https://goodworld.in A website by Madhav Bhope

*बँकस्य कथा रम्या..* सायबर फ्रॉड-(३)* cyber-fraud-3

featured image for cyber fraud-3

लेखक 

श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद 

(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)

ही लेखमाला श्री कोटणीस यांच्या फेसबुक पेज वर नुकतीच त्यांनी प्रसिद्ध केली आहे आणि तिला वाचकांचा भरभरून प्रतिसाद नेहमीप्रमाणे मिळतो आहे. इथे ही लेखमाला या ब्लॉगच्या  वाचकांसाठी, श्री कोटणीस यांच्या परवानगीने प्रसिद्ध करीत आहोत.

 

cyber-fraud-3

सायबर फ्रॉड- (३)
 
 
*बँकस्य कथा रम्या:*
*सायबर फ्रॉड..(३)*

माझा गोंधळलेला चेहरा पाहून मला डोळ्यांनं खुणवून माझा हात धरून बावधनकर साहेब मला बाजूला घेऊन गेले आणि म्हणाले..
“साहेब, तुमची नक्की खात्री आहे की हा डिजीएम साहेबांचाच फोन आहे ?”

मी उसळून म्हणालो..
“अरे ! हा काय प्रश्न झाला ? मी बरेच दिवस डिजीएम साहेबांच्या सहवासात राहिलो आहे, त्यांचा आवाज मी चांगलाच ओळखतो. मी खात्रीनं सांगू शकतो की हा नक्की त्यांचाच आवाज आहे. पण.. तुम्ही असं का विचारताय ?”

“कारण मला शंका येतेय की पलीकडून बोलणारी व्यक्ती आपले डिजीएम साहेब नसावेत..”

कसलातरी विचार करीत गंभीर चेहऱ्याने बावधनकर साहेब म्हणाले.

“कशावरून..?” मी विचारलं.

“हा आवाज, ही बोलण्याची पद्धत जरी हुबेहूब आपल्या डिजीएम साहेबां सारखीच असली तरी एका गोष्टीमुळे शंका येतेय. ती म्हणजे.. कितीही चिडले तरी आपले डिजीएम साहेब कधीही आणि कुणालाही अजिबात अशा शिव्या देत नाहीत.. कुणाबद्दल साधे अपशब्दही ते कधी वापरत नाहीत..”

बावधनकर साहेबांनी व्यक्त केलेली शंका तशी अगदी यथार्थ अशीच होती. आमचे रकिब साहेब खूप मृदु हृदयाचे होते. कदाचित आमच्याकडून पैसे पाठविण्यास उशीर झाल्याने ते चिडले असतील आणि तशा उतावीळ, उत्तेजित अवस्थेत त्यांच्या तोंडून ते अपशब्द बाहेर पडले असावेत.

अचानक मला आठवलं..

डिजीएम साहेबांचे व्यवस्थापकीय सचिव (Adm. Sec. to DGM) श्री. अनिल सास्तुरे हे माझे बॅचमेट, माझे जवळचे मित्र होते. त्यांच्या कानावर ही गोष्ट घातली तर..?

लगेच मी सास्तुरे साहेबांना फोन लावला. सुदैवाने त्यांनी तो पहिल्याच झटक्यात उचलला. दुपारपासून झालेला घटनाक्रम मी त्यांना थोडक्यात सांगितला. त्यावर ते म्हणाले..

“डिजीएम साहेब तर आज सकाळपासून ऑफिसमध्येच आहेत. तरी देखील त्यांनी तुला असा फोन केला होता का ? याबद्दल त्यांनाच विचारून लगेच तुला कळवतो..”

अवघ्या मिनिटाभरातच सास्तुरे साहेबांचा फोन आला. ते म्हणाले..

“अरे, डिजीएम साहेबांना मी तुझा किस्सा सांगितला तेव्हा ते खूप मोठ्यानं हसले आणि म्हणाले की कुणीतरी प्रॅक्टिकल जोक केला असावा. ते तर विनोदाने असंही म्हणाले की.. त्या कोटनिसला सांगा की पैसे मागायचेच असते तर मी कमीतकमी दोन तीन लाख रुपये तरी मागितले असते. माझ्या नावाने फक्त चाळीस हजार रुपये मागून त्या जोक करणाऱ्या व्यक्तीने एकप्रकारे अप्रत्यक्षपणे माझी लायकी कमी लेखून माझा अपमानच केला आहे..”

थरथरत्या स्वरातच सास्तुरेंना “थॅन्क्स..!” म्हणून मी कॅशियर कडे धाव घेतली. “सॉरी.. पण आता पैसे पाठवायची गरज नाही आहे..” असं त्याला सांगून ते व्हाउचर आणि चाळीस हजार रुपये परत घेतले आणि सुटकेचा निःश्वास टाकला.!

एव्हाना, सास्तुरे साहेबांनी मला काय सांगितलं असावं याचा बावधनकर साहेबांना अंदाज आलाच होता. ते म्हणाले..

“तुम्हाला त्या नकली डिजीएमचा फोन किती वाजता आला होता ?”
“अं.. ठीक दोन वाजता..!”
“अच्छा..! आणि किती वेळात वैजापूरला पोहोचतो असं त्यांनी सांगितलं..?”
“अर्ध्या तासात..!”
“पहा..! आत्ता साडेतीन होतायेत. म्हणजे तब्बल दीड तास झाला त्याचा फोन येऊन. एवढ्या वेळात तर औरंगाबादहून सुद्धा इथपर्यंत पोहोचता येतं..”
बावधनकर साहेब बोलत असतानाच माझा मोबाईल वाजला. नंबर पाहून मी म्हटलं..
“हा त्या नकली डिजीएम चाच फोन आहे..”
“द्या तो फोन इकडे..! आता मीच बोलतो त्याच्याशी..! मघाशी विनाकारण खूप शिव्या ऐकून घेतल्या त्याच्या.. !!”
असं म्हणून बावधनकर साहेबांनी माझ्याकडून फोन जवळ जवळ हिसकावूनच घेतला.

“नमस्ते साब..! बावधनकर बात कर रहा हूँ..!”
“अरे ! क्या sss बावधनकरजी ? आखिर क्या.. प्रॉब्लेम क्या है जी ? अभी तक उस खाते में पैसे क्यों नहीं जमा हुए ?”
“साब, अभी यहां कनेक्टिव्हिटी का थोड़ा प्रॉब्लेम चल रहा है.. बस कुछ ही देर में सॉल्व्ह हो जाएंगा.. लेकिन सर, आप तो आधे घंटे में यहां आने वाले थे.. क्यों नहीं पहुंचे सर अभी तक ?”
“अरे, रास्ते में हमारी लासूर ब्रँच पड़ती है ना, वहीं पर थोड़ी देर के लिए रुका हूँ..”

“तू वहीं रुक साले sss ! हम पुलिस को लेकर वहीं पर पहुंच रहे है ! खुद को ज्यादा शाणा समझता है क्या ? अभी तुझे तेरी नानी याद दिलाता हूँ.. !!”

बावधनकर साहेबांनी असा काही रुद्रावतार धारण केला की पलीकडच्या त्या नकली डिजीएमने घाबरून फोनच बंद केला. खरं तर त्यांना आणखी खूप शिव्या द्यायच्या होत्या त्या तोतया डिजीएमला.. पण त्याने फोनच कट केल्यामुळे त्यांचा नाईलाज झाला.

त्यानंतर अष्टपुत्रे साहेबांच्या केबिनमध्ये बसून आम्ही त्या तोतया डिजीएमने पाठविलेल्या अकाउंट नंबर बद्दल डिटेल एन्कवायरी केली तेंव्हा समजलं की SBI च्या गाझियाबाद शाखेचं ते खातं कुणा दीपक कुमार चौरसिया नावाच्या व्यक्तीचं होतं. त्या खात्यातील काही अलीकडचे व्यवहार तपासले असता एक धक्कादायक बाब उघड झाली. 

ती अशी की गेल्या काही दिवसात देशाच्या विविध भागातून त्या खात्यात चाळीस चाळीस हजार रुपये जमा झाल्याच्या अनेक नोंदी होत्या. हे पैसे खात्यात जमा होताच लगेच काढून घेण्यात आले होते आणि सध्या त्या खात्यात फक्त मिनिमम बॅलन्स बाकी ठेवण्यात आला होता. म्हणजेच हे एक मोठं रॅकेट होतं आणि देशाच्या विविध राज्यांत ते पसरलेलं होतं. त्यावेळी एटीएम द्वारे एका खात्यातून एका दिवसात जास्तीतजास्त चाळीस हजार रुपयेच काढता येत असल्याने तेवढीच रक्कम सर्वांकडून मागविण्यात आली असावी.

अष्टपुत्रे साहेबांनी मागविलेला चहा पिऊन आणि त्यांचे आभार मानून बँकेत परतलो. केवळ आमचे अकाउंटंट श्री सुनील बावधनकर यांच्या सतर्कतेमुळेच आज फार मोठ्या फसवणुकी पासून मी वाचलो होतो. त्यामुळे त्यांचे शतशः आभार मानले आणि ताबडतोब रिजनल ऑफिसमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कानावर झालेला सर्व प्रकार घातला. तसंच फसवणुकीचा प्रयत्न झाल्याबद्दल अज्ञात व्यक्ती विरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करावी का ? याबद्दल वरिष्ठांना सल्लाही विचारला.

मात्र “प्रत्यक्षात पैशाचं कोणतंही नुकसान झालं नसल्याने पोलिसांत तक्रार केल्यास प्रकरणास विनाकारण चुकीची प्रसिद्धी मिळून बँकेची बदनामीच होईल..” असे कारण देत वरिष्ठांनी पोलिसांत तक्रार देण्याची परवानगी दिली नाही. तसंच ही बाब गुप्तच ठेवा आणि झालेल्या प्रकरणाबद्दल गावात किंवा स्टाफमध्ये अजिबात चर्चा करू नका असा वैयक्तिक खाजगी सल्लाही दिला.

ज्या खात्याचा उपयोग करून बसल्या बसल्या केवळ मोबाईल वर बोलून अनेकांची फसवणूक केली जात आहे, “तो” (दीपक कुमार चौरसियाचा) खाते नंबर व “तो”(तोतया डिजीएमचा) मोबाईल नंबर पोलिसांना दिल्यास ते या प्रकरणी सखोल चौकशी करतील आणि गुन्हेगारांना अटक करतील.. परिणामत: भविष्यात होणाऱ्या अनेकांच्या संभाव्य फसवणुकीला आळा घालता येईल, असं मला वाटत होतं. परंतु वरिष्ठांच्या आदेशाचं तंतोतंत पालन करणं मला भाग होतं. त्यामुळे खूप इच्छा असूनही या प्रकरणी पोलिसांत कोणतीही तक्रार दिली नाही.

काही दिवसांनी कानांवर ज्या बातम्या उडत उडत आल्या त्यावरून असं समजलं की गेल्या काही दिवसांत त्या नकली डिजीएमने आमच्या बँकेच्या गंगापूर, कन्नड, अंबड, परतूर, सेलू, गंगाखेड, वसमत, हिंगोली, कळमनुरी अशा अनेक शाखांच्या मॅनेजर्सना असाच फोन करून पैसे पाठवायला सांगितले होते. नेमके किती मॅनेजर्स त्या तोतयाच्या जाळ्यात फसून पैसे घालवून बसले हे जरी खात्रीलायकरित्या समजलं नसलं तरी किमान तीन-चार मॅनेजर्सनी “आपण त्या खात्यावर पैसे पाठवून लुबाडलो गेलो असल्याची” खाजगीत प्रामाणिकपणे कबुली दिल्याची आम्हा अधिकारी वर्गात कुजबुज होती.


या घटनेच्या सुमारे वर्षभरानंतर काही प्रमुख वृत्तपत्रांत “बँकेतील उच्च पदस्थांच्या आवाजाची हुबेहुब नक्कल करून बँक कर्मचारी/अधिकाऱ्यांना गंडा घालणाऱ्या टोळीस अटक..” या मथळ्याखाली एक विस्तृत बातमी छापून आली. सदर टोळीचे सदस्य वेगवेगळ्या बहाण्यांनी देशभरातील विविध बँकांच्या रिजनल/झोनल कार्यालयात जाऊन कार्यालय प्रमुखांची भेट घ्यायचे व त्यांचा आवाज, बोलण्याची पद्धत इत्यादीचा बारकाईने अभ्यास करायचे. तसेच बँकेच्या कार्यक्षेत्रातील शाखा, अधिकारी/ शाखाधिकाऱ्यांची नावे, त्यांचे फोन नंबर इत्यादी माहिती मिळवून त्याचा उपयोग करून आणि उच्च पदस्थांच्या आवाजाची तंतोतंत नक्कल करून पैशांची मागणी करायचे. सिंडिकेट बँकेच्या सांगली शाखेतील मॅनेजरने याबाबत पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानंतर पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवली आणि उत्तर प्रदेशातील मेरठ येथून टोळीच्या सदस्यांना अटक केली होती.

या घटनेच्या निमित्ताने वाघमारे बाईंची आदर्श शाळा पाहण्यात आली. तेथील परोपकारी, सेवाभावी शिक्षकांपासून प्रेरणा घेऊन वैजापुरातील अनाथ विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाला सढळ हाताने नियमितपणे वैयक्तिक मदत करण्यास प्रवृत्त झालो. बँकेच्या “SBH विद्या” योजने अंतर्गत दरवर्षी शाळेतील काही गरजू विद्यार्थिनींना दत्तक घेऊन त्यांचा दहावी पर्यंतचा सर्व खर्च बँकेतर्फे करण्याची व्यवस्था करण्यात आली. बँकेच्या “कम्युनिटी वेल्फेअर” योजने अंतर्गत शाळेला वॉटर प्युरिफायर, वॉटर कूलर व सिलिंग फॅन्स उपलब्ध करून देण्यात आले. शिक्षण घेण्यासाठी जवळच्या खेड्यांतून पायी चालत येणाऱ्या शाळेतील गरीब विद्यार्थिनींना बँकेच्या स्टाफ कडून वर्गणी गोळा करून सायकलीही पुरवण्यात आल्या.


कधी कधी वाटतं की त्या दिवशी SBI स्टाफचं लंच टाईमला शिर-खुर्मा खाण्यासाठी बाहेर जाणं आणि उशिरानं येणं, बावधनकर साहेबांनी तोतया डिजीएमचा फोन उचलणं, डिजीएम साहेबांचे सेक्रेटरी श्री. सास्तुरे साहेबांना फोन करून विचारण्याची मला बुद्धी होणं.. हा सारा काय निव्वळ योगायोगच होता ? तसं पाहिलं तर सकाळी फोन द्वारे अशीच फसवणूक झालेल्या वाघमारे बाईंचं बँकेत येणं म्हणजे एक प्रकारे मला मिळालेला सावधगिरीचा इशाराच होता. पण तरी सुद्धा डिजीएम साहेबांचं नुसतं नाव ऐकताच अती-उत्तेजीत होऊन सारासार विचार करण्याची बुद्धीच मी हरवून बसलो होतो.
थोडक्यात काय, तर काळ आला होता पण वेळ आली नव्हती.
कदाचित.. त्या दिवशी शाळेतून परततांना कसलाही अभिमान न बाळगता, अगदी निर्मळ हृदयानं वाघमारे बाईंची मनापासून माफी मागितल्यावर त्यांच्या मनात माझ्याबद्दल ज्या सद्भावना आल्या असतील त्यांच्या प्रभावाने तर माझ्यावर आलेलं संकट टळलं नसेल ना ?

(समाप्त)


अजय कोटणीस 


ajay kotnis photo1

श्री अजय कोटणीस हे बँकेतील माझे सहकारी असून, स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३८  वर्षांचा प्रदीर्घ अनुभव  असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानकावर खिळवून ठेवतात.  

त्यांना वैजापूर या गावी असतांना आलेला एक अनुभव हा बँकर्स ला किती निरनिराळ्या आणि विचित्र अनुभवांना सामोरे जावे लागते याचे चित्तथरारक वर्णन आहे. 

या आधीचे प्रकरण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

*बँकस्य कथा रम्या..* सायबर फ्रॉड-१

*बँकस्य कथा रम्या..* सायबर फ्रॉड-२

 

*बँकस्य कथा रम्या..* सायबर फ्रॉड-(2)* cyber-fraud-2

atm-2

लेखक 

श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद 

(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)

ही लेखमाला श्री कोटणीस यांच्या फेसबुक पेज वर नुकतीच त्यांनी प्रसिद्ध केली आहे आणि तिला वाचकांचा भरभरून प्रतिसाद नेहमीप्रमाणे मिळतो आहे. इथे ही लेखमाला या ब्लॉगच्या  वाचकांसाठी, श्री कोटणीस यांच्या परवानगीने प्रसिद्ध करीत आहोत.

 

cyber-fraud-2

सायबर फ्रॉड- (२)
 
आमचे डीजीएम श्री. बिजॉय रकीब म्हणजे एक अतिशय निस्पृह, प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष असं आदर्श व्यक्तिमत्व होतं.
 
मध्यम उंची, सुदृढ देहयष्टी, तुळतुळीत टक्कल आणि मूळचे काश्मिरी असल्याने गोऱ्या गुलाबी कांतीचे असलेले रकिब साहेब कामाच्या बाबतीत जितके कडक, शिस्तप्रिय होते तितकेच व्यक्तिगत जीवनात अत्यंत रसिक, जिंदादिल व साहित्य, सिने-नाट्य, गीत, संगीत प्रेमी होते. 
 
यापूर्वी परभणी रिजनल ऑफिसमध्ये कार्यरत असताना त्यांचा अतिशय निकटचा सहवास लाभला होता. त्यावेळी त्यांची साधी राहणी, समर्पित कार्यनिष्ठा, दिलखुलास वृत्ती व कर्मचाऱ्यांप्रती मैत्रीभाव, हे सारं जवळून अनुभवल्यामुळे त्यांच्याबद्दल मनात खूप आदरभाव होता.
 
असे हे माझे आवडते डिजीएम रकीब साहेब मला त्यांचे पर्सनल काम करण्याबद्दल विचारत होते. मला एक प्रकारे तो माझा सन्मानच वाटला.
 
“बात ऐसी है कि मेरा बेटा जो अभी दिल्ली में पढ़ रहा उसके दोस्त का आज सुबह दिल्ली के पास गाजियाबाद में एक्सीडेंट हुआ है । उसे वहां के अस्पताल में भर्ती कराया गया है और फिलहाल मेरा बेटाही उसकी देखभाल कर रहा है । 
 
अस्पताल के खर्चे के लिए उसे चालीस हजार रूपयोंकी तुरंत जरूरत है । औरंगाबाद से बाहर होने के कारण अभी मै उसकी कोई मदद नहीं कर पा रहा हूँ, इसलिए तुम्हे फोन किया है ।
 
मै तुम्हे एक अकाउंट नंबर देता हूँ.. ये मेरे बेटे के दोस्त का अकाउंट है । उस खाते में अर्जेंटली चालीस हजार रुपया जमा करना है। मेरा बेटा पैसों के लिए वहां एटीएम रूम के बाहर कार्ड लिए खड़ा हुआ है । पैसे खाते में जमा होते ही मुझे कॉल कर के बता देना । आधे घंटे के बाद जब मैं वैजापुर पहुंचूंगा तब तुम्हे चेक दे कर तुम्हारे पैसे लौटा दूंगा ।”
 
एवढं बोलून झाल्यावर मधेच थांबून रकीब साहेब म्हणाले..
“कोटनीसजी sss ! सुन रहे हो ना..?”
“हां सर ! सुन रहा हूँ सर..!!”
क्षणाचाही वेळ न दवडता मी उत्तर दिलं.
 
एकीकडे डिजीएम साहेबांचं बोलणं लक्षपूर्वक ऐकत असतांनाच एवढ्या तातडीने चाळीस हजार रुपये कुठून आणावेत ? याचाही मी विचार करीत होतो. महिना अखेर असल्याने माझ्या खात्यात जेमतेम पाचशे रुपयेच शिल्लक होते. बँकेतील अन्य कर्मचाऱ्यांच्या खात्यातही यावेळी मोठी रक्कम जमा असण्याची शक्यता जवळपास शून्यच होती.
 
डिजीएम साहेबांचं आपल्या भारी भक्कम, करड्या आवाजात आज्ञावजा सूचना देणं सुरूच होतं.
 
“हां..और एक बात ! ये SBI का खाता है । लेकिन याद रहे, RTGS या NEFT नहीं करना है, क्योंकि उसमें Funds transfer होने में काफी वक्त लग जाता है । SBI की ब्रँच में जाकरही इस अकाउंट में कॅश जमा करना पड़ेगा । समझ में आ गई पूरी बात ? Any doubts ?”
 
“जी नहीं सर! SBI में जा कर इस अकाउंट में चालीस हजार जमा करने है और पैसे Transfer होने पर आपको फोन करके बताना है ।”
 
“एक्झॅक्टली..! व्हेरी गुड ! कम ऑन..! बी क्विक..! अब फोन रक्खो, और पैसे लेकर SBI की तरफ दौड़ पड़ो..! आधे घंटे बाद आपसे मुलाकात होगी तब एक अच्छीसी चाय पिला देना..! In the mean time, I’m waiting for your phone. Don’t forget to call me. मिलते है.. बा sss य, कोटनीसजी..!”
 
फोन ठेवल्या ठेवल्या भिंतीवरील घड्याळाकडे नजर गेली. दोन वाजून दहा मिनिटे झाली होती. बाप रे ! ताबडतोब चाळीस हजार रुपये जमा करून SBI मध्ये जायला हवं. कारण अडीच वाजता त्या बँकेचा लंच टाईम सुरू होईल. लगेच इंटरकॉमवर बोलून अकाउंटंट श्री. सुनील बावधनकर यांना ताबडतोब केबिन मध्ये बोलावून घेतलं आणि त्यांना डिजीएम साहेबांच्या फोनबद्दल सांगितलं. कुशाग्र बुद्धीचे बावधनकर साहेब म्हणाले..
 
“साहेब, यावेळी तरी कुणाही स्टाफच्या खात्यात चाळीस हजार रुपये एवढी मोठी रक्कम शिल्लक असणं शक्यच नाही. तेंव्हा आता एकच मार्ग आहे. कुणातरी कस्टमर कडून तात्पुरते पैसे मागून आणणं.. आपल्या बँकेशेजारीच पेट्रोल पंप आहे. रोज दुपारी चार वाजता ते दिवसभराचा गल्ला आपल्या बँकेत जमा करतात. त्यामुळे त्यांच्याकडे आत्ता सुद्धा कॅश उपलब्ध असेलच. मी लगेच त्यांना फोन करून चाळीस हजार रुपये इथे मागवून घेतो. त्यांनी पैसे पाठविले की मग आपण SBI मध्ये जाऊ..”
 
बावधनकर साहेबांना वैजापूरला येऊन दोन वर्षं झाली होती. त्यामुळे वैजापूर गावात त्यांच्या भरपूर ओळखी होत्या. त्यांनी फोन केल्यावर पाचच मिनिटांत पेट्रोल पंप मालकाने चाळीस हजार रुपयांची कॅश बँकेत पाठवली. मात्र ती कॅश म्हणजे पाच रुपये, दहा रुपये, वीस रुपये, पन्नास रुपये अशा लहान मोठ्या किमतीच्या नोटांची अनेक बंडले होती. एवढी जास्त नोटांची बंडले कदाचित SBI ने स्वीकारलीही नसती. म्हणून हेड कॅशियरकडे ती बंडले सोपवून त्या लहान नोटांच्या बदल्यात दोन हजार रुपयांच्या वीस नोटा एक्सचेंज करून घेतल्या.
 
या सर्व धावपळीत दोन वाजून पंचवीस मिनिटे होऊन गेली होती. तोपर्यंत बँकेच्या जीपच्या ड्रायव्हरने जीप बँके बाहेर काढून सुरू करून ठेवली होती. अक्षरशः धावत पळतच आम्ही जीप मध्ये बसलो आणि ठीक अडीचच्या ठोक्याला SBI मध्ये पोहोचलो.
 
बँकेत शुकशुकाट दिसत होता. हॉलमधील बाकावर बसलेले दोन तीन कस्टमर वगळता काउंटर्सच्या पलीकडे एकही कर्मचारी किंवा अधिकारी दिसत नव्हता. गेटवरील वॉचमनकडे चौकशी केली तेव्हा कुणातरी मुस्लिम कस्टमरच्या निमंत्रणावरून सगळा स्टाफ नुकताच त्याच्याकडे रमझान ईद निमित्त शिर-खुरमा खाण्यासाठी गेल्याचे समजले. सुदैवाने SBI चे मॅनेजर श्री. अष्टपुत्रे व अन्य सर्व अधिकारी हे बावधनकर साहेबांचे घनिष्ठ मित्र होते. त्यांनी लगेच अष्टपुत्रे साहेबांना फोन लावून आम्ही अर्जंट कामानिमित्त त्यांच्या ब्रँचमध्ये आल्याचे कळविले तेव्हा ते म्हणाले..
 
“सॉरी..! पण येथील प्रख्यात बिल्डर व आमचे “हाय व्हॅल्यू कस्टमर” श्री. समद खान यांच्याकडे नुकताच शिर-खुर्म्यासाठी आलो आहे. मात्र तुमच्यासाठी येथील कार्यक्रम लवकरात लवकर आटोपून अवघ्या पंधरा वीस मिनिटांतच मी बँकेत परत येतोय..”
 
बावधनकर साहेबांचे अष्टपुत्रे साहेबांशी बोलणे चालू असतानाच मला मोबाईल वर एक कॉल आला. नंबर अनोळखी होता. मी फोन उचलला. पलीकडून डिजिएम साहेबच बोलत होते. किंचित चिडक्या, वैतागलेल्या स्वरात ते म्हणाले..
 
“अरे क्या है भाई कोटनीसजी ? आपने अभी तक खाते में पैसे जमा नहीं करवाए ? उधर से मेरा बेटा मुझे फोन पे फोन किए जा रहा है..! मेडिकल इमर्जन्सी है भाई, मौके की नजाकत को जरा समझो यार.. “
 
“सॉरी सर.. फिलहाल हम SBI में ही आए हुए है..” असं म्हणून मी त्यांना येथील सर्व परिस्थिती सांगितली. त्यानंतर सहज मी त्यांना विचारलं..
“सर, ये आपका नया मोबाईल नंबर है क्या ? क्योंकि मेरे पास आपका जो नंबर सेव्ह है, वो ये नंबर नहीं है..!”
 
त्यावर डिजिएम साहेब म्हणाले..
“अरे नहीं नहीं..! मेरा नंबर वहीँ है जो आपने सेव्ह कर रक्खा है। अभी अभी मेरे उस मोबाइल की चार्जिंग खतम हुई, इसलिए कार ड्रायव्हर के मोबाईल से बात कर रहा हूँ। जब खाते में पैसे जमा हो जाए तब मुझे इस ड्रायव्हर के नंबर पर ही inform करना..!”
 
डिजिएम साहेबांशी बोलणं संपवून, ‘आता अष्टपुत्रे साहेब येईपर्यंत पंधरा वीस मिनिटं कुठे टाईम-पास करावा ?’ याचा विचार करीत असतांनाच मागून कुणा स्त्रीनं “नमस्कार साहेब sss !” असा आवाज दिला म्हणून मागे वळून पाहिलं तर त्या सकाळी बँकेत आलेल्या मुख्याध्यापिका वाघमारे बाई होत्या. त्या म्हणाल्या..
 
“मी या बँकेतून होम लोन आणि पर्सनल लोन घेतलं आहे. काही कारणास्तव या महिन्याचा कर्जाचा हप्ता भरू शकत नाही हे मॅनेजर साहेबांना सांगण्याकरता इथे आले होते. पण ते कुठेतरी बाहेर गेल्यामुळे त्यांच्याशी भेट झाली नाही. तसाही आता बँकेचा लंच टाईम आहे. माझी शाळा बँकेच्या अगदी समोरच आहे. इथे थांबण्यापेक्षा थोड्या वेळासाठी तुम्ही जर माझ्या शाळेत आलात तर मला खूप आनंद होईल. प्ली sss ज सर..!”
 
वाघमारे बाईंचा आग्रह मोडणं माझ्या अगदी जीवावर आलं. तसंही अष्टपुत्रे साहेब पंधरा वीस मिनिटां नंतरच येणार होते.
“ठीक आहे.. फक्त दहा मिनिटांसाठी येतो..”
 
असं म्हणून बावधनकर साहेबांना घेऊन रस्ता ओलांडून वाघमारे बाईंच्या शाळेत गेलो.
 
वाघमारे बाईंनी शाळा छान स्वच्छ व सुंदर ठेवलेली होती. शाळेच्या आवारात आकर्षक फुलझाडं कलात्मकरित्या लावलेली होती. पटांगणाच्या मध्यभागी असलेल्या पाण्याच्या छोट्याशा हौदात कमळावर बसून वीणा वादन करीत असलेल्या सरस्वतीची छोटीशीच पण सुबक अशी मूर्ती होती. शाळेच्या बाहेरील भिंतीवर जागोजागी सुंदर अक्षरात सुविचार लिहिलेले होते. सर्व वर्गात शिक्षक मन लावून शिकवित होते. वर्गातील मुली सुद्धा शांत बसून एकाग्र चित्ताने शिक्षकांच्या शिकवण्याकडे लक्ष देत होत्या. सारं वातावरण एकदम प्रसन्न, आल्हाददायक वाटत होतं.
 
इतक्यात शाळेची मधली सुटी झाली. कसलाही गडबड, गोंधळ वा आरडा ओरड न करता मुलीं वर्गाबाहेर येऊन शाळेच्या पटांगणातील वडाच्या पारावर तसंच ठिकठिकाणी ठेवलेल्या बाकांवर जाऊन बसल्या. वाघमारे बाईंनी आम्हाला टीचर्स रूम मध्ये नेऊन सर्व शिक्षकांचा परिचय करून दिला.
 
त्या शाळेतील सर्वच शिक्षक ध्येयाने झपाटलेले होते. प्रत्येक शिक्षकाने शाळेतील दहा दहा गरीब विद्यार्थिनी दत्तक घेतलेल्या होत्या. त्यांच्या वह्या पुस्तकांचा, युनिफॉर्म, दप्तराचा सर्व खर्च हे सारे शिक्षक स्वतःच्या पगारातून करीत असत. याशिवाय गरीब, होतकरू विद्यार्थिनींच्या घरी जाऊन त्यांच्या अडचणी समजून घेणं, त्यांच्या पालकांशी संवाद साधणं, मुलींना पुढे शिकविण्यासाठी त्यांना प्रवृत्त करून प्रोत्साहन देणं, अशी अनेक समाजोपयोगी कामं हे शिक्षक आवडीनें व हिरीरीनं करीत असत. त्या शिक्षकांच्या तोंडून हे सारं ऐकून मी तर भारावूनच गेलो. आपणही यापुढे गरीब व अनाथ विद्यार्थ्यासाठी काम करणाऱ्या संस्थांना, वसतिगृहांना सढळ हाताने मदत करायची असा त्याचवेळी मनोमन निर्धार केला.
 
आम्ही शाळेच्या बाहेर निघालो तेव्हा वाघमारे बाई आम्हाला सोडायला शाळेच्या गेट पर्यंत आल्या होत्या. त्यांचा निरोप घेताना मी म्हटलं..
“मॅडम, माफ करा ! आज सकाळी मी तुम्हाला नकळत दुखावलं. खरं म्हणजे त्या झालेल्या प्रकारात तुमची काहीच चूक नव्हती. तुम्ही तर स्वच्छ, निष्पाप मनानं समोरच्या फसवणाऱ्या व्यक्तीच्या फोनवर विश्वास ठेवला होता. कुणासोबतही असं घडू शकतं. तुम्हीं गेल्यानंतर मला खूप वाईट वाटलं. खरंच, चुकलो मी… सॉरी !”
 
वाघमारे बाईंनी मनमोकळं, मंद सुहास्य करीत हलकेच आपली मान किंचित खाली झुकवली. जणू माझ्या दिलगिरीचा स्वीकार करून त्यांनी मला माफ केलंय असंच मला वाटलं. माझ्या मनावरचं ओझं एकदम नाहीसं झालं आणि प्रफुल्लित मनानं मी SBI कडे जाण्यास निघालो. एवढ्यात माझ्या मोबाईलची रिंग वाजली. मी नंबर पहिला. तो मघाचाच डिजीएम साहेबांच्या ड्रायव्हरचा फोन नंबर होता.
 
मला एकदम धडकीच भरली. अरे बापरे ! बघता बघता तीन वाजले की..! आपण अजून डिजीएम साहेबांनी सांगितलेल्या खात्यात पैसे जमा केलेलेच नाहीत. डिजीएम साहेब आता नक्कीच मला खूप झापणार.. काय करावं ? फोन उचलावा की नाही ?
माझा चिंताग्रस्त चेहरा पाहून बावधनकर साहेब म्हणाले..
 
“काय झालं साहेब ?”
 
“अहो, डिजीएम साहेबांचा सारखा फोन येतोय. अष्टपुत्रे साहेब तर अजूनही बँकेत परत आलेले नाहीत. आता डिजीएम साहेबांना काय उत्तर देऊ ?”
यापूर्वी झोनल ऑफिसमध्ये काम केलं असल्याने बावधनकरांचाही डिजीएम साहेबांशी परिचय होता. त्यामुळे ते म्हणाले..
“द्या तो फोन इकडे..! मी समजावून सांगतो त्यांना..!”
 
बावधनकर साहेबांनी माझ्याकडून मोबाईल घेऊन तो त्यांच्या कानाला लावताच पलीकडून डिजीएम साहेब कडाडून बरसले..
 
“व्हॉट द हेल यू आर डूइंग देअर सीन्स लास्ट वन अवर कोटनीसजी ? नॉनसेन्स ! एक छोटासा काम करने को कहा था आपको.. ! यू ब्लडी फूल..! अब रहने दो.. मै कोई और इंतजाम कर लेता हूँ..! हॅट या sss र, मैने सोचा था कोटनीस अपना आदमी है, तुरंत काम कर देगा..! बट आय वॉज राँग.. यू लेट मी डाऊन.. यू हॅव डिसहार्टेड मी, शेम ऑन यू..! यू हॅव डिसअपॉइंटेड मी ग्रेटली..”
 
डिजीएम साहेबांच्यां तोफेचा असा प्रचंड भडिमार सुरू असतानाच अष्टपुत्रे साहेब लगबगीनं बँकेत शिरताना बावधनकर साहेबांनी पाहिलं आणि डिजीएम साहेबांना मध्येच थांबवित ते म्हणाले..
 
“सर..सर..सर..! प्लीज सुनिये..! मै अकाउंटंट बावधनकर बात कर रहा हूँ.. अभी अभी SBI के मॅनेजर साब बँक में वापस लौट आए है.. अगले पांच ही मिनट में आपके बताए हुए खाते में पैसे ट्रान्सफर हो जाएंगे.. आप निश्चिंत रहिये..!”
 
बावधनकर साहेबांच्या शब्दांनी जणू जादूच केली. डिजीएम साहेब एकदम शांतच झाले. बावधनकरांचे आभार मानत ते म्हणाले..
“थँक्यू व्हेरी मच, बावधनकर जी ! ठीक है, अब मैं फोन रखता हूँ.. आप जल्दी से काम पूरा कर दो.. !”
 
त्यानंतर आम्ही घाईघाईनं SBI मध्ये पोहोचलो. अष्टपुत्रे साहेबांसोबतच बँकेतील अन्य स्टाफ सुद्धा परत येऊन आपापल्या काउंटरवर जाऊन बसला होता. क्रेडिट व्हाउचर वर गाझियाबाद शाखेतील खात्याचा नंबर टाकून ते व्हाउचर व सोबत आणलेल्या दोन हजाराच्या वीस नोटा मी कॅश काउंटरवर दिल्या. कॅशियरने पैसे मोजले आणि आता तो क्रेडिट व्हाउचर पोस्ट करणार इतक्यात.. अचानक बावधनकर साहेब कॅशियरला म्हणाले..
“थांबा ! आम्ही सांगेपर्यंत ते व्हाउचर पोस्ट करू नका. आलोच आम्ही दोन मिनिटांत..”
 
“ओके..” असं म्हणून आमचं व्हाउचर पोस्ट न करता तो कॅशियर दुसऱ्या कामाकडे वळला.
 
बावधनकर साहेबांना एकाएकी हे काय झालंय..? त्यांनी कॅशियरला व्हाउचर पोस्ट करण्यापासून का रोखलं आहे ? मला काहीच कळेना. पैसे पाठवण्यास उशीर झाल्यामुळे संतप्त झालेल्या डिजीएम साहेबांचा क्रुद्ध चेहरा नजरे समोर आला आणि आयत्या वेळी कामात मोडता घालणाऱ्या बावधनकर साहेबांचा किंचित रागही आला.
 
प्रश्नार्थक चेहऱ्याने मी त्यांच्याकडे पाहिलं..
 
(क्रमशः ३)

ajay kotnis photo1

श्री अजय कोटणीस हे बँकेतील माझे सहकारी असून, स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३८  वर्षांचा प्रदीर्घ अनुभव  असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानकावर खिळवून ठेवतात.  

त्यांना वैजापूर या गावी असतांना आलेला एक अनुभव हा बँकर्स ला किती निरनिराळ्या आणि विचित्र अनुभवांना सामोरे जावे लागते याचे चित्तथरारक वर्णन आहे. 

या आधीचे प्रकरण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

*बँकस्य कथा रम्या..* सायबर फ्रॉड-१

*बँकस्य कथा रम्या..* सायबर फ्रॉड-१-cyber-fraud-1

atm

लेखक 

श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद 

(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)

ही लेखमाला श्री कोटणीस यांच्या फेसबुक पेज वर नुकतीच त्यांनी प्रसिद्ध केली आहे आणि तिला वाचकांचा भरभरून प्रतिसाद नेहमीप्रमाणे मिळतो आहे. इथे ही लेखमाला या ब्लॉगच्या  वाचकांसाठी, श्री कोटणीस यांच्या परवानगीने प्रसिद्ध करीत आहोत.

cyber-fraud-1
*बँकस्य कथा रम्या..*
 (१)*सायबर फ्रॉड-१
 
त्यावेळी मी औरंगाबाद जिल्ह्यातील स्टेट बँक ऑफ हैदराबाद च्या वैजापूर शाखेत शाखाधिकारी म्हणून नुकताच कार्यभार सांभाळला होता.
 
एके दिवशी सकाळी, अगदी बँक उघडल्या उघडल्याच, चष्मा लावलेल्या, सोज्वळ, मृदु, सात्विक चेहऱ्याच्या एका मध्यम वयाच्या सडपातळ बाईंनी घाईघाईत माझ्या केबिनमध्ये प्रवेश केला. त्यांच्या चेहऱ्यावर घाबरल्याचे भाव दिसत होते. जोरजोरात श्वास घेत आणि कपाळावरील घाम पुसत त्या म्हणाल्या..
 
“साहेब, ताबडतोब माझं खातं बंद करा. नुकतेच कुणीतरी माझ्या खात्यातून तीस हजार रुपये काढून घेतले आहेत. हा पहा, माझ्या मोबाईलवर तसा मेसेजही आला आहे..”
 
हे बोलतांना त्या बाईंना चांगलीच धाप लागली होती. भीतीनं त्यांचा घसाही कोरडा पडल्याचं जाणवत होतं.
 
“हे पहा, तुम्ही अशा घाबरून जाऊ नका. शांत व्हा, आणि आधी इथे खुर्चीवर शांतपणे बसा पाहू..”
 
मी त्या बाईंना धीर देत म्हटलं. हातातली पर्स टेबलावर ठेऊन एक दीर्घ सुस्कारा सोडत त्या बाई खुर्चीवर बसल्या. 
 
