Life is a learning journey. जीवन म्हणजे एक सतत शिकण्याचा प्रवास आहे. आपल्याला आपल्या जीवनात अनेक माणसे भेटतात. अनेकांशी कामानिमित्ताने अगदी जवळचा संबंध येतो. खरे तर आपल्या घरच्या लोकांपेक्षाही आपण जिथे काम करतो तिथल्या आपल्या सहकाऱ्यांसोबत आपण जास्त वेळ असतो.
दत्तात्रेयाने जसे 24 गुरू केले होते, आणि प्रत्येकाकडून काही ना काही गुण घेतले होते तसे प्रत्येकामध्ये काही काही गुण प्रकर्षाने दिसून येतात. ते आत्मसात करता आले तर खूप चांगले. नाही आले तरी आपल्याला एक बेंचमार्क बघायला मिळतो आणि काही प्रमाणात का होईना, ते गुण कळत नकळत आपल्यात येतात.
यापूर्वी अशा काही व्यक्तींविषयी लिहिले. आज अजून काही सहकाऱ्यांबद्दल लिहायचा विचार आहे.
- श्री सुभाष व्यवहारे
एखाद्या माणसाची कामाप्रति निष्ठा कशी असावी, याचे चालते बोलते उदाहरण म्हणजे सुभाष व्यवहारे. मी पाथरी कृषि विकास शाखेला असतांना सुभाष व्यवहारे तिथे दफ्तरी म्हणून होते. अगदी टाप टीप राहणी, कपडे नेहमी नीट नेटके, आणि बँकेचा पांढरा गणवेश नेहमी न चुकता घालून येत, आणि वेळेच्या आधी नेहमी बँकेत हजर. बोलणे नेहमी अदबशीर. कधीही न सांगता सुट्टी घेत नसत. खूप आधी पूर्वकल्पना देऊन, आवश्यक असेल तेंव्हाच सुट्टी घेत. सुभाष व्यवहारेचा सगळ्यात मोठा गुण म्हणजे रेकॉर्ड ठेवण्याची त्यांची पद्धत. बँकेचे अनेक वर्षांचे रेकॉर्ड, ज्याच्यात रोजच्या व्हाऊचरपासून, ते मागील पूर्ण पत्रव्यवहार, बँकेचे असंख्य सर्क्युलर्स, वेगवेगळ्या विषयांच्या फाइली, या सर्व गोष्टींचा समावेश असे. या बाबतीत सुभाष व्यवहारेने तिथे आल्यावर, मागील सर्व सर्क्युलर्स, विषयाप्रमाणे आणि वर्षाप्रमाणे नीट लावून घेतले, आणि त्यांना बुक बाईंडर ला बोलावून त्याच्याकडून पक्के बाईंडिंग करून घेतले, आणि प्रत्येक फाइलवर त्या त्या सेरीजचे नाव आणि वर्ष सुवाच्च अक्षरात टाकून, त्या सर्व फाइल्स क्रमाने लावून ठेवल्या होत्या. त्यामुळे आम्हाला जुन्या कुठल्याही सर्क्युलर चा संदर्भ पाहिजे असेल तेंव्हा सुभाष व्यवहारे ते सर्क्युलर लगेच काढून देत. त्यामुळे इतर कुठल्या ब्रांचलाही, इतकेच नव्हे, तर कधी कधी रिजन ऑफिस ला ही एखादा जुना संदर्भ पाहिजे असेल, तर ते आमच्या ब्रांच ला फोन करत, कारण सुभाष व्यवहारे ते पटकन काढून देतील याविषयी त्यांना खात्री असे. तसेच रोज लागणारे वेगवेगळे फॉर्म्सही सुभाष यांनी अगदी व्यवस्थित लावून ठेवलेले असत. त्यामुळे फॉर्म शोधण्यात वेळ जात नसे.
अव्यवस्थितपणा त्यांना अजिबात खपत नसे. आपल्या कामाबद्दल त्यांना रास्त अभिमान होता, आणि हे सर्व काम व्यवस्थित करण्यास कितीही उशिरापर्यन्त थांबावे लागले, तरी त्यांची तयारी असे. या त्यांच्या गुणामुळे, मला, पाथरीला असतांना याबाबतीत खूप मदत झाली.
नंतर 2010 ते 2015 मी जेंव्हा ट्रेनिंग सेंटरला होतो, तेंव्हा, आम्ही मधून मधून subordinate staff साठी ट्रेनिंग प्रोग्राम घ्यायचो. तेंव्हा काही प्रोग्राम्स मध्ये मी मुद्दाम सुभाष व्यवहारे यांना बोलावून, एक पूर्ण सेशन, रेकॉर्ड कसे नीट ठेवावे, या विषयी त्यांच्याकडून प्रात्यक्षिक दाखवून घेत असे, त्यावेळी ते योगा योगाने, औरंगाबादच्याच एका ब्रांचला होते. ते त्यांच्या सोबत, काही फाइली घेऊन येत आणि त्यांनी तेथील ब्रांचचे व्हाऊचर्स कसे stitch केले आहेत फाइली कशा प्रकारे ठेवल्या आहेत, या विषयी सविस्तर सांगत. अशा प्रकारे मी ज्यांच्या सोबत काम केले, त्यापैकी सुभाष व्यवहारे हे व्यक्तिमत्व एक सभ्य, सुसंस्कृत, कामाप्रति अढळ निष्ठा असणारे व्यक्तिमत्व हे माझ्या कायम लक्षात राहिले आहे.
- श्री पी. एम. बुरांडे
श्री पी. एम. बुरांडे(प्रभाकर बुरांडे) हे व्यक्तिमत्व सुद्धा, बऱ्याच अंशी श्री सुभाष व्यवहारे यांच्या सारखेच होते. वरील सर्व गुण हे त्यांच्यातही अगदी जसेच्या तसे होते म्हटले तरी चालेल. 1998 ते 2001 मधील अडीच वर्षांच्या काळात मी औरंगाबाद येथील स्टेशन रोड ब्रांचला होतो. त्यावेळी तिथे श्री बुरांडे हे दफ्तरी होते. बुरांडे हे नेहमी हसतमुख असत. आणि आपण एखादेवेळी त्यांच्यावर रागावलो तरी ते शांतपणे, समजावून सांगून, समोरच्याचा राग शांत करत. ही गोष्ट भल्या भल्यांना जमत नाही. पण स्थितप्रज्ञता हा बुरांडे यांचा अंगभूत गुण होता. मी कधीही त्यांना रागावलेले किंवा कोणाशी तावातावाने भांडतांना पाहिले नाही. श्री बुरांडे यांनीही तेथील रेकॉर्ड अत्यंत व्यवस्थित ठेवले होते. आणि कोणताही फॉर्म किंवा रेकॉर्ड पाहिजे असल्यास ते पटकन काढून देण्याची त्यांची हातोटी होती. बुरांडे एक चांगले कलाकार सुद्धा होते, आणि रांगोळी काढण्याची कला ही त्यांना अवगत होती.
श्री बुरांडे हे अभ्यासू व मेहनती असल्यामुळे थोडेच दिवसांत त्यांचे प्रमोशन होऊन ते क्लरिकल केडऱ मध्ये आले, आणि नंतर प्रमोशन होऊन हेड कॅशियर पर्यन्त त्यांची पदोन्नती झाली.
आता तर निवृत्तीनंतर त्यांनी त्यांचा बागकामाचा छंद इतका उत्कृष्टपणे जपला आहे, की आता पूर्ण संभाजीनगर (औरंगाबाद) मधून खूप लोक त्यांच्या बागेला आणि कचऱ्यातून कला निर्माण करण्याच्या कार्याला पाहायला येतात. बँकेतील लोक तर त्यांचे कौतुक करतातच, पण आता त्यांच्या कार्याची प्रसिद्धी आसपासच्या सर्व परिसरात झाली आहे, आणि त्याबद्दल काही वृत्तपत्रांमध्येही लिहून आले आहे. त्यांना त्यांच्या बागकामासाठी, आणि टाकाऊतून टिकाऊ निर्माण करण्याच्या कार्यासाठी बरीच परितोषकेही मिळाली आहेत. नुकतेच त्यांना इको ग्रीन फाउंडेशन औरंगाबाद यांच्या तर्फे विशेष उल्लेखनीय बागेसाठीचे पारितोषिक देऊन गौरवीत करण्यात आले. हल्लीच त्यांनी काही प्रदर्शनेही भरवली होती. निवृत्तीनंतरचे आयुष्य कसे जगावे याचे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे श्री बुरांडे होत.

माझ्या वरील दोन सहकाऱ्यांचे काम, त्यांचा स्वभाव, कामाप्रति त्यांची निष्ठा, या गोष्टींचा माझ्यावर खूप प्रभाव पडला आहे.






