एका वेळची गोष्ट आहे.
एकदा अकबर बादशहा जंगलात शिकारीला गेला. बरोबर पुष्कळ लोक होते. पण दैवयोगाने, अकबर जंगलात कुठे तरी भटकला आणि त्याच्या सोबतचे लोक खूप लांब राहिले.
अकबर बराच पुढे गेल्यावर त्याला एक शेत दिसले. एंव्हाना त्याला खूप भूक आणि तहान लागली होती आणि तो दमला होता. अकबर त्या शेतात पोंचला, आणि त्या शेताचा मालक जो एक अत्यंत गरीब शेतकरी होता, त्याला म्हणाला, “बाबा रे, मी तहानेने आणि भुकेने अगदी व्याकुळ झालो आहे. काही खायला मिळाले, आणि प्यायला थंडगार पाणी मिळाले तर खूप उपकार होतील.” अकबराने त्याला आपण बादशहा आहोत असे काही संगितले नाही. फक्त म्हणाला, “मी राज्याचा माणूस आहे.”
शेतकरी जरी अगदी गरीब होता, पण माणुसकी त्याची जिवंत होती. तो म्हणाला, “ ठीक आहे. आमच्यासाठी तर तुम्ही आमचे मालकच आहात. काही काळजी करू नका.” असे म्हणून शेतकर्याने राजाला थंड पाणी दिले, शेतात असलेल्या ऊसाचा थंडगार रस दिला, आणि आपल्याजवळच्या गाठोड्यातील भाकरीही दिली. नंतर त्याने झाडाखाली खाटेवर चादर अंथरुन राजाला थोडा आराम करायची विनंती केली. राजा अगदी खुष झाला. त्याला शेतकर्याने दिलेल्या वस्तू अमृतासमान वाटल्या.
बादशहा जेंव्हा जायला निघाला, तेंव्हा शेतकर्याला म्हणाला, “तुला जर काही काम पडले तर दिल्लीला जरूर ये, आणि मला भेट. माझे नांव अकबर आहे. दिल्लीला आल्यावर कोणालाही विचार.”
“नाही तर थांब, तुझ्याजवळ कागद आणि कलम असेल तर आण. मी तुला लिहून देतो.”
आता शेतात कुठला कागद आणि कुठली कलम! तो शेतकरी बिचारा अनपढ होता. त्याच्या शेतात एक फुटलेला मातीचा घडा होता. तो त्याने बादशहासमोर ठेवला, आणि कुठून तरी एक पांढरा चुनखडीचा तुकडा घेऊन आला, आणि बादशहासमोर ठेवला. बादशहाने त्या घड्याच्या तुकड्यावर आपले नाव लिहिले आणि सही केली. “मला भेतायला येशील तेंव्हा हे घेऊन ये” म्हणून संगितले. शेतकरी हो म्हणाला, आणि तो लिहिलेला तुकडा आपल्या झोपडीत ठेवून दिला.
तो तुकडा तिथे बरेच वर्ष पडून राहिला. मग एके वर्षी खूप दुष्काळ पडला, शेती अजिबात पिकली नाही, गुरढोरांना प्यायला पाणीही मिळेना. त्यावेळी त्या शेतकर्याच्या बायकोला ही घटना आठवली, आणि ती शेतकर्याला म्हणली, “तो दिल्लीचा कोणी माणूस आला होता ना? त्याच्याकडे एकदा जाऊन तरी पहा. काही मदत मिळते का ते?”
पत्नीने वारंवार म्हटल्यावर शेतकरी तो घड्याचा तुकडा घेऊन दिल्लीला पोंचला.
दिल्लीला गेल्यावर रस्त्याने त्याने लोकांना विचारले, “अकबरीये का घर कौन-सा है?” बादशहा अकबराचे नांव ऐकून, काही लोकांनी त्याला राजवाड्याचा रस्ता दाखविला. तिथे गेल्यावर तो शेतकरी म्हणतो,
“अकबरीये का घर यही है कया?”
द्वारपालांनी रागावून म्हटले, “कोण आहेस तू? बोलायची काही अक्कल आहे का नाही?”
तो शेतकरी तर आपल्या गावरान भाषेत बोलला होता. त्याने आपल्या जवळील तो घड्याचा तुकडा दाखविला, आणि संगितले, “जाऊन त्याला सांगा, एक जण तुला भेटायला आला आहे.”
बादशहाची सही बघून द्वारपाल चक्रावून गेला. त्याने बादशहाला जाऊन संगितले, “महाराज, एक ग्रामीण आपणास भेटायला आला आहे. बोलण्याची अजिबात अक्कल नाही. पण त्याने हा घड्याचा तुकडा दिला आहे.”
तो तुकडा पाहिल्यावर अकबराला तो सर्व प्रसंग आठवला,आणि तो म्हणाला, “जा, घेऊन या त्याला.”
खेडूत आत आला. बादशहाला उंच सिंहासनावर बसलेला पाहून तो म्हणाला, “ओ अकबरीये! तू तो बहुत ऊंचा बैठा है!”
बादशहा त्याला म्हणाला, “आओ भाई! बैठो!”
असे म्हणून बादशहाने त्याला बसवले, आणि म्हणाला, “तू थोडा वेळ बैस. माझ्या नमाजचा समय झाला आहे. मी नमाज पढून घेतो.”
आता शेतकरी पाहतो तो बादशहाने एक कापड अंथरले, त्यावर बसतो आहे, उठतो आहे, अजून काय काय करतो आहे. अकबराचे नमाज पढून झाल्यावर शेतकऱ्याने विचारले, “हे तू काय करीत होतास?”
बादशहा म्हणाला, “परवरदिगार परमेश्वराची बंदगी करत होतो.”
शेतकरी म्हणाला, “मला समजले नाही”
त्यावर बादशहा म्हणाला, “तो ईश्वर आहे ना? सर्वशक्तिमान? त्याची हाजरी भरत होतो.”
“किती वेळा करतो?”
“दिवसातून पाच वेळा”
“पाच वेळा, उठतो, बसतो, हे सर्व करतो? का?”
“ज्याने हे सर्व वैभव दिले आहे, त्याची हाजरी भरतो.”
शेतकरी म्हणाला, “ मी तर एकदाही हाजरी भरत नाही, तरीही त्याने मला सर्व काही दिले आहे आणि देतो आहे. तुला पाच वेळा हाजरी भरावी लागते? अच्छा, जय रामजी की! मी चाललो.”
तेंव्हा बादशहाने विचारले, “का आला होतास?”
“माझ्या पत्नीने सांगितले, की दिल्लीला जाऊन भेटून ये, इथे आल्यावर दिसले, तुला स्वतःला पाच वेळा नमाज पढावा लागतो. जेंव्हा तुलाच तो परमात्मा देतो, तर मी तुझ्याजवळ काय मागू?”
“अरे बाबा, तुला पाहिजे असेल ते माग!”
“नाही, तुला एवढ्या मुश्किलीने जे मिळते, ते मी मोफतमध्ये कसे घेऊ?”
असे म्हणून शेतकरी तिथून तडक निघाला, आणि घरी आला.
घरी आल्यावर बायकोने विचारले, “काय झाले? त्या दिल्लीच्या माणसाने काही मदत केली का?”
शेतकरी म्हणाला, “आपल्या देवाची आठवण करूयात, तोच सगळ्यांना सगळे देतो. आता त्या राज्याच्या माणसाला काय मागायचे, जो की स्वतःच मागून खातो? म्हणून देवावर भरवसा ठेवूयात, त्याचे नांव घेऊयात, बस्स!”
इकडे काही चोर चोरी करायला निघाले होते. ते चोर त्या शेतकऱ्याच्या घराबाहेर लपून हे सर्व संभाषण ऐकत होते.
बायको म्हणत होती, “दिल्लीला गेले आणि काही आणले नाही.” शेतकरी तिला समजावत होता. त्यावर ती वैतागून म्हणत होती, काही कमवून तरी आणायचे. त्यावर शेतकरी म्हणाला, “आता तर तो सर्व शक्तिमान भगवान देईल तेंव्हाच घेऊ. मी तर सर्व त्याच्यावर सोडले आहे.”
“अहो देवावर सोडले आहे ते ठीक आहे, पण काही कामधंदा तर करा!”
“कामधंदा न करता ही धन मिळते, पण मी ते घेत नाही. आता तर ठाकूरजीची मर्जी असेल तर ते घरबसल्या देतील. काही चिंता करू नकोस, पाऊस येईल, शेती पिकेल, सर्व काही ठीक होईल. मी आता देवावर पूर्ण भरोसा ठेवला आहे. देवाचे देण्याचे खूप मार्ग आहेत. आणि त्याने मनात आणले तर तो छप्पर फाडून ही देतो!”
“ऐक. आजचीच गोष्ट तुला सांगतो. मी नदीवर गेलो होतो. नदीला पूर आला होता. किनारा दिसत नव्हता. मी तिथे हात धुवायला गेलो, तेंव्हा तिथे मला एक भांडे दिसले. ते आधी वाळूत गाडलेले असावे, पण पावसामुळे उघडे पडले असावे. मी जवळ जाऊन पाहिले तर एक झाकण लावलेला एक गडू होता. मी झाकण उघडून पाहिले, तर आत खूप सोने, नाणे भरलेले दिसले. पण मी विचार केला, की हे आपले नाही, आपल्याला नको. परमेश्वर स्वतः देईल तेंव्हा घेऊ!. मी त्याचे झाकण लाऊन ठेवले आणि वापस आलो.
बायकोने त्याला विचारले, “कुठे? कोणत्या जागी?”
तर शेतकऱ्याने तिला सांगितले, अशा अशा एका जागी, एक असे असे झाड आहे, त्याच्या बाजूला.
इकडे चोर त्यांचे हे सर्व बोलणे ऐकत होते. चोरांनी विचार केला, “हा शेतकरी तर पागल आहे! असे सहजासहजी मिळालेले धन कोणी सोडते का? आपण तर तिकडेच जाऊ! इतर कुठे चोरी करायला गेलो तर पकडले जाण्याची भीती! त्यापेक्षा हा फुकटचा माल घेऊ!”
असा विचार करून चोर त्या ठिकाणी गेले. पत्ता त्यांनी ऐकला होताच. आता त्या शेतकऱ्याकडून त्या गडूचे झाकण लावतांना चूक झाली होती, आणि झाकण काही पक्के लागले नव्हते. थोडेसे उघडे राहिले होते. त्या उघड्या राहिलेल्या जागेतून एक साप त्याच्या आत जाऊन बसला होता. चोरांनी ते झाकण उघडताच, सापाने जोरात फूत्कार मारला. तेंव्हा घाबरून चोरांनी झाकण जोरात बंद करून टाकले.
चोरांनी आता असा विचार केला, की नक्कीच त्या शेतकऱ्याने आपल्याला पाहिले असेल, आणि आपल्याला मारण्यासाठीच त्याने ही खोटी कहाणी बनवून आपल्या बायकोला सांगितली असेल. या गडूच्या आत न जाणो कितीतरी विषारी साप आणि विंचू भरलेले असतील. आता एक काम करू. त्या शेतकऱ्याला अद्दल घडवण्यासाठी हा गडू त्याच्याच घरात जाऊन उपडा करून देऊ, म्हणजे ते सर्व साप विंचू त्यालाच चावतील!
असा विचार करून, त्या गडूच्या तोंडाला एक फडके बांधून, ते शेतकऱ्याच्या घराकडे गेले. शेतकरी आणि त्याची बायको झोपले होते. चोरांनी घराचे छप्पर फाडून, त्यातून तो गडू उपडा केला आणि पळून गेले. इकडे तो गडू पडल्यानंतर पहिल्यांदा तो साप खाली पडला, आणि त्याच्यावर ते सर्व दागिने, मोहरा, वगैरे आणि नंतर तो जड असलेला गडू त्या सापावर जोरात पडला आणि साप त्याखाली दाबून मरून गेला.
त्या सर्व आवाजाने शेतकरी नवरा बायको जागे होऊन पाहतात, तर साप मरून पडलेला, आणि सर्व घरात सोने नाणे आणि दागिने विखुरलेले!
भगवान देता है तो छप्पर फाडके! ही म्हण खऱ्या अर्थाने सार्थ झाली.!
वरील गोष्ट अर्थात, काल्पनिक आहे, आणि देवावर श्रद्धा ठेवली तर देव कश्याही प्रकारे पालन पोषण करतोच, हे दाखवण्यासाठी फक्त तेवढे उदाहरण दिले आहे. यात, अकर्मण्यतेची भलावण करण्याचा, गोष्ट सांगणाऱ्याचा अजिबात हेतू नाही. त्यामुळे गोष्टीतील उदाहरण फक्त तेवढ्यापुरतेच आहे हे लक्षात घ्यावे. वरील गोष्ट ही स्वामी रामसुखदासजी यांनी, आपल्या प्रवचनात, एक उदाहरण म्हणून सांगितली आहे.
Related
Discover more from Blissful Life
Subscribe to get the latest posts sent to your email.