https://goodworld.in A website by Madhav Bhope

लेखक 

श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद 

(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)

रानभूल…* (२) नदीच्या बाहेर पडल्यावर पुढे जाताना थोड्या थोड्या वेळाने सारखा मागे वळून पहात होतो. आपण पुन्हा पुन्हा त्याच त्याच ठिकाणी कसे जाऊन पोहोचतो आहोत..? हा चकवा तर नाही ना ? चकव्याचा विचार मनात येताच भीतीने अंग शहारलं. लहानपणापासून ऐकलेल्या चकव्याबद्दलच्या अनेक गूढ कथा, कहाण्या आठवल्या. चकवा हा कोणत्याही वस्तूचे, माणसाचे, पक्ष्याचे, प्राण्याचे रूप घेऊ शकतो, हे ही ऐकल्याचं आठवलं. पण.. आम्हाला तर अजूनपर्यंत एकही माणूस, पक्षी किंवा प्राणी भेटला नव्हता..! चकवा कोणत्याही सजीव किंवा निर्जीव वस्तूचे रूप घेऊ शकतो.. म्हणजे मग आम्हाला पुन्हा पुन्हा दिसणारे ते वृक्ष.. तो कोवळा पाच फुटी साग.. ते तिरपे हिरड्याचे झाड.. ही सारी चकव्याने घेतलेली रूपे तर नाहीत..? अगदी ती पुन्हा पुन्हा दिसणारी गूढ, भयावह नदी म्हणजे सुद्धा चकव्याचे छद्मरूप असू शकते.images 24 किंवा.. मी मघापासून ज्याच्याशी बोलतो आहे तो बँकेचा प्यून.. रमेश.. तो सुद्धा खरा आहे की चकव्याने घेतलेले रूप आहे..? मी मोटर सायकल थांबवून रमेशकडे निरखून बघितले. “..तुम.. रमेश ही हो नं.. ?”

गोंधळलेल्या रमेशकडे अविश्वासपूर्ण नजरेने पहात थरथरत्या घोगऱ्या आवाजात मी विचारलं..

” ऐसा क्यूँ पूछ रहे हो साब..! और.. ऐसा घूर घूर के मत देखो साब मेरी तरफ.. डर लगता है..!” अगोदरच भीतीने गारठून गेलेला रमेश खाली नजर वळवित म्हणाला. त्याला माझ्या संशयी नजरेची भीती वाटत असावी.. की.. त्यालाही माझ्यासारखीच भीती वाटते आहे.. म्हणजे उलट तो मलाच तर चकवा समजत नाहीय ना..?

…तसं असेल तर आधी रमेशची भीती घालवणं अत्यंत जरुरीचं होतं. कारण या भयावह, एकाकी जंगलात आता आम्हाला एकमेकांचाच आधार होता.images 25

रमेशचा हात धरून आश्वासक शब्दात त्याला म्हणालो.. “देखो रमेश.. हम इस जंगल की भूलभुलैया में अटक गए है.. यहां से कैसे बाहर निकला जाएं.. तुम्हे कुछ सूझ रहा है..?” “साब.. मुझे पूरा यकीन है, ये *छलावा* ही है..!” अत्याधिक अनामिक भयाने स्तब्ध होऊन थिजलेल्या आवाजात एक एक शब्द संथपणे उच्चारीत रमेश म्हणाला. “छलावा..?.. वो क्या होता है..?” मी हा शब्द नव्यानेच ऐकत होतो.. “यहां के गोंड आदिवासी उसे *साडतीन* कहते है.. कुछ आदिवासी उसे *भूलनी* भी कहते है.. इसे लोगों को सताने में, भटका कर परेशान करने में मजा आता है..” मी ओळखलं.. रमेश चकव्याबद्दलच बोलत होता. चकव्याला मराठीत “रानभूल” ही म्हणतात. ग्रामीण भाषेत त्याला “बाहेरची बाधा” म्हणतात तर काही ठिकाणी त्याला “झोटिंग” असे ही म्हणतात.halloween ghost in spooky empty house dark mysterious background ai generated photo पूर्वी माणसं फारसा प्रवास करीत नसत. आतासारखी दळणवळणाची साधनं तेव्हा नव्हती. बिकट वाटा आणि अनवट वळणांवरून प्रवास करावा लागायचा. म्हणून माणसं फारसा प्रवास करीतच नसत. काही माणसं तर आयुष्यभर बाहेर गेलेली नसत. अशाकाळी कुणी प्रवासाला निघाला तर त्याच्यावर बरंच दडपण येत असे. दऱ्या, डोंगर, झाडी, वाटमारी याला माणसं सतत घाबरत. मनावर ताण घेऊन केलेल्या प्रवासात माणसं बऱ्याचदा वाट चुकत. आडरानात फिरून फिरून पुन्हा त्याच ठिकाणी येत. दिशांचे ज्ञान विस्मृत झाल्यामुळे दिशाभूल होत असे. याला रानभूल म्हणत. त्यालाच आपण चकवाही म्हणतो. जे लोक चकव्याला एक प्रकारचे “भूत” मानतात त्यांचा असा समज आहे की हे भूत माणसाला *ऐन मध्यान्ही* चकविते. आम्ही देखील ऐन मध्यान्हीच या चकव्याच्या तावडीत सापडलो होतो. त्यातल्या त्यात समाधानाची बाब ही होती की, चकवा हा तसा निरुपद्रवी असतो.. थोडा वेळ भटकवून मग सोडून देतो.. हे वाचून, ऐकून माहिती होतं त्यामुळे जीवावर बेतण्यासारखा काही धोका नव्हता. चकव्याच्या नादी लागून व्यर्थ जंगलात गोल गोल फिरण्याऐवजी एका ठिकाणी शांत बसून डबे खाऊन घ्यावेत असा विचार करून जवळच एका झाडाखाली बसलो. त्या दाट घनघोर जंगलात डब्यातील अन्नाचा एकेक घास खाताना चारी दिशांना मान वळवून भोवतालच्या वृक्ष वेलींचे बारकाईने निरीक्षण करीत होतो. मधेच मान वर करून उंच उंच झाडांच्या शेंड्यांची न दिसणारी टोकं बघण्याचा प्रयत्न करीत होतो. मघाशी सुंदर, रमणीय वाटणारं हे जंगल आता दुष्ट, क्रूर आणि अक्राळविक्राळ भासत होतं.p07n19vr खूप भूक लागली असूनही भीतीमुळे घास घशाखाली उतरत नव्हता. आता पुढे काय होणार..? आपण ह्या चक्रव्यूहातून बाहेर कसे पडणार..? जर आपल्याला वाट सापडलीच नाही आणि रात्र जंगलातच काढावी लागली तर..? आपण ज्याला निरुपद्रवी चकवा समजतो आहोत, तो चकवा नसून दुसरा काहीतरी भयंकर प्रकार असेल तर..? एका मागोमाग एक असे अनेक विपरीत, अनिष्ट, अशुभ विचार मनात येत होते.. विविध शंका कुशंका मनात दाटून येत होत्या. भीतीमुळे घशाला कोरड पडली होती. डबे खाऊन झाले होते. आता तहान लागली होती. आम्ही प्यायचं पाणी सोबत आणलं नव्हतं. रमेश मध्येच उठून दोन तीन वेळा लघवी करून आला. तसेच पायात चप्पल घालताना त्याचा उजवा की डावा असा गोंधळ होत होता. “क्या बात है रमेश..? बार बार चप्पल का पांव बदल रहे हो..! और.. हमने कितनी देर से एक घूंट भी पानी नहीं पिया, फिर भी तुम्हे बार बार पेशाब कैसे आ रही है..?” शेवटी न राहवून विचारलंच… “सुना है, इस छलावेसे बाहर निकलना हो तो तुरंत पेशाब के लिए बैठ जाना चाहिए ! साथ ही में जूता चप्पल का पांव भी अदला बदली करना चाहिए ! ऐसा करने से छलावे का जादू खत्म हो जाता है !” रमेशच्या उत्तरामुळे त्याच्या विचित्र वागण्याचा उलगडा झाला. “चलो फिर.. निकल पडते है..! और एक बार ट्राय कर के देखेंगे..! हो सकता है के तुम्हारा नुस्खा काम कर गया हो और शायद अब की बार हमे रास्ता मिल भी जाये..” असं म्हणत आम्ही उठलो आणि उसनं अवसान आणून एकमेकांकडे पाहून केविलवाणं हसत मोटर सायकलवर बसून जंगलातल्या पायवाटेने पुढे निघालो. जाताना वाटेतली सारी झाडं झुडुपं, वृक्ष वेली, खाच खळगे, शिळा, वारुळं ओळखीची वाटत होती. तेच ते स्वप्न आपण वारंवार पहात आहोत असं वाटत होतं. थोड्या वेळाने त्याचा उबग येऊन आजूबाजूला पाहणं सोडून दिलं आणि नाकासमोर पहात गाडी चालवू लागलो. *”रानावनात पडणारा चकवा किंवा पडणारी रानभूल म्हणजे पानाफुलांतील, वृक्षवेलींतील अज्ञात गूढ शक्तीचा अनुभव असतो..”* असं काहीसं एका लेखात वाचल्याचं मला स्मरत होतं. त्या लेखात पुढे असं ही म्हटलं होतं की.. “जंगलातल्या अनेक वृक्षवेलींमध्ये, झाडाझुडपांमध्ये अनेक प्रकारची शक्ती असते. ती आपल्या जाणिवेच्या पलीकडे असल्यामुळे गूढ वाटते. मात्र ही शक्ती सर्वच वृक्षवेलींत नसते. ठरावीक परिसरातच ती आढळते. रानात भटकायला गेल्यावर अमक्याला ‘चकवा’ लागला किंवा ‘बाहेरची बाधा’ झाली, अशा गोष्टी कुणाकुणाकडून ऐकायला मिळतात. वनस्पती अभ्यासकांच्या मते या ‘चकव्या’लाही वनस्पतीशास्त्रात काही आधार आहे. त्याचा संबंध भुताखेताशी नसून ठरावीक वनस्पतींचं स्वयंसंरक्षणासाठीचं ते एक शस्त्र आहे. जंगलातल्या काही जागा पवित्र, मंगलमय वाटतात. केवढं प्रसन्न आणि रमणीय वाटतं तिथे. याचा अर्थ तिथे सकारात्मक ऊर्जेचे प्रवाह वाहत असतात. तर काही जागा गूढ, रहस्यमय शक्तींनी भारलेल्या असतात असं वाटतं, आणि त्या आपल्याला अस्वस्थ करतात. तिथे नकारात्मक ऊर्जेचं प्राबल्य असतं. त्या ऊर्जेच्या संपर्कात माणूस आला, की माणसाचं संतुलन बिघडतं. तो भारलेल्या अवस्थेत जातो. कधी आजारीही पडतो. अशी भारून टाकणारी एक अरण्यशक्ती तिथे असते. या अरण्यशक्तीचे, निसर्गऊर्जेचे अनेक अनुभव, अरण्य हेच आपलं घर मानून, सारं जीवन अरण्यात घालवणाऱ्यांना येतात.” ….हे सारं आठवत गाडी चालवता चालवता किती वेळ गेला ते कळलंही नाही. अचानक मागे बसलेल्या रमेशच्या तोंडावर पूर्वी दोनदा बसला होता अगदी तस्साच एका रानवेलीचा जोरदार फटका बसला आणि तो वेदनेनं कळवळला. मी गाडी थांबवली. तीच जागा.. तीच वेल.. आणि तेच त्या झाडाखाली रचलेले मोहाच्या फळाफुलांचे ढीग.. मोटर सायकल वर पुढे बसलेल्या मला टाळून दरवेळी नेमका मागे बसलेल्या रमेशच्या चेहऱ्यावरच या वेलीचा आघात कसा काय होतो ? हा नेम धरून हल्ला करण्याचा प्रकार तर नाही ना ? (क्रमशः)

लेखक परिचय-ajay kotnis photo1

श्री अजय कोटणीस हे बँकेतील माझे सहकारी असून, स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव  असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानकावर खिळवून ठेवतात.  

अशीच एक सत्यकथा त्यांना तेंव्हाच्या आंध्र प्रदेश मधील आदिलाबाद जिल्ह्यातील उतनूर या ठिकाणी पोस्टिंग असतांना आलेला अनुभव वर्णन करणारी आहे. ही कथा 3 भागांमध्ये क्रमशः आहे. ही यापूर्वी त्यांच्या फेसबुकवर प्रसिद्ध झालेली आहे, आणि आता त्यांच्या परवानगीने या ब्लॉगच्या वाचकांसाठी इथे देत आहोत. 

smartphone summer sale
smartphone summer sale
wall clocks
Wall Clocks
Nilkamal cupboard
Nilkamal cupboard
wooden sofa set
wooden sofa set

Order any items above by clicking on respective images

Or click on the link shown here  to see all items in furniture

The above items are available on Amazon India.

Please refer to our affiliate disclosure page


Discover more from Blissful Life

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Blissful Life

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading