https://goodworld.in A website by Madhav Bhope

मुलांचा अभ्यास घेण्यापूर्वी १० मिनिटे हे वाचा. Spare 10 minutes to read this

happy-homework

मुलांचा अभ्यास घेण्यापूर्वी १० मिनिटे हे वाचा. Spare 10 minutes to read this

Spare 10 minutes to read this

मुलांचा अभ्यास घेण्यापूर्वी १० मिनिटे हे वाचा. Spare 10 minutes to read this

मागच्या लेखात आपण पाहिले तसे, आजकाल मुले वाढविणे अत्यंत आव्हानात्मक, challenging झाले आहे- आणि त्यात मुलांचा अभ्यास घेणे म्हणजे तर मुलांच्या आयांसाठी रोजची लढाई- आणि मुलांसाठी सुद्धा! त्यामानाने खरेच आमची पिढी खूप भाग्यवान होती. आम्ही जेंव्हा लहान होतो, तेंव्हा आमच्या आई वडिलांना आम्ही कोणत्या वर्गात आहोत एवढे माहीत असणे म्हणजे खूप होते. आणि वर्षाच्या शेवटी- पास झालोय की नापास- एवढ्यापुरता त्यांचा संबंध येई. यात कदाचित आजच्या पिढीला अतिशयोक्ति वाटेल, पण वस्तुस्थिती अशीच होती.

आता दिवसेंदिवस परिस्थिती अत्यंत वेगाने बदलत आहे, आणि मुलांच्या शिक्षणाचा ताण आई वडिलांवर जास्त येतो आहे. शाळेत मुलांना घरून करून आणण्यासाठी एवढे मोठे होमवर्क देतात, निरनिराळे प्रोजेक्ट्स देतात, जे की मुलें स्वतंत्रपणे करूच शकणार नाहीत. त्यामुळे मुलाच्या पालकांना त्यात लक्ष घालावेच लागते आणि त्यातून घरोघर रोजची ‘लढाई’ नित्य झाली आहे.

पण दुर्दैवाची गोष्ट अशी की ही जबाबदारी पार पाडण्यासाठी काही स्किल लागू शकते, याची जाणीव फार थोड्या पालकांना असते, मग त्यांनी त्याची कुठली ट्रेनिंग घेणे तर दूर राहिले. आणि मग पालक, आपल्या आपल्या स्वभाव वैशिष्ट्यांप्रमाणे, आपल्या मर्यादित ज्ञानानुसार, मुलांचा अभ्यास घेण्याचा सोपस्कार पार पाडतात आणि पुरेशा सामंजस्याअभावी हा रोजचा अनुभव ते मूल आणि त्याची आई- दोघांसाठीही थकवणारा होतो.

त्यासाठी पालकांना काही अत्यंत मूलभूत गोष्टी माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे.

काही पालकांची अशी ठाम समजूत असते की मुलांना ‘धाकात’ ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. नाही तर मुले बिघडतील.. त्यामुळे ते कायम मुलांशी आज्ञार्थी आणि दरडावून बोलण्यावर विश्वास ठेवतात, सतत मुलांच्या चुका दाखवून त्यांना टोकत राहतात, हिणवत राहतात.  तर काही पालक या उलट मुलांचे अत्यंत लाड करतात- त्यांचा कुठलाही शब्द खाली पडू देत नाहीत- या दोन्ही टोकाच्या गोष्टी टाळायला हव्यात.

मुलांचे होमवर्क- अर्थात घरून करून आणायचा अभ्यास 

आज आपण अभ्यासाबद्दल बोलणार आहोत.

मुलांचे पालक (जास्त करून आयांना मुलांचा अभ्यास घ्यावा लागतो म्हणून आपण या ठिकाणी आयांचे उदाहरण घेणार आहोत) मुलांचा अभ्यास घ्यायला बसतात, तेंव्हा त्यांच्यात पेशन्स नसेल, आपल्या हातातील कामात आनंद घेण्याची वृत्ती नसेल, तर ते शक्यतो लवकर त्यांचे होमवर्क ‘उरकून’ घेण्याचा प्रयत्न करतात.

या ठिकाणी आईला काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे-

  1. मुलांची उपजत आणि नैसर्गिक प्रवृत्ती ही ‘खेळण्याची’ असते- त्यांना ‘खेळण्यात’ जो आनंद मिळतो तो इतर कशातही मिळत नाही- त्यामुळे मुले अभ्यासाचे रूपांतर ही खेळण्यात करू पाहतात. खरे तर आपल्यासोबत अभ्यासाला बसून, त्यांनी त्याच्या ‘खेळण्यावर’ पाणी सोडलेले असते हा त्यांच्या दृष्टीने मोठा ‘त्याग’ असतो! आईने मुलांना हसत ‘खेळत’ शिकविले तर त्यांना त्याचे अजिबात टेंशन येणार नाही.
  2. साधारण वयस्कर मनुष्यांचा attention span हा ३२ ते ५० मिनिटे असतो. हे मी बँकेच्या ट्रेनिंग सेंटर मध्ये असतांना आम्हाला सांगितले जात असे- त्यामुळे आम्ही वर्गात शिकवतांना ३५ ते ४० मिनिटां नंतर participants ला एखादा जोक सांगून, किंवा विषय बदलून, मग पुन्हा विषयावर येत असू. ५ ते ६ वर्षांच्या मुलां मध्ये हा attention span १२ ते १८ मिनिटे असतो. खाली वयानुसार attention span चा तक्ता दिला आहे.
वयानुसार लक्ष देण्याची क्षमता
• २ वर्षांची मुले: ४-६ मिनिटे
• ३ वर्षांची मुले: ६-८ मिनिटे
• ४ वर्षांची मुले: ८-१२ मिनिटे
• ५-६ वर्षांची मुले: १२-१८ मिनिटे
• ७-८ वर्षांची मुले: १६-२४ मिनिटे
• ९-१० वर्षांची मुले: २०-३० मिनिटे
• ११-१२ वर्षांची मुले: २५-३५ मिनिटे
• १३-१५ वर्षांची मुले: ३०-४० मिनिटे
• १६ आणि त्याहून अधिक वयाचे: ३२-५०+ मिनिटे

त्यामुळे, मुलांचा अभ्यास घेतांना त्यांना लागोपाठ एकेक दोन दोन तास अभ्यास करायला लावला, तर त्याचा ‘काही उपयोग’ होत नाही. ५ ते ८ वर्षाच्या मुलाला २०-२५ मिनिटांनंतर मध्ये थोडा ब्रेक घेऊ देणे हे अत्यंत आवश्यक आहे. ही शास्त्रीय माहिती फार थोड्या पालकांना असते आणि शिस्त लावायच्या नावाखाली, किंवा लवकर ‘उरकण्या’ साठी, ते मुलांना नॉनस्टॉप अभ्यासाला बसवू पाहतात, आणि त्यातून मग conflict सुरू होतो- लढाई सुरू होते! मुले चुळबूळ करायला लागतात. त्यापेक्षा मधून मधून मुलांना ब्रेक घेऊ दिला तर त्यांचा अभ्यास नीट पार पडू शकतो.child-playing

  1. मुलांना आपण काय सांगतोय ते समजले नाही तर पालक अत्यंत अधीर होतात, एवढे साधेही कसे समजत नाही म्हणून मुलावर ओरडतात. पण आपण आपल्या लहानपणी किती बुद्दू होतो हे ते विसरतात! आणि शिकवतांना मुलांवर अनेक नकारार्थी शब्दांचा भडिमार करतात! उदाहरणार्थ- उनाडक्या करायला, मोबाईल बघायला बरे आवडते, आणि अभ्यासाच्या वेळेसच बरा कंटाळा येतो! खायला पायजे नुसते! अभ्यासाच्या नांवाने बोंब नुसती! शिकला नाहीत तर कसे व्हावे- मवाली होशील! (त्या मुलाच्या शब्दकोशात ‘मवाली’ हा शब्द नसतो- तो आपण घालतो!) तसेच पालक आपले सर्व frustration, निराशा त्या मुलांवर ओततात. मुलांची आणि आपली समजण्याची पातळी एक असू शकत नाही- मुलाला समजले नाही याचा अर्थ आपण सांगण्यात कुठे तरी कमी पडतो आहोत हे त्यांनी समजून घ्यायला पाहिजे- आणि पेशन्स हा परवलीचा शब्द लक्षात ठेवला पाहिजे.

त्यापुढची पायरी म्हणजे मग मुलांवर ओरडणे, त्यांना मारणे, धमकी देणे  हे प्रकार होतात. मुले या गोष्टी अत्यंत seriously घेतात- त्यांना तुम्ही खरेच बोलताय की पोकळ धमकी देताय हे समजण्या इतपत अनुभव नसतो. पालकांनी या ठिकाणी हे लक्षात घेणे आवश्यक आहे की पालक जेंव्हा मुलांवर ओरडतात, रागावतात, त्यावेळी त्यांचा lower brain अॅक्टिवेट होतो- म्हणजे काय? तर आपले संरक्षण करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या हालचाली किंवा प्रतिक्रिया त्याच्या शरीरात आणि मनात व्हायला लागतात. त्यांच्या रक्तात  cortisol आणि adrenaline ही स्ट्रेस हार्मोन्स रिलीज होतात. Cortisol मुळे मेंदूत नवीन पाथ वेज (ज्ञान तंतूंचे मार्ग) तयार होणे कमी होते. Adrenaline मुळे  fight or flight हा रिस्पॉन्स trigger होतो. अशा वेळी त्याचा मेंदू कुठलीही उपयुक्त माहिती ग्रहण करू शकत नाही. त्यामुळे पालकांनी पण त्यांचा lower brain वापरण्या ऐवजी, त्यांचा upper brain वापरून, शांत पणे, मुलांना समजून सांगण्याची आवश्यकता असते- म्हणूनच म्हटले जाते की पालकत्व हे पालकांसाठी त्यांच्या संयमाची परीक्षा असते. मुलें स्ट्रेस मध्ये कुठलीही नवीन माहिती ग्रहण करू शकत नाहीत.brain functions

  1. मुलांना (खरे तर कोणालाही) प्रोत्साहनाची आवश्यकता असते. कौतुक, प्रोत्साहन यामुळे मनुष्यात Dopamine, Serotonin, Oxytocin, Endorphins ही happy harmones रिलीज होतात. त्यामुळे मुलांकडून उदाहरणे सोडवून घेताना, त्यांनी ५० प्रश्न सोडवले असतील, तर ते तपासतांना, त्यातील एक दोन प्रश्नांची उत्तरे चुकली असतील तर नेमके त्यावरच बोट ठेवण्या ऐवजी- आधी त्यांनी जे प्रश्न बरोबर सोडवले आहेत, त्याबद्दल त्यांना शाबासकी द्या, त्यांचे कौतुक करा-किती हुशार आहेस तू! अरे वा! बरोबर उत्तर दिलेस! शाब्बास! अशा शब्दांची मुक्तपणे उधळण करा. त्याला काही पैसे लागत नाहीत! काही पालकांचा अगदी ठाम गैरसमज असतो की मुलांचे कौतुक केले तर ती शेफारतात! त्यामुळे ती चुकूनही मुलांचे कौतुक करत नाहीत. मग मुले हिरमुसली होतात. हा खरे तर मनुष्य स्वभावाचा मूलभूत पैलू आहे! आणि यामुळे खूप गोष्टी सुकर होऊ शकतात. पण काही पालक या बाबतीत अत्यंत चिक्कू असतात.
  2. मुले के. जी, पहिली दुसरी, अशाच वर्गात असतांना सुद्धा काही पालक त्यांनी १०० पैकी शंभर मार्क मिळवलेच पाहिजेत, नाही तर अगदी आभाळ कोसळेल अशा समजुतीत असतात. त्यांनी हा समज काढून टाकायला पाहिजे. मुलांना शाळा शिकणे, अभ्यास करणे हा एक आनंदाचा अनुभव झाला पाहिजे हा उद्देश पालकांचा असला पाहिजे. मुलांचा सर्वांगीण विकास होऊ देणे हा आपला उद्देश असला पाहिजे. याबाबतीत बऱ्याच पालकांचे म्हणणे असते की, तुमच्या वेळी वेगळे होते, आजकाल स्पर्धा खूप वाढली आहे, त्यामुळे अगदी बालपणापासून मुलांकडून मेहनत करून घेतली नाही तर त्यांचे भविष्य काही बनू शकणार नाही. पण पहिली दुसरीतील, शाळेतील अंतर्गत परिक्षेतील गुणांनी मुलाच्या भवितव्यावर कितीसा परिणाम होणार आहे, आणि त्यासाठी आपण किती किंमत मोजायची, याचा सापेक्ष विचार प्रत्येक आई वडिलांनी करायचा आहे. 
  3. मुलांना जर रागावून, भीती दाखवून, धमकावून, अभ्यास करून घेण्याचा प्रयत्न केला, तर मुलें त्यांच्या स्वभावानुसार प्रतिक्रिया देतील. काही मुले जी बुजरी आहेत, ती पालकांच्या धाकाने अभ्यास करतील, पण आपला आत्मविश्वास हरवून बसतील- प्रत्येक गोष्टीत त्यांना पालकांची मदत लागेल. याउलट जी मुलें स्वभावतः आक्रमक आहेत, ती त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर अधिकाधिक आक्रमक होत जातील.frustrated-homework
  4. काही पालकांच्या मनात नक्कीच विचार येत असतील- आमच्या काळी असली काही थेरें नव्हती- छडी लागे छम छम, विद्या येई घम घम! या उक्तीप्रमाणे, मुलांना धाक दाखवला तर ती वठणीवर येतात, अन्यथा नाही. पण या बाबतीत हे लक्षात घेणे आवश्यक आहे की त्या काळची कौटुंबिक आणि सामाजिक परिस्थिती वेगळी होती. मुलांना वळण लावायला फक्त आई वडीलच नाही तर इतरही वडीलधारे असत. तसेच मुलांना आपल्या भावनांना वाट मोकळी करून द्यायला सुद्धा इतर वडीलधारे, मित्र, नातेवाईक, मोठे, लहान भाऊ बहीण असत असत. खरे तर आजोबा आणि आजी ही मुलांच्या आयुष्यातील buffer किंवा shock absorber म्हणून काम करीत. पण आजकाल न्यूक्लियर families मध्ये मुलें पूर्ण पणे isolated असतात. इतर कुणाशीही त्यांचा क्वचितच संबंध येतो. मित्र मैत्रिणीही अगदी निवडकच असतात- अशा वेळी हा छडी लागे छम छम चा वापर केला, तर त्याचा उलट परिणामच होण्याची शक्यता जास्त. आई किंवा वडिलांकडून एखादा शब्द चुकीचा गेला, तर त्याला neutralize करायला घरात इतर कोणीही नसते- किंवा काही ठिकाणी आजोबा आजी असतील तरी त्यांना मोकळेपणाने बोलण्याची सोय नसते.

त्यामुळेच मला असे वाटते, आजकालच्या आई वडिलांना मुलांना वाढवणे हे एक मोठे आव्हान आहे, आणि त्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी  त्यांनी आपली क्षमता वाढवणे अत्यंत आवश्यक आहे.

म्हणूनच मुलांचा अभ्यास घेण्या आधी १० मिनिटें या लेखात मांडलेल्या मतांवर विचार करा- आणि आपल्या मुलांचा अभ्यास हा आपल्यासाठी आणि त्यांच्यासाठी पण एक आनंद यात्रा होईल असा प्रयत्न करा!

हा लेख म्हणजे या विषयावरील मला सुचलेले विचार आहेत. या विषयाला इतर अनेक पैलू आहेत- जसे की differently abled मुलांचा विषय, एकल पालक (single parents) यांनी मुलाला कसे सांभाळावे इत्यादि. तसेच मी काही या विषयावरील तज्ञही नाही. माझी मतें ही माझ्या अनुभवातून आणि मर्यादित ज्ञानातून आलेली असल्यामुळे परिपूर्ण असतील असे नाही. पण हा विषय मांडायला ब्लॉगिंग हा एक उपयुक्त मंच उपलब्ध झाल्यामुळे ती इथे मांडायचा प्रयत्न केला आहे.

या विषयावरील आपली मतें comments मध्ये नक्की कळवा.

माधव भोपे

मुलांना वाढवतांना- हा ७-७-७ चा नियम पाळा! Bringing up children- the 7-7-7 rule.

happy-family

Bringing up children- the 7-7-7 rule.

मुलांना वाढवतांना- हा ७-७-७ चा नियम पाळा!

एक गोष्ट आपण सगळेच मान्य करू- आजकाल मुलांना वाढवणे इतके सोपे राहिले नाही, जितके की २५-३०-४० वर्षांपूर्वी होते. कौटुंबिक आणि सामाजिक परिस्थिती खूप बदलली आहे- वाढत्या वयातील मुलांच्या पालकांचा ताण खूप वाढला आहे- आई आणि वडील दोघेही नोकरी करणारे असतील, आणि घरात कोणी वडीलधारे नसतील तर ही परिस्थिती आणखीच बिकट होते.

आजकाल लग्नें खूप थाटामाटाने लावून देतात. लग्न झाल्यानंतर लवकरच दोघेही आई वडील होतात. पण मुलें जशी जशी मोठी व्हायला लागतात, त्यांचे सुरुवातीचे गोड बालपण संपून हळू हळू ती ४-५-६- वर्षांची होतात, के. जी. किंवा शाळेत जाऊ लागतात, तसे तसे त्यांना कसे handle करावे, असा प्रश्न पडू लागतो. खरे तर मूल झाल्यानंतर आईवडिलांचे खरे शिक्षण सुरू होते, त्यांच्या स्वभावाचा, त्यांच्या पेशन्सचा, त्यांच्या संवाद कौशल्याचा, कस लागतो- मुलें आई वडिलांच्या संयमाची परिक्षा पाहतात- आणि बरेच आई वडील या परिक्षेत सपशेल फेल होतात आणि मुलांवर चिडणे, रागावणे, ओरडणे, मारणे, इत्यादि प्रकार सुरू होतात. कधी कधी त्यामुळे एकमेकांवर चिडणे ही सुरू होते.angry-mother

याचे कारण म्हणजे पालकत्व parenting- शिकण्यासाठी वेगळे काही करावे लागेल- शिकावे लागेल, आपल्या स्वभावात काही बदल घडवावे लागतील असे या ‘नवजात’ (!) आई वडिलांच्या गावीही नसते. त्याउलट मूल थोडेसे समजायच्या वयाचे झाले की त्याच्यावर तथाकथित  ‘संस्कार’ करणे ही आपली जबाबदारी, जन्मसिद्ध अधिकार आहे असा पक्का ग्रह प्रत्येक आई वडिलांचा असतो.

खरं तर मूल हे तुम्ही काय ‘सांगता’ यापेक्षा प्रत्येक प्रसंगात तुम्ही कसे ‘वागता’, तुमची काय प्रतिक्रिया असते, देहबोली, आवाजाचा ‘टोन’ डोळे, चेहऱ्यावरचा भाव, इत्यादि कसे आहेत, यावरून शिकत असते, आणि आईवडिलांच्या ‘सांगण्या’ पेक्षा त्यांचे ‘वागणे’ हे अनुकरण करीत असते, आत्मसात करीत असते. एखाद्या आईला छोट्या छोट्या गोष्टींवर कपाळावर हात मारून घ्यायची सवय असेल तर मूल लगेच ती उचलते. मुलाचे वडील जर मोबाईल बघत बघत जेवत असतील तर मूलही तसेच करते.

मुलांना मोठे करण्यात आई वडील दोघांचाही सहभाग असला, तरी त्यात आईचा वाटा खूप जास्त असतो, कारण मुलाजवळ २४ तास राहणारी आईच असते. आणि आपल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मुलांना आईचा सहभाग आणि सहवास हवा असतो. अर्थात मुलांकडून योग्य त्या गोष्टी करून घेण्यासाठी, त्यांना अयोग्य गोष्टींपासून परावृत्त करण्यासाठी किंवा दूर ठेवण्यासाठी, दिवसातून अनेक वेळा रागवावे लागू शकते, खरे तर मुलांना रागावत नाही ओरडत नाही असे पालक कुणीच नसतील. पण असे करतांना जर एक ७-७-७ चा गोल्डन रूल लक्षात ठेवला, तर मुलांवर त्या रागावण्याचा अनिष्ट परिणाम होणार नाही.

काय आहे तो गोल्डन रूल? प्रत्येक आईने(आणि वडिलांनीही) लक्षात ठेवावा असा हा नियम म्हणजे- दिवसातील ३ मुख्य वेळा पाळण्याचा. कोणत्या आहेत या तीन वेळा?

या तीन वेळा म्हणजे मूल जेंव्हा सकाळी झोपेतून उठते, त्यावेळचे ७ मिनिट, दुसरी वेळ म्हणजे मूल जेंव्हा शाळेतून घरी येते, त्यावेळचे ७ मिनिट, आणि तिसरी वेळ म्हणजे मूल जेंव्हा झोपी जाते, त्यापूर्वीचे ७ मिनिट- या अत्यंत महत्त्वाच्या वेळा असतात.

४ ते ७-८ वर्षांचे मूल जेंव्हा सकाळी झोपेतून उठते, तेंव्हा त्याला आई समोर पाहिजे असते. मूल जेंव्हा के. जी. किंवा शाळेत जायच्या वयाचे होते, आणि सकाळी शाळा असेल, तेंव्हा सकाळी त्याला उठवणे भाग असते. बऱ्याच आया, त्यांच्या कामाच्या ताणामुळे, सकाळी बरीच कामे लवकर आटपायची असल्यामुळे, मुलांना उठवतांनाच खूप वैतागून, आरडा ओरडा करून, मुलांना उठवतात. मुलें उठत असतांनाच बऱ्याच गोष्टी त्यांना ‘सुनावून’’ देतात. वास्तविक पाहता, झोपेतून उठण्याची ही वेळ मुलांसाठी अत्यंत ‘सेंसिटीव्ह’ असते. झोपेतून उठून, बाहेरच्या जगाच्या धावपळीशी जुळवून घेण्यात त्यांनाही बरेच प्रयत्न करावे लागतात. अर्धवट झोपेतून उठून लगेच तोंड धुणे, आंघोळ करणे, शाळेची तयारी करणे, या सर्व गोष्टी लागोपाठ कराव्या लागतात. त्यांच्यासाठी सुद्धा ही रोजची लढाई असते. अशा वेळी मुले उठतात त्यावेळची ७ मिनिटे. जर आईने त्याला थोडे मायेने, प्रेमाने, डोक्यावर हात फिरवून, दोन गोड शब्द बोलून जर झोपेतून जागे केले, फक्त ७ मिनिटे जर पेशन्स दाखविला, तर ते मूल आनंदाने उठते- आजकालची मुलेही बरीच समजूतदार झालीत. त्यांना नीट समजून सांगितले तर ती समजून घेतात- पण नेमक्या या महत्वाच्या वेळेस जर आपले फ्रस्ट्रेशन थोडे बाजूला ठेवून, त्यांच्याशी मायेने वागले नाही, तर दिवसाची सुरुवातच चिडचिड आणि राग  याने होते, आणि संबंध दिवसावर याचा परिणाम होतो.happy-child-1

दुसरी महत्त्वाची वेळ म्हणजे मूल शाळेतून घरी येते, तेंव्हा! मूल शाळेतून घरी येते, तेंव्हा त्याला आई समोर हवीच असते! आणि दिवसभर शाळेत काय काय झाले हे अगदी बारीक सारीक तपशीलांसह आईला सांगायचे असते. त्यावेळी आईने हातात कितीही महत्त्वाचे काम असले, तरी ते बाजूला ठेवून, मुलाचे म्हणणे, अगदी इंटरेस्ट दाखवून ऐकले, फक्त ७ मिनिटे! तरी मुलाचे समाधान होते. अशा वेळी बऱ्याच आया मुलाकडे दुर्लक्ष करतात, किंवा, आल्या आल्या, त्याने डबा पूर्ण संपवला नाही, दफ्तर कुठे तरी फेकून दिले, बूट नीट जागेवर ठेवले नाही, अशा काही कारणांमुळे लगेच रागवायला सुरुवात करतात. अशा वेळी खरे तर आई काही कामात असली, तरी तिने आपले लक्ष मुलाकडे आहे असे दाखवणे आवश्यक आहे- तुझ्यापेक्षा मला कोणतेही काम मोठे नाही- अशी जाणीव करून देणे आवश्यक आहे. कमीतकमी सुरुवातीचे काही सेकंद- एखादे मिनिट तरी- मुलाला, आपल्या आगमनामुळे आईला आनंद झाला आहे हे जाणवले पाहिजे-  आणि तुम्ही कोणत्या अत्यंत महत्वाच्या कामात असलात तरी- “थांब हं! मी एवढे करून आलेच!” अशी एक प्रकारे त्याची ‘परमिशन’ घेऊन हातातील काम उरकून लगेच त्याच्याकडे लक्ष दिले तर आपण आईसाठी महत्वाचे आहोत ही खात्री मुलांच्या मनात येते.happy-child-2

तिसरी महत्वाची वेळ म्हणजे रात्री झोपण्यापूर्वीची! झोपेतून उठणे आणि झोपी जाणे या दोन क्रिया एक प्रकारे transition phase असतात! त्यावेळी मुलांना आई जवळ हवी असते. आणि मुले झोपण्याच्या वेळेस कुठल्याही प्रकारे वाद विवाद करून, रागावून (तू लवकर झोपत नाहीस म्हणून) चिडून रडत रडत जर मूल झोपी गेले, तर त्याची तीच मानसिक अवस्था झोपेतही सुरू राहते, आणि सकाळीही मूल तीच मानसिक अवस्था घेऊन उठण्याची शक्यता असते. त्यामुळे आई वडिलांना मूल झोपतांना (किंवा त्याला झोपी घालतांना)ही आपल्या संयमाचा कस लावावा लागतो. दिवसभरात काहीही वाद विवाद झाले असतील, तरी झोपतांना मुलाला जवळ घेऊन, डोक्यावरून, पाठीवरून हात फिरवून, आनंदी अवस्थेत झोपी घातले, तर मुलाची झोप उत्तम प्रकारची होते आणि सकाळी उठतांना ही मूल फ्रेश मूड मध्ये उठते.mother-child

अशा प्रकारे हा ७-७-७ चा नियम जर पाळला तर बऱ्याच पालकांचे आणि त्यांच्या मुलांचे आयुष्य सुकर होईल!

वरील प्रकारे वागतांना आईला आपल्या आवडीनिवडींना, मुरड घालावी लागते- हीच स्वभाव बदलण्याची शाळा-जिच्यात आईवडिलांना नकळत प्रवेश मिळाला असतो. त्यामुळे मुलें मोठी होत असतांना- नुसती मुलें च मोठी (शहाणी) होत नाहीत, तर त्यांच्याबरोबर त्यांच्या इतकेच किंवा त्यांच्यापेक्षा जास्त त्यांच्या आई वडिलांचे- आई वडील म्हणून, आणि माणूस म्हणून- शिक्षण चालू असते!

या विषयावर आपले अनुभव आणि आपली मते जरूर कळवा.

माधव भोपे 

Navdurga Devi kavach सर्व ठिकाणी रक्षण करणारे चण्डी कवच-5

navdurga devi kavach

Navdurga Devi Kavach- The armour of the power of Goddess Durga- सर्व ठिकाणी रक्षण करणारे देवी कवच-भाग-5

भाग-1 वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

भाग-2  वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

भाग-3   वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

भाग-4    वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

मागील भागावरून पुढे चालू 

याठिकाणी, अहंकार, हा शब्द, आपला consciousness, अशा अर्थाने लक्षात घ्यायला हवा. गीतेत अहंकार हा शब्द ५ ठिकाणी आला आहे. त्यातील पाहिला उल्लेख, ७ व्या अध्यायात, चौथ्या श्लोकात आलेला आहे.

भूमिरापोऽनलो वायु: खं मनो बुद्धिरेव च |
अहङ्कार इतीयं मे भिन्ना प्रकृतिरष्टधा||

 भूमि, आप, तेज, वायू, आकाश, ही पंचमहाभूतें, आणि मन बुद्धि आणि अहंकार, या आठ प्रकारांने विभाजित असलेली ही माझी ‘अपरा’ म्हणजे जड प्रकृती आहे.

तसेंच १३ व्या अध्यायात, ५ व्या श्लोकात,

महाभूतान्यङ्ककारो बुद्धिरव्यक्त मेव च |

इन्द्रियाणि दशैकं च पञ्च चेन्द्रियगोचरा: ||

 क्षेत्र क्षेत्रज्ञ योगा मध्ये, क्षेत्राच्या वर्णनात वरील श्लोक आला आहे, पाच महाभूतें, अहंकार, बुद्धि, आणि ‘अव्यक्तम्’ एव, म्हणजे मूल प्रकृति सुद्धा, दहा इंद्रियें, एकम् म्हणजे एक ‘मन’ आणि पञ्च इन्द्रिय गोचरा, म्हणजे पाच इंद्रियांचे विषय, म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे क्षेत्र आहेत असे सांगितले आहे.

मनुष्याचे उद्दिष्ट जरी, सत्व रज, तम या तीन्ही गुणांच्या पलीकडे जाण्याचे असले, आणि मन, बुद्धि आणि अहंकार यांच्या अतीत असलेले तत्व जाणून घेण्याचे असले, तरी, जो पर्यंत ते उद्दिष्ट प्राप्त होत नाही, तोपर्यंत, ही सर्व ‘instruments’ सुस्थितीत रहावीत हीच प्रार्थना देवीकडे केली आहे.

आपण नेहमी वापरतो त्या अर्थाने अहंकार हा शब्द, किंवा त्याचे रूप, गीतेच्या  खालील श्लोकांमध्ये आले आहे, ते जिज्ञासूंनी पाहावे. (अध्याय- श्लोक)

१६-१८; १८-१७;, १८- ५८,५९.

आपण ४२ व्या श्लोकापर्यंत अर्थ पाहिला. देवी कवच एकूण ५६ श्लोकांचे आहे. उर्वरित १४ श्लोकांबद्दल थोडक्यात पाहू.

पदमेकं न गच्छेतु यदीच्छेच्छुभमात्मनः।
कवचेनावृतो नित्यं यत्र यत्रैव गच्छति॥43

 

मनुष्य आपले शुभ इच्छित असेल तर कवचाशिवाय एक पाऊल ही पुढे टाकू नये. (या स्तोत्राचे महत्व अधोरेखित करण्यासाठी हा श्लोक आहे असे वाटते.)

तत्र तत्रार्थलाभश्च विजयः सार्वकामिकः।
यं यं चिन्तयते कामं तं तं प्राप्नोति निश्चितम्‌।

परमैश्वर्यमतुलं प्राप्स्यते भूतले पुमान्‌॥44

 

कवचाने सुरक्षित मनुष्य जिथे जिथे जाईल तिथे तिथे त्याला धन प्राप्ति होईल आणि पूर्ण कामनांची सिद्धि करवणाऱ्या विजयाची प्राप्ति होईल. तो ज्या ज्या अभीष्ट वस्तूचे चिन्तन करेल त्या त्या वस्तूची त्याला निश्चित प्राप्ति होईल. तो पुरुष या पृथ्वीवर तुलनारहित महान ऐश्वर्य प्राप्त करील.

निर्भयो जायते मर्त्यः संग्रामेष्वपराजितः।

त्रैलोक्ये तु भवेत्पूज्यः कवचेनावृतः पुमान्‌॥45

 

कवचाने सुरक्षित मनुष्य निर्भय होतो. युद्धात त्याचा पराजय होत नाही आणि तो तीन्ही लोकांत पूजनीय होतो.

इदं तु देव्याः कवचं देवानामपि दुर्लभम्‌।
यः पठेत्प्रयतो नित्यं त्रिसन्ध्यं श्रद्धयान्वितः॥46

 

देवीचे हे कवच, देवांनाही दुर्लभ आहे. जो रोज नियमपूर्वक तीन्ही संधीकाळी (सकाळ, दुपार, संध्याकाळ) श्रद्धेने या स्तोत्राचा पाठ करतो,

दैवी कला भवेत्तस्य त्रैलोक्येष्वपराजितः।
जीवेद् वर्षशतं साग्रमपमृत्युविवर्जितः॥47

 

त्याला दैवी कला प्राप्त होते, आणि तो तीन्ही लोकांमध्ये कधीही पराजित होत नाही. तो अपमृत्यू पासून रहित होतो, आणि शताधिक वर्षेंपर्यंत जीवित राहतो.

नश्यन्ति व्याधयः सर्वे लूताविस्फोटकादयः।
स्थावरं जंगमं चैव कृत्रिमं चापि यद्विषम्‌॥48

 

(लूत आणि विस्फोटक हे व्याधींचे प्रकार आहेत) या व्याधी नष्ट होतात त्याच्यावर, स्थावर, जंगम आणि कृत्रिम विषाचा काहीही परिणाम होत नाही. [कण्हेर, भांग, अफू, धत्तुरा, आदींचे ‘स्थावर’ विष म्हटले जाते. साप, विंचू इत्यादि विषारी प्राणी चावल्यामुळे चढलेले म्हणजे, ‘जंगम’ विष, आणि, अहिफेन (अफू) आणि तेल यांच्या संयोगाने किंवा, तत्सम विविध वस्तूंच्या संयोगाने बनलेले कृत्रिम विष]


अभिचाराणि सर्वाणि मन्त्रयन्त्राणि भूतले।
भूचराः खेचराश्चैव जलजाश्चोपदेशिकाः॥49

 

या पृथ्वीतलावर मारण, मोहन आदि जितके अभिचार प्रयोग आहेत, तसेंच अशा प्रकारचे जितकेही मंत्र यंत्र आहेत, ते सर्व, या कवचाला हृदयात धारण केल्याने त्या मनुष्याला पाहताच नष्ट होतात. पृथ्वीवर विचरणारे ग्रामदेवता, आकाशचारी देवविशेष, जलदेवता, उपदेश मात्राने सिद्ध होणारे निम्न कोटीचे देवता,

 

सहजा कुलजा माला डाकिनी शाकिनी तथा।
अन्तरिक्षचरा घोरा डाकिन्यश्च महाबलाः॥50

 

ग्रहभूतपिशाचाश्च यक्षगन्धर्वराक्षसाः।
ब्रह्मराक्षसवेतालाः कूष्माण्डा भैरवादयः॥51

 

नश्यन्ति दर्शनात्तस्य कवचे हृदि संस्थिते।
मानोन्नतिर्भवेद् राज्ञस्तेजोवृद्धिकरं परम्‌॥52

 

आपल्या जन्माच्या बरोबर प्रकट होणारे देवता (सहजा) कुलदेवता, माला (कंठमाला इत्यादि), डाकिनी, शाकिनी, अंतरिक्षामध्ये विचरणाऱ्या घोर डाकिनी, ग्रह, भूत, पिशाच, यक्ष, राक्षस, गंधर्व, ब्रम्हराक्षस, वेताळ, कूष्मांड आणि भैरव आदि अनिष्टकारक देवता सुद्धा हे कवच हृदयात धारण केलेल्या मनुष्याला पाहूनच पळून जातात. कवचधारी पुरुषाला राजासमान वृद्धि प्राप्त होते.

(वरील विवरणात दिलेल्या ‘कुलदेवता’ या शब्दाचा आपापल्या कुलदेवते सोबत गल्लत करू नये. वरील सर्व क्षुद्र देवता म्हणवल्या जातात, आणि निरनिराळ्या योनितल्या देवता आहेत, ज्या की त्या त्या पातळीवर exist होतात.)

यशसा वर्धते सोऽपि कीर्तिमण्डितभूतले।

जपेत्सप्तशतीं चण्डीं कृत्वा तु कवचं पुरा॥53

यावद्भूमण्डलं धत्ते सशैलवनकाननम्‌।
तावत्तिष्ठति मेदिन्यां संततिः पुत्रपौत्रिकी॥54

 

कवचाचा पाठ करणारा पुरुष आपल्या कीर्तीने विभूषित भूतलावर सुयशासाहित वृद्धीला प्राप्त होतो. जो प्रथम कवचाचा पाठ करून मग सप्तशतीचा चण्डी पाठ करतो तो, जोपर्यन्त वन, पर्वत, आणि काननासाहित ही पृथ्वी टिकून रहाते, तोपर्यंत त्याची पुत्र, पौत्र आदि संतान परंपरा कायम राहते.

देहान्ते परमं स्थानं यत्सुरैरपि दुर्लभम्‌।
प्राप्नोति पुरुषो नित्यं महामायाप्रसादतः॥55

 

नंतर, देहाचा अंत होतो, तेंव्हा, तो पुरुष भगवती महामायेच्या प्रसादाने त्या नित्य परम पदाला प्राप्त होतो, जे की देवांलाही दुर्लभ आहे.

लभते परमं रूपं शिवेन सह मोदते॥ॐ॥56

तो सुंदर दिव्य रूप धारण करतो आणि शिवासहित आनंदाचा भागीदार होतो.

आजकालच्या मनोविज्ञानात सकारात्मक विचारांचे महत्व अधोरेखित केलेले आहे. आपली संस्कृति पाहिली, तर पावलोपावली, मनाला नकारात्मक विचारांपासून परावृत्त करून  सकारात्मक विचारांकडे जाणीवपूर्वक घेऊन जाण्याचा प्रयत्न दिसतो, जो की खूप महत्त्वाचा आहे. आजकाल आपल्या अवतीभोवती सगळीकडे आसुरी विचार आणि आचार बोकाळलेले दिसतात, आणि तेच कसे नॉर्मल आहेत असे उदात्तीकरण केले जाते. अशा काळात, अशा मंगल आणि सकारात्मक विचारांनी भरलेल्या आपल्या पुरातन ठेव्याचे आपण जतन केले पाहिजे असे प्रकर्षाने वाटते.  

ॐ शांतिः शांतिः शांतिः!

माधव भोपे

Navdurga Devi kavach सर्व ठिकाणी रक्षण करणारे चण्डी कवच-3

navdurga devi kavach

Navdurga Devi Kavach- The armour of the power of Goddess Durga- सर्व ठिकाणी रक्षण करणारे देवी कवच-भाग-3

भाग-1 वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

भाग-2  वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

मागील भागावरून पुढे चालू 

आता आपण  १७ व्या श्लोकापासून ते ४२ व्या श्लोकापर्यंत जे देवी कवच आहे, त्याची विशेषता पाहू:

त्राहि मां देवि दुष्प्रेक्ष्ये शत्रूणां भयवर्धिनी ।

प्राच्यां रक्षतु मामैन्द्री आग्नेय्यामग्निदेवता॥१७॥

दक्षिणेऽवतु वाराही नैर्ऋत्यां खड्गधारिणी।

प्रतीच्यां वारुणी रक्षेद् वायव्यां मृगवाहिनी॥१८॥

उदीच्यां पातु कौमारी ऐशान्यां शूलधारिणी।

ऊर्ध्वं ब्रह्माणि मे रक्षेदधस्ताद् वैष्णवी तथा ॥१९॥

एवं दश दिशो रक्षेच्चामुण्डा शववाहना।

जया में चाग्रतः पातु विजया पातु पृष्ठतः॥२०॥

अजिता वामपार्श्वे तु दक्षिणे चापराजिता।

शिखामुद्योतिनी रक्षेदुमा मूर्ध्नि व्यवस्थिता॥२१॥

मालाधारी ललाटे च भ्रुवौ रक्षेद् यशस्विनी।

त्रिनेत्रा च भ्रुवोर्मध्ये यमघण्टा च नासिके॥२२॥

शंखिनी चक्षुषोर्मध्ये श्रोत्रयोर्द्वारवासिनी।

कपोलौ कालिका रक्षेत्कर्णमूले तु शांकरी॥२३॥

नासिकायां सुगन्धा च उत्तरोष्ठे च चर्चिका।

अधरे चामृतकला जिह्वायां च सरस्वती॥२४॥

दन्तान्‌ रक्षतु कौमारी कण्ठदेशे तु चण्डिका।

घण्टिकां चित्रघण्टा च महामाया च तालुके॥२५॥

कामाक्षी चिबुकं रक्षेद् वाचं मे सर्वमंगला।

ग्रीवायां भद्रकाली च पृष्ठवंशे धनुर्धरी॥२६॥

नीलग्रीवा बहिःकण्ठे नलिकां नलकूबरी।

स्कन्धयोः खड्गिनी रक्षेद् बाहू में व्रजधारिणी॥२७॥

हस्तयोर्दण्डिनी रक्षेदम्बिका चांगुलीषु च।

नखाञ्छूलेश्वरी रक्षेत्कुक्षौ रक्षेत्कुलेश्वरी॥२८॥

स्तनौ रक्षेन्महादेवी मनः शोकविनाशिनी।

हृदये ललिता देवी उदरे शूलधारिणी॥२९॥

नाभौ च कामिनी रक्षेद् गुह्यं गुह्येश्वरी तथा।

पूतना कामिका मेढ्रं गुदे महिषवाहिनी॥३०॥

कट्यां भगवती रक्षेज्जानुनी विन्ध्यवासिनी।

जंघे महाबला रक्षेत्सर्वकामप्रदायिनी॥३१॥

गुल्फयोर्नारसिंही च पादपृष्ठे तु तैजसी।

पादांगुलीषु श्री रक्षेत्पादाधस्तलवासिनी॥३२॥

नखान्‌ दंष्ट्राकराली च केशांश्चैवोर्ध्वकेशिनी।

रोमकूपेषु कौबेरी त्वचं वागीश्वरी तथा॥३३॥

रक्तमज्जावसामांसान्यस्थिमेदांसि पार्वती।

अन्त्राणि कालरात्रिश्च पित्तं च मुकुटेश्वरी॥३४॥

पद्मावती पद्मकोशे कफे चूडामणिस्तथा।

ज्वालामुखी नखज्वालामभेद्या सर्वसंधिषु॥३५॥

शुक्रं ब्रह्माणि मे रक्षेच्छायां छत्रेश्वरी तथा।

अहंकारं मनो बुद्धिं रक्षेन्मे धर्मधारिणी॥३६॥

प्राणापानौ तथा व्यानमुदानं च समानकम्‌।

वज्रहस्ता च मे रक्षेत्प्राणं कल्याणशोभना॥३७॥

रसे रूपे च गन्धे च शब्दे स्पर्शे च योगिनी।

सत्त्वं रजस्तमश्चैव रक्षेन्नारायणी सदा॥३८॥

आयू रक्षतु वाराही धर्मं रक्षतु वैष्णवी।

यशः कीर्तिं च लक्ष्मीं च धनं विद्यां च चक्रिणी॥३९॥

गोत्रमिन्द्राणि मे रक्षेत्पशून्मे रक्ष चण्डिके।

पुत्रान्‌ रक्षेन्महालक्ष्मीर्भार्यां रक्षतु भैरवी॥४०॥

पन्थानं सुपथा रक्षेन्मार्गं क्षेमकरी तथा।

राजद्वारे महालक्ष्मीर्विजया सर्वतः स्थिता॥४१॥

रक्षाहीनं तु यत्स्थानं वर्जितं कवचेन तु।

तत्सर्वं रक्ष मे देवि जयन्ती पापनाशिनी॥४२॥

यात प्रथम सर्व दिशांचा उल्लेख असून दाही दिशांना देवी माझे रक्षण करो, अशी प्रार्थना आहे. तसेच, मागून पुढून, डाव्या, उजव्या बाजूकडून रक्षण करो. तद्नंतर, शेंडी पासून सर्व अवयवांचे रक्षण करण्याविषयी तपशीलवार आले आहे. शेंडी, मस्तक, ललाट (कपाळ), भुवया, भ्रुवोर्मध्य, दोन्ही डोळ्यांचा मध्य, नाकपुड्या, कान, कपोल(म्हणजे गाल), कानाचे मूळ (कर्णमूळ), नाक, वरचा ओठ, खालचा ओठ, दात, कन्ठ, गळ्याची घाटी, तालु, चिबुक म्हणजे हनुवटी, बोलण्याची शक्ति म्हणजे वाणी, कण्ठाचा बाहेरील भाग, कण्ठनळी, दोन्ही खांदे, दोन्ही दंड, दोन्ही हात, त्यांची बोटें,  आणि नखें, पोट, दोन्ही स्तन, हृदय, उदार, नाभी, गुह्यभाग, (मेढ्र)लिङ्ग, गुदा, कटिभाग, गुडघे(जानुनी विन्ध्यवासिनी), दोन्ही जंघा (म्हणजे मराठीत पोटऱ्या), गुल्फ म्हणजे पायाचे घोटे ज्याला इंग्लिश मध्ये ankle म्हणतात. पायांचा पृष्ठ भाग, पायांची बोटें, पायांचे तळवे,  नखें, केश, रोमकूप म्हणजे शरीरावरील रोमावली. त्वचा,

रक्त, मज्जा, वसा, मांस, हाडे, मेद; आंत (आंतडे), 

एवढेच नव्हे, तर, शरीरातील पित्त, कफ, नखांचे तेज, शरीरातील समस्त संधि,

वीर्य, छाया (सावली), प्राण अपान इत्यादि पंचप्राण, अहंकार, मन बुद्धि

एवढेच नाही, तर रस, रूप, गंध, शब्द आणि स्पर्श या विषयांचा अनुभव, सत्वगुण, रजोगुण, तमोगुण,

आयु,

धर्म, यश, कीर्ति, लक्ष्मी, धन, विद्या

वरील सर्व गोष्टी स्वतः च्या संदर्भातील झाल्या,

आता त्यानंतर, गोत्र, पशु, पुत्र, पत्नी यांचे रक्षण करण्याविषयी प्रार्थना आहे

राजाच्या दरबारात तसेच सर्व भयापासून रक्षण करण्याविषयी प्रार्थना आहे.

एवढे कमी आहे की काय, म्हणून शेवटी असे म्हटले आहे, की वरील वर्णनात जर एखादे स्थान राहून गेले असेल तर त्याचे ही रक्षण कर.

इतका comprehensive विचार केला आहे, हे बघून मन थक्क होते.

क्रमशः

माधव भोपे 

Navdurga Devi kavach सर्व ठिकाणी रक्षण करणारे चण्डी कवच-4

navdurga devi kavach

Navdurga Devi Kavach- The armour of the power of Goddess Durga- सर्व ठिकाणी रक्षण करणारे देवी कवच-भाग-4

भाग-1 वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

भाग-2  वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

भाग-3   वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

मागील भागावरून पुढे चालू 

१७ व्या श्लोकाच्या दुसऱ्या ओळीपासून कवच सुरु होते.

प्राच्यां रक्षतु मामैन्द्री आग्नेय्यामग्निदेवता॥17॥

पूर्व दिशेला ऐन्द्री (इंद्र शक्ति), तू माझे रक्षण कर. आग्नेय दिशेला अग्निशक्ति तू माझे रक्षण कर.

आठ दिशांची माहिती आपणा सर्वांना आहेच. तरीही, उजळणीसाठी आपण अष्टदिशांचे चित्र पाहू

Durgadevi kavach

देवी कवचामध्ये पूर्व दिशेपासून सुरुवात करून, आग्नेय, दक्षिण, नैऋत्य, पश्चिम, वायव्य, उत्तर, ईशान्य अशाप्रकारे क्रमाने सर्व दिशांनी ती देवी माझे रक्षण करो अशी प्रार्थना केलेली आहे. वरील आठ दिशांच्या शिवाय, ऊर्ध्व आणि अध अर्थात वर आणि  खाली या प्रकारे १० दिशा झाल्या. म्हणून एवं दश दिशो रक्षेच्चामुण्डा शववाहना।

याशिवाय, पुढे, मागे, डावीकडे आणि उजवीकडे:–अग्रतः म्हणजे पुढे, आणि  पृष्ठतः म्हणजे मागे, जया आणि विजया देवी माझे रक्षण करोत. डाव्या बाजूला अजिता आणि दक्षिण म्हणजे उजव्या बाजूला अपराजिता माझे रक्षण करो. १७ ते ४२ या श्लोकांत विविध अंगांचे आणि संकल्पनांचे रक्षण करण्याविषयी देवीची विविध नांवे घेऊन प्रार्थना केली आहे.

कवचामध्ये उल्लेख केलेले विविध अवयव आणि त्यांचे रक्षण करणाऱ्या विविध देवतांची माहिती बघूयात

1

शिखा (शेंडी)

उद्योतिनी

2

मूर्ध्नि (मस्तक भाग)

उमा

3

ललाट (कपाळ)

मालाधरी

4

भुवया

यशस्विनी

5

भ्रूमध्य

त्रिनेत्रा

6

नाकपुड्या (नासिका)

यमघण्टा

7

दोन्ही डोळ्यांचा मध्यभाग

शङ्खिनी

8

श्रोत्र (कान)

द्वारवासिनी

9

कपोल (गाल)

कालिका

10

कर्णमूल

शांकरी

11

नासिका (नाक): इथे नाकपुड्या आणि नाक हे दोन वेगवेगळे कल्पिले आहेत)

सुगन्धा

12

उत्तरोष्ठ(वरील ओठ)

चर्चिकादेवी

13

अधरोष्ठ(खालचा ओठ)

अमृतकला

14

जिंव्हा

सरस्वती

15

दात

कौमारी

16

कण्ठप्रदेश

चण्डिका

17

घण्टिका (गळ्याची घाटी)

चित्रघण्टा

18

तालुका (टाळू)

महामाया

19

चिबुक (हनुवटी)

कामाक्षी

20

वाचा

सर्वमङ्गला

21

ग्रीवा (गळा)

भद्रकाली

22

पृष्ठवन्श(मेरुदण्ड्)

धनुर्धरी

23

बहिः कण्ठ(कण्ठाचा बाहेरील भाग)

नीलग्रीवा

24

नलिका(कण्ठनळी)

नलकूबरी

25

स्कन्धयोः (दोन्ही खांदे)

खड्गिनी

26

दोन्ही बाहू म्हणजे दण्ड

वज्रधारिणी

27

दोन्ही हात

दण्डिनी

28

अङ्गुली(हाताची बोटें)

अम्बिका

29

नखें

शूलेश्वरि

30

कुक्षि (कोख, उदर) पहा: वामकुक्षी

कुलेश्वरी

31

स्तन

महालक्ष्मी

32

मन

शोकविनाशिनी

33

हृदय

ललितादेवी

34

उदर

शूलधारिणी

35

नाभि

कामिनी

36

गुह्य

गुह्येश्वरी

37

मेढ्र(लिंग)

पूतना आणि कामिका

38

गुदा

महिषवाहिनी

39

कटी (कंबर)

भगवती

40

जानु (गुडघे)

विन्ध्यवासिनी

41

जंघा(म्हणजे पोटऱ्या)

महाबला, सर्व कामना पूर्ण करणारी

42

गुल्फ(पायाचे घोटे)

नारसिंही

43

पादपृष्ठ(पायांचा वरचा भाग)

तैजसी

44

पायाची बोटें

श्री देवी

45

पायाचे तळवे

तलवासिनी

46

नखें(पायाची)

दंष्ट्राकराली

47

केश

ऊर्ध्वकेशिनी

48

रोमकूप अर्थात, शरीरावरील रोमछिद्र

कौबेरी

49

त्वचा

वागीश्वरी

50

रक्त, मज्जा, वसा,मांस, अस्थि, मेद

सप्त धातूंपैकी सहा धातू: रक्त-blood, मज्जा- bone marrow and nervous tissue,

वसा-म्हणजे रक्तामध्ये स्थित स्नेह (ज्याला आजकालच्या भाषेत fatty acid म्हणता येईल), मांस म्हणजे स्नायू म्हणता येईल, अस्थि म्हणजे हाडें, आणि मेद म्हणजे चरबी किंवा fat. वरील सर्व गोष्टी आपल्या शरीरासाठी आवश्यक आहेत हे ओघानेच आले.

पार्वति

51

अंत्र म्हणजे आतडे किंवा gut.

कालरात्री

52

पित्त (शरीरात अन्न पचविण्यासाठी पित्त आवश्यक आहे) म्हणजेच वेगवेगळे पाचक रस.

मुकुटेश्वरी

53

पद्मकोश म्हणजे मूलाधार आदि कमलकोश

पद्मावती

54

कफ (कफ म्हणजे आपण समजतो तसा चिकट पदार्थ नव्हे, आयुर्वेदात कफ संकल्पना वेगळी आहे)

चूडामणी

55

नखांचे तेज

ज्वालामुखी

56

शरीरातील समस्त संधि (सांधे)

अभेद्या (जिचे भेदन कोणतेही अस्त्र करू शकत नाही)

57

शुक्र

ब्रह्माणी

58

छाया

छात्रेश्वरी

59

अहंकार, मन, बुद्धि

धर्मधारिणी

60

प्राण, अपान, व्यान, उदान, समान हे पंचप्राण

वज्रहस्ता

61

प्राण

कल्याण शोभना

62

रस, रूप, गन्ध, शब्द, स्पर्श, हे पाच विषय ग्रहण करतांना

योगिनी

63

सत्व, रज आणि तम हे तिन्ही गुण

नारायणी

64

आयुष्य

वाराही

65

धर्म

वैष्णवी

66

यश, कीर्ति, लक्ष्मी, धन, विद्या

चक्रिणी

67

गोत्र

इंद्राणी

68

पशू

चंडिका

69

पुत्राचे रक्षण

महालक्ष्मी

70

भार्येचे रक्षण

भैरवी

71

पंथ (अर्थात, while travelling)

सुपथा

72

मार्ग

क्षेमकरी

73

राजाच्या दरबारी

महालक्ष्मी

74

सर्व ठिकाणी

विजया

आपल्याकडे सर्व देवांची कवचें प्रसिध्द आहेत. रामरक्षा हेही एक प्रकारचे कवच आहे, आणि   डोक्यापासून ते पायापर्यंत च्या अवयवांचा उल्लेख आहे. आपल्यापैकी काहींनी योगनिद्रेचा class कधी केला असेल. त्यामध्ये, शरीराच्या एकेक अवयवांवर आपला consciousness घेऊन जाऊन, शरीराचा तो तो भाग शिथिल होत आहे, अशी कल्पना करायची असते.

देवी कवचामध्ये आपल्या शरीराचे बाह्यभाग, आणि बरेच अंतर-अवयव यांच्या कडे आपले ध्यान  (consciousness) घेऊन जाऊन, त्या त्या भागांना, किंवा, अंतर्गत अवयवांना, देवीच्या एकेक नावाशी, रूपाशी, जोडले आहे, आणि त्या त्या भागाचे रक्षण करण्याची प्रार्थना केली आहे. या कवचात स्थूल अवयवांसोबत काही सूक्ष्म गोष्टी, आणि काही concepts ही जोडले आहेत. त्यातील, सत्व, रज आणि तम हे गुण, रस, रूप, गन्ध, शब्द, स्पर्श, हे पाच विषय ग्रहण करणारी इंद्रियें. (बाह्य इंद्रियें नव्हे, तर त्या त्या संवेदना जाणवणारी मेंदूतील centres), यांचा उल्लेख आहे.

वरील सर्व गोष्टी लक्षात येऊ शकतात. तसेच, मन आणि बुद्धि यांचे रक्षण कर, हेही लक्षात येऊ शकते. पण अहंकार? आपल्या मनात कदाचित अशी शंका येऊ शकते, की माझ्या अहंकाराचे रक्षण कर, असे कसे म्हटले जाऊ शकते? कारण अहंकार हा शब्द आपल्याकडे सहसा तो मनुष्य फार अहंकारी आहे, म्हणजे गर्विष्ठ आहे, अशा अर्थाने वापरला जातो. अहंकाराचा त्याग करा, असेच सर्व ठिकाणी सांगितल्याचे ऐकायला, वाचायला, येते. मग अहंकाराचे रक्षण कर असे कसे?

याबद्दल वाचूयात पुढील भागात 

क्रमशः

माधव भोपे 

Navdurga Devi kavach सर्व ठिकाणी रक्षण करणारे चण्डी कवच-2

navdurga devi kavach

Navdurga Devi Kavach- The armour of the power of Goddess Durga- सर्व ठिकाणी रक्षण करणारे देवी कवच-भाग-2

मागील लेखावरून पुढे चालू 

भाग-1 वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

श्री दुर्गा सप्तशती हा ग्रंथ, जो की देवी माहात्म्य या नावानेही ओळखला जातो, याच्यात एकूण १३ अध्याय आणि ७०० श्लोक आहेत. ७०० श्लोक असल्यामुळेही याला सप्तशती असे म्हणतात. (श्रीमद्भग्वद्गीते मध्येही ७०० श्लोक आहेत.) हे ७०० श्लोक म्हणजे मार्कंडेय पुराणामधील अध्याय ८१ ते ९३ आहेत. आपल्याकडे १८ पुराणे आहेत. भागवत पुराण, विष्णू पुराण, नारदीय पुराण, वामन पुराण, मत्स्य पुराण, गरुड पुराण, ब्रह्म पुराण, भविष्य पुराण, अग्नि पुराण, ब्रम्ह्वैवर्त पुराण, ब्रम्हानंद पुराण, पद्म पुराण, शिव पुराण, लिंग पुराण, कूर्म पुराण, मार्कंडेय पुराण, वराह पुराण आणि स्कंद पुराण या १८ पुराणांपैकी १६ वे हे  मार्कंडेय पुराण आहे.

देवी कवच ही मार्कंडेय पुराणाचाच भाग आहे. आणि ग्रंथ वाचकाच्या अंग प्रत्यंगांचे रक्षण करण्याचे काम करते.

श्री दुर्गा सप्तशतीच्या १३ अध्यायांमध्ये खालील प्रमाणे वर्णन आहे.

अध्याय

श्लोक

वर्णन

१०४

मधुकैटभ वध

६९

महिषासुर सेना वध

४४

महिषासुर वध

४२

देवतांकडून देवीची स्तुती

१२९

देवतांकडून देवीची स्तुती आणि चण्ड मुण्ड देवीला शुम्भ निशुम्भा चा निरोप

२४

धूम्रलोचन वध

२७

चण्ड मुण्ड वध

8

६३

रक्तबीज वध

४१

निशुम्भ वध

१०

३२

शुम्भ वध

११

५५

देवी स्तुति- वरदान

१२

४१

पाठ माहात्म्य

१३

२९

सुरथ आणि वैश्याला इच्छित वर प्राप्ति

एकूण

७००

 

आता आपण देवी कवचा च्या पुढील काही श्लोकांचा अर्थ पाहू.

अग्निना दह्यमानस्तु शत्रुमध्ये गतो रणे।

विषमे दुर्गमे चैव भयार्ताः शरणं गताः॥6॥

न तेषां जायते किंचिदशुभं रणसंकटे।

नापदं तस्य पश्यामि शोकदुःखभयं न हि॥7॥

यैस्तु भक्त्या स्मृता नूनं तेषां वृद्धिः प्रजायते।

ये त्वां स्मरन्ति देवेशि रक्षसे तान्न संशयः॥8॥

प्रेतसंस्था तु चामुण्डा वाराही महिषासना।

ऐन्द्री गजसमारूढा वैष्णवी गरुडासना॥9॥

माहेश्वरी वृषारूढा कौमारी शिखिवाहना।

लक्ष्मीः पद्मासना देवी पद्महस्ता हरिप्रिया॥10॥

श्वेतरूपधरा देवी ईश्वरी वृषवाहना।

ब्राह्मी हंससमारूढा सर्वाभरणभूषिता॥11॥

श्लोक ६-७:  जो मनुष्य अग्नीत जळत असेल, रणभूमी मध्ये शत्रूंनी घेरला गेला असेल, विषम संकटामध्ये सापडला असेल, आणि अशा प्रकारे भयाने आतुर होऊन देवीला शरण आला असेल, त्याचे काहीही अशुभ (अमंगल) होत नाही; युद्धाच्या संकटामध्येही त्याच्यावर कोणतीही विपत्ति येत नाही, त्याला शोक, दुःख आणि भय प्राप्त होत नाही.

वरील विपत्तींना वाच्यार्थाने न घेता, लक्ष्यार्थाने घ्यावे. कारण वरील प्रकारच्या विपत्ति आजकालच्या कालात येणे दुर्मिळ असले, तरी, तत्सम प्रसंग मात्र मनुष्याच्या आयुष्यात नित्यच येत असतात.

श्लोक ८: ज्यांनी भक्तिपूर्वक देवीचे स्मरण केले आहे, त्यांचा नक्कीच अभ्युदय (वृद्धिः) होतो. हे देवेश्वरी, जे तुझे चिन्तन करतात, त्यांचे तू निःसंदेह रक्षण करतेस.

 आता खालील ९ ते ११ या श्लोकांमध्ये योगशक्तीने संपन्न देवीच्या विविध रूपांचे वर्णन आहे.

प्रेतसंस्था तु चामुण्डा:  सप्तशतीच्या ७व्या अध्यायात चण्ड आणि मुण्ड राक्षसांच्या वधाचे वर्णन आहे.

 सहाव्या अध्यायात शुम्भ निशुम्भाने पाठविलेल्या धूम्रलोचन राक्षसाचा देवीने वध केल्यानंतर, शुम्भ निशुम्भ यांनी, चण्ड आणि मुण्ड या दोन महादैत्यांना देवीचे केस धरून ओढत आणण्याची आज्ञा केली.

 सातव्या अध्यायात चण्ड आणि मुण्ड देवीला ओढत न्यायला आले असतांना, क्रोधाने देवीचे तोंड काळे ठिक्कर पडले, आणि तिच्या शरीरातून विक्राळ असे कालीरूप प्रकट झाले. त्या कालीने इतर राक्षसांसोबत, चण्ड आणि मुण्ड यांचा वध केला.

 त्यावर कल्याणमयी देवीने, चण्ड आणि मुण्ड यांना मारणारी, म्हणून तिचे नांव चामुण्डा असे ठेवले. प्रेत हे तिचे आसन समजले जाते.

वाराही, ही सप्त मातृकांमधील असून, विष्णूच्या वराह अवताराची शक्ति समजली जाते. तिचे वाहन महिष आहे. सप्त मातृका म्हणजे; चामुण्डा, वाराही, इंद्राणी, वैष्णवी, माहेश्वरी, कौमारी, ब्राम्ही.

सप्तशतीच्या ८ व्या अध्यायात, रक्तबीज वधाच्या समयी, निरनिराळ्या मातृकांनी, म्हणजेच देवांच्या शक्तिरुपांनी राक्षसांचा वध केला, त्यातही वाराहीचा उल्लेख आहे. वाराही ही देवता वाम मार्गाच्या (तंत्र मार्गाच्या) साधकांमध्ये विशेष प्रसिद्ध आहे.

 कार्तिकेयाची  (ज्यांचे दुसरे नांव ‘कुमार’ आहे) शक्ति कौमारी , जी की शिखिवाहना, म्हणजे मोरावर आरूढ आहे. कार्तिकेयाच्या बऱ्याच कथा प्रसिद्ध आहेत. कार्तिकेय(शंकराचा पुत्र) हा दक्षिणेमध्ये मुरुगन, किंवा, सुब्रम्हण्यम या नावाने प्रसिध्द आहे.

इत्येता मातरः सर्वाः सर्वयोगसमन्विताः।

नानाभरणशोभाढ्या नानारत्नोपशोभिताः॥12॥

अशा प्रकारे या सर्व माता सर्व प्रकारच्या योग शक्तींनी संपन्न आहेत, आणि नाना प्रकारच्या आभूषणांनी युक्त आणि नाना प्रकारच्या रत्नांनी सुशोभित आहेत.

श्लोक १३ ते ४३:

दृश्यन्ते रथमारूढा देव्यः क्रोधसमाकुलाः।

शंख चक्रं गदां शक्तिं हलं च मुसलायुधम्‌॥13॥

खेटकं तोमरं चैव परशुं पाशमेव च।

कुन्तायुधं त्रिशूलं च शांर्गमायुधमुत्तमम्‌॥14॥

दैत्यानां देहनाशाय भक्तानामभयाय च।

धारयन्त्यायुधानीत्थं देवानां च हिताय वै॥15॥

या सर्व देवी क्रोधाने भरलेल्या आहेत आणि भक्तांच्या रक्षणासाठी रथावर बसलेल्या आहेत. त्यांनी आपल्या हातांमध्ये शंख, चक्र, गदा, शक्ति, हल, मुसळ, खेटक (म्हणजे ढाल), तोमर (म्हणजे सर्पाकृती मुख असलेला बाण), परशु, पाश, कुन्त या नावाचे आयुध (कुन्त म्हणजे English मध्ये ज्याला spear म्हणता येईल, म्हणजे भाला किंवा तत्सदृश शस्त्र), त्रिशूल, शारङ्ग नावाचे धनुष्य इत्यादि शस्त्रें धारण केली आहेत. ही शस्त्रें त्यांनी दैत्यांचे देह नाश करण्यासाठी, भक्तांना अभय देण्यासाठी आणि देवांच्या कल्याणासाठी धारण केली आहेत

आता कवचाचा प्रारंभ करण्याआधी प्रार्थना केली जाते:

नमस्तेऽस्तु महारौद्रे महाघोरपराक्रमे।

महाबले महोत्साहे महाभयविनाशिनि॥16॥

महान रौद्र रूप, अत्यंत घोर पराक्रम आणि महान उत्साहाने भरलेल्या देवी, तू भयाचा नाश करणारी आहेस, तुला नमस्कार असो.

त्राहि मां देवि दुष्प्रेक्ष्ये शत्रूणां भयवर्धिनि।

प्राच्यां रक्षतु मामैन्द्री आग्नेय्यामग्निदेवता॥17॥

तुझ्याकडे बघणेही कठीण आहे.(दुष्प्रेक्ष्य). हे शत्रूंचे भय वाढविणाऱ्या देवी, तू माझे रक्षण कर.

क्रमशः

माधव भोपे