लेखक
श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद
(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)
ही लेखमाला श्री कोटणीस यांच्या फेसबुक पेज वर नुकतीच त्यांनी प्रसिद्ध केली आहे आणि तिला वाचकांचा भरभरून प्रतिसाद नेहमीप्रमाणे मिळतो आहे. इथे ही लेखमाला या ब्लॉगच्या वाचकांसाठी, श्री कोटणीस यांच्या परवानगीने प्रसिद्ध करीत आहोत.
*बॅंकस्य कथा रम्या..*
*स्थितप्रज्ञ आणि उलटलेला डाव*
(भाग : 7)
मोठ मोठे आकर्षक डोळे, कमनीय बांधा,…रश्मीच्या अंगोपांगात, गात्रागात्रात, समग्र व्यक्तिमत्वातच रसरशीत, दाहक मादकपणा अगदी ठासून भरला होता..
खरं म्हणजे आम्ही सगळे कोर्टाकडून लवकरात लवकर अटकपूर्व जामीन मिळविण्याच्या टेन्शन खाली होतो आणि आमच्या मनात सतत त्याबद्दलचेच विचार घोंगावत होते. पण तरी देखील रश्मीचं रेशमी सौंदर्य आम्हाला तात्पुरतं, क्षणभरासाठी का होईना, आमची विवंचना विसरण्यास भाग पाडीत होतं.
सिनेमात आणि कथा कादंबऱ्यांत वर्णन असतं अगदी तश्शीच रश्मी आपल्या बॉसला अगदी खेटूनच बसायची.. त्यांच्याकडून डिक्टेशन घेतांना त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बघायची, पापण्यांची जादुई, मोहक उघडझाप करायची.. कधी आपल्या भडक लाल, जांभळ्या रंगाची लिपस्टिक लावलेल्या ओठांचा आकर्षक चंबू करायची तर कधी खोटी, नाटकी जवळीक व काळजी दाखविण्यासाठी बॉसच्या शर्टावरील काल्पनिक कचरा आपल्या रुमालाने टिपायची..
डिक्टेशन देताना योग्य वाक्य किंवा समर्पक मुद्दा न सुचल्यामुळे वकील साहेब जेंव्हा काही क्षण थांबून विचारात मग्न होत तेंव्हा रश्मी लगबगीने आपल्या ड्रॉवर मधून सिगारेट काढून ती हलकेच बॉसच्या ओठांत खोचायची..आणि मग पर्स मधून लायटर काढून बॉसच्या पुढ्यात झुकून जेंव्हा ती सिगारेट पेटवायची तेंव्हा वकील साहेबांची कामुक नजर तिच्या छातीचा धांडोळा घेत असायची..
रश्मीचे लाडिक चाळे, बॉसशी सहेतुक लगट आणि तिच्याकडे पाहतानाची जोगळेकर साहेबांची ती सतत वखवखलेली, बुभुक्षित नजर.. की जी पाहून आम्हालाही शरमल्या सारखं होत होतं, हे सारं काय मिसेस जोगळेकरांना दिसत, कळत नसेल ? की, तिला वकील साहेबांपासून दूर ठेवण्यासाठी म्हणून मुद्दामच त्या तिला सारखं सारखं किचनमध्ये बोलावून घेत होत्या ?
आमच्या बरोबर आलेली बेबी सुमित्रा सुद्धा प्रथमदर्शनी जरी रश्मीच्या भुरळ पाडणाऱ्या लोभस, अलौकिक लावण्याने आणि तिच्या विलक्षण उत्तेजक, आक्रमक, आव्हानात्मक व्यक्तिमत्वाने भारावून गेली असली तरी वकील साहेबांचं एखाद्या कामातुर, लंपट, उल्लू आशिक सारखं वागणं पाहून तिलाही खूप ऑकवर्ड, अवघडल्यासारखं होत होतं. बहुदा त्यामुळेच त्यानंतर बेबी पुन्हा कधीही वकील साहेबांच्या ऑफिसमध्ये आली नाही.. असो !
पुराणिक वकिलांनी आमच्या केस संबंधी काढलेले प्रमुख महत्वाचे मुद्दे जोगळेकरांनी भराभर वाचून काढले आणि मग गंभीर चेहरा करून आमच्याकडे पहात म्हणाले..
“गंभीर गुन्ह्याची एकूण सहा कलमं पोलिसांनी FIR मध्ये तुमच्या विरुद्ध लावली आहेत. त्यापैकी कलम 467 व 468 ही आर्थिक फसवणूकीच्या उद्देशाने बनावट कागद पत्रे तयार करणे यासाठी आहेत तर अशी बनावट कागदपत्रे वापरून तोतयेगिरीने आर्थिक फसवणूक करणे यासाठी कलम 471 व 474 आहेत. कलम 420 हे गंभीर फसवणुकीचे कृत्य करणे यासाठी तर समान हेतूने अनेक जणांनी मिळून गुन्हेगारी कृत्य करणे यासाठी कलम 34 आहे.”
एवढं बोलून किंचित थांबून ते म्हणाले..
“दुर्दैवाने कलम 471 व 474 वगळता अन्य चारही कलमं ही अजामीनपात्र (non bailable) आहेत. म्हणजेच You have no automatic right to obtain bail..! अर्थात प्रभावी युक्तिवाद करून, भक्कम कारणे देऊन, ही कलमं लावणे अयोग्य असल्याबद्दल कोर्टाला पटवून दिलं तर आणि आरोपी पळून जाणार नाहीत, पुरावे नष्ट करणार नाहीत, कारवाईस हजर राहतील व पोलिसांना सहकार्य करतील याबद्दल न्यायालयाला खात्री वाटली तरच ते सशर्त जामीन मंजूर करू शकतात.”
वकील साहेबांनी केस समजावून सांगायला अशी नुकतीच सुरवात केलीच होती तोंच ऑफिसच्या बाजूलाच असलेल्या किचन मधून मिसेस जोगळेकरांनी रश्मीला हाक मारली, त्यामुळे ती उठून चट्क चट्क असा सँडल्सचा आवाज करीत किचनच्या दिशेने निघाली. तेवढ्याने वकील साहेबांचीही लिंक मधेच तुटली. कमरेची लयबद्ध हालचाल करीत, नितंबांना मंद हेलकावे देत जाणाऱ्या पाठमोऱ्या रश्मीकडे आशाळभूत, भुकेल्या, कामासक्त नजरेने पाहण्याच्या नादात, त्यांच्या पुढे आम्ही पक्षकार बसलो आहोत याचंही वकिलसाहेबांना भान राहिलं नाही.
या मधल्या काळात सहज जोगळेकर वकिलांच्या ऑफिसचं निरीक्षण केलं. ऑफिसच्या भिंतींवर जागोजागी तोकड्या वस्त्रांतील सुंदरींच्या चित्रांसाठी प्रसिद्ध असलेली महागडी कॅलेंडर्स लावली होती. टेबलाच्या कडेला व्हीनसची half bust देखणी, अनावृत्त मूर्ती ठेवली होती. धबधब्याखाली आंघोळ करणाऱ्या “ओलेती” चं 6″x2″ अशा फुल साईझचं रमणीय पोर्ट्रेट हॉलच्या मुख्य भिंतीवर होतं तर पुस्तकांच्या काचेच्या शो-केस मध्ये खजुराहोतील कामशिल्पांच्या लहान लहान प्रतिकृतीही ठेवलेल्या होत्या. वकील साहेब सौंदर्य पिपासू, रसिक व रंगेल स्वभावाचे दिसतात.. मी मनातल्या मनात म्हणालो..
कोपऱ्यातील काचेच्या कपाटात उंची मद्याच्या बाटल्या ठेवलेल्या होत्या. हा जोगळेकर साहेबांचा खाजगी मिनी बार असावा.
…रात्री ऑफिस संपल्यावर अपुऱ्या चमचमत्या वस्त्रांतील रश्मी, पद्मा खन्ना प्रमाणे “हुस्न के लाखों रंग..” म्हणत थिरकत थिरकत वकील साहेबांना मद्याचा पेग बनवून देते आहे आणि ते ही प्रेमनाथ सारखे कामांध होऊन झोकांड्या खात तिच्यावर झडप घालून तिला पकडण्याचा अयशस्वी प्रयत्न करीत आहेत असं विनोदी दृश्यही क्षणभर नजरे समोर तरळून गेलं..
रश्मी किचन मधून परत येईपर्यंत वकील साहेबांचं चित्त काही थाऱ्यावर नव्हतं.. ती आल्यावरच त्यांनी पुढे बोलायला सुरुवात केली..
“आता मुद्द्याचं बोलू.. मी तुम्हा सर्वांना खात्रीनं अँटीसिपेटरी बेल मिळवून देईन.. मात्र त्यासाठी थोडे जास्त पैसे द्यावे लागतील. काही जणांना सहज बेल मिळेल. उदाहरणार्थ, हे मॅनेजर साहेब ! यांचा घटनेशी दुरान्वयानेही काहीही संबंध किंवा सहभाग नाही. तसंच शेख रहीम यांनी फक्त चेक घेऊन टोकन दिलं, एवढाच यांचा घटनेतील सहभाग. त्याचप्रमाणे कॅशियर सैनी यांनीही रीतसर पास झालेल्या चेकचं नियमानुसारच टोकन घेऊन पेमेंट केलं आहे. थोड्याशा युक्तीवादानं टप्प्याटप्प्याने या तिघांनाही बेल मिळेल. बेबी सुमित्रा आणि रविशंकर यांच्यासाठी मात्र थोडी जास्त मेहनत घ्यावी लागेल. सरकारी वकील.. प्रसंगी जज साहेबांनाही “मॅनेज” करावं लागेल. पण, …होईल ! प्रत्येकी चाळीस हजार रुपये माझी फी आहे. अर्थात, तुम्हाला बेल मंजूर झाल्यानंतरच ती द्या. आता उद्या सकाळी सेशन कोर्टातच भेटू..”
चाळीस हजार ही तशी खूपच जास्त रक्कम होती, पण ती देण्यावाचून अन्य उपायही नव्हता. जोगळेकर वकिलांच्या ऑफिसातून पायी चालतच निघालो तेंव्हा रात्रीचे अकरा वाजले होते. व्हीआयपी गेस्ट रूमच्या बिल्डिंग जवळ पोहोचलो तेंव्हा तेथील भिंतीच्या आडोशाला अंधारात साध्या वेशातील एक व्यक्ती मोटार सायकल वर बसून जणू आमचीच वाट पहात होती.
“अहो साहेब, नमस्कार ! सहज इकडून चाललो होतो, म्हटलं बँकवाल्या साहेबांना “गुड नाईट” करून जावं..”
सब इंस्पे. हिवाळेंचा तो चिरपरिचित आवाज ऐकताच अंगावर भीतीची एक थंडगार शिरशिरी उमटून गेली..
“अरे..! इन्स्पेक्टर साहेब ? तुम्ही..? यावेळी..? आणि इथे..?”
घशाशी आलेला आवंढा गिळत उसनं अवसान आणीत मी म्हणालो.
आमच्या विरुद्ध गंभीर FIR दाखल झालेला होता, आम्ही भूमिगत, फरार होतो आणि आम्हाला अद्याप बेल ही मिळालेला नव्हता. अटकेची टांगती तलवार आमच्या डोक्यावर अजूनही लटकत होतीच. त्यातच आम्हाला घाबरवून गर्भगळीत करण्यासाठी हा सब इंस्पे. हिवाळे वेळीअवेळी, सतत एखाद्या दैत्यासारखा अचानक आमच्या पुढे येऊन उभा रहात होता.
“आम्ही कुणालाही, कधीही आणि कुठेही भेटू शकतो.. मात्र, मी तुमचा मित्र आहे, हितचिंतक आहे हे लक्षात असू द्या..! येतो मी, गुड नाईट !!”
..असा आपला नेहमीचा ठरलेला डायलॉग मारून गाडीला किक मारून हिवाळे साहेब निघून गेले. अरे ! हा माणूस आहे की भूत आहे ? याला लगेच कसा कळतो आमचा ठावठिकाणा ? की आपल्याच पैकी कुणीतरी फितूर त्यांचा खबऱ्या आहे ? जाऊ दे ! आता यावर जास्त विचार करून डोकं शिणवायचं नाही. उद्या बेल मिळणारच आहे, त्यानंतरच ही हिवाळेंच्या भेटीची काय भानगड आहे ते बघू.. असं ठरवून गेस्ट रुम मध्ये प्रवेश केला.
दुसऱ्या दिवशी सकाळी कोर्ट सुरू झाल्यावर तासाभरातच मला बेल मंजूर झाला. त्याची ऑर्डर घेऊन व RM साहेबांना कळवून लगेच दुपारी दोनच्या आत वैजापूरला कामावर रुजूही झालो. फारसं विशेष कुणीही भेटायला न आल्यामुळे तो दिवस तसा शांततेतच गेला. संशयित रुपेश जगधनेही आज बँकेत आला नव्हता. रहीम चाचा आणि सुनील सैनी यांना उद्या बेल मिळणार असल्याचं पुराणिक वकिलांनी संध्याकाळी मला फोन करून कळवलं. रात्री झोपण्यापूर्वी औरंगाबादच्या गेस्ट रूम मधील सहकाऱ्यांशी फोन वर बोलून त्यांना ही बातमी दिली आणि रविशंकर व बेबी सुमित्राला आणखी काही काळ धीर धरण्यास सांगितलं.
दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजताच बँकेत गेलो आणि एकाग्र चित्ताने घटनेच्या दिवसाचं cctv फुटेज पहात बसलो. अचानक कुणीतरी केबिनमध्ये आल्याचं जाणवलं म्हणून मान वळवून पाहिलं तर इंस्पे. माळी व सब इंस्पे. हिवाळे हे दोघे केबिनच्या दारात उभे होते.
“या, साहेब.. !” लगबगीने खुर्चीवरून उठून त्यांचं स्वागत करीत म्हणालो..
माझ्या बोलण्याकडे साफ दुर्लक्ष करीत हिवाळे तडक माझ्या खुर्चीच्या मागे गेले आणि हातातील लाकडी रुळाच्या साहाय्याने भिंतीवरील cctv कॅमेऱ्याची दिशा त्यांनी छताकडे वळवली.
“साहेब, आत या, बसा नं..!”
अजूनही दारातच उभे असलेल्या इंस्पे. माळींना मी विनंती केली.
“आम्ही इथे बसण्यासाठी आलेलो नाही.. !”
अतिशय करड्या स्वरात इंस्पे. माळी कडाडले..
“तुम्हाला जर असं वाटत असेल की कोर्टाकडून अटकपूर्व जामीन मिळवला म्हणजे आपण काही फार मोठा तीर मारला आहे, तर तो तुमचा गैरसमज आहे ! FIR मध्ये आणखी गंभीर स्वरूपाची कलमं नव्याने ॲड करून आम्ही तुम्हाला कधीही.. अगदी आत्ताही अटक करू शकतो. तसंच तुमचा हा अटकपूर्व जामीन काही काळापुरताच मर्यादित आहे. शिवाय पोलिसांच्या प्रतिकूल रिपोर्टवर न्यायालय तो जामीन रद्दही करू शकते. आणि.. तसा रिपोर्ट पाठवणं हे आमच्याच हातात आहे. तेंव्हा, आज संध्याकाळच्या आत हिवाळे साहेब सांगतील तेवढी तडजोडीची रक्कम त्यांच्यापर्यंत पोहोचती करा, म्हणजे तुम्हाला या केस मध्ये आमच्याकडून काहीही त्रास होणार नाही. लक्षात ठेवा, आज जर रक्कम मिळाली नाही तर उद्या तुम्हाला अतिशय अपमानास्पद रित्या अटक केली जाईल ही काळ्या दगडावरची रेघ आहे..!”
एवढं बोलून ताडताड पावले टाकीत ते एकटेच केबिन बाहेर निघून गेले. ते गेल्यावर सब इंस्पे. हिवाळे शांतपणे माझ्या समोरील खुर्चीत बसले आणि म्हणाले..
“ठाणेदार साहेब आत्ता जे काही बोलून गेले, ते तसं निश्चितच करून दाखवतील. त्यामुळे त्यांचं म्हणणं सिरियसली घ्या. तुम्हाला आमची दक्षिणा ही द्यावीच लागेल. आणि ती दक्षिणा आहे, प्रत्येकी तीस हजार ! समोरच्या संजू चहावाल्याकडे संध्याकाळ पर्यंत आठवणीने, न चुकता रक्कम जमा करा.. आणि, मी तुमचा मित्र आहे, हितचिंतक आहे हे ध्यानात असू द्या..”
“हिवाळे साहेब, काय वाट्टेल ते झालं तरी मी तुम्हाला एक पैसा ही देणार नाही.. मग तुम्ही माझे मित्र असाल की शत्रू असाल, हितचिंतक असाल की हितशत्रू असाल.. त्याने मला काहीही फरक पडत नाही..!”
मी बाणेदारपणे माझी भूमिका स्पष्ट केली. आमचं बोलणं सुरू असतानाच संजू चहावाला चहा घेऊन केबिन बाहेर आला होता. त्याच्या कानावर माझे शब्द पडल्या बरोबर तो आत येऊन हिवाळे साहेबांसमोर हात जोडून गयावया करत म्हणाला..
“म्यानीजर सायबांचं बोलणं तुम्ही मनावर घेऊ नका, सायेब..! त्ये लई टेन्शन मंदी हायेत म्हणून आसं बोलतेत.. तुमची दक्षिणा जरूर मिळंल सायेब तुमाला.. बास..!फकस्त एकच ईनंती हाय.. तीस हजार थोडं जास्त हुतात.. ईस हजार ठीक रायतील.. थोडं आडजस्त करा सायेब..”
संजूचे पोलिसांशी जवळीकीचे संबंध होते. शहरातील विविध अवैध धंद्यांचे हप्ते पोलिसांच्या वतीने तोच गोळा करीत असे.
“ठीक आहे ! संजू, फक्त तुझ्याकडे पाहून मी प्रत्येकी वीस हजार मान्य करतो. मात्र ते कुठल्याही परिस्थितीत आज संध्याकाळच्या आत पोहोचते झाले पाहिजेत. अन्यथा काय होईल, हे तुला चांगलंच माहीत आहे..”
एवढं बोलून माझ्याकडे ढुंकूनही न पाहता हिवाळे साहेब केबिन बाहेर निघाले. जागीच उभा राहून मी मोठ्याने ओरडलो..
“थांबा ! संजू काहीही म्हणाला तरी मी तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत एक पैसा ही देणार नाही.. तुम्ही मला खुशाल अटक करू शकता..”
माझं बोलणं ऐकलं न ऐकल्या सारखं करून हिवाळे बँकेबाहेर पडले. संजूही त्यांच्या मागेमागे, त्यांची मनधरणी करीत गेट बाहेर गेला. बहुदा माझ्या रागाच्या भीतीनं संजू मग त्या दिवसभरात एकदाही बँकेत आला नाही. बँकेसमोरील त्याचं हॉटेलही त्यानं त्या दिवशी बंदच ठेवलं.
दुपारी चार वाजता रहीम चाचा व सुनील सैनी हे दोघेही आनंदी चेहऱ्याने बँकेत आले. त्यांना आज दुपारी बारा वाजताच अटकपूर्व जामीन मंजूर झाला होता. आज सकाळचा प्रसंग व पोलिसांची मागणी याबद्दल त्यांच्या कानावर घातलं. आश्चर्य म्हणजे सर्व काही आधीच माहीत असल्या सारखं त्यांनी अतिशय निर्विकार, थंडपणे माझं सारं बोलणं ऐकून घेतलं.. त्यावर काहीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.
शाखेतील माझं आठवडाभराचं सारंच काम पेंडिंग राहिलं होतं, ते उरकता उरकता कधी रात्रीचे बारा वाजले ते कळलंही नाही. रात्री थकून अंथरुणावर पडलो तेंव्हा.. आपण पोलिसांच्या धमकीला घाबरलो नाही, त्यांना पैसे देण्यास साफ नकार दिला याचं मनोमन पुरेपूर सात्विक आणि तात्विक समाधान असलं तरी उद्या ठाणे अंमलदार इंस्पे. माळी साहेब आपली धमकी खरी करण्यासाठी अटक करण्यास येतील तेंव्हा आपण इतकेच खंबीर राहू शकू कां ? याच विचारात केंव्हातरी उशिरा माझा डोळा लागला.