मी त्यांच्यासाठी मागवलेलं पाणी त्यांनी आधाशासारखं घटाघटा पिऊन टाकलं. मग डोळ्यावरील चष्मा काढून पदराच्या टोकानं त्याची काच पुसण्याच्या निमित्तानं त्यांनी हळूच आपल्या डोळ्यातील अश्रूही टिपून घेतले. थोडावेळ काही न बोलता त्या स्वस्थ बसल्या. आता त्यांना बरं वाटत असावं असं समजून मी म्हणालो..
“हं.. सांगा आता ! काय घडलंय नेमकं..?”
 
खाली मान घालून रडवेल्या स्वरात त्या बाई म्हणाल्या..
 
“साहेब, माझं नाव ललिता वाघमारे. येथील जिल्हा परिषद कन्या शाळेत मी मुख्याध्यापिका आहे. 
शाळेच्या कामासाठी काल मी औरंगाबादला गेले असता दुपारी तीन वाजता एका व्यक्तीचा मला फोन आला. “मी बँकेतून बचत खात्याचा अधिकारी बोलतो आहे..” असं तो माणूस म्हणाला.
 
त्यानंतर माझं नाव आणि माझा अकाउंट नंबर सांगून तो माणूस म्हणाला की “तुमच्या खात्याचं kyc expire झाल्याने ते खातं ब्लॉक करण्यात आलं आहे. तुम्ही तुमच्या खात्यातून आता कोणताही व्यवहार करू शकणार नाही. तुमचं एटीएम कार्ड देखील ब्लॉक करण्यात आल्याने तुम्हाला एटीएम मधून सुद्धा पैसे काढता येणार नाहीत.”
 
एवढं बोलून थोडा दम घेऊन झाल्यावर त्या बाई पुढे म्हणाल्या..
 
“साहेब, योगायोगाने कालच माझे पगाराचे पैसे खात्यात जमा होणार होते. मी नेहमी एटीएम नेच खात्यातील पैसे काढते. त्या माणसाने एटीएम ब्लॉक झाल्याचे सांगताच धास्तावून “मग आता मला काय करावं लागेल ?” असं मी त्याला विचारलं. त्यावर तो म्हणाला..
“जर तुम्ही तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड व एटीएम कार्ड घेऊन संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत बँकेत आलात तर तुमचं खातं आजच पुन्हा सुरू करता येईल. अन्यथा उद्या शुक्रवार आहे. आणि शुक्रवार-शनिवार या दोन्हीं दिवशी ही कामे करता येत नसल्याने खाते पुन्हा सुरू होण्यासाठी तुम्हाला पुढील सोमवार पर्यंत वाट पहावी लागेल.”
 
मला आता त्या बाईंच्या कथेत इंटरेस्ट यायला लागला होता.
“बरं मग पुढे..?”
उत्सुकतेनं मी विचारलं.
 
“ज्यावेळी मी त्याला सांगितलं की सध्या मी औरंगाबादला असून आज साडेपाच पर्यंत बँकेत येणे शक्य नाही, तेंव्हा तो माणूस म्हणाला की “तुम्ही तुमचा आधार कार्ड नंबर, पॅन कार्ड नंबर व एटीएम कार्डचे डिटेल्स सांगा. तसेच एटीएम कार्ड मागील CVV नंबर सुद्धा सांगा. आम्ही इथून खात्याचा ब्लॉक काढल्यावर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल, तो आम्हाला कळवा. आम्ही तो ओटीपी कॉम्प्युटर मध्ये फीड केल्यावर तुमचं खातं पुन्हा सुरू होईल.”
एवढं बोलून त्या बाई थांबल्या. सायबर फ्रॉड करणाऱ्यांची ही नेहमीचीच मोडस ऑपरेंडी असल्याने पुढे काय घडलं असावं याचा एव्हाना मला पुरेपूर अंदाज आला होता.
 
“मग..? काय केलंत तुम्ही ? दिली त्या माणसाला सगळी माहिती..?”
खाली मान घालून माझ्या नजरेला नजर न देता हळूच त्या बाई पुटपुटल्या..
 
“हो..!”
 
आणि मग एकदम बळंच अवसान आणीत माझ्याकडे पहात किंचित तक्रारीच्या सुरात त्या म्हणाल्या..
 
“मग काय करणार साहेब ? एटीएम वापरण्याची आता एवढी सवय झाली आहे की एटीएम बंद होणार हे ऐकल्याबरोबर मी घाबरून गेले. शिवाय कालच आमचा पगारही होणार होता. तो ही काढायचा होता. बंद झालेलं एटीएम पुन्हा लगेच चालू झालं नसतं तर पैसे काढण्यासाठी बँकेत येऊन इथल्या गर्दीत तासभर रांगेत उभं रहावं लागलं असतं. त्या माणसानं सांगितल्याप्रमाणे ताबडतोब बँकेत येणं मला शक्य नव्हतं आणि एटीएम साठी सोमवार पर्यंत थांबण्या इतका मला धीर नव्हता.
 
सुदैवाने माझं एटीएम कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड माझ्या पर्समध्येच होतं. तो माणूस फसवत असेल अशी मला जराही शंका आली नाही. ताबडतोब मी त्याला त्यानं विचारलेली सर्व माहिती दिली आणि थोड्या वेळानं माझ्या मोबाईल वर आलेला ओटीपी नंबरही त्याला सांगितला. एटीएम पुन्हा चालू झाल्याचं त्या माणसाने सांगितलं तेंव्हा त्याला “थॅन्क्स” म्हणून मी पुन्हा माझ्या कामात व्यस्त झाले. खरं म्हणजे त्याचवेळी मोबाईल वर कोणता तरी मेसेज आल्याचा “नोटिफिकेशन ॲलर्ट साउंड” सुद्धा मी ऐकला, पण मी कामाच्या घाईत होते आणि एटीएम चालू झाल्या बद्दलचाच तो मेसेज असावा असं समजून तेंव्हा तो मेसेज मी पाहिला नाही.”
 
सलग एका दमात एवढं सारं बोलल्यामुळे वाघमारे बाईंचा श्वास फुलून आला होता. क्षणभर थांबून एक दीर्घ उसासा सोडत त्या पुढे म्हणाल्या..
“त्या दिवशी औरंगाबादचं काम संपवून वैजापूरला परतायला रात्र झाली, त्यामुळे आता उद्या सकाळीच एटीएम मधून पगाराची रक्कम काढू असा विचार केला. त्याप्रमाणे आत्ता सकाळी दहा वाजता जेव्हा तुमच्या बँकेशेजारील एटीएम मधून पैसे काढायला गेले तेव्हा “Insufficient balance” असा मेसेज आला म्हणून लगेच “मिनी स्टेटमेंट” काढलं, तर त्यात माझ्या खात्यातून काल तीस हजार रुपये काढल्याचं दिसत होतं. मला एकदम काल बँकेतून आलेला फोन आठवला आणि फसवणुकीची शंका आली. लगेच काल मोबाईलवर आलेला मेसेज काढून पाहिला, तर तो खात्यातून तीस हजार रुपये काढल्याचाच मेसेज होता..”
 
बोलता बोलताच वाघमारे बाईंच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. पण मघासारखा ते पुसण्याचा अट्टाहास न करता तशाच डबडबलेल्या डोळ्यानं आणि दोन्ही हात जोडून थरथरत्या आवाजात त्या म्हणाल्या..
 
“साहेब, माझा नवरा दारूडा आहे. काहीच कामकाज करत नाही तो. माझ्या पगारावरच सारं घर चालतं. पीएफ वगैरे कटून कसाबसा जेमतेम तीस हजार रुपये पगार खात्यात जमा होतो. तो साराच्या सारा गेला. कसा काढायचा आता महिना ? देणेकरी तर पैशाकरता जीव नकोसा करतील. बँकांच्या कर्जाचे हप्तेही भरायचे आहेत. दया करा साहेब, हात जोडून विनंती करते, कसंही करून माझे पैसे मला परत मिळवून द्या..”
 
वाघमारे बाईंची ती दयनीय अवस्था बघवत नव्हती. त्यांना धीर देत म्हटलं..
“मॅडम, अशा घाबरून जाऊ नका. आधी तुमचं खातं चेक करतो आणि मग बघतो काय करता येईल ते..”
 
मॅडमचं खातं चेक केलं तेव्हा खरोखरीच खात्यातून काल तीस हजार रुपये काढलेले दिसत होते. लगेच औरंगाबादच्या झोनल ऑफिसमधील एटीएम चॅनेल मॅनेजरशी बोलून त्यांना झालेला सर्व प्रकार सांगितला. ते म्हणाले..
 
“कस्टमरने ओटीपी स्वतःच्या मर्जीने (Willingly share) कळविला असल्याने बँक refund साठी जबाबदार नाही. तसंच असे गेलेले पैसे परत मिळण्याची शक्यताही खूपच कमी असते. मात्र कस्टमरचे खाते तसेच एटीएम कार्ड ब्लॉक करून त्याच्याकडून लेखी तक्रार घेऊन ती आमच्याकडे पाठविल्यास फ्रॉडस्टरच्या खात्यातील पेमेंट रोखण्याचा काहीतरी प्रयत्न करता येईल.”
 
वाघमारे मॅडमना हे सर्व सांगितल्यावर त्या म्हणाल्या..
“एकदा फसवून, खात्यातून पैसे काढून घेतल्यावर आता कसले परत मिळणार आहेत ते पैसे ? मी काही लेखी तक्रार वगैरे करणार नाही. तुम्ही फक्त एवढं करा की माझं हे सेव्हिंग खातं बंद करून टाका आणि दुसरं नवीन खातं उघडा. तसंच जुनं एटीएम कार्ड रद्द करून नवीन कार्ड इश्यु करा..”
 
खूप समजावून सांगून ही वाघमारे बाई ऐकेनात. शेवटी त्याचं खातं बंद करून ताबडतोब नवीन खातं उघडून दिलं आणि नवीन खात्याची एटीएम कार्ड रिक्वेस्टही टाकली. नवीन खात्याचं पासबुक त्यांच्या हातात ठेवत म्हणालो..
 
“हे घ्या मॅडम तुमच्या नवीन खात्याचं पासबुक. हा नवीन खाते नंबर तुमच्या वरिष्ठांना कळवा म्हणजे तुमचा पगार ह्या खात्यात जमा होत जाईल. तसंच आठ दहा दिवसांत तुमचं नवीन एटीएम कार्डही तुमच्या घरच्या पत्त्यावर येऊन जाईल. तुम्हाला पैशांची अर्जंट गरज असेल तर आमच्या बँकेकडून तुम्हाला ताबडतोब पन्नास हजार रुपयांपर्यंतचं पर्सनल लोन मिळू शकेल.”
 
पासबुक घेऊन वाघमारे मॅडम खाली मान घालून स्वतःशीच काहीतरी विचार करीत केबिनमध्ये शांत बसल्या असताना मी त्यांना म्हणालो..
 
“मॅडम, आम्ही लेखी मेसेज व ऑडिओ मेसेज द्वारे वारंवार खातेदारांना सावध करत असतो की.. “बँक कधीही फोन द्वारे कस्टमरला पिन किंवा ओटीपी नंबर मागत नाही. कधीही, कुणाही अनोळखी व्यक्तीला फोनवर ओटीपी किंवा पिन सांगू नका.” हा संदेश वारंवार तुमच्या मोबाईल वर दिसत असतो, ऐकू येत असतो. तरीदेखील तुमची अशी कशी फसगत झाली ? तुम्ही तर उच्च शिक्षित आहात, मुख्याध्यापिका आहात. तुम्हीच जर अशा घाबरून जाऊन कुणाही अनोळखी व्यक्तीला अशी महत्त्वाची माहिती फोनवर सांगितलीत तर कसं होईल ? तुमच्या सारख्या सुशिक्षित, जबाबदार व्यक्तीकडून अशा उतावीळ, धांदरट, बेजबाबदार व निष्काळजी वर्तनाची तर अजिबातच अपेक्षा नव्हती..”
 
मान वर करून माझ्याकडे एकटक पाहत वाघमारे बाई म्हणाल्या..
“पटतंय मला. केवळ फोन वरून कुणीही काहीतरी बोललं म्हणून मी एकदम असं घाबरून जायला नको होतं. यात जसा माझा मूर्खपणा आहे तशीच ही गोष्ट जर बाहेर कुणाला समजली तर त्यात माझी बदनामी सुद्धा आहे. सगळेजण मला अक्कलशून्य, बावळट समजतील. म्हणूनच मी लेखी तक्रार देण्याचं टाळलंय.
आता आणखी एकच विनंती आहे की कृपया ह्या झालेल्या प्रकाराची तुम्ही कुठेही वाच्यता करू नका. हे छोटंसं गाव आहे. गावभर बातमी पसरायला वेळ लागणार नाही. आणि मग.. आत्ता तुम्ही मला जसा उपदेश केलात तसाच उपदेश गावातील जो तो माणूस मला ऐकवू लागेल..”
 
“तुम्ही अगदी निश्चिंत रहा. सुदैवाने माझ्याखेरीज बँकेतील अन्य कुणालाही या घटनेबद्दल किंचितही कल्पना नाही. आणि माझ्याकडून ही गोष्ट कायम गुप्तच ठेवली जाईल..”
 
टेबलावरची पर्स उचलून निमूटपणे, जड पावलांनी वाघमारे बाई बँकेबाहेर निघून गेल्या. त्यानंतर कितीतरी वेळ मी त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघतच राहिलो.
 
मला राहून राहून वाटत होतं की आधीच निराश, खचलेल्या आणि दुःखात असलेल्या वाघमारे बाईंना मी असं टोचून बोलायला नको होतं. “एक वाईट अनुभव समजून, झालं गेलं विसरून जा, आणि यापुढे सावधगिरी बाळगा..” असं म्हणून त्यांना धीर देण्याऐवजी त्यांच्या शिक्षणावर, त्यांच्या शिक्षिका असण्यावर बोट ठेवून त्यांना मी अप्रत्यक्षपणे मूर्ख, बावळट आणि घाबरटच म्हटलं होतं. जेव्हा फसगत व्हायची असते तेव्हा सारासार विचार न करता मनुष्य समोरच्यावर डोळे मिटून विश्वास ठेवतो. त्या थोड्या वेळाकरता त्याची जणू बुद्धीच काम करेनाशी होते. हे कुणाबाबतही घडू शकतं. न जाणो उद्या माझ्यावर सुद्धा असा प्रसंग आला तर..?
 
मी घड्याळात पाहिलं. बारा वाजून गेले होते. आज बँकेत अजिबातच गर्दी नव्हती. बऱ्याच दिवसांनी निवांत वेळ मिळाल्याने टेबलावरची कामं भराभरा उरकून पेंडिंग ऑडिट रिप्लाइज देण्याच्या कामात मी गढून गेलो. थोड्या वेळानं मान वर करून पाहिलं तर दुपारचे दोन वाजले होते. “बापरे ! वेळ कसा चट्कन निघून गेला ते कळलंही नाही..” स्वतःशीच मी पुटपुटलो. ऑडिट रिप्लाईजचं रेंगाळलेलं पण महत्त्वाचं असं काम एकदाचं पूर्ण झाल्यामुळे समाधानानं खुर्चीवर बसल्या बसल्या मागे रेलून कुठलं तरी आवडतं गाणं गुणगुणू लागलो तोच टेबलावरील लॅन्ड लाईन फोन खणखणला..
 
या मोबाईलच्या जमान्यात लॅन्ड लाईन कॉल म्हणजे नक्कीच रिजनल ऑफिस किंवा झोनल ऑफिसचा फोन असावा असा विचार करीतच रिसिव्हर उचलला. माझा अंदाज खरा ठरला. पलीकडून खुद्द डिजीएम साहेबच बोलत होते..
“हॅलो..! कोटनीस जी sss! कैसे हो ? मैं डीजीएम बात कर रहा हूँ..”
“हॅलो सर..! कोटनीस बात कर रहा हूँ सर..! मैं ठीक हूँ सर..!”
तत्परतेने मी त्यांना प्रत्युत्तर दिलं.
 
डीजीएम साहेबांचा फोन आहे हे समजताच नकळत लगबगीनं स्वतःला सावरून घेत, खुर्चीवर ताठ होऊन बसत जीवाचा कान करून ते काय सांगत आहेत ते मी ऐकू लागलो..
“सुनो, कोटनीस जी sss ! मै शिर्डी ब्रँच व्हिजिट के लिए औरंगाबाद से घंटाभर पहलेही निकल चुका हूँ । आधे घंटे में वैजापुर पहुँचूंगा । वहाँ दो मिनट रुक कर फिर आगे निकल जाऊंगा । मेरा एक पर्सनल काम है.. करोगें ?”
“क्यों नहीं सर ! इट्स माय प्लेझर..! आप बस हुकुम कीजिए सर, प्ली sss ज.. !!”
आवाजात शक्य तितकी अदब, तत्परता व आज्ञाधारकपणा आणीत म्हणालो.
( क्रमशः 2 )

ajay kotnis photo1

श्री अजय कोटणीस हे बँकेतील माझे सहकारी असून, स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३८  वर्षांचा प्रदीर्घ अनुभव  असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानकावर खिळवून ठेवतात.  

त्यांना वैजापूर या गावी असतांना आलेला एक अनुभव हा बँकर्स ला किती निरनिराळ्या आणि विचित्र अनुभवांना सामोरे जावे लागते याचे चित्तथरारक वर्णन आहे. 

एटीएम चे थरारक नाट्य- भाग-५ अजय कोटणीस

goodworld_atm natya-7

लेखक 

श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद 

(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)

ही लेखमाला श्री कोटणीस यांच्या फेसबुक पेज वर नुकतीच त्यांनी प्रसिद्ध केली आहे आणि तिला वाचकांचा भरभरून प्रतिसाद नेहमीप्रमाणे मिळतो आहे. इथे ही लेखमाला या ब्लॉगच्या  वाचकांसाठी, श्री कोटणीस यांच्या परवानगीने प्रसिद्ध करीत आहोत.

एटीएम चे थरारक नाट्य- भाग-५   अजय कोटणीस atm drama

*एटीएम नाट्य..* 

*एटीएम नाट्य..* (क्रमशः 5)

(अंक तिसरा – प्रवेश अंतिम)

“सायेब, मले काह्याले बलावलं होतं तुमी ?”

अचानक केबिनच्या दरवाज्या बाहेरून एक धसमुसळा, खेडवळ आवाज आला आणि माझ्या छातीत पुन्हा एकदम धस्स झालं.

आम्ही साऱ्यांनी चमकून आवाजाच्या दिशेने एकदमच केबिनच्या दरवाजाकडे पाहिलं. कपाळावर मोठ्ठं, गोल, ठसठशीत कुंकू लावलेली एक मध्यमवयीन स्त्री दरवाजात उभी होती. उन्हाने रापलेला चेहरा, अर्धवट, गुडघ्यापर्यंत नेसलेलं काष्ट्याचं मळकट लुगडं, त्यावर कोपरापर्यंत लांब बाह्यांचं किंचित विरलेलं पोलकं, डोईवर पूर्ण पदर घेतलेला, दोन्ही मनगटांवर आतल्या बाजूने काहीतरी गोंदलेलं.. अशा अवतारातील ती कुणी कष्टकरी महिला वाटत होती.

“कोण तुम्ही ? मी ओळखलं नाही तुम्हाला ?

माझ्या ह्या प्रश्नावर ती उत्तरली..

“म्या रखमाबाई.. ! तुमच्या हापिसातल्या प्रेमानंद भाऊंकडं धुणं भाड्याचं काम करती मी. फौजदार जमदाडे भाऊंकडंबी म्याच काम करती. त्येंची काय तरी मायती पायजं व्हती म्हनं तुमास्नी.. प्रेमानंद भाऊंनी घरला तसा निरुप धाडला व्हता काल.. तेच्या साटीच आली हाव म्या..”

हिंदी चित्रपटातील शेवटच्या सीनमध्ये जशी सिनेमातील सर्व पात्रे एकत्र येतात तशी या एटीएम नाट्यातील सर्व पात्रे एका मागोमाग एक अशी रंगमंचावर म्हणजेच माझ्या केबिनमध्ये येऊन जात होती.

“या बाई आत या..!”

मी काही बोलण्याच्या आतच इन्स्पेक्टर खराटे त्या बाईला म्हणाले. बाई आत आल्यावर हवालदार जमदाडेंकडे बोट दाखवून ते म्हणाले..

“हेच का तुमचे “फौजदार” जमदाडे ?”

“व्हय, हेच की..! अगं बया, ह्ये फौजदार सायेब तर हिथंच हायेत.. म्यानीजर सायेब, मंग यांची मायती यायलेच इचारून घ्या.. जाती म्या..”

असं बोलून रखमाबाई परत जाण्यासाठी वळली न वळली तोच इन्स्पेक्टर खराटे कडाडले..

“कुठे चाललीस ? थांब..! आता मॅनेजर साहेब तुला जे जे प्रश्न विचारतील त्यांची खरी खरी उत्तरं द्यायची.. समजलं ना ? आणि.. काय म्हणालीस तू ह्या मुच्छडला ? फौजदार ? अगं, हे कसले फौजदार ? हे तर साधे शिपाई..! खरा फौजदार मी आहे. इन्स्पेक्टर..! इथल्या पोलिस स्टेशनचा ठाणेदार !”

रखमाबाईंनं हवालदार जमदाडेंचा मघाशी “फौजदार” असा उल्लेख केलेला ठाणेदार साहेबांना अजिबातच आवडला नसल्याचं दिसत होतं. कदाचित त्यामुळे त्यांचा इगो दुखावला असावा.

“मले यवडं त्ये काय बी समजत न्हाई.. म्या खाकी डरेस वाल्या समद्याच पोलिसानला “फौजदार” आसंच म्हंते..”

रखमाबाईच्या स्पष्टीकरणाकडे दुर्लक्ष करीत इन्स्पेक्टर खराटे मला म्हणाले..

“बोला..! मॅनेजर साहेब, काय विचारणार होतात तुम्ही या बाईला ?”

फौजदार साहेबांच्या या प्रश्नावर चोरासारखा खाली मान घालून भीतभीत मी पुटपुटलो..

“हेच, की गेल्या दहा बारा दिवसांत हवालदार साहेब कधी घरी आलेले दिसले का ?”

“अरे बापरे ! भले बहाद्दर !! काय डेअरिंग आहे हो तुमची ? एका छोट्याशा, क्षुल्लक मॅटर साठी थेट पोलिसांच्या घराची हेरगिरी करण्यापर्यंत मजल गेली तुमची ? मानलं रे बाबा तुम्हाला..!”

असं बोलून मला पुन्हा एकदा फटकारून झाल्यावर रखमाबाई कडे वळून ते म्हणाले..

“हं.. बोल बाये.. ह्याच्या आधी कधी दिसला होता ह्यो मिशीवाला बाबा तुला घरी आलेला..?”

“म्हंजी बगा ssss,” किंचित आठवल्यासारखं करून रखमाबाई म्हणाली.. “ईस पंचीस दिसा पयलं ह्यो सायब मुंबयला गेलं होतं.. तिठून धा दिसांनी ते पुना आपल्या घरला माघारी आलं. तवा पासून सात आठ दीस ते घरलाच आराम करीत व्हतं. इच्यारलं बी म्या फौजदारनी बायसायेबाला की, “सायेब डिवटी वर कामून जात न्हाईत म्हून..” तवा बाईसायेब म्हनल्या..”त्येंनला बरं वाटत न्हाई म्हून त्ये सुटीवर हायती..” आनि मंग आठ दिसांनी सायेब पुन्यांदा मुंबयला गेलं, आन् दोनतीन दिसा पयलंच परत आलं..”

“व्हेरी गुड.. !!” खुश होऊन इन्स्पेक्टर साहेब रखमाबाईला म्हणाले.. “बाई, तुला लिहिता वाचता येतं का ?”

“कसं यील ? कंदी साळंतच घातलं न्हाई माया घरच्याईनी.. पर.. सई करन्या पुरतं लिवायला शिकून घेतलंय म्या..!”

“फार छान ! हे बघ.. आत्ता इथे तू जे काही सांगितलंस ते सारं हे अकाऊंटंट साहेब एका कागदावर लिहून काढतील आणि तुला वाचून दाखवतील. तू फक्त त्या कागदावर सही करायची आहेस. समजलं ?”

फौजदार खराटेंच्या आज्ञेनुसार अकाऊंटंट साहेबांनी तयार केलेल्या रखमाबाईंच्या लेखी जबाबावर त्या कामवाल्या बाईंनी “र ख मा” अशी सुटी सुटी अक्षरं लिहून सही केली आणि तो चौथा पुराव्याचा कागद हस्तगत करीत ठाणेदार साहेब खुशालरावांना म्हणाले..

“आता तर फोन ठेवल्या ठेवल्या दुसऱ्याच मिनिटाला कमिशनर साहेब तुझ्या सस्पेंशनची ऑर्डर थेट वायरलेस मेसेजनेच पाठवतील, असं वाटतंय..”

हवालदार जमदाडेंनी पुन्हा एकदा फौजदार साहेबांचे पाय धरत “नको साहेब.. दया करा.. तुम्ही जे सांगाल ते करतो.. माझ्या बायको पोरांचा तरी थोडा विचार करा..” असं म्हणत गयावया करायला सुरवात केली..atm natya-5

इन्स्पेक्टर खराटेंच्या हातात डॉ. भोसले, नंदू आइस्क्रीम वाला, लाईनमन सोमनाथ आणि कामवाली रखमाबाई अशा चार जणांचे लेखी जबाब होते. जमदाडे हवालदारांची मानगुटच जणू आता त्यांच्या पंज्यात होती. केबिन मधील सर्वांकडे पाहून त्यांनी हात जोडले आणि म्हणाले..

“तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. माझ्या कठोर शब्दांनी तुम्ही सर्वच जण, विशेषतः मॅनेजर साहेब, खूप दुखावले गेले असाल, कदाचित तुम्हाला माझा रागही आला असेल याची मला कल्पना आहे. परंतु सदैव गुन्हेगारांशीच संबंध येत असल्याने आमची भाषाच तशी झाली असते, त्याला माझा नाईलाज आहे. आता आणखी फक्त एकच मदत हवी आहे तुमच्याकडून..”

एवढं बोलून इन्स्पेक्टर खराटे थांबले. आम्ही प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे पहात असतानाच अचानक चपळाईने त्यांनी लॅपटॉपला लावलेला Pen drive काढून घेतला आणि तो आपल्या पँटच्या खिशात टाकीत ते म्हणाले..

