लेखक
श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद
(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)
ही लेखमाला श्री कोटणीस यांच्या फेसबुक पेज वर नुकतीच त्यांनी प्रसिद्ध केली आहे आणि तिला वाचकांचा भरभरून प्रतिसाद नेहमीप्रमाणे मिळतो आहे. इथे ही लेखमाला या ब्लॉगच्या वाचकांसाठी, श्री कोटणीस यांच्या परवानगीने प्रसिद्ध करीत आहोत.
*बॅंकस्य कथा रम्या..*
*स्थितप्रज्ञ आणि उलटलेला डाव..*
( भाग : 6 )
असं आकस्मिकरित्या, एकदम हवेतून प्रकट झाल्यासारखं सब इंस्पे. हिवाळेंना दारात उभं असलेलं पाहून आम्ही भयचकीतच झालो. एखादं भूत पाहिल्या सारखे दचकून आणि गर्भगळीत होऊन आम्ही पाचही जण स्तब्ध होऊन त्यांच्याकडे एकटक पहातच राहिलो.
फिल्मी स्टाईलने हातातल्या लाकडी रुळाने आम्हाला बाजूला सारीत हिवाळेंनी खोलीत प्रवेश केला.
“एवढ्या लवकर मी इथे तुमच्या पर्यंत कसा पोहोचलो ? याबद्दल आत्ता मला काहीही विचारू नका. मात्र तुमचा एक मित्र म्हणूनच मी इथे आलेलो आहे हे जाणून घ्या. आणि असे पॅनिक होऊ नका. शांतपणे बसून मी काय सांगतो ते ऐका..”
असं म्हणत स्वतः हिवाळे साहेब सुद्धा तिथेच एका खुर्चीवर बसले.
“तुम्ही विनाकारण घाबरून वैजापूरहुन पळून आलात. तुम्ही समजता तसं तुमच्या विरुद्ध अजून कसलाही FIR दाखल झालेलाच नाही. आम्ही सांगितल्या प्रमाणे जर फक्त पाचच मिनिटांपुरते तुम्ही पोलीस ठाण्यात आला असतात तर हे प्रकरण आम्ही आजच मिटवून टाकलं असतं. पण कुणाच्या तरी सांगण्या वरून तुम्ही हा जादाचा शहाणपणा दाखवलांत.. असो..!आमचं नेटवर्क इतकं जबरदस्त आहे की तुम्ही कुठेही दडून बसलांत तरी मनांत आणलं तर आम्ही सहज तुमच्या पर्यंत पोहोचून तुम्हाला कधीही अटक करू शकतो.. बस, एवढं सांगण्यासाठीच मी इथवर आलो होतो. आता टेन्शन घेऊ नका.. शांतपणे झोपा.”
एवढं बोलून हिवाळे साहेब उठले. आम्हा कुणाच्याही तोंडून अद्याप एक शब्दही बाहेर पडला नव्हता.
“गुड नाईट..!” असं म्हणून दारा बाहेर गेल्यावर किंचित मागे वळून ते म्हणाले..
“मी तुमचा मित्र आहे, हितचिंतक आहे आणि या प्रकरणात तुम्हाला वेळोवेळी मदत करीत राहीन एवढं मात्र कायम ध्यानात असू द्या..!”
टॉक टॉक असा बुटांचा आवाज करीत.. तडफदारपणे दमदार पावले टाकीत हिवाळे साहेब निघून गेले.
ते दिसेनासे होईपर्यंत त्यांच्या पाठमोऱ्या रुबाबदार आकृतीकडे आम्ही दारात खिळून बघतच राहिलो.
पोलिसांना मूर्ख बनवून, त्यांना चकवून सिनेमातल्या हिरो सारखं फरारी होऊन गुंगारा देण्यातला आमचा आजचा आनंद.., अंतर्यामी भीती असतांनाही हसत खेळत एन्जॉय केलेला तो साहसी, थरारक प्रवास.. या साऱ्यातील सगळा रोमांचच हिवाळे साहेबांच्या त्या नाट्यपूर्ण एंट्रीने संपुष्टात आला होता. उलट आम्हीच उतावळे, मूर्ख ठरलो होतो. उदास होऊन, अत्यंत हताश, निराश मनाने निमूटपणे आम्ही झोपायला गेलो.
दुसऱ्या दिवशीच्या कोणत्याही वृत्तपत्रांत बँकेविरुद्धच्या FIR ची तसेच आमच्या फरार होण्याची कुठेही छोटीशी देखील बातमी नव्हती. त्यामुळे हिवाळे साहेब खरंच बोलत होते याची आम्हाला खात्री पटली.
दुपारी जवळच असलेल्या रिजनल ऑफिस मध्ये जाऊन RM साहेबांना भेटलो आणि त्यांना कालच्या सब इंस्पे. हिवाळेंच्या भेटी बद्दल सांगितलं. ते ऐकून RM साहेब म्हणाले..
“तुम्ही त्यांच्या बोलण्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. या ना त्या मार्गाने तुमच्या कडून पैसे लुबाडण्यासाठीच ते आलेले असावेत. अहो, आपल्या जन्मदात्या बापालाही सोडत नाहीत हे पोलीस लोक पैसे खाण्याच्या बाबतीत.. !
तुम्ही आता ताबडतोब वैजापुरातील बँकेच्या वकिलांशी संपर्क साधा आणि त्यांना पोलीस स्टेशन मध्ये जाऊन बँकेविरुद्ध च्या FIR ची प्रत मिळण्यासाठी अर्ज करण्यास सांगा. त्यांत कोणती कलमं लावली आहेत हे समजल्याशिवाय अटकपूर्व जामिनासाठी (Anticipatory bail) कोर्टात अर्जच करता येणार नाही.. आणि हो, ती ट्रेनिंग सेंटरची जागा आता तुमच्यासाठी सुरक्षित राहिलेली नाही. आज पासून तुम्ही इथल्या व्हीआयपी गेस्ट रूम मध्ये शिफ्ट व्हा. DGM साहेबांना सांगून मी तशी व्यवस्था करतो.”
कोण खरं आणि कोण खोटं, आम्हाला तर काहीच समजेनासं झालं होतं. एकीकडे, ज्याअर्थी पेपरमध्ये बातमी नाही त्या अर्थी पोलिसांनी FIR दाखल केलेलाच नाही, हे हिवाळे साहेबांचं म्हणणंही खरंच वाटत होतं. तर दुसरीकडे, RM साहेब तर पोलीस स्टेशन मधून FIR ची कॉपी मागवून घेण्याबद्दल सांगत होते. शेवटी, वैजापूर येथील आमचे बँकेचे वकील श्री प्रभाकर मनोहर यांना फोन लावला आणि पोलीस स्टेशन मध्ये जाऊन FIR बद्दल चौकशी करण्यास सांगितलं. संध्याकाळ पर्यंत मनोहर वकिलांकडून काहीच मेसेज आला नाही. रात्री आठ वाजता त्यांचा मेसेज आला की बँकेचा माळी-कम-प्युन नंदू औरंगाबादला येण्यास निघाला असून त्याच्याजवळ आवश्यक ती कागदपत्रे दिली आहेत.
आम्ही दुपारीच नंदूला मेसेज करून रविशंकर व बेबी सुमित्रा यांच्या घरी/रूमवर जाऊन त्यांचे रोजचे वापरायचे कपडे व दोन चार ड्रेस घेऊन येण्यास सांगितले होते. रहीम चाचांचे घर वैजापूर पासून तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या येवला इथे होते. त्यांचा मोठा मुलगा नुकताच तिथून येऊन त्यांचे कपडे व अन्य आवश्यक ते सामान देऊन गेला होता. आम्ही आता अधिरतेनं नंदूची वाट पहात होतो.
