https://goodworld.in A website by Madhav Bhope

Hanuman Jayanti

श्रीहनुमान – शक्ती आणि भक्तीचे आदर्श रूप

यावर्षी हनुमान जयंती कधी आहे- हनुमान जयंती  कशी साजरी करतात.

नुकतीच आपण सर्वांनी मोठ्या भक्तिभावाने श्री रामनवमी म्हणजेच प्रभू श्रीरामाचा जन्मोत्सव साजरा केला. प्रभू श्रीरामांच्या जन्मोत्सवानंतर लगेचच, म्हणजे ६ दिवसांनी, श्रीरामाचे अनन्य भक्त, सेवा आणि भक्तीचे आदर्श, महाबली, महाशक्तिमान, भगवान शिवाच्या रुद्र रूपाचा  अवतार असलेल्या श्री हनुमानाचा जन्मोत्सव चैत्री पौर्णिमेला येतो. या  जन्मोत्सवाचा सोहळाही महाराष्ट्रात आणि भारताच्या विविध प्रदेशांत मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. शक्ति आणि नम्रता यांचा अनोखा संगम श्री हनुमानामध्ये बघायला मिळतो. यावर्षी गुरूवार दि. २ एप्रिल रोजी, हा उत्सव येतो आहे. दि. १ एप्रिल रोजीच सकाळी ७.०७ च्या नंतर पौर्णिमा लागते. ती गुरूवारी २ एप्रिल ला सकाळी ७.४२ वाजता संपते. हनुमानाचा जन्म हा सूर्योदयाला झाला. २ एप्रिल रोजी सूर्योदय सकाळी ६.३३ ला आहे, त्यामुळे हनुमान जयंती २ एप्रिल, गुरूवारी आहे.

आपल्याकडे प्रत्येक गावागावात, शहरा शहरात, हा जन्मोत्सव, मारूतीच्या मंदिरांमधून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. हनुमान जन्मोत्सवानंतर, प्रसाद म्हणून सुंठवडा, गूळ, खोबरे,  बुंदीचे लाडू, केळी इत्यादि गोड पदार्थ भक्त गणांना दिले जातात.

समर्थ रामदासांनी सुरू केलेली परंपरा.

महाराष्ट्रात समर्थ रामदास स्वामींनी विशेष करून हनुमानाची उपासना,  बलाची, पुरुषार्थाची देवता म्हणून गावा गावात सुरू करून त्या काळच्या समाजा चैतन्य जागृत केले.

समर्थ रामदास स्वामींनी श्रीहनुमानाचे वर्णन पराक्रम, बुद्धिमत्ता, नम्रता आणि रामभक्तीचे अद्वितीय उदाहरण म्हणून केले आहे. रामदास स्वामींच्या दृष्टीने हनुमान हा केवळ देवता नसून संपूर्ण समाजासाठी आदर्श व्यक्तिमत्त्व आहे.

समर्थ रामदास  यांनी शक्ती, पराक्रम आणि भक्ती यांचा अत्यंत सुंदर समन्वय आपल्या ग्रंथांमध्ये आणि उपदेशांमध्ये मांडला आहे. त्यांच्या मते शक्तीशिवाय धर्मरक्षण होऊ शकत नाही, आणि भक्तीशिवाय शक्तीला योग्य दिशा मिळत नाही. म्हणूनच त्यांनी श्रीहनुमानाला शक्ती, धैर्य आणि निस्सीम भक्तीचे सर्वोच्च प्रतीक मानले.

शक्तीचे महत्त्व

समर्थ रामदास स्वामींनी आपल्या दासबोध  या ग्रंथात अनेक ठिकाणी शक्तीचे महत्त्व सांगितले आहे. त्यांच्या मते मनुष्याने तीन प्रकारच्या शक्ती जोपासल्या पाहिजेत :

  1. शारीरिक शक्ती – शरीर बलवान असले पाहिजे.
  2. मानसिक शक्ती – संकटांना तोंड देण्याचे धैर्य असले पाहिजे.
  3. आध्यात्मिक शक्ती – परमेश्वरावरील अढळ श्रद्धा असली पाहिजे.

ते म्हणतात की दुर्बळ समाजावर अन्याय सहज होतो, म्हणून समाज बलवान असणे आवश्यक आहे.

महाराष्ट्रात हनुमान मंदिरांची स्थापना

समर्थ रामदास यांनी महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये हनुमान मंदिरांची स्थापना केली. यामागे त्यांचा एक सामाजिक हेतू होता.

त्या काळात देशावर परकीय सत्ता होती आणि समाज निरुत्साही झाला होता. त्यामुळे त्यांनी युवकांमध्ये :

  • शौर्य आणि पराक्रम जागृत करणे
  • व्यायाम आणि शरीरसाधना वाढवणे
  • धर्म आणि राष्ट्ररक्षणाची प्रेरणा देणे

या उद्देशाने हनुमान उपासना रुजवली.

समर्थांनी स्थापन केलेले ११ मारुती

समर्थ रामदास स्वामींनी १७ व्या शतकात महाराष्ट्रात बलोपासना आणि संघटनशक्ती वाढवण्यासाठी सातारा व कोल्हापूर परिसरात प्रामुख्याने कृष्णा नदीच्या काठी ११ जागृत मारुतींची (हनुमान) स्थापना केली. हे मारुती महाराष्ट्राच्या इतिहासात समर्थस्थापित अकरा मारुती म्हणून प्रसिद्ध आहेत.

समर्थांनी स्थापन केलेले अकरा मारुतींची नावे व ठिकाणे:
१. शहापूरचा मारुती (चुण्याचा मारुती): कराडजवळ.
२. मस्कतचा मारुती (महारुद्र): मसूर (कराडजवळ).
३. चाफळचा मारुती (दास मारुती): चाफळ.
४. चाफळचा प्रताप मारुती: चाफळ (राम मंदिराच्या मागे).
५. शिंगणवाडीचा मारुती (बाल मारुती): चाफळजवळ, टेकडीवर.
६. उंब्रजचा मारुती (मठातील मारुती): उंब्रज
७. माजगावचा मारुती: सातारा-कोरेगाव मार्गावर
८. बहेचा मारुती (बोरगावचा मारुती): वाळवा तालुक्यात कृष्णा काठी.
९. मनपाडळेचा मारुती: कोल्हापूरजवळ.
१०. शिराळ्याचा मारुती: बात्ती शिराळा.
११. पारगावचा मारुती: वारणा नदीकाठी (पन्हाळा तालुक्याजवळ). 

संयमित शक्तीचे प्रतीक

रामदास स्वामींच्या दृष्टीने हनुमानाची सर्वात मोठी महानता म्हणजे संयमित शक्ती.

हनुमानाकडे प्रचंड सामर्थ्य होते, पण त्यांनी ते कधीही अहंकारासाठी वापरले नाही. ते नेहमी भगवान रामाच्या सेवेसाठी आणि धर्मरक्षणासाठी वापरले.

यातून समाजाला असा संदेश दिला गेला की :

  • शक्ती असावी पण अहंकार नसावा
  • पराक्रम असावा पण धर्मनिष्ठाही असावी

शिवकालीन समाजावर प्रभाव

समर्थ रामदास स्वामींच्या शिकवणीचा प्रभाव छत्रपति शिवाजी महाराज यांच्या काळातील समाजावरही दिसून येतो.

रामदास स्वामींनी दिलेली शक्ती आणि भक्ती यांची शिकवण समाजाला प्रेरणा देणारी ठरली. त्यामुळे हनुमान हा वीरत्व, निष्ठा आणि धर्मरक्षणाचा आदर्श म्हणून जनमानसात रुजला.

हनुमान जन्माची कथा

अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च विभीषणः।

कृपः परशुरामश्च सप्तैते चिरंजीविनः॥

सप्तैतान् संस्मरेन्नित्यं मार्कण्डेयमथाष्टमम्।

जीवेद्वर्षशतं सोऽपि सर्वव्याधिविवर्जितः॥

हनुमान सप्त चिरंजीवांमध्ये गणला गेलेला आहे. पण लौकिक  अर्थाने हनुमानाच्या जन्माबद्दल अनेक कथा प्रचलित आहेत.

हनुमानाच्या जन्माची कथा श्रीरामांच्या जन्माशी निगडित आहे.

हनुमान जन्माची मुख्य कथा खालीलप्रमाणे आहे:

  • अंजनीचा शाप आणि तपस्या: हनुमान यांची माता अंजनी ही पूर्वजन्मी एक अप्सरा होती. एका ऋषींच्या शापामुळे तिचे रूप वानरीचे झाले होते. तिचे लग्न वानर राज केसरी यांच्यासोबत झालेले होते. आपल्याला मिळालेला शाप घालवण्यासाठी आणि पुत्र प्राप्ती साठी iतिने भगवान शंकराची कठोर तपस्या केली. तिची भक्ती पाहून शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी तिला पुत्राचा वर दिला.
  • पुत्रकामेष्टी यज्ञ आणि प्रसादाचा अंश: ज्यावेळी अयोध्येचे राजा दशरथ पुत्रप्राप्तीसाठी ‘पुत्रकामेष्टी यज्ञ’ करत होते, तेव्हा यज्ञातून निघालेली खीर (पायस) त्यांनी आपल्या तिन्ही राण्यांना वाटली. असे म्हटले जाते की, वायू देवाच्या साहाय्याने त्या खिरीचा काही अंश एका घारीने उचलला आणि तो तपस्या करणाऱ्या अंजनीच्या हातावर पडला.
  • वायू देवाचा आशीर्वाद: अंजनीने तो शंकराचा प्रसाद समजून ग्रहण केला. वायू देवाने तो प्रसाद अंजनीपर्यंत पोहोचवण्यात मदत केली, म्हणून हनुमानाला ‘पवनपुत्र’ असेही म्हटले जाते.
  • जन्म: या प्रसादाच्या प्रभावाने आणि भगवान शंकराच्या आशीर्वादाने चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमानाचा जन्म झाला. त्यांना भगवान शंकराचा अकरावा ‘रुद्र अवतार’ मानले जाते.

केसरी व अंजनी यांना जो मुलगा झाला, त्याचे नाव ठेवले मारुती. मरुत म्हणजे वारा किंवा वायू . वाऱ्यामुळे म्हणजेच वायुदेवाच्या शक्तीमुळे अंजनीच्या हाती यज्ञाचे पायस आले, म्हणून हनुमानाला मारुती किंवा वायुपुत्र असेही म्हणतात. 

महाराष्ट्रात, समर्थांनी केलेले ‘भीमरूपी महारुद्रा’ हे स्तोत्र घराघरात, अगदी लहान मुलांपासून ते थोरांपर्यंत अतिशय लोकप्रिय आहे.

श्री मारुती स्तोत्र

भीमरूपी महारुद्रा, वज्र हनुमान मारुती ।

वनारी अंजनीसूता, रामदूता प्रभंजना ।। १।।

महाबळी प्राणदाता, सकळां उठवीं बळें ।

सौख्यकारी दुखःहारी, धूर्त वैष्णव गायका ।।२।।

दिनानाथा हरीरूपा, सुंदरा जगदंतरा ।

पातालदेवता हंता, भव्य सिंदूरलेपना ।। ३।।

लोकनाथा जगन्नाथा, प्राणनाथा पुरातना ।

पुण्यवंता पुण्यशीला, पावना परतोषका ।। ४।।

ध्वजांगे उचली बाहू, आवेशें लोटिला पुढें ।

काळाग्नी काळरुद्राग्नी, देखतां कांपती भयें ।।५।।

ब्रम्हांडे माईली नेणों, आवळें दंतपंगती ।

नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा, भ्रुकुटी त्राटील्या बळे।।६।।

पुच्छ तें मुरडिलें माथां, किरीटी कुंडलें बरीं ।

सुवर्ण कटी कांसोटी, घंटा किंकिणी नागरा।।७।।

ठकारे पर्वताऐसा, नेटका सडपातळू ।

चपळांग पाहतां मोठें, महाविद्युल्लतेपरी ।। ८।।

कोटिच्या कोटि उड्डाणें, झेपावे उत्तरेकडे ।

मंद्राद्रीसारिखा द्रोणू, क्रोधे उत्पाटिला बळें ।।९।।

आणिला मागुती नेला, आला गेला मनोगती ।

मनासी टाकिलें मागें, गतीसी तूळणा नसे ।।१०।।

अणूपासोनि ब्रह्मांडा, येवढा होत जातसे ।

तयासी तुळणा कोठें, मेरुमंदार धाकुटें ।। ११।।

ब्रह्मांडाभोंवते वेढे, वज्रपुच्छ करु शके ।

तयासि तूळणा कैचीं, ब्रह्मांडीं पाहतां नसे ।।१२।।

आरक्त देखिलें डोळां, ग्रासिले सूर्यमंडळा ।

वाढतां वाढतां वाढे, भेदिलें शून्यमंडळा ।। १३।।

धनधान्यपशुवृद्धी, पुत्रपौत्र समग्रही ।

पावती रूपविद्यादी, स्तोत्र पाठें करूनियां।।१४।।

भूतप्रेतसमंधादी, रोगव्याधी समस्तही ।

नासती तूटती चिंता, आनंदें भीमदर्शनें ।। १५।।

हे धरा पंधराश्लोकी, लाभली शोभली बरी ।

दृढदेहो निसंदेहो, संख्या चंद्रकळागुणें ।। १६।।

रामदासी अग्रगण्यू, कपिकुळासी मंडणू ।

रामरूपी अंतरात्मा, दर्शनें दोष नासती ।। १७।।

मारुतीची आरती – सत्राणे उड्डाणे हुंकार वदनीं

सत्राणे उड्डाणे हुंकार वदनीं ।
करि डळमळ भूमंडळ सिंधूजळ गगनीं ।
कडाडिलें ब्रह्मांड धाके त्रिभुवनीं ।
सुरवर नर निशाचर त्यां झाल्या पळणी ।। १ ।।

जय देव जय देव जय जय हनुमंता ।
तुमचेनि प्रतापे न भिये कृतान्ता ।। धृ० ।।

दुमदुमिले पाताळ उठला प्रतिशब्द ।
धगधगिला धरणीधर मानिला खेद ।
कडाडिले पर्वत उडुगण उच्छेद ।
रामीं रामदासा शक्तीचा शोध ।। २ ।।

मारुतीचा पाळणा हनुमान जयंतीचा पाळणा

पहिल्या दिवशी झाला आनंद
माया अंजनी होती वनात
शिव शिव जप करी मनात,
पोटी जन्मले बाळ हनुमंत
जो बाळा जो जो रे जो ।।१।। 

चैत्र महिन्यात पौर्णिमेला
बाळ मारुती आला जन्माला,
फळ समजला वरी सूर्याला
जो बाळा जो जो रे जो ।।२।। 

रामाची भक्ती गाती गाणी
केशरी नंदन जो तो जाणी,
पवनपुत्र तो ज्ञानी ध्यानी
जो बाळा जो जो रे जो ।।३।।

हनुमान बाळ थोर जाहला
सुग्रीवाचा सोबती जाहला,
राम लक्ष्मणा सहाय्य केला
जो बाळा जो जो रे जो ।।४।।

अंजनीचा सुत धन्य झाला
शत्रुमर्दना बाळ आला,
दासावरी कृपा करिला
जो बाळा जो जो रे जो ।।५।

श्री हनुमान जन्माचे अभंग

 

देवांगना हातीं आणविला शृंगी । यज्ञ तो प्रसंगी आंरभिला ॥१॥
विभांडका क्रोध आला असे भारी । अयोध्या भीतरीं वेगीं आला ॥२॥
राजा दशरथ सामोरा जाऊनी । अति प्रिती करुनी सभे नेला ॥३॥
पुत्र स्नुषा दोन्हीं देखतां नयनीं । आनंदला मनी म्हणॆ नामा ॥४॥

आनंदोनी म्हणे राया धन्य केलें । इच्छिलें सोहळे पुरवीन ॥१॥
यज्ञाचा आरंभ करी लवलाह्मा । पुसोनी आचार्या वसिष्ठांसी ॥२॥
सर्व ऋषीजन मिळाले सकळ । मंत्रांचा कल्लोळ करिताती ॥३॥
नामा म्हणे शृंगी मुख्यत्वें शोभला । यज्ञ आरंभिला तेणें जेव्हां ॥४॥

आरंभिला यज्ञ सन्तोष सर्वत्र । आनंदे नगर दुमदुमीत ॥१॥
यज्ञनारायण सन्तोष पावला । प्रत्यक्ष तो आला कुंडांतुनीं ॥२॥
पायस तें पात्र घेऊनियां करीं । शृगीस झडकरी बोलतसे ॥३॥
विलंब करितां विघ्न ओढवेल । सत्वर वहिले भाग करा ॥४॥
नामा म्हणे देव येईल पोटासीं । ऎंसे गूज त्यासी अग्नी सांगे ॥५॥

विभाग सत्वर वसिष्ठानें केले । राया बोलाविलें सान्निधचि ॥१॥
प्रथम तो भाग कौसल्यसी दिला । तेणें क्रोध आला कनिष्ठेसी ॥२॥
येतांचि तो क्रोध विघ्न ओढवलें । मुखीं झडपिला पिंड घारीं ॥३॥
आसडोनी पिंड घारीनें पै नेला । नामा म्हणे घातिला अंजनी करीं ॥४॥

सुवर्च्यानामें स्वर्गीची देवांगना । ब्रह्मशापें जाणा घारी झाली ॥१॥
अयोध्येचा राजा दशरथ नृपती । यज्ञ पुत्राप्रती करविला ॥२॥
शृंगी पायसपात्र दिधलें वसिष्ठा हातीं । त्वरें करीजेती तीन भाग ॥३॥
तीन भाग वसिष्ठें करुनी निश्चितीं । दिधलें राणी हातीं तिघी तीस ॥४॥
कैकई रुसली तेथें विघ्न झालें । घारीनें तें नेलें निजभागा ॥५॥
एका जनार्दनी घारीं पिंड नेतां । पुढें झाली कथा श्रवण करा ॥६॥

ऋष्यमूक पर्वती अंजनी तप करी । आठविला अंतरी सदाशिव ॥१॥
तपाचिया अंती शिव झाला प्रसन्न । मागे वरदान काय इच्छा ॥२॥
येरी म्हणे तुज ऐसा व्हावा मज पुत्र । ज्ञानी भक्त पवित्र उत्तम गुणी ॥३॥
म्हणतसे शिव अंजुळी पसरुनी । बैस माझे ध्यानीं सावधान ॥४॥
वायुदेव येउनी प्रसाद देईल तुजला । भक्षीं कां वहिला अविलंबें ॥५॥
एका जनार्दनीं घारीं नेतां पिंड । वायूनें प्रचंड आसुडिला ॥६॥

पिंड घारीनें झडपिला । अंजनीनें तो सेविला ॥१॥
अंजनीच्या तपासाठीं । महारुद्र आले पोटीं ॥२॥
चैत्र शुद्ध पौर्णिमेसी । सुर्योदय समयासी ॥३॥
महारुद्र प्रगटला । नामा म्हणे म्यां वंदिला ॥४॥

महारुद्र प्रगटला । नामा म्हणे म्यां वंदिला हे चरण म्हणून गुलाल फुले टाकावीत.

घारीमुखींचा पिंड अंजनीच्या करीं । पडतां निर्धारीं भक्षियला ॥१॥
नवमास होतां झाली ती प्रसूत । दिव्य वायुसूत प्रगटला ॥२॥
वानराचा वेष सुवर्ण कौपीन । दिसती शोभायमान कुंडलें तीं ॥३॥
जन्मतांची जेणें सूर्यातें धरियलें । इंद्रादिकां दिलें थोर मार ॥४॥
अमरपति मारी वज्रहनुवटी । पडिला कपाटीं मेरुचिया ॥५॥
वायुदेव येवोनी बाळ तो उचलिला । अवघाचि रोधिला प्राण तेथें ॥६॥
सकळ देव मिळोनी प्रसन्न पैं होतीं । वरदान देती मारुतीसी ॥७॥
सर्व देव मिळोनी अंजनीशीं बाळ । देतां प्रात:काळ होतां तेव्हां ॥८॥
तिथि पौर्णिमा चैत्रमास जाण । एका जनार्दनी रुपासी आला ॥९॥

 

Recommended Posts

हनुमान चालीसा

 

 श्रीगुरु चरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारि ।

बरनऊ रघुवर विमल जसु जो दायकु फल चारि ।।

बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरौ पवन कुमार ।

बल बुद्धि विद्या देहु मोहि, हरहु कलेश विकार ।।

जय हनुमान ज्ञान गुन सागर ।

जय कपीस तिहुँ लोक उजागर ॥१॥

राम दूत अतुलित बल धामा ।

अंजनि पुत्र पवनसुत नामा ॥२॥

महावीर विक्रम बजरंगी ।

कुमति निवार सुमति के संगी ॥३॥

कंचन बरन बिराज सुबेसा ।

कानन कुंडल कुँचित केसा ॥४॥

हाथ वज्र औ ध्वजा बिराजे ।

काँधे मूँज जनेऊ साजे ॥५॥

शंकर सुवन केसरी नंदन ।

तेज प्रताप महा जग वंदन ॥६॥

विद्यावान गुणी अति चातुर ।

राम काज करिबे को आतुर ॥७॥

प्रभु चरित्र सुनिबे को रसिया ।

राम लखन सीता मनबसिया ॥८॥

सूक्ष्म रूप धरि सियहि दिखावा ।

बिकट रूप धरि लंक जरावा ॥९॥

भीम रूप धरि असुर संहारे ।

रामचंद्र के काज सवाँरे ॥१०॥

लाऐ संजीवन लखन जियाए ।

श्री रघुबीर हरषि उर लाए ॥११॥

रघुपति कीन्ही बहुत बड़ाई ।

तुम मम प्रिय भरतहि सम भाई ॥१२॥

सहस बदन तुम्हरो जस गावै ।

अस कहि श्रीपति कंठ लगावै ॥१३॥

सनकादिक ब्रह्मादि मुनीसा ।

नारद सारद सहित अहीसा ॥१४॥

जम कुबेर दिगपाल जहाँ ते ।

कवि कोविद कहि सके कहाँ ते ॥१५॥

तुम उपकार सुग्रीवहि कीन्हा ।

राम मिलाय राज पद दीन्हा ॥१६॥

तुम्हरो मंत्र विभीषण माना ।

लंकेश्वर भये सब जग जाना ॥१७॥

जुग सहस्त्र योजन पर भानू ।

लील्यो ताहि मधुर फ़ल जानू ॥१८॥

प्रभु मुद्रिका मेलि मुख माही ।

जलधि लाँघि गए अचरज नाही ॥१९॥

दुर्गम काज जगत के जेते ।

सुगम अनुग्रह तुम्हरे तेते ॥२०॥

राम दुआरे तुम रखवारे ।

होत न आज्ञा बिनु पैसारे ॥२१॥

सब सुख लहै तुम्हारी सरना ।

तुम रक्षक काहू को डरना ॥२२॥

आपन तेज सम्हारो आपै ।

तीनहूं लोक हाँक ते काँपै ॥२३॥

भूत पिशाच निकट नहि आवै ।

महावीर जब नाम सुनावै ॥२४॥

नासै रोग हरे सब पीरा ।

जपत निरंतर हनुमत बीरा ॥२५॥

संकट तें हनुमान छुडावै ।

मन क्रम वचन ध्यान जो लावै ॥२६॥

सब पर राम राय सिर ताजा ।

तिनके काज सकल तुम साजा ॥२७॥

और मनोरथ जो कोई लावै ।

सोइ अमित जीवन फल पावै ॥२८॥

चारों जुग परताप तुम्हारा ।

है परसिद्ध जगत उजियारा ॥२९॥

साधु संत के तुम रखवारे ।

असुर निकंदन राम दुलारे ॥३०॥

अष्ट सिद्धि नौ निधि के दाता ।

अस बर दीन जानकी माता ॥३१॥

राम रसायन तुम्हरे पासा ।

सदा हो रघुपति के दासा ॥३२॥

तुम्हरे भजन राम को पावै ।

जनम जनम के दुख बिसरावै ॥३३॥

अंतकाल रघुवरपुर जाई ।

जहाँ जन्म हरिभक्त कहाई ॥३४॥

और देवता चित्त ना धरई ।

हनुमत सेई सर्व सुख करई ॥३५॥

संकट कटै मिटै सब पीरा ।

जो सुमिरै हनुमत बलबीरा ॥३६॥

जै जै जै हनुमान गोसाई ।

कृपा करहु गुरु देव की नाई ॥३७॥

जो शत बार पाठ कर जोई ।

छूटहि बंदि महा सुख होई ॥३८॥

जो यह पढ़े हनुमान चालीसा ।

होय सिद्धि साखी गौरीसा ॥३९॥

तुलसीदास सदा हरि चेरा ।

कीजै नाथ हृदय मँह डेरा ॥४०॥

पवन तनय संकट हरन, मंगल मूरति रूप ।

राम लखन सीता सहित, हृदय बसहु सुर भूप ॥॥


Discover more from

Subscribe to get the latest posts sent to your email.

Say what you feel