गेल्या महिन्यात एके ठिकाणी गेल्यावर तिथे एका जुनाट, वापरात नसलेल्या विहिरीवर, सुगरणीचे अनेक खोपे दिसले. विहीरीच्या काठाने उगवलेल्या झाडांवर त्यांनी खोपे बांधले होते. आणि अनेक सुगरण पक्षी, त्यांचा तो विशिष्ट आवाज करीत लगबग लगबग करीत ये-जा करीत होते. 
त्या पक्ष्यांची मेहनत बघून वाटले, आजकाल छोट्या छोट्या अडचणींना वैतागून, व्यसनाधीन होणारे, किंवा डिप्रेशन मध्ये जाणारे किंवा आत्महत्या करणारे लोक, जर या पक्ष्यांच्या जीवनातून काही बोध घेतील तर किती बरे!
बहिणाबाई चौधरीने म्हणून ठेवले आहे.
तिची उलूशीच चोच,
तेच दात, तेच ओठ
तुले देले रे देवाने
दोन हात दहा बोटं
बहिणाबाई म्हणतात, त्या पक्ष्याला ना हात आहेत, ना बोटं. तिची छोटीशी चोंच हीच तिचे हात आणि बोटं. तरी पण किती जिद्दीने ती तिचे घरटे विणते!
खरंच बहिणाबाई चौधरी या आपल्या खानदेशी कवयित्रीची जीवनाकडे बघण्याची दृष्टी किती practical आणि आशावादी होती !
त्या निमित्ताने इथे बहिणाबाईची सुगरणीच्या खोप्यावरील कविता या ठिकाणी देण्याचा मोह आवरत नाही. म्हणून ती पूर्ण कविता येथे सादर करीत आहे.
खोप्या मधी खोपा
अरे खोप्या मधी खोपा
सुगरणीचा चांगला
देखा पिलासाठी तिनं
झोका झाडाले टांगला
पिलं निजली खोप्यात
जसा झुलता बंगला
तिचा पिलामधी जीव
जीव झाडाले टांगला
सुगरीन सुगरीन
अशी माझी रे चतुर

तिला जन्माचा सांगाती
मिळे गण्या गंप्या नर 1
खोपा विणला विणला
जसा गिलक्याचा 2 कोसा3
पाखराची कारागिरी
जरा देख रे माणसा!
तिची उलूशीच4 चोच,
तेच दात, तेच ओठ
तुले देले रे देवाने
दोन हात दहा बोटं
काय लोकाचीबी तऱ्हा
कसे भांग घोटा पेल्हे5
उभा जमिनीच्या मधी
आड6 म्हणती उभ्याले
आसं म्हनू नही कधी
जसं उभ्याले आडवा
गुढी उभारतो त्याले
बहिणाबाई चौधरी
शब्द अर्थ:
- गण्या गंप्या नर- सुगरण पक्षिणीला खोपा विणता येतो. परंतु तिच्या नराला येत नाही. तो फक्त तिला गवताच्या काड्या वगैरे आणून देतो. म्हणून त्याला गण्या गंप्या म्हणजेच बावळट म्हटले आहे.
- गिलक्याचा कोसा- गिलके म्हणजे घोसाळे (पारसे दोडके). कोसा म्हणजे त्याचे वाळवून केलेली स्पंजा सारखी रचना. याला इंग्लिश मध्ये loofah म्हणतात.

- वाळवून केलेली स्पंजा सारखी रचना
- उलूशीच- छोटीशी
- पिले.
- आड म्हणजे पूर्वी घरात किंवा गल्लीत असायचे ते छोटे पाण्याचे स्रोत. इथे बहिणाबाईने कोटी केली आहे. आड हा जमिनीत ‘उभा’ असतो. त्याला आड म्हणणे जसे चूक आहे, तसेच गुढी पाडव्याला आपण गुढी ‘उभारतो’, पण मग त्याला ‘पाडवा’ कसे काय म्हणतो.? असा जाता जाता विनोद केला आहे.
Discover more from Blissful Life
Subscribe to get the latest posts sent to your email.