रात्री दहा वाजता नंदू आला. आल्या आल्या त्याने ॲडव्होकेट मनोहर साहेबांनी पाठविलेला एक लिफाफा माझ्या हातात ठेवला. लिफाफ्यात FIR ची कॉपी होती आणि सोबत मनोहर वकिलांची चिट्ठी ही होती. दोन तास पोलीस स्टेशन मध्ये ताटकळत बसवूनही पोलिसांनी FIR ची कॉपी न दिल्याने शेवटी न्यायालयात अर्ज करून FIR ची certified कॉपी मिळविल्याचे त्यात लिहिले होते. तसेच FIR काल दुपारी बारा वाजताच दाखल झाला असल्याचेही त्यांनी चिट्ठीत नमूद केले होते.
म्हणजे RM साहेबांचा अंदाज अचूक होता तर.. ! मग हिवाळे साहेबांनी आपल्याला कालच अटक का केली नाही ? तसंच FIR दाखल झालाच नाही असं खोटं ते का बोलले ? दिवसभरात नोंदविण्यात आलेल्या सर्व गुन्ह्यांची माहिती पोलिसांना रोज संध्याकाळी पत्रकारांना द्यावीच लागते असे ऐकून होतो. त्या आधारेच पत्रकार उद्याच्या पेपरात छापायची बातमी तयार करतात. मग आमच्या केस मध्ये पोलिसांनी ही माहिती पत्रकारांना का दिली नाही ?
अशा अनेक प्रश्नांची उकल होत नव्हती. काहीही असो, FIR ची certified प्रत तर हातात आली होती, आता अटकपूर्व जमीन (Anticipatory bail) मिळविण्यासाठी ताबडतोब एखाद्या चांगल्या वकिलाला गाठावे लागणार होते. बँकेच्या आलिशान व्हीआयपी गेस्ट सुट (suit) मध्ये बसल्या बसल्या माझ्या औरंगाबाद मधील मित्रांना फोन करून मी त्याबाबत सल्ला विचारत होतो. सरतेशेवटी सर्वानुमते जोगळेकर वकिलांचे नाव निश्चित केले आणि उद्या सकाळी नऊ वाजताच त्यांचेकडे जायचे असे ठरवले.
जोगळेकर वकिलांचा दुमजली बंगला रिजनल ऑफिस पासून जवळच होता. त्यांचे निवासस्थान व ऑफिस हे दोन्ही पहिल्या मजल्यावरच होते. बंगल्याबाहेर पक्षकारांची खूप गर्दी होती. खाली पार्किंग मध्ये पाच सहा कार व आठ दहा दुचाकी वाहने उभी होती. ती सर्व वाहने जोगळेकर वकिलांची तसेच त्यांच्या कर्मचाऱ्यांची असावीत. कारण त्या सर्व वाहनांची सिरीज वेगळी असली तरी रजिस्ट्रेशन नंबर मात्र एकच होता.. 302 !
जोगळेकर वकील खुनाच्या केसेस (कलम 302) लढण्यासाठी प्रसिद्ध होते. आणि अशा केसेस बाबतीत त्यांचा सक्सेस रेट सुद्धा खूप हाय होता. शिकाऊ वकिलांचा एक मोठा ताफाच त्यांच्या हाताखाली होता. आम्ही त्यांना भेटलो तेंव्हा त्यांना कोर्टात जायची घाई होती. माझ्या कडे एकवार नजर फिरवीत.. “केस संबंधी तुमच्या जवळ असलेली सर्व कागदपत्रे माझे असिस्टंट श्री. पुराणिक यांच्याकडे द्या. आणि तुम्ही रात्री आठ वाजता या. तेंव्हा निवांत बोलू…” असं सांगून ते लगबगीने निघून गेले. सुखदेव बोडखेने बँकेकडे दिलेला तक्रार अर्ज, पोलिसांकडे दिलेली लेखी तक्रार व FIR ची वैजापूर कोर्टातून मिळवलेली प्रमाणित प्रत एवढीच कागदपत्रे आमच्याकडे होती. ती पुराणिक वकिलांकडे देऊन आम्ही गेस्ट हाऊस वर परतलो.
रात्री आठ वाजता पुन्हा जोगळेकर वकिलांकडे गेलो तेंव्हा त्यांच्या पुढे आठ दहा जण बसले होते. त्यांच्या चेहऱ्यांवरुन ते सराईत गुंड वाटत होते. आणि आपसांत ते हिंदी भाषेत बोलत होते.
“हं.. बोल मुन्ना ! यावेळी कोणता राडा करून आलास ? कुणाशी पंगा घेतलास ?”
जोगळेकर वकिलांची मुन्ना नावाच्या त्या गुंडाशी चांगलीच जान पहचान दिसत होती. त्याच्याशी ते त्याच्याच छपरी भाषेत बोलत होते.
“काही नाही साहेब, त्या इब्राहिमने माझ्या एरियात मटका आणि देशी दारूचा अड्डा उघडला होता म्हणून त्याला धमकावण्यासाठी पिस्तुल घेऊन त्याच्या अड्ड्यावर गेलो होतो. त्यावेळी झालेल्या झटापटीत माझ्या पिस्तुलातून गोळी सुटली, ती इब्राहिमच्या कानाला चाटून गेली. सध्या तो सरकारी दवाखान्यात उपचार घेतो आहे आणि पोलिसांनी माझ्या अटकेचं वॉरंट काढलं आहे. नेहमी प्रमाणे तुम्ही मला यातून सहीसलामत वाचवाल याची खात्री आहे, म्हणूनच तुमच्याकडे आलो आहे..”
मुन्नाने एका दमात सगळं घडाघडा सांगून टाकलं. जोगळेकर वकील हसत हसत त्याला म्हणाले..
“बस.., एवढंच ? काही काळजी करू नकोस..! तुझं काहीही वाकडं होणार नाही. फक्त आता थोड्या दिवसांसाठी तू अंडरग्राउंड होऊन जा. बाकीचं मी बघून घेतो.. बरं, ते पिस्तुल कुठाय ? आणलं आहेस का इथे ?”
“हो, हो.. ! आणलं आहे ना !”
असं म्हणून झटकन पायजाम्याच्या खिशात हात घालून बाहेर काढलेलं एक ओबडघोबड पिस्तुल मुन्नाने अगदी लहान मुलाच्या उत्साहाने व कौतुकाने जोगळेकर वकिलांना दाखवलं. ते पिस्तुल हातात घेऊन वकील साहेब म्हणाले..
“अरे..! हे असलं कसलं गावठी पिस्तुल..?”
“देशी कट्टा आहे साहेब तो.. गेल्याच महिन्यात एका बिहारी भाईच्या लग्नासाठी पाटण्याला गेलो होतो तेंव्हा तिथून असे तीन चार कट्टे आणले होते. दिसायला रफ असलं तरी काम मात्र एकदम टफ आणि असरदार करतं..!”
कौतुकाने मुन्ना म्हणाला. (मुन्नाला त्याच्या धंद्यात सगळे “मुन्ना सनकी” या नावाने ओळखतात हे नंतर एकदा सहज बोलता बोलता पुराणिक वकिलांनी आम्हाला सांगितलं..)
“छान..!”
त्या प्राणघातक शस्त्राला हळुवारपणे कुरवाळुन परत मुन्ना सनकीला देत जोगळेकर म्हणाले..
“आता तुम्ही लोक जा ! यापुढे माझ्याशी कसल्याही प्रकारे संपर्क साधण्याचा प्रयत्न करू नका. काही खूपच अर्जंट असेल तर पुराणिक साहेबांजवळ निरोप द्या. सारे मोबाईल बंद ठेवा.. सिम कार्ड्सही नष्ट करा.. काही दिवसांनी प्रकरण थंड पडेल. मधल्या काळात काय करायचं ते मी पाहतो.. ! निघा आता तुम्ही..!”
मुन्ना “सनकी” ने खिशातून शंभराच्या नोटांची आठ दहा पाकिटं काढली आणि “अभी के लिए इतना रख लो साब..!” असं म्हणत ती जोगळेकर वकिलांच्या पुढ्यात ठेवली. त्या पैशांना स्पर्श ही न करता ते म्हणाले..
“पुराणिक साब नीचे बैठे है, जाते जाते उनसे मिलकर वकिलपत्र पर दस्तखत करके जाना.. और ये पैसे भी उन्ही के पास जमा करना..!”
“जी, शुक्रिया..! शब्बा खैर..! गुड नाईट साब..!”
मुन्ना सनकी आपल्या साथीदारांसह निघून गेला.. ते जाताना सहजच माझी नजर त्या सर्वांच्या शर्ट पायजाम्यांच्या फुगीर खिशांकडे गेली. नक्कीच त्या खिशांमध्ये नोटांच्या गड्ड्या व देशी कट्टे, पिस्तुले, रामपुरी चाकू अशी शस्त्रे असावीत..
बाप रे ! अशा सराईत गुन्हेगारांशी सलोख्याचे संबंध असणारा हा जोगळेकर वकील स्वतःही तितकाच मुरलेला व खतरनाक असावा. मी जोगळेकर वकिलांकडे निरखून पाहिलं..
साधारण पस्तीस ते चाळीस दरम्यानचे वय, भक्कम देहयष्टी, एखाद्या सिनेनटासारखा देखणा चेहरा, लालबुंद कोकणस्थी गोरा वर्ण, लबाड कावेबाज वाटणारे घारे डोळे, रुबाबदार मिशा, दाट केसांचा स्टायलिश भांग, गळ्यात टाय व अंगावर उंची कापडाचा अप-टू-डेट पेहराव.. एकंदरीत अत्यंत आकर्षक व्यक्तिमत्व असलेल्या वकिलसाहेबांची तितकीच गोरीपान, सुस्वरूप, सुडौल व सुंदर पत्नी अधून मधून त्यांना त्यांच्या कामात मदत करण्यासाठी, केस संबंधीच्या फायली व पुस्तके काढून देण्यासाठी बाजूच्याच घरातून सारखी ये-जा करीत होती. तसंच किचन मधून त्यांना पाणी, कॉफी, काजू-बदाम ई. आणून देत होती.
पण या सर्वांपेक्षा जास्त लक्ष वेधून घेत होती ती रश्मी.. जोगळेकर साहेबांची स्वीय सहायक… पर्सनल सेक्रेटरी.
(क्रमशः 7)
श्री अजय कोटणीस हे बँकेतील माझे सहकारी असून, स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानकावर खिळवून ठेवतात.
त्यांना मराठवाड्यातील एका गावी बँकेत शाखा प्रमुख असतांना आलेल्या अनुभवावर आधारित, एक प्रसंग त्यांनी त्यांच्या खास शैलीत वर्णन केला आहे
Subscribe to Blog via Email
Posts by all authors
- Ajay Kotnis
- उतनूरचे दिवस-5A-Memories-at-Utnoor-By Ajay Kotnis
- उतनूरचे दिवस-4D-Memories-at-Utnoor-By Ajay Kotnis
- उतनूरचे दिवस-4B-Memories-at-Utnoor-By Ajay Kotnis
- उतनूरचे दिवस-4A-Memories-at-Utnoor-By Ajay Kotnis
- उतनूरचे दिवस-3-Memories-at-Utnoor-By Ajay Kotnis
- उतनूरचे दिवस-2-Memories-at-Utnoor-By Ajay Kotnis
- उतनूरचे दिवस-1-Memories-at-Utnoor-By Ajay Kotnis
- Mind blowing experiences of a Banker-19 LAST episode शेवटचे प्रकरण
- Mind blowing experiences of a Banker-18 एका बँकरचे थरारक अनुभव-18
- Mind blowing experiences of a Banker-17 एका बँकरचे थरारक अनुभव-17
- Guest Writer
- Madhav Bhope
- चातुर्मासाचे महत्त्व importance-of-chaturmas
- Birthday card from a daughter to her father
- उतनूरचे दिवस-4C-Memories-at-Utnoor-By Ajay Kotnis
- IFSC code search for Banks in India
- Try these android apps
- Memories of SBH on foundation day माँ का आँचल
- Hanuman Chalisa Quiz
- Gita chapter 15 quiz
- Tic Tac Toe
- मोबाईलचा सदुपयोग कसा करायचा touch-quiz-gita-adhyaya-mobile-addiction
Related
Discover more from Blissful Life
Subscribe to get the latest posts sent to your email.