Madhav Bhope
Tough to say TATA to such a Ratan!
कदाचित हे सोशल मेडिया वरचे आतापर्यंतचे एकमेव उदाहरण असावे, जेंव्हा की एका उद्योगपतीला भारतातल्या प्रत्येक whatsapp ग्रुपमध्ये भारतातल्या घराघरातून श्रद्धांजली वाहिली गेली, जणू आपल्या कुटुंबातीलच एक व्यक्ति गेली असे वाटण्याइतपत प्रत्येकाने त्यांना श्रद्धांजली वाहिली. अगदी फॅमिली ग्रुप्स मध्येही, रतन टाटांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला गेला. असे अजातशत्रू होते रतन टाटा!
त्याचे एकमेव कारण म्हणजे माणूस म्हणून रतन टाटा हे एक अत्यंत साधे, निगर्वी, पण त्याचबरोबर उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते.
अत्यंत साध्या परिस्थितीतून, आपल्या कर्तृत्त्वाने आभाळएवढी उंची गाठणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे रतन टाटा होते.
ते एका प्रकारे एक तत्त्वचिंतक ही होते. आज त्यांच्या स्मृति जागवतांना त्यांचे काही प्रसिद्ध quotes या निमित्ताने येथे देत आहोत. मला सगळ्यात आवडणारा त्यांचा quote म्हणजे “Don’t take life so seriously” हा खाली देत आहे.
Perhaps this is the only example of a businessman, whose departure is being mourned in every household across India, in all political social groups irrespective of their ideologies and affiliation, Even family whatsapp groups in India saw the sad news of his death posted in the morning as if someone from their family had passed away. Ratan Tata was such a great human being!
A man with no enemies.
The only reason for this is that Ratan Tata as a human being was a very simple and humble, but at the same time, an outstanding personality as a prudent businessman.
Ratan Tata was a man who rose skyhigh with his achievements from a very humble background.
He was also, in a way, a philosopher. Here are some of his famous quotes to commemorate him today. One of my favorite quotes is “Don’t take life so seriously” below.
इतरही त्यांचे सुप्रसिद्ध quotes
खाली देत आहे.
- “I don’t believe in taking right decisions. I take decisions and then make them right.”
- “None can destroy iron, but its own rust can. Likewise, none can destroy a person, but their own mindset can.”
- “Power and wealth are not two of my main stakes.”
- “The biggest risk is not taking any risk. In a world that is changing quickly, the only strategy that is guaranteed to fail is not taking risks.”
- “The best leaders are those most interested in surrounding themselves with assistants and associates smarter than they are.”
- “Never underestimate the power of kindness, empathy, and compassion in your interactions with others.”
- “Leadership is about taking responsibility, not making excuses.”
- “Don’t wait for opportunities to come to you, create your own opportunities.”
- “If you want to walk fast, walk alone. But if you want to walk far, walk together.”
- “I don’t believe in work-life balance. I believe in work-life integration. Make your work and life meaningful and fulfilling, and they will complement each other.”
Ratan Tata's Last speech goes viral
Navdurga Upasana नवदुर्गा उपासना
नवरात्र म्हणजे शक्तीची उपासना
Navdurga Upasana
हिंदू धर्मातील बहुतेक सर्व सण आणि व्रतें ही निसर्ग चक्राशी जोडली गेलेली आहेत असे दिसते. पावसाळ्याचे चार महिने (जून ते ऑक्टोबर) वातावरणातील ओल, दमटपणा, सूर्यदर्शनाचा अभाव, त्यामुळे होणारी रोगजंतूंची वाढ, इत्यादींपासून बचाव करण्याच्या दृष्टीने, चातुर्मासाच्या निमित्ताने वेगवेगळ्या व्रतांची आणि उपवासांची योजना केलेली असल्यामुळे या काळात आपोआपच आरोग्याची काळजी घेतली जाते. चातुर्मासातील शेवटचा एक महिना, म्हणजे आश्विन महिना (साधारण ऑक्टोबर महिना सुरू झाल्यामुळे ऑक्टोबर हीट जेंव्हा सुरू झालेली असते), हा शरद ऋतू आणि हेमंत ऋतू यातील संधिकाल असतो. शरद ऋतू हा आरोग्याच्या दृष्टीने तसाही प्रतिकूल मानला गेला आहे. आणि त्यात भाद्रपद महिना संपल्यावर, आश्विन महिना लागतो तेंव्हा शरद ऋतू संपून हेमंत ऋतू सुरू होण्याचा काल, म्हणजे ऋतुसंधी, त्यामुळे या काळात आरोग्याची जास्त काळजी घेणे, आणि पुढे येणाऱ्या अनुकूल काळासाठी म्हणजेच हिवाळ्यासाठी शरीराला तयार करणे, या दृष्टीने दुर्गादेवीच्या नवरात्री व्रताची योजना असावी असे वाटते. या काळात, उपवास करून, ब्रह्मचर्य पालन करून, व्रतस्थ आणि संयमाने राहून, शरीर आणि मन दोन्हींना शुद्ध करून पुढे येणाऱ्या काळात शक्तिसंचय करण्यास तयार केले जाते असे दिसते. म्हणजेच शक्तीची उपासना करायला सुरूवात या काळापासून होते.
हिंदू धर्मातील सर्व देव, देवी आणि देवता हे, क्वचित काही अपवाद वगळता, शस्त्रधारी आहेत. निसर्गातील प्रत्येक शक्तीचे, शक्तीच्या प्रत्येक रूपाचे, व्यक्तिकरण (personification) केले गेले आहे. तसेच देवीच्या विविध रूपांत शक्तीच्या विविध रूपांचे व्यक्तीकरण केले आहे.
आजपासून सुरू होणारे देवीचे नवरात्र हे म्हणूनच, शक्तीची उपासना आहे.
नवरात्रामध्ये देवीच्या, म्हणजेच शक्तीच्या नऊ रूपांची नवदुर्गांच्या रूपात उपासना केली जाते. जाणून घेऊयात कोणत्या आहेत नवदुर्गा
दुर्गा सप्तशती ग्रंथांतर्गत देवी कवच स्तोत्रातील पुढील श्लोकांमध्ये अनुक्रमे नवदुर्गां ची नावे दिली आहेत –
प्रथमं शैलपुत्री च द्वितीयं
ब्रह्मचारिणी।
तृतीयं चन्द्रघण्टेति कूष्माण्डेति चतुर्थकम् ।।
पंचमं स्कन्दमातेति षष्ठं कात्यायनीति च।
सप्तमं कालरात्रीति महागौरीति चाष्टमम् ।।
नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गा: प्रकीर्तिता:।
उक्तान्येतानि नामानि ब्रह्मणैव महात्मना ।।
शैलपुत्री
दुर्गादेवी तिच्या पहिल्या रूपात ‘शैलपुत्री’ म्हणून ओळखली जाते. ती नवदुर्गांपैकी पहिली दुर्गा आहे. तिला ‘शैलपुत्री’ हे नाव पडले कारण तिचा जन्म पर्वतराज हिमालयाच्या घरात झाला होता. (शैल म्हणजे पर्वत). नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तिची पूजा केली जाते. तिचे वाहन वृषभ आहे, म्हणून तिला वृषारूढा असेही म्हणतात. या देवीच्या उजव्या हातात त्रिशूळ आहे आणि डाव्या हातात कमळ आहे. काही ठिकाणी तिच्या डाव्या हातात डमरू आहे असेही सांगितले जाते. तिला सती असेही म्हणतात.
शैलपुत्रीची कहाणी
एकदा सतीचे वडील प्रजापती दक्ष यांनी यज्ञ केला तेव्हा त्यांनी सर्व देवांना आमंत्रित केले, परंतु त्यांचे जावई भगवान शंकर यांना बोलावले नाही. सती आपल्या वडिलांच्या यज्ञाला जायला उत्सुक होती. शंकरांनी सतीला समजावले की बोलावणे नसतांना जाणे योग्य नाही. पण सतीचे समाधान झाले नाही. सतीचा हट्ट पाहून शंकरांनी तिला यज्ञाला जाण्याची परवानगी दिली.
सती दक्ष प्रजापतींकडे पोहोचल्यावर तिची उपेक्षा झाली. दक्षाने शंकरांबद्दल अपमानास्पद शब्दही बोलले. यामुळे सतीला खूप राग आला, पतीचा हा अपमान तिला सहन झाला नाही आणि तिने यज्ञकुंडात योगाग्नीद्वारे स्वतःला जाळून घेतले.
शंकरांना हे कळल्यावर ते भयंकर रागावले, आणि आपल्या जटांपासून त्यांनी वीरभद्राची निर्मिती केली आणि दक्ष प्रजापतीच्या यज्ञाचा नाश करण्यासाठी त्याला हजारो गणांसह पाठवले. त्यांनी त्या यज्ञाचा नाश केला. हीच सती पुढील जन्मी शैलराज हिमालयाची कन्या म्हणून जन्मली आणि तिला शैलपुत्री म्हटले गेले. शैलपुत्री पार्वतीजींच्या कठोर तपश्चर्येनंतर, लोककल्याणाच्या भावनेने तिचा भगवान शंकराशी पुन्हा विवाह झाला.
नवदुर्गांपैकी पहिली आणि सर्वात प्रमुख, शैलपुत्रीला खूप महत्त्व आहे आणि तिचे वैभव अनंत आहे. नवरात्राच्या पहिल्या दिवशी तिची पूजा केली जाते. या दिवशी, साधकाने मूलाधारावर आपले मन एकाग्र ठेवावे. हा त्यांच्या आध्यात्मिक अनुशासनाचा प्रारंभ बिंदू आहे. या दिवशी जप करावयाचा मंत्र: ओम शैलपुत्रये नमः.
या दिवशी श्री दुर्गा सप्तशतीच्या पहिल्या अध्यायाचे पठण करावे.
नवदुर्गा मधील इतर नावांविषयी जाणून घेऊयात यापुढील लेखांत त्यासाठी दररोज पुढील लेख नक्की वाचा
********* माधव भोपे*********
Avoid these vegetables in Rainy Season
[web_stories_embed url=”https://goodworld.in/web-stories/avoid-these-vegetables-in-rainy-season/” title=”Avoid these vegetables in Rainy Season” poster=”https://goodworld.in/wp-content/uploads/2024/09/cropped-images-50.jpeg” width=”360″ height=”600″ align=”none”]
Remembering our forefathers and ancestors पितृ पक्ष- कृतज्ञतेचा पंधरवडा
पितृपक्ष- कृतज्ञतेचा पंधरवडा
Remembering our forefathers and ancestors
हा लेख बराच मोठा असला, तरी जिज्ञासूंनी आणि धर्मशास्त्रात विश्वास असणाऱ्यांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचावा अशी विनंती आहे.
माधव भोपे
कृतज्ञता
भारतीय संस्कृतीचा सगळ्यात सुंदर पैलू म्हणजे कृतज्ञता. आपल्या जगण्याला, आपल्या अस्तित्वाला ज्या व्यक्ति, प्राणी, निसर्गातील घटक प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे सहाय्यभूत होतात, त्या सर्वांच्या प्रति कृतज्ञतेचा भाव असणे, आणि तो व्यक्त करणे, त्यांची थोड्या तरी प्रमाणात परतफेड करणे, हे भारतीय संस्कृतीचे मूलभूत अंग राहिले आहे. निसर्गापासूनही ओरबाडून घेणे हे आपल्या संस्कृतीत कधीच मान्य नव्हते. निसर्गापासून काही घेतले, तर त्याला तेवढे परतही करायचे असे संस्कार आपल्याला ठायी ठायी आढळतात. पूर्वी एखादा वाटसरू आपली तहान भागवण्यासाठी एखाद्या सरोवरापाशी गेला, त्यातून ओंजळभर पाणी प्याला, तर त्या सरोवरातून मूठभर माती किंवा गाळ काढून बाजूला टाकावा असे शास्त्र होते. सरोवरात गाळ साचून ते भरून जाऊ नये ही प्रत्येकाचीच जबाबदारी आहे, आणि आपण जेंव्हा त्याचे पाणी पितो, तेंव्हा सरोवराने आपल्याला दिलेल्या पाण्याच्या बदल्यात, त्याच्या उपकाराची परतफेड म्हणून आणि सामाजिक जाणीव म्हणून एक मूठ गाळ काढून बाजूला टाकायचा.
वैद्य लोक जेंव्हा औषधांसाठी वनस्पतींची पानें, फुलें किंवा इतर भाग तोडीत, तेंव्हा त्या वनस्पतीची प्रार्थना करीत, क्षमा मागीत, नंतर ती वनस्पती तोडीत. आणि पाहिजे तेवढीच तोडत.
आपली संस्कृति
सकाळी उठून जमिनीवर पाय ठेवण्याच्या आधी ‘विष्णुपत्नी नमस्त्युब्धम् पादस्पर्शं क्षमस्व मे’ असे म्हणून त्या धरित्री मातेची, तिच्यावर पाय ठेवण्याबद्दल क्षमा मागून मगच तिच्यावर पाय ठेवण्याची आपली संस्कृति आहे.
दररोज सकाळी उठून स्नान करून सूर्याला ‘श्री सूर्याय इदं अर्घ्यं दत्तं न मम’ असे म्हणून अर्घ्य देणे हा त्याच संस्कृतीचा उदात्त पैलू आहे. भोजन करण्याआधी केला जाणारा वैश्वदेव हा सुद्धा निसर्गातील सर्व घटकांच्या प्रति व्यक्त केला जाणारा कृतज्ञता भावच आहे. खरं तर सगळीकडेच परतफेड करतांना, ‘न मम’- हे माझे नाही, तर तुझेच तुला अर्पण करतो आहे हा भाव आपल्या संस्कृतीत रूजला आहे. गंगा पूजन, सूर्यनमस्कार, अशा अजून कितीतरी प्रथा सांगता येतील, ज्या आपल्या संस्कृतीच्या कृतज्ञतेचा भाव अधोरेखित करतात.
आपले सगळे सण तर या कृतज्ञतेच्या भावनेचे मूर्तिमंत प्रतीक आहेत. बैल पोळा असो, नागपंचमी असो, हे सर्व सण, त्या त्या प्राणीमात्रांप्रति कृतज्ञतेचा भाव व्यक्त करणारे आहेत.
मग ज्यांनी आपल्याला प्रत्यक्ष जन्म दिला, ज्यांच्या शरीरापासून आपले शरीर बनले, एका असहाय्य मांसाच्या गोळ्यापासून ज्यांनी आपल्याला एक परिपूर्ण माणूस बनविले, त्या आई वडिलांच्या प्रति तर आपली संस्कृति सर्वोच्च कृतज्ञता भाव शिकविते यात काही नवल नाही. ‘मातृ देवो भव, पितृ देवो भव, आचार्य देवो भव’ ही शिकवण लहानपणापासून देणारी आपली संस्कृति आहे. आई वडील, त्यांचे आई वडील, त्यांच्या आई वडिलांचे आई वडील यांचेही आपल्यावर अनंत उपकार असतात. आपले भाऊ, बहिणी, चुलते, मामे, गुरू, शिष्य, सगळ्यांचे आपल्यावर अनंत उपकार असतात. आई वडील हयात असतांना तर त्यांना देवाचा दर्जा असतोच, पण ते गेल्याच्या पश्चातही त्यांच्या उपकाराचे आपण हयात असेपर्यन्त स्मरण ठेवायचे असते.
Remembering our forefathers and ancestors
काही काही लोक ‘ आमच्या आईवडिलांनी आमच्यासाठी काहीच केले नाही, ते असेच होते, तसेच होते’, असे जेंव्हा म्हणतात तेंव्हा वाईट वाटते. आई वडिलांमुळे हे शरीर मिळाले हाच त्यांचा सगळ्यात मोठा उपकार असतो. भलेही त्यांचा उद्देश काही असो. पण त्यांच्यामुळेच हे शरीर मिळाले, लहानपणी आपल्याला जिवंत ठेवण्यात त्यांचाच सहभाग होता, एवढे तर कमीतकमी मानावेच लागते. ईश्वर प्राप्तीचे साधन म्हणून मनुष्य शरीराचे महत्व ज्याला समजले, तोच हे समजू शकतो. ईश्वर प्राप्ति फक्त मनुष्य शरीरातच होऊ शकते.
तर जे आता हयात नसतील, अशा आपल्या पूर्वजांचे स्मरण करण्यासाठी, त्यांच्या विषयी आदर भाव व्यक्त करण्यासाठी भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील पंधरा दिवस हे आपल्या संस्कृतीत राखीव ठेवले आहेत. शरीर नष्ट झाल्यानंतर सर्व संपते असे आपली संस्कृति कधीच मानत नाही. एका शरीरातून दुसऱ्या शरीराकडे, एका योनीतून दुसऱ्या योनिकडे असा हा प्रवास, माणसाला आत्मबोध होईपर्यंत चालू राहतो.
शरीरं यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः ।
गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानिवाशयात्- गीता ॥ १५-८ ॥
शरीर सोडल्यानंतर, वारा वासाच्या वस्तूतून वास घेऊन स्वतःबरोबर नेतो, तसाच देहादिकांचा स्वामी जीवात्माही ज्या शरीराचा त्याग करतो, त्या शरीरातून मनसहित इंद्रिये बरोबर घेऊन नवीन मिळणाऱ्या शरीरात जातो. ॥ १५-८ ॥
पण एक शरीर सोडल्यानंतर, दुसरे शरीर धारण करीपर्यंत किती काळ लागू शकतो हे कोणीच सांगू शकत नाही. त्या मधल्या काळात त्यांचे अस्तित्व ‘पितृ’ योनीत असते. आणि असे मानले गेले आहे की माणसांचे (किंवा पृथ्वीवरील) एक वर्ष म्हणजे पितृलोकातील एक दिवस असतो. पितृ योनि मध्ये आपल्यासारखा भौतिक आहार नसतो, तर पितर हे नुसत्या वासाने, आणि भावनेने तृप्त होतात असे सांगितले आहे. अशा या आपल्या, पितृ योनीत असणाऱ्या पूर्वजांना, त्यांचा पुढील प्रवास सुखकर व्हावा म्हणून त्यांच्या प्रति कृतज्ञ भावनेने, संकल्प करून घातलेले भोजन, म्हणजे महालय श्राद्ध होय.
इथे संकल्पाला खूप जास्त महत्त्व आहे. आपण पितरांच्या नावाने नुसतेच कुणाला खाऊ घातले, तर त्याचा काही उपयोग नाही. दररोजच्या देवपूजेत असो, किंवा इतर कुठल्याही धार्मिक कार्यात असो, खालील गोष्टींचा उच्चार नक्की करावा लागतो. प्रथम सगळे देश, काल यांचे coordinates define करायचे- म्हणजे- अद्य ब्रह्मणो द्वितीये परार्धे, विष्णुपदे, श्री श्वेतवाराह कल्पे, वैवस्वत मन्वंतरे, कलियुगे, कली प्रथम चरणे, भरतवर्षे, भरत खंडे, जंबुद्वीपे, दंडकारण्ये देशे, गोदावर्या: उत्तरे तीरे, शालिवाहन शके, क्रोधी नाम संवत्सरे, दक्षिणायने, शरद ऋतौ, भाद्रपद मासे, कृष्ण पक्षे, अद्य अमुक तिथौ अमुक वासरे अमुक दिवस नक्षत्रे, अमुक योगे, अमुक करणे, वर्तमाने चंद्रे अमुक स्थिते, श्री सूर्ये अमुकस्थिते, देवगुरौ अमुकस्थिते, शेषेशु ग्रहेशु, यथा यथं राशीस्थान स्थितेशु सत्सु शुभनाम योगे शुभ करणे,एवम गुण विशेषण विशिष्टायां शुभ पुण्यातिथौ मम- अमुक गोत्रोत्पन्न अमुक शर्मणां आत्मना: श्रुति स्मृति पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम- यथा ज्ञानेन यथा मिलितोपचार द्रव्य्ये: अमुक अमुक कार्यं ब्राह्मण द्वारा करिष्ये-
याच्यात- सध्या कुठले परार्ध चालू आहे, कुठला कल्प चालू आहे, कुठले मन्वंतर चालू आहे, कुठले युग चालू आहे, त्याचे कुठले चरण चालू आहे- या सर्वांमध्ये –‘काला’ ची व्याख्या केली. नंतर कुठला भाग, कुठला खंड, कुठले द्वीप, कुठले अरण्य, नंतर कुठल्या नदीच्या कुठल्या बाजूला (दिशेला) राहून हे कार्य करीत आहे, यात ‘देशा’ ची व्याख्या केली. नंतर पुन्हा, कालाची अजून विस्तृत व्याख्या करण्यासाठी- कुठले शक चालू आहे, कुठले संवत्सर चालू आहे, त्यातील कुठले अयन (दक्षिणायन/ उत्तरायण), कुठला ऋतु, कुठला महिना, त्यातील कुठला पक्ष- (शुक्ल अथवा कृष्ण), कुठला वार, आणि कुठली तिथी चालू आहे- यात कालाचे अधिक नेमकेपणाने वर्णन केले आहे. नंतर आकाशस्थ ग्रहांची सध्याची परिस्थिति- जसे सूर्य, चंद्र, गुरू या ग्रहांची स्थिती कुठल्या नक्षत्रात आहे- इतके सगळे co-ordinates वर्णन करून मग आपण कोण आहोत, कुठल्या गोत्रातील आहोत,यांचे वर्णन करून, नंतर आपण कुठले कर्म करू जाणार आहोत, त्याचा उद्देश काय, कुणाच्या द्वारे करणार आहोत- इतके सगळे डिटेल्स उच्चार करून मग ते कर्म सुरू करायचे असते.
याची तुलना आपण आजकालच्या कायद्याच्या भाषेशी करू शकतो. कायद्यातही प्रत्येक गोष्टीची व्याख्या करावी लागते- आपण आपल्याला मिळालेल्या कोणत्या अधिकाराअंतर्गत आपण हे कार्य करीत आहोत तो सांगावे लागते- तेंव्हाच ते कार्य किंवा ती आज्ञा कायदेशीर होते.
इतके डिटेल्स आणि इतके नेमकेपण मला नाही वाटत अन्य कुठल्या धर्मात असेल.
तर एवढे सगळे डिटेल्स देऊन नंतर ते कर्म शास्त्रात सांगितल्याप्रमाणे केले, तरच ते आपल्या पितरांना पोंचते. पण एवढे सगळे करणे ज्यांना शक्य नसेल, त्यांच्यासाठीही शास्त्रात पद्धती सांगितलेल्या आहेत. पण आजकाल, आम्ही आमच्या पितरांच्या पुण्यतिथीला कुठे आश्रमाला दान देतो, भिकाऱ्यांना खाऊ घालतो, भावगीतांचा कार्यक्रम करतो, अनाथाश्रमात दान देतो, असे जे आधुनिकपणाच्या नावाखाली करतात, त्याचा आपल्या पितरांना काहीही उपयोग होत नाही. वरील सर्व कामे चांगली आहेत. निश्चितच चांगली आहेत. ती आपल्याला शक्य असेल तेंव्हा नक्कीच करावी. पण पितरांच्या नांवे, आणि श्राद्धकर्माच्या ‘ऐवजी’ नक्कीच नाही. सविस्तर श्राद्ध कर्म शक्य नसेल तर त्याचे अनेक सोपे पर्याय हे शास्त्रातच सांगितले आहेत, जसे की हिरण्य श्राद्ध, आमान्न श्राद्ध, आणि काहीच शक्य नसले (खरोखरच), तर घरापासून लांब जाऊन दक्षिण दिशेला तोंड करून , दोन्ही हात वर करून पितरांना हे सांगणे, की माझी इच्छा आहे पण मी करू शकत नाही- आणि चक्क दोन्ही हात तोंडावर नेऊन ‘बोंब’ मारणे-हाही शेवटचा उपाय शास्त्रात सांगितला आहे. त्यामुळे आपल्या मनाला वाटेल तसे न करता, शास्त्रात सांगितले ते केले तरच ते फलदायी होऊ शकते. यात मुख्य महत्त्व हे भावनेला आहे.
पितरांना अन्न कसे पोंचते?
आता नवविचार लोकांकडून व्यक्त केले जातात की माणूस गेल्यानंतर त्याला दुसरा जन्म मिळतो. एखाद्याला मुक्ती मिळते तर दुसरा जन्म कुठला मिळाला आहे सांगता येणार नाही. आम्ही सर्वांनाच अन्नोदक देतो. पिंडही अन्नाचेच असतात. पण त्याला सापाचा जन्म मिळाला असेल, एखाद्याला कृमी-कीटकाचा मिळाला असेल त्यांना अन्न चालणार नाही. पण विधात्याने त्याचीही व्यवस्था केलेली आहे. त्यांच्या मदतीला वसू, रुद्र, आदित्य, अर्यमा, देवता त्यांना दिलेले अन्न त्यांच्या त्यांच्या खाद्य पदार्थांत रूपांतर करून देण्याचे कार्य करतात. काहींना अमृत रूपाने, काहींना गवतरूपाने, काहींना वायुरूपाने ते देतात. उदाहरण म्हणून सांगायचे झाल्यास जसे दुसर्या राष्ट्रात राहणार्या आपल्या नातेवाइकाला आम्हाला पैसे पाठवायचे असतील तर आपण बँकेमध्ये रक्कम भरतो. ती रक्कम त्या माणसाला त्या राष्ट्रातल्या चलनात मिळते किंवा तिकडून इकडे रक्कम पाठवायची असेल तर तिकडे बँकेतून भरलेली रक्कम आमच्या चलनामध्ये आम्हाला मिळते. त्याप्रमाणे ही व्यवस्था आहे. आणि आपल्या पितरांना जर मुक्ति मिळाली असेल, तर ते अन्न किंवा त्याचे फळ हे आपल्यालाच मिळते, जसे की एखाद्याला मनीऑर्डर पाठविली, ती व्यक्ति तिथे नसेल तर पाठवणाऱ्याला परत येते, तद्वतच.
आपली कृतज्ञता व्यक्त करण्याची थोर परंपरा चालू ठेवणे फार गरजेचे आहे. म्हणून महालय श्राद्ध करणे जरुरीचे आहे. आपले जे कोणी मृत झालेले, त्यांचाच उल्लेख विधीचेवेळी करायचा आहे. श्राद्ध हे पवित्र कर्तव्य आहे. महालय महिना अन्य कशाकरिताही वर्ज्य नाही.
महालय विधी
भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते अमावस्या खरे तर रोज महालय श्राद्ध करायचे असते. परंतु तसे करणे शक्य नसेल तर वडिलांच्या तिथीला करावे. न जमल्यास पितृपक्षातील चतुर्दशी सोडून अन्य कुठल्याही तिथीला करता येते. महालय श्राद्धाचा कालावधी हा भाद्रपद वद्य प्रतिपदेपासून जेंव्हा सूर्य कन्या राशीत प्रवेश करतो, तेंव्हापासून ते सूर्य वृश्चिक राशीत जाईपर्यंत असतो. पण मुख्य काळ भाद्रपद वद्य प्रतिपदेपासून अमावस्येपर्यंत आहे. हा पितरांचा अपरान्ह काळ आहे. आपले एक वर्ष म्हणजे पितरांचा एक दिवस आहे. म्हणजे वर्षश्राद्ध व महालय श्राद्धामुळे पितरांना रोज जेवण मिळते. सर्वसामान्यपणे पितृपंधरवडा मुख्य काळ असतो. संपूर्ण पितृपक्षात महालय श्राद्ध करणे शक्य न झाल्यास सूर्य तूळ राशीत असण्याच्या कालावधीत(या वर्षी १६ नोवेंबर पर्यन्त सूर्य तूळ राशीत आहे, त्यानंतर वृश्चिक राशीत प्रवेश करतो.) करता येते.
पितरांना मंगल कार्यामध्ये स्थान आहे. सर्व मंगल कार्ये, अनुष्ठाने यामध्येही श्राद्ध केले जाते. याला नांदीश्राद्ध असे म्हणतात. ज्याप्रमाणे आपण एखाद्या कार्यक्रमामध्ये श्रद्धांजली वाहतो तोच प्रकार आहे.Remembering our forefathers and ancestors
महालय श्राद्ध आणि प्रति सांवत्सरिक श्राद्ध यात काय फरक आहे?
प्रति सांवत्सरिक श्राद्ध हे एकाच व्यक्तिला उद्देशून केले जाते तर महालय श्राद्ध आपल्या नात्यातील विशिष्ट सर्व मृत व्यक्तींना उद्देशून केले जाते.
महालय श्राद्धात कोणा कोणाला पिंड दिले जातात?
महालय श्राद्धात कुटुंबातील दिवंगत व्यक्तींचे पिंडरूपाने स्मरण –पूजन करण्याची परंपरा आहे. हे श्राद्ध, पितृत्रयी – पिता, पितामह, प्रपितामह (म्हणजेच वडील, आजोबा, पणजोबा) ; मातृत्रयी – माता, पितामही, प्रपितामही म्हणजेच आई, आईची सासू, आणि तिची सासू (म्हणजेच आई, आजी, पणजी) , सापत्नमाता, मातामह(आईचे वडील), मातृपितामह(आईच्या वडिलांचे वडील), मातृप्रपितामह(त्यांचे वडील),मातामही(आईची आई) , मातृपितामही(आईच्या आईची सासू) , मातृप्रतिपामही(आईच्या आईच्या सासूची सासू), पत्नी, पुत्र, कन्या, पितृव्य, मातुल, बंधू, आत्या, मावशी, बहीण, पितृव्य(म्हणजे काका) – पुत्र, जावई, बहिणीचा मुलगा, सासरा, सासू, आचार्य, उपाध्याय, गुरू, मित्र, शिष्य या सर्वांच्या उद्देशाने करायचे असते. यामध्ये दिवंगत आई, वडील, आजी, आजोबा, पणजी, पणजोबा, सावत्र नातेवाईक, भाऊ-बहीण, काका-काकू, मामा-मामी, मावशी, आत्या, सासू-सासरे, व्याही, विहीण व अन्य नातेवाईक या सर्वाना उद्देशून पिंडदान करतात. आपण विविध गुरूंकडून आयुष्यभर काहीना काही शिकत असतो, आणि काही लोकांना आपण शिकवत असतो. त्यामुळे या निमित्ताने निधन पावलेले आपले गुरू आणि शिष्य त्यांचेही आपण स्मरण करतो. आपले हितचिंतक, स्नेही, अन्य आप्त, आपल्या घरी मदतनीस म्हणून राहिलेल्या व्यक्ती, आपल्या घरातील पाळीव प्राणी हे दिवंगत असतील तर त्यांचेही यात स्मरण होते. याखेरीज जगाच्या पाठीवर दिवंगत असलेल्या आपल्या ओळखीच्या एवढेच नव्हे तर, अनोळखी असलेल्या दिवंगत व्यक्तीना उद्देशूनही हे श्राद्ध करतात. जे कोणी जिवंत असतील ते वगळून इतरांच्या नावाचा उल्लेख करतात.
पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर या चार दिशांना चार धर्मपिंडे देण्याची पद्धत या श्राद्धात विशेषकरून आहे. चार दिशांना मृत झालेल्या ज्ञात-अज्ञात जीवांसाठी यजमान हे पिंडदान करतात.
महालय श्राद्धात क्षणदान, अर्घ्यदान, पूजा, अग्नौकरण, पिंडदान, विकिरदान, स्वधावाचन वगैरे विधी करावयाचे असतात.
चतुर्दशीचे दिवशी मृत झालेल्यांचा महालय चतुर्दशीचे दिवशी करु नये शस्त्राने हत झालेल्यांचे श्राद्ध चतुर्दशीचे दिवशी करावे असा नियम आहे. याकरिता प्रतिवार्षिक श्राद्धावाचून इतर श्राद्ध चतुर्दशीचे दिवशी करण्याबद्दल निषेध आहे. याप्रमाणे पौर्णिमेचे दिवशी मृत झालेल्याचाही महालय पौर्णिमेचे दिवशी करू नये. कारण कृष्ण पक्ष नसल्यामुळे पौर्णिमेचे दिवशी महालय प्राप्त होते नाही. चतुर्दशी अथवा पौर्णिमा या दिवशी मरण पावलेल्यांचा महालय द्वादशी, अमावास्या इत्यादि तिथीचे दिवशी करावा.
अविधवा नवमी
भाद्रपद वद्य नवमीला अविधवा नवमी म्हणतात. या दिवशी अहेवपणी (नवरा जिवंत असताना) मृत झालेल्या स्त्रीचे श्राद्ध करण्याचा किंवा सवाष्णीला भोजन घालण्याचा प्रघात आहे. गुजरातेत या नवमीला डोशी नवमी म्हणात.
सर्वपित्री अमावास्या
भाद्रपद अमावास्येला मातामह श्राद्ध (आईच्या वडिलांचे श्राद्ध) असतेच, पण या शिवाय, या दिवशी ज्यांचा मृत्युदिन नक्की माहीत नाही त्या सर्वच पितरांचे श्राद्ध करण्याचाही प्रघात आहे. तसेच महालयातील विशिष्ट तिथींना करण्यात येणारे श्राद्ध कोणत्याही कारणाने किंवा अडचणीमुळे राहिले असेल तर ते या दिवशी करता येते.
पितरांची यादी
अशा प्रकारे आपण विधिपूर्वक महालय श्राद्ध करण्याचे ठरविल्यानंतर, सर्व पितरांची एक यादी करून ठेवणे सोयीचे ठरते. त्यात पितरांची नांवे, नाते, गोत्र, आणि ते सपत्नीक निधन पावलेले आहेत, की स्त्री असेल तर सभर्तृक (म्हणजे पतीसह) निधन पावलेले आहेत, एखादी स्त्री सवाष्ण असतांना गेलेली आहे का, इत्यादि नोंदी ठेवल्यास, पिंडदान करतांना उच्चार करायला सोपे जाते, आणि सवाष्ण स्त्रीच्या पिंडावर हळदी कुंकू वाहावे लागते.
पूर्वीच्या काळची आठवण
खेड्या पाड्यात सर्व जातीत अजूनही हा पितृ पंधरवडा सर्व जातींत पाळला जातो. त्याला ग्रामीण बोलीत ‘पित्तरपाटा’ असे म्हणतात.
पूर्वीच्या काळची अजून एक आठवण म्हणजे पुढे येणार्या दसरा आणि दिवाळी या मंगल सणांसाठी, या काळात, घरांची डागडुजी केली जात असे, भिंती सारवल्या जात असत, छताची शाकारणी केली जात असे, फुटलेली, तुटलेली कौले बदलली जात असत, आणि घराची रंगरगोटी केली जात असे.
समारोप
असो. अशा प्रकारे पितृ पक्षा बद्दल या लेखात सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.
वरील पूर्ण लेख हा स्वलिखित आहे. त्यातील फक्त काही माहिती ही धार्मिक पुस्तकें, किंवा अन्य स्रोतांतून घेतली आहे.
ज्यांना ह्या विषयात रस आणि श्रद्धा असेल, त्यांनी हा लेख जतन करून ठेवायला हरकत नाही, तसेच इतर समविचारी मंडळींना अवश्य पाठवावा.
माधव भोपे
अनंत चतुर्दशी- भगवान विष्णूंचे व्रत
Anant Chaturdashi अनंत चतुर्दशी हे मुख्य करून भगवान विष्णूचे व्रत आहे.
आज अनंत चतुर्दशी. सर्वसाधारणपणे आपल्याला अनंत चतुर्दशी म्हणजे गणपती विसर्जनाचा दिवस हेच जास्त माहिती आहे. पण सार्वजनिक रित्या गणपती बसवण्याची पद्धत ही लोकमान्य टिळक यांच्या काळात म्हणजे अलीकडेच सुरू झालेली. गणपती चतुर्थीला बसवतात, आणि १० दिवसांच्या वास्तव्यानंतर चतुर्दशीला विसर्जन करतात अशी प्रथा सुरू झाली. पण काही जणांचे गणपती दीड दिवसांचेही असतात, तर काहींचे ५ दिवसांचे, काहींचे ७ दिवसांचे इत्यादि. पण अनंत चतुर्दशी चे महत्त्व पुरातन काळापासून वेगळ्याच गोष्टीसाठी आहे. ते म्हणजे अनंताचे व्रत.
हिंदू धर्मात अनंत चतुर्दशीला अतिशय महत्व आहे. या दिवशी भगवान विष्णूच्या अनंत रूपाची पूजा केली जाते. पूजेनंतर अनंत धागा बांधण्याची परंपरा आहे. या धाग्यात 14 गाठी मारल्या जातात. हा धागा रेशीम किंवा कापसाचा बनवला जातो. स्त्रिया डाव्या हातात आणि पुरुष उजव्या हातात हा अनंत धागा बांधतात. अनंत धागा बांधल्याने सर्व दु:ख आणि संकटे दूर होतात अशी धार्मिक मान्यता आहे. 
अनंत चतुर्दशीचे महत्त्व
अनंत चतुर्दशी साजरी करण्याचा उल्लेख महाभारतात आढळतो. पुराणानुसार पांडवांनी जुगारात आपले संपूर्ण राज्य गमावले होते. त्यानंतर त्यांना 12 वर्षांचा वनवास आणि एक वर्ष अज्ञातवासात घालवावे लागले. या काळात पांडवांनी आपले वचन पूर्ण करण्यासाठी जंगलात वास्तव्य केले होते. त्यावेळी युधिष्ठिराने भगवान श्रीकृष्णांला आपले राज्य परत मिळवण्याचा आणि दुःख दूर करण्याचा मार्ग विचारला. तेव्हा श्रीकृष्णाने त्यांना सांगितले की जुगारामुळे माता लक्ष्मी तुझ्यावर नाराज आहे. तुम्हाला तुमचे राज्य परत मिळवायचे असेल तर तुम्ही अनंत चतुर्दशीचे व्रत ठेवा आणि भगवान विष्णूची पूजा करा. हे व्रत केल्याने तुम्हाला सर्व काही परत मिळेल. यानंतर श्रीकृष्णाने युधिष्ठिराला व्रताचे महत्त्व सांगणारी कथाही सांगितली. यानंतर युधिष्ठिराने अनंत चतुर्दशीचे व्रत केले आणि पांडवांना त्यांचे राज्य परत मिळाले.
अनंत चतुर्दशीची कथा
प्राचीन काळी एक तपस्वी ब्राह्मण राहत होता. त्याचे नाव सुमंत आणि पत्नीचे नाव दिक्षा होते. त्या दोघांना सुशीला नावाची पुण्यवान मुलगी होती. सुशीला लहान असतानाच तिची आई दीक्षा मरण पावली. काही काळानंतर सुशीलाचे वडील सुमंत यांनी कर्कशा नावाच्या महिलेशी लग्न केले. काही दिवसांनंतर सुशीलाचा विवाह ब्राह्मण कौंडिण्य ऋषीशीही झाला. सुशीलाच्या निरोपाच्या वेळी तिची सावत्र आई कर्कशा हिने काही विटा आणि दगड बांधून जावई कौंडिण्याला दिले. कौंडिण्याला कर्कशाचे हे वागणे खूप वाईट वाटले. दुःखाने तो आपल्या पत्नीसह निघून गेला. वाटेत रात्र झाली म्हणून तो एका नदीकाठी थांबला आणि संध्याकाळी भगवंताचे नामस्मरण करू लागला. त्याचवेळी सुशीलाला अनेक स्त्रिया कोणत्या ना कोणत्या देवतेची पूजा करताना दिसल्या. सुशीलाने त्या स्त्रियांना पूजेबद्दल विचारले तेव्हा त्यांनी तिला भगवान अनंतांची पूजा आणि त्याचे महत्त्व सांगितले. सुशीलानेही त्याच वेळी व्रत केले आणि 14 गाठींचा धागा बांधून कौंडिण्याकडे आली. कौंडिण्याने सुशीलाला त्या धाग्याबद्दल विचारले तेव्हा सुशीलाने त्याला सर्व प्रकार सांगितला. कौंडिण्याने हे सर्व स्वीकारण्यास नकार दिला आणि तिच्या हातावर बांधलेला अनंत धागा काढून आगीत टाकला. यानंतर त्याची सर्व संपत्ती नष्ट झाली आणि तो दुःखी राहू लागला. खूप दिवस उलटल्यानंतर कौंडिण्याने सुशीलाला या गरिबीचे कारण विचारले तेव्हा तिने भगवान अनंतांचा धागा जाळल्याची आठवण करून दिली. हे ऐकून कौंडिण्य अनंत सूत्र घेण्यासाठी वनाकडे निघाला. अनेक दिवस जंगलात शोधाशोध करूनही जेव्हा त्याला अनंत सूत्र सापडले नाही तेव्हा तो निराशेने जमिनीवर कोसळला. त्यानंतर तेथे भगवान विष्णू प्रकट झाले आणि कौंडिण्याला उद्देशून म्हणाले. हे कौंडिण्या तू माझा तिरस्कार केला होता म्हणूनच तुला खूप त्रास सहन करावा लागला. आता तुला पश्चात्ताप झाला आहे, म्हणून मी तुझ्यावर प्रसन्न आहे. आता घरी जाऊन अनंत चतुर्दशीचे व्रत कर. 14 वर्षे उपवास केल्यावर तुझे दुःख दूर होईल आणि तू धनवान होशील. त्यानंतर कौंडिण्याने अनंत चतुर्दशीचे व्रत केले आणि त्याची सर्व संकटातून सुटका झाली.
या दिवशी अनंत आणि अनंती म्हणजेच चौदा गाठींचा धागा बांधला जातो, जो भगवान विष्णूच्या १४ जगांचे प्रतीक मानला जातो. अनंत चतुर्दशीच्या पूजेच्या दिवशी भगवान विष्णूच्या सहस्त्रनामाचा पाठ करणे अत्यंत शुभ मानले जाते. अनंतच्या १४ गाठी १४ जगांचे प्रतीक मानले जातात. चौदा भुवने – सप्त स्वर्ग आणि सप्त पाताळ मिळून चौदा भुवने होतात.
सात स्वर्ग लोक
भूलोक, भुवर लोक, स्वर्लोक, महालोक, जनलोक, तपलोक, सत्यलोक
सात पाताळ लोक
अतल, वितल, सुतल, महातल, रसातल, तलातल, पाताळ
आपल्या सणावारांचा प्रारंभ प्रतिवर्षी नागपंचमीपासून होतो आणि त्यातील एक पर्व अनंत चतुर्दशीला संपते. अनंत हे विष्णू चे नाव आहे. अनंत हे एका महानागाचेही नाव आहे.
अनंत चतुर्दशीच्या दिवशी विष्णूची ‘अनंत’ ह्या नावाने पूजा केली जाते. दर्भपासून अनंतरूपी नाग बनवला जातो. आणि त्याची पूजा केली जाते.
१४ प्रकारची फुले, १४ प्रकारची फळे, १४ प्रकारची धान्ये आणि १४ प्रकारचे नैवेद्य
ह्या व्रतामध्ये पूजा झाल्यानंतर विसर्जन मागाहून दुस-या दिवशी किंवा गणपती पूजेप्रमाणे दोन, पाच दिवसांनी अशाप्रकारे न करता त्याच दिवशी पूजेनंतर काही वेळाने करतात.
हे अनंताचे व्रत १४ वर्षे आचरावे असे सांगितलेले असले तरी अनेक लोक ते नेहमीसाठी पाळतात.
अनंत चतुर्दशीचे महत्त्व अधिक वाढविणारा योग म्हणजे गणेशोत्सवातील मूर्तीचे विसर्जन सगळीकडे थाटामाटात केले जाईल. जलाशयात मूर्ती विसर्जित करावयाच्या असा धर्मनियम असल्यामुळे समुद्र, नद्या, विहिरी अशा ठिकाणी गणेशभक्त वाजतगाजत जाऊन मूर्तीचे विसर्जन करतात. सगळीकडे आनंदाचा जल्लोष चालू असतो आणि अशा जल्लोषामुळे अनंत चतुर्दशी हा अनंताच्या व्रताचा दिवस आहे, ही गोष्ट फारशी कोणाच्या ध्यानातच येत नाही. असो. त्यानिमित्ताने या अनंताच्या व्रताची माहिती सर्वांना व्हावी म्हणून हा प्रपंच. गणेश विसर्जनाच्या सर्वांना शुभेच्छा! (खरं तर गणेश विसर्जनाच्या शुभेच्छा हा शब्दप्रयोग किंवा वाक्यप्रयोग कितपत योग्य आहे हे माहिती नाही.) गणपतीबाप्पा मोरया पुढच्या वर्षा लवकर या….!
संकलक- माधव भोपे















