https://goodworld.in A website by Madhav Bhope

Guest article by vaidya Sohan Pathak

जमत नाही… न जमण्याबद्दल सुद्धा अभिमान..

बऱ्याच लोकांना आपल्याला एखादी गोष्ट बिलकुल जमत नाही याबद्दल खंत वाटण्याऐवजी अभिमान वाटतो, आणि त्यामुळे आपण आपलेच किती नुकसान करून घेत आहोत, याबद्दल त्यांना माहिती नसते.

१)एका पेशंटला तिखट जरा कमी खा, हिरवी मिरची डायरेक्ट खाऊ नका असं सांगितल्यावर तो चक्क म्हणाला डॉक्टर तेवढं सोडून बोला, दोन गोळ्या वाढवून द्या… पण मला तिखट बंद करणे अजिबात जमणार नाही..

२)पती-पत्नीच्या वादाची केस होती. प्रकरण घटस्फोटात पर्यंत गेलं होतं.. त्या स्त्रीला म्हटलं तुम्ही त्यांना थोडं समजून घ्या ‌. सारखं टोचून बोलू नका. त्यांनी चूक कबूल केली आहे, तुम्हाला संसार पुढे न्यायचं असेल तर तुम्हाला बोलण्याची पद्धत थोडी बदलावी लागेल…

लगेच ती स्त्री म्हणाली .. ते मला शक्य होणार नाही कारण माझ्या माहेरी अशाच पद्धतीने बोलतात.त्यात काय एवढं! त्याने समजून घ्यावं..

deal with stubborn man
stubborn woman

३)व्यसनाधीन युवक कावीळ, अपचन आजाराने त्रस्त होता.. औषधाने बरं वाटल्यावर समुपदेशन करताना व्यसन बंद करण्याबद्दल सांगितलं तेव्हा तो चक्क म्हणाला सर,मी खूपदा प्रयत्न केला ते शक्य नाही. त्याच्याशिवाय जगू शकत नाही… माझे मित्र तर माझ्यापेक्षा जास्त घेतात त्यांना काही झालं नाही..

आपल्याला अशा  व्यक्ती बऱ्याचदा भेटतात किंवा आपण सुद्धा आपल्या साठी हितकर नसणाऱ्या पण आवडणाऱ्या गोष्टी किंवा आपल्या सवयी, आपल्यातील दुर्गुण, आपल्या स्वभावातील कमतरता  याबाबत अशाच पद्धतीने दृष्टिकोन ठेवत असतो. आपण चूक करत आहोत किंवा आपल्या स्वभावात हा बदल करणे आवश्यक आहे हे आपल्याला जाणवते फक्त त्याच्याशी स्थिर भावना,(rigid thoughts ) अवस्तुनिष्ठ वैचारिकता,( irrational thought process) निगडित असल्यामुळे जेव्हा असा प्रसंग येतो तेव्हा आपण अनेक कारणे देऊन त्यापासून पळवाटा शोधण्याचा प्रयत्न करतो. समुपदेशनासाठी आलेली असंच नुकतीच शाळेत नोकरी लागलेली स्त्री मला स्टेज करेज  येऊ च शकत नाही मी ते काम करणारच नाही. असं म्हणून नोकरी सोडायला निघाली होती.

खरंच”जमत नाही”

असं काही असतं का?आणि अत्यावश्यक आहे अशा वेळेस आपण भीती, अतार्किक आकलन (wrong perception),व्यसन, सवय याच्यावर विजय मिळू शकत नाही का? नक्कीच मिळवू शकतो . इतिहासात आणि आसपास आपल्याला असे अनेक उदाहरणे पाहायला मिळतात. रवींद्र गुर्जर यांच्या ‘ *70 दिवस*’ भाषांतरित कादंबरीत नरमांस खाऊन जगलेला युवक भयंकर अपघात घडे पर्यंत अत्यंत लाजाळू, घाबरट होता पण त्याने विमान आल्पसच्या बर्फाळ पर्वतावर पडल्यावर जिवंत राहण्यासाठी स्वतःच्या स्वभावात बदल केला. आणि 70 दिवसाचा इतिहास घडवला .

गाडी शिकताना आपल्याला भीती वाटते आपल्याला बॅलन्स करता येणे अशक्य आहे असं सुरुवातीला नक्कीच वाटतं. एक्सीलेटर,क्लच आणि ब्रेक चा गोंधळ चार चाकी शिकताना स्वप्नात सुद्धा होतो. पण हळूहळू आपण तो बदल आपल्यात घडवून घेतो आणि नंतर सराईत ड्रायव्हिंग करू लागतो. जमत नाही यामागे बऱ्याच वेळा भीती हे कारण असते भय निर्माण होण्यासाठी काही जणांच्या बाबतीत सुरुवातीला काही अयोग्य,भीतीदायक घटना घडलेली असते किंवा भूतकाळात त्यांच्या हातून एखादी चूक झाली असते किंवा आपली योग्य नोंद घेतली जात नाही,कोणीतरी आपली झालेली चूक सर्वांसमोर निर्देशानास आणली असेल इत्यादी कारणं घडलेली असतात.पण अयोग्य विचार बैठकीमुळे त्याबद्दल इतका विचार केला जातो की पुन्हा याच्यापुढे मी असं करणारच नाही अशा सूचना आपण आपल्या मनाला देतो. आणि मग त्या मागच्या भितीचे समर्थन करण्यासाठी वेगवेगळी कारण देण्याची आपल्याला सवय लागते आणि हळूहळू त्याबाबत लोकांनी सहानुभूती दाखवल्यावर त्याचे रूपांतर वृथा अभिमानात होते आणि त्याबद्दल आपल्याला वाईट पण वाटत नाही.फोबिया किंवा भयगंड ,एन्झायटी नावाचा आजार यातूनच निर्माण होतो. आयुर्वेदामध्ये तर भयाची व्याख्या खूपच सुंदर केली आहे *अपकार अनुसंधानजं दैन्यम्* “| अर्थात पुढे काहीतरी वाईट होईल अशा विचारांमुळे येणारी मनाची दैन्यता.

म्हणजे सतत न जमणाऱ्या गोष्टीबद्दल नकारात्मक स्वसंवाद केल्यामुळे आपल्याला त्याबद्दल भय निर्माण होते. पण अशा पद्धतीने आपण आपले व्यक्तिमत्व निर्माण केले तर न जमणाऱ्या गोष्टींची संख्या वाढत जाते. त्याच्या मुळे आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर त्रासदायक परिणाम होतो.आपल्या क्षमता आपण पूर्ण वापरू शकत नाही. त्याची खंत नंतर सतत राहते .

*आत्मनेव मन्येत कर्तारं सुखदुःखयो:* |

स्वतःच्या सुखदुःखाला आपणच कारण आहोत ज्या अयोग्य गोष्टी आपल्या वर्तनात आहेत, ज्याबद्दल आपल्या मनात भीती निर्माण होते,किंवा आपण बऱ्याच वेळा उपभोगतेच्या बाबतीत मनावर नियंत्रण ठेवू शकत नाही. यामुळे आपल्यावर त्रासदायक परिणामच होतात. यात सुधारणा होण्यासाठी नक्कीच ठरवून प्रयत्न केले पाहिजे त्यासाठी प्रसंगी समुपदेशक किंवा तज्ञ व्यक्ती किंवा योग्य सहकार्याची मदत घेतली पाहिजे.

भीतीला जिंकण्यासाठी आयुर्वेदामध्ये ‘धैर्य’ थेरपी सांगितली आहे एखादी वर्तवणूक आपल्यासाठी त्रासदायक आहे त्यावर निश्चित आपण योजना बद्ध पद्धतीने विजय मिळवू शकतो. कोणताही बदल अचानक होत नाही त्यासाठी रोज थोडा थोडा प्रयत्न केला तर नक्की यश मिळते .

आपण शारीरिक, वाचिक आणि मानसिक कर्म करत असतो शारीरिक न जमणाऱ्या कर्मामध्ये व्यायाम, शिस्त, योजनाबद्ध पद्धतीने अवलंबूनत्व कमी करणे, असे सकारात्मक प्रयत्न उपयोगी ठरतात.उदाहरणार्थ सारखे नख खाण्याची सवय असेल तर बोटांना विशिष्ट चवीचे लेप लावले तर ही सवय बंद होण्यासाठी मदत होते. भार कमी करण्यासाठी व्यायाम आहार नियंत्रण हे जमवावे च लागते.

वाचिक कर्मामध्ये चुकीचे बोलणे,टोचून बोलणे,खोटे बोलणे,इत्यादी सवयी असू शकतात. याचा अत्यंत घातक परिणाम संसारिक,सामाजिक जीवनावर होतो. कदाचित बोलणाऱ्याच्या मनामध्ये असा उद्देश नसू शकेल पण चूक शब्दांची निवड,समोरच्याला लागेल असे बोलणे, सतत तुलना करणारे वाक्य , असमाधान व्यक्त करत रहाणे,अति क्रोध याचे उपद्रवमूल्य प्रचंड असू शकते. त्यामुळे जवळची माणसं दुरावतात.अशा व्यक्तींचा असा बोलण्याचा स्वभाव आहे हे माहीत असून सुद्धा बोललेले रुक्ष शब्द, मन दुखावणारा संवाद आयुष्यभर लक्षात ठेवला जातो.त्यामुळे समोरच्या व्यक्तीला व तत्परिणामी स्वतःला मानसिक त्रास होऊ शकतो.त्यासाठी प्रयत्नपूर्वक आपली बोलण्याची पद्धत, शब्दांची निवड,भावना व्यक्तिकरण पद्धती सुधारावी लागते.मानसिक कर्मामध्ये भीती,रागिष्ट स्वभाव, लोभ, द्वेष,इर्षा,सतत नकारात्मक विचार अशी वर्तवणूक असू शकते.यात जर बदल करायचा असेल तर ध्यान,धारणा, धैर्य,समुपदेशन इत्यादी उपाय फायदेशीर ठरतात. केवळ भीतीमुळे,सवयी मुळे, त्रासदायक आवड जपण्यासाठी बदल न स्वीकारणे हे आपल्यासाठी अत्यंत नुकसान कारक असते. आपल्या चुकांचा अथवा चुकीच्या सवयींचा अभिमान बाळगण्यात काय अर्थ आहे?

अर्थात अशा मनोवृत्तीमध्ये निश्चित बदल होऊ शकतो फक्त आपला कम्फर्ट झोन सोडण्यासाठी प्रयत्न प्रामाणिक हवेत.

मी सो…पा..

वैद्य सोहन पाठक

तद्विद समुपदेशन केंद्र

9822303175

sohan pathakसदरील लेख हा छ. संभाजीनगर येथील प्रथितयश आयुर्वेदिक चिकित्सक  आणि समुपदेशक वैद्य  सोहन पाठक यांच्या फेसबुक पोस्ट वरून त्यांच्या परवानगीने साभार घेतला आहे. 

 


Discover more from Blissful Life

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Blissful Life

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading