यापूर्वी आपण श्री अजय कोटणीस यांचे अनेक लेख वाचले आहेत. पण खालील आठवण ही त्यांची अर्धांगिनी सौ. निरुपमा कोटणीस यांची एक अत्यंत हृद्य आठवण असून, यापूर्वी ती जेंव्हा फेसबुकवर प्रकाशित केली होती, त्यावेळी आणि त्यानंतर खूप लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता, त्यात नुसतीच एक आठवण नाही, तर समाजातील एक मोठी गरज असलेल्या गोष्टीबद्दल त्यांनी सर्व समाजाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
*दुधाचं कर्ज*
लेखिका- सौ. निरुपमा कोटणीस
त्यावेळी आमची बदली बुलढाण्या जवळील पारध या गावी झाली होती, म्हणून आम्ही बुलढाण्यालाच घर केले होते. माझा मोठा मुलगा अनिश पहील्या वर्गात होता अन् छोटा अथर्व दोन महिन्यांचा होता.
माझे माहेर ही बुलढाणाच असून तेंव्हा माझी आई व माझा मोठा भाऊ तिथे सहकुटुंब राहायचे.
1998…जानेवारी महिन्यातला पहिला आठवडा होता. माझ्या आईची तब्येत बरी नसल्याने दादाने ..माझ्या भावाने बुलढाण्यातील प्रसिद्ध डॉक्टर दीपक लध्दड यांची अपॉईंटमेंट घेतली होती. सकाळी दहा वाजता आईला घेऊन दवाखान्यात जायचे होते.
ठरल्याप्रमाणे दादा आईला घेऊन सकाळी माझ्या घरी आला आणि “मी तुझ्या बाळा जवळ थांबतो. तू आईला घेऊन डॉक्टर कडे जा” म्हणाला.
मी सर्व आवरून लगेच आईला घेऊन दवाखान्यात गेले. सिस्टरने “डॉक्टर अर्ध्या तासात येतील, तोपर्यंत बसा !” म्हणून सांगितलं. आम्ही दोघी तिथल्या बाकड्यावर बोलत बसलो होतो. कुठूनतरी बाळाच्या रडण्याचा आर्त आवाज येत होता…कोण आणि कां रडतंय हा प्रश्न पडताच उत्तर मिळालं.
…समोरून एक माणूस एका बाळाला घेऊन येताना दिसला. धोतराच्या दुहेरी कापडात उघडेबंब बाळ जिवाच्या आकांताने जोरजोरात रडत होते. आमच्या दोघींचे हृदय त्याच्या रडण्याने पिळवटून निघत होते. त्यावेळी सकाळचे दहा वाजले होते तरी थंडीचे दिवस असल्याने हवेत गारठा होता.आणि त्यातून हे बाळ असं उघडं…
तो माणूस बाळाला घेऊन आमच्या जवळून जायला लागला. बाळाचे रडणे न ऐकवून मी त्या माणसाला थांबवून म्हणाले…
“अहो भाऊ (विदर्भात अनोळखी व्यक्तीला भाऊ,ताई, बाई, दादा असे बोलतात) त्या बाळाला नीट कपड्यात गुंडाळून घ्या ना….थंडी वाजतेय त्याला.”
तो माणूस कुठल्या तरी खेड्यातला होता. तो बोलला..
“बाई, हे कपडाच ठेवत नाहीये अंगावर.”
मी म्हणाले…
“द्या इकडे… मी व्यवस्थित गुंडाळून देते…”
असे म्हणून मी हात पुढे केला…आणि त्या चिमुकल्या बाळाला जवळ घेऊन कपड्यात गुंडाळायला लागले…..तर ते बाळ रडता रडता माझ्या छातीशी तोंड करून दुधाची वाट बघू लागले. मी त्या माणसाला म्हणाले..
“भाऊ, याला खूप भूक लागलीय… त्याच्या आईकडे न्या आधी. बाळ भुकेने कळवळतंय…”
त्यावर हताशपणे तो माणूस म्हणाला
“बाई, त्याची आई टीबी हॉस्पिटलमध्ये मध्ये ऍडमिट आहे. तिला टीबी असल्याने बाळाला वरचे दूध सुरू आहे आणि आम्ही रस्त्यावरच चूल पेटवून दूध गरम करून पाजतो त्याला. त्यामुळे त्यालाही ते इन्फेक्शन का काय म्हणतात, ..ते झाले आहे…म्हणून त्याच्या टेस्ट करायला बोलावले होते..”
बाळाचे रडून रडून बारीक झालेले लुकलुकणारे डोळे मला काहीतरी मागत होते…थरथरणारे सुकलेले गुलाबी ओठ काहीतरी शोधत होते. त्याची व्याकुळता मला हतबल करत होती. माझ्यातलं मातृत्व जागं होतंच. लहानपणापासूनची परोपकाराची शिकवण मला स्वस्थ बसू देईना.
शेवटी न राहवून आईला हळूच विचारलं..
“आई, ह्याला दूध पाजू का गं ? मला या बाळाची भूक बघवत नाही…”
आई म्हणाली… “एक मिनिट थांब !
आणि आईने थोडे बाजूला जाऊन त्या माणसाला विचारलं..
“ही माझी मुलगी आहे. तिचे दोन महिन्यांचे बाळ घरी आहे. …तुमच्या बाळाची भूक तिला बघवत नाही. तुम्ही हो म्हणत असाल तर ती आपलं दूध पाजेल बाळाला….”
त्या गृहस्थाने अक्षरशः माझ्या आईचे पाय धरले.
“बाई, कोण म्हणतं हो देव नाही. मला काय करावं काहीच समजत नव्हतं. तुम्ही देवासारखे भेटले.”
असं म्हणत त्यांनं आनंदानं होकार दिला. डॉक्टर दिपक लद्धड शालेय जीवनात आमचे शेजारी असल्याने मी व आई हक्काने सिस्टरला सांगून बाळाला घेऊन डॉक्टरच्या केबिनमध्ये गेलो. इतका वेळ बाळाच्या रडण्याने हॉस्पिटलमध्ये होत असलेला आक्रोश, गडबड गोंधळ आता थांबला होता. अत्यंत शांतपणे बाळाला स्तनपानाचा कार्यक्रम झाला. बाळाचे पोट यथेच्छ भरले होते. आणि ते शांतपणे माझ्या कुशीत झोपले होते.
तशा अवस्थेतच मी त्याला व्यवस्थित गुंडाळून त्या व्यक्तीच्या हवाली केले.
आमचे खूप खूप आभार मानून तो माणूस निघून गेला. नंतर पाच दहा मिनिटातच डॉक्टर आले. आईचे चेक अप झाले. डॉक्टरांनी औषधी लिहून दिली आणि आम्ही घरी परत आलो.
घरी यायला आम्हाला जरा उशीरच झाला होता. दादाने कारण विचारल्यावर आईने त्याला झालेला प्रकार सांगितला. त्यावर त्याने माझ्याकडे पाहून हात जोडले.
“खरंच निरु, यापुढे तू देवाला हात जोडले नाहीस तरी चालेल गं…! देव तुझ्यावर जाम खुश झाला असणार. त्याची कृपा कायम तुझ्यावर राहील.”
असं म्हणून मला तोंड भरून आशिर्वाद देऊन, चहा घेऊन दादा ऑफिसला निघून गेला.
त्या बाळाचे इन्फेक्शन माझ्या बाळाला लागू नये म्हणून मी डेटॉलने वॉश घेऊन माझ्या बाळा जवळ गेले. माझे बाळ शांतपणे झोपले होते. मी मनाशी विचार केला… “बरं झालं ! बाळ झोपलंय तोवर आपण पटकन स्वयंपाक करून घेऊ.”
स्वयंपाक झाला. अनिश शाळेतून आला होता, त्याचे आवरणे झाले. आमची जेवणेही झाली. .. तरी बाळ उठेना. शेवटी चार वाजता, न राहवून मी त्याला हलवून उठवण्याचा प्रयत्न केला. पण त्याची झोप उघडत नव्हती. तो परत तासभर झोपला. आणि नंतर खेळू लागला. आज माझ्या बाळाला भूक पण लागली नव्हती.
आई म्हणाली…
“बघ निरू, आज दवाखान्यात तू त्या बाळाचे पोट भरलेस, तर इकडे देवाने तुझ्या बाळाचेही पोट भरले. पाहिलंस, आज अथर्व प्यायला देखील उठला नाही.”
आमचं दुपार नंतरचं चहापाणी झाल्यावर आणि घरातली कामं आवरल्यावर माझ्या डोळ्यापुढे दवाखान्यातलं ते बाळ दिसायला लागलं. आता संध्याकाळी त्याच कसं होईल ही चिंता वाटत होती. सकाळचा प्रसंग असा झटकन घडून गेला की त्या माणसाचे नाव, गाव, पत्ता काहीच विचारलं गेलं नाही. मनाला त्या बाळाच्या भुकेची काळजी वाटून सारखी चुटपुट लागून राहिली.
दुसऱ्या दिवशी मी दादाला त्या बाळाबद्दल चौकशी करण्यासाठी दवाखान्यात पाठवलं. पण त्याचा काहीच पत्ता लागला नाही. टीबी हॉस्पिटल मध्येही ते कुटुंब नव्हतं.
एक खंत उगीच लागून राहिली होती की त्याच वेळी त्यांची नीट चौकशी करून त्या बाळाची आई बरी होई पर्यंत काही दिवस तरी मी त्याला सांभाळायला हवं होतं.
आजही मला त्या अश्राप, दुर्दैवी बाळाचे नाव, गाव, जात, पत्ता काहीच माहित नाही. एक रुख रूख मात्र मनात सदैव घर करून राहिली आहे. त्याचवेळी त्याची व्यवस्थित चौकशी करायला हवी होती म्हणून.
….बहुदा त्या बाळाचं गेल्याजन्मीचं दुधाचं कर्ज फिटलं असेल एवढंच म्हणेन…!!
माझ्या कौतुकासाठी मी ही पोस्ट लिहिली नाही. पण समाजात ज्या महिलांना शक्य असेल त्यांनी अशा प्रकारे अमृतदान दिल्यास भुकेल्या गरजू बाळाची गरज भागवली जाते. आणि स्वतःला खूप समाधान मिळते. याचा प्रत्यय घ्यावा. यात काहीही वावगे नाही. हे दान आपण इच्छा असूनही *नेहमी* करू शकत नाही. त्यामुळे जेंव्हा शक्य असेल तेंव्हा हे अमृतपान नक्की करा…त्यातच आपलं खरं सौंदर्य (ब्युटी) आहे. स्त्री असल्याचा मला *अभिमान* आहे आणि सर्व स्त्रियांनी तो बाळगावा !!