https://goodworld.in A website by Madhav Bhope

Emotional Intelligence-1

woman-brunette

Emotional Intelligence भावनिक बुद्धिमत्ता

Logo

goodworld.in- A website by Madhav Bhope

यापूर्वी, दि. 20 जानेवारीच्या  Art of Listening-2, ऐकण्याची कला- भाग 2 या लेखात आपण शेवटी, Emotional Intelligence चा उल्लेख केला होता. त्या बद्दल आज काही चर्चा करूयात.

आपल्याला I.Q.( Intelligence Quotient) म्हणजेच ‘बुध्ढ्यांक’ या शब्दाचा परिचय चांगल्या प्रकारे आहे. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला, फ्रेंच मानसशास्त्रज्ञ अल्फ्रेड बिनेट याने ही संकल्पना मांडली आणि नंतर अमेरिकन शास्त्रज्ञांनी त्यात भर घालून, बुद्धिमत्तेचे मोजमाप करण्यासाठी काही पद्धती निश्चित केल्या. IQ = (mental age/chronological age) x 100. पण नंतरच्या काळात एखाद्या व्यक्तीची गुणवत्ता मोजण्यासाठी I.Q. च्या उपयोगितेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. आणि जीवनातल्या अनेक क्षेत्रातील यशस्वी व्यक्तींचा  अभ्यास केल्यानंतर असे आढळून आले, की केवळ ‘बुध्ढ्यांक’ हा यशस्वी जीवनाचे गमक होऊ शकत नाही, तर ज्या व्यक्ति आपल्या भावनांचे योग्य प्रकारे नियमन करू शकतात, त्या आयुष्यात जास्त यशस्वी होतात. यशस्वितेचा संबंध बुद्धिमत्तेपेक्षा, भावनांचे योग्य रित्या नियमन करण्याशी जास्त आहे असे दिसून आले. मानसशास्त्री Daniel Goleman याने 1990 च्या सुमारास ही संकल्पना, त्याच्या, Emotional Intelligence: Why It Can Matter More Than IQ.” या पुस्तकाद्वारे मांडली.

IQ_EQ
IQ_EQ

वरील सर्व तांत्रिक आणि academic माहिती जरी बाजूला ठेवली, तरी आपल्या आजूबाजूला पाहिले तरी वरील गोष्ट खरी आहे असे जाणवेल.

What is Emotional Intelligence?

भावनिक बुद्धिमत्ता (EQ) म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या स्वतःच्या भावना ओळखण्याची, समजून घेण्याची, व्यवस्थापित करण्याची आणि प्रभावीपणे वापरण्याची क्षमता तसेच इतरांच्या भावना ओळखण्याची, समजून घेण्याची आणि प्रभावित करण्याची क्षमता ही रोजच्या जीवनात, तसेच जीवनात येणाऱ्या आव्हानांना यशस्वीरीत्या हाताळण्यास अत्यंत आवश्यक आहे असे दिसून येते.

ही संकल्पना जरी पाश्चात्य जगात आत्ता आत्ता मान्य पावत असली तरी, आपल्याकडे, काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या सहा भावनांना षड्रिपू या नावाने पारंपारिकरित्या ओळखले जाते. आणि त्यांना ताब्यात ठेवण्याविषयीही सांगितले जाते. पण एखाद्या विषयाची अति परिचयात अवज्ञा व्हावी तसे या विषयी झाले आहे असे वाटते.

वरील भावना जर ताब्यात नसतील, तर कमालीचा क्रोध, अस्वस्थता, कंटाळा, भीती, निराशा, चिडचिडेपणा, अपराधी भावना, न्यूनगंड, एकाकीपणा या नकारात्मक भावनांना माणसाचा ताबा घ्यायला वेळ लागत नाही, आणि व्यक्ति जगापासून एकटी पडत जाते, याउलट भावनांचे नियंत्रण ज्यांना जमते, त्यांच्यामध्ये प्रशंसा, कृतज्ञता, कुतूहल, उत्साह, उत्कटता,  दृढनिश्चय, लवचिकता, आत्मविश्वास,  आनंदीपणा, चैतन्य या भावना दिसून येतात.

cute sisters

असे म्हटले जाते, की बुध्ढ्यांक I.Q. हा एका विशिष्ट वयानंतर वाढत नाही. पण असे दिसून आले आहे की E.Q. हा लवचिक आहे, आणि प्रयत्नाने, अभ्यासाने, वाढवता येऊ शकतो.

How Emotional Intelligence can be measured?

पाश्चात्य मानसशास्त्रीनी E.Q. चे मूल्यमापन करण्यासाठी विविध पद्धती विकसित केल्या आहेत. त्यात self-awareness, self-management, social awareness, and relationship management अशा चार मापदंडावर मूल्यमापन केले जाते.

आजच्या धकाधकीच्या आणि चढाओढीच्या जीवनात अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धापर्यन्त सर्व जण कुठल्या ना कुठल्या छोट्या किंवा मोठ्या तणावाला नित्य सामोरे जातात असे दिसून येते. त्यातील सगळ्यात मोठा तणाव हा कुठल्या ना कुठल्या कारणामुळे येणारा राग महणजेच क्रोध. किंवा कुठल्या ना कुठल्या गोष्टीची, परिस्थितीची वाटणारी वास्तव किंवा अवास्तव भीति. या भावनांचा निचरा झाला नाही, तर लवकर किंवा उशीरा त्या कुठल्या ना कुठल्या शारिरिक किंवा मानसिक रोगात परिवर्तित होतात. काही लोक या भावनांना, बिनदिक्कतपणे, त्यांच्या परिणामांचा विचार न करता, मनाला येईल त्या प्रकारे व्यक्त करतात.

angry man

पण अशा अनियंत्रित प्रकटीकरणामुळे त्या व्यक्तीचे कधीही न भरून येणारे नुकसान होत असते. आणि ती दुसऱ्यांना आणि स्वतःलाही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष इजा करून घेत असते. अशी व्यक्ति समाजापासून दूर जाते आणि एकटी पडते. याउलट काही व्यक्ति क्रोध, भीती, निराशा, दुःख या भावना मनातल्या अगदी आतल्या कप्प्यात दडवून ठेवतात. सभ्यपणाचा मुखवटा कोणासमोरही उतरून ठेवता येत नसल्यामुळे, आणि या भावना मनातल्या मनात दाबल्यामुळे, त्यांची प्रचंड घुसमट होते, आणि त्यामुळे निरनिराळ्या मनोकायिक (psychosomatic) रोगांना आमंत्रण मिळते.

sad girl

Psychosomatic diseases.

मनोकायिक विकार

साध्या अपचन, अॅसिडिटी पासून ते पोटदुखी, पाठदुखी, मानदुखी, कंबरदुखी, अल्सर, पाळीच्या तक्रारी, बीपी, मधुमेह, हृदयाशी संबंधित रोग, अशा कुठल्याही रोगाचे मूळ हे मनोकायिक असू शकते.

मग काय करायचे?  आपल्याला राग आल्यावर दुसऱ्याला ठोकून काढायचे, शिव्या द्यायच्या, की मनातल्या मनात चिडत राहायचे? हा प्रश्न आपणा सर्वांनाच पडतो. आपल्या मनातल्या सुप्त इच्छा मारधाडीच्या हिन्दी सिनेमातील हीरो पूर्ण करतो म्हणून आपण असे सिनेमे आवडीने पाहतो. पण हे प्रॅक्टिकल नाही, हे आपल्याला चांगलेच माहिती असते.

आपण सहसा हे गृहित धरलेले असते, की या भावना आपल्याला अशाच छळणार, हा आपला स्वभावच आहे, आणि त्याला काही औषध नाही, किंवा ही जगाची रीतच आहे.  फार झाले तर आपल्यापेक्षा कमजोर व्यक्तींवर आपला राग काढला जातो आणि बलदंड किंवा कुठल्याही प्रकारे आपल्यापेक्षा वरचढ असलेल्यांपुढे नरमाईची भूमिका घेतली जाते.

पण emotional intelligence द्वारे, आपल्या भावनांना योग्य ती वाट करून दिली जाऊ शकते, स्वतःला किंवा दुसऱ्याला कोणतीही इजा न करता. इतकेच नव्हे, तर वरकरणी harmful घातक वाटणाऱ्या भावनांना योग्य रित्या channelize करून, योग्य रित्या वळवून त्यांना आपली शक्ति बनवली जाऊ शकते, किंवा हे शक्य झाले नाही तरी, कमीत कमी, भावनांचा उपद्रव कमी करता येऊ शकतो- हे एक life skill जीवनातील कौशल्य आहे, आणि ते उपजत नसले तरी, प्रयत्नाने, अभ्यासाने, आत्मसात करता येऊ शकते. जसे आपण मागील एका लेखात पाहिले होते, समर्थांनी दास बोधात सांगितल्याप्रमाणे,

रूप लावण्य अभ्यासिता न ये |

सहज गुणास न चले उपाये |

कांही तरी धरावी सोये |

आगंतुक गुणाची || (दासबोध- २-८-३१)

या बाबत आपल्या पूर्वजांनी किती कार्य करून ठेवले आहे, ते यथावकाश, पुढील काही भागांमध्ये पाहू.

Go to my Amazon Shop to shop and order for any amazon product, by clicking on the icon.

Art of listening-2 ऐकण्याची कला-2

Listening2
Listening2
listening3

Art of Listening- Part 2 ऐकण्याची कला – भाग २

यापूर्वी आपण १४ जानेवारीला भेटलो होतो. त्यात शेवटच्या परिच्छेदात  म्हटल्याप्रमाणे, आज दोन विषयांवर विचार करायचा आहे. एक म्हणजे, “ऐकण्याची कला”, Art of Listening आणि दुसरी म्हणजे, Non verbal communication आणि body language. ज्याला ‘गैरमौखिक, किंवा, अशाब्दिक संप्रेषण’ आणि “देहबोली” असेही म्हणता येईल.

आपण बऱ्याच गोष्टी बोलून जरी दाखवत नसलो, तरी, त्या आपल्या शरीराद्वारे, हालचालीद्वारे, हातवाऱ्यांद्वारे, चेहऱ्यावरील भावांद्वारे, डोळ्यांद्वारे, भुवयांद्वारे, जिवणीद्वारे, बसण्याच्या किंवा उभे राहण्याच्या पद्धतीद्वारे, मौनाद्वारे, आणि आवाजाच्या टोन द्वारे, अशा असंख्य प्रकारे, “बोलून” दाखवत असतो, किंवा व्यक्त करीत असतो. हे व्यक्त करणे नेहमी जणीवपूर्वकच होते असे नाही, तर अभावितपणे, आपल्या नकळतही होत असते. खरं तर अगदी तान्हे मूल असते, ते त्याच्या सगळ्या भावना याच प्रकारे, अगदी प्रभावीपणे व्यक्त करीत असते, किंवा असे म्हणू की त्या आपोआप व्यक्त होत असतात.

अमेरिकेतील, Los Angeles येथील, University of California मधील, मानसशास्त्रज्ञ अल्बर्ट मेराबियन ( Albert Mehrabian) याने, १९६७ मध्ये केलेल्या काही प्रयोगांद्वारे, परस्पर संवादासंदर्भात काही निष्कर्ष काढले. त्याने असे निरीक्षण केले, की माणसांच्या संवादात, व्यक्त होण्याच्या प्रक्रियेत आणि परिणामकारकतेत , फक्त ७% वाटा हा बोललेल्या शब्दांचा, ३८% वाटा हा शब्दांच्या टोनचा आणि ५५% वाटा हा देहबोलीचा असतो. आपण जर आपल्या आजूबाजूला निरीक्षण केले, एवढेच कशाला, आपले स्वतःचे ही निरीक्षण केले, तर ही गोष्ट लक्षात येईल.  

आणि देहबोली ही आपल्या नकळत  आणि आपल्या इच्छेविरुद्ध (involuntarily) होत असते.

मी B.Sc. First year ला असतांनाची गोष्ट. त्यावेळी Engineering ला admission मिळणे, हे प्रत्येकाचे स्वप्न असायचे. माझा first year चा result लागेपर्यंत, आपल्याला अॅडमिशन  मिळेल की नाही याची धाकधूक होती. पण रिजल्ट लागल्यावर आणि जे मार्क मिळाले, त्यावरून, साधारणपणे, अॅडमिशन मिळू शकेल असे वाटू लागले. इतके दिवस वाकून चालणारा मी, त्यादिवशी, कॉलेजच्या रस्त्यावर (नकळतच) छाती पुढे काढून चालू लागलो. माझा एक मित्र रस्त्यात भेटला, आणि माझ्या छातीवर ठोकून म्हणाला, कायरे, छातीत पर्सेंटेज भरलेले आहे वाटते?

एखादी  व्यक्ति प्रचंड मानसिक ताणात असेल, रागात असेल पण बोलता येत नसेल तेंव्हा, जिवणी गच्च बंद करून घेतली जाते, भुवया आक्रसून जातात, हात आवळले जातात.

आपल्या आजूबाजूला जर आपण पाहिले तर साधारणपणे, रोड माणसे (माझ्यासारखी) पायांची घडी घालून बसतात किंवा/ आणि, हाताचीही घडी घालून बसतात., जेंव्हा की सुदृढ किंवा स्थूल माणसे कधीही पायाची किंवा हाताची घडी घालून बसलेली दिसणार नाहीत. त्याच प्रमाणे, जेंव्हा दोन व्यक्तींमध्ये संवादात ताण येतो, त्यावेळी, पुढे बोलण्यात काही अर्थ नाही असे ज्या व्यक्तीला वाटते, ती लगेच हाताची घडी घालून गेते . हाताची घडी घालणे ही सर्वसाधारणपणे closed (बंद) देहबोली आहे. (अर्थात, काहीजणांचा त्याला अपवाद असतो, जसे की स्वामी  विवेकानंदांची हाताची घडी घातलेली देहबोली ही त्यांचा आत्मविश्वास दर्शवीत होती).

बोलण्याचा स्वर (टोन) हाही तितकाच महत्वाचा असतो. एकच वाक्य वेगवेगळ्या टोन मध्ये उच्चारल्यानंतर त्याचे पूर्णपणे वेगवेगळे अर्थ निघू शकतात आणि त्यातून वेगवेगळ्या भावना व्यक्त होऊ शकतात. “चहा घेणार का?” हे एकच वाक्य वेगवेगळ्या स्वरात उच्चारल्यानंतर त्यातून, आदर, सन्मान, प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, किंवा तुच्छता, कंटाळा( काय कटकट आहे), उपरोधिकपणा, संताप, अशा कितीतरी भावना व्यक्त होऊ शकतात.  

आपला विषय “ ऐकण्याची कला” Art of listening हा चालला होता, त्यासंदर्भात वरील सर्व गोष्टींची ओघात चर्चा आली. पण याआधीच्या लेखात आपण चर्चा केल्याप्रमाणे, संवादाचा एक अत्यंत महत्वाचा उपयोग किंवा उद्देश, हा, दुसऱ्याच्या भावना समजून घेणे, दुसऱ्याला बोलते करणे, हाही असतो, आणि  त्याचबरोबर एखाद्या विषयावर सम्यक  माहिती मिळविणे, आपल्या ज्ञानात भर घालणे, हाही असतो.  अशा प्रकारचा संवाद जर आपल्याला अपेक्षित किंवा इच्छित असेल, तर, खालील गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत.

  1. बिना अडथळा ऐकणे- ऐकते वेळी इतर काही कामे न करणे.
  2. ऐकतांना अगदी कोरा चेहरा (bland face) न ठेवता, मनात येणाऱ्या भावनांना चेहऱ्यावर दिसू देणे. मधून मधून, दाद देणे
  3. मधून मधून open questions (ज्या प्रश्नांचे उत्तर केवळ हो किंवा नाही मध्ये न येता सांगणाऱ्या त्या विषयाचा अजून एखादा पैलू सांगता येईल अशा प्रकारचे प्रश्न) विचारणे.
  4. एखादा मुद्दा समजला नसेल तर त्याबद्दल clarification (स्पष्टीकरण) विचारणे.
  5. एखादा मुद्दा समजला असेल तरी, त्यात आणखी स्पष्टता यावी म्हणून paraphrasing करणे, म्हणजे वक्त्याने जे सांगितले असेल, त्याला आपल्या शब्दात पुन्हा मांडणे. उदाहरणार्थ: “तुम्हाला असे म्हणायचे आहे का.., किंवा मला समजले त्याप्रमाणे..” किंवा एखाद्या तुलनेद्वारे विषय अधिक स्पष्ट करून घेणे.

अर्थात वरील सर्व नियम हे आपल्या रोजच्या सहज होणाऱ्या हवापाण्याच्या बोलण्याला तितकेसे लागू होत नाहीत.

In fact, आपल्या रोजच्या सामान्यपणे होणाऱ्या बोलण्याचा, मुख्य उद्देश हा एकमेकांची ख्याली खुशाली विचारणे, किंवा एखादी माहिती घेणे, किंवा देणे, इतकाच मर्यादित असतो.

वरील विषयांवर आपले सर्वांचेच काही विचार आणि अनुभव असतीलच. ते खाली comments मध्ये नक्की शेअर करा.

comments  करण्यासाठी तुमचा email  देण्याची गरज नाही. त्या रकान्यात कुठलेही एक अक्षर टाइप केले तरी चालेल. 

पुढील लेखात emotional intelligence (भावनिक बुद्धिमत्ता) या विषयावर काही बोलूयात.

माधव भोपे

शनिवार, दि. २० जानेवारी २०२४   

Listen to understand
Listen to understand
selective listening
selective listening
ignoring
ignoring
I am on your side
I am on your side
attentive listening
attentive listening

The concept of the art of listening is one that is quite nuanced and requires a multifaceted approach. As can be gleaned from the informative article above, there are a multitude of points that are worth considering when seeking to become a better listener. These may include aspects such as developing empathy towards the speaker, understanding the different types of listening and when they are appropriate, and being mindful of one’s own biases and preconceptions that may shape how they process and interpret information. Additionally, it is important to cultivate an open and receptive attitude towards the speaker, being willing to truly engage with what is being said rather than simply waiting for a turn to speak. Overall, by taking a deliberate and holistic approach to the art of listening, individuals can improve their communication skills, build stronger relationships and gain a deeper understanding of the world around them.

Improving one’s listening skills is a task that requires dedication and patience. Fortunately, there are various methods and techniques that can help a person enhance their listening capabilities and become a better listener. One popular approach is active listening, which involves paying attention to not only what someone is saying, but their body language and tone of voice as well. Another technique is empathic listening, where a person strives to understand the speaker’s perspective and feelings. Additionally, eliminating distractions and reducing internal noise can improve one’s ability to hear and comprehend the message being conveyed. Engaging in conversation with individuals from diverse backgrounds and actively seeking feedback can further enhance one’s listening skills. By investing time and effort into techniques such as these, individuals can develop stronger listening skills and improve their communication with others.

Art of Listening- Part 1 ऐकण्याची कला 1

istockphoto 1369510216 612x612 1
istockphoto 1369510216 612x612 1
pune news

या पूर्वी आपण 10 जानेवारी ला भेटलो होतो. त्यात आपण समर्थांच्या दासबोधातील, दुसऱ्या समासातील एक श्लोक उद्धृत केला होता.

रूप लावण्य अभ्यासिता न ये |

सहज गुणास न चले उपाये |

कांही तरी धरावी सोये |

आगंतुक गुणाची || (दासबोध- २-८-३१)

 

अर्थात, “जन्मजात सगळ्यांना सगळे गुण असतातच असे नाही. पण काही गुण अभ्यासाने, प्रयत्नाने, आत्मसात करता येतात”

जगातील सगळ्यात मोठी समस्या, जगातील जास्तीत जास्त दुःखांचे कारण काय आहे असा प्रश्न जर कोणाला विचारला, तर त्याची अनेक उत्तरें येतील. कोणाच्या दृष्टीने गरिबी हे जगातल्या सर्व दुःखांचे मूळ कारण असेल, तर कोणाला बेरोजगारी ही सगळ्यात मोठी समस्या वाटत असेल. कोणाला वाढत चालणारा हिंसाचार हा सर्व दुःखांचे आणि समस्येचे मूळ वाटत असेल, तर कोणाला, आजकालच्या जगात वाढत असलेला भोगवाद, चंगळवाद, आणि माणसांचा वाढत चाललेला स्वार्थीपणा, निसर्गाला ओरबाडण्याची वृत्ती, ही सगळ्या दुःखांच्या मुळात आहे असे वाटू शकते.  

वरील सर्व कारणे नक्कीच कमी अधिक प्रमाणात माणसाच्या दुःखाला कारणीभूत आहेत, हे कोणीही नाकारू शकत नाही. पण, आज आपल्या अवतीभवती पाहिले असता, माणसाच्या दुःखाचे एक मोठे आणि मुख्य कारण हे सुसंवादाचा अभाव हेच आहे. सुसंवाद तर दूरची गोष्ट राहिली, आज माणसा माणसात, इतकेच काय, अगदी जवळच्या नातेसंबंधात संवाद सुद्धा होणे दुर्मिळ आणि दुर्धर झाले आहे. आणि यात विडंबना अशी की, विज्ञानाचे, तंत्रज्ञानाचे लागणारे नवीन नवीन शोध आणि वाढलेली  संवादाची साधने यांचा या ‘संवादाच्या अभावात’  प्रमुख सहभाग आहे. घराघरात लहानांपासून थोराच्या हातात दिसणारा मोबाईल हे याचे एक ज्वलंत उदाहरण आहे. पण त्याबद्दल नंतर कधी बोलूत. कारण या विषयावर वरवर पाहता सर्वांचे एकमत असले तरी, आपण सोडून इतर सर्व लोकांनी याबाबत जागरूक होण्याची गरज आहे, आपण तर याबाबतीत जागरूक आहोतच, हे प्रत्येकाचे प्रामाणिक मत असते.

पण माझा विषय वेगळाच आहे. वर समर्थांनी म्हटले आहे की जन्मजात सगळ्यांना सगळे गुण असतातच असे नाही. पण काही गुण अभ्यासाने, प्रयत्नाने, आत्मसात करता येतात. ‘बोलावे कसे’ याबद्दल आपल्याकडे, आपल्या पारंपरिक ग्रंथांमध्ये, संत साहित्यामध्ये विस्ताराने मार्गदर्शन केलेले आढळते. गीतेमध्ये, सांगितल्याप्रमाणे-

अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत् |
स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङमयं तप उच्यते || गीत १७ -१५ 15||

 

अर्थात, दुसऱ्यांना उद्विग्न न करणारे, सत्य, प्रिय वाटणारे आणि हितकारी असे बोलणे, तसेच नित्य वेद आणि शास्त्र यांचा अभ्यास वाणीने करणे यांना वाणीचे तप म्हणतात.

तसेच, मनुस्मृतीत म्हटल्याप्रमाणे,

सत्यं ब्रूयात् प्रियं ब्रूयात् , न ब्रूयात् सत्यम् अप्रियम् ।

प्रियं च नानृतम् ब्रूयात् , एष धर्मः सनातन: ॥ ४-१३८ ||

अर्थात, सत्य बोलना चाहिये, प्रिय बोलना चाहिये, सत्य किन्तु अप्रिय नहीं बोलना चाहिये । प्रिय किन्तु असत्य नहीं बोलना चाहिये ; यही सनातन धर्म है ॥

पण माझा मुद्दा असा आहे, की आपण संवादाचा, भाषेचा उपयोग दोन कारणांसाठी करतो: एक- माहितीचे संप्रेषण करण्यासाठी(उदा. अमुक वस्तु अमुक ठिकाणी ठेवली आहे), दुसरे- भावना व्यक्त करण्यासाठी.

पण संवादाचा एक अत्यंत महत्वाचा उपयोग किंवा उद्देश, हा, दुसऱ्याच्या भावना समजून घेणे, दुसऱ्याला बोलते करणे, हाही असतो, आणि  त्याचबरोबर एखाद्या विषयावर सम्यक  माहिती मिळविणे, आपल्या ज्ञानात भर घालणे, हाही असतो, याची जाणीव फार कमी जणांना आणि फार कमी वेळेस होते. त्यामुळेच, आधीच्या लेखात म्हटल्याप्रमाणे, “वक्ता भवति प्रत्येकः, श्रोता भवति वा न वा” असे म्हणण्यासारखी परिस्थिती दिसून येते. कुठल्याही संवादात, आपल्याला असलेली माहिती, किंवा आपले विचार, हे ठासून आणि आग्रहपूर्वक सांगण्याची प्रवृत्ती दिसून येते. वास्तविक आपण सांगत असलेल्या गोष्टी, या मूळ आपले विचार नसून, नुकतेच कुठेतरी वाचलेले, ऐकलेले, पाहिलेले, आणि आपल्याला भावलेले असे input असते. पण ते आपण आपलेच म्हणून रेटून मांडत असतो. बरे, जो मनुष्य, असे एकतर्फी बोलतो, त्या माणसाच्या ज्ञानात, त्या पूर्ण संवादानंतर काय भर पडते? कारण तो जे बोलला, ते तर त्याला आधीच माहिती होते.(वाचून किंवा ऐकून). मग त्याच्यात value addition काय झाले? त्यामुळे, दुतर्फा संवाद नसेल, तर एकतर्फी बोलणाऱ्याचा घडा रिकामाच राहतो. त्या ऐवजी, जर आपण समोरच्या माणसाशी बोलतांना, लक्षपूर्वक, पूर्वग्रह सोडून ऐकले, आणि ऐकतांना, त्या माणसाला बोलण्याला प्रवृत्त करण्यासाठी काही योग्य ते प्रश्न विचारत गेलो, तर आपल्याला कल्पनाही नसलेल्या अनेक गोष्टी कळू शकतात, माहिती होऊ शकतात. बऱ्याचदा त्यामुळे, जी माहिती, खूप उशिरा, कालांतराने कळाली असती, ती विनासायास कळू शकते. पण त्यासाठी, ‘ऐकण्याची कला’ अशी काही असते, हे मान्य करावे लागेल. ऐकण्याच्या कलेमुळे झाला तर आपला फायदाच होऊ शकतो. नुकसान काही व्हायचा प्रश्न नाही. कारण प्रत्येकाला आपले आपले स्वातंत्र्य असतेच.  

त्यामुळे, पुढील लेखात आपण, “ The Art of listening” अर्थात, ‘ऐकण्याची कला’ याबद्दल काही चर्चा करूयात. तसेच, संवादात, communication मध्ये, non verbal communication, अर्थात, ‘गैरमौखिक, किंवा, अशाब्दिक संप्रेषण’ याची किती भूमिका आहे, याविषयीही काही चर्चा करूयात.  

मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

माधव भोपे 

Acquire New Skills

Samarth Ramdas

कांही तरी धरावी सोये | आगंतुक गुणाची ||

काल आपण २२ जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या श्रीरामाच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनाविषयी माहिती घेतली. तत्पूर्वी नवीन वर्षाच्या सुरुवातीला “वक्ता दशसहस्रेषु” च्या धर्तीवर “श्रोता दशसहस्रेषु” या ब्लॉग द्वारे काही हितगुज केले. त्यात म्हटल्याप्रमाणे, आजकाल असे वाटते की एकीकडे बोलणाऱ्यांचा सुकाळ आहे, आणि ‘ऐकणारे’ किंवा ‘वाचणारे’ यांचा दुष्काळ आहे, तर दुसरीकडे असेही दिसून येते की ‘meaningful communication’ (‘अर्थवाही संवाद’, किंवा दुसऱ्यांपर्यंत खऱ्या अर्थाने ‘पोचणारा’ संवाद) कुठेतरी हरवत चालले आहे. खरे तर, Good listening is the first step of good communication. पण ऐकणारा कान आणि समजून घेणारे मन ही दुर्मिळ गोष्ट झाली आहे, किंवा असे म्हणता येईल की समोरची व्यक्ति, मग ती किती का जवळची असेना, आपल्या मनाची व्यथा ऐकेल आणि आपले मन समजून घेईल असा विश्वास, trust कुणाला वाटेनासा झाला आहे. यात न बोलणाऱ्याचा दोष की न ऐकणाऱ्याचा दोष हे सांगणे कठीण आहे. आणि आणि त्यामुळे, यापूर्वी कधीही न ऐकलेल्या मानसिक समस्या, मानसिक आजार दिसून येत आहेत. न सांगता येण्याजोग्या समस्या, न बदलता येणारी परिस्थिती, नात्यातील आणि परस्पर संबंधातील घुसमट, या गोष्टी, जर मनाची बैठक सुदृढ नसेल तर, माणसाला हतबल करून टाकतात, आणि माणसे एक तर विचित्र वागतात, नाही तर जीवनातील त्यांचा रसच संपून जातो, आणि ते, घाण्याच्या बैलाप्रमाणे निरर्थकपणे जीवनाचे ओझे ओढीत राहतात.

काही दिवसांपूर्वी पुण्यातील एका तरुणाने सुरुवात केलेल्या, “Listeners’ Army” या संस्थेविषयी वाचले. राज डगवार या तरुणाने, डिसेंबर २०२० मध्ये एक उपक्रम सुरू केला-

raj dagwar
Listeners Army

 

“Tell me your story, and I will give you Rs.10” अशी हस्तलिखित पाटी घेऊन तो पुण्याच्या वर्दळीच्या फर्ग्युसन रोडवर उभा राहिला. 

 

सुरुवातीला लोक येऊन, कुतूहलाने, काहीशा संशयाने  पाहून निघून जात, पण ४ दिवसांनंतर त्याला पहिली व्यक्ति मिळाली, जिने की आपल्या मनातील सारी खळबळ, दुःख, असहायता, या परक्या आणि अनोळखी व्यक्तीसमोर ओकली आणि आपल्या दुःखाला  वाट करून दिली. या तरुणाची कहाणी मुळातूनच वाचण्यासारखी आहे. आज त्याच्या Listeners Army या एनजीओ चे काम भारतभर पसरले आहे, आणि त्याच्यासोबत ६०० volunteers म्हणजे स्वयंसेवक काम करीत आहेत. आणि ५००० लोक या  चळवळी सोबत जोडले गेले आहेत.

“माझे कोणी ऐकून घेत नाही”, आणि, “माझे कोणी ऐकत नाही” या दोन तक्रारी सगळ्यांच्याच मनात असतात. या दोन वाक्यांत सूक्ष्म फरक आहे. त्यातील दुसरे वाक्य हे पालकांकडून जास्त करून ऐकायला मिळते, जे, “माझा सल्ला कोणी ऐकत नाही, किंवा, माझ्या आज्ञा कोणी (विशेषतः आपले पाल्य) पाळत नाही” अशा अर्थानेही वापरले जाते.

वरील चर्चा आपल्याला आपल्या मूळ विषयाकडे घेऊन येते. ती म्हणजे “संवाद कौशल्य”, ज्याला इंग्लिश मध्ये, “Communication skill” म्हटले जाते. या विषयात माझ्यासारख्याने उडी मारणे म्हणजे एक मोठा विनोद आहे असेच कोणाला वाटेल. कारण कम्युनिकेशन मधील ‘क’ ही ज्याला माहीत नाही, त्याने या विषयावर कशाला बोलावे असेही काही जणांना वाटू शकते. तर ज्ञानेश्वर माउली म्हणतात तसे,saint dnyaneshwar

राजहंसाचे चालणे |
भूतळी जालिया शहाणे |
पण आणिके काय कोणे |
चालावेचि ना ? ||

(ज्ञानेश्वरी १८-१७१३)

आणि समर्थांनी म्हटल्याप्रमाणे, माणसाला काही गुण उपजत असतात, पण काही गुण ‘अर्जित’ करावे लागतात, आणि करता येतातही. तसेच, काही माणसांना संभाषण कला किंवा संवाद कौशल्य हे उपजत किंवा जन्मजात असते, पण ते ज्यांना जन्मजात नाही, त्यांना ते ‘अर्जित’ करता येऊ शकते, हा विषय घेऊन आपण पुढे जाणार आहोत.Samarth Ramdas

रूप लावण्य अभ्यासिता न ये |
सहज गुणास न चले उपाये |
कांही तरी धरावी सोये |
आगंतुक गुणाची ||

(श्रीदासबोध २-८-३१) 

पुन्हा भेटूयात, पुढच्या ब्लॉग मध्ये.

माधव भोपे 

बुधवार, दि. १० जानेवारी २०२४ 

श्रोता दशसहस्रेषु

श्रोता दशसहस्रेषु

शतेषु जायते शूरः सहस्रेषु च पण्डितः।

वक्ता दशसहस्रेषु दाता भवति वा न वा।।

२०२३ हे वर्ष पाहता पाहता संपले, आणि आपण २०२४ च्या उंबरठ्यावर उभे आहोत. नवीन वर्षाचे अनेकांचे अनेक संकल्प असतात. त्यातील किती तडीस जातात हा भाग निराळा. पण संकल्प करण्यातही एक वेगळीच मजा असते.

नवीन वर्षापासून, जमेल तितके लिहिते व्हावे, हा संकल्प उत्पन्न झाला. अर्थात, आपण लिहिते झाल्यावर, ‘वाचते’ व्हावे असा संकल्प घेणारे काही महाभाग ही असावेत, ही अपेक्षा अगदीच काही गैरलागू नाही. हा विषय मनात आल्यावर, वरील संस्कृत सुभाषित आयतेच आठवले. अर्थात, त्या सुभाषितात, वक्ता, आणि दाता यांचे गुणगान केले आहे. “शंभरात एखादाच शूर असतो, हजारात एखादाच पण्डित असतो, वक्ता (येथे उत्तम वक्ता अभिप्रेत असावा) दहा हजारात एखादाच असतो, तर ‘दाता’ मात्र दुर्मिळ असतो “वा, न, वा”- म्हणजे असतो किंवा असत नाही”, असा या सोप्या सुभाषिताचा सोपा अर्थ. पण आजकालची परिस्थिती पाहून, “वक्ता भवति प्रत्येकः, श्रोता भवति वा न वा” असे म्हणण्यासारखी परिस्थिती दिसून येते. हा प्रत्यय आपल्याला पदोपदी येतो. म्हणूनच, ‘लिहिते’ झाल्यानंतर ‘वाचते’ होणारे वाचक ही असावे लागतात हे ओघानेच आले.अर्थात, स्वान्तः सुखाय लिहिले तर मग ती काळजी राहणार नाही. असो.

Good listening is the first step of good communication.

नवीन वर्षामध्ये या आणि अशा बऱ्याच विषयांवर बोलण्यासाठी भेटूयात.

सगळ्यांना, नवीन वर्ष २०२४ हे आत्मानुभूतीचे जावो!

-माधव भोपे