सकाळी जाग आली तेंव्हा आठ वाजून गेले होते. बँकेच्या अगदी समोर असलेल्या एका दुमजली इमारतीच्या वरच्या मजल्यावर तेंव्हा मी रहात होतो. माझ्या खोलीच्या खिडकीतून रस्त्याच्या पलीकडे असलेली बँक दिसायची. रोजच्या सवयी प्रमाणे दात घासता घासता खिडकीतून बाहेर पाहिलं. खालच्या रस्त्यावर बँकेच्या गेट समोर पोलीसांच्या तीन जीप व दोन मोठ्या व्हॅन उभ्या होत्या. कडक गणवेशातील इंस्पे. माळी व सब इंस्पे. हिवाळे उतावीळपणे रस्त्यावर येरझारा घालीत होते. मध्येच ते मोबाईल किंवा वायरलेस सेट वरून वरिष्ठांशी बोलत होते तर कधी मोठ्याने ओरडून हाताखालच्या शिपायांना सूचना देत होते.
“बाप रे ! काल धमकी दिल्याप्रमाणे मला अटक करण्यासाठी इंस्पे. माळी अगदी जय्यत तयारी करून आलेले दिसतात..! बहुदा पत्रकार व फोटोग्राफर येण्याची तसेच मी खाली उतरण्याचीच ते वाट पहात असावेत..”
मी मनाशी म्हणालो..
“चला..! आलिया भोगासी असावे सादर.. !!”
धडधडत्या छातीने, अनिच्छेनेच कसाबसा तयार होऊन वधस्तंभाकडे जाणाऱ्या कैद्याप्रमाणे, जड झालेली पावले ओढीत बँकेकडे निघालो..
(काल्पनिक) (क्रमशः)
श्री अजय कोटणीस हे बँकेतील माझे सहकारी असून, स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानकावर खिळवून ठेवतात.
त्यांना मराठवाड्यातील एका गावी बँकेत शाखा प्रमुख असतांना आलेल्या अनुभवावर आधारित, एक प्रसंग त्यांनी त्यांच्या खास शैलीत वर्णन केला आहे
Subscribe to Blog via Email
Posts by all authors
- Ajay Kotnis
- उतनूरचे दिवस-5A-Memories-at-Utnoor-By Ajay Kotnis
- उतनूरचे दिवस-4D-Memories-at-Utnoor-By Ajay Kotnis
- उतनूरचे दिवस-4B-Memories-at-Utnoor-By Ajay Kotnis
- उतनूरचे दिवस-4A-Memories-at-Utnoor-By Ajay Kotnis
- उतनूरचे दिवस-3-Memories-at-Utnoor-By Ajay Kotnis
- उतनूरचे दिवस-2-Memories-at-Utnoor-By Ajay Kotnis
- उतनूरचे दिवस-1-Memories-at-Utnoor-By Ajay Kotnis
- Mind blowing experiences of a Banker-19 LAST episode शेवटचे प्रकरण
- Mind blowing experiences of a Banker-18 एका बँकरचे थरारक अनुभव-18
- Mind blowing experiences of a Banker-17 एका बँकरचे थरारक अनुभव-17
- Guest Writer
- Madhav Bhope
- चातुर्मासाचे महत्त्व importance-of-chaturmas
- Birthday card from a daughter to her father
- उतनूरचे दिवस-4C-Memories-at-Utnoor-By Ajay Kotnis
- IFSC code search for Banks in India
- Try these android apps
- Memories of SBH on foundation day माँ का आँचल
- Hanuman Chalisa Quiz
- Gita chapter 15 quiz
- Tic Tac Toe
- मोबाईलचा सदुपयोग कसा करायचा touch-quiz-gita-adhyaya-mobile-addiction
Related
Discover more from Blissful Life
Subscribe to get the latest posts sent to your email.