Guest Article by Shri V.D.Bhope., Retired Executive Engineer, Irrigation Department, Govt. of Maharashtra
तुम तो ठहरे परदेसी
साथ क्या निभाओगे
सुबह पहली गाडी से
तुम तो चले जाओगे
………………………….
मित्रांनो
असाच एक किस्सा तुमच्या बरोबर शेअर करतोय …
साधारणपणे १९९७ सालची गोष्ट आहे. त्यावेळी मी उमरग्याला कार्यरत होतो .१९९३ साली लातूर उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये जो प्रलयंकारी भूकंप झाला त्या भूकंपात एकूण ५२ गावे फार मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाल्यामुळे जवळपास बेचिराख झाली होती. व मनुष्यहानीही कांही हजारांमध्ये झाली होती .
माझ्याकडे एकूण ५ गावांच्या पुनर्वसनाचे काम होते.सरकारनेही भूकंप पुनर्वसनाचे काम वेळेत व्हावे म्हणून सुमारे ८०० इंजिनीअर्स या प्रकल्पावर नेमले होते .
ज्या गावाच्या पुनर्वसनाचे काम पूर्ण झाले तेथील सर्व नवीन घरे , शाळा , दवाखाना, ग्रामपंचायत, कम्युनिटी हाॅल ,इत्यादिंचा लोकार्पण सोहळा केला जायचा.त्यासाठी अर्थातच पालकमंत्री यायचे . बॅंडवालेही यायचे . भाषणे व्हायची. मंत्री आले की त्यांचे कार्यकर्ते, चेलेचपाटे, खुशमस्करेही आवर्जून यायचे .कुणी सांगायचं मी साहेबांचा उजवा हात आहे बरं का !
अशाच एका नवीन वसलेल्या गावाचा उद्घाटनसोहळा होता.
मंत्र्यांच्या स्तुतीपर भाषणे झाली. आमचा रोल म्हणजे या सोहळ्यास हजर राहणे तेही अनिच्छेने एवढाच होता. मंत्री महोदय भाषणास उभे राहिले …. शासन तुमच्या पाठीशी आहे . तुमचं गाव आम्ही आता पूर्णपणे नवीन बांधून दिलं आहे .भूकंपग्रस्त लोकांना काहीही अडचण आली तर मी अर्ध्यारात्री धावून येईन. तुमची साथ मी कधीही सोडणार नाही असं साॅलिड आश्वासन मंत्र्यांनी देऊ न टाकलं…
त्यांच्या कार्यकर्त्यांनी व जमलेल्या लोकांनी टाळ्या वाजवल्या . नंतर मंत्र्यांच्याच एका उत्साही कार्यकर्त्यांने त्यांची गावातून मिरवणूक काढण्याची टूम काढली.तो साहेबांचा उजवा हात म्हणवून घ्यायचा..
साहेबांची मिरवणूक गावातून निघाली…एका कार्यकर्त्याने बॅंडवाल्यांना इशारा केला चांगलं गाणं वाजवा रे…
बॅंडवाल्यांना काय , त्यांनी लगेच त्या काळातलं अल्ताफ राजाचं गाणं सुरु केलं….
तुम तो ठहरे परदेसी
साथ क्या निभाओगे
सुबह पहली गाडीसे
तुम तो चले जाओगे
तुम तो ठहरे परदेसी
साथ क्या निभाओगे….
कार्यकर्ता माझ्या चांगल्या ओळखीतला होता.बैठकीतलाही होता.मी त्याचा शर्ट ओढून त्याला म्हटलं , हे काय गाणं लावलं राव. मंत्र्यांनी आत्ताच भाषणात लोकांना साथ देण्याचं आश्वासन दिलंय अन् तुम्ही हे गाणं लावलं …
त्यावर तो म्हणाला ,…
जाऊ द्या हो साहेब . मंत्र्यांना काय त्यांच्या कार्यकर्त्यांची गर्दी पायजे,बॅंड पायजे अन् स्वत:ची मिरवणूक पायजे…हे सगळं आहे ना, बस तर मग…बॅंडवर कोणतं का गाणं वाजेना.कोण लक्ष देतोय .तुम्ही त्यांच्या चेहेऱ्याकडे पहा बरं , किती खुश दिसताहेत ते..’
मी हळूच मंत्र्यांच्या चेहेऱ्याकडे पाहिलं . मिरवणुकीचा एवढा लवाजमा पाहून स्वारी जाम खुश दिसत होती…
मी कार्यकर्त्याला म्हटलं , तुमच बरोबर आहे रावं . आम्हाला नाही कळत तुमच्या एवढं. खुशाल चालू द्या गाणं
तुम तो ठहरे परदेसी
साथ क्या निभाओगे
😁😃😜🤑🤑😄
This site contains product affiliate links for Amazon and other sellers. We may receive a small commission if you make a purchase after clicking on one of these links, without any additional cost to the purchaser.
Related
Discover more from Blissful Life
Subscribe to get the latest posts sent to your email.