https://goodworld.in A website by Madhav Bhope

विष्णूदास कवि (परमहंस परिव्राजकाचार्य पुरुषोत्तमानंद सरस्वती) हे इ. स. १८४४ ते १९१७ या कालावधीत होऊन गेलेले एक दत्तभक्त आणि रेणुका मातेचे निस्सीम भक्त होऊन गेलेले आहेत. आयुष्यातील खूप काळ त्यांनी माहूर येथे श्री रेणुकादेवीच्या भक्तीत व्यतीत केला आणि त्यांचे निर्वाण ही तेथेच झाले. त्यांनी रचलेल्या देवीच्या आरत्या, पदें आणि अष्टकें महाराष्ट्रातील विशेषतः देवीच्या भक्तांच्या घरा घरात प्रसिद्ध आहेत. विष्णूदास हे अत्यंत आर्तपणे आपल्या आईला- रेणुकामातेला साद घालतात- भेट देण्याविषयी कळकळीची विनंती करतात- कधी कधी, बालकाच्या अधिकाराने, रेणुका मातेवर रागावतात- या भव सागरात आपल्याला विषय रूपी शत्रूंशी झुंजायला एकट्यालाच पाठविले म्हणून तिला नांवे ही ठेवतात.  विष्णूदासांची अष्टकें अत्यंत भावपूर्ण आहेत. ज्यांच्या घरी देवीचे नवरात्र असतात, त्यांच्या घरी नवरात्रात दररोज रात्री घरात सर्व जणांनी एकत्र बसून ही  अष्टकें म्हणण्याची प्रथा आहे. अशी काही अष्टकें एका ठिकाणी मिळावी म्हणून या ब्लॉग च्या वाचकांसाठी यापूर्वी काही अष्टकें इथे उपलब्ध केली होती. त्या सगळ्यांची लिंक खाली दिलेली आहे. आता अजून काही अष्टकें या ठिकाणी देत आहोत.


विष्णूदासाची कविता 

Renuka Ashtak-9

ऊठ अंबे ! तूं झोंपि नको जाऊं

 

( दिंड्या )
माझि पतिताची, पापकृती खोटी ।
तुझी पावन करण्याचि शक्ति मोठी ॥
समजवंता मी, काय समजाऊं ।
ऊठ अंबे ! तूं झोंपि नको जाऊं ॥१॥


जरी गेलिस तूं मायबाइ झोंपी ।
तरी बुडतिल भव – सागरांत पापी ।
ब्रह्मज्ञानीही लागतील वाहूं ॥ ऊठ० २॥


कामक्रोधादिक चोरटे गृहांत ।
शिरुनि पडले ते दुष्ट आग्रहांत ॥
लुटूं म्हणती हणुं, मारुं जीव घेऊं ॥ ऊठ० ३॥


काळसर्प मुख, वासुनी उशाला ।
टपत बसला तो, भीइना कशाला ॥
कितीतरि या निर्वाणिं तुला बाहूं ॥ ऊठ० ४॥


कृपा सोडुनि निजलीस यथासांग ।
उपेक्षीसी मज, काय अतां सांग ।
कृपावंते ! निष्ठूर नको होऊं ॥ ऊठ० ५॥


तुझ्याविण मी कोणासि हात जोडूं ।
आइ म्हणुनी, कोणाचा पदर ओढूं ॥
तुझे पाय सोडूनि कुठें जाऊं ॥ ऊठ० ६॥


जगीं त्राता तुज – वीण कोणि नाहीं ।
माझि कोणी कळवळ जाणिनाही ॥
तूंच जननी तूं, जनक बहिण भाऊ ॥ ऊठ० ७॥


नको सांड करुं, माझिया जिवाची ।
तुला एकविरे ! आण भार्गवाची ॥
नको सहसा जगदंबे अंत पाहूं ॥ ऊठ० ८॥


जरी माझी ना, करिसी तूं उपेक्षा ।
तरी वाढेल तुझें नांव याहिपेक्षां ॥
विष्णुदास म्हणे, गूण तुझे गाऊं ॥ ऊठ० ९॥

************************************** 


Discover more from

Subscribe to get the latest posts sent to your email.

Say what you feel