https://goodworld.in A website by Madhav Bhope

खंडेरायाच्या आरत्या आणि तळी

khandoba-aarti

खंडोबाची आरती-१ नरहरी कृत

जेजुरगडपर्वत शिवलिंगाकार ।

मृत्युलोकी दुसरे कैलास शिखर ॥

नानापरिची रचना रचिली अपार ।

तये स्थळी नांदे स्वामी शंकर ॥ १ ॥

जय देव जय देव शिवमार्तंडा ।

अरिमर्दन मल्लारी तूंची प्रचंडा ॥ धृ. ॥

मणिमल्ल दैत्य प्रबळ तो झाला ।

त्रिभुवनी त्याने प्रळय मांडिला ॥

नाटोपे कोणास वरे मातला ।

देवगण गंधर्व कांपती त्याला ॥ जय. ॥ २ ॥

चंपाषष्ठी दिवशी अवतार धरिसी ।

मणिमल्ल दैत्यांचा संहार करिसी ।

चरणी पृष्ठी खंङ्‌गें वर्मी स्थापीसी ।

अंती वर देउनि त्या मुक्तीते देशी ॥ जय. ॥ ३ ॥

मणिमल्ल दैत्य मर्दुनी मल्लारी ।

देवा संकट पडतां राहे जेजुरी ॥

अर्धांगी म्हाळसा शोभे सुंदरी ।

देवा ठाय मागे दास नरहरि ॥ जय. ॥ ४ ॥


खंडोबाची आरती-२  रामदास स्वामी कृत

पंचानन हयवाहन सुरभूषितनीळा ।

खंडामंडित दंडित दानव अवलीळा ॥

मणिमल्ल मर्दुनियां जों धूसुर पिवळा ।

हिरे कंकण बासिंगे सुमनांच्या माळा ॥ १ ॥

जय देव जय देव जय शिव मल्हारी ।

वारीं दुर्जनअसुरा भवदुस्तर तारी ॥ धृ. ॥

सुरवरसंवर वर दे मजलागी देवा ।

नाना नामे गाइन ही तुमची सेवा ॥

अघटित गुण गावया वाटतसे हेवा ।

फणिवर शिणला किती नर पामर केवा ॥ २ ॥

रघुवीरस्मरणी शंकर हृदयीं निवाला ।

तो हा मल्लांतक अवतार झाला ॥

यालागीं आवडे भाव वर्णीला ।

रामी रामदासा जिवलग भेटला ॥ जय देव.॥ ३ ॥


खंडोबाची आरती-३  नामदेव कृत

जय देवा मार्तंडा । हाती घेउनिया खंडा ॥

मारिले दुष्ट दैत्य । उडे त्रैलोकी झेंडा ॥ धृ. ॥

मातले पृथ्वीवरि । मणि मल्ल दैत्य दोनी ॥

टाकिले ऋषीयाग । यज्ञकुंड विध्वंसुनी ॥

म्हणुनीया अवतरले । गौरीहर शूळपाणी ॥ जय. ॥ १ ॥

साठ कोटी गण सवें । घेउनियां दैत्यावरी ॥

जाऊनियां युद्ध केलें । रण तुंबल भारी ॥

शिवचक्र दैत्यचक्र । युद्ध होय बरोबरी ॥ जय. ॥ २ ॥

त्रिशुळपाणी तप्त । थोर झाले क्रोधामुळें ॥

मारिले खङ्‌ग जेव्हां । दैत्याचे कंठनाळीं ॥

वरदान मागताती । प्राण अंताचे वेळी ॥ जय. ॥ ३ ॥

मल्ल म्हणे कर्पूरगौरा । हर हर महादेवा मल्हारी जनमुखिं ॥

ऎसा उच्चार व्हावा । उद्धरिले असुरातें ।

म्हणुनीं मल्लारी नांवा । जय. ॥ ४ ॥

चंपाषष्ठीचे दिवशी । ऎसा अवतार झाला ॥

आनंदले सुरवर । म्हणुनी येळकोट बोला ॥

चरणी तुझे लीन नामा ॥ देवा सांभाळी त्याला ॥ जय देवा. ॥ ५ ॥


खंडोबाची आरती- ४ मध्वमुनीश्वर कृत

मस्तकि मुगुट अंगी सोन्याचा शेला । हस्तकि खड्गा घेउनी मारिसी मणिमल्ला ।।

कैलासाची प्रतिमा जेजुरीचा किल्ला । बैसोनिया रक्षिसी दक्षिणचा जिल्हा ।।१।।

जयदेव जयदेव जय खंडेराया । अखंड भंडारानें डवडवली काया ।।धृ ।।

चंपाषष्ठीचा जे करिती कुळधर्म । त्यांचे होत आहे परिपूर्णधर्म ।।

ज्यांना न कळे तुझ्या भक्तीचे वर्म। त्यांचे तोडीत आहे कळीकाळ चर्म ।।२।।

जयदेव जयदेव जय खंडेराया ।अखंड भंडारानें डवडवली काया ।।धृ ।।

तुझे भक्तीविन्मुख जे ते कौरव । जिकडे तुझा धर्म तिकडे गौरव ।।

मध्वनाथ जपतो येळकोट भैरव । निंदा करिती त्यांना होती रौरव ।।३।।

जयदेव जयदेव जय खंडेराया । अखंड भंडारानें डवडवली काया ।।धृ ।।


खंडोबाची तळी

श्री खंडोबा महाराज तळी आरती

॥ जय मल्हार ॥

बोल खंडेराव महाराज की जय॥

सदानंदाचा येळकोट ॥

येळकोट येळकोट जय मल्हार॥

हर हर महादेव॥ चिंतामण मोरया॥

भैरोबाचा चांदोबा॥ अगडबंब नगारा॥

सोन्याची जेजुरी॥ मोत्याचा तुरा॥

निळा घोडा॥ पाई तोडा॥

कमर करगोटा ॥ बेंबी हिरा॥

गळयात कंठी॥ मोहन माळा॥

ङोईवर शेला॥ अंगावर शाल॥

सदा हिलाल॥ जेजुरी जाई॥

शिकार खेळी॥ म्हाळसा सुंदरी॥

आरती करी॥ देवा ओवाळी ॥

नाना परी॥ देवाचा श्रृंगार ॥

कोठ लागो शिखरा॥ खंडेरायाचा खंडका ॥

भंडाऱ्याचा भडका॥ बोल सदानंदाचा येळकोट ॥

येळकोट येळकोट जय मल्हार॥


आगडदुम नगारा, सोन्याची जेजुरी ।

निळा घोडा, पाव में तोडा ।

मस्तकी तुरा, बेंबी हिरा ।

अंगावर शाल, सदाही लाल ।

म्हाळसा सुंदरी, आरती करी ।

खोबऱ्याचा कुटका, भंडाऱ्याचा भंडका ।

बोला सदा आनंदाचा येळकोट

खंडेराव महाराजकी जय

हर हर महादेव

चिंतामणी मोरया

आनंदीचा उदय उदय

भैरीचा चांग भले

सदानंदाचा येळकोट

खंडेराव महाराज की जय

हर हर महादेव

चिंतामणी मोरया

चिंतामणी मोरया

आनंदाचा उदय उदय

भैरीचा चांग बले

सदानंदाचा येळकोट

खंडेराव महाराज कि जय


बोल खंडेराव महाराज की जय॥

सदानंदाचा येळकोट ॥

येळकोट येळकोट जय मल्हार॥

हर हर महादेव॥ चिंतामण मोरया॥

भैरोबाचा चांदोबा॥ अगडबंब नगारा॥

सोन्याची जेजुरी॥ मोत्याचा तुरा॥

निळा घोडा॥ पाई तोडा॥

कमरी करगोटा ॥ बेंबी हिरा॥

गळयात कंठी॥ मोहन माळा॥

अंगावर शाल॥ सदा हिलाल॥

जेजुरी जाई॥ शिकार खेळी॥

म्हाळसा सुंदरी॥ आरती करी॥

देवा ओवाळी ॥ नाना परी॥

देवाचा श्रृंगार ॥ कोठ लागो शिखरा॥

खंडेरायाचा खंडका ॥ भंडाऱ्याचा भडका॥

बोल सदानंदाचा येळकोट ॥

येळकोट येळकोट जय मल्हार॥


 


Discover more from Blissful Life

Subscribe to get the latest posts sent to your email.

Say what you feel

0 Comments
Inline Feedbacks
View all comments
0
Would love your thoughts, please comment.x
()
x