“हा pen drive तुमच्याकडून मला सप्रेम भेट. आता तक्रार मागे घेण्यात आलेली आहे तेंव्हा एटीएम मशीन मधील हे संबंधित रेकॉर्डिंग ताबडतोब नष्ट करा. तसंच हवालदार साहेबांनी तुमच्याकडे दिलेल्या तक्रारीचा अर्ज ही आम्हाला परत करा.”

फौजदार साहेबांच्या या मागण्या पूर्ण करणे शक्यच नव्हते. त्यामुळे “एटीएम रेकॉर्डिंग नष्ट करता येत नाही, त्यासाठी हेड ऑफिसची परवानगी घ्यावी लागेल” अशी गुळमुळीत थाप त्यांना ठोकून दिली. तसंच “हवालदार जमदाडेंचा मूळ तक्रार अर्ज रिजनल ऑफिसला पाठविला आहे, त्यामुळे तो परत देता येणार नाही” असंही खोटंच सांगितलं. अर्थात माझ्या बोलण्यावर फौजदार साहेबांचा अजिबात विश्वास बसला नाही. पण तसं न दाखवता वरकरणी हसत हसत त्यांनी आमचा निरोप घेतला.

त्यांच्या मागोमाग हवालदार जमदाडे सुद्धा खाली मान घालून नेहमीच्या सवयीप्रमाणे आपल्या मिशीवर हलकेच हात फिरवित निमूटपणे निघून गेले.

एटीएम नाट्याचा खूपच लांबलेला हा तिसरा अंक अनेक नाट्यमय वळणे घेत आमच्या दृष्टीने तरी एकदाचा संपला होता.

मात्र आम्हा सर्वांच्या अपेक्षेप्रमाणे हवालदार जमदाडेंचे ना निलंबन (suspension) झाले ना बडतर्फी (termination). इन्स्पेक्टर खराटेंनी ते प्रकरण पूर्णपणे दाबून टाकले होते. अर्थात त्यासाठी प्रचंड मोठी रक्कम हवालदार जमदाडें कडून फौजदार साहेबांनी वसूल केली अशी माहितीही नंतर उडत उडत आमच्या कानावर आली होती.

एटीएम नाट्याच्या या मुख्य कथेला अनेक छोटी मोठी उपकथानके होती. वेळ व काळाच्या अभावी त्या सर्वांचा इथे उल्लेख करणे शक्य नाही. कमिशनर, औरंगाबाद तसेच बँकेचे रिजनल ऑफिस यांना मी पाठविलेली जमदाडेंच्या तक्रार अर्जावरील उत्तराची प्रतिलिपी इन्स्पेक्टर खराटेंनी औरंगाबादच्या कुरिअर ऑफिसला दमदाटी करून मधल्या मधे गायब केली असल्याचेही समजले. बहुदा त्यामुळेच आमच्या रिजनल ऑफिस कडून तसंच पोलिस कमिशनर कार्यालयातून नंतर या प्रकरणी आमच्याकडे कधीही कसलीही विचारणा झाली नाही.

बँकेची अवघ्या दहा हजार रुपयांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचे प्रकरण दाबण्यासाठी इन्स्पेक्टर खराटेंनी एवढी प्रचंड रक्कम हवालदार जमदाडेंकडून कशी काय वसूल केली ? याचं गूढ मात्र मला अजूनही उलगडत नव्हतं. शेवटी पोलिस स्टेशनमधीलच अन्य एका कॉन्स्टेबलने सहज बोलताना याबद्दल खुलासा केला तो असा..

हवालदार जमदाडे हे मुंबई येथे गोपनीय कामगिरीवर गेले होते. सीआयडी खात्यामार्फत एका “हाय प्रोफाईल मर्डर केस”ची गुप्त चौकशी सुरू होती. या खुनाशी संबंधित मृतदेहाचे अवशेष, खुनाचे अवजार (Murder weapon) व अन्य महत्त्वाचे पुरावे मुंबईला नेऊन त्यांची डीएनए टेस्ट तसेच विविध प्रकारची फॉरेन्सिक तपासणी करवून घेऊन सीआयडी खात्याला ते अवशेष व पुरावे सुपूर्द करणे हे काम जमदाडेंवर सोपविण्यात आलेले होते. पूर्वी या मर्डर केसमध्ये पुराव्यांशी छेडछाड करणे, पुरावे नष्ट करणे असे अनेक प्रकार घडले असल्याने सतत जागरूक राहून मृतदेहाचे अवशेष व अन्य पुराव्यांचे रक्षण करणे व कोणत्याही परिस्थितीत कामाची जागा न सोडणे याबद्दल जमदाडेंना निक्षून बजावण्यात आले होते. तरीदेखील हवालदार जमदाडे हे कामाची जागा सोडून घरी, वैजापूरला आले होते. ही गोष्ट जर सिद्ध झाली असती तर त्यांची नोकरी वाचणे कठीण होते. बँकेला यात इनवॉल्व्ह न करता डॉ. भोसले, नंदू, सोमनाथ व रखमाबाई यांच्या कडून घेतलेल्या लेखी जबाबांच्या जोरावर हवालदार जमदाडेंना ब्लॅकमेल करण्याचा फौजदार खराटेंचा डाव होता. आणि तो डाव पूर्णपणे यशस्वीही झाला होता.

वैजापूर पोलिस स्टेशनच्या रेकॉर्डनुसार पाच तारीख ते पंचवीस तारीख असे वीस दिवस हवालदार जमदाडे मुंबई येथे गोपनीय कामगिरीवर गेले होते. या वीस दिवसांचा टीएडीए सुद्धा त्यांनी क्लेम केला होता. एटीएम रूम मध्ये अंधार करून पैसे काढले तर आपण सीसीटीव्हीत दिसणार नाही आणि “तो मी नव्हेच” असे सांगून दमदाटी करून बँकेकडून सहज फुकटचे दहा हजार रुपये वसूल करता येतील असा खुशालराव जमदाडेंचा साधा सरळ प्लॅन होता. दुर्दैवाने एटीएम मशीन मधील इन-बिल्ट कॅमेऱ्यामुळे त्यांचा हा प्लॅन त्यांच्यावरच उलटला. तसंच माझ्या अतिउत्साही सखोल तपासामुळे हवालदार जमदाडेंना ब्लॅकमेल करण्यासाठी इन्स्पेक्टर खराटेंना आयतेच चार लेखी जबाबही मिळाले.

अशाप्रकारे बँकेला फसवून दहा हजार रुपये हडप करण्याचा मोह हवालदार जमदाडेंना खूपच महागात पडला होता.

यानंतर एका महिन्याच्या आतच हवालदार जमदाडेंची अचानक अहमदनगरच्या तोफखाना पोलिस स्टेशनला बदली झाली. या बदलीमागे ठाणेदार खराटेंचाच हात असल्याचं बोललं जात होतं. योगायोग म्हणजे त्या पाठोपाठ लगेच इन्स्पेक्टर खराटेंचीही मुंबई इथे प्रमोशनवर बदली झाली.

अहमदनगरला बदलीच्या जागी रुजू झाल्यावर एक दिवस हवालदार जमदाडे चोरट्यासारखे दबकत माझ्या केबिन मध्ये आले आणि परगावी बदली झाली असल्यामुळे येथील बँक खाते बंद करायचे आहे, असे म्हणाले. खूप पटवून सांगूनही खाते अहमदनगरला transfer करून घेण्यास ते तयार नव्हते. त्यामुळे खाते बंद करून खात्यातील रक्कम त्यांच्या हातावर ठेवली आणि नियमानुसार आता बंद खात्याचं एटीएम कार्ड बँकेला सरेंडर करा असं त्यांना सांगितलं. त्यानुसार पाकिटातून एटीएम कार्ड काढून माझ्यापुढे ठेवताना हवालदार जमदाडेंची नजर जरा जास्तच खाली झुकलेली आहे आणि त्यांचा हातही किंचित थरथरा कापतो आहे असा नकळत मला भास झाला.

आणखीही एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली.. ती ही, की..

यावेळी पहिल्यांदाच बँकेबाहेर पडेपर्यंत घनी, मोटी मूंछें वाले हवालदार खुशालराव जमदाडे यांनी एकदाही आपल्या त्या नत्थुलाल फेम, सुप्रसिद्ध, भक्कम, भरदार, भरघोस, भरगच्च, जाडजूड मिशांना पीळ देत त्यावरून आपला हात फिरवला नव्हता..

(समाप्त)

 

 

 

ajay kotnis photo1

श्री अजय कोटणीस हे बँकेतील माझे सहकारी असून, स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३८  वर्षांचा प्रदीर्घ अनुभव  असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानकावर खिळवून ठेवतात.  

त्यांना वैजापूर या गावी असतांना आलेला एक अनुभव हा बँकर्स ला किती निरनिराळ्या आणि विचित्र अनुभवांना सामोरे जावे लागते याचे चित्तथरारक वर्णन आहे. 

एटीएम चे थरारक नाट्य- भाग-४ अजय कोटणीस

goodworld_atm nataya-6

लेखक 

श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद 

(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)

ही लेखमाला श्री कोटणीस यांच्या फेसबुक पेज वर नुकतीच त्यांनी प्रसिद्ध केली आहे आणि तिला वाचकांचा भरभरून प्रतिसाद नेहमीप्रमाणे मिळतो आहे. इथे ही लेखमाला या ब्लॉगच्या  वाचकांसाठी, श्री कोटणीस यांच्या परवानगीने प्रसिद्ध करीत आहोत.

एटीएम चे थरारक नाट्य- भाग-४  अजय कोटणीस atm drama

*एटीएम नाट्य…* 

(तिसरा व शेवटचा अंक,भाग १ ला )

एटीएम मशीन मधील बिल्ट इन कॅमेऱ्याच्या सहाय्याने एटीएम प्रकरणाचा उलगडा होऊन हवालदार जमदाडेंची तक्रार खोटी असल्याचे सिद्ध झाले होते व त्यांनी तक्रार मागे घेतल्यावर हे प्रकरण एकदाचे संपुष्टात आले होते.

केबिनमध्ये माझ्यासमोर बसलेल्या इन्स्पेक्टर खराटेंनी आतापर्यंत मांडीवर काढून ठेवलेली पोलिसी कॅप पुन्हा आपल्या डोक्यावर घातली आणि टेबलावर ठेवलेली आपली चमकदार लाकडी छडी उचलून ती उंचावत म्हणाले..

“तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद ! हे प्रकरण आता संपलेलं आहे आणि तुम्ही पूर्णपणे विसरूनही जायचं आहे. या बद्दल कुणाशीही चर्चा करून पोलिसांची बदनामी होईल असे कृत्य केल्यास त्याचे गंभीर व प्रतिकूल परिणाम होतील अशीही मी तुम्हाला विनंतीवजा, अगाऊ नम्र सूचना देऊन ठेवीत आहे. ह्या नत्थुलाल उर्फ हवालदार खुशालराव जमदाडेंवर डिपार्टमेंट तर्फे योग्य ती कार्यवाही केली जाईलच. तुम्हाला अन्य कोणत्याही बाबतीत पोलिसांच्या सहकार्याची गरज भासल्यास आम्ही आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत..”

इन्स्पेक्टर खराटे बोलत असतानाच अचानक सरकारी दवाखान्याचे डॉक्टर विक्रम भोसले घाईघाईत केबिनमध्ये आले. त्यांना “हाऊसिंग लोन इंटरेस्ट सर्टिफिकेट” वर माझी सही हवी होती. मी सर्टिफिकेट वर सही करीत असताना सहज त्यांचे लक्ष माझ्या पुढ्यात बसलेल्या हवालदार जमदाडेंकडे गेले. सर्टिफिकेट नेताना क्षणभर थबकून काही तरी आठवल्यागत ते मागे फिरले आणि म्हणाले..

“अं.. अं.. साहेब, तुम्ही मला पंधरा तारखेला रात्री एटीएम मधून पैसे काढून जाताना एटीएम रूमच्या जवळपास कुणी दिसलं होतं का म्हणून विचारलं होतं ना ? त्यावरून आठवलं..! त्या दिवशी बँकेच्या गेटच्या बाहेर हे हवालदार जमदाडे आईसक्रीमवाल्या नंदूशी रागारागाने काहीतरी बोलत होते. मी त्यांना नमस्कारही केला पण त्यांनी माझ्याकडे लक्षच दिलं नाही. त्यामुळे मी माझी मोटारसायकल काढली आणि घराकडे निघून गेलो.”

डॉक्टर भोसलेंचं बोलणं ऐकताच इन्स्पेक्टर खराटेंचे डोळे आश्चर्यानं चमकले. ते डॉक्टरांना म्हणाले..

“थांबा..! तुमची नक्की खात्री आहे की त्यादिवशी रात्री बँकेबाहेर तुम्ही या हवालदार जमदाडेंनाच पाहिलं होतं ?”

“हो साहेब ! हवालदार साहेबांशी माझी जुनी ओळख आहे. त्या दिवशी मी बँकेबाहेर येताच वीज गेली होती. तरीपण रस्त्यावर थोडा उजेड होता. हवालदार साहेबांच्या फेमस मिशांवरून मी त्यांना लगेच ओळखलं..”

डॉक्टर भोसलेंचं उत्तर ऐकताच इन्स्पेक्टर खराटे उत्तेजित होऊन म्हणाले..

“तुम्ही आत्ता जे बोललात ते कागदावर लिहून देऊ शकाल ?”

“हो..! अवश्य..!!”

असं म्हणून डॉक्टर भोसलेंनी घडलेला प्रसंग जसाच्या तसा एका कागदावर लिहून त्यावर आपली सही करून तो कागद इन्स्पेक्टर खराटेंच्या हातात दिला.

“थँक्यू..!” असं म्हणून डॉक्टर भोसलेंना निरोप दिल्यावर इन्स्पेक्टर भोसलेंनी बसल्या जागेवरूनच मोठ्याने ओरडून बँकेच्या सिक्युरिटी गार्डला केबिनमध्ये बोलावलं. सिक्युरिटी गार्ड आत येताच ते म्हणाले..

“जा..! त्या बँकेसमोरील आइस्क्रीमवाल्या नंदूची गचांडी धरून आत्ताच्या आत्ता त्याला इथे घेऊन ये..”

ड्युटी वर असताना गेट सोडून बाहेर कसं जावं ? म्हणून माझ्या अनुमतीसाठी सिक्युरिटी गार्डने प्रश्नार्थक नजरेने माझ्याकडे पाहिलं. ते पाहताच एकाएकी इन्स्पेक्टर खराटेंचा पारा चढला. दरडावणीच्या सुरात ते त्याला म्हणाले..

“साहेबांकडे काय बघतोस ? पोलिस चौकशी सुरू आहे. तुझ्या साहेबांनी जर नाही म्हटलं तर सरकारी कामकाजात अडथळा आणला म्हणून तुझ्या सहित तुझ्या या साहेबालाही अटक करून घेऊन जाईन. मग बसा बोंबलत..”

मी मानेनेच सिक्युरिटी गार्डला “जा..” म्हणून इशारा केला. गार्ड बाहेर गेल्यावर इन्स्पेक्टर खराटेंना म्हणालो..

“डॉक्टर भोसलें प्रमाणेच नंदू कडेही एटीएम रूमच्या आसपास कुणी दिसले होते का ? याबद्दल मी चौकशी केली होती. कारण वीज परत आल्यावर सर्वप्रथम नंदूच एटीएम रूम मध्ये गेला होता. पण त्यालाही त्यावेळी एटीएमच्या आसपास कुणीच दिसलं नाही, असं तो म्हणाला..”

त्यानंतर थोड्याच वेळात नंदूचं बखोटं धरून सिक्युरिटी गार्डने त्याला केबिनमध्ये आणलं. आधीच भेदरलेल्या नंदूच्या पोटात खुनशीपणे आपला लाकडी रूळ जोराने खुपशीत इन्स्पेक्टर खराटे म्हणाले..

“चल बोल चटचट..! तू आणि हवालदार जमदाडे.. या दोघांनी मिळून काय प्लॅन रचला होता ? पंधरा तारखेला रात्री सव्वा नऊ वाजता बँकेच्या गेटबाहेर तुम्हा दोघांना एकत्र पाहण्यात आलं आहे. काय बोलणं झालं तुमच्यात त्या वेळी ?”

थरथर कापणाऱ्या नंदूने हळूच एकवार खाली मान घालून बसलेल्या हवालदार जमदाडेंकडे बघितलं आणि म्हणाला..

“पोलिस स्टेशनच्या रेग्युलर हप्त्याशिवाय वेगळा असा, दिवसाला पन्नास रुपये प्रमाणे अधिकचा हप्ता हवालदार जमदाडे माझ्याकडून दररोज वसूल करतात. गेल्या दहा दिवसांपासून ते मुंबईला गेले असल्याने त्यांचा हप्ता देणे बाकी होते. त्या दहा दिवसांचे पाचशे रुपये मागायलाच ते माझ्याकडे आले होते. नेमकं त्या दिवशी दुपारीच घराचं वीज बिल भरण्यासाठी आईस्क्रीम विक्रीचा दिवसभरातील गल्ला मी मुलाला दिला होता त्यामुळे माझ्याकडे पुरेसे पैसे नव्हते.

हवालदार साहेबांशी बोलत असतानाच अचानक गावातली वीज गेली होती. तरीदेखील अंधारातच मी परत खांबाला बांधलेल्या गाडीजवळ गेलो. गाडीची कुलुपं उघडली. आतला गल्ला उघडून बघितला. त्यात जेमतेम दीडशे रुपये होते. म्हणून आता एटीएम मधून काढूनच त्यांना पाचशे रुपये द्यावेत असा विचार केला. योगायोगाने तोपर्यंत वीजही परत आली होती. हवालदार साहेब अजूनही गेट बाहेर माझी वाट पहात उभे होते. त्यांना थांबायला सांगून मी एटीएम मध्ये जाऊन पाचशे रुपये काढून आणले व त्यांना दिले.”

नंदूचं बोलणं संपल्यावर भेदक नजरेने त्याच्याकडे पहात इन्स्पेक्टर खराटे म्हणाले..

“हे, तू सगळं खरं खरं सांगतोयस ना ? जरा देखील काही अन्य महत्वाची माहिती तू लपवत असलास तर तुझी काय हालत होईल, याची कल्पना आहे ना ?”

रडकुंडीला आलेला नंदू गळ्याला हात लावीत म्हणाला..

“माझ्या मुलाबाळांची शपथ घेऊन सांगतो साहेब.. हे असंच आणि एवढंच घडलं त्या दिवशी..”

“ठीक आहे ! मग आता बाहेर जा आणि आत्ता तू जे जे सांगितलंस ते जसंच्या तसं एका कागदावर लिहून त्यावर सही करून मला आणून दे. आणि हे बघ, पोलिस स्टेशनच्या रेग्युलर हप्त्याबद्दल त्यात काही एक उल्लेख करायचा नाही. समजलं ?”

मान डोलावीत नंदू बाहेर गेल्यावर इन्स्पेक्टर खराटे खोचकपणे मला म्हणाले..

“बराच सखो ssss ल तपास केलेला दिसतोय तुम्ही या एटीएम प्रकरणाचा. अगदी डिटेक्टिव्ह स्टाईल..! रहस्यकथा वाचण्याचा नाद आहे वाटतं तुम्हाला.. आणि, वेळ बरा मिळतोय तुम्हाला हे आगाऊ धंदे करायला..?”

बोलता बोलता फौजदार साहेबांचा आवाज एकदम चढला. डॉक्टर भोसले आणि नंदू यांच्याकडे मी चौकशी केल्याचं त्यांना अजिबात आवडलं नव्हतं, हे स्पष्टच दिसत होतं.

थोड्याच वेळात नंदू आपल्या साक्षी जबाबाचा सही केलेला कागद घेऊन आला. इन्स्पेक्टर खराटेंनी त्यावर नजर फिरवली आणि खुश होत म्हणाले..

“व्वा ! छान..! जा.. !! आता यापुढे कुणालाही अधिकचा हप्ता द्यायचा नाही, काय ? आणि कुणी जादा  हप्ता मागितलाच तर थेट माझ्याकडे त्याची कंप्लेंट करायची. निघ आता तू..”

नंदू गेल्यावर अत्यंत तीक्ष्ण नजरेने हवालदार जमदाडेंकडे पहात फौजदार खराटे म्हणाले..

“तरी मला फार पूर्वीपासून शंका होतीच आणि खबऱ्यांकडून तसा रिपोर्टही मिळाला होता की बऱ्याच छोट्या धंदेवाल्यांकडून तू स्वतःचा वेगळा हप्ता वसूल करतोस म्हणून.. आज पक्का पुरावा हाती लागलाय.. आता गेल्या गेल्या कमिशनर साहेबांना एक फोन करतो आणि सांगतो त्यांना, त्यांच्या लाडक्या नत्थुलालचे एटीएम कारनामे..! संध्याकाळपर्यंत तुझ्या निलंबनाचा आदेश येईलच..”

आतापर्यंत, हे काय चाललं आहे ? हवालदार जमदाडेंनी तक्रार मागे घेतल्यावरही इन्स्पेक्टर खराटे साक्षीदारांकडून लेखी जबाब का गोळा करीत आहेत ? हे मला काहीच समजत नव्हतं. पण हवालदार जमदाडेंना मात्र फौजदार साहेबांच्या प्लॅनची पुरेपूर कल्पना आलेली दिसत होती. अचानक खुर्चीवरून उठून फौजदार साहेबांच्या पायावर डोकं ठेवीत ते  म्हणाले..

“साहेब, माफ करा. माझ्या पोराबाळांचा तरी विचार करा. तुम्ही जे म्हणाल ते करतो. हे मॅटर वरती रिपोर्ट करू नका. वाचवा मला साहेब, वाचवा..”

मला आश्चर्य वाटलं. निगरगट्टपणे, माझ्या नजरेला नजरही न देता खाली मान घालून गप्प बसलेल्या हवालदार जमदाडेंनी अजूनपर्यंत एकदाही माझी माफी मागितली नव्हती. फौजदार खराटेंपुढे मात्र गयावया करीत ते क्षमायाचना करीत होते. कदाचित, आम्ही बँकवाले त्याचं काहीच बिघडवू शकणार नाही, याची त्यांना खात्री असावी.

खाली वाकून आपल्या ठाणेप्रमुखाचे दोन्ही पाय घट्ट पकडून बसलेल्या हवालदार जमदाडेंचे खांदे धरून ठाणेदार खराटेंनी त्यांना उभं केलं आणि त्यांच्याकडे रोखून पहात ते म्हणाले..

“बेट्या ssss ! नोकरीतून सस्पेंड तर तू होणारच आहेस. आता फक्त कायमचा बडतर्फ होणार नाहीस याचीच तुला काळजी घ्यावी लागणार आहे..”

झाला तेवढा तमाशा पुरे झाला, इथे तर पोलिसांच्याच अब्रूचे धिंडवडे निघत आहेत हे जाणवून काही न बोलता फौजदार-हवालदाराची ती जोडगोळी परत जायला निघाली. परंतु खुशालरावांचं दुर्दैव अजून संपलेलं नव्हतं..

“आत येऊ का साहेब ?”

वीज मंडळाच्या खाकी युनिफॉर्म मधील एक लाईनमन केबिन बाहेर उभा राहून विचारीत होता. मी काही बोलण्याच्या आतच तो म्हणाला..

“मी सोमनाथ..! वीजमंडळात लाईनमन आहे. या भागातील वीज पुरवठा बंद-चालू करण्याची ड्युटी माझ्याच कडे आहे. तुम्हाला माझ्याकडे काही तरी काम असल्याचा काल माझा मित्र प्यारेलाल कडून निरोप मिळाला. म्हणूनच आज तुम्हाला भेटायला आलो आहे..”

सोमनाथचं हे बोलणं ऐकताच फौजदार साहेब जागीच थबकले. त्यांनी आळीपाळीनं एक दोनदा माझ्याकडे आणि सोमनाथकडे आश्चर्यमिश्रित अविश्वासानं बघितलं. अभावितपणे त्यांच्या तोंडून हलकीशी शीळ बाहेर पडली. जमदाडेंसह पुन्हा आपल्या जागेवर बसत आपले दोन्ही हात कोपरापासून जोडून मला नमस्कार करीत ते म्हणाले..

“ओ माय गॉड sss ! खरोखरीच धन्य आहे तुमची.. !! वीज मंडळापर्यंतही पोहोचलात तुम्ही ? आता मात्र कमाल झाली.. आणखी किती खोलवर घुसला आहात तुम्ही या नत्थुलालच्या केसमध्ये ? च्यायला, मी तर तुम्हा बँकवाल्यांना खूपच साधंभोळं समजत होतो, पण तुम्ही तर अती स्मार्ट, extra ॲडव्हान्स निघालात..”

फौजदार साहेबांच्या उपरोधिक बोलण्याकडे माझं लक्षच नव्हतं. सोमनाथचा आवाज ऐकताच हवालदार जमदाडेंनी चटकन् मान वर केली होती आणि मागे वळून ते सोमनाथ कडे पाहण्याचा प्रयत्न करीत होते. आणि खुशालरावांच्या चेहऱ्यावरील हावभावांचं मी बारकाईने निरीक्षण करीत होतो. सोमनाथला डोळ्यानेच खुणावून धमकावीत “इथे कशाला आलास ? ताबडतोब निघून जा..” अशी खूण ते करीत होते. पण त्यांच्या दुर्दैवाने सोमनाथचे त्यांच्याकडे लक्षच नव्हते. तो एकटक माझ्याकडेच पहात होता. आता पुढे काय करावं हे मलाही समजत नव्हतं. हे पाहून फौजदार साहेबांनी पुन्हा सारी सुत्रं आपल्या हातात घेतली. मला उद्देशून ते म्हणाले..

“अहो बघत काय बसलात ? बोलवा त्या सोमनाथला आत..!”

आणि मग स्वतःच सोमनाथ कडे हातातील छडी रोखत म्हणाले..

“ये बाबा, आत ये ! आणि आता हे मॅनेजर साहेब तुला जे जे प्रश्न विचारतील त्यांची खरी खुरी उत्तरं दे.  लक्षात घे, ही पोलिस एन्क्वॉयरी आहे. खोटं बोलण्याचा किंवा कोणतीही माहिती दडवण्याचा थोडा जरी प्रयत्न केलास तरी या दंडुक्याने तुझी पाठ काळी निळी करून टाकीन..”

दबकत दबकतच सोमनाथ आत आला.

“हं..! विचारा मॅनेजर साहेब, तुम्ही काय विचारणार होतात या सोमनाथला ते..”

इन्स्पेक्टर खराटेंनी असा हुकूम सोडल्यावर मला विचारणं भागच होतं.

“पंधरा तारखेला रात्री सव्वा नऊच्या सुमारास पाच सहा मिनिटांकरिता वीज पुरवठा बंद झाला होता. तो तूच बंद केला होतास का ?”

“हो..”

नम्रपणे एकाच शब्दात सोमनाथने उत्तर दिलं.

“कशासाठी ? म्हणजे.., कुणाच्या सांगण्यावरून ?”

हा प्रश्न विचारल्या विचारल्या लगेच मी खुशालरावांकडे बघितलं. ते स्वतःच्या तोंडावर बोट ठेवून सोमनाथला “गप्प रहा, काहीच सांगू नकोस..” असा इशारा करीत होते. ठाणेदार साहेबांनी ते पाहिलं. करड्या स्वरात ते म्हणाले..

“सोमनाथ, कुणालाही अजिबात घाबरायचं नाही. फक्त खरं तेच सांगायचं..!”

“हो, सांगतो साहेब !”

तिरप्या, चोरट्या नजरेने जमदाडेंकडे पहात आणि त्यांच्याच कडे बोट रोखीत किंचित चाचरत सोमनाथ म्हणाला..

“या हवालदार साहेबांनी मला सांगितलं की बँकेत इमर्जन्सी लाईट बसवले असून वीज गेल्यावर त्याचा पुरेसा प्रकाश पडतो की नाही हे टेस्ट करायचे आहे. पोलिसांच्या देखरेखीत रात्री सव्वा नऊ वाजता हे टेस्टिंग करायचे आहे. त्यामुळे मी बाहेरून हाताने इशारा करताच तू बँकेसमोरील डिपी वरून लाईट बंद करायचेस. मग मी बँकेत जाऊन चार पाच मिनिटांतच इमर्जन्सी लाईट टेस्ट करीन. मी बँके बाहेर येऊन पुन्हा हाताने इशारा केल्यावर तू पुन्हा लाईट सुरू करायचेस. त्याप्रमाणे हवालदार साहेबांनी गेट बाहेरून इशारा करताच मी बँकेसमोरील डीपी वरून वीज पुरवठा बंद केला आणि हवालदार साहेब बँकेच्या गेट मधून आत गेल्यावर डीपी जवळच थांबलो.  पाच एक मिनिटांनी हवालदार साहेब बँकेच्या गेट बाहेर आले आणि त्यांनी हात हलवून इशारा करताच मी वीज पुरवठा पुन्हा सुरू केला. बस इतकंच..!”

सोमनाथने दिलेलं स्पष्टीकरण ऐकून त्याच्या बुद्धीची कीव करत मी जरी कपाळावर हात मारून घेतला तरी फौजदार साहेब मात्र फारच खवळले. सोमनाथच्या अंगावर धावून जात ते म्हणाले..

“बस इतकंच ? अरे मूर्खा, बँकेच्या आतले इमर्जन्सी लाईट टेस्ट करण्यासाठी साऱ्या एरियातले लाईट बंद करायची काय गरज ? बँकेच्या मीटरचा मेन स्विच बंद केला असता तरी काम झालं असतं. आणि बँकेच्या अंतर्गत कामात पोलिसांचं काय काम ? आधीच पोलिसांना काय कमी कामं आहेत ? बँकेतर्फे वीजमंडळाकडे वीज पुरवठा बंद करण्यासाठी लेखी विनंती करण्यात आली होती का ?”

घाबरून मागे सरत सोमनाथ म्हणाला..

“ते काही मला माहीत नाही साहेब. या हवालदार साहेबांनी मला जसं करायला सांगितलं तसं मी केलं. तसंही पोलिसांच्या कुठल्याही कामाला “नाही” म्हणायची इथे कुणात हिंमत आहे साहेब ? उद्या, तुमच्या ठाण्यातील कोणत्याही शिपायाने कोणत्याही कारणासाठी पुन्हा गावातली वीज बंद करायला सांगितली तरी कसलंही डोकं न लावता मी ती बंद करीन..”

सोमनाथचं म्हणणं एका परीनं खरंच होतं. पोलिसांबद्दल त्याच्या मनात असलेला दरारा पाहून फौजदार साहेबांनाही आतून गुदगुल्याच होत असाव्यात. एकाएकी शांत होत ते सोमनाथला म्हणाले..

“तू आत्ता जे काही सांगितलंस ते तुझ्या सही निशी सविस्तरपणे लिहून दिलंस तर तुझ्यावर कोणतीही ॲक्शन न घेता तुला सोडून देईन. हा घे कागद आणि शांतपणे बाहेर बसून लिहित बस..”

फौजदार साहेबांनी दिलेला कागद घेऊन सोमनाथ बाहेर गेल्यावर हवालदार जमदाडेंनी पुन्हा एकदा काकुळतीने फौजदार साहेबांच्या विनवण्या करायला सुरवात केली. पण फौजदार साहेब कसल्यातरी दुसऱ्याच विचारात मग्न होते. सोमनाथ आपल्या जबाबाचा कागद आणून देईपर्यंत ते गप्पच होते. सोमनाथने दिलेला कागद त्यांनी वाचला आणि समाधानाने हसत जमदाडेंना म्हणाले..

“बापरे ! भरपूर लेखी पुरावे गोळा झाले. एवढे पुरावे तर मर्डर केस मध्ये सुद्धा आपण गोळा करत नाही.  आता जर कमिशनर साहेबांना फोन केला तर बहुदा जेमतेम दोन तासातच तुमच्या सस्पेंशनची ऑर्डर येईल. हं…! खूप उशीर झाला आहे, चला निघू या.. नाहीतर आणखीन् एखादा तुमच्या विरुद्धच्या पुराव्याचा कागद स्वतःहून चालत यायचा इथे..”

अखेरीस एकदाचे इन्स्पेक्टर खराटे केबिनमधून बाहेर पडत होते. एव्हाना दुपारचे बारा वाजून गेले होते. रोजची सारीच महत्त्वाची कामं  खोळंबली होती. आपल्या महत्त्वाच्या कामांनिमित्त मला भेटण्यासाठी आलेले अनेक कस्टमर्स “कधी एकदा हे इन्स्पेक्टर साहेब मॅनेजर साहेबांच्या केबिनच्या बाहेर जातात ?” याची वाट पहात बाहेर ताटकळत उभे असलेले दिसत होते.

इन्स्पेक्टर खराटेंचे सततचे उर्मट, हडेलहप्पी वर्तन आणि त्यांचे कुत्सित, उपरोधाने भरलेले, अपमानजनक ताशेरे यामुळे मीही वैतागलो होतो. आता या केसशी संबंधित आणखी कुणीही माझ्या केबिनमध्ये येऊ नये आणि पुन्हा नवीन खोळंबा होऊ नये हीच देवाकडे मनोमन प्रार्थना करीत होतो. पण हवालदार जमदाडें प्रमाणेच माझंही दुर्दैव त्या दिवशी संपता संपत नव्हतं.

“साहेब, मले काह्याले बलावलं होतं तुमी ?”

अचानक केबिनच्या दरवाज्या बाहेरून एक धसमुसळा, खेडवळ आवाज आला आणि माझ्या छातीत पुन्हा एकदम धस्स झालं.

                         (क्रमशः 5)

                🙏🌹🙏

ajay kotnis photo1

श्री अजय कोटणीस हे बँकेतील माझे सहकारी असून, स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३८  वर्षांचा प्रदीर्घ अनुभव  असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानकावर खिळवून ठेवतात.  

त्यांना वैजापूर या गावी असतांना आलेला एक अनुभव हा बँकर्स ला किती निरनिराळ्या आणि विचित्र अनुभवांना सामोरे जावे लागते याचे चित्तथरारक वर्णन आहे. 

एटीएम चे थरारक नाट्य- भाग-३ अजय कोटणीस

atm drama-3

लेखक 

श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद 

(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)

ही लेखमाला श्री कोटणीस यांच्या फेसबुक पेज वर नुकतीच त्यांनी प्रसिद्ध केली आहे आणि तिला वाचकांचा भरभरून प्रतिसाद नेहमीप्रमाणे मिळतो आहे. इथे ही लेखमाला या ब्लॉगच्या  वाचकांसाठी, श्री कोटणीस यांच्या परवानगीने प्रसिद्ध करीत आहोत.

एटीएम चे थरारक नाट्य- भाग-३  अजय कोटणीस atm drama

*एटीएम नाट्य..* 

(अंक दुसरा – प्रवेश दुसरा)

अतिशय निराश, खिन्न अंतःकरणाने त्या एटीएम प्रकरणावर विचार करीतच मी बँकेत आलो. या प्रकरणी आता जास्त खोलात जायचं नाही, अतिविचार करून डोकं शिणवून घ्यायचं नाही, असं कितीही ठरवलं तरी काही काही गोष्टी मात्र मला अजूनही खटकतच होत्या. नेमक्या त्याच वेळी, फक्त पाच सहा मिनिटां पुरतीच गावातली वीज कशी जाते ? अचानक मला आठवलं, वीज मंडळातील एक प्यारेलाल नावाचा कर्मचारी आमच्या बँकेतील प्युन शंकरचा मित्र होता. लगेच शंकर करवी प्यारेलालला बँकेत बोलावून घेतलं.

“या भागातील वीज पुरवठा बंद-चालू करण्याची ड्युटी कुणाकडे आहे ? त्याला बँकेत घेऊन येता येईल का ?”

असं विचारलं असता तो वीज मंडळातील कर्मचारी प्यारेलाल म्हणाला..

“माझा मित्र व शेजारी सोमनाथ हाच या भागातील वीज पुरवठा बंद-चालू करण्याचे काम करीत असतो. कुणीतरी नातेवाईक वारल्यामुळे आज सकाळीच तो नजिकच्या गावाला गेला आहे. उद्या मी त्याला नक्कीच बँकेत घेऊन येईन..”

आजचा दिवसच असा उगवला होता की कोणतंच काम चट्कन आणि मनासारखं होत नव्हतं. क्रूरकर्मा हवालदार जमदाडेंच्या दहशतीपायी उतावीळ होऊन पूर्वीचे एटीएम टेक्निशियन श्री. गाडेकर तसेच सध्याचे टेक्निशियन श्री. डोंगरे यांना पुन्हा फोन लावला आणि त्यांना प्रकरणाची अर्जन्सी समजावून सांगितली. कुणी अन्य टेक्निशियन आज इथे येण्यासाठी उपलब्ध आहे का ? याचीही चौकशी केली. पण दोघांकडूनही नकारार्थीच उत्तर मिळाले.

तशी तर अगदी सुरवातीपासूनच या प्रकरणातील हवालदार जमदाडेंची भूमिका मला जराशी संशयास्पदच वाटत होती. त्यामुळे त्यांची पत्नी व मुले याबद्दलची अधिक माहिती काढण्याची कामगिरी बँकेतील हेड प्युन प्रेमानंद यांच्यावर सोपविली होती. प्रेमानंदचं घर जमदाडेंच्या घरापासून अगदी जवळच होतं. त्याने आणलेल्या माहितीनुसार जमदाडेंची पत्नी ठार निरक्षर होती तसेच त्यांची दोन्ही मुले अहमदनगर येथे शिकत असून गेल्या अनेक दिवसांत ती वैजापूरला आलेली नव्हती. त्यामुळे याबाबतीत तरी हवालदार जमदाडे यांनी दिलेली माहिती ही खरीच होती.

मात्र खुद्द हवालदार जमदाडे दहा दिवसांपूर्वी वैजापूरला येऊन गेले किंवा नाही याबद्दल अजूनही पक्की माहिती मिळाली नव्हती. सुदैवाने प्रेमानंदच्या घरची कामवाली बाईच जमदाडेंच्या घरीही भांडी घासण्यासाठी जाते, असं प्रेमानंद कडून समजलं. तेव्हा आता या कामवाली कडूनच हवालदार जमदाडेंच्या बाबतीत पक्की खबर मिळण्याची किंचितशी शक्यता होती. मात्र ती कामवाली देखील सध्या आजारी असल्यामुळे गेले दोन दिवस प्रेमानंद कडे कामाला आलेली नव्हती.

नेहमी सारखीच आजही बँकेत ग्राहकांची अफाट गर्दी होती. दैनंदिन कामकाजात एवढा बुडून गेलो की दिवस केंव्हा मावळला ते कळलंही नाही. संध्याकाळी साडेसात वाजता रोजच्या सारखी एटीएम मध्ये कॅश टाकण्यापूर्वी (Replenish) हेड कॅशियर व अकाउंटंट साहेब सहज माझ्या केबिन मध्ये आले, तेंव्हाच जमदाडेंच्या प्रकरणाची मला आठवण झाली. आज दिवसभरात जमदाडे बँकेत फिरकले नाहीत हे लक्षात येताच खूप हायसं वाटलं आणि मनोमन आनंदही झाला. वाटलं, चला..! तेवढंच आजचं मरण उद्यावर ढकललं गेलं.

पण माझा हा आनंद फार काळ टिकला नाही. रात्री साडेआठ वाजता हवालदार जमदाडे दोन तीन पत्रकारांना घेऊन बँकेत आले. जमदाडेंचा अवतार गेल्या खेपे सारखाच अतिशय उग्र, संतप्त होता. खुर्चीवर बसता बसता सोबत आलेल्या पत्रकारांकडे बोट दाखवून ते म्हणाले..

“तुमच्या कडून काहीच निरोप आला नाही म्हणून शेवटी या मित्रांना घेऊन इथे यावं लागलं. तुमचा तपास केंव्हा पूर्ण होणार आहे ? आणि तुम्ही माझे पैसे कधी परत करणार आहात ?, त्याची पक्की, फिