https://goodworld.in A website by Madhav Bhope

एटीएम चे थरारक नाट्य- भाग-५ अजय कोटणीस

goodworld_atm natya-7

लेखक 

श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद 

(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)

ही लेखमाला श्री कोटणीस यांच्या फेसबुक पेज वर नुकतीच त्यांनी प्रसिद्ध केली आहे आणि तिला वाचकांचा भरभरून प्रतिसाद नेहमीप्रमाणे मिळतो आहे. इथे ही लेखमाला या ब्लॉगच्या  वाचकांसाठी, श्री कोटणीस यांच्या परवानगीने प्रसिद्ध करीत आहोत.

एटीएम चे थरारक नाट्य- भाग-५   अजय कोटणीस atm drama

*एटीएम नाट्य..* 

*एटीएम नाट्य..* (क्रमशः 5)

(अंक तिसरा – प्रवेश अंतिम)

“सायेब, मले काह्याले बलावलं होतं तुमी ?”

अचानक केबिनच्या दरवाज्या बाहेरून एक धसमुसळा, खेडवळ आवाज आला आणि माझ्या छातीत पुन्हा एकदम धस्स झालं.

आम्ही साऱ्यांनी चमकून आवाजाच्या दिशेने एकदमच केबिनच्या दरवाजाकडे पाहिलं. कपाळावर मोठ्ठं, गोल, ठसठशीत कुंकू लावलेली एक मध्यमवयीन स्त्री दरवाजात उभी होती. उन्हाने रापलेला चेहरा, अर्धवट, गुडघ्यापर्यंत नेसलेलं काष्ट्याचं मळकट लुगडं, त्यावर कोपरापर्यंत लांब बाह्यांचं किंचित विरलेलं पोलकं, डोईवर पूर्ण पदर घेतलेला, दोन्ही मनगटांवर आतल्या बाजूने काहीतरी गोंदलेलं.. अशा अवतारातील ती कुणी कष्टकरी महिला वाटत होती.

“कोण तुम्ही ? मी ओळखलं नाही तुम्हाला ?

माझ्या ह्या प्रश्नावर ती उत्तरली..

“म्या रखमाबाई.. ! तुमच्या हापिसातल्या प्रेमानंद भाऊंकडं धुणं भाड्याचं काम करती मी. फौजदार जमदाडे भाऊंकडंबी म्याच काम करती. त्येंची काय तरी मायती पायजं व्हती म्हनं तुमास्नी.. प्रेमानंद भाऊंनी घरला तसा निरुप धाडला व्हता काल.. तेच्या साटीच आली हाव म्या..”

हिंदी चित्रपटातील शेवटच्या सीनमध्ये जशी सिनेमातील सर्व पात्रे एकत्र येतात तशी या एटीएम नाट्यातील सर्व पात्रे एका मागोमाग एक अशी रंगमंचावर म्हणजेच माझ्या केबिनमध्ये येऊन जात होती.

“या बाई आत या..!”

मी काही बोलण्याच्या आतच इन्स्पेक्टर खराटे त्या बाईला म्हणाले. बाई आत आल्यावर हवालदार जमदाडेंकडे बोट दाखवून ते म्हणाले..

“हेच का तुमचे “फौजदार” जमदाडे ?”

“व्हय, हेच की..! अगं बया, ह्ये फौजदार सायेब तर हिथंच हायेत.. म्यानीजर सायेब, मंग यांची मायती यायलेच इचारून घ्या.. जाती म्या..”

असं बोलून रखमाबाई परत जाण्यासाठी वळली न वळली तोच इन्स्पेक्टर खराटे कडाडले..

“कुठे चाललीस ? थांब..! आता मॅनेजर साहेब तुला जे जे प्रश्न विचारतील त्यांची खरी खरी उत्तरं द्यायची.. समजलं ना ? आणि.. काय म्हणालीस तू ह्या मुच्छडला ? फौजदार ? अगं, हे कसले फौजदार ? हे तर साधे शिपाई..! खरा फौजदार मी आहे. इन्स्पेक्टर..! इथल्या पोलिस स्टेशनचा ठाणेदार !”

रखमाबाईंनं हवालदार जमदाडेंचा मघाशी “फौजदार” असा उल्लेख केलेला ठाणेदार साहेबांना अजिबातच आवडला नसल्याचं दिसत होतं. कदाचित त्यामुळे त्यांचा इगो दुखावला असावा.

“मले यवडं त्ये काय बी समजत न्हाई.. म्या खाकी डरेस वाल्या समद्याच पोलिसानला “फौजदार” आसंच म्हंते..”

रखमाबाईच्या स्पष्टीकरणाकडे दुर्लक्ष करीत इन्स्पेक्टर खराटे मला म्हणाले..

“बोला..! मॅनेजर साहेब, काय विचारणार होतात तुम्ही या बाईला ?”

फौजदार साहेबांच्या या प्रश्नावर चोरासारखा खाली मान घालून भीतभीत मी पुटपुटलो..

“हेच, की गेल्या दहा बारा दिवसांत हवालदार साहेब कधी घरी आलेले दिसले का ?”

“अरे बापरे ! भले बहाद्दर !! काय डेअरिंग आहे हो तुमची ? एका छोट्याशा, क्षुल्लक मॅटर साठी थेट पोलिसांच्या घराची हेरगिरी करण्यापर्यंत मजल गेली तुमची ? मानलं रे बाबा तुम्हाला..!”

असं बोलून मला पुन्हा एकदा फटकारून झाल्यावर रखमाबाई कडे वळून ते म्हणाले..

“हं.. बोल बाये.. ह्याच्या आधी कधी दिसला होता ह्यो मिशीवाला बाबा तुला घरी आलेला..?”

“म्हंजी बगा ssss,” किंचित आठवल्यासारखं करून रखमाबाई म्हणाली.. “ईस पंचीस दिसा पयलं ह्यो सायब मुंबयला गेलं होतं.. तिठून धा दिसांनी ते पुना आपल्या घरला माघारी आलं. तवा पासून सात आठ दीस ते घरलाच आराम करीत व्हतं. इच्यारलं बी म्या फौजदारनी बायसायेबाला की, “सायेब डिवटी वर कामून जात न्हाईत म्हून..” तवा बाईसायेब म्हनल्या..”त्येंनला बरं वाटत न्हाई म्हून त्ये सुटीवर हायती..” आनि मंग आठ दिसांनी सायेब पुन्यांदा मुंबयला गेलं, आन् दोनतीन दिसा पयलंच परत आलं..”

“व्हेरी गुड.. !!” खुश होऊन इन्स्पेक्टर साहेब रखमाबाईला म्हणाले.. “बाई, तुला लिहिता वाचता येतं का ?”

“कसं यील ? कंदी साळंतच घातलं न्हाई माया घरच्याईनी.. पर.. सई करन्या पुरतं लिवायला शिकून घेतलंय म्या..!”

“फार छान ! हे बघ.. आत्ता इथे तू जे काही सांगितलंस ते सारं हे अकाऊंटंट साहेब एका कागदावर लिहून काढतील आणि तुला वाचून दाखवतील. तू फक्त त्या कागदावर सही करायची आहेस. समजलं ?”

फौजदार खराटेंच्या आज्ञेनुसार अकाऊंटंट साहेबांनी तयार केलेल्या रखमाबाईंच्या लेखी जबाबावर त्या कामवाल्या बाईंनी “र ख मा” अशी सुटी सुटी अक्षरं लिहून सही केली आणि तो चौथा पुराव्याचा कागद हस्तगत करीत ठाणेदार साहेब खुशालरावांना म्हणाले..

“आता तर फोन ठेवल्या ठेवल्या दुसऱ्याच मिनिटाला कमिशनर साहेब तुझ्या सस्पेंशनची ऑर्डर थेट वायरलेस मेसेजनेच पाठवतील, असं वाटतंय..”

हवालदार जमदाडेंनी पुन्हा एकदा फौजदार साहेबांचे पाय धरत “नको साहेब.. दया करा.. तुम्ही जे सांगाल ते करतो.. माझ्या बायको पोरांचा तरी थोडा विचार करा..” असं म्हणत गयावया करायला सुरवात केली..atm natya-5

इन्स्पेक्टर खराटेंच्या हातात डॉ. भोसले, नंदू आइस्क्रीम वाला, लाईनमन सोमनाथ आणि कामवाली रखमाबाई अशा चार जणांचे लेखी जबाब होते. जमदाडे हवालदारांची मानगुटच जणू आता त्यांच्या पंज्यात होती. केबिन मधील सर्वांकडे पाहून त्यांनी हात जोडले आणि म्हणाले..

“तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. माझ्या कठोर शब्दांनी तुम्ही सर्वच जण, विशेषतः मॅनेजर साहेब, खूप दुखावले गेले असाल, कदाचित तुम्हाला माझा रागही आला असेल याची मला कल्पना आहे. परंतु सदैव गुन्हेगारांशीच संबंध येत असल्याने आमची भाषाच तशी झाली असते, त्याला माझा नाईलाज आहे. आता आणखी फक्त एकच मदत हवी आहे तुमच्याकडून..”

एवढं बोलून इन्स्पेक्टर खराटे थांबले. आम्ही प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे पहात असतानाच अचानक चपळाईने त्यांनी लॅपटॉपला लावलेला Pen drive काढून घेतला आणि तो आपल्या पँटच्या खिशात टाकीत ते म्हणाले..

“हा pen drive तुमच्याकडून मला सप्रेम भेट. आता तक्रार मागे घेण्यात आलेली आहे तेंव्हा एटीएम मशीन मधील हे संबंधित रेकॉर्डिंग ताबडतोब नष्ट करा. तसंच हवालदार साहेबांनी तुमच्याकडे दिलेल्या तक्रारीचा अर्ज ही आम्हाला परत करा.”

फौजदार साहेबांच्या या मागण्या पूर्ण करणे शक्यच नव्हते. त्यामुळे “एटीएम रेकॉर्डिंग नष्ट करता येत नाही, त्यासाठी हेड ऑफिसची परवानगी घ्यावी लागेल” अशी गुळमुळीत थाप त्यांना ठोकून दिली. तसंच “हवालदार जमदाडेंचा मूळ तक्रार अर्ज रिजनल ऑफिसला पाठविला आहे, त्यामुळे तो परत देता येणार नाही” असंही खोटंच सांगितलं. अर्थात माझ्या बोलण्यावर फौजदार साहेबांचा अजिबात विश्वास बसला नाही. पण तसं न दाखवता वरकरणी हसत हसत त्यांनी आमचा निरोप घेतला.

त्यांच्या मागोमाग हवालदार जमदाडे सुद्धा खाली मान घालून नेहमीच्या सवयीप्रमाणे आपल्या मिशीवर हलकेच हात फिरवित निमूटपणे निघून गेले.

एटीएम नाट्याचा खूपच लांबलेला हा तिसरा अंक अनेक नाट्यमय वळणे घेत आमच्या दृष्टीने तरी एकदाचा संपला होता.

मात्र आम्हा सर्वांच्या अपेक्षेप्रमाणे हवालदार जमदाडेंचे ना निलंबन (suspension) झाले ना बडतर्फी (termination). इन्स्पेक्टर खराटेंनी ते प्रकरण पूर्णपणे दाबून टाकले होते. अर्थात त्यासाठी प्रचंड मोठी रक्कम हवालदार जमदाडें कडून फौजदार साहेबांनी वसूल केली अशी माहितीही नंतर उडत उडत आमच्या कानावर आली होती.

एटीएम नाट्याच्या या मुख्य कथेला अनेक छोटी मोठी उपकथानके होती. वेळ व काळाच्या अभावी त्या सर्वांचा इथे उल्लेख करणे शक्य नाही. कमिशनर, औरंगाबाद तसेच बँकेचे रिजनल ऑफिस यांना मी पाठविलेली जमदाडेंच्या तक्रार अर्जावरील उत्तराची प्रतिलिपी इन्स्पेक्टर खराटेंनी औरंगाबादच्या कुरिअर ऑफिसला दमदाटी करून मधल्या मधे गायब केली असल्याचेही समजले. बहुदा त्यामुळेच आमच्या रिजनल ऑफिस कडून तसंच पोलिस कमिशनर कार्यालयातून नंतर या प्रकरणी आमच्याकडे कधीही कसलीही विचारणा झाली नाही.

बँकेची अवघ्या दहा हजार रुपयांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचे प्रकरण दाबण्यासाठी इन्स्पेक्टर खराटेंनी एवढी प्रचंड रक्कम हवालदार जमदाडेंकडून कशी काय वसूल केली ? याचं गूढ मात्र मला अजूनही उलगडत नव्हतं. शेवटी पोलिस स्टेशनमधीलच अन्य एका कॉन्स्टेबलने सहज बोलताना याबद्दल खुलासा केला तो असा..

हवालदार जमदाडे हे मुंबई येथे गोपनीय कामगिरीवर गेले होते. सीआयडी खात्यामार्फत एका “हाय प्रोफाईल मर्डर केस”ची गुप्त चौकशी सुरू होती. या खुनाशी संबंधित मृतदेहाचे अवशेष, खुनाचे अवजार (Murder weapon) व अन्य महत्त्वाचे पुरावे मुंबईला नेऊन त्यांची डीएनए टेस्ट तसेच विविध प्रकारची फॉरेन्सिक तपासणी करवून घेऊन सीआयडी खात्याला ते अवशेष व पुरावे सुपूर्द करणे हे काम जमदाडेंवर सोपविण्यात आलेले होते. पूर्वी या मर्डर केसमध्ये पुराव्यांशी छेडछाड करणे, पुरावे नष्ट करणे असे अनेक प्रकार घडले असल्याने सतत जागरूक राहून मृतदेहाचे अवशेष व अन्य पुराव्यांचे रक्षण करणे व कोणत्याही परिस्थितीत कामाची जागा न सोडणे याबद्दल जमदाडेंना निक्षून बजावण्यात आले होते. तरीदेखील हवालदार जमदाडे हे कामाची जागा सोडून घरी, वैजापूरला आले होते. ही गोष्ट जर सिद्ध झाली असती तर त्यांची नोकरी वाचणे कठीण होते. बँकेला यात इनवॉल्व्ह न करता डॉ. भोसले, नंदू, सोमनाथ व रखमाबाई यांच्या कडून घेतलेल्या लेखी जबाबांच्या जोरावर हवालदार जमदाडेंना ब्लॅकमेल करण्याचा फौजदार खराटेंचा डाव होता. आणि तो डाव पूर्णपणे यशस्वीही झाला होता.

वैजापूर पोलिस स्टेशनच्या रेकॉर्डनुसार पाच तारीख ते पंचवीस तारीख असे वीस दिवस हवालदार जमदाडे मुंबई येथे गोपनीय कामगिरीवर गेले होते. या वीस दिवसांचा टीएडीए सुद्धा त्यांनी क्लेम केला होता. एटीएम रूम मध्ये अंधार करून पैसे काढले तर आपण सीसीटीव्हीत दिसणार नाही आणि “तो मी नव्हेच” असे सांगून दमदाटी करून बँकेकडून सहज फुकटचे दहा हजार रुपये वसूल करता येतील असा खुशालराव जमदाडेंचा साधा सरळ प्लॅन होता. दुर्दैवाने एटीएम मशीन मधील इन-बिल्ट कॅमेऱ्यामुळे त्यांचा हा प्लॅन त्यांच्यावरच उलटला. तसंच माझ्या अतिउत्साही सखोल तपासामुळे हवालदार जमदाडेंना ब्लॅकमेल करण्यासाठी इन्स्पेक्टर खराटेंना आयतेच चार लेखी जबाबही मिळाले.

अशाप्रकारे बँकेला फसवून दहा हजार रुपये हडप करण्याचा मोह हवालदार जमदाडेंना खूपच महागात पडला होता.

यानंतर एका महिन्याच्या आतच हवालदार जमदाडेंची अचानक अहमदनगरच्या तोफखाना पोलिस स्टेशनला बदली झाली. या बदलीमागे ठाणेदार खराटेंचाच हात असल्याचं बोललं जात होतं. योगायोग म्हणजे त्या पाठोपाठ लगेच इन्स्पेक्टर खराटेंचीही मुंबई इथे प्रमोशनवर बदली झाली.

अहमदनगरला बदलीच्या जागी रुजू झाल्यावर एक दिवस हवालदार जमदाडे चोरट्यासारखे दबकत माझ्या केबिन मध्ये आले आणि परगावी बदली झाली असल्यामुळे येथील बँक खाते बंद करायचे आहे, असे म्हणाले. खूप पटवून सांगूनही खाते अहमदनगरला transfer करून घेण्यास ते तयार नव्हते. त्यामुळे खाते बंद करून खात्यातील रक्कम त्यांच्या हातावर ठेवली आणि नियमानुसार आता बंद खात्याचं एटीएम कार्ड बँकेला सरेंडर करा असं त्यांना सांगितलं. त्यानुसार पाकिटातून एटीएम कार्ड काढून माझ्यापुढे ठेवताना हवालदार जमदाडेंची नजर जरा जास्तच खाली झुकलेली आहे आणि त्यांचा हातही किंचित थरथरा कापतो आहे असा नकळत मला भास झाला.

आणखीही एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली.. ती ही, की..

यावेळी पहिल्यांदाच बँकेबाहेर पडेपर्यंत घनी, मोटी मूंछें वाले हवालदार खुशालराव जमदाडे यांनी एकदाही आपल्या त्या नत्थुलाल फेम, सुप्रसिद्ध, भक्कम, भरदार, भरघोस, भरगच्च, जाडजूड मिशांना पीळ देत त्यावरून आपला हात फिरवला नव्हता..

(समाप्त)

 

 

 

ajay kotnis photo1

श्री अजय कोटणीस हे बँकेतील माझे सहकारी असून, स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३८  वर्षांचा प्रदीर्घ अनुभव  असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानकावर खिळवून ठेवतात.  

त्यांना वैजापूर या गावी असतांना आलेला एक अनुभव हा बँकर्स ला किती निरनिराळ्या आणि विचित्र अनुभवांना सामोरे जावे लागते याचे चित्तथरारक वर्णन आहे. 

एटीएम चे थरारक नाट्य- भाग-४ अजय कोटणीस

goodworld_atm nataya-6

लेखक 

श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद 

(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)

ही लेखमाला श्री कोटणीस यांच्या फेसबुक पेज वर नुकतीच त्यांनी प्रसिद्ध केली आहे आणि तिला वाचकांचा भरभरून प्रतिसाद नेहमीप्रमाणे मिळतो आहे. इथे ही लेखमाला या ब्लॉगच्या  वाचकांसाठी, श्री कोटणीस यांच्या परवानगीने प्रसिद्ध करीत आहोत.

एटीएम चे थरारक नाट्य- भाग-४  अजय कोटणीस atm drama

*एटीएम नाट्य…* 

(तिसरा व शेवटचा अंक,भाग १ ला )

एटीएम मशीन मधील बिल्ट इन कॅमेऱ्याच्या सहाय्याने एटीएम प्रकरणाचा उलगडा होऊन हवालदार जमदाडेंची तक्रार खोटी असल्याचे सिद्ध झाले होते व त्यांनी तक्रार मागे घेतल्यावर हे प्रकरण एकदाचे संपुष्टात आले होते.

केबिनमध्ये माझ्यासमोर बसलेल्या इन्स्पेक्टर खराटेंनी आतापर्यंत मांडीवर काढून ठेवलेली पोलिसी कॅप पुन्हा आपल्या डोक्यावर घातली आणि टेबलावर ठेवलेली आपली चमकदार लाकडी छडी उचलून ती उंचावत म्हणाले..

“तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद ! हे प्रकरण आता संपलेलं आहे आणि तुम्ही पूर्णपणे विसरूनही जायचं आहे. या बद्दल कुणाशीही चर्चा करून पोलिसांची बदनामी होईल असे कृत्य केल्यास त्याचे गंभीर व प्रतिकूल परिणाम होतील अशीही मी तुम्हाला विनंतीवजा, अगाऊ नम्र सूचना देऊन ठेवीत आहे. ह्या नत्थुलाल उर्फ हवालदार खुशालराव जमदाडेंवर डिपार्टमेंट तर्फे योग्य ती कार्यवाही केली जाईलच. तुम्हाला अन्य कोणत्याही बाबतीत पोलिसांच्या सहकार्याची गरज भासल्यास आम्ही आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत..”

इन्स्पेक्टर खराटे बोलत असतानाच अचानक सरकारी दवाखान्याचे डॉक्टर विक्रम भोसले घाईघाईत केबिनमध्ये आले. त्यांना “हाऊसिंग लोन इंटरेस्ट सर्टिफिकेट” वर माझी सही हवी होती. मी सर्टिफिकेट वर सही करीत असताना सहज त्यांचे लक्ष माझ्या पुढ्यात बसलेल्या हवालदार जमदाडेंकडे गेले. सर्टिफिकेट नेताना क्षणभर थबकून काही तरी आठवल्यागत ते मागे फिरले आणि म्हणाले..

“अं.. अं.. साहेब, तुम्ही मला पंधरा तारखेला रात्री एटीएम मधून पैसे काढून जाताना एटीएम रूमच्या जवळपास कुणी दिसलं होतं का म्हणून विचारलं होतं ना ? त्यावरून आठवलं..! त्या दिवशी बँकेच्या गेटच्या बाहेर हे हवालदार जमदाडे आईसक्रीमवाल्या नंदूशी रागारागाने काहीतरी बोलत होते. मी त्यांना नमस्कारही केला पण त्यांनी माझ्याकडे लक्षच दिलं नाही. त्यामुळे मी माझी मोटारसायकल काढली आणि घराकडे निघून गेलो.”

डॉक्टर भोसलेंचं बोलणं ऐकताच इन्स्पेक्टर खराटेंचे डोळे आश्चर्यानं चमकले. ते डॉक्टरांना म्हणाले..

“थांबा..! तुमची नक्की खात्री आहे की त्यादिवशी रात्री बँकेबाहेर तुम्ही या हवालदार जमदाडेंनाच पाहिलं होतं ?”

“हो साहेब ! हवालदार साहेबांशी माझी जुनी ओळख आहे. त्या दिवशी मी बँकेबाहेर येताच वीज गेली होती. तरीपण रस्त्यावर थोडा उजेड होता. हवालदार साहेबांच्या फेमस मिशांवरून मी त्यांना लगेच ओळखलं..”

डॉक्टर भोसलेंचं उत्तर ऐकताच इन्स्पेक्टर खराटे उत्तेजित होऊन म्हणाले..

“तुम्ही आत्ता जे बोललात ते कागदावर लिहून देऊ शकाल ?”

“हो..! अवश्य..!!”

असं म्हणून डॉक्टर भोसलेंनी घडलेला प्रसंग जसाच्या तसा एका कागदावर लिहून त्यावर आपली सही करून तो कागद इन्स्पेक्टर खराटेंच्या हातात दिला.

“थँक्यू..!” असं म्हणून डॉक्टर भोसलेंना निरोप दिल्यावर इन्स्पेक्टर भोसलेंनी बसल्या जागेवरूनच मोठ्याने ओरडून बँकेच्या सिक्युरिटी गार्डला केबिनमध्ये बोलावलं. सिक्युरिटी गार्ड आत येताच ते म्हणाले..

“जा..! त्या बँकेसमोरील आइस्क्रीमवाल्या नंदूची गचांडी धरून आत्ताच्या आत्ता त्याला इथे घेऊन ये..”

ड्युटी वर असताना गेट सोडून बाहेर कसं जावं ? म्हणून माझ्या अनुमतीसाठी सिक्युरिटी गार्डने प्रश्नार्थक नजरेने माझ्याकडे पाहिलं. ते पाहताच एकाएकी इन्स्पेक्टर खराटेंचा पारा चढला. दरडावणीच्या सुरात ते त्याला म्हणाले..

“साहेबांकडे काय बघतोस ? पोलिस चौकशी सुरू आहे. तुझ्या साहेबांनी जर नाही म्हटलं तर सरकारी कामकाजात अडथळा आणला म्हणून तुझ्या सहित तुझ्या या साहेबालाही अटक करून घेऊन जाईन. मग बसा बोंबलत..”

मी मानेनेच सिक्युरिटी गार्डला “जा..” म्हणून इशारा केला. गार्ड बाहेर गेल्यावर इन्स्पेक्टर खराटेंना म्हणालो..

“डॉक्टर भोसलें प्रमाणेच नंदू कडेही एटीएम रूमच्या आसपास कुणी दिसले होते का ? याबद्दल मी चौकशी केली होती. कारण वीज परत आल्यावर सर्वप्रथम नंदूच एटीएम रूम मध्ये गेला होता. पण त्यालाही त्यावेळी एटीएमच्या आसपास कुणीच दिसलं नाही, असं तो म्हणाला..”

त्यानंतर थोड्याच वेळात नंदूचं बखोटं धरून सिक्युरिटी गार्डने त्याला केबिनमध्ये आणलं. आधीच भेदरलेल्या नंदूच्या पोटात खुनशीपणे आपला लाकडी रूळ जोराने खुपशीत इन्स्पेक्टर खराटे म्हणाले..

“चल बोल चटचट..! तू आणि हवालदार जमदाडे.. या दोघांनी मिळून काय प्लॅन रचला होता ? पंधरा तारखेला रात्री सव्वा नऊ वाजता बँकेच्या गेटबाहेर तुम्हा दोघांना एकत्र पाहण्यात आलं आहे. काय बोलणं झालं तुमच्यात त्या वेळी ?”

थरथर कापणाऱ्या नंदूने हळूच एकवार खाली मान घालून बसलेल्या हवालदार जमदाडेंकडे बघितलं आणि म्हणाला..

“पोलिस स्टेशनच्या रेग्युलर हप्त्याशिवाय वेगळा असा, दिवसाला पन्नास रुपये प्रमाणे अधिकचा हप्ता हवालदार जमदाडे माझ्याकडून दररोज वसूल करतात. गेल्या दहा दिवसांपासून ते मुंबईला गेले असल्याने त्यांचा हप्ता देणे बाकी होते. त्या दहा दिवसांचे पाचशे रुपये मागायलाच ते माझ्याकडे आले होते. नेमकं त्या दिवशी दुपारीच घराचं वीज बिल भरण्यासाठी आईस्क्रीम विक्रीचा दिवसभरातील गल्ला मी मुलाला दिला होता त्यामुळे माझ्याकडे पुरेसे पैसे नव्हते.

हवालदार साहेबांशी बोलत असतानाच अचानक गावातली वीज गेली होती. तरीदेखील अंधारातच मी परत खांबाला बांधलेल्या गाडीजवळ गेलो. गाडीची कुलुपं उघडली. आतला गल्ला उघडून बघितला. त्यात जेमतेम दीडशे रुपये होते. म्हणून आता एटीएम मधून काढूनच त्यांना पाचशे रुपये द्यावेत असा विचार केला. योगायोगाने तोपर्यंत वीजही परत आली होती. हवालदार साहेब अजूनही गेट बाहेर माझी वाट पहात उभे होते. त्यांना थांबायला सांगून मी एटीएम मध्ये जाऊन पाचशे रुपये काढून आणले व त्यांना दिले.”

नंदूचं बोलणं संपल्यावर भेदक नजरेने त्याच्याकडे पहात इन्स्पेक्टर खराटे म्हणाले..

“हे, तू सगळं खरं खरं सांगतोयस ना ? जरा देखील काही अन्य महत्वाची माहिती तू लपवत असलास तर तुझी काय हालत होईल, याची कल्पना आहे ना ?”

रडकुंडीला आलेला नंदू गळ्याला हात लावीत म्हणाला..

“माझ्या मुलाबाळांची शपथ घेऊन सांगतो साहेब.. हे असंच आणि एवढंच घडलं त्या दिवशी..”

“ठीक आहे ! मग आता बाहेर जा आणि आत्ता तू जे जे सांगितलंस ते जसंच्या तसं एका कागदावर लिहून त्यावर सही करून मला आणून दे. आणि हे बघ, पोलिस स्टेशनच्या रेग्युलर हप्त्याबद्दल त्यात काही एक उल्लेख करायचा नाही. समजलं ?”

मान डोलावीत नंदू बाहेर गेल्यावर इन्स्पेक्टर खराटे खोचकपणे मला म्हणाले..

“बराच सखो ssss ल तपास केलेला दिसतोय तुम्ही या एटीएम प्रकरणाचा. अगदी डिटेक्टिव्ह स्टाईल..! रहस्यकथा वाचण्याचा नाद आहे वाटतं तुम्हाला.. आणि, वेळ बरा मिळतोय तुम्हाला हे आगाऊ धंदे करायला..?”

बोलता बोलता फौजदार साहेबांचा आवाज एकदम चढला. डॉक्टर भोसले आणि नंदू यांच्याकडे मी चौकशी केल्याचं त्यांना अजिबात आवडलं नव्हतं, हे स्पष्टच दिसत होतं.

थोड्याच वेळात नंदू आपल्या साक्षी जबाबाचा सही केलेला कागद घेऊन आला. इन्स्पेक्टर खराटेंनी त्यावर नजर फिरवली आणि खुश होत म्हणाले..

“व्वा ! छान..! जा.. !! आता यापुढे कुणालाही अधिकचा हप्ता द्यायचा नाही, काय ? आणि कुणी जादा  हप्ता मागितलाच तर थेट माझ्याकडे त्याची कंप्लेंट करायची. निघ आता तू..”

नंदू गेल्यावर अत्यंत तीक्ष्ण नजरेने हवालदार जमदाडेंकडे पहात फौजदार खराटे म्हणाले..

“तरी मला फार पूर्वीपासून शंका होतीच आणि खबऱ्यांकडून तसा रिपोर्टही मिळाला होता की बऱ्याच छोट्या धंदेवाल्यांकडून तू स्वतःचा वेगळा हप्ता वसूल करतोस म्हणून.. आज पक्का पुरावा हाती लागलाय.. आता गेल्या गेल्या कमिशनर साहेबांना एक फोन करतो आणि सांगतो त्यांना, त्यांच्या लाडक्या नत्थुलालचे एटीएम कारनामे..! संध्याकाळपर्यंत तुझ्या निलंबनाचा आदेश येईलच..”

आतापर्यंत, हे काय चाललं आहे ? हवालदार जमदाडेंनी तक्रार मागे घेतल्यावरही इन्स्पेक्टर खराटे साक्षीदारांकडून लेखी जबाब का गोळा करीत आहेत ? हे मला काहीच समजत नव्हतं. पण हवालदार जमदाडेंना मात्र फौजदार साहेबांच्या प्लॅनची पुरेपूर कल्पना आलेली दिसत होती. अचानक खुर्चीवरून उठून फौजदार साहेबांच्या पायावर डोकं ठेवीत ते  म्हणाले..

“साहेब, माफ करा. माझ्या पोराबाळांचा तरी विचार करा. तुम्ही जे म्हणाल ते करतो. हे मॅटर वरती रिपोर्ट करू नका. वाचवा मला साहेब, वाचवा..”

मला आश्चर्य वाटलं. निगरगट्टपणे, माझ्या नजरेला नजरही न देता खाली मान घालून गप्प बसलेल्या हवालदार जमदाडेंनी अजूनपर्यंत एकदाही माझी माफी मागितली नव्हती. फौजदार खराटेंपुढे मात्र गयावया करीत ते क्षमायाचना करीत होते. कदाचित, आम्ही बँकवाले त्याचं काहीच बिघडवू शकणार नाही, याची त्यांना खात्री असावी.

खाली वाकून आपल्या ठाणेप्रमुखाचे दोन्ही पाय घट्ट पकडून बसलेल्या हवालदार जमदाडेंचे खांदे धरून ठाणेदार खराटेंनी त्यांना उभं केलं आणि त्यांच्याकडे रोखून पहात ते म्हणाले..

“बेट्या ssss ! नोकरीतून सस्पेंड तर तू होणारच आहेस. आता फक्त कायमचा बडतर्फ होणार नाहीस याचीच तुला काळजी घ्यावी लागणार आहे..”

झाला तेवढा तमाशा पुरे झाला, इथे तर पोलिसांच्याच अब्रूचे धिंडवडे निघत आहेत हे जाणवून काही न बोलता फौजदार-हवालदाराची ती जोडगोळी परत जायला निघाली. परंतु खुशालरावांचं दुर्दैव अजून संपलेलं नव्हतं..

“आत येऊ का साहेब ?”

वीज मंडळाच्या खाकी युनिफॉर्म मधील एक लाईनमन केबिन बाहेर उभा राहून विचारीत होता. मी काही बोलण्याच्या आतच तो म्हणाला..

“मी सोमनाथ..! वीजमंडळात लाईनमन आहे. या भागातील वीज पुरवठा बंद-चालू करण्याची ड्युटी माझ्याच कडे आहे. तुम्हाला माझ्याकडे काही तरी काम असल्याचा काल माझा मित्र प्यारेलाल कडून निरोप मिळाला. म्हणूनच आज तुम्हाला भेटायला आलो आहे..”

सोमनाथचं हे बोलणं ऐकताच फौजदार साहेब जागीच थबकले. त्यांनी आळीपाळीनं एक दोनदा माझ्याकडे आणि सोमनाथकडे आश्चर्यमिश्रित अविश्वासानं बघितलं. अभावितपणे त्यांच्या तोंडून हलकीशी शीळ बाहेर पडली. जमदाडेंसह पुन्हा आपल्या जागेवर बसत आपले दोन्ही हात कोपरापासून जोडून मला नमस्कार करीत ते म्हणाले..

“ओ माय गॉड sss ! खरोखरीच धन्य आहे तुमची.. !! वीज मंडळापर्यंतही पोहोचलात तुम्ही ? आता मात्र कमाल झाली.. आणखी किती खोलवर घुसला आहात तुम्ही या नत्थुलालच्या केसमध्ये ? च्यायला, मी तर तुम्हा बँकवाल्यांना खूपच साधंभोळं समजत होतो, पण तुम्ही तर अती स्मार्ट, extra ॲडव्हान्स निघालात..”

फौजदार साहेबांच्या उपरोधिक बोलण्याकडे माझं लक्षच नव्हतं. सोमनाथचा आवाज ऐकताच हवालदार जमदाडेंनी चटकन् मान वर केली होती आणि मागे वळून ते सोमनाथ कडे पाहण्याचा प्रयत्न करीत होते. आणि खुशालरावांच्या चेहऱ्यावरील हावभावांचं मी बारकाईने निरीक्षण करीत होतो. सोमनाथला डोळ्यानेच खुणावून धमकावीत “इथे कशाला आलास ? ताबडतोब निघून जा..” अशी खूण ते करीत होते. पण त्यांच्या दुर्दैवाने सोमनाथचे त्यांच्याकडे लक्षच नव्हते. तो एकटक माझ्याकडेच पहात होता. आता पुढे काय करावं हे मलाही समजत नव्हतं. हे पाहून फौजदार साहेबांनी पुन्हा सारी सुत्रं आपल्या हातात घेतली. मला उद्देशून ते म्हणाले..

“अहो बघत काय बसलात ? बोलवा त्या सोमनाथला आत..!”

आणि मग स्वतःच सोमनाथ कडे हातातील छडी रोखत म्हणाले..

“ये बाबा, आत ये ! आणि आता हे मॅनेजर साहेब तुला जे जे प्रश्न विचारतील त्यांची खरी खुरी उत्तरं दे.  लक्षात घे, ही पोलिस एन्क्वॉयरी आहे. खोटं बोलण्याचा किंवा कोणतीही माहिती दडवण्याचा थोडा जरी प्रयत्न केलास तरी या दंडुक्याने तुझी पाठ काळी निळी करून टाकीन..”

दबकत दबकतच सोमनाथ आत आला.

“हं..! विचारा मॅनेजर साहेब, तुम्ही काय विचारणार होतात या सोमनाथला ते..”

इन्स्पेक्टर खराटेंनी असा हुकूम सोडल्यावर मला विचारणं भागच होतं.

“पंधरा तारखेला रात्री सव्वा नऊच्या सुमारास पाच सहा मिनिटांकरिता वीज पुरवठा बंद झाला होता. तो तूच बंद केला होतास का ?”

“हो..”

नम्रपणे एकाच शब्दात सोमनाथने उत्तर दिलं.

“कशासाठी ? म्हणजे.., कुणाच्या सांगण्यावरून ?”

हा प्रश्न विचारल्या विचारल्या लगेच मी खुशालरावांकडे बघितलं. ते स्वतःच्या तोंडावर बोट ठेवून सोमनाथला “गप्प रहा, काहीच सांगू नकोस..” असा इशारा करीत होते. ठाणेदार साहेबांनी ते पाहिलं. करड्या स्वरात ते म्हणाले..

“सोमनाथ, कुणालाही अजिबात घाबरायचं नाही. फक्त खरं तेच सांगायचं..!”

“हो, सांगतो साहेब !”

तिरप्या, चोरट्या नजरेने जमदाडेंकडे पहात आणि त्यांच्याच कडे बोट रोखीत किंचित चाचरत सोमनाथ म्हणाला..

“या हवालदार साहेबांनी मला सांगितलं की बँकेत इमर्जन्सी लाईट बसवले असून वीज गेल्यावर त्याचा पुरेसा प्रकाश पडतो की नाही हे टेस्ट करायचे आहे. पोलिसांच्या देखरेखीत रात्री सव्वा नऊ वाजता हे टेस्टिंग करायचे आहे. त्यामुळे मी बाहेरून हाताने इशारा करताच तू बँकेसमोरील डिपी वरून लाईट बंद करायचेस. मग मी बँकेत जाऊन चार पाच मिनिटांतच इमर्जन्सी लाईट टेस्ट करीन. मी बँके बाहेर येऊन पुन्हा हाताने इशारा केल्यावर तू पुन्हा लाईट सुरू करायचेस. त्याप्रमाणे हवालदार साहेबांनी गेट बाहेरून इशारा करताच मी बँकेसमोरील डीपी वरून वीज पुरवठा बंद केला आणि हवालदार साहेब बँकेच्या गेट मधून आत गेल्यावर डीपी जवळच थांबलो.  पाच एक मिनिटांनी हवालदार साहेब बँकेच्या गेट बाहेर आले आणि त्यांनी हात हलवून इशारा करताच मी वीज पुरवठा पुन्हा सुरू केला. बस इतकंच..!”

सोमनाथने दिलेलं स्पष्टीकरण ऐकून त्याच्या बुद्धीची कीव करत मी जरी कपाळावर हात मारून घेतला तरी फौजदार साहेब मात्र फारच खवळले. सोमनाथच्या अंगावर धावून जात ते म्हणाले..

“बस इतकंच ? अरे मूर्खा, बँकेच्या आतले इमर्जन्सी लाईट टेस्ट करण्यासाठी साऱ्या एरियातले लाईट बंद करायची काय गरज ? बँकेच्या मीटरचा मेन स्विच बंद केला असता तरी काम झालं असतं. आणि बँकेच्या अंतर्गत कामात पोलिसांचं काय काम ? आधीच पोलिसांना काय कमी कामं आहेत ? बँकेतर्फे वीजमंडळाकडे वीज पुरवठा बंद करण्यासाठी लेखी विनंती करण्यात आली होती का ?”

घाबरून मागे सरत सोमनाथ म्हणाला..

“ते काही मला माहीत नाही साहेब. या हवालदार साहेबांनी मला जसं करायला सांगितलं तसं मी केलं. तसंही पोलिसांच्या कुठल्याही कामाला “नाही” म्हणायची इथे कुणात हिंमत आहे साहेब ? उद्या, तुमच्या ठाण्यातील कोणत्याही शिपायाने कोणत्याही कारणासाठी पुन्हा गावातली वीज बंद करायला सांगितली तरी कसलंही डोकं न लावता मी ती बंद करीन..”

सोमनाथचं म्हणणं एका परीनं खरंच होतं. पोलिसांबद्दल त्याच्या मनात असलेला दरारा पाहून फौजदार साहेबांनाही आतून गुदगुल्याच होत असाव्यात. एकाएकी शांत होत ते सोमनाथला म्हणाले..

“तू आत्ता जे काही सांगितलंस ते तुझ्या सही निशी सविस्तरपणे लिहून दिलंस तर तुझ्यावर कोणतीही ॲक्शन न घेता तुला सोडून देईन. हा घे कागद आणि शांतपणे बाहेर बसून लिहित बस..”

फौजदार साहेबांनी दिलेला कागद घेऊन सोमनाथ बाहेर गेल्यावर हवालदार जमदाडेंनी पुन्हा एकदा काकुळतीने फौजदार साहेबांच्या विनवण्या करायला सुरवात केली. पण फौजदार साहेब कसल्यातरी दुसऱ्याच विचारात मग्न होते. सोमनाथ आपल्या जबाबाचा कागद आणून देईपर्यंत ते गप्पच होते. सोमनाथने दिलेला कागद त्यांनी वाचला आणि समाधानाने हसत जमदाडेंना म्हणाले..

“बापरे ! भरपूर लेखी पुरावे गोळा झाले. एवढे पुरावे तर मर्डर केस मध्ये सुद्धा आपण गोळा करत नाही.  आता जर कमिशनर साहेबांना फोन केला तर बहुदा जेमतेम दोन तासातच तुमच्या सस्पेंशनची ऑर्डर येईल. हं…! खूप उशीर झाला आहे, चला निघू या.. नाहीतर आणखीन् एखादा तुमच्या विरुद्धच्या पुराव्याचा कागद स्वतःहून चालत यायचा इथे..”

अखेरीस एकदाचे इन्स्पेक्टर खराटे केबिनमधून बाहेर पडत होते. एव्हाना दुपारचे बारा वाजून गेले होते. रोजची सारीच महत्त्वाची कामं  खोळंबली होती. आपल्या महत्त्वाच्या कामांनिमित्त मला भेटण्यासाठी आलेले अनेक कस्टमर्स “कधी एकदा हे इन्स्पेक्टर साहेब मॅनेजर साहेबांच्या केबिनच्या बाहेर जातात ?” याची वाट पहात बाहेर ताटकळत उभे असलेले दिसत होते.

इन्स्पेक्टर खराटेंचे सततचे उर्मट, हडेलहप्पी वर्तन आणि त्यांचे कुत्सित, उपरोधाने भरलेले, अपमानजनक ताशेरे यामुळे मीही वैतागलो होतो. आता या केसशी संबंधित आणखी कुणीही माझ्या केबिनमध्ये येऊ नये आणि पुन्हा नवीन खोळंबा होऊ नये हीच देवाकडे मनोमन प्रार्थना करीत होतो. पण हवालदार जमदाडें प्रमाणेच माझंही दुर्दैव त्या दिवशी संपता संपत नव्हतं.

“साहेब, मले काह्याले बलावलं होतं तुमी ?”

अचानक केबिनच्या दरवाज्या बाहेरून एक धसमुसळा, खेडवळ आवाज आला आणि माझ्या छातीत पुन्हा एकदम धस्स झालं.

                         (क्रमशः 5)

                🙏🌹🙏

ajay kotnis photo1

श्री अजय कोटणीस हे बँकेतील माझे सहकारी असून, स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३८  वर्षांचा प्रदीर्घ अनुभव  असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानकावर खिळवून ठेवतात.  

त्यांना वैजापूर या गावी असतांना आलेला एक अनुभव हा बँकर्स ला किती निरनिराळ्या आणि विचित्र अनुभवांना सामोरे जावे लागते याचे चित्तथरारक वर्णन आहे. 

एटीएम चे थरारक नाट्य- भाग-३ अजय कोटणीस

atm drama-3

लेखक 

श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद 

(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)

ही लेखमाला श्री कोटणीस यांच्या फेसबुक पेज वर नुकतीच त्यांनी प्रसिद्ध केली आहे आणि तिला वाचकांचा भरभरून प्रतिसाद नेहमीप्रमाणे मिळतो आहे. इथे ही लेखमाला या ब्लॉगच्या  वाचकांसाठी, श्री कोटणीस यांच्या परवानगीने प्रसिद्ध करीत आहोत.

एटीएम चे थरारक नाट्य- भाग-३  अजय कोटणीस atm drama

*एटीएम नाट्य..* 

(अंक दुसरा – प्रवेश दुसरा)

अतिशय निराश, खिन्न अंतःकरणाने त्या एटीएम प्रकरणावर विचार करीतच मी बँकेत आलो. या प्रकरणी आता जास्त खोलात जायचं नाही, अतिविचार करून डोकं शिणवून घ्यायचं नाही, असं कितीही ठरवलं तरी काही काही गोष्टी मात्र मला अजूनही खटकतच होत्या. नेमक्या त्याच वेळी, फक्त पाच सहा मिनिटां पुरतीच गावातली वीज कशी जाते ? अचानक मला आठवलं, वीज मंडळातील एक प्यारेलाल नावाचा कर्मचारी आमच्या बँकेतील प्युन शंकरचा मित्र होता. लगेच शंकर करवी प्यारेलालला बँकेत बोलावून घेतलं.

“या भागातील वीज पुरवठा बंद-चालू करण्याची ड्युटी कुणाकडे आहे ? त्याला बँकेत घेऊन येता येईल का ?”

असं विचारलं असता तो वीज मंडळातील कर्मचारी प्यारेलाल म्हणाला..

“माझा मित्र व शेजारी सोमनाथ हाच या भागातील वीज पुरवठा बंद-चालू करण्याचे काम करीत असतो. कुणीतरी नातेवाईक वारल्यामुळे आज सकाळीच तो नजिकच्या गावाला गेला आहे. उद्या मी त्याला नक्कीच बँकेत घेऊन येईन..”

आजचा दिवसच असा उगवला होता की कोणतंच काम चट्कन आणि मनासारखं होत नव्हतं. क्रूरकर्मा हवालदार जमदाडेंच्या दहशतीपायी उतावीळ होऊन पूर्वीचे एटीएम टेक्निशियन श्री. गाडेकर तसेच सध्याचे टेक्निशियन श्री. डोंगरे यांना पुन्हा फोन लावला आणि त्यांना प्रकरणाची अर्जन्सी समजावून सांगितली. कुणी अन्य टेक्निशियन आज इथे येण्यासाठी उपलब्ध आहे का ? याचीही चौकशी केली. पण दोघांकडूनही नकारार्थीच उत्तर मिळाले.

तशी तर अगदी सुरवातीपासूनच या प्रकरणातील हवालदार जमदाडेंची भूमिका मला जराशी संशयास्पदच वाटत होती. त्यामुळे त्यांची पत्नी व मुले याबद्दलची अधिक माहिती काढण्याची कामगिरी बँकेतील हेड प्युन प्रेमानंद यांच्यावर सोपविली होती. प्रेमानंदचं घर जमदाडेंच्या घरापासून अगदी जवळच होतं. त्याने आणलेल्या माहितीनुसार जमदाडेंची पत्नी ठार निरक्षर होती तसेच त्यांची दोन्ही मुले अहमदनगर येथे शिकत असून गेल्या अनेक दिवसांत ती वैजापूरला आलेली नव्हती. त्यामुळे याबाबतीत तरी हवालदार जमदाडे यांनी दिलेली माहिती ही खरीच होती.

मात्र खुद्द हवालदार जमदाडे दहा दिवसांपूर्वी वैजापूरला येऊन गेले किंवा नाही याबद्दल अजूनही पक्की माहिती मिळाली नव्हती. सुदैवाने प्रेमानंदच्या घरची कामवाली बाईच जमदाडेंच्या घरीही भांडी घासण्यासाठी जाते, असं प्रेमानंद कडून समजलं. तेव्हा आता या कामवाली कडूनच हवालदार जमदाडेंच्या बाबतीत पक्की खबर मिळण्याची किंचितशी शक्यता होती. मात्र ती कामवाली देखील सध्या आजारी असल्यामुळे गेले दोन दिवस प्रेमानंद कडे कामाला आलेली नव्हती.

नेहमी सारखीच आजही बँकेत ग्राहकांची अफाट गर्दी होती. दैनंदिन कामकाजात एवढा बुडून गेलो की दिवस केंव्हा मावळला ते कळलंही नाही. संध्याकाळी साडेसात वाजता रोजच्या सारखी एटीएम मध्ये कॅश टाकण्यापूर्वी (Replenish) हेड कॅशियर व अकाउंटंट साहेब सहज माझ्या केबिन मध्ये आले, तेंव्हाच जमदाडेंच्या प्रकरणाची मला आठवण झाली. आज दिवसभरात जमदाडे बँकेत फिरकले नाहीत हे लक्षात येताच खूप हायसं वाटलं आणि मनोमन आनंदही झाला. वाटलं, चला..! तेवढंच आजचं मरण उद्यावर ढकललं गेलं.

पण माझा हा आनंद फार काळ टिकला नाही. रात्री साडेआठ वाजता हवालदार जमदाडे दोन तीन पत्रकारांना घेऊन बँकेत आले. जमदाडेंचा अवतार गेल्या खेपे सारखाच अतिशय उग्र, संतप्त होता. खुर्चीवर बसता बसता सोबत आलेल्या पत्रकारांकडे बोट दाखवून ते म्हणाले..

“तुमच्या कडून काहीच निरोप आला नाही म्हणून शेवटी या मित्रांना घेऊन इथे यावं लागलं. तुमचा तपास केंव्हा पूर्ण होणार आहे ? आणि तुम्ही माझे पैसे कधी परत करणार आहात ?, त्याची पक्की, फिक्स तारीख आत्ताच आमच्या ह्या पत्रकार मित्रांसमोर सांगा. म्हणजे त्यानुसार आम्हालाही पुढचं पाऊल उचलता येईल. तसं पाहिलं तर, मी नको नको म्हणत असतानाही एक छोटसं पाऊल माझ्या या मित्रांनी आज उचललंच आहे. बहुदा तुमचं त्याकडे लक्षच गेलेलं नसावं.”

असं बोलून दैनिक लोकमत, दै. सामना, दै. सकाळ अशा प्रमुख वर्तमानपत्रांत “वैजापूरच्या स्टेट बँकेत एटीएम घोटाळा” अशा मथळ्याखाली छापून आलेली दोन पॅराग्राफची छोटीशी बातमीच जमदाडेंनी मला दाखविली. सकाळी घाईघाईत पेपर चाळताना माझ्या नजरेतून ती बातमी सुटली असावी, मात्र बँकेच्या स्टाफने नक्कीच ती बातमी पाहिली असणार आणि केवळ मला आणखी मनस्ताप नको म्हणून माझ्याकडे त्या बातमीचा कुणीही उल्लेख केलेला नसावा.

“हे बघा, मी तुम्हाला यापूर्वीच सांगितलं आहे की तांत्रिक बिघाडामुळे एटीएम रूम मधील सीसीटीव्ही रेकॉर्डिंग सध्या उपलब्ध नसून एक दोन दिवसात औरंगाबाद येथून टेक्निशियन आल्यावर सीसीटीव्ही फुटेज तपासूनच पुढील निर्णय घेता येईल.”

माझ्या या उत्तरावर डोळे बारीक करीत मिशीवरून हात फिरवित निळू फुलें सारख्या धूर्त, बेरकी आविर्भावात जमदाडे म्हणाले..

“आणि समजा, तांत्रिक बिघाडामुळे अथवा अन्य काही कारणाने ते रेकॉर्डिंग झालेच नसेल किंवा ते झालेले रेकॉर्डिंग अस्पष्ट, अंधुक असेल, तर अशावेळी तुम्ही काय करणार ?”

जमदाडेंनी असा प्रश्न विचारताच चमकून जाऊन मी त्यांना प्रतिप्रश्न केला..

“पण तुम्हाला अशी शंका का येते आहे ?”

जमदाडे क्षणभर चपापले पण लगेच स्वतःला सावरून घेत म्हणाले..

“तुम्हीच म्हणालात ना की सीसीटीव्ही रेकॉर्डिंग मध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे म्हणून.. आणि तांत्रिक बिघाडात असं काहीही होणं शक्यच आहे.”

“ठीक आहे, तुम्ही म्हणता तशी परिस्थिती उद्भवलीच तर बँकेच्या नियमानुसार आणि वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशानुसार पुढील निर्णय घेतला जाईल.”

माझ्या या उत्तराने जमदाडेंचे जराही समाधान झाले नाही. त्यांचा बँकेत येण्याचा उद्देशच मुळी लोक जमवून, आरडा ओरडा करून, माझ्यावर दबाव टाकणे हा होता. ताडकन उठून उभे रहात माझ्याकडे बोट रोखून ते गरजले..

“बस झाला तुमचा वेळकाढूपणा ! उद्या सकाळी साडे दहा वाजता जर मला माझे पैसे परत मिळाले नाहीत तर दुपारी स्थानिक पुढारी, पत्रकार आणि वृत्तवाहिन्यांचे (News channel) प्रतिनिधी यांच्यासह बँकेत येऊन तुम्हाला घेराव घालणार आहे. त्यानंतर टीव्ही आणि वृत्तपत्रांतून बँकेची जी प्रचंड, घोर बदनामी होईल त्यासाठी सर्वस्वी तुम्हीच जबाबदार असाल. त्यामुळे तुम्हाला जो काही निर्णय घ्यायचा आहे तो आजच घ्या.. येतो आम्ही.. !!”

दाणदाण पावले आपटीत, तावातावाने आपल्या दोन्ही मिशांना करकचून पीळ देत आपल्या पत्रकार मित्रांसह खुशालराव जमदाडे निघून गेले.

आणि डोकं गच्च धरून मी जागच्या जागी बसून राहिलो. या प्रकरणाची कोंडी फुटता फुटत नव्हती. एकीकडे हवालदार जमदाडे विनाकारण इरेस पेटून घाईला आले होते तर दुसरीकडे या संकटातून मार्ग काढण्याचे माझे सारे प्रयत्न एक तर संपुष्टात आले होते किंवा लांबणीवर पडले होते. शेवटचा निकराचा प्रयत्न म्हणून एटीएम टेक्निशियन श्री. डोंगरेंना अनेकदा, अगदी वारंवार कॉल केला परंतु त्यांनी एकदाही माझा कॉल उचलला नाही.

शेवटी, उद्या काय व्हायचं ते होवो, आता या प्रकरणात आणखी मनस्ताप करून घ्यायचा नाही असं मनाशी ठरवून उदास अंतःकरणाने रूमवर झोपायला निघून गेलो.

दुसऱ्या दिवशी सकाळी सवयीनुसार लवकरच जाग आली. पण आज नेहमीसारखं वैजापूर गावालगतच्या नारंगी सारंगी डॅमच्या काठी मॉर्निंग वॉकला जाण्याची इच्छाच झाली नाही. त्यामुळे कितीतरी वेळ तसाच आळसावल्यागत बिछान्यावर पडून राहिलो. शेवटी, जेंव्हा सकाळी साडेनऊ वाजता सिक्युरिटी गार्डचा फोन आला की “तुम्हाला भेटायला कुणी तरी आलं असून त्याचं तुमच्याकडे खूप महत्वाचं आणि अर्जंट काम आहे. त्यासाठी तुम्हाला ताबडतोब भेटायचं आहे असं ते म्हणत आहेत..” तेंव्हा “अरे देवा, आता हे कोणतं आणखीन एक नवीन संकट उद्भवणार आहे ?” या धास्तीनं कसंबसं घाईघाईत तोंडावर पाणी मारून तसाच बँकेत गेलो.

एक अनोळखी तरुण माझ्या केबिनमध्ये माझी वाट पहात बसला होता. मला पाहताच सुहास्य मुद्रेने हस्तांदोलनासाठी हात पुढे करीत तो म्हणाला..

“सर, मी आशिष डोंगरे.. एटीएम टेक्निशियन.. !”

मला आश्चर्याचा सुखद धक्काच बसला.

“सॉरी सर, काल मी माझा मोबाईल घरीच विसरून गेलो होतो. त्यामुळे तुमचा कॉल रिसिव्ह करू शकलो नाही. रात्री उशिरा घरी परतल्यावर तुमचे एवढे सारे मिस कॉल बघितले. तसं तर आज सकाळी मला सिन्नरला जायचं होतं, पण पहिल्यांदा इथलं तुमचं काम करून मगच पुढे सिन्नरला जावं अशी मला तीव्र आंतरिक प्रेरणा झाली. त्यामुळेच मी थेट तुमच्याकडे आलो आहे..”

मला तर जणू देवच पावल्यागत झालं. लगेच त्यांना घेऊन एटीएम रूम मध्ये गेलो. अकाउंटंट आणि हेड कॅशियर साहेब सुद्धा तोपर्यंत बँकेत आले होते. त्यांनाही सोबत घेतलं. विवादित एटीएम व्यवहाराची तारीख आणि वेळ सांगितल्यावर लगेच आशिष डोंगरेने अवघ्या पाच दहा मिनिटांतच बिल्ट-इन कॅमेऱ्यातील पंधरा तारखेच्या रात्री सव्वा नऊ वाजताचं रेकॉर्डिंग बँकेच्या pen drive मध्ये काढून दिलं. Pen drive माझ्या हातात ठेवत तो म्हणाला..

“हे घ्या..! सर्व रेकॉर्डिंग अगदी क्लिअर आणि स्पष्ट आहे. मी काल येऊ न शकल्याने तुम्हाला जो त्रास झाला असेल त्याबद्दल खरोखरीच दिलगीर आहे. मला आता सिन्नरला लवकर पोहोचायचं असल्याने कृपया मला जाण्याची परवानगी द्या..”

एवढं बोलून Pen drive माझ्या हातात ठेऊन मला साधी आभार मानण्याची संधीही न देता जवळ जवळ धावतच तो नम्र, अदबशीर व हसतमुख एटीएम टेक्निशियन बँकेबाहेर निघून गेला.

मी घड्याळात पाहिलं तर सकाळचे दहा वाजत होते. सकाळी साडेनऊ वाजता अचानक आशिष डोंगरेचं बँकेत प्रकट होणं आणि एटीएम रेकॉर्डिंग काढून देऊन दहा वाजेपर्यंत बँकेतून अंतर्धान पावणं.. हे सारं मला अगदी स्वप्नवत.. जणू एखादा चमत्कार घडून आल्या सारखंच वाटत होतं.

ताबडतोब वैजापूर पोलिस स्टेशनला फोन लावला. इन्स्पेक्टर खराटेंनीच फोन उचलला. त्यांना एटीएम रेकॉर्डिंग उपलब्ध झाले असल्याचें कळवता क्षणीच.. “अरे व्वा ! शाब्बास.. !! हवालदार जमदाडेंना सोबत घेऊन ‘ते’ रेकॉर्डिंग पहायला आत्ता लगेच बँकेत येतो आहे..” असं ते म्हणाले.

रेकॉर्डिंग मध्ये कुणाचा चेहरा आहे हे पाहण्याची इन्स्पेक्टर खराटें प्रमाणेच आम्हा सर्वांना सुद्धा अत्यंत उत्सुकता होती. ठाणेदार साहेब हवालदार जमदाडेंना घेऊन आल्यावर लॅपटॉपला Pen drive लावून रेकॉर्डिंग पहायला सुरुवात केली. ठीक नऊ वाजून पंधरा मिनिटे आणि सोळा सेकंदांनी एक धिप्पाड माणूस दहा हजार रुपये मोजताना दिसला. सुरवातीला त्याच्या चेहऱ्यावर खूप मोठे काळे डाग दिसत होते. नंतर नीट निरखून पाहिल्यावर लक्षात आलं की ते काळे डाग नसून त्या माणसाच्या जाडजूड, भरघोस मिशा आहेत. आता चेहरा नीट दिसू लागल्यावर तर तो माणूस म्हणजे हवालदार खुशालराव जमदाडे हाच होय, हे स्पष्ट झालं.

“अरेत्तिच्या मारी !” अविश्वासानं जमदाडेंकडे पाहत इन्स्पेक्टर खराटे उद्गारले..

“आता ह्याला काय म्हणावं ? ‘उलटा चोर कोतवाल को डांटे’ च्या ऐवजी ‘उलटा हवालदार मॅनेजर को डांटे’ असाच प्रकार झाला हा..! अशी आहे तर ही भानगड ! तरी मला शंका होतीच हा हवालदार एवढा मागे का लागलाय बँक वाल्यांच्या.. हे बाहेर समजलं तर “पोलिसांच्या उलट्या बोंबा” असंच म्हणतील ना सारे गावकरी ?”

हवालदार जमदाडे खाली मान घालून चुपचाप बसला होता. भीतीने व शरमेने त्याच्या तोंडून एक शब्दही बाहेर पडत नव्हता.

आम्ही सारे स्तब्ध होऊन एकटक हवालदार खुशालराव जमदाडेंकडेच पहात होतो. काही वेळ असाच निःशब्द शांततेत गेल्यावर ठाणेदार खराटेंनी केबिनमधील संभाषणाची सारी सूत्रं आपल्या हातात घेतली. पुन्हा हवालदार जमदाडेंकडे वळून ते म्हणाले..

“अरेरे..! काय हे खुशालराव ? पोलिसांची होती नव्हती ती सारी इज्जतच पार मातीत घालवलीत तुम्ही..! खरं म्हणजे हे रेकॉर्डिंग अगदी क्रिस्टल क्लिअर म्हणता येईल इतकं अजिबातच स्पष्ट नाही. तुमच्या ऐवजी दुसरं कुणीही या रेकॉर्डिंग मध्ये असतं तर संशयाचा फायदा देऊन त्याला सहज सोडून देता आलं असतं. पण.. पण.. तुमच्या ह्या जगप्रसिद्ध मिशा आडव्या आल्या ना !!

अहो, तुमच्या ह्या गलेलठ्ठ भरभक्कम मिशा पाहून तर कुणी आंधळाही ओळखेल की ह्या रेकॉर्डिंग मध्ये दिसणारा माणूस हा जमदाडे हवालदारच आहे म्हणून..!”

जमदाडे अजूनही खाली मान घालूनच गप्प बसले होते. नंतर आमच्याकडे पहात मोठ्याने हसत इन्स्पेक्टर खराटे म्हणाले..

“अहो, काय सांगू तुम्हाला..!, आमच्या कमिशनर मिश्रा साहेबांना ह्या हलकट जमदाडेच्या मिशांचं एवढं कौतुक की प्रत्येक वेळी वैजापूरला आले की अमिताभ बच्चन स्टाईल ते म्हणायचे.. “मूंछें हो तो जमदाडे जैसी..! वरना ना हो.” पण बघा ना आज त्या मिशांनीच त्याचा घात केला.. मिशांच्या केसांनीच आज त्याचा गळा कापला..”

हास्यविनोद करून केबिन मधील वातावरण हलकं करण्याचा ठाणेदार खराटे आटोकाट प्रयत्न करीत असले तरी अकस्मात बसलेल्या आश्चर्याच्या त्या धक्क्यातून आमच्यापैकी कुणीच अजूनही बाहेर आलेलं नव्हतं. साऱ्यांच्या नजरा मुंडी खाली झुकवून बसलेल्या खुशालराव जमदाडेंवरच खिळलेल्या होत्या. आमची ती अवस्था बघून परिस्थिती सावरून घेत अत्यंत विनम्र आणि समजावणीच्या सुरात ठाणेदार खराटे म्हणाले..

“हे पहा, कधी कधी होतात चुका आम्हा पोलिसांकडूनही..! अशावेळी आपण देखील समजदारी दाखवून उदार बुद्धीने त्यांना माफ केलं पाहिजे. हवालदार जमदाडेंच्या वतीने मी तुम्हा सर्वांची माफी मागतो. आता हवालदार आपली तक्रार मागे घेत असल्याचं तुम्हाला लिहून देतील. तुम्ही देखील हे प्रकरण इथेच मिटवून टाका. चला..! सगळ्या स्टाफसाठी चहा मागवा माझ्या तर्फे, आणि शेवट गोड करा..!”

इन्स्पेक्टर खराटेंच्या ह्या प्रस्तावाला होकारार्थी मान डोलवत मी देखील आपली मूक संमती दर्शवली. प्रकरण विनाकारण वाढवून पोलिसांशी पंगा घेण्याची माझी आता अजिबातच इच्छा नव्हती.

“एटीएम मधून पंधरा तारखेला मीच दहा हजार रुपये काढले होते व त्याचे विस्मरण झाल्याने गैरसमजातून बँके विरुद्ध तक्रार केली होती..”  असे कबूल करून त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करीत बँके विरुद्धची तक्रार मागे घेत असल्याचे हवालदार जमदाडेंनी लिहून दिले.

हे प्रकरण एकदाचं संपलं असं वाटून मी ही सुटकेचा निःश्वास टाकला.

पण.. या एटीएम नाट्याचा तिसरा व शेवटचा अंक अद्याप बाकी होता. तसंच अनेक नवीन पात्रांचा या नाटकात प्रवेश होणंही अजून बाकी होतं..

                        (क्रमश:..4)

                      🙏🏻🌹🙏🏻

ajay kotnis photo1

श्री अजय कोटणीस हे बँकेतील माझे सहकारी असून, स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३८  वर्षांचा प्रदीर्घ अनुभव  असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानकावर खिळवून ठेवतात.  

त्यांना वैजापूर या गावी असतांना आलेला एक अनुभव हा बँकर्स ला किती निरनिराळ्या आणि विचित्र अनुभवांना सामोरे जावे लागते याचे चित्तथरारक वर्णन आहे. 

एटीएम चे थरारक नाट्य- भाग-२ अजय कोटणीस

atm drama-2

लेखक 

श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद 

(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)

ही लेखमाला श्री कोटणीस यांच्या फेसबुक पेज वर नुकतीच त्यांनी प्रसिद्ध केली आहे आणि तिला वाचकांचा भरभरून प्रतिसाद नेहमीप्रमाणे मिळतो आहे. इथे ही लेखमाला या ब्लॉगच्या  वाचकांसाठी, श्री कोटणीस यांच्या परवानगीने प्रसिद्ध करीत आहोत.

एटीएम चे थरारक नाट्य- भाग-२  अजय कोटणीस atm drama

*एटीएम नाट्य..* 

(अंक दुसरा – प्रवेश पहिला)

दुसरा दिवस उजाडला. आज संध्याकाळी हवालदार जमदाडे वरिष्ठांना घेऊन बँकेत येणार होते. त्यावेळी त्यांना काय उत्तर द्यावे हे अजूनही न सुचल्यामुळे सकाळ पासूनच मनाला एक अनामिक हुरहूर व चिंता लागून राहिली होती.

त्या दिवशी बँकेत ग्राहकांची खूप गर्दी होती. कामाच्या गडबडीत संध्याकाळ कधी झाली ते कळलंही नाही. मात्र तशा घाईगर्दीतही या प्रकरणाशी संबंधित दोन महत्त्वाच्या घटना घडल्या. सरकारी दवाखान्यातील डॉ. विक्रम भोसले आणि बँकेसमोर आईसक्रीम विकणारा नंदू हे दोघेही काही कामानिमित्त बँकेत आले होते. त्यांना पाहताच अकाऊंटंट साहेब त्या दोघांनाही घेऊन माझ्या केबिनमध्ये आले. सुरवातीला मी डॉक्टरसाहेबांना विचारलं..

“पंधरा तारखेला रात्री नऊ वाजून दहा मिनिटांनी बँकेच्या एटीएम मधून एक हजार काढून बाहेर आल्यावर तुम्हाला एटीएम रूमच्या आसपास कोणी दिसलं होतं का ?”

माझ्या या प्रश्नावर नकारार्थी मान हलवित डॉक्टर साहेब म्हणाले..

“एटीएम रूमच्या आसपास तेंव्हा कुणीही नव्हतं. एटीएम रूम पासून बँकेच्या कंपाऊंडचे फाटक पंचवीस ते तीस मीटर इतके दूर आहे. परत जाताना हे पूर्ण अंतर पार करीत असताना मला कुणीही दिसलं नाही. मात्र बँकिंग हॉलच्या ग्रील गेट जवळ उभ्या असलेल्या तुमच्या सिक्युरिटी गार्डने त्यावेळी मला सॅल्युट ठोकलेला अजून आठवतो. कारण मी जरी त्याला ओळखलं नाही, तरी तो मात्र मला जरूर ओळखत असावा. शिवाय, त्यादिवशी त्या गार्डच्या खांद्यावर नेहमी सारखी रायफल सुद्धा नव्हती हे देखील मी त्यावेळी मार्क केलं होतं.”

“ठीक आहे डॉक्टरसाहेब, आपले खूप खूप धन्यवाद !”

एवढं बोलून डॉक्टर साहेबांना निरोप दिल्यानंतर आईसक्रीम गाडीवाल्या नंदूला विचारलं..

“पंधरा तारखेला रात्री नऊ वाजून वीस मिनिटांनी तू येथील एटीएम मधून पाचशे रुपये काढले होतेस. त्यावेळी एटीएम रूम कडे जाताना किंवा परतताना तुला कुणी अन्य व्यक्ती दिसली का ?”

त्यावर नंदू म्हणाला..

“नेहमी सारखी रात्री नऊ सव्वा नऊ वाजता मी कुलुपं लावून आईसक्रीमची गाडी बंद केली आणि घरी निघालो होतो. तेवढ्यात सगळीकडची वीज गेली. वीज गेल्यावर मला आठवलं की माझ्या घराचं गेल्या चार महिन्यांचं वीज बिल भरणं बाकी आहे. मी खिशातील पैसे काढून मोजले व हिशोब केला. बिलासाठी फक्त पाचशे रुपये कमी पडत होते. एवढ्यात वीज परत आली आणि बीज बिल भरण्यासाठी एटीएम मधून मी पाचशे रुपये काढले. मात्र एटीएम रूम कडे जाताना किंवा तेथून परतताना वाटेत मला कुणीही दिसलं नाही.”

नंदू गेल्यावर मी विचारमग्न झालो. डॉ. भोसले किंवा नंदू यापैकी कुणीच कसं त्यादिवशी एटीएम रुमच्या आसपास कुणालाच पाहिलं नाही ? अर्थात गावात विनाकारण चर्चा नको म्हणून मुद्दामच मी हवालदार जमदाडेंच्या खात्यातून दहा हजार रुपये काढले गेल्याच्या घटनेचा त्या दोघांजवळही उल्लेख केला केला नव्हता. हे ATM withdrawal चं प्रकरण हळूहळू गूढ होत चाललं होतं.

डॉ. भोसलेंनी बोलता बोलता रायफल नसलेल्या सिक्युरिटी गार्डचा उल्लेख केला होता. त्यामुळे हेड गार्डकडून “गार्ड ड्युटी रजिस्टर” मागवून पंधरा तारखेला रात्री नऊ वाजता कोणत्या गार्डची ड्युटी होती ? हे तपासून पाहिलं. तेव्हा, पंधरा तारखेला रेग्युलर गार्ड सुटीवर असल्याने टेम्पररी गार्ड गणपत हा त्या दिवशी संध्याकाळी सहा ते रात्री दहा या काळात ड्युटीवर होता असे समजले. हा गणपत होमगार्ड असल्याने त्याच्याजवळ रायफल बाळगण्याचा परवाना नव्हता. तसंच, तो सरकारी दवाखान्यातही टेम्पररी वॉचमन म्हणून काम करीत असल्याने डॉ. भोसलेंना ओळखत असावा असाही खुलासा झाला.

टीव्हीवरील “Crime Patrol” सिरीयल मध्ये दाखवतात, तशाच धर्तीवर विविध अँगल्स पडताळून माझा तपास सुरू होता. हवालदार खुशाल जमदाडे यांच्याविषयी जमेल तितकी माहिती गोळा करण्यासही मी सुरुवात केली होती. विशेषतः खरोखरीच गेले वीस दिवस ते मुंबईला गेले होते की अधून मधून वैजापूरला ही येऊन जात होते, हे जाणून घेण्यावर माझा भर होता.

संध्याकाळचे सात वाजले होते. बँकेतली गर्दी आता बरीच ओसरली होती. हवालदार जमदाडे आता कोणत्याही क्षणी बँकेत प्रवेश करतील असा विचार मनात येतो न येतो तोच केबिनच्या काचेतून हवालदार खुशालराव एका उंच, सडपातळ इन्स्पेक्टर सह बँकेत शिरताना दिसले.

ते दोघेही माझ्या केबिन मधल्या खुर्चीवर स्थानापन्न झाल्यावर हवालदार जमदाडेंनी अगोदर त्याच्या वरिष्ठांना माझा परिचय करून दिला आणि म्हणाले..

“हे वैजापूर पोलिस स्टेशनचे ठाणेदार इन्स्पेक्टर खराटे. माझ्यावर झालेल्या अन्याया संदर्भात आता तेच माझी बाजू मांडतील..”

गोरापान वर्ण, लांब उभट चेहरा, पिंगट डोळे, सरळ धारदार नाक आणि बारीक मिशा असलेले इन्स्पेक्टर खराटे अत्यंत मृदु आवाजात म्हणाले..

“वेल sss ! मला एवढंच सांगायचं आहे की एका अत्यंत गुप्त व महत्वाच्या कामासंदर्भात आमच्या पोलिस स्टेशनचे हवालदार श्री जमदाडे यांना पाच तारखेपासून पंचवीस तारखेपर्यंत मुंबई येथे पाठविण्यात आले होते. काम अत्यंत संवेदनशील असल्याने त्यांना सदैव कामाच्या ठिकाणीच हजर राहणे अनिवार्य होते. तसंच मुंबईला जाताना बँकेचे एटीएम कार्डही सोबत नेले असल्याचे त्यांनी मला प्रतिज्ञा पूर्वक सांगितले आहे.

त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या खात्यातून एटीएम द्वारे दहा हजार रुपयांची रक्कम अज्ञात व्यक्तीद्वारे काढून घेण्यात आली ही अत्यंत गंभीर बाब आहे. श्री जमदाडे हे आमच्या ठाण्याचे अत्यंत ईमानदार, कर्तव्यदक्ष व सिनियर हवालदार असून त्यांना त्यांची रक्कम ताबडतोब परत करण्यात यावी अशी तुमच्याकडे मी मागणी करतो.

या घटनेला अगोदरच दहा ते बारा दिवस होऊन गेले असल्याने आधी हवालदार साहेबांना त्यांची रक्कम परत करावी आणि बँकेची अंतर्गत चौकशी चालूच ठेवावी. चौकशी संदर्भात आवश्यकता भासल्यास आम्ही आपणांस सर्व प्रकारे सहाय्य करू.

गेले दोन दिवस, आपण स्वतःहूनच पैसे परत कराल याची आम्ही वाट पाहिली. परंतु आपल्याकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने आपल्या बँकेविरुद्ध लेखी तक्रार आपल्याकडेच नोंदवित आहोत. कृपया या कागदाच्या सत्य-प्रतीवर “Received” असे लिहून सही शिक्का द्यावा.”

असं म्हणून इन्स्पेक्टर खराटेंनी खिशातून दोन कागद काढून ते माझ्यासमोर ठेवले.

मी कागदावरून झरझर नजर फिरवली. हवालदार जमदाडेंनी पूर्वी मला सांगितलेला घटनाक्रमच त्या तक्रारीत लिहिलेला होता. ते मुंबई येथे गुप्त कामगिरीवर गेले असल्याचा उल्लेखही त्यात होता. एटीएम रूम मधील सीसीटीव्ही चे रेकॉर्डिंग तपासून प्रकरणाची शहानिशा करून त्वरित पैसे परत मिळावेत अशी मागणीही त्यात केलेली होती. लगेच त्या तक्रारीच्या सत्य-प्रतीवर Received असं लिहून सही शिक्क्यासह ती प्रत जमदाडेंना परत केली. माझ्याशी हस्तांदोलन करून इन्स्पेक्टर खराटे केबिन बाहेर पडले. त्यांना गेटपर्यंत सोडण्यासाठी हवालदार जमदाडेही त्यांच्या मागोमाग बाहेर गेले.

पाचच मिनिटांनी खुशालराव जमदाडे पुन्हा माझ्या केबिन मध्ये परत आले. मघाशी इन्स्पेक्टर साहेबांसोबत असतानाचे त्यांच्या चेहऱ्यावरील नम्र, मवाळ, सभ्य, आज्ञाधारक भाव आता पार बदललेले होते. त्या चेहऱ्यावर आता भीषण क्रौर्य दिसत होते. आधीच मोठे, बटबटीत असलेले डोळे आता क्रोधाने लालबुंद झाले होते. त्यांची नजर खुनशी वाटत होती. कुटिल, कावेबाज, छद्मी हास्य करीत ते म्हणाले..

“मी तुम्हाला पैसे परत करण्यासाठी दिलेली मुदत कालच संपली. आता उद्यापासून “पोलिसी खाक्या” कसा असतो, ते तुम्हाला दाखवणार आहे. तेव्हा तयार रहा..”

हवालदार जमदाडे बोलत असताना त्यांच्यात क्षणोक्षणी अमरीश पुरी, परेश रावळ, सदाशिव अमरापूरकर अशा क्रूर, बेरकी फिल्मी खलनायकांचा भास होत होता. ज्यावेळी त्यांच्या दोन्ही हातांच्या मुठी वळल्या जाऊन त्यांचे उग्र डोळे आग ओकीत होते त्यावेळी तर ते हुबेहूब नाना पाटेकरच्या “तिरंगा” चित्रपटातील क्रूर व्हिलन दीपक शिर्के उर्फ “प्रलयनाथ गेंडास्वामी”च भासत होते.

टेबलावर मूठ आपटीत आणि सवयीप्रमाणे आपल्या जाडजूड मिशांना हळुवारपणे कुरवाळीत, त्यांना हलकेच पीळ देत खुशालराव तरातरा बँकेतून निघून गेले.

ते गेल्यावर त्यांनी दिलेली तक्रार पुन्हा वाचून काढली. तक्रारीच्या प्रति  पोलिस स्टेशन, वैजापूर, पोलिस कमिशनर (ग्रामीण), औरंगाबाद, जिल्हाधिकारी, औरंगाबाद तसेच बँकेच्या रिजनल मॅनेजर साहेबांना दिलेल्या होत्या. ताबडतोब त्या तक्रारीचे उत्तर लिहायला घेतले.

“बँकेने आपल्या तक्रारीची ताबडतोब दखल घेतली असून प्रकरणाचा तपास चालू आहे. CCTV फुटेज तसेच अन्य तांत्रिक तपास पूर्ण झाल्यावर बँकेच्या नियमाप्रमाणे आपल्या तक्रारीचे योग्य ते निराकरण केले जाईल..” असा उल्लेख करून ते उत्तर ताबडतोब हवालदार जमदाडेंना चपराशा मार्फत हॅण्ड डिलिव्हरीने पाठवून दिले. तसेच त्या उत्तराच्या प्रति वैजापूर पोलिस स्टेशन, रिजनल मॅनेजर, जिल्हाधिकारी व पोलिस कमिशनर, औरंगाबाद यांनाही पाठवून दिल्या.

त्या दिवशी रात्रभर मला झोप आली नाही. सारखी खुशालरावांनी दिलेली “पोलिसी खाक्या” दाखवण्याची धमकी आठवत होती. त्यांचा  लालभडक डोळ्यांतून आग ओकणारा, त्वेषाने मुठी वळलेला, काळा कभिन्न, उर्मट, खडबडीत, राक्षसी चेहरा सतत डोळ्यांपुढे येत होता.

पहाटे पहाटे माझा डोळा लागला आणि मला स्वप्न पडलं. त्या स्वप्नात महिनाभरापूर्वी बँकेत येऊन गेलेले एटीएम टेक्निशियन श्री. गाडेकर हे मला दिसले. बोलता बोलता श्री. गाडेकर म्हणाले..

“प्रत्येक एटीएम मशीन मध्ये एक अदृश्य, छुपा, गुप्त कॅमेरा (in-visible, hidden, discreet camera) सुद्धा असतो. हा कॅमेरा सामान्यत: आकाराने अत्यंत छोटा, सूक्ष्म छिद्र पद्धतीचा, पिन होल भिंगांचा (small, pin- hole lenses) असून तो पॅनेलच्या अग्रभागी मशीनच्या आत बसवलेला, अंतर्निहित (in-built) असतो. या कॅमेऱ्यामुळे एटीएम वापरणाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्याची स्पष्ट प्रतिमा (clear image) घेतली जाते.

काही एटीएम मशीन मधील अंतर्निहित गुप्त कॅमेरे हे सतत (continuous) रेकॉर्डिंग करीत असतात तर काही मशीन मधील कॅमेरे हे घटना-प्रवृत्त (event-triggered) असतात. म्हणजेच मशीनमध्ये एटीएम कार्ड सारताच किंवा पॅनेल समोर कसलीही हालचाल होताच हे कॅमेरे आपोआप कार्यरत (active) होतात.

तसंच या गुप्त कॅमेऱ्यातील रेकॉर्डिंग हे जास्तीतजास्त 90 दिवसांपर्यंतच मशीनमध्ये साठवून (store) ठेवले जाऊ शकते. एटीएम टेक्निशियनच्या मदतीने हे गुप्त रेकॉर्डिंग तुम्ही पाहू शकता तसंच ते रेकॉर्डिंग Pen-drive मध्ये सुद्धा घेता येतं.”

मला झोपेतून जाग आली तेंव्हा पहाटे पहाटे पडलेलं ते स्वप्न मला पुन्हा आठवलं. खरं म्हणजे गेल्याच महिन्यात बँकेत येऊन गेलेल्या एटीएम टेक्निशियनने मला ह्या मशीनमधील इन-बिल्ट कॅमेऱ्याबद्दल सांगितलं होतं. पण माझा एटीएमशी पूर्वी कधीच संबंध आलेला नसल्याने मला त्यात फारसे स्वारस्य नव्हते त्यामुळेच त्यांचे ते बोलणे त्यावेळी मी लक्षपूर्वक ऐकले नव्हते.

सुदैवाने ते एटीएम टेक्निशियन श्री गाडेकर यांचा मोबाईल नंबर मी सेव्ह करून ठेवला होता. ताबडतोब त्यांना फोन केला आणि घडलेला प्रकार त्यांच्या कानावर घातला. त्यांनी माझं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं आणि म्हणाले..

“काही काळजी करू नका. वीज गेली असली तरी मशीन मधील इन-बिल्ट कॅमेरा आपले काम व्यवस्थितपणे करीत राहतो. मीच तिथे येऊन तुम्हाला त्या दिवशीचे रेकॉर्डिंग काढून दिलं असतं.. पण गेल्याच आठवड्यात माझी बदली परभणी रिजनला झाली असल्यामुळे मी तिथे येऊ शकत नाही. मात्र माझ्या जागी श्री डोंगरे हे टेक्निशियन तिथे आलेले आहेत. त्यांचा नंबर मी तुम्हाला देतो. तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना वैजापूरला बोलावून घ्या.”

श्री. गाडेकरांचे आभार मानून लगेच नवीन टेक्निशियन श्री. डोंगरे यांच्याशी संपर्क साधला. दुर्दैवाने माझ्या फोनला श्री. डोंगरे यांचा प्रतिसाद अगदी थंड असाच होता. “पुढील काही दिवसांचा टूर प्रोग्राम फिक्स असल्याने किमान एक आठवडा तरी वैजापूरला येणे शक्य होणार नाही..” असे ते म्हणाले. मी हर तऱ्हेने त्यांना विनंती केली.. “पाहिजे तर रिजनल मॅनेजर साहेबां करवी तुम्हाला इथे बोलावून घेतो..” असेही सांगितले.. पण श्री डोंगरे एखाद्या पर्वताप्रमाणे आपल्या म्हणण्यावर ठाम, अडीग होते.

शेवटी हताश होऊन “तुमचा आजचा प्रोग्राम काय आहे ?” असे त्यांना विचारले तेंव्हा ते म्हणाले..

 “आज मी मनमाड येथे जाणार आहे तर उद्या सिन्नर येथे..! या दोन्ही ठिकाणी भरपूर काम असल्याने तिथून परतायला मला खूप उशीर होईल. त्यामुळे निदान हे दोन दिवस तरी वैजापूरला येणं मला मुळीच शक्य नाही. “

स्वतःशीच चरफडत मी फोन खाली ठेवला. अजूनही हवालदार जमदाडेंची कालची ती हिंस्त्र, खुनशी नजर, त्या क्रोधाने घट्ट वळलेल्या दोन्ही हातांच्या मुठी, ते खदिरांगारासारखे लालबुंद, तप्त, क्रुद्ध, भेदक डोळे.. हे सारं डोळ्यापुढे येत होतं.

या प्रकरणाचा लवकरात लवकर काहीतरी साक्षमोक्ष लावलाच पाहिजे. नाहीतर तो माजलेला “पुलिसवाला गुंडा” काहीतरी आततायी कृत्य केल्याशिवाय राहणार नाही. कसंही करून एखादा एटीएम टेक्निशियन ताबडतोब वैजापूरला आणायलाच हवा. अधीर होऊन मी रिजनल मॅनेजर (AGM) व उपमहाप्रबंधक (DGM) या दोघांनाही फोन लावण्याचा प्रयत्न केला. पण माझ्या दुर्दैवाने ते दोघेही त्यावेळी मुंबईला GM साहेबां सोबतच्या मीटिंग मध्ये व्यस्त होते.

या सर्व खटपटीत सकाळचे दहा वाजून गेले होते. बँकेत जायची वेळ झाली होती. आजचा दिवस हा प्रचंड वेगवान आणि नाट्यमय घडामोडींनी भरलेला असणार आहे अशी माझा “सिक्स्थ सेन्स” ग्वाही देत होतं..

एटीएम नाट्याचा अतिशय उत्कंठापूर्ण असा हा दुसरा अंक आज निर्णायक वळण घेणार होता..

                          (क्रमशः 3)

                   🙏🏻🌹🙏🏻

ajay kotnis photo1

श्री अजय कोटणीस हे बँकेतील माझे सहकारी असून, स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३८  वर्षांचा प्रदीर्घ अनुभव  असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानकावर खिळवून ठेवतात.  

त्यांना वैजापूर या गावी असतांना आलेला एक अनुभव हा बँकर्स ला किती निरनिराळ्या आणि विचित्र अनुभवांना सामोरे जावे लागते याचे चित्तथरारक वर्णन आहे. 

एटीएम चे थरारक नाट्य- भाग-१ अजय कोटणीस

atm drama-1

लेखक 

श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद 

(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)

ही लेखमाला श्री कोटणीस यांच्या फेसबुक पेज वर नुकतीच त्यांनी प्रसिद्ध केली आहे आणि तिला वाचकांचा भरभरून प्रतिसाद नेहमीप्रमाणे मिळतो आहे. इथे ही लेखमाला या ब्लॉगच्या  वाचकांसाठी, श्री कोटणीस यांच्या परवानगीने प्रसिद्ध करीत आहोत.

एटीएम चे थरारक नाट्य- भाग-१ अजय कोटणीस atm drama

*एटीएम नाट्य..*

“अंक पहिला..”

औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर ह्या तालुक्याच्या गावातील स्टेट बँकेत शाखाधिकारी म्हणून काम करीत असताना आलेला हा अनुभव..

त्या दिवशी नेहमीप्रमाणेच सकाळी लवकर येऊन बँकेत दैनंदिन कामकाज करीत बसलो होतो. नऊ किंवा साडे नऊ वाजले असावेत. इतक्यात बँकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर पहारा देत असलेल्या सिक्युरिटी गार्डशी कुणीतरी मोठ्या आवाजात बाचाबाची करीत असल्याचा आवाज आला. म्हणून केबिनच्या बाहेर येऊन पाहिलं तर ग्रील गेटच्या बाहेर पायजामा शर्ट घातलेला एक दांडगा धटिंगण “मॅनेजर साहेबांना भेटायचं आहे.. अर्जंट काम आहे” असं म्हणत आत सोडण्यासाठी सुरक्षा रक्षकाशी वाद घालताना दिसला.

मला पाहताच तो धटिंगण “अहो साहेब, मला ठाण्यात ड्युटीला जायचं आहे. फक्त पाच मिनिटांचं काम आहे. प्लीज, मला आत येऊ द्या..” अशी विनंती करू लागला. त्यामुळे गार्डला त्याला आत सोडायला सांगून पुन्हा माझ्या केबिन मध्ये जाऊन बसलो. लगेच माझ्या मागोमाग तो दांडगा धटिंगणही केबिन मध्ये शिरला.

“साहेब, मी इथल्या पोलिस ठाण्यात सिनियर हवालदार आहे. माझं नाव खुशाल जमदाडे. तुमच्या बँकेतील सारा स्टाफ मला ओळखतो. हा गेटवरचा बंदुकधारी गार्ड तुमच्या सारखाच नवीन आलेला दिसतो. त्यामुळेच तो मला ओळखत नाही. नाहीतर मला अडवण्याची त्याची हिंमतच झाली नसती..”

अत्यंत जाड्या भरड्या, खरखरीत आवाजात तो बोलत होता. त्याच्या स्वरातील आत्मप्रौढी, अहंभाव मला अजिबात आवडला नाही.

“बसा..!”

खुर्चीकडे बोट दाखवित म्हणालो. लगेच झटकन तो खुर्चीवर बसला. अभावितपणेच त्याचं बारकाईने निरीक्षण करीत त्याचं माझ्याकडे काय काम असावं याचा अंदाज बांधू लागलो.

काळाकुट्ट, गोल, खडबडीत चेहरा, बारीक कापलेले केस, मोठे, उग्र, बटबटीत डोळे, जाडजूड ओठ आणि दाट, लांब लचक, भरघोस मिशा.. ! भक्कम, पिळदार शरीराचा तो इसम एखाद्या मोकाट, उद्दाम, सराईत गुंडासारखाच भासत होता. मला त्याच्या चमकदार, काळ्या, अतिशय भरगच्च अशा मिशांचं कौतुक वाटलं. मी त्याच्या मिशांकडे एकटक पहात असतांना माझ्या नजरेतील कुतुहलाचे भाव ओळखून मनोमन खुश होत आपल्या मिशांना हळुवारपणे कुरवाळीत तो म्हणाला..atm drama-1

“आमच्या अख्ख्या डिपार्टमेंट मध्ये माझ्या या मिशा खूप फेमस आहेत. आमचे कमिशनर मिश्रा साहेब सुद्धा माझा उल्लेख “घनी मोटी मूँछवाले जमदाडे” असाच करतात. मिशी वाढवण्याच्या अनेक स्पर्धांत या मिशीमुळे मला बक्षिसेही मिळाली आहेत..”

“खरंच..! खूप मोठ्या, विशाल, विलक्षण आणि आकर्षक आहेत तुमच्या मिशा..!!”

मी ही त्याच्या मिशांचं कौतुक केलं आणि विचारलं..

“बरं..! काय काम होतं तुमचं ?”

माझ्या या प्रश्नावर जरासा गंभीर होत तो म्हणाला..

“दहा दिवसांपूर्वी, म्हणजेच 15 तारखेला रात्री सव्वा नऊ वाजता माझ्या एटीएम खात्यातून कुणीतरी दहा हजार रुपये काढून घेतले आहेत, असं आत्ताच मला समजलं आहे. माझ्या एटीएम खात्यात पंधरा हजार रुपये जमा होते. आज सकाळी त्यातून दहा हजार रुपये काढून घेण्यासाठी एटीएम मध्ये गेलो असता “Insufficent Balance” असल्यामुळे “transaction decline” झाले.

त्यावर विश्वास न बसून खात्याचे “मिनी स्टेटमेंट” काढून बघितले तेव्हा 15 तारखेला दहा हजार रुपये खात्यातून Withdraw झाले असल्याचे दिसले. नंतर मी मोबाईल वरील जुने मेसेजेस तपासून पाहिले तेव्हा पंधरा तारखेला रात्री सव्वा नऊ वाजता एटीएम द्वारे दहा हजार रुपये काढल्याचा मेसेजही आलेला दिसला.”

या समोर बसलेल्या गृहस्थाची एटीएम संबंधी कंप्लेंट असल्याचं समजल्यावर मला जरासं हायसं वाटलं.

एटीएम संबंधी तक्रारींचं निराकरण करणं हे आता आमच्या रोजच्या सरावाचं झालं होतं. अशा बहुतांश तक्रारी या एकतर गैरसमजातून, निष्काळजीपणामुळे, विसरभोळेपणामुळे किंवा घरातीलच कुणाच्या तरी गैरवापरामुळे उद्भवलेल्या असायच्या. त्यामुळे वस्तुस्थिती निदर्शनास आणल्यावर साहजिकच तक्रारकर्त्याचं समाधान व्हायचं. त्यामुळे नेहमीच्या सवयीनं विचारलं..

“हवालदार साहेब, नीट आठवून पहा.. कदाचित तुम्हीच पैसे काढले असतील आणि मग पार विसरून गेला असाल.. किंवा तुमची पत्नी, मुलगा अथवा घरातीलच कुणीतरी तुमच्या नकळत तुमचं एटीएम कार्ड वापरलं असेल. तुम्ही घरी सर्वांना याबाबत विचारलंत का ?”

माझ्या या प्रश्नावर हवालदार जमदाडे एकदमच बिथरले. चिडून, तावातावाने ते म्हणाले..

“तुम्ही असं कसं विचारू शकता ? माझं एटीएम कार्ड नेहमी माझ्याजवळच असतं. मी ते कधीही कुणालाही वापरायला देत नाही. त्यातून गेले वीस दिवस पोलिस स्टेशनच्या गोपनीय कामगिरीसाठी मी मुंबई येथे गेलो होतो. जाताना सोबत एटीएम कार्ड ही घेऊन गेलो होतो.

अत्यंत महत्वाच्या, गुप्त व संवेदनशील कामगिरीवर असल्यामुळे कोणत्याही परिस्थितीत गुप्त कामाचे स्थान सोडण्याची मला परवानगी नव्हती. त्यामुळे कालपर्यंत मी मुंबईतच होतो. आज सकाळीच तेथील काम संपवून वैजापूरला परतलो तेंव्हाच माझ्या एटीएम खात्यातून पैसे काढले गेल्याची बाब समजली.

तुम्ही ताबडतोब या गोष्टीचा तपास करा आणि मला माझे पैसे तात्काळ परत करा. तुम्हाला मी आजच्या संपूर्ण दिवसाची मुदत देतो..”

ही शेवटची दोन वाक्यं उच्चारताना हवालदार जमदाडेंचा स्वर अचानक जरबेचा, कठोर आणि गर्भित धमकीयुक्त असा झाला. त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून निर्विकारपणे मी विचारलं..

“तुमच्या घरी कोण कोण असतं ?”

“माझी ऐंशी वर्षांची आई, जी आजारपणामुळे खाटेला खिळून असते आणि माझी पत्नी, जिला अजिबात लिहाय वाचायला येत नाही.. निरक्षर आहे ती..”

“आणि.. तुमची मुलं ?”

“दोन मुलं आहेत मला.. एक दहावीला आहे तर दुसरा बारावीला. दोघेही अहमदनगरला, त्यांच्या मामाकडे राहून शिकतात.”

“त्यांच्यापैकी कुणी एवढ्यात वैजापूरला येऊन गेलं का ?”

“नाही. दोघांच्याही परीक्षा सुरू आहेत सध्या. त्या संपल्यावर मग येऊन जातील ते इथे काही दिवसांसाठी..”

“ठीक आहे. मी आमच्या परीने चौकशी करतो आणि मग कळवतो तुम्हाला..”

“नुसतं कळवून भागणार नाही साहेब, मला माझे पैसे परत मिळालेच पाहिजेत आणि तेही ताबडतोब..! मी उद्या पुन्हा येईन..”

माझ्याकडे रागाचा तीव्र कटाक्ष टाकून आणि आपल्या जाडजूड, भरघोस मिशीला दोन्ही बाजूंनी पीळ देत खुशालराव जमदाडे निघून गेले.

खुशालरावांशी बोलत असतानाच त्यांच्या खात्यातून 15 तारखेला खरोखरीच दहा हजार रुपये एटीएम द्वारे withdraw झाल्याची मी माझ्या कॉम्प्युटर स्क्रीन वरून खातरजमा करून घेतली होती. तसंच आमच्या बँकेच्या कंपाऊंड मधील मागील बाजूस असलेल्या एटीएम रूम मधील एटीएम मशीन मधूनच हे पैसे काढले गेल्याचीही मी खात्री करून घेतली होती. वरकरणी जमदाडेंची तक्रार खरी भासत असली तरी यापूर्वीही एटीएम संबंधित अशा अनेक तक्रारींचं समाधान आणि निराकरण आम्ही एटीएम रूम मधील सीसीटीव्ही रेकॉर्डिंग च्या सहाय्याने चुटकीसरशी केलेलं असल्याने, याही प्रकरणी मी तसा निर्धास्तच होतो.

त्या दिवशी दुपारी लंच टाईम मध्ये हेड कॅशियर आणि अकाउंटंट साहेबांना सोबत घेऊन एटीएम रूम मधील 15 तारखेचं सीसीटीव्ही फुटेज व्हेरिफाय करायला सुरवात केली. तत्पूर्वी एटीएम लॉग आणि अन्य एटीएम रिपोर्ट एन्क्वायरी मार्फत जमदाडेंच्या खात्यातून दहा हजार रुपये काढल्याची एक्झॅक्ट वेळ ही नऊ वाजून पंधरा मिनिटे व सोळा सेकंद इतकी असल्याचे कन्फर्म करून घेतले होते. 15 तारखेच्या रात्री नऊ वाजून दहा मिनिटे पासूनचे सीसीटीव्ही रेकॉर्डिंग Re-play करून आम्ही उत्सुकतेने स्क्रीनकडे पाहू लागलो.

नऊ वाजून ठीक साडेदहा मिनिटांनी एक लठ्ठ ठेंगणे गृहस्थ एटीएम रूम मध्ये आलेले दिसले. त्यांना पाहताच “अरे ! हे तर आपले सरकारी दवाखान्यातले डॉक्टर विक्रम भोसले..” असे उद्गार हेड कॅशियर व अकाउंट साहेब या दोघांच्याही तोंडून एकदमच बाहेर पडले. एटीएम मधून एक हजार रुपये काढून डॉ. भोसले निघून गेले तेंव्हा नऊ वाजून तेरा मिनिटे झाली होती. त्यानंतर मिनिटभर कुणीही एटीएम रूम मध्ये आलं नाही. नऊ वाजून चौदा मिनिटे झाली.. आता एटीएम रूम मध्ये येणारी व्यक्ती कोण असेल याची सर्वांनाच उत्कंठा लागली होती.

एक दोन सेकंद गेले आणि अचानक एटीएम रूम मध्ये मिट्ट काळोख झाला. नेमकी त्याचवेळी त्या परिसरातील वीज गेली असावी. एटीएम रूम बाहेरील पार्किंग शेडवरील लाईट सुद्धा बंद झाल्याने एटीएम च्या आतबाहेर सगळीकडे अंधारच अंधार दिसत होता. आमचा सीसीटीव्ही स्क्रीन तर पूर्णपणे ब्लॅक झाला होता. तरी देखील आम्ही तिघेही डोळे ताणून एटीएम रुम मध्ये काही हालचाल दिसते का ? एखादी आकृती तरी दिसते का ? हे निरखून पहात होतो. मात्र अंधार एवढा गडद होता की जणू काही कुणीतरी सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्याला काळ्या कापडाने घट्ट बांधून टाकले असावे असेच वाटत होते. त्या निश्चल, निष्क्रिय डार्क स्क्रीन कडे आम्ही हताशपणे पहातच राहीलो.

अशीच पाच सहा मिनिटे गेली. नऊ वाजून वीस मिनिटे होताच मघाशी गेलेली वीज अचानक परत आली. सीसीटीव्ही स्क्रीन पुन्हा उजळला. एटीएम रूम मधील रेकॉर्डिंग तसं तर सुरूच होतं, फक्त आता ते आम्हाला पुन्हा स्पष्ट दिसायला लागलं होतं, इतकंच. मात्र या मधल्या सहा मिनिटांत (9.14 ते 9.20) एटीएम रूम मध्ये कोण येऊन गेलं हे कळण्यास काहीच मार्ग नव्हता.

नऊ वाजून बावीस मिनिटांनी बँकेसमोरील आईसक्रीम गाडीवाला नंदू एटीएम रूम मध्ये आलेला दिसला. त्याला आम्ही तिघांनीही ताबडतोब ओळखलं. पाचशे रुपये काढून तो निघून गेला. पुढील सीसीटीव्ही रेकॉर्डिंग बघण्यात काहीच अर्थ नव्हता. त्यामुळे रेकॉर्डिंग ऑफ करून “आता पुढे काय करता येईल ?” याबद्दल चर्चा करीत बसलो. खूप विचार करूनही कोणालाच काहीही मार्ग सुचेना तेंव्हा उद्या जमदाडे आल्यावर काहीतरी थातूरमातूर कारण सांगून त्याला तात्पुरते गप्प बसवू या. आणि मग या प्रकरणी वरिष्ठांचा सल्ला घेऊ या असे ठरवले.

अपेक्षेप्रमाणेच दुसऱ्या दिवशी बँक उघडताच हवालदार जमदाडे पोलिस युनिफॉर्म मध्ये बँकेत हजर झाले. उगीच वरकरणी खोटी अदब दाखवून सॅल्युट मारीत ते म्हणाले..

“नमस्कार साहेब ! काय मग ? झाला ना तुमचा तपास पूर्ण ? काय निघालं तुमच्या तपासात ?”

एवढं बोलून मग खुर्चीत बसत आपल्या भरगच्च मिशीला पीळ देत ते म्हणाले..

“ते जाऊ द्या..! सहजच विचारलं मी.. तुमच्या तपासात काय निघालं ह्याच्याशी मला काहीही देणं घेणं नाही. ते तुमचं इंटर्नल मॅटर आहे. मात्र मी एटीएम मधून पैसे काढले नाहीत हे तर नक्कीच सिद्ध झालं असेल. तेंव्हा मला माझे दहा हजार रुपये परत करून टाका आणि माझ्यापुरतं मॅटर क्लोज करा.”

हवालदार जमदाडे एवढ्या खात्रीपूर्वक आणि निरागस आत्मविश्वासाने बोलत होते की आता त्यांना काय सांगावं हेच कळत नव्हतं. शेवटी धीर एकवटून म्हणालो..

“हे पहा, तुमचं म्हणणं अगदी खरं असलं तरी जोपर्यंत आम्ही एटीएम रूम मधील सीसीटीव्ही रेकॉर्डिंग तपासून पहात नाही, तोपर्यंत तुम्हाला काहीच सांगू शकत नाही. दुर्दैवाने काहीतरी तांत्रिक बिघाड झाल्याने 15 तारखेचे सीसीटीव्ही रेकॉर्डिंग सध्यातरी उपलब्ध नाही. एक दोन दिवसात औरंगाबाद येथून टेक्निशियन आल्यावरच त्याबाबत अधिक खुलासा होईल. आणि मगच आम्हाला पुढील निर्णय घेता येईल.”

खुशालराव जमदाडेंनी माझं बोलणं शांतपणे ऐकून घेतलं. त्यांचा अपेक्षाभंग होऊन त्यांना खूप राग आल्याचं त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होतं. खुर्चीवरून उठत ते म्हणाले..

“तुमचं म्हणणं मी ऐकलं. आता माझं म्हणणंही ऐका. तुमच्या त्या टेक्निशियनला ताबडतोब, आजच्या आजच बोलावून घ्या. कोणत्याही परिस्थितीत उद्या सकाळी मला माझे पैसे परत मिळालेच पाहिजेत. नाहीतर उद्या संध्याकाळी माझ्या वरिष्ठांसह येऊन तुमच्या विरुद्ध फसवणुकीची लेखी तक्रार करीन. आणि मग त्यानंतर तुम्हाला आणि तुमच्या स्टाफला जो त्रास होईल त्याला सर्वस्वी तुम्हीच जबाबदार असाल, हे लक्षात असू द्या..”

खुशालरावांनी नेहमी सारखा आपल्या जाडजूड मिशांना पीळ देत एवढा सज्जड दम दिला होता की क्षणभर त्यांचे नाव “जमदाडे” नसून “दमदाटे” च असावे, असे मला वाटून गेले.

हे प्रकरण आता फार काळ रेंगाळत ठेऊन चालणार नव्हतं. मिशीबहाद्दर जमदाडेंचा आजचा उग्र अवतार पाहता उद्या संध्याकाळी आपल्या वरिष्ठांसह बँकेत येऊन ते काहीतरी गोंधळ घालणार हे निश्चित होतं. बराच वेळ विचार करून मग एटीएम चं काम बघणाऱ्या रिजनल ऑफिसमधील चीफ ऑफिसरच्या कानावर हा प्रकार घातला. त्यांनी एटीएम चॅनेल मॅनेजरचा नंबर देऊन त्याच्याशी संपर्क साधण्यास सांगितलं. मात्र हा चॅनेल मॅनेजर नेमका त्याचवेळी सहकुटुंब पंधरा दिवसांच्या युरोप टूर वर गेला असल्याने नजिकच्या काळात तरी त्याच्याशी संपर्क होण्याची शक्यता नव्हती.

शेवटी नाईलाजाने संध्याकाळी रिजनल मॅनेजर साहेबांच्या कानावर हे प्रकरण घालून हवालदार जमदाडेंनी दिलेल्या धमकी बद्दल सांगितलं तेंव्हा ते म्हणाले..

“जोपर्यंत तुमच्याकडे या प्रकरणी लेखी तक्रार येत नाही तोपर्यंत तुम्ही घाबरण्याचं काहीही कारण नाही. स्वतः या जमदाडेंनी किंवा त्यांच्या मित्राने वा कुणा परिचितानेच त्यांच्या एटीएम कार्डचा वापर करून पैसे काढले आहेत, हे तर उघडच आहे. आणि एटीएम कार्ड जपून ठेवणे तसंच त्याचा पिन कुणालाही कळू न देणं ही खातेदाराचीच जबाबदारी असते. तेंव्हा जमदाडेंच्या या निष्काळजीपणा बद्दल बँकेला दोषी ठरवता येणार नाही.

तसंच एटीएम रूम मधील Surveillance Camera (CCTV) हा तर प्रामुख्याने एटीएम रूम मधील “कार्ड स्किमिंग” (फसवणुकीसाठी उपकरण लावून एटीएम कार्डचा डेटा चोरणे, ज्याचा उपयोग करून बनावट एटीएम कार्ड तयार करता येते.) सारखी गुन्हेगारी कृत्ये व तत्सम फ्रॉड्स रोखण्यासाठी पोलिस यंत्रणेला आवश्यक ते पुरावे (Evidences) उपलब्ध करून देण्यासाठी सहाय्यक असतो. दहा हजार रुपयांसारख्या छोट्या रकमेसाठी कुणी जमदाडेंचा कार्ड डेटा चोरून बनावट एटीएम कार्ड तयार करेल याची तर अजिबातच शक्यता नाही. तेंव्हा तुम्ही निर्धास्त रहा आणि या प्रकरणी लेखी तक्रार आलीच तर आम्हाला ती तक्रार लगेच फॉरवर्ड करा. तिला उचित उत्तर देण्यासंबंधी आम्ही जरूर योग्य ते मार्गदर्शन करू.”

रिजनल मॅनेजर साहेबांच्या या आश्वासक शब्दांनी मला धीर आला आणि समाधानाने मी फोन खाली ठेवला.

अशाप्रकारे एटीएम नाट्याचा पहिला अंक तर संपला होता. आता उद्या सुरू होणाऱ्या नाटकाच्या दुसऱ्या अंकात “पुढे काय होणार ?” याचीच उत्सुकता लागून राहिली होती..

                          ( क्रमश: 2..)

                      🙏🏻🌹🙏🏻

ajay kotnis photo1

श्री अजय कोटणीस हे बँकेतील माझे सहकारी असून, स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३८  वर्षांचा प्रदीर्घ अनुभव  असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानकावर खिळवून ठेवतात.  

त्यांना वैजापूर या गावी असतांना आलेला एक अनुभव हा बँकर्स ला किती निरनिराळ्या आणि विचित्र अनुभवांना सामोरे जावे लागते याचे चित्तथरारक वर्णन आहे. 

उतनूरचे दिवस-5A-Memories-at-Utnoor-By Ajay Kotnis

memories at utnoor featured image

Memories-at-Utnoor

लेखक 

श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद 

(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)

*उतनूरचे दिवस..*

*थरार… (५-अ)*

तरुण वयात प्रत्येकालाच साम्यवादाचं आकर्षण असतं. तसं ते एके काळी मला ही होतं. ज्या समाजात श्रीमंत गरीब असा वर्ग कलह नाही, निर्बल बलवान असा शक्ती संघर्ष नाही, उच्च नीच असा पंक्तीभेद नाही अशा समाजात राहणं कुणाला आवडणार नाही ? अशा कल्पनारम्य, आदर्श जगाची मोहिनी बहुतांश विद्वान, विचारवंत, प्रोफेसर, वैज्ञानिक, साहित्यिक, कवी व कलावंतांना तर कायमच पडत आलेली आहे.

विद्यार्थीदशेत असताना कार्ल मार्क्स, फ्रेडरिक एंगेल्स यांच्या विचारांच्या काही लहानशा पुस्तिका वाचल्या होत्या. पुढे कुतूहलवश “द कम्युनिस्ट मॅनिफेस्टो” आणि “दास कॅपिटल” हे ग्रंथही लायब्ररीतून मिळवून वाचून काढले. त्या कोवळ्या, अपरिपक्व वयात त्यातील विचार फारसे समजले नाहीत आणि त्यामुळे पुढे कम्युनिस्ट साहित्यापासून तसा दूरच राहिलो.

पुढे जॉर्ज ऑर्वेल ची “ऍनिमल फार्म”, “1984” ही पुस्तकं वाचली, स्टॅलिन व माओ यांनी केलेल्या आपल्याच देशवासीयांच्या प्रचंड नरसंहाराची वर्णनं वाचली आणि कम्युनिझम म्हणजे सुद्धा एकप्रकारची निर्दयी हुकूमशाहीच आहे असा माझा पक्का समज झाला. मात्र तरी देखील अमेरिका, ब्रिटन व अन्य पाश्चात्य, युरोपीय देश कम्युनिझमला एवढा विरोध का करतात याचं नेमकं आणि पटेल असं संयुक्तिक कारण मला ज्ञात नव्हतं.

नोकरीच्या निमित्ताने मी सध्या नक्षली मुलुखात होतो. मार्क्स, लेनिन आणि माओ यांच्या विचारांनी प्रेरित असलेला नक्षलवाद हाही एकप्रकारे टोकाचा (extreme) साम्यवादच. मात्र मिलिटरी सारखा नक्षली गणवेश घालून पोलिसांपासून जीव वाचवित जंगलात वणवण हिंडणाऱ्या ह्या भागातील गरीब, निरक्षर, आदिवासी नक्षली तरुणांना लेनिन, मार्क्स, एंगेल्स ची खरीखुरी साम्यवादी विचारसरणी माहित तरी असेल का ? असा प्रश्न मला नेहमीच पडत असे.

तसं पाहिलं तर आतापर्यंत एक दोन सशस्त्र नक्षलवाद्यांना ओझरतं पाहिलं असलं तरी कुणाही नक्षलवाद्याशी अद्याप माझा प्रत्यक्ष आमना सामना झाला नव्हता. मात्र, दुर्दैवाने लवकरच तशी वेळ येणार होती.

उतनूर पासून बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या वडगलपूर बुजुर्ग या गावात आमच्या शाखेचा जुना पीक कर्जाचा फायनान्स होता. पूर्वी हे गाव अत्यंत घनदाट जंगलात वसलेलं होतं. पुढे काही कारणास्तव वन विभागाने हा परिसर अधिग्रहित करून आपल्या ताब्यात घेतला आणि वडगलपुर गावाचं सहा किलोमीटर दूर असलेल्या गुंडाळा या गावाजवळ पुनर्वसन केलं. आज, याच गुंडाळा गावाला जाऊन तेथील पूर्वाश्रमीच्या वडगलपुर वासीयांना भेटून थकीत पीक कर्ज खाती नियमित करण्याचा माझा विचार होता.

दुपारी बारापर्यंत शाखेतील महत्वाची कामे आटोपून प्युन रमेश सोबत निघायचं ठरवलं होतं. परंतु बँकेतून निघे निघेपर्यंत दोन वाजून गेले होते. शाळेला दिवाळीच्या सुट्या लागल्यामुळे लहानग्या अनिशला घेऊन बायको पंधरा दिवसांसाठी अकोल्याला गेली होती. त्यामुळे घरी निरोप ठेवण्याचा प्रश्नच नव्हता. बस स्टँड जवळील चिन्नय्याच्या मेस मध्ये जेवून तीन वाजता मी व रमेश गुंडाळा गावाकडे निघालो.

जंगलातील कच्च्या पायवाटेने गुंडाळा गाव तसं फक्त सतरा अठरा किलोमीटर अंतरावरच होतं. बँकेतून निघायला उशीर झाल्याने आज गुंडाळा गावाला फक्त धावती भेट देऊन लगेच पाच वाजण्याच्या आत उतनूरला परतायचं असं आधीच ठरवलं होतं. आम्ही जेमतेम दोन तीन किलोमीटर अंतरावर आलो असतानाच अचानक रमेशचं पोट खूप दुखू लागलं. त्याला मोहाची दारू पिण्याचा खूप नाद होता. जास्त दारू पिल्यावर त्याचं पोट असं नेहमीच दुखायचं.

रमेशचं पोट दुखणं थांबायची वाट पहात आम्ही एका झाडाखाली उभे राहिलो. परंतु रमेशचं दुखणं थांबण्या ऐवजी आणखीनच वाढलं. शेवटी तो म्हणाला..

“ताबडतोब घरी जाऊन औषध घेऊन पडून राहिलो तरच मला आराम पडेल. मी आता परत उतनूरला जातो. गुंडाळा गावाकडे पायी जाणारा एखादा वाटसरू तुम्हाला पाहून देतो. तो तुम्हाला नीट वाट दाखवील. तसा, गुंडाळ्याचा रस्ता अगदी सरळ आहे. जातांनी रस्ता नीट पाहून ठेवा आणि येतांनी गेले तसेच परत या..”

रमेशचं म्हणणं मला पटलं. तसाही मी आजकाल बऱ्याच गावांत एकट्यानेच जात होतो. तेलगू भाषाही आता मला बरीचशी समजू लागली होती आणि मोडकी तोडकी बोलताही येत होती. याशिवाय बरेचसे आदिवासी बोली भाषेतील रोजच्या वापरातील शब्द ही माझ्या ओळखीचे झाले होते. त्यातून आज उतनूरला बँकेत काही विशेष काम नसल्याने रमेशच्या बोलण्यावर मी संमतीदर्शक मान डोलावली.

सुदैवाने त्याचवेळी समोरून पायी येणारा बिरसय्या हा गुंडाळा गावचा रहिवासी रमेशच्या चांगल्याच परिचयाचा निघाला. मला गुंडाळा गावात नेण्याबद्दल त्याला सांगून, एका फॉरेस्ट गार्डच्या दुचाकीवर बसून रमेश उतनूरला निघून गेला.

रमेशनं सांगितल्या प्रमाणेच गुंडाळा गावाकडे जाणारा रस्ता अगदी सरळ सरळ होता. रस्ता अगदी निर्मनुष्य होता. आजूबाजूला रमणीय वनश्री आणि छोटे छोटे सुंदर तलाव होते. झाडांवर व तलावाच्या आसपास बसलेल्या चित्रविचित्र रानपक्ष्यांचा सुरेल किलबिलाट कानी पडत होता. त्या अनोख्या पक्ष्यांना एकदा तरी निरखून पाहण्याचा अनावर मोह होत होता. पण समोरची पायवाट एवढी अरुंद होती की कसाबसा मोटारसायकलचा तोल सांभाळण्याकडेच सारं लक्ष द्यावं लागतं होतं.

वीस पंचवीस मिनिटांतच आम्ही गुंडाळा गावात पोहोचलो. संपूर्ण प्रवासात बिरसय्या माझ्याशी एक शब्दही बोलला नाही. ग्रामपंचायत ऑफिस समोरील वडाच्या झाडाजवळ उतरून काही न बोलता तो आपल्या घराकडे निघून गेला.

memories at utnoor 5a

ग्रामपंचायत ऑफिसला कुलूप होतं. तिथल्या लाकडी बाकावर काही रिकामटेकडी माणसं विडी फुंकत बसली होती. मी कोणीतरी सरकारी अधिकारी आहे असाच त्यांचा समज झाला असावा. त्यामुळे लगबगीने हातातील विड्या तशाच बाजूला फेकून देत ते जागीच नम्रपणे उभे राहिले.

त्यांच्या जवळ जाऊन, मी उतनूरच्या स्टेट बँकेतून आल्याचं सांगून वडगलपूर गावातील पुनर्वसित गावकऱ्यांबद्दल त्यांच्याकडे चौकशी केली. त्यावर त्यांच्यापैकी एक जण म्हणाला..

“वडगलपूरच्या लोकांना गुंडाळा गावामागे अर्ध्या किलोमीटर दूर असलेल्या जंगलाच्या मध्यभागातील मोकळ्या जागेत वसवण्यात आले आहे. तिकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम सुरू असल्याने सध्यातरी तुम्हाला मोटारसायकल घेऊन त्या रस्त्याने जाता येणार नाही. मात्र या उजव्या बाजूच्या पायवाटेने एक किलोमीटरचा वळसा घालून गेल्यास सहज गावापर्यंत मोटारसायकल नेता येईल.”

त्या गावकऱ्यांचे आभार मानून उजव्या बाजूच्या पायवाटेने नवीन वडगलपूर कडे निघालो.

अंदाजे दोन तीन किलोमीटर अंतर कापलं तरी कोणत्याही गावाचा मागमूस दिसेना आणि जंगल तर अधिकाधिक दाट होत चाललं होतं. आपण रस्ता चुकलो तर नाही ? ही शंका मनात येताच माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. मात्र, इथपर्यंत आलोच आहोत तर आणखी एक दोन किलोमीटर पुढे जाऊन पाहावे आणि तरी देखील वडगलपूर गाव दिसलं नाही तर सरळ माघारी फिरावं असा विचार करून नेटानं मोटारसायकल दामटीत राहिलो.

त्या एकाकी, सुनसान रस्त्यानं जाताना आपण खूप खोल जंगलात शिरत असल्याचा भास होत होता. सर्वत्र भयाण शांतता पसरली होती. बहुदा सूर्य मावळू लागल्याने पक्षी आपापल्या घरट्यात परतून चिडीचूप बसले होते. मधूनच दूरवरून हिंस्त्र जंगली प्राण्याचा भीतीदायक चित्कार ऐकू येई. नकळत एक अनामिक भय दाटून आलं आणि अचानक मी मोटारसायकल माघारी फिरवली. आता गुंडाळा गावातही न थांबता सरळ उतनूर गाठायचं असं ठरवलं.

संध्याकाळ होत आली होती. मनगटा वरच्या घड्याळात पाहिलं तर सव्वा पाच वाजले होते. चला..! म्हणजे फारसा उशीर झालेला नाही. आणखी अर्ध्या पाऊण तासात आपण सहज घरी पोहोचू शकतो, या विचारानं मला धीर आला. मात्र यापुढे रमेशला सोबत घेतल्याशिवाय कोणत्याही अनोळखी रस्त्याने कधीही जायचं नाही म्हणजे नाही, असा मनोमन घोकून घोकून ठाम निश्चय केला.

विचारांच्या नादात किती वेळ झाला, आपण मोटारसायकल चालवीतच आहोत याकडे माझं लक्षच गेलं नाही. अर्धा पाऊण तास झाला तरी अजून गुंडाळा गाव देखील आलं नव्हतं. समोरील रस्ता सुद्धा एकदम अनोळखी वाटत होता. वाहत्या पाण्याचा खळखळाट अगदी जवळून ऐकू येत होता. नक्कीच आजूबाजूला एखादी नदी किंवा ओढा असावा. मी पुन्हा हातातील घड्याळाकडे पाहिलं. सहा वाजून गेले होते. आता मात्र आपण रस्ता चुकल्याची माझी पुरेपूर खात्री झाली.

थोडं पुढे गेल्यावर वाटेत मधोमध एक मोठं झाड आडवं पडलं होतं. त्यामुळे रस्ता बंद झाला होता. ते झाड एवढं मोठं होतं की आठ दहा माणसांच्या मदतीशिवाय ते जागेवरून हलवणं शक्यच नव्हतं. वादळ वाऱ्यामुळे ते झाड उन्मळून पडल्याची देखील अजिबात शक्यता दिसत नव्हती. करण आसपास तशा कोणत्याही खुणा नव्हत्या. नक्कीच कुणीतरी रस्ता अडवण्यासाठी हे झाड इथे आणून टाकलं असावं.

पुढे जाण्यास रस्ताच नसल्याने माझी गती आणि मती दोन्ही ही कुंठित झाली आणि दिग्मूढ़ होऊन मी त्या आडव्या पडलेल्या विशाल वृक्षाकडे एकटक पहातच राहिलो. मी भानावर आलो तेंव्हा हातात कुऱ्हाडी व कोयता असलेल्या चार बलदंड आदिवासी तरुणांनी माझ्याभोवती गराडा घातला होता. माझ्याशी एक शब्दही न बोलता त्यांनी माझे दोन्ही हात पाठीमागे नेऊन लवचिक जंगली वेलींनी करकचून बांधून टाकले. त्यानंतर बाजूच्या झाडीत घुसून जंगलातील झाडे झुडुपे व दगड गोटे यातून मार्ग काढीत ते मला कुठेतरी घेऊन चालले होते.

memories at utnoor5a

अकस्मात झालेल्या या घटनेने मी भांबावून गेलो होतो. भीतीने माझ्या तोंडून शब्दही बाहेर पडत नव्हता. त्या आदिवासींचे मख्ख, गंभीर चेहरे आणि त्यांच्या हातातील कुऱ्हाडी व कोयते पाहून मी पुरता गर्भगळीत झालो होतो. निःशब्द पणे चालत आम्ही आता डोंगराच्या उतारा वरून खाली दरीत उतरत होतो. लवकरच दुरून डफ, ढोलकीचे व माणसांच्या ओरडण्या किंचाळण्याचे आवाज ऐकू येऊ लागले. लगेच त्या आदिवासीं पैकी एकाने आपल्या डोक्यावरील मुंडासं काढून ते माझ्या डोळ्यांभोवती बांधलं.

थोड्याच वेळात आम्ही नक्षल्यांच्या तळावर पोहोचलो, तेंव्हा आम्हाला पाहतांच तेथील वाद्यांचे व किंचाळून बोलण्याचे आवाज एकदम थांबले. आदिवासी गोंड भाषेत तिथल्या कमांडरने ओरडून कसली तरी आज्ञा दिल्यावर माझ्या डोळ्यांवरील फडकं काढण्यात आलं. समोर तीन चार खाटांवर हिरव्या गणवेशातील आठ दहा सशस्त्र नक्षली कमांडर बसले होते. त्यांच्यापैकी एका जाडजूड मिशीवाल्या गलेलठ्ठ माणसाने करड्या आवाजात तेलगू भाषेत मला विचारलं..

“तू कोण आहेस आणि इथे जंगलात कशाला आलास..?”

मी थोडक्यात माझी कर्मकहाणी त्यांना सांगितली. अर्थात त्यांचा माझ्या कहाणीवर काडीचाही विश्वास नव्हता. त्यांनी माझी कसून झडती घेतली. पेन, पाकीट, रुमाल आणि वडगलपुरच्या कर्जदारांची यादी एवढंच साहित्य त्यांना या झडतीतून मिळालं. माझी कर्मकथा त्यांना आता थोडी फार पटू लागल्याचं त्यांच्या चेहऱ्यावरील हावभावांवरून वाटत होतं.

मला जिथे उभं करण्यात आलं होतं तिथून सुमारे शंभर फूट अंतरावर असलेल्या नदीच्या काठावर काही खुर्च्या आणि टेबलं मांडण्यात आली होती. काही पॅन्ट शर्ट घातलेल्या व्यक्ती तिथे बसलेल्या दिसत होत्या. अधून मधून माना वळवून त्या व्यक्ती माझ्याकडे पहात होत्या. माझी चौकशी पूर्ण झाल्यावर तो गलेलठ्ठ कमांडर त्या खुर्च्यांवर बसलेल्या व्यक्तींकडे गेला आणि त्याने त्यांना काहीतरी सांगितलं. त्यानंतर तो कमांडर माझ्याजवळ आला आणि त्याने माझे मागे बांधलेले हात सोडले. त्यानंतर त्याने मला त्या पॅन्ट शर्ट घालून खुर्च्यांवर बसलेल्या शहरी बाबूंच्या पुढ्यात नेऊन उभं केलं.

मी त्यांना नीट निरखून पाहिलं. ते एकूण सहा जण होते. चार पुरुष आणि दोन स्त्रिया. स्त्रियांनी लांब बाह्यांची पोलकी आणि पांढऱ्या रंगाच्या साध्या सुती साड्या घातल्या होत्या तर चारही पुरुषांचा पोशाख, टेरिकॉटची काळ्या रंगाची पॅन्ट व पांढऱ्या रंगाचा जाड्याभरड्या खादीचा हाफ बाह्यांचा शर्ट, असा होता. ते सहाही जण बुद्धिजीवी, अभ्यासू आणि उच्चभ्रू शहरी वाटत होते. एक किरकोळ देहयष्टीचा आणि तरतरीत चेहऱ्याचा चष्मेवाला त्या सहा जणांचा नेता असावा. माझ्याकडे आपादमस्तक पहात तो हिंदीत म्हणाला..

“अच्छा, म्हणजे तुम्ही बँक अधिकारी आहात आणि केवळ वाट चुकल्यामुळेच इतक्या खोल जंगलात आला आहात तर..!”

केविलवाण्या चेहऱ्यानं मी होकारार्थी मान हलवली.

आपला चष्मा काढून त्याची काच शर्टाच्या कोपऱ्याने पुसत तो शहरी नेता म्हणाला..

“योगायोगाने म्हणा किंवा अपघाताने.. पण सध्या तुम्ही कुठे येऊन पोहोचला आहात याची तुम्हाला कल्पना असेलच..?”

“माफ करा, पण मी स्वतः हुन इथे आलेलो नाही तर मला हात बांधून व डोळे झाकून जंगल तुडवीत येथे आणण्यात आलं आहे. मी तर माझ्या रस्त्याने सरळ पुढे चाललो होतो. झाड पडल्यामुळे रस्ता बंद झाल्यानेच नाईलाजाने मला त्या जागी थांबावं लागलं.. “

प्रथमच निर्भय होऊन ताठ मानेने मी प्रत्युत्तर दिलं.

माझ्याकडून अशा बाणेदार प्रत्युत्तराची त्या नेत्याने अपेक्षाच केली नसावी. क्रोधाने त्याच्या भुवया उंचावल्या. करड्या आवाजात तो म्हणाला..

“तुम्ही ज्या रस्त्याने पुढे चालला होतात तोही रस्ता शेवटी इथेच येतो. सामान्य जनतेसाठी हा भाग निषिद्ध आहे. पोलिसही इथे एकट्यानं येण्याचं साहस करीत नाहीत.”

“पण.. मी या भागात नवीन आहे. गुंडाळा गावातून वडगलपुरला जाताना माझा रस्ता चुकला असावा.. तुमच्या कमांडरला मी हे पूर्वीच सांगितलं आहे.”

मी नम्रपणे स्पष्टीकरण दिलं.

“हो.. पण आम्हाला तुमच्या बोलण्यावर असा एकदम विश्वास ठेवता येणार नाही.”

असं बोलून आपल्या सहकाऱ्यांकडे हात करून तो म्हणाला..

“आमच्या पार्टीचा हा जो गट (faction) आहे त्याचे काही वरिष्ठ पॉलिट ब्युरो सदस्य आज इथे हजर आहेत. ते तुम्हाला काही प्रश्न विचारतील. कोणतीही लपवाछपवी न करता त्या प्रश्नांची खरीखुरी उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत. तुमचं काय करायचं ? याचा निर्णय त्यानंतरच सर्व जण मिळून घेतील.”

माझ्यापुढे अन्य कोणताही पर्याय नसल्याने एखाद्या गुन्हेगारा सारखा खाली मान घालून समोरून येणाऱ्या प्रश्नांना तोंड देण्यास मी सिद्ध झालो. माझी उलट तपासणी सुरू झाली.

सुरवातीला माझं नाव, माझं मूळ गाव, शिक्षण, बँकेतील सहकाऱ्यांची नावे, पत्नी व मुलांबद्दल माहिती अशी प्राथमिक जुजबी चौकशी त्यांनी केली. मी सांगितलेली सर्व माहिती त्यांच्यापैकी एकाने आपल्या वहीत लिहून घेतली. त्यानंतर चीफ कमांडरला बोलावून त्याच्या हातात ती वही देऊन सांकेतिक भाषेत त्याने काहीतरी सांगितलं. कमांडर ती वही घेऊन निघून गेल्यानंतर हिटलर सारखी तोकडी मिशी असलेल्या एका अन्य पॉलिट ब्युरो सदस्याने चौकशीची सूत्रं आपल्या हातात घेतली.

थेट मुद्द्यालाच हात घालत त्यानं विचारलं..

“कम्युनिस्ट विचारसरणी बद्दल तुमचं काय मत आहे ?”

अत्यंत अक्कल हुशारीने विचारलेला तो प्रश्न खूप अवघड आणि tricky होता. मी साम्यवादी आणि पर्यायानं नक्षलवादी विचारसरणीचं समर्थन करावं अशीच प्रश्नकर्त्याची अपेक्षा असावी. जर मी नक्षली हिंसाचाराचा निषेध केला असता, व्यक्तिगत स्वातंत्र्य हिरावून घेणाऱ्या साम्यवादी विचारांच्या विरोधात माझं खरंखुरं मत प्रदर्शित केलं असतं तर कदाचित मला विचारलेला पहिला प्रश्न हाच माझा अखेरचा प्रश्न ठरला असता.

अर्थात साम्यवादी आणि नक्षलवादी विचारांचं समर्थन करण्यासाठी त्यांची तत्वप्रणाली व त्या चळवळीचा समग्र इतिहास माहीत असणं आवश्यक होतं. आणि त्यादृष्टीने माझं वाचन, माझा अभ्यास तर खूपच तोकडा होता.

शेवटी, पुरेसा अभ्यास न झालेल्या विषयाच्या परीक्षेत ज्याप्रमाणे आपण गोल गोल व तीच तीच उत्तरं देऊन कशीबशी वेळ मारून नेतो, तीच पद्धत इथेही अवलंबवावी असं मी ठरवलं.

(क्रमशः ५-ब)

 

ajay kotnis photo1

श्री अजय कोटणीस हे स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३७ पेक्षा जास्त  वर्षांचा प्रदीर्घ अनुभव  असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्याआधी त्यांनी मराठवाडा ग्रामीण बँकेतही  सेवा केली.  त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानकावर खिळवून ठेवतात.  

त्यांच्या सेवाकाळात त्यांनी आंध्र प्रदेश मधील (आताचे तेलंगणा) आदिलाबाद या नक्सलग्रस्त जिल्ह्यातील, उतनूर या दुर्गम गावी पोस्टिंग असतांना त्यांना आलेल्या अनुभवावर  आधारित, नवीन लेखमाला- “उतनूरचे दिवस” ही सुरू केली आहे. सदर लेख त्यांच्या फेसबुक पेज वरून त्यांच्या परवानगीने साभार घेऊन, त्यात कथेस अनुरूप अशी चित्रें आणि व्हिडिओ टाकून, सदरील लेखमाला या ब्लॉगच्या वाचकांसाठी प्रस्तुत करीत आहोत.