खूप वर्षांपूर्वी शरद उपाध्ये यांचे ‘भविष्यावर बोलू काही’, आणि ‘राशीचक्र’, यासारखे टीव्ही शोज मराठी टीव्ही चॅनेल्स वर खूप लोकप्रिय झाले होते. राशीभविष्य या विषयावर हलक्या फुलक्या भाषेत दिलेली माहिती श्रोत्यांना खूप आवडत असे. त्यामुळे राशीभविष्य या विषयाविषयी लोकांना वाटणारी एक प्रकारची भीती असायची ती कमी होण्यास मदत झाली.
माणसाचे भविष्य घडविणे हे त्याच्या हातात असते, असे कर्तृत्ववान लोकांचे मानणे असते, आणि ते अगदी खरे आहे. पण ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करणार्यांचे म्हणणे असे असते, की या शास्त्राचा उपयोग माणसाला सतर्क करण्यासाठी होऊ शकतो.
अर्थात, या विषयावरील विविध मतांमध्ये आपल्याला जायचे नाही.
पण ढोबळ मानाने पहायचे झाल्यास ज्या काही विषयांवर जवळ जवळ सर्व ज्योतिषकारांचे एकमत आढळते, ते म्हणजे विशिष्ट राशींचे विशिष्ट स्वभाव. आपल्यासारख्या सर्वसाधारण माणसानेही आपल्या आजूबाजूस पाहिल्यास यातील काही गोष्टी खूप प्रमाणात लागू पडतात असे दिसते. सगळ्याच गोष्टी लागू पडत नाहीत. पण काही राशींचे स्वभाव अगदी ठळकपणे दिसून येतात उदा. कन्या राशीचा चिकित्सक आणि शंकेखोर स्वभाव- घराला लावलेले कुलूप तीन तीनदा ओढून बरोबर लागले आहे की नाही ते पाहणारी माणसे आपल्या आजूबाजूला दिसतात. वृषभ राशीच्या व्यक्ति देखण्या, रसिक आणि चैनी असलेल्या बर्याच प्रमाणात दिसतात.नेतृत्व गुण आणि अहंकार असलेल्या सिंह राशीच्या व्यक्तीही आपल्या आजूबाजूला दिसतात. अजून एक गोष्ट म्हणजे, कोणत्या राशीचा शरीराच्या कुठल्या भागावर अंमल जास्त असतो, आणि त्या त्या राशीच्या लोकांना जास्त करून त्याच अवयवांचे त्रास हे प्रामुख्याने होतात, हे नमूद केलेल्यानुसार खूप प्रमाणात जुळते. त्यामुळे त्या त्या राशीच्या लोकांनी त्या त्या अवयवांची जास्त काळजी घेतल्यास पुढे होणारा त्रास ते टाळू शकतील.
बर्याच वेळा आपल्या आजूबाजूची माणसे आपल्या अपेक्षेपेक्षा खूप वेगळी वागतात. काही वेळा आपण केलेल्या उपकाराची फेड अपकाराने करतात, कारण नसतांना आपल्याशी डूख धरतात, तेंव्हा असे का होते, ते असे का वागतात, हे जेंव्हा समजत नाही.
अशा वेळी , हा राशींच्या स्वभावाचा चार्ट पाहिल्यास एखाद्या व्यक्तीच्या वागण्याची संगती काही प्रमाणात लागू शकते- जन्मतःच जो स्वभाव व्यक्ति घेऊन आलेली असते, त्याप्रमाणे ती वागते.
आता एखादा मनुष्य त्याच राशीत का जन्म घेतो?- तर प्रत्येकजण आपले पूर्वकर्म बरोबर घेऊन येतो, आणि गेल्या जन्मीचे हिशोब या जन्मी पूर्ण करतो- आणि या जन्माच्या कर्मांनी नवीन जन्माची तयारी करतो! असो. मी असेच एक कुतूहल म्हणून विविध ठिकाणी उपलब्ध असणाऱ्या माहितीवरून एक चार्ट तयार केला. या चार्ट मध्ये, प्रत्येक राशीचा राशीस्वामी, नक्षत्र, त्या त्या राशीचे कोणते strong points आहेत, त्यांनी कोणत्या अवगुणांवऱ मात केली पाहिजे, तसेच त्या त्या राशीची स्वभाव वैशिष्ट्ये काय आहेत, याची माहिती (जी सर्वसाधारणपणे कुठल्याही ज्योतिष विषयक साहित्यात सापडते) ती इथे दिली आहे. मला स्वतःला ज्योतिष या विषयाची काही माहिती नाही, त्यामुळे या विषयातील विद्वान मंडळींची आधीच माफी मागतो.
सदरील माहिती ही केवळ मनोरंजन या स्वरूपात घ्यावी अशी विनंती आहे. आणि यात दिलेली माहिती, आपल्या स्वतःच्या स्वभावाला, किंवा आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींच्या (ज्यांच्या राशी आपल्याला माहित आहेत) स्वभावाशी ताडून पाहून, हे कितपत लागू होते हे आपणच ठरवावे.
आपल्याला आवडल्यास इतरांनाही जरूर शेअर करावे.
[table id=1 /]
सूर्य आणि चंद्र हे प्रत्येकी एका राशीचे स्वामी आहेत. सूर्य सिंह राशीचा तर चंद्र कर्क राशीचा स्वामी आहे.
मंगळ, बुध, गुरू, शुक्र आणि शनि हे प्रत्येकी 2-2 राशींचे स्वामी आहेत.
[table id=2 /]
या विषयी आपले अनुभव असतील ते comments मध्ये नक्की कळवा. तसेच आपले विचार ही comments मध्ये लिहून कळवा.
एकदा अकबर बादशहा जंगलात शिकारीला गेला. बरोबर पुष्कळ लोक होते. पण दैवयोगाने, अकबर जंगलात कुठे तरी भटकला आणि त्याच्या सोबतचे लोक खूप लांब राहिले.
अकबर बराच पुढे गेल्यावर त्याला एक शेत दिसले. एंव्हाना त्याला खूप भूक आणि तहान लागली होती आणि तो दमला होता. अकबर त्या शेतात पोंचला, आणि त्या शेताचा मालक जो एक अत्यंत गरीब शेतकरी होता, त्याला म्हणाला, “बाबा रे, मी तहानेने आणि भुकेने अगदी व्याकुळ झालो आहे. काही खायला मिळाले, आणि प्यायला थंडगार पाणी मिळाले तर खूप उपकार होतील.” अकबराने त्याला आपण बादशहा आहोत असे काही संगितले नाही. फक्त म्हणाला, “मी राज्याचा माणूस आहे.”
शेतकरी जरी अगदी गरीब होता, पण माणुसकी त्याची जिवंत होती. तो म्हणाला, “ ठीक आहे. आमच्यासाठी तर तुम्ही आमचे मालकच आहात. काही काळजी करू नका.” असे म्हणून शेतकर्याने राजाला थंड पाणी दिले, शेतात असलेल्या ऊसाचा थंडगार रस दिला, आणि आपल्याजवळच्या गाठोड्यातील भाकरीही दिली. नंतर त्याने झाडाखाली खाटेवर चादर अंथरुन राजाला थोडा आराम करायची विनंती केली. राजा अगदी खुष झाला. त्याला शेतकर्याने दिलेल्या वस्तू अमृतासमान वाटल्या.
बादशहा जेंव्हा जायला निघाला, तेंव्हा शेतकर्याला म्हणाला, “तुला जर काही काम पडले तर दिल्लीला जरूर ये, आणि मला भेट. माझे नांव अकबर आहे. दिल्लीला आल्यावर कोणालाही विचार.”
“नाही तर थांब, तुझ्याजवळ कागद आणि कलम असेल तर आण. मी तुला लिहून देतो.”
आता शेतात कुठला कागद आणि कुठली कलम! तो शेतकरी बिचारा अनपढ होता. त्याच्या शेतात एक फुटलेला मातीचा घडा होता. तो त्याने बादशहासमोर ठेवला, आणि कुठून तरी एक पांढरा चुनखडीचा तुकडा घेऊन आला, आणि बादशहासमोर ठेवला. बादशहाने त्या घड्याच्या तुकड्यावर आपले नाव लिहिले आणि सही केली. “मला भेतायला येशील तेंव्हा हे घेऊन ये” म्हणून संगितले. शेतकरी हो म्हणाला, आणि तो लिहिलेला तुकडा आपल्या झोपडीत ठेवून दिला.
तो तुकडा तिथे बरेच वर्ष पडून राहिला. मग एके वर्षी खूप दुष्काळ पडला, शेती अजिबात पिकली नाही, गुरढोरांना प्यायला पाणीही मिळेना. त्यावेळी त्या शेतकर्याच्या बायकोला ही घटना आठवली, आणि ती शेतकर्याला म्हणली, “तो दिल्लीचा कोणी माणूस आला होता ना? त्याच्याकडे एकदा जाऊन तरी पहा. काही मदत मिळते का ते?”
पत्नीने वारंवार म्हटल्यावर शेतकरी तो घड्याचा तुकडा घेऊन दिल्लीला पोंचला.
दिल्लीला गेल्यावर रस्त्याने त्याने लोकांना विचारले, “अकबरीये का घर कौन-सा है?” बादशहा अकबराचे नांव ऐकून, काही लोकांनी त्याला राजवाड्याचा रस्ता दाखविला. तिथे गेल्यावर तो शेतकरी म्हणतो,
“अकबरीये का घर यही है कया?”
द्वारपालांनी रागावून म्हटले, “कोण आहेस तू? बोलायची काही अक्कल आहे का नाही?”
तो शेतकरी तर आपल्या गावरान भाषेत बोलला होता. त्याने आपल्या जवळील तो घड्याचा तुकडा दाखविला, आणि संगितले, “जाऊन त्याला सांगा, एक जण तुला भेटायला आला आहे.”
बादशहाची सही बघून द्वारपाल चक्रावून गेला. त्याने बादशहाला जाऊन संगितले, “महाराज, एक ग्रामीण आपणास भेटायला आला आहे. बोलण्याची अजिबात अक्कल नाही. पण त्याने हा घड्याचा तुकडा दिला आहे.”
तो तुकडा पाहिल्यावर अकबराला तो सर्व प्रसंग आठवला,आणि तो म्हणाला, “जा, घेऊन या त्याला.”
खेडूत आत आला. बादशहाला उंच सिंहासनावर बसलेला पाहून तो म्हणाला, “ओ अकबरीये! तू तो बहुत ऊंचा बैठा है!”
बादशहा त्याला म्हणाला, “आओ भाई! बैठो!”
असे म्हणून बादशहाने त्याला बसवले, आणि म्हणाला, “तू थोडा वेळ बैस. माझ्या नमाजचा समय झाला आहे. मी नमाज पढून घेतो.”
आता शेतकरी पाहतो तो बादशहाने एक कापड अंथरले, त्यावर बसतो आहे, उठतो आहे, अजून काय काय करतो आहे. अकबराचे नमाज पढून झाल्यावर शेतकऱ्याने विचारले, “हे तू काय करीत होतास?”
बादशहा म्हणाला, “परवरदिगार परमेश्वराची बंदगी करत होतो.”
शेतकरी म्हणाला, “मला समजले नाही”
त्यावर बादशहा म्हणाला, “तो ईश्वर आहे ना? सर्वशक्तिमान? त्याची हाजरी भरत होतो.”
“किती वेळा करतो?”
“दिवसातून पाच वेळा”
“पाच वेळा, उठतो, बसतो, हे सर्व करतो? का?”
“ज्याने हे सर्व वैभव दिले आहे, त्याची हाजरी भरतो.”
शेतकरी म्हणाला, “ मी तर एकदाही हाजरी भरत नाही, तरीही त्याने मला सर्व काही दिले आहे आणि देतो आहे. तुला पाच वेळा हाजरी भरावी लागते? अच्छा, जय रामजी की! मी चाललो.”
तेंव्हा बादशहाने विचारले, “का आला होतास?”
“माझ्या पत्नीने सांगितले, की दिल्लीला जाऊन भेटून ये, इथे आल्यावर दिसले, तुला स्वतःला पाच वेळा नमाज पढावा लागतो. जेंव्हा तुलाच तो परमात्मा देतो, तर मी तुझ्याजवळ काय मागू?”
“अरे बाबा, तुला पाहिजे असेल ते माग!”
“नाही, तुला एवढ्या मुश्किलीने जे मिळते, ते मी मोफतमध्ये कसे घेऊ?”
असे म्हणून शेतकरी तिथून तडक निघाला, आणि घरी आला.
घरी आल्यावर बायकोने विचारले, “काय झाले? त्या दिल्लीच्या माणसाने काही मदत केली का?”
शेतकरी म्हणाला, “आपल्या देवाची आठवण करूयात, तोच सगळ्यांना सगळे देतो. आता त्या राज्याच्या माणसाला काय मागायचे, जो की स्वतःच मागून खातो? म्हणून देवावर भरवसा ठेवूयात, त्याचे नांव घेऊयात, बस्स!”
इकडे काही चोर चोरी करायला निघाले होते. ते चोर त्या शेतकऱ्याच्या घराबाहेर लपून हे सर्व संभाषण ऐकत होते.
बायको म्हणत होती, “दिल्लीला गेले आणि काही आणले नाही.” शेतकरी तिला समजावत होता. त्यावर ती वैतागून म्हणत होती, काही कमवून तरी आणायचे. त्यावर शेतकरी म्हणाला, “आता तर तो सर्व शक्तिमान भगवान देईल तेंव्हाच घेऊ. मी तर सर्व त्याच्यावर सोडले आहे.”
“अहो देवावर सोडले आहे ते ठीक आहे, पण काही कामधंदा तर करा!”
“कामधंदा न करता ही धन मिळते, पण मी ते घेत नाही. आता तर ठाकूरजीची मर्जी असेल तर ते घरबसल्या देतील. काही चिंता करू नकोस, पाऊस येईल, शेती पिकेल, सर्व काही ठीक होईल. मी आता देवावर पूर्ण भरोसा ठेवला आहे. देवाचे देण्याचे खूप मार्ग आहेत. आणि त्याने मनात आणले तर तो छप्पर फाडून ही देतो!”
“ऐक. आजचीच गोष्ट तुला सांगतो. मी नदीवर गेलो होतो. नदीला पूर आला होता. किनारा दिसत नव्हता. मी तिथे हात धुवायला गेलो, तेंव्हा तिथे मला एक भांडे दिसले. ते आधी वाळूत गाडलेले असावे, पण पावसामुळे उघडे पडले असावे. मी जवळ जाऊन पाहिले तर एक झाकण लावलेला एक गडू होता. मी झाकण उघडून पाहिले, तर आत खूप सोने, नाणे भरलेले दिसले. पण मी विचार केला, की हे आपले नाही, आपल्याला नको. परमेश्वर स्वतः देईल तेंव्हा घेऊ!. मी त्याचे झाकण लाऊन ठेवले आणि वापस आलो.
बायकोने त्याला विचारले, “कुठे? कोणत्या जागी?”
तर शेतकऱ्याने तिला सांगितले, अशा अशा एका जागी, एक असे असे झाड आहे, त्याच्या बाजूला.
इकडे चोर त्यांचे हे सर्व बोलणे ऐकत होते. चोरांनी विचार केला, “हा शेतकरी तर पागल आहे! असे सहजासहजी मिळालेले धन कोणी सोडते का? आपण तर तिकडेच जाऊ! इतर कुठे चोरी करायला गेलो तर पकडले जाण्याची भीती! त्यापेक्षा हा फुकटचा माल घेऊ!”
असा विचार करून चोर त्या ठिकाणी गेले. पत्ता त्यांनी ऐकला होताच. आता त्या शेतकऱ्याकडून त्या गडूचे झाकण लावतांना चूक झाली होती, आणि झाकण काही पक्के लागले नव्हते. थोडेसे उघडे राहिले होते. त्या उघड्या राहिलेल्या जागेतून एक साप त्याच्या आत जाऊन बसला होता. चोरांनी ते झाकण उघडताच, सापाने जोरात फूत्कार मारला. तेंव्हा घाबरून चोरांनी झाकण जोरात बंद करून टाकले.
चोरांनी आता असा विचार केला, की नक्कीच त्या शेतकऱ्याने आपल्याला पाहिले असेल, आणि आपल्याला मारण्यासाठीच त्याने ही खोटी कहाणी बनवून आपल्या बायकोला सांगितली असेल. या गडूच्या आत न जाणो कितीतरी विषारी साप आणि विंचू भरलेले असतील. आता एक काम करू. त्या शेतकऱ्याला अद्दल घडवण्यासाठी हा गडू त्याच्याच घरात जाऊन उपडा करून देऊ, म्हणजे ते सर्व साप विंचू त्यालाच चावतील!
असा विचार करून, त्या गडूच्या तोंडाला एक फडके बांधून, ते शेतकऱ्याच्या घराकडे गेले. शेतकरी आणि त्याची बायको झोपले होते. चोरांनी घराचे छप्पर फाडून, त्यातून तो गडू उपडा केला आणि पळून गेले. इकडे तो गडू पडल्यानंतर पहिल्यांदा तो साप खाली पडला, आणि त्याच्यावर ते सर्व दागिने, मोहरा, वगैरे आणि नंतर तो जड असलेला गडू त्या सापावर जोरात पडला आणि साप त्याखाली दाबून मरून गेला.
त्या सर्व आवाजाने शेतकरी नवरा बायको जागे होऊन पाहतात, तर साप मरून पडलेला, आणि सर्व घरात सोने नाणे आणि दागिने विखुरलेले!
भगवान देता है तो छप्पर फाडके! ही म्हण खऱ्या अर्थाने सार्थ झाली.!
वरील गोष्ट अर्थात, काल्पनिक आहे, आणि देवावर श्रद्धा ठेवली तर देव कश्याही प्रकारे पालन पोषण करतोच, हे दाखवण्यासाठी फक्त तेवढे उदाहरण दिले आहे. यात, अकर्मण्यतेची भलावण करण्याचा, गोष्ट सांगणाऱ्याचा अजिबात हेतू नाही. त्यामुळे गोष्टीतील उदाहरण फक्त तेवढ्यापुरतेच आहे हे लक्षात घ्यावे. वरील गोष्ट ही स्वामी रामसुखदासजी यांनी, आपल्या प्रवचनात, एक उदाहरण म्हणून सांगितली आहे.
भावनांना कुठल्याही भौगोलिक मर्यादा नसतात. भाषा वेगवेगळी असली तरी भावना चेहऱ्यावर व्यक्त सारख्याच प्रकारे होतात.
काही महिन्यांपूर्वी ट्वीटर (आताचे x )आलेली एक पोस्ट कुठून तरी फिरत फिरत माझ्यापर्यंत आली होती, आणि ती फारच भावली होती. मी याआधी कदाचित काही whatsapp ग्रुप्स मध्ये शेअर केली ही होती. त्यामुळे त्याची द्विरुक्ती होत असल्यास क्षमस्व . हो पोस्ट बहुतेक एका पाकिस्तानी माणसाने पोस्ट केली आहे.
या फक्त 90 सेकंदांच्या क्लिपमध्ये , एक तरुण मुलाने घरातल्या ज्येष्ठानबद्दल जी भावना व्यक्त केली आहे, ती अप्रतिम आहे.
पोस्ट चा climax शेवटच्या ओळीत येतो जेंव्हा तो मान हलवत, रुद्ध गळ्याने आणि अश्रूंना रोखत म्हणतो, ” गूगल मॅप तो फिर भी रहेगा, लेकिन ये लोग..” आणि पुढले शब्द त्याच्या घशातच राहून जातात.
Some times you stumble upon a touching post unknowingly. The chords of emotions know no geographical bounds or language barriers. I had stumbled upon this post few months back. It seems that the video is posted on twitter by a Pakistani man, depicting the love, care and attachment of a young boy about the elders of the house.
The respect for elders is a universal phenomenon. But sometimes it tends to get suppressed in the daily hustle bustle of busy life schedule. This post is an eye opener in a way.
It’s just a 90 seconds clip, with very few words, but the actor depicts the entire story by his facial expressions, his sighs, and his silences, all within the 90 seconds. The climax is reached in the last line.. See the way he moves his head, with a choked throat and tears held back forcibly in his eyes, when he says, “लेकिन ये लोग ..” not able to utter the next words..
If you are going to watch one thing today, please watch this one!! It might change your perspective. Beautiful beautiful ✨️💫 pic.twitter.com/TAeuu6E3tu
आयुष्यात एका टप्प्यावर आल्यानंतर, माणसाच्या मनात एक हुरहूर लागून राहते. आणि जसे जसे वय वाढत जाते, तशी तशी ती हुरहूर अधिकाधिक गडद होत जाते. मन पूर्ण आयुष्याचा हिशेब मांडायला लागते, आणि शेवटी हाती काय उरले हा एक मोठा यक्षप्रश्न उभा राहतो. कित्येकदा तर, “ याचसाठी केला होता का एवढा सारा खटाटोप?” असा मोठा प्रश्न आ वासून उभा राहतो. “सुख खरे की दु:ख खरे” हेच समजेनासे होते.
एके दिवशी अचानक, 2008 मध्ये लहानपणीच्या मुग्धा वैशंपायनने Little Champs मध्ये गायलेले “हुरहूर असते, तीच उरी” हे गाणे ऐकायला (आणि बघायला) मिळाले. त्या गाण्यातील अगदी मोजकेच शब्द, पण मनाला स्पर्शून गेले. मुग्धाने त्या बालवयात ही हे गाणे एवढे छान म्हटले होते, त्यावेळी तिला वैशाली सामंतने, जेंव्हा विचारले, की, “बाळा, तुला या गाण्याचा अर्थ कळतो का?” तेंव्हा मुग्धा ने गोड हसून उत्तर दिले होते, “बाबा, म्हणाले, तू मोठी झाल्यावर कळेल”
हुरहुर असते तीच उरी दिवस बरा की रात्र बरी
कुठला रस्ता सांग खरा वळणाचा की सरळ बरा
शरीर जाते जळून तरी धूर खरा की राख खरी
जगणे, मरणे, काय बरे
सुख खरे की दु:ख खरे
मुग्धाच्या या गाण्यावर बोलतांना, अतिथि म्हणून उपस्थित असलेला आदेश बांदेकर म्हणाला होता, की मुग्धा, मी आज हे गाणे पहिल्यांदा ऐकले. आणि यापुढे जेंव्हा हे गाणे ऐकेन तेंव्हा मला हे मुग्धाचे गाणे म्हणूनच लक्षात राहील. माझेही तसेच झाले. मला हे गाणे ऐकले की सर्वप्रथम मुग्धा आठवते. असो.
मुग्धाच्या त्या गाण्याची लिंक खाली देत आहे.
मग या गाण्याचा शोध घेता घेता, “एक उनाड दिवस” हा अशोक सराफची प्रमुख भूमिका असलेला, 2005 मध्ये प्रदर्शित झालेला मराठी सिनेमा बघण्यात आला. अत्यंत सरळ आणि छोटीसे कथानक असलेला हा चित्रपट मुळातूनच पाहण्यासारखा आहे, पण त्यात हे गाणे अशोक सराफ (चित्रपटातील दाभोळकर) जेंव्हा अभिनेत्री फैयाज (चित्रपटातील, विपन्नावस्थेतील गायिका चंद्रिका) हिच्या तोंडून ऐकतो, त्यावेळी, अशोक सराफच्या चेहऱ्यावरील भाव अगदी अप्रतिम आहेत. गायिका गात असलेल्या गीतातील भाव त्याच्या चेहऱ्यावर साक्षात मूर्तिमंत होतात. इतक्या कमी वेळात एक माणूस आपल्या चेहऱ्याने, अगदी काहीही न बोलता, इतके उत्कट भाव कसे व्यक्त करू शकतो, हे खरंच अचंबित करणारे आहे. अभिनेत्री फैयाजनेही त्याच ताकदीने हे गाणे पेश केले आहे.
श्रेय नामावली:
गीत: सौमित्र
संगीत- सलील कुलकर्णी
मूळ गायिका- शुभा जोशी
चित्रपट- एक उनाड दिवस
मूळ चित्रपटातील मला भावलेले हे गाणे, त्याची लिंक खाली देत आहे.
Emotional Intelligence किंवा भावनिक बुद्धिमत्ता हा शब्द जरी बोजड वाटत असला, तरी तसे वाटायचे कारण नाही. साध्या शब्दात सांगायचे झाल्यास, ज्याला आपण व्यवहारात परिपक्वता maturity म्हणतो, ती जर डोळ्यासमोर आणली, तर आपल्याला नेमके काय अपेक्षित आहे हे लक्षात येईल.
Five components of Emotional Intelligence
पाश्चात्य मानसशास्त्रज्ञांनी E.I.( किंवा यालाच E.Q.- Emotional Intelligence Quotient असेही म्हणतात) चे ढोबळमानाने 5 आधारस्तंभ कल्पिले आहेत.
5 components of emotional intelligence
Self awareness, Self Regulation, Motivation, Empathy आणि Social skills. यातील पहिले 3 स्वतःशी संबंधित आहेत तर नंतरचे 2 हे समाजाशी संबंधित आहेत.
पहिला म्हणजे, स्वतःचा स्वभाव ओळखणे ( याच्यात SWOT analysis आले- म्हणजे Strengths, Weaknesses, Opportunities and Threats ओळखणे ) म्हणजेच आपल्या स्वभावातील बलस्थाने, कमजोरी, इत्यादि ओळखणे.
दुसऱ्यांच्या मनाचा विचार करणे. ( Empathy- ही पेक्षा वेगळी आहे. Sympathy मध्ये एक प्रकारचा दयेचा भाव आहे- तर Empathy म्हणजे मी जर त्याच्या जागी असतो तर- Stepping into the others’ shoes – हा विचार आहे)
आणि, Social skills.अर्थात, आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाशी, त्यातील प्रत्येक घटकाशी चांगले संबंध ठेवणे
वरील सर्व विवेचन हे ढोबळमानाने झाले, आणि यात अनेक शंका काढता येऊ शकतील- उदा.- माझा शेजारी माझ्या दारात कचरा टाकीत असेल, तर मी त्याच्याशी चांगले संबंध कसे ठेवू? आणि मी जर दुसऱ्यांच्याच विचार करायला लागलो, तर माझे काय? अशाने तर झालेच कल्याण! लोकांना काय, ते तर टपलेलेच आहेत गैरफायदा घ्यायला! लोकांचा विचार करायला लागलो तर लवकरच भिकेला लागून जाईन ना मी!
वरील विचार लगेचच मनात येणे साहजिक आहे.
हे विचार सध्या बाजूला ठेवूत. आपल्याला स्वतःवर काम करायचे आहे. वरीलपैकी पहिला घटक म्हणजे स्वतःला ओळखणे.
Indian philosophy on Emotional Intelligence.
“ मी देह नाही, आत्मा आहे”- ही फार वरची पायरी झाली! तिथपर्यंत पोंचायचेच आहे- पण एखाद्या वेळेस आपण एका कागदावर, एका बाजूला आपली बलस्थाने, आणि दुसऱ्या बाजूला कमजोर बाजू, लिहून काढल्या, तर आपले आपल्यालाच काही गोष्टींबद्दल विचार करणे भाग पडेल. बलस्थाने काय असू शकतात-उदा .- “मी सहनशील आहे, कुठल्याही वातावरणाशी adjust करून घेऊ शकतो, मला एखादी गोष्ट इतरांपेक्षा चट्कन लक्षात येते, माझी स्मरणशक्ती चांगली आहे”-इत्यादि- असे अनेक plus points असतील ते लिहीत जायचे. नंतर दुसऱ्या बाजूला, आपले weak points लिहीत जायचे- जसे की “मला राग फार पट्कन येतो, मला खायची वस्तू समोर दिसल्यावर मनावर ताबा राहत नाही, मला नियमितपणे एखादी गोष्ट करायची म्हटले तर फार कंटाळा येतो” इत्यादि.
Behavioral Science च्या ट्रेनिंग मध्ये या प्रकारची एक activity असते. आणि ती खूप उपयुक्त असते.
अर्थात, स्वतःचा उद्धार स्वतःलाच करायचा आहे, (दुसरे कोणी येणार नाहीये!)।
स्वतःच स्वतःचा मित्र किंवा शत्रू असतो!
Self Assessment
आपण कधी स्वतःचे प्रामाणिक मूल्यमापन करतच नाही. In fact, “ मी आहे हा असा आहे!” Take it or leave it! अशी आपण आपल्या व्यक्तिमत्वाबद्दल एक उगीचच अहंभावना करून घेतली असते. आपल्या हेकेखोर स्वभावालाच आपण आपली identity- ओळख म्हणून अभिमानाने मिरवीत असतो. त्याच न्यायाने पाहू गेल्यास एक दारुडा, दारू पिण्याच्या आपल्या सवयीलाच आपली identity मानून, ती कधीच सोडू शकणार नाही!
मनाचा हा हेकेखोर स्वभाव आपल्या संतांनी चांगलाच ओळखला होता, आणि म्हणून त्याला चुचकारत, समजावत, एक प्रकारचा self talk करत, समर्थांनी 205 मनाचे श्लोक लिहिले आहेत. गीतेमध्ये तर मनाच्या विविध अवस्था, त्यांचे परिणाम, आणि मनाला कसे ताब्यात आणायचे, याबद्दल ठिकठिकाणी उल्लेख आला आहे. महर्षि पतंजलीनी “योगश्चित्तवृत्तिर्निरोध:” असे सांगून, वेगवेगळ्या प्रसंगांना कसे सामोरे जावे याबद्दल सूत्ररूपात मार्गदर्शन केले आहे.
वरील सर्व चर्चा ही खूप interesting होणार आहे.
पुढील काही भागांत याबद्दलचर्चा करूयात. Stay tuned!
यापूर्वी, दि. 20 जानेवारीच्या Art of Listening-2, ऐकण्याची कला- भाग 2या लेखात आपण शेवटी, Emotional Intelligence चा उल्लेख केला होता. त्या बद्दल आज काही चर्चा करूयात.
आपल्याला I.Q.( Intelligence Quotient) म्हणजेच ‘बुध्ढ्यांक’ या शब्दाचा परिचय चांगल्या प्रकारे आहे. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला, फ्रेंच मानसशास्त्रज्ञ अल्फ्रेड बिनेट याने ही संकल्पना मांडली आणि नंतर अमेरिकन शास्त्रज्ञांनी त्यात भर घालून, बुद्धिमत्तेचे मोजमाप करण्यासाठी काही पद्धती निश्चित केल्या. IQ = (mental age/chronological age) x 100. पण नंतरच्या काळात एखाद्या व्यक्तीची गुणवत्ता मोजण्यासाठी I.Q. च्या उपयोगितेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. आणि जीवनातल्या अनेक क्षेत्रातील यशस्वी व्यक्तींचा अभ्यास केल्यानंतर असे आढळून आले, की केवळ ‘बुध्ढ्यांक’ हा यशस्वी जीवनाचे गमक होऊ शकत नाही, तर ज्या व्यक्ति आपल्या भावनांचे योग्य प्रकारे नियमन करू शकतात, त्या आयुष्यात जास्त यशस्वी होतात. यशस्वितेचा संबंध बुद्धिमत्तेपेक्षा, भावनांचे योग्य रित्या नियमन करण्याशी जास्त आहे असे दिसून आले. मानसशास्त्री Daniel Goleman याने 1990 च्या सुमारास ही संकल्पना, त्याच्या, “Emotional Intelligence: Why It Can Matter More Than IQ.” या पुस्तकाद्वारे मांडली.
IQ_EQ
वरील सर्व तांत्रिक आणि academic माहिती जरी बाजूला ठेवली, तरी आपल्या आजूबाजूला पाहिले तरी वरील गोष्ट खरी आहे असे जाणवेल.
What is Emotional Intelligence?
भावनिक बुद्धिमत्ता (EQ) म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या स्वतःच्या भावना ओळखण्याची, समजून घेण्याची, व्यवस्थापित करण्याची आणि प्रभावीपणे वापरण्याची क्षमता तसेच इतरांच्या भावना ओळखण्याची, समजून घेण्याची आणि प्रभावित करण्याची क्षमता ही रोजच्या जीवनात, तसेच जीवनात येणाऱ्या आव्हानांना यशस्वीरीत्या हाताळण्यास अत्यंत आवश्यक आहे असे दिसून येते.
ही संकल्पना जरी पाश्चात्य जगात आत्ता आत्ता मान्य पावत असली तरी, आपल्याकडे, काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या सहा भावनांना षड्रिपू या नावाने पारंपारिकरित्या ओळखले जाते. आणि त्यांना ताब्यात ठेवण्याविषयीही सांगितले जाते. पण एखाद्या विषयाची अति परिचयात अवज्ञा व्हावी तसे या विषयी झाले आहे असे वाटते.
वरील भावना जर ताब्यात नसतील, तर कमालीचा क्रोध, अस्वस्थता, कंटाळा, भीती, निराशा, चिडचिडेपणा, अपराधी भावना, न्यूनगंड, एकाकीपणा या नकारात्मक भावनांना माणसाचा ताबा घ्यायला वेळ लागत नाही, आणि व्यक्ति जगापासून एकटी पडत जाते, याउलट भावनांचे नियंत्रण ज्यांना जमते, त्यांच्यामध्ये प्रशंसा, कृतज्ञता, कुतूहल, उत्साह, उत्कटता, दृढनिश्चय, लवचिकता, आत्मविश्वास, आनंदीपणा, चैतन्य या भावना दिसून येतात.
असे म्हटले जाते, की बुध्ढ्यांक I.Q. हा एका विशिष्ट वयानंतर वाढत नाही. पण असे दिसून आले आहे की E.Q. हा लवचिक आहे, आणि प्रयत्नाने, अभ्यासाने, वाढवता येऊ शकतो.
How Emotional Intelligence can be measured?
पाश्चात्य मानसशास्त्रीनी E.Q. चे मूल्यमापन करण्यासाठी विविध पद्धती विकसित केल्या आहेत. त्यात self-awareness, self-management, social awareness, and relationship management अशा चार मापदंडावर मूल्यमापन केले जाते.
आजच्या धकाधकीच्या आणि चढाओढीच्या जीवनात अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धापर्यन्त सर्व जण कुठल्या ना कुठल्या छोट्या किंवा मोठ्या तणावाला नित्य सामोरे जातात असे दिसून येते. त्यातील सगळ्यात मोठा तणाव हा कुठल्या ना कुठल्या कारणामुळे येणारा राग महणजेच क्रोध. किंवा कुठल्या ना कुठल्या गोष्टीची, परिस्थितीची वाटणारी वास्तव किंवा अवास्तव भीति. या भावनांचा निचरा झाला नाही, तर लवकर किंवा उशीरा त्या कुठल्या ना कुठल्या शारिरिक किंवा मानसिक रोगात परिवर्तित होतात. काही लोक या भावनांना, बिनदिक्कतपणे, त्यांच्या परिणामांचा विचार न करता, मनाला येईल त्या प्रकारे व्यक्त करतात.
पण अशा अनियंत्रित प्रकटीकरणामुळे त्या व्यक्तीचे कधीही न भरून येणारे नुकसान होत असते. आणि ती दुसऱ्यांना आणि स्वतःलाही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष इजा करून घेत असते. अशी व्यक्ति समाजापासून दूर जाते आणि एकटी पडते. याउलट काही व्यक्ति क्रोध, भीती, निराशा, दुःख या भावना मनातल्या अगदी आतल्या कप्प्यात दडवून ठेवतात. सभ्यपणाचा मुखवटा कोणासमोरही उतरून ठेवता येत नसल्यामुळे, आणि या भावना मनातल्या मनात दाबल्यामुळे, त्यांची प्रचंड घुसमट होते, आणि त्यामुळे निरनिराळ्या मनोकायिक (psychosomatic) रोगांना आमंत्रण मिळते.
साध्या अपचन, अॅसिडिटी पासून ते पोटदुखी, पाठदुखी, मानदुखी, कंबरदुखी, अल्सर, पाळीच्या तक्रारी, बीपी, मधुमेह, हृदयाशी संबंधित रोग, अशा कुठल्याही रोगाचे मूळ हे मनोकायिक असू शकते.
मग काय करायचे? आपल्याला राग आल्यावर दुसऱ्याला ठोकून काढायचे, शिव्या द्यायच्या, की मनातल्या मनात चिडत राहायचे? हा प्रश्न आपणा सर्वांनाच पडतो. आपल्या मनातल्या सुप्त इच्छा मारधाडीच्या हिन्दी सिनेमातील हीरो पूर्ण करतो म्हणून आपण असे सिनेमे आवडीने पाहतो. पण हे प्रॅक्टिकल नाही, हे आपल्याला चांगलेच माहिती असते.
आपण सहसा हे गृहित धरलेले असते, की या भावना आपल्याला अशाच छळणार, हा आपला स्वभावच आहे, आणि त्याला काही औषध नाही, किंवा ही जगाची रीतच आहे. फार झाले तर आपल्यापेक्षा कमजोर व्यक्तींवर आपला राग काढला जातो आणि बलदंड किंवा कुठल्याही प्रकारे आपल्यापेक्षा वरचढ असलेल्यांपुढे नरमाईची भूमिका घेतली जाते.
पण emotional intelligence द्वारे, आपल्या भावनांना योग्य ती वाट करून दिली जाऊ शकते, स्वतःला किंवा दुसऱ्याला कोणतीही इजा न करता. इतकेच नव्हे, तर वरकरणी harmful घातक वाटणाऱ्या भावनांना योग्य रित्या channelize करून, योग्य रित्या वळवून त्यांना आपली शक्ति बनवली जाऊ शकते, किंवा हे शक्य झाले नाही तरी, कमीत कमी, भावनांचा उपद्रव कमी करता येऊ शकतो- हे एक life skill जीवनातील कौशल्य आहे, आणि ते उपजत नसले तरी, प्रयत्नाने, अभ्यासाने, आत्मसात करता येऊ शकते. जसे आपण मागील एका लेखात पाहिले होते, समर्थांनी दास बोधात सांगितल्याप्रमाणे,
रूप लावण्य अभ्यासिता न ये |
सहज गुणास न चले उपाये |
कांही तरी धरावी सोये |
आगंतुक गुणाची || (दासबोध- २-८-३१)
या बाबत आपल्या पूर्वजांनी किती कार्य करून ठेवले आहे, ते यथावकाश, पुढील काही भागांमध्ये पाहू.
Go to my Amazon Shop to shop and order for any amazon product, by clicking on the icon.