https://goodworld.in A website by Madhav Bhope

लेखक 

श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद 

(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)

रानभूल…* (३ )

अनेक वृक्षवल्लींत पंचेंद्रियांची गूढ शक्ती असते. जंगलात येणाऱ्या प्रत्येक परक्याचं अस्तित्व ही घुसखोरी वाटल्यामुळे त्यांना ती सहन होत नाही. आपल्याला उपद्रव व इजा करण्यासाठीच कुणीतरी आलेलं आहे अशी त्यांची समजूत होते. मग त्यांची स्वसंरक्षणासाठी प्रतिक्षिप्त क्रिया (Reflex action), हालचाल होते.

… हा वेलीचा रमेशवरील हल्ला म्हणजे अशीच प्रतिक्षिप्त क्रिया तर नाही ना ?

काही वृक्षवेली आपण त्यांच्या जवळपास जाताच पानाफुलांतून उग्र गंध सोडून त्रस्त करून सोडतात. त्या उग्र गंधाचा परिणाम सौम्य किंवा तीव्र भूल दिल्यासारखा होतो. परिणामी प्राणिमात्रांना गुंगी येते. प्रत्येकाच्या मनोबलानुसार कमी-जास्त प्रमाणात स्मृतिभ्रंश होतो. त्यामुळे आजूबाजूच्या व्यक्ती, दिशा यांचं भान राहात नाही. आपण कुठे आहोत, कुठे चाललो आहोत, कुठे जायचं आहे, हे कळेनासं होतं. मेंदू बधिर होतो, आणि मागे, पुढे, डावीकडे, उजवीकडे जाण्याचा रस्ता सापडत नाही. फिरून फिरून व्यक्ती त्याच जागेवर येते. हीच रानभूल! हाच चकवा, आणि हेच झोटिंग!

…आम्हालाही असाच स्मृतिभ्रंश तर झालेला नाही ना ? कारण योग्य दिशा न सापडल्यामुळे आम्हीही फिरून फिरून त्याच जागी येत होतो.

पण नाही..! ज्याअर्थी मला सारं काही व्यवस्थित आठवत होतं त्याअर्थी माझी स्मरणशक्ती जागृत होती. माझी तर्कशक्ती, चिकित्सक वृत्ती व विनोदबुद्धी ही अद्याप शाबूत होती. वास्तवाचं पुरेपूर भानही मला होतं. पण.. पण या व्यतिरिक्त इथे असं काहीतरी होतं की जे माझ्या बुद्धीच्या आकलन कक्षेबाहेरचं होतं.

हा निसर्गाचा भोवरा, हे मायावी अरण्याचं दुष्टचक्र कधी संपणार..? असा सचिंत मनाने विचार करीत असतानाच जंगलातील वातावरण ढवळल्यासारखं होऊन जोरदार वारे वाहू लागले. जवळच्या झाडीतून कुणाच्या तरी दबक्या आवाजातील हसण्याचा व कुजबुज करण्याचा आवाजही कानी पडला. बोलणाऱ्या व्यक्तींची भाषा जरी समजत नसली तरी ऐकू येणाऱ्या विविध प्रकारच्या आवाजांवरून तो किमान सहा सात माणसांचा घोळका असावा.img

आतापर्यंत अतिशय शांत, स्तब्ध, नीरव असलेल्या त्या जंगलात कोणतीही चाहूल न लागू देता अचानक एवढी सारी माणसे कुठून आली..? असा प्रश्न पडून भीती वाटण्याऐवजी उलट या जंगलात आम्हाला कुणीतरी सोबतीला आलं आहे याचा आनंदच झाला. या व्यक्तींना जंगलातील सर्व रस्त्यांची खडानखडा माहिती असेल आणि त्यांच्या मदतीने या जंतरमंतर मधून आता नक्कीच बाहेर पडू या विचाराने आम्ही सुखावलो.

बराच वेळ झाला तरी त्या हसत गप्पा करणाऱ्या व्यक्ती जंगलातून बाहेर येण्याचे नावच घेत नव्हत्या. शेवटी कंटाळून त्यांचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही मोठ्याने ओरडून आवाज देत टाळ्याही वाजवल्या. थोडा वेळ तो आवाज एकदम शांत झाला. त्यापाठोपाठ वाहता वाराही लगेच थांबला. पण मग आमच्या आवाजाकडे संपूर्ण दुर्लक्ष करीत पुन्हा त्यांचं हसणं खिदळणं पूर्ववत सुरू झालं. वाराही पूर्वीसारखा अनिर्बंध वाहू लागला.mihaly koles kKWrn At4Gg unsplash

ती माणसं जंगलातून परस्पर निघून गेली तर या चकव्यातून बाहेर पडण्याची आलेली संधी आपण गमावून बसू या धास्तीने उतावीळ होऊन मी त्यांना गाठण्यासाठी झाडीत शिरण्यासाठी पुढे सरसावलो.. तोच.. रमेशने माझा हात धरून “थांबा..!” अशी खूण केली. मी भिवया उंचावत चेहऱ्यावर प्रश्नार्थक भाव आणून त्याच्याकडे पाहिलं, तेंव्हा तो हलकेच पुटपुटला..

“साब.. यहीं *छलावा* है !”

रमेशचे हे शब्द ऐकताच मी विंचू चावल्यागत झटकन झाडीत घातलेला पाय मागे घेतला.

रमेशने इतक्या हळू आवाजात बोललेलं त्या दूर झाडीतील चकव्याला कसं काय ऐकू गेलं कोण जाणे..! पण त्या नंतर तो आवाज एकाएकी एकदम लुप्त झाला. वाहता वाराही अचानक थंड झाल्यामुळे जंगलात स्मशान शांतता पसरली. आम्ही बराच वेळ त्या आवाजाच्या दिशेने कानोसा घेत उभे होतो. पण पुन्हा काही तो आवाज ऐकू आला नाही.

कदाचित तो चकवाही.. आता आम्ही काय करतो..? याची गंमत पहात आमच्या अगदी जवळच उभा असावा. कारण थोडा वेळ कानोसा घेऊन जेंव्हा आम्ही तिथून आपल्या वाटेने पुढे जायला निघालो तेंव्हा त्या झाडीतून विकट हास्याचा एक कल्लोळ उठला. जणू काय..”कसं फसवलं..!” असंच चिडवित तो आम्हाला हसत असावा. पुन्हा सुरू झालेल्या बेभान वाऱ्यासंगे तो गडगडाटी अट्टाहास ध्वनी जंगलभर घुमत असतानाच मी गाडीचा वेग वाढवला.

थोडं पुढे आल्यावर रमेश म्हणाला..

“जब तक हम इस रास्ते पर है, तब तक सेफ है ! उस छलावेका इरादा हमे किसी तरह जंगल के अंदर बुलाकर, दूर खींच के ले जाने का है ! अगर हम गलती से भी रास्ता छोड़कर जंगल के अंदर गए तो बहुत बुरे फंस जाएंगे !”

रमेशचे हे बोलणे ऐकतांच कॉलेजातील मित्राने एकदा सांगितलेला चकव्या संबंधीचा असाच एक किस्सा आठवला.

या मित्राच्या गावाकडील शेतात काम करणारा एक तरणाबांड मजूर दुपारी रानाजवळील वाटेने शेतात जात असताना बाजूच्या झुडुपात त्याला कसलातरी आवाज ऐकू आला. म्हणून त्याने जवळ जाऊन पाहिले तर त्याला काहीच दिसले नाही. तो थोडा पुढे आल्यावर पुन्हा त्याला तसाच आवाज ऐकू आला. यावेळीही त्याला त्या झुडुपात काहीच दिसलं नाही. तिसऱ्या वेळी पुन्हा जेंव्हा तसा आवाज आला तेंव्हा त्याने चिडून त्या दिशेने एक मोठा दगड भिरकावला, तेंव्हा एक गलेलठ्ठ रानकोंबडी पंख फडफडवित रानाच्या दिशेने पळाली.

