विष्णूदास कवि (परमहंस परिव्राजकाचार्य पुरुषोत्तमानंद सरस्वती) हे इ. स. १८४४ ते १९१७ या कालावधीत होऊन गेलेले एक दत्तभक्त आणि रेणुका मातेचे निस्सीम भक्त होऊन गेलेले आहेत. आयुष्यातील खूप काळ त्यांनी माहूर येथे श्री रेणुकादेवीच्या भक्तीत व्यतीत केला आणि त्यांचे निर्वाण ही तेथेच झाले. त्यांनी रचलेल्या देवीच्या आरत्या, पदें आणि अष्टकें महाराष्ट्रातील विशेषतः देवीच्या भक्तांच्या घरा घरात प्रसिद्ध आहेत. विष्णूदास हे अत्यंत आर्तपणे आपल्या आईला- रेणुकामातेला साद घालतात- भेट देण्याविषयी कळकळीची विनंती करतात- कधी कधी, बालकाच्या अधिकाराने, रेणुका मातेवर रागावतात- या भव सागरात आपल्याला विषय रूपी शत्रूंशी झुंजायला एकट्यालाच पाठविले म्हणून तिला नांवे ही ठेवतात. विष्णूदासांची अष्टकें अत्यंत भावपूर्ण आहेत. ज्यांच्या घरी देवीचे नवरात्र असतात, त्यांच्या घरी नवरात्रात दररोज रात्री घरात सर्व जणांनी एकत्र बसून ही अष्टकें म्हणण्याची प्रथा आहे. अशी काही अष्टकें एका ठिकाणी मिळावी म्हणून या ब्लॉग च्या वाचकांसाठी यापूर्वी काही अष्टकें इथे उपलब्ध केली होती. त्या सगळ्यांची लिंक खाली दिलेली आहे. आता अजून काही अष्टकें या ठिकाणी देत आहोत.
विष्णूदासाची कविता
Renuka Ashtak-10
तूं एक वेळ तरि दर्शन दे भवानी
( वृत्त : वसंततिलका )
श्रीमूळपीठ – शिखर स्थळि कोटि लक्ष
चिंतामणी सुरभि शोभति कल्पवृक्ष
मी तेथ मंदमति कां श्रमतों बसूनी
तूं एक वेळ तरि दर्शन दे भवानी ॥१॥
यावी दया तुज बया ! शतशः अशांची
जो फार दीन बसला धरुनी अशाची
गेली निघून म्हणतां म्हणतां जवानी
तूं एक वेळ तरि दर्शन दे भवानी ॥२॥
केलें तुझें भजन कीं निष्काम नाहीं
आतां असो दुर परी दुष्कामना ही
आहे विनंति इतुकी जननी ! निदानीं
तूं एक वेळ तरि दर्शन दे भवानी ॥३॥
वाटे पला परम घातकि मी मनुष्य
म्यां नासिलें परम दुर्लभ हें अयुष्य
काळासि केलि तुज वंचुनि मेजवानी
तूं एक वेळ तरि दर्शन दे भवानी ॥४॥
झाली शरीरिं विषयानलिं यातनाची
गंजी जशी समुळची जळते तणाची
यासाठी आइ ! तुज प्रार्थित दीनवाणी
तूं एक वेळ तरि दर्शन दे भवानी ॥५॥
गेली बहीण, जननी, दिविं तेंवि तात
गेली वधू प्रमुख मानिली जी हितांत
ही जाहली अशि, असो, जरि सर्व हानी
तूं एक वेळ तरि दर्शन दे भवानी ॥६॥
जी केलि म्यां जपतपादिक साधनाही
ती व्यर्थ गेलि सहसा तरि बाध नाहीं
आलों तुला शरण मी निज – सौख्यदानी
तूं एक वेळ तरि दर्शन दे भवानी ॥७॥
आलीस तूं सकलही स्वरुपीं अकारा
हें नेणुनी उगिच मी करितों पुकारा
येती जशी नउ नऊ, गणितां नवांनीं
तूं एक वेळ तरि दर्शन दे भवानी ॥८॥
शक्ती असो जग – हितास्तव अंगिं बाकी
यावीण कांहिं नलगे मजलागिं बाकी
हें विष्णुदास विनवी श्रीमृगराज – यानी
तूं एक वेळ तरि दर्शन दे भवानी ॥९॥
**************************************
या आधील पदांची लिंक खाली दिलेली आहे.
Renuka Ashtak-1 अगाई रेणुके ! किति दिन असे बोलुंच नये- रेणुका अष्टक-1
Renuka Ashtak-2 लाज याची रेणुके, तुला सारी- रेणुका अष्टक-2
Renuka Ashtak-3 तूं एक वेळ तरि दर्शन दे भवानी-रेणुका अष्टक-3
Renuka Ashtak-4 लक्ष कोटी चंद्रकिरण-रेणुका अष्टक-4
Renuka Ashtak-5 तू विचित्र गारुडीण- रेणुका अष्टक-5
Renuka Ashtak-6 तुझे सुंदर रूप रेणुके विराजे – रेणुका अष्टक-6
Renuka Ashtak-7 अवो रेणुके रेणुके रेणुके तू – रेणुका अष्टक-7
Renuka Ashtak-8 नको रेणुके ! आपुलें ब्रीद सोडूं- रेणुका अष्टक-8
Renuka Ashtak-9 ऊठ अंबे ! तूं झोंपि नको जाऊं- रेणुका अष्टक-9
Discover more from
Subscribe to get the latest posts sent to your email.