Story of parrot
एकदा एक पोपट पकडणारा पारधी होता. त्याने जंगलात एक पाण्याचे छोटेसे कुंड बनवले होते. त्यावर एक लाकडाची दांडी आडवी ठेवली होती. तिच्यावर पोपट बसला, की ती दांडी उलटी होत असे. पोपट जेंव्हा खाली बघत असे तेंव्हा चहूबाजूनी त्याला खोल पाणी दिसत असे. त्यामुळे पोपट त्या दांडीला घट्ट पकडून ठेवत असे. मग तो पारधी येऊन त्या पोपटाला पकडून नेऊन बाजारात विकत असे.
हे दृश्य पाहून एका दयाळू माणसाला’ त्या पकडल्या जाणाऱ्या पोपटांची दया आली. त्याने एक पोपट घेतला, आणि त्याला शिकवले- “हे बघ पोपटा, जिथे पाण्याचे असे कुंड असेल, तिथे जायचे नाही.”
तेंव्हा पोपटाने ते पाठ करून तो तसेच म्हणू लागला. मग माणसाने त्याला सांगितले, की “तिथे आडवी दांडी असेल, तिच्यावर बसायचे नाही”. पोपटाने ते पण पाठ केले. मग माणसाने त्याला शिकवले- “चुकून बसलाच, तर उडून जायचे! उडून गेलास तर पकडला जाणार नाहीस”. पोपटाने तेही पाठ केले आणि तसेच म्हणू लागला. असे शिकवून दयाळू माणसाने पोपटाला सोडून दिले. त्या पोपटाने इतर पोपटांनाही हे शिकविले.
नंतर एके दिवशी पुन्हा त्या पारध्याने पाण्याच्या कुंडावर आडवी दांडी ठेवली. तो शिकवलेला पोपट उडत उडत तिथे गेला, आणि त्या आडव्या दांडीवर बसला! आणि तोंडाने म्हणू लागला, “पाण्याच्या कुंडीवर जायचे नाही, आडव्या दांडीवर बसायचे नाही, बसले तरी उडून जायचे, म्हणजे आपण पकडले जात नाही.”
पण प्रत्यक्षात काही त्या पोपटाने ती दांडी सोडली नाही. खाली पाणी दिसत होते, आणि त्याला पाण्यात बुडून मरण्याची भीती वाटत होती. दांडी सोडली तर आपण उडू शकतो हे त्याच्या लक्षातच येत नव्हते.
तेवढ्यात पारधी येऊन त्या पोपटाला पकडून घेऊन गेला.
अशीच काहीशी अवस्था आपली सर्वांची तर नाही?
याच प्रकारे वानराला पकडणारे लोक, एका अरुंद तोंडाच्या घड्यात चणे ठेवून देतात. वानर येते आणि हात घड्यात घालून ते चणे मुठीमध्ये घेऊन बाहेर काढू बघते. पण मूठ बांधलेली असल्याने ती अरुंद तोंडातून बाहेर येऊ शकत नाही, आणि वानर चणे सोडत नाही. वानर पकडणारा येऊन सहज त्याला पकडून घेऊन जातो.
परोपदेश बेलायाम् सर्वे शिष्टा भवन्ति हि |
विस्मरन्ति तत्सर्वं स्वकार्ये समुपस्थिते |
नारायण, नारायण!
Related
Discover more from Blissful Life
Subscribe to get the latest posts sent to your email.