https://goodworld.in A website by Madhav Bhope

Guest Article by Shri V.D.Bhope., Retired Executive Engineer, Irrigation Department, Govt. of Maharashtra

 

एका गाढवाची गोष्ट

ही साधारण १९६३ सालची गोष्ट आहे.

मी त्यावेळी अंबाजोगाईला होतो आणि योगेश्वरी शाळेत ९ वीत शिकत होतो. आमच्या शाळेच्या सभागृहात कथाकथनाचा कार्यक्रम चालू होता. त्यात एक खूप बिलंदर वक्ता होता. तो नेहमी मास्तर लोकांची चेष्टा करीत असे.

त्याने गाढवाची गोष्ट सांगायला सुरुवात केली.

“एका धोब्याकडे एक गाढव असते. ते मानेने फक्त ‘हो-हो’ असेच म्हणत असते. त्या धोब्याने शर्यत लावली की जो कोणी माझ्या गाढवाकडून ‘नाही- नाही’ म्हणवून दाखवेल, त्याला दहा रुपये बक्षीस म्हणून देण्यात येतील. तेंव्हा बरेच जण आले आणि त्यांनी विविध प्रकारे त्या गाढवाची मान ‘नाही-नाही’ अशी, म्हणजे आडवी हालेल यासाठी प्रयत्न केले.  पण कितीही जंग जंग पछाडले तरी ते गाढव काही ‘नाही-नाही’ म्हणत नव्हते. दर वेळी ते गाढव ‘हो-हो’ अशीच मान हालवित होते.

शेवटी एकजण आला. तो त्या गाढवाच्या कानात काही तरी बोलला. लगेच ते गाढव मानेने ‘नाही-नाही’ असे म्हणू लागले.

धोब्याने आपली हार कबूल केली, आणि ठरल्याप्रमाणे त्या माणसाला १० रुपये दिले. पण मग न राहवून धोब्याने त्या माणसाला विचारले, “मी इतके दिवसांपासून हा खेळ करतो आहे, पण आतापर्यंत कुणीही गाढवाकडून नाही नाही म्हणवून घेऊ शकले नाही, मग तुम्ही असे काय त्या गाढवाच्या कानात सांगितले, की माझे गाढव एवढे जोरजोरात नाही म्हणून मान हलवू लागले?”

त्यावर तो माणूस म्हणाला, “अगदी सोपे आहे. मी त्या गाढवाच्या कानात विचारले, क्या तू मास्टर बनेगा?” त्यावर त्याने जोरात मान हलवली.!!”

त्या वक्त्याच्या या शेवटच्या वाक्याने, पूर्ण हॉल प्रचंड हास्यात बुडून गेला. तिथे उपस्थित असलेले सर्व शिक्षक, गोरेमोरे झाले.

संयोजकांनी पुढच्या वक्त्याचे नाव पुकारले. पुढचे वक्ते होते संभूस सर. संभूस सर हे खूप हजरजबाबी म्हणून प्रसिद्ध होते. ते योगेश्वरी  महाविद्यालयाचे मराठीचे प्राध्यापक तर होतेच पण एक चांगले साहित्यिक पण होते. ते त्या आगाऊ वक्त्याला असे सोडतील असे शक्यच नव्हते.

संभूस सर व्यासपीठावर आले.  त्यांनी सर्व श्रोत्यांकडे नजर फिरविली. त्यानंतर एक कटाक्ष त्यांनी आधीच्या वक्त्याकडे टाकला आणि त्यांनी पहिलेच वाक्य म्हटले,

“ आत्ताच तुम्ही एका गाढवाची गोष्ट ऐकली आहे…..

आता माझी गोष्ट ऐका…”

एक क्षणभर शांतता, आणि पुढल्याच क्षणी, आधी झाला होता, त्यापेक्षा, दुप्पट हशा पूर्ण सभागृहात झाला, आणि त्याबरोबर टाळ्यांचा कडकडाट पण झाला.

तो आधीचा वक्ता, जो इतका वेळ विजयी नजरेने सगळीकडे पाहत होता, त्याला मेल्याहून मेल्यासारखे झाले, आणि त्याने खाली मान घातली, ती नंतर वर केलीच नाही.man sitting with his head down to the left leaning on his hand one line drawing concept fatigue reflections tiredness drowsiness vector

 

“मास्टर से पंगा लेना इतना आसान नही होता!” हे त्यादिवशी संभूस सरांनी सिद्ध करून दाखवले.

लेखक:- श्री व्ही. डी. भोपे

 निवृत्त कार्यकारी अभियंता, सिंचन  विभाग, महाराष्ट्र सरकार 


Discover more from Blissful Life

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Blissful Life

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading