श्री मकरंद करंदीकर यांच्या फेसबुक पेज वर अनेक महितीपूर्ण पोस्ट्स ते टाकत असतात. तसेच ठिकठिकाणी ते माहितीपूर्ण व्याख्यानेही देत असतात.
काही दिवसांपूर्वी त्यांनी दक्षिणा इत्यादि नेहमी शेवटी 1 आकडा असलेली का देत असतात याबाबत माहितीपूर्ण विवेचन दिले आहे. ते इथे साभार पोस्ट करीत आहोत. तसेच त्या पोस्टची लिंक पण खाली देत आहोत. जेणे करून मूळ पोस्ट पाहून त्यांच्या पेज लाईक व शेअर करता येईल.
दक्षिणा, आहेर, बक्षीस हे ११, ५१, १०१ अशा रकमेचे का देतात ?
( थोडी वेगळी माहिती )
आता चातुर्मास व श्रावण महिना सुरु झाला आहे.आपल्याकडे अशा अनेक चालीरिती आहेत ज्या लोकं वर्षानुवर्षे कसोशीने पाळतात पण त्या आपण का पाळतो हे अनेकांना माहिती नसते. त्यातील एक प्रथा म्हणजे दक्षिणा,आहेर, बक्षीस हे ५१, १०१, ५०१ अशा रकमेचे देणे. आता श्रावण महिना सुरु झाला आहे. भटजींना दक्षिणा, १० वी / १२ वी उत्तीर्ण झालेल्यांना कौतुक म्हणून बक्षीस, धार्मिक कार्यांमध्ये आहेर हा रोख देतांना नेहेमी सम रकमेत १ रुपया मिळवून ती रक्कम विषम करूनच दिला जातो. या मागची अनेक करणे आणि समजुती आपण आज जाणून घेऊ या.
मान्य केलेल्या रकमेपेक्षा थोडेसे अधिक दिले तर घेणारा खूष होतो. कोकणात पूर्वापार आंबे, काजू अशा गोष्टी शेकड्यावर घेतल्या जात असत. त्याचे १०० मोजले की अधिक ५ फळे तरी दिली जात असत. मापट्याने ( फरा, पायली ) धान्य मोजताना पहिला पसाभर देवासाठी आणि शेवटी पाच पसा अधिक दिले जायचे. युरोपात एकदा एका बेकरीवाल्याने १ डझन म्हणून चुकीने १२ ऐवजी १३ वस्तू दिल्या. त्यामुळे तिकडे १३ वस्तूंना बेकर्स डझन म्हणतात.
विषम रकमेच्या आहेरामागे अशी एक भावना असते की सम अंकाचा दोनने भागाकार होऊ शकतो पण विषम अंकाचा दोनने भागाकार होत नाही. तसाच आहेर घेणाऱ्याच्या सुखाचे, आनंदाचे कधीही दोन भाग होऊ नयेत आणि पुढचा १ म्हणजे ते वर्धिष्णू असल्याचे द्योतक. तसेच ५०. १००, ५०० म्हणजे शेवटी शून्य. शून्य म्हणजे सगळे संपले… असे होऊ नये म्हणून अधिक १ !… हा पुढचा अधिकचा १ रुपया म्हणजे, हल्लीच्या भाषेत …and counting म्हणजे त्यापुढेही अजून सुरूच असल्याची सद्भावना… अधिकस्य अधिकम फलम ! आज खरेतर १ रुपयाला कांही किंमतच उरलेली नाही. १ रुपयाची नोट छापायला सरकारला १ रुपयापेक्षाही अधिक खर्च येतो. तरीही सरकार अजूनही १ रुपयाची नोट छापते. लोकांच्या मनातल्या या भावनेची घेतलेली ही दखल तर नाही ?
पूर्वी धार्मिक कार्यासाठी भटजींना सव्वा रुपया दक्षिण दिली जात असे. अगदी पूर्वी तर फक्त चांदीचा रुपया असे. ही दक्षिणा फळे, शिधा, नारळ या व्यतिरिक्त प्रतीकात्मक म्हणून आणि शुद्ध धातूचे दान म्हणून दिली जात असे. जर काही कारणांमुळे पूजा साहित्य जमविणे यजमानाला कठीण असेल तर भटजींना पूजेच्या साहित्याचा सव्वा रुपया अधिक सव्वा रुपया दक्षिणा असे अडीच रुपये दिले जाऊ लागले. येथे एक गंमतीदार गोष्ट सांगाण्यासारखी आहे. इंग्रज सरकारने १९१८ साली भारतात, सव्वा रुपया अधिक सव्वा रुपया असे एकूण अडीच रुपयांची ( २ रुपये ८ आणे ) अजब चलनी नोट छापली होती.
कागदी नोटा आल्यावर एक नवीन डोकेदुखी आली. दक्षिणा देतांना त्यावर तुळशीपत्र ठेऊन उदक म्हणजे पाणी सोडून ती दिली जात असे. तुळशीपत्र ठेवणे आणि उदक सोडणे म्हणजे सर्वकाही समर्पण केल्याचे प्रतीक असते. कागदाच्या नोटांवर पाणी कसे सोडायचे ? म्हणून मग त्यावर १ नाणे ठेऊन देण्याची प्रथा रूढ झाली.
याचाच एक महत्वाचा भाग अनेकांना माहिती नसेल म्हणून सांगतो.. अनेक धार्मिक स्थळी किंवा खूप जाणकार भटजी, पुजारी तुमच्याकडून घेतलेल्या दक्षिणेतील १ रुपया तुम्हाला परत करतात. तो रुपया म्हणजे शुभ शकुनाचा, देवाच्या प्रसादाचा म्हणून मानला जातो. त्याशिवाय देणाऱ्याने जरी त्याचे सर्वस्व तुमच्या झोळीत टाकले तरी ते सर्व स्वीकारून त्याला कफल्लक करायचे नसते. म्हणून त्यातील थोडे तरी धन त्याला प्रसाद म्हणून परत करायचे असते. ही प्रथा आता फक्त कांही जाणकारच पाळतात. धार्मिक प्रथा म्हणून कोरडी भिक्षा मागितली जाते. त्यावेळीही तुम्ही घातलेल्या भिक्षेतून चिमूटभर / मूठभर तुमच्या पात्रात, प्रसाद म्हणून परत दिली जाते.
कांही ठिकाणी असे मानले जात असे की दानामधील वरचा १ रुपया हा पुजाऱ्याचा आणि बाकी रक्कम देवळाची ! एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर १२ व्या किंवा १३ व्या दिवशी, घरातील माणसे सर्व धार्मिक कार्ये आटोपल्यावर, नव्याने सुरुवात म्हणून देवळात जात असत. त्यावेळी पुजाऱ्याकडून कुठलेही धार्मिक कार्य करायचे नसल्यामुळे त्यांना सम रकमेची दक्षिणा / दान
दिले जात असे. त्यामुळे सम रक्कम देणे हे एरवी अशुभही मानले जाते.
आता तुम्ही पुढे कधी कुणाला १०१ किंवा ५०१ रुपये द्याल तेव्हा तुम्हाला या सर्व गोष्टी नक्कीच आठवतील.
( या लेखाचे हिंदी आणि कोंकणी भाषेत भाषांतरही झाले आहे ).
( पुनर्लिखित )
*© ( हा लेख व सोबतचे फोटो शेअर केल्यास कृपया माझ्या नावासह शेअर करावेत )*
***** *मकरंद करंदीकर.*
*makarandsk@gmail.com*
Discover more from Blissful Life
Subscribe to get the latest posts sent to your email.


