मुलांचा अभ्यास घेण्यापूर्वी १० मिनिटे हे वाचा. Spare 10 minutes to read this
Spare 10 minutes to read this
मुलांचा अभ्यास घेण्यापूर्वी १० मिनिटे हे वाचा. Spare 10 minutes to read this
मागच्या लेखात आपण पाहिले तसे, आजकाल मुले वाढविणे अत्यंत आव्हानात्मक, challenging झाले आहे- आणि त्यात मुलांचा अभ्यास घेणे म्हणजे तर मुलांच्या आयांसाठी रोजची लढाई- आणि मुलांसाठी सुद्धा! त्यामानाने खरेच आमची पिढी खूप भाग्यवान होती. आम्ही जेंव्हा लहान होतो, तेंव्हा आमच्या आई वडिलांना आम्ही कोणत्या वर्गात आहोत एवढे माहीत असणे म्हणजे खूप होते. आणि वर्षाच्या शेवटी- पास झालोय की नापास- एवढ्यापुरता त्यांचा संबंध येई. यात कदाचित आजच्या पिढीला अतिशयोक्ति वाटेल, पण वस्तुस्थिती अशीच होती.
आता दिवसेंदिवस परिस्थिती अत्यंत वेगाने बदलत आहे, आणि मुलांच्या शिक्षणाचा ताण आई वडिलांवर जास्त येतो आहे. शाळेत मुलांना घरून करून आणण्यासाठी एवढे मोठे होमवर्क देतात, निरनिराळे प्रोजेक्ट्स देतात, जे की मुलें स्वतंत्रपणे करूच शकणार नाहीत. त्यामुळे मुलाच्या पालकांना त्यात लक्ष घालावेच लागते आणि त्यातून घरोघर रोजची ‘लढाई’ नित्य झाली आहे.
पण दुर्दैवाची गोष्ट अशी की ही जबाबदारी पार पाडण्यासाठी काही स्किल लागू शकते, याची जाणीव फार थोड्या पालकांना असते, मग त्यांनी त्याची कुठली ट्रेनिंग घेणे तर दूर राहिले. आणि मग पालक, आपल्या आपल्या स्वभाव वैशिष्ट्यांप्रमाणे, आपल्या मर्यादित ज्ञानानुसार, मुलांचा अभ्यास घेण्याचा सोपस्कार पार पाडतात आणि पुरेशा सामंजस्याअभावी हा रोजचा अनुभव ते मूल आणि त्याची आई- दोघांसाठीही थकवणारा होतो.
त्यासाठी पालकांना काही अत्यंत मूलभूत गोष्टी माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे.
काही पालकांची अशी ठाम समजूत असते की मुलांना ‘धाकात’ ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. नाही तर मुले बिघडतील.. त्यामुळे ते कायम मुलांशी आज्ञार्थी आणि दरडावून बोलण्यावर विश्वास ठेवतात, सतत मुलांच्या चुका दाखवून त्यांना टोकत राहतात, हिणवत राहतात. तर काही पालक या उलट मुलांचे अत्यंत लाड करतात- त्यांचा कुठलाही शब्द खाली पडू देत नाहीत- या दोन्ही टोकाच्या गोष्टी टाळायला हव्यात.
मुलांचे होमवर्क- अर्थात घरून करून आणायचा अभ्यास
आज आपण अभ्यासाबद्दल बोलणार आहोत.
मुलांचे पालक (जास्त करून आयांना मुलांचा अभ्यास घ्यावा लागतो म्हणून आपण या ठिकाणी आयांचे उदाहरण घेणार आहोत) मुलांचा अभ्यास घ्यायला बसतात, तेंव्हा त्यांच्यात पेशन्स नसेल, आपल्या हातातील कामात आनंद घेण्याची वृत्ती नसेल, तर ते शक्यतो लवकर त्यांचे होमवर्क ‘उरकून’ घेण्याचा प्रयत्न करतात.
या ठिकाणी आईला काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे-
- मुलांची उपजत आणि नैसर्गिक प्रवृत्ती ही ‘खेळण्याची’ असते- त्यांना ‘खेळण्यात’ जो आनंद मिळतो तो इतर कशातही मिळत नाही- त्यामुळे मुले अभ्यासाचे रूपांतर ही खेळण्यात करू पाहतात. खरे तर आपल्यासोबत अभ्यासाला बसून, त्यांनी त्याच्या ‘खेळण्यावर’ पाणी सोडलेले असते हा त्यांच्या दृष्टीने मोठा ‘त्याग’ असतो! आईने मुलांना हसत ‘खेळत’ शिकविले तर त्यांना त्याचे अजिबात टेंशन येणार नाही.
- साधारण वयस्कर मनुष्यांचा attention span हा ३२ ते ५० मिनिटे असतो. हे मी बँकेच्या ट्रेनिंग सेंटर मध्ये असतांना आम्हाला सांगितले जात असे- त्यामुळे आम्ही वर्गात शिकवतांना ३५ ते ४० मिनिटां नंतर participants ला एखादा जोक सांगून, किंवा विषय बदलून, मग पुन्हा विषयावर येत असू. ५ ते ६ वर्षांच्या मुलां मध्ये हा attention span १२ ते १८ मिनिटे असतो. खाली वयानुसार attention span चा तक्ता दिला आहे.
वयानुसार लक्ष देण्याची क्षमता
• २ वर्षांची मुले: ४-६ मिनिटे
• ३ वर्षांची मुले: ६-८ मिनिटे
• ४ वर्षांची मुले: ८-१२ मिनिटे
• ५-६ वर्षांची मुले: १२-१८ मिनिटे
• ७-८ वर्षांची मुले: १६-२४ मिनिटे
• ९-१० वर्षांची मुले: २०-३० मिनिटे
• ११-१२ वर्षांची मुले: २५-३५ मिनिटे
• १३-१५ वर्षांची मुले: ३०-४० मिनिटे
• १६ आणि त्याहून अधिक वयाचे: ३२-५०+ मिनिटेत्यामुळे, मुलांचा अभ्यास घेतांना त्यांना लागोपाठ एकेक दोन दोन तास अभ्यास करायला लावला, तर त्याचा ‘काही उपयोग’ होत नाही. ५ ते ८ वर्षाच्या मुलाला २०-२५ मिनिटांनंतर मध्ये थोडा ब्रेक घेऊ देणे हे अत्यंत आवश्यक आहे. ही शास्त्रीय माहिती फार थोड्या पालकांना असते आणि शिस्त लावायच्या नावाखाली, किंवा लवकर ‘उरकण्या’ साठी, ते मुलांना नॉनस्टॉप अभ्यासाला बसवू पाहतात, आणि त्यातून मग conflict सुरू होतो- लढाई सुरू होते! मुले चुळबूळ करायला लागतात. त्यापेक्षा मधून मधून मुलांना ब्रेक घेऊ दिला तर त्यांचा अभ्यास नीट पार पडू शकतो.
- मुलांना आपण काय सांगतोय ते समजले नाही तर पालक अत्यंत अधीर होतात, एवढे साधेही कसे समजत नाही म्हणून मुलावर ओरडतात. पण आपण आपल्या लहानपणी किती बुद्दू होतो हे ते विसरतात! आणि शिकवतांना मुलांवर अनेक नकारार्थी शब्दांचा भडिमार करतात! उदाहरणार्थ- उनाडक्या करायला, मोबाईल बघायला बरे आवडते, आणि अभ्यासाच्या वेळेसच बरा कंटाळा येतो! खायला पायजे नुसते! अभ्यासाच्या नांवाने बोंब नुसती! शिकला नाहीत तर कसे व्हावे- मवाली होशील! (त्या मुलाच्या शब्दकोशात ‘मवाली’ हा शब्द नसतो- तो आपण घालतो!) तसेच पालक आपले सर्व frustration, निराशा त्या मुलांवर ओततात. मुलांची आणि आपली समजण्याची पातळी एक असू शकत नाही- मुलाला समजले नाही याचा अर्थ आपण सांगण्यात कुठे तरी कमी पडतो आहोत हे त्यांनी समजून घ्यायला पाहिजे- आणि पेशन्स हा परवलीचा शब्द लक्षात ठेवला पाहिजे.
त्यापुढची पायरी म्हणजे मग मुलांवर ओरडणे, त्यांना मारणे, धमकी देणे हे प्रकार होतात. मुले या गोष्टी अत्यंत seriously घेतात- त्यांना तुम्ही खरेच बोलताय की पोकळ धमकी देताय हे समजण्या इतपत अनुभव नसतो. पालकांनी या ठिकाणी हे लक्षात घेणे आवश्यक आहे की पालक जेंव्हा मुलांवर ओरडतात, रागावतात, त्यावेळी त्यांचा lower brain अॅक्टिवेट होतो- म्हणजे काय? तर आपले संरक्षण करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या हालचाली किंवा प्रतिक्रिया त्याच्या शरीरात आणि मनात व्हायला लागतात. त्यांच्या रक्तात cortisol आणि adrenaline ही स्ट्रेस हार्मोन्स रिलीज होतात. Cortisol मुळे मेंदूत नवीन पाथ वेज (ज्ञान तंतूंचे मार्ग) तयार होणे कमी होते. Adrenaline मुळे fight or flight हा रिस्पॉन्स trigger होतो. अशा वेळी त्याचा मेंदू कुठलीही उपयुक्त माहिती ग्रहण करू शकत नाही. त्यामुळे पालकांनी पण त्यांचा lower brain वापरण्या ऐवजी, त्यांचा upper brain वापरून, शांत पणे, मुलांना समजून सांगण्याची आवश्यकता असते- म्हणूनच म्हटले जाते की पालकत्व हे पालकांसाठी त्यांच्या संयमाची परीक्षा असते. मुलें स्ट्रेस मध्ये कुठलीही नवीन माहिती ग्रहण करू शकत नाहीत.
- मुलांना (खरे तर कोणालाही) प्रोत्साहनाची आवश्यकता असते. कौतुक, प्रोत्साहन यामुळे मनुष्यात Dopamine, Serotonin, Oxytocin, Endorphins ही happy harmones रिलीज होतात. त्यामुळे मुलांकडून उदाहरणे सोडवून घेताना, त्यांनी ५० प्रश्न सोडवले असतील, तर ते तपासतांना, त्यातील एक दोन प्रश्नांची उत्तरे चुकली असतील तर नेमके त्यावरच बोट ठेवण्या ऐवजी- आधी त्यांनी जे प्रश्न बरोबर सोडवले आहेत, त्याबद्दल त्यांना शाबासकी द्या, त्यांचे कौतुक करा-किती हुशार आहेस तू! अरे वा! बरोबर उत्तर दिलेस! शाब्बास! अशा शब्दांची मुक्तपणे उधळण करा. त्याला काही पैसे लागत नाहीत! काही पालकांचा अगदी ठाम गैरसमज असतो की मुलांचे कौतुक केले तर ती शेफारतात! त्यामुळे ती चुकूनही मुलांचे कौतुक करत नाहीत. मग मुले हिरमुसली होतात. हा खरे तर मनुष्य स्वभावाचा मूलभूत पैलू आहे! आणि यामुळे खूप गोष्टी सुकर होऊ शकतात. पण काही पालक या बाबतीत अत्यंत चिक्कू असतात.
- मुले के. जी, पहिली दुसरी, अशाच वर्गात असतांना सुद्धा काही पालक त्यांनी १०० पैकी शंभर मार्क मिळवलेच पाहिजेत, नाही तर अगदी आभाळ कोसळेल अशा समजुतीत असतात. त्यांनी हा समज काढून टाकायला पाहिजे. मुलांना शाळा शिकणे, अभ्यास करणे हा एक आनंदाचा अनुभव झाला पाहिजे हा उद्देश पालकांचा असला पाहिजे. मुलांचा सर्वांगीण विकास होऊ देणे हा आपला उद्देश असला पाहिजे. याबाबतीत बऱ्याच पालकांचे म्हणणे असते की, तुमच्या वेळी वेगळे होते, आजकाल स्पर्धा खूप वाढली आहे, त्यामुळे अगदी बालपणापासून मुलांकडून मेहनत करून घेतली नाही तर त्यांचे भविष्य काही बनू शकणार नाही. पण पहिली दुसरीतील, शाळेतील अंतर्गत परिक्षेतील गुणांनी मुलाच्या भवितव्यावर कितीसा परिणाम होणार आहे, आणि त्यासाठी आपण किती किंमत मोजायची, याचा सापेक्ष विचार प्रत्येक आई वडिलांनी करायचा आहे.
- मुलांना जर रागावून, भीती दाखवून, धमकावून, अभ्यास करून घेण्याचा प्रयत्न केला, तर मुलें त्यांच्या स्वभावानुसार प्रतिक्रिया देतील. काही मुले जी बुजरी आहेत, ती पालकांच्या धाकाने अभ्यास करतील, पण आपला आत्मविश्वास हरवून बसतील- प्रत्येक गोष्टीत त्यांना पालकांची मदत लागेल. याउलट जी मुलें स्वभावतः आक्रमक आहेत, ती त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर अधिकाधिक आक्रमक होत जातील.

- काही पालकांच्या मनात नक्कीच विचार येत असतील- आमच्या काळी असली काही थेरें नव्हती- छडी लागे छम छम, विद्या येई घम घम! या उक्तीप्रमाणे, मुलांना धाक दाखवला तर ती वठणीवर येतात, अन्यथा नाही. पण या बाबतीत हे लक्षात घेणे आवश्यक आहे की त्या काळची कौटुंबिक आणि सामाजिक परिस्थिती वेगळी होती. मुलांना वळण लावायला फक्त आई वडीलच नाही तर इतरही वडीलधारे असत. तसेच मुलांना आपल्या भावनांना वाट मोकळी करून द्यायला सुद्धा इतर वडीलधारे, मित्र, नातेवाईक, मोठे, लहान भाऊ बहीण असत असत. खरे तर आजोबा आणि आजी ही मुलांच्या आयुष्यातील buffer किंवा shock absorber म्हणून काम करीत. पण आजकाल न्यूक्लियर families मध्ये मुलें पूर्ण पणे isolated असतात. इतर कुणाशीही त्यांचा क्वचितच संबंध येतो. मित्र मैत्रिणीही अगदी निवडकच असतात- अशा वेळी हा छडी लागे छम छम चा वापर केला, तर त्याचा उलट परिणामच होण्याची शक्यता जास्त. आई किंवा वडिलांकडून एखादा शब्द चुकीचा गेला, तर त्याला neutralize करायला घरात इतर कोणीही नसते- किंवा काही ठिकाणी आजोबा आजी असतील तरी त्यांना मोकळेपणाने बोलण्याची सोय नसते.
त्यामुळेच मला असे वाटते, आजकालच्या आई वडिलांना मुलांना वाढवणे हे एक मोठे आव्हान आहे, आणि त्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी त्यांनी आपली क्षमता वाढवणे अत्यंत आवश्यक आहे.
म्हणूनच मुलांचा अभ्यास घेण्या आधी १० मिनिटें या लेखात मांडलेल्या मतांवर विचार करा- आणि आपल्या मुलांचा अभ्यास हा आपल्यासाठी आणि त्यांच्यासाठी पण एक आनंद यात्रा होईल असा प्रयत्न करा!
हा लेख म्हणजे या विषयावरील मला सुचलेले विचार आहेत. या विषयाला इतर अनेक पैलू आहेत- जसे की differently abled मुलांचा विषय, एकल पालक (single parents) यांनी मुलाला कसे सांभाळावे इत्यादि. तसेच मी काही या विषयावरील तज्ञही नाही. माझी मतें ही माझ्या अनुभवातून आणि मर्यादित ज्ञानातून आलेली असल्यामुळे परिपूर्ण असतील असे नाही. पण हा विषय मांडायला ब्लॉगिंग हा एक उपयुक्त मंच उपलब्ध झाल्यामुळे ती इथे मांडायचा प्रयत्न केला आहे.
या विषयावरील आपली मतें comments मध्ये नक्की कळवा.
माधव भोपे
Discover more from Blissful Life
Subscribe to get the latest posts sent to your email.