Guest Article by Shri V.D.Bhope.
इंग्रजी सिनेमा पाहतांना पकडले …..
( पण कुणी कुणाला ? )
———————
मित्रांनो
साधारणपणे १९६८ सालची गोष्ट आहे. त्यावेळी मी औरंगाबादला(आताचे संभाजीनगर) इंजिनियरींगच्या दुसऱ्या वर्षात शिकत होतो.दोन मित्रांसोबत किरायाची खोली घेऊन उस्मानपुऱ्यात रहात होतो.महिन्यातून एक दोन वेळा सिनेमा पहायला जायचो. त्या काळात विद्यार्थ्यांनी इंग्रजी सिनेमा पाहणे एकदम वर्ज्य समजले जायचे.एकदम शांतम् पापम् ! पापभिरू मंडळींनी इंग्रजी सिनेमा पहायचा नसतो अशी समजूत सर्वसाधारणपणे दृढ होती .
आमच्या घरचे वातावरण तर फारच बाळबोध होते.आम्हा सर्व बहीण भावंडांना आमच्या वडिलांचा फार धाक वाटत होता .त्यांच्या समोर बोलण्याची आमची हिम्मत नसे. त्यांच्याशी सगळं महत्वाचं communication सहसा आईच्या मार्फतच व्हायचं .
आमच्या काळात आपण कांहीही चूक केली नसली तरी वडीलांना भिण्याची पध्दत होती.
तर एका रविवारी आम्ही कांही मित्रांनी गुलजार टाॅकीजमध्ये चालू असलेला एक इंग्रजी सिनेमा पहायला जायचे ठरवले.सगळ्यांचे आई वडील परगावी रहात होते. त्यामुळे ही गोष्ट तशी कुणाच्याही घरी कळण्याची काहीच शक्यता नव्हती.
तर आम्ही कांही मित्र ठरल्या प्रमाणे गुलजार टाॅकीज मध्ये मॅटिनी शो ला जाऊन बसलो. सिनेमा सुरू झाला .त्यातील नट माहित नाहीत, नट्या माहित नाहीत ,त्यांची भाषा कळत नाही, उच्चार नीट समजत नाहीत , पडद्यावर नक्की काय चाललंय हे ही कुणाला समजत नाही तरी पण आसपासचे कुणी हसले तर कांही तरी विनोद झाला असावा असा अंदाज बांधून उरलेले हसतात .आणि सगळ्यांच्या चेहेऱ्यावर एक काॅमन भाव दिसतो.आपल्याला सिनेमातलं कांही कळत नाही हे कुणी ओळखलं तर नाही ना ? अशा अर्थाचा तो ओशाळवाणा भाव असतो. पण अळीमिळी गुपचिळी हेच धोरण सगळे जण अवलंबतात .म्हणजे तेरी भी चूप अन् मेरी भी चूप .असो.
सिनेमा सुरू झाल्या नंतर कांही वेळाने माझ्या एका मित्राने मोठ्ठ्याने ओरडून हाक मारली..ए भोपे , इकडे ये न बे , जागा रिकामी आहे. ‘ मी त्याने दाखवलेल्या जागेवर जाऊन बसलो.टाॅकीज मध्ये अंधारात थोडावेळ बसल्यांनतर कांही वेळाने आसपासचे बऱ्यापैकी दिसू लागते.कांही वेळाने माझ्या लक्षात आले की माझ्या शेजारचे गृहस्थ आमच्या कुटुंबाशी चांगलेच परिचित असलेले एक गृहस्थ होते. आम्ही त्यांना काका म्हणत असू. माझ्या मित्राने मोठ्ठयाने माझ्या नावाने जेव्हां मला हाक मारली तेंव्हाच त्या काकांना समजले होते की मी सिनेमाला आलो म्हणून !
आणि आता तर काय मी त्यांच्या शेजारीच बसलो होतो. ते म्हणाले, अरे विष्णू बैस बैस .आता मात्र मी बेचैन झालो. हे काका पुढे मागे आमच्या गावी आमच्या घरी गेले तर नक्कीच माझी चुगली करतील आणि मग वडिलांनी जाब विचारला तर आपल्यावर काय प्रसंग ओढवेल याची मला काळजी वाटू लागली .
मला ओरडून नावाने हाक मारणाऱ्या मित्राला इंटरव्हल मध्ये चांगलंच झापावं आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे या शेजारच्या काकांना कांहीतरी गयावया करून पुढेमागे गावी गेलात तर प्लीज ही गोष्ट घरी सांगू नका,अशी गळ घालावी असं मी मनात ठरवलं आणि त्यासाठी मनातल्या मनात शब्दांची जुळवाजुळव करू लागलो .
इंटरव्हल झाली . माझ्या त्या मित्राला मी गाठलं आणि म्हणालो ” माझं नाव घेऊन एवढ्या मोठ्ठयाने ओरडायची काय गरज होती रे ? त्या माझ्या शेजारी बसलेल्या काकांना आता कळालंना ! त्यांनी घरी चुगली केली म्हणजे ?”
तेवढ्यात त्या काकांनी मला गाठलं. माझ्या अभ्यासाविषयी जुजबी चौकशी केली. माझ्यासाठी व स्वत:साठी खारे दाणे घेतले. व आर्जवाच्या स्वरात मला म्हणाले,
” माझं एक काम करशील का ?’
मी काम न जाणून न घेताच म्हटले ,
“हो करीन की . त्यात काय एवढं !”
त्यावर काका म्हणाले , “हे बघ तू जर कधी आमच्या घरी आलास ना तर इतर कुठल्याही विषयावर बोल पण हिला म्हणजे तुझ्या काकूला मी इंग्लिश सिनेमा पाहतांना भेटलो होतो हे तिला कधीही सांगू नकोस बाबा. तुझी काकू कशी आहे हे तुला माहीत आहे ना. सगळं घर डोक्यावर घेईल ती हे कळालं तर.’
आता माझी ट्यूब लाईट पेटली. म्हणजे जो प्राॅब्लेम मला होता तोच प्राॅब्लेम या काकांनाही होता तर ! मी उगचंच घाबरलो होतो.
म्हणजे या काकांना इंग्लिश पिक्चर पाहतांना मी पाहिलं हे ही तितकंच खरं होतं की !
अन् त्यांनाच चिंता वाटत होती की मी कुठे ही गोष्ट त्यांच्या घरी सांगतो .
मी म्हणालो , “अहो काका!!
आज आपण भेटलोच नाही आणि इंग्लिश पिक्चर तर पाहिलाच नाही! तेंव्हा कुणी कुणाला कांही सांगण्याचा प्रश्न येतोच कुठे , सांगा बरं !!…”
काका म्हणाले, … शाब्बास . व्हेरी गुड .हुशार आहेस . अळिमिळी गुप चिळी. चल चहा घेऊ यात .
😄😎🤑
Related
Discover more from Blissful Life
Subscribe to get the latest posts sent to your email.