रान कोंबडी पाहून मजुराला तिला पकडण्याचा मोह झाला आणि तिच्या मागे धावत तो खूप खोल रानात गेला. रानकोंबडी तर त्याला गुंगारा देऊन कुठेतरी गडप झाली पण तो मजूर मात्र त्या रानात अडकला. फिर फिर फिरला, पण रानातून बाहेर पडण्याचा मार्गच त्याला सापडेना. असा चार पाच तास भटकल्यानंतर संध्याकाळी तो गावापासून दहा किलोमीटर दूर तालुक्याच्या दिशेने जाताना दिसला. त्याची अवस्था भ्रमिष्टा सारखी झाली होती. आपल्याला कुठे जायचे आहे याची त्याला शुद्धच नव्हती. गावकऱ्यांनी त्याला कसेबसे घरी आणल्यानंतर बरेच दिवस तो संभ्रमित, अस्थिर मानसिक अवस्थेत होता.

…आम्हीही मघाशी उताविळपणे त्या हसण्याच्या आवाजाच्या दिशेने खोल जंगलात शिरलो असतो तर आमची अवस्था काय झाली असती या नुसत्या कल्पनेनेच मला कापरं भरलं.

जंगलातील ओबड धोबड पायवाटेवरून खडखड असा आवाज करीत हळूहळू पुढे जाणाऱ्या मोटर सायकल वरून आमचा अर्थहीन व अंतहीन प्रवास सुरूच होता.

एवढ्यात.. तोच चिरपरिचित नदीच्या पाण्याचा खळखळाट पुन्हा ऐकू आला. समोर पाहिलं तर तोच नदीकाठचा मोठा दगड, तीच मोडून नदीत आडवी पडलेली झाडे, फुटभर खोल स्वच्छ पाण्यात चमकणारे तेच दगड वाळू गोटे आणि एखाद्या भयनाट्यातील मायावी चेटकिणी प्रमाणे भासणारी तीच तीस चाळीस फुटाच्या उथळ पात्राची खळखळ वाहणारी गूढ रहस्यमय नदी..Nature Tree River Bach Water Forest Landscape 3630487 2

“रमेश, क्या नाम है इस नदी का..?”

या नदीचं नक्कीच निर्दया, भीषणा, भेसूरा, कर्कशा, कठोरा, निष्ठूरा, आक्रोशा, रुद्रा, डाकिणी, पिशाचीणी असं काहीतरी भीतीदायक नाव असलं पाहिजे, असा मनाशी विचार करीत रमेशला विचारलं..

“ये नदी आगे जा कर “प्राणहिता नदी” को मिल जाती है इस लिये इस नदी को भी सब लोग *प्राणहिता* ही कहते है..!”

रमेशचं हे उत्तर ऐकून हसू आलं. एखाद्या निर्दयी कसायाचं नाव दीनदयाळ असावं.. तसंच होतं हे ! खरं तर “प्राणहिता” ऐवजी या नदीचं नाव “प्राणहरा” किंवा “प्राणहंता” असंच असायला हवं होतं..!

हतबुद्ध होऊन नाईलाजाने नदीकाठच्या त्या मोठ्या दगडावर बसून क्षणभराची विश्रांती घेताना आणखी किती वेळा ही नदी आपल्याला पुन्हा पुन्हा आडवी येणार आहे असाच विचार राहून राहून मनात येत होता.

(क्रमशः)

या आधीचे २ लेख इथे वाचा 

रानभूल-१ 

 

रानभूल-२ 

 

लेखक परिचय-ajay kotnis photo1

श्री अजय कोटणीस हे बँकेतील माझे सहकारी असून, स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव  असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानकावर खिळवून ठेवतात.  

अशीच एक सत्यकथा त्यांना तेंव्हाच्या आंध्र प्रदेश मधील आदिलाबाद जिल्ह्यातील उतनूर या ठिकाणी पोस्टिंग असतांना आलेला अनुभव वर्णन करणारी आहे. ही कथा 3 भागांमध्ये क्रमशः आहे. ही यापूर्वी त्यांच्या फेसबुकवर प्रसिद्ध झालेली आहे, आणि आता त्यांच्या परवानगीने या ब्लॉगच्या वाचकांसाठी इथे देत आहोत. 

Online Shopping on Amazon

smartphone summer sale
smartphone summer sale
wall clocks
Wall Clocks
Nilkamal cupboard
Nilkamal cupboard
wooden sofa set
wooden sofa set

Order any items above by clicking on respective images

Or click on the link shown here  to see all items in furniture

The above items are available on Amazon India.

Please refer to our affiliate disclosure page


Discover more from Blissful Life

Subscribe to get the latest posts sent to your email.