तिची परिक्षा पाहण्यासाठी आणि तिचे सत्त्वहरण करण्यासाठी तयार झाले. त्या तिघांनी ब्राह्मणाची रूपे घेतली. आणि ते तिघे भर दुपारी अत्रिमुनींच्या आश्रमात आले.
अशा वेळी आपल्या आश्रमात आलेले ब्राह्मण अतिथी पाहून अनुसूयेने त्यांचे आदरातिथ्य केले, आणि दुपारची वेळ असल्यामुळे त्यांना भोजन करण्याची विनंती केली. तेंव्हा ब्राह्मण रूपात आलेल्या त्रिदेवांनी तिच्यासमोर अट ठेवली, की तिने विवस्त्र होऊन त्यांना वाढावे
अनुसूयेने तिच्या तपसामर्थ्याने ते कोण असावेत हे ओळखले. अत्रि मुनि नदीवर स्नान संध्येला गेले होते. अनुसूयेने आपल्या पतीचे स्मरण करून, त्यांचे पांदतीर्थ या ब्राह्मणांवर शिंपडले, त्यामुळे ती तिघे सहा महिन्यांची बालकें होऊन रांगू लागली.
अनुसूयेने त्यांच्या इच्छेप्रमाणे करून, त्यांना स्तनपान करविले. आणि त्यांना थोपटून पाळण्यात झोपविले. अत्रिमुनी परत आल्यानंतर तिने सर्व वृत्तान्त त्यांना सांगितला. अत्रीमुनींकडून ही गोष्ट नारदाला कळाली. स्वर्गलोकात तीन्ही देवस्त्रिया आपल्या पतींची वाट पाहू लागल्या. तेव्हा नारदमुनी अत्रिमुनींचा निरोप घेऊन स्वर्गलोकी आले व घडलेली घटना सांगितली. त्या चिंताग्रस्त झाल्या. त्या तिघी अनुसूयेकडे गेल्या. तिची त्यांनी करुणा भाकून झालेली सारी कथा निवेदन केली व अनुसूयेची क्षमा मागितली. तेव्हा अत्रिमुनींनीं पुन्हा गंगोदक देऊन तें त्या बालकांवर शिंपडण्यास सांगितले. तेव्हा अनुसूयेने त्या बालकांवर गंगोदक शिंपडले. तेव्हा ती बालके पूर्ववत् देवस्वरूप झाली. इतक्यांत मुनि बाहेर आले. त्यांनी देवांना साष्टांग नमस्कार घातला. ब्रह्मा- विष्णु- महेश, प्रसन्न झाले व म्हणाले, “हे अनुसूये आम्ही तुजवर प्रसन्न झालो आहोत. इच्छित वर माग!” तेव्हां अनुसूयेने ‘तिघे बालक ( ब्रह्मा – विष्णु- महेश ) माझ्या घरी तीन मूर्ति एकरूप होऊन पुत्राप्रमाणे राहू देत’ असा वर मागितला. तेव्हा ‘तथास्तु’ असें म्हणून देव अंतर्धान पावले. कालांतराने हे तीन्ही देव अनुसूयेच्या गर्भातून प्रकट झाले.
मासांमाजीं मार्गेश्वर । उत्तम महिना प्रियकर ।तिर्थीमाजीं तिथी थोर । चतुर्दशी शुद्ध पैं ॥वार बुधवार कृत्तिका नक्षत्र । ते दिनीं ब्रह्मा विष्णु त्रिनेत्र ।तिघे मिळोनि एकत्र । शुद्ध सत्त्व निवडिलें ॥त्रैमुर्तींचें सत्त्व मिळोन । मूर्ति केली असे निर्माण।ठेविते झाले नामभिघान । दत्तात्रेय अवधूत ॥
अशा तऱ्हेने मार्गशीर्ष शुक्ल चतुर्दशीच्या दिवशी दत्तात्रेयाचा जन्म झाला. तीन शिरें, सहा हात आणि तेजस्वी अंगकांतीचें ते बालक पाहून सती अनुसूयेला अत्यानंद झाला. ती पतिव्रता स्त्री खरोखर धन्य होय. तेव्हापासून आजतागायत मार्गशीर्ष शुक्ल पौर्णिमेला प्रदोषकाली दत्तजयंतीचा उत्सव प्रतिवर्षी साजरा होतो.
दत्तात्रेयांचे रूप आणि त्याचा अर्थ
दत्तात्रेय जरी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कायम फिरत असले, तरी त्यांचे आवडीचे ठिकाण म्हणजे उंबराचा वृक्ष होय. त्यांचे रूप म्हणजे केसांवर जटाभार, सर्व अंगावर विभूति, व्याघ्रांबर वस्त्र म्हणून नेसलेले, तसेंच त्यांच्यासोबत त्यांची गाय आणि 4 कुत्रे, काखेला झोळी, असे ‘अवधूत’ दत्त विश्वाच्या कल्याणासाठी फिरत असतात. त्यांच्या सोबत असलेली गाय म्हणजे पृथ्वीचे स्वरूप समजले जाते. किंवा लोकांच्या कामना पूर्ण करणारी कामधेनू. तसेंच त्यांच्या सोबत असलेले 4 कुत्रे म्हणजे 4 वेद आहेत. तसेंच त्यांच्या हातात असणारे त्रिशूल म्हणजे तीन गुणांवर विजय मिळवण्याचे प्रतीक आहे. आणि एका हातात असलेले सुदर्शन चक्र म्हणजे काळाचे प्रतीक आहे, म्हणजे ते कालातीत आहेत. तसेंच एका हातात असलेला शंख म्हणजे ॐ ध्वनिचे प्रतीक आहे. तसेंच त्यांनी अंगावर फासलेले भस्म म्हणजे वैराग्याचे प्रतीक आहे. त्यांच्या हातात असलेले भिक्षापात्र म्हणजे ‘दान’ करण्याचे प्रतीक आहे. मनुष्यमात्राला, आपल्याजवळील वस्तू इतरां सोबत वाटून खाण्याचा संदेश आहे. एका हातात असलेली जपमाळ ही नामस्मरणाचे महत्त्व सांगते.
सर्व संप्रदायांमध्ये दत्तात्रेय
दत्तात्रेय हे वारकऱ्यांनाही पूज्य आहेत. श्री ज्ञानदेव आणि श्री एकनाथ हे दत्तोपासक होते. आनंद संप्रदायाची गुरुपरंपरा ही दत्तात्रेयादी आहे. चैतन्य संप्रदायाची गुरुपरंपरा राघव-चैतन्य-केशव-बाबाजी- तुकाराम अशी आहे. या परंपरेतील राघव चैतन्यांनी दत्ताची उपासना केली होती. मुस्लिमांत या देवतेचा निर्देश शहा फकीर म्हणून होतो. भक्तांसाठी दत्तप्रभू मलंग वेश धारण करतात, अशी धारणा आहे. यामुळे दत्ताचे अनेक भक्त मुसलमान असतात.
संकलन- goodworld.in
Related
Discover more from Blissful Life
Subscribe to get the latest posts sent to your email.