https://goodworld.in A website by Madhav Bhope

Guest Article by Shri V.D.Bhope., Retired Executive Engineer, Irrigation Department, Govt. of Maharashtra

 

पाठांतर स्पर्धेची गोष्ट

——————–

मित्रांनो

आपण लहानपणी अभावितपणे अशा काही गोष्टी करतो, की त्यावेळी त्या किती हास्यास्पद आहेत याचा आपल्याला तेंव्हा पत्ता ही नसतो. पण नंतर कधी त्या गोष्टी आठवल्यानंतर आपल्याला त्या आठवून आपलेच आपल्याला हसू आल्याशिवाय राहत नाही.

ही साधारण १९६१-६२ सालची गोष्ट आहे.

त्यावेळी आम्ही जाफ्राबादला होतो.

त्या काळात तिथे लाईट नव्हते . कंदील चिमण्यांचा वापर करावा लागायचा.

 तसेच नळाचे पाणी नव्हते. विहीरीचे पाणीच प्यायला व धुण्याभांड्याला उपलब्ध होते . मी सरकारी शाळेत त्यावेळी आठवीत शिकत होतो.

आमच्या शाळेत दरवर्षी मी १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीची आतुरतेने वाट पहायचो कारण या दोन दिवशी खूप धमाल करायला मिळायची.

वेगवेगळ्या खेळांच्या स्पर्धा व्हायच्या . उदा. चमचा लिंबू रेस, तीनटांगी दौड,  पोत्यात  दोन्ही पाय घालून उड्या मारीत जाणे, हात बांधून उड्या मारून उंच दोरीला बांधलेली जिलबी खाणे, निबंध स्पर्धा , कविता पाठांतर स्पर्धा .

या सगळ्यांमध्ये मी हिरिरी ने भाग घ्यायचो . निबंध स्पर्धा आणि कविता पाठांतर स्पर्धांमध्ये मला हमखास पहिले बक्षीस मिळायचे .  मी फार हुशार होतो अशातला अजिबात भाग नाही . फक्त इतर विद्यार्थ्यांचे पालक बहुधा अशिक्षित होते, त्यांच्या घरी शैक्षणिक वातावरण नव्हते त्यामुळे ते अभ्यासात मागे असत .म्हणून मी म्हणजे वासरात लंगडी गाय शहाणी असा प्रकार होता…

तर मी पाठांतर स्पर्धेत भाग घेतला होता .एकूण वीसएक स्पर्धक होते .आमच्या हेडमास्तरांना ( वाघमारे ) सरांना मी बाळबोधपणे विचारले,

” सर किती कविता म्हणून दाखवायच्या ?”

सर म्हणाले , तांदुळजे सर परिक्षक आहेत .जेवढ्या कविता तुला पाठ आहेत तेवढ्या त्यांना म्हणून दाखव.”

…झालं… मला तर पडत्या फळाची आज्ञा मिळाली होती .

स्पर्धा सुरु झाली . तांदुळजे सरांनी माझा नंबर सगळ्यात  शेवटी ठेवला होता. प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या कविता म्हणून दाखवल्या . कुणी २ कुणी ३ कुणी चार अशा ..माझ्या आधीच्या मुलांपैकी चारच्या वर कुणी गेले नाही. याचा अर्थ सरळ होता की मी पाच कविता म्हटल्या तरी पुरेसे होते .पहिला नंबर पक्का होता.माझा शेवटचा नंबर होता. 

तो आल्यानंतर मी कविता म्हणायला सुरुवात केली …. सहा कविता म्हणून झाल्या .

शाळा संपल्याची घंटा झाली.

तांदुळजे सर म्हणाले. चल आता . तुझ्या सहा कविता झाल्या . शिपायाला शाळा बंद करायची आहे.’

पण माझी मुख्याध्यापकांवर फार दृढ श्रध्दा होती. मी तांदुळजे सरांना म्हटले . ‘सर शिपायाला खुशाल शाळा बंद करू द्या . मला हेडसरांनी सांगितले की तुला जितक्या कविता येतात तेवढ्या म्हण. तेंव्हा आता माघार नाही. मी तुमच्या घरी येतो व तिथे उरलेल्या कविता म्हणून दाखवतो!!’

सर फार भिडस्त होते. मी सगळ्याच सरांचा लाडका विद्यार्थी होतो. तसाच या सरांचाही लाडका विद्यार्थी होतो. सर म्हणाले ,ठीक आहे बाबा..माझ्या घरी चल . तिथे उरलेल्या कविता म्हण. ‘

आम्ही सरांच्या घरी आलो की मी लगेच उरलेल्या कविता सुरु केल्या.   सरांचं लग्न झालं  नव्हतं. म्हणून ते स्वत:च घरी स्वयंपाक करायचे. सर मला म्हणाले मी स्वयंपाक करतो.   तू तुझं चालू दे. इकडे माझ्या कविता चालूच होत्या.

सरांनी कमालीचा संयम राखीत शांतपणे खिचडी टाकली.khichdi

सुमारे वीस मिनिटांनी माझ्या मराठी कविता संपल्या. मी म्हटले सर आता हिंदीच्या आणि इंग्रजीच्या कविता राहिल्यात , त्या म्हणू का ?talking boy   सरांनी समयसूचकपणा दाखवत म्हटले , नको नको.ही स्पर्धा फक्त मराठी कवितांचीच आहे…

सरांना इतका वेळ पीडा देऊन मी घरी परतलो….

मित्रांनो आपल्या मराठी  विनोदी साहित्यात कवी  आणि कविता हे दोन्ही सातत्याने चेष्टेचा विषय राहिले आहेत .पण मी हेडमास्तरांनी  दिलेल्या सूचना पाळतांना तारतम्य न बाळगल्यामुळे तांदुळजे सरांना आपण खूप पीडा देत आहोत हा विचार त्यावेळी माझ्या मनाला शिवला पण  नाही.

तांदुळजे सरांच्या पेशन्सला मात्र माझा त्रिवार सलाम….त्या काळच्या शिक्षकांचे आणि मुलांचे असे वेगळेच नाते होते…

लेखक:- श्री व्ही. डी. भोपे

 निवृत्त कार्यकारी अभियंता, सिंचन  विभाग, महाराष्ट्र सरकार 


Discover more from Blissful Life

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Blissful Life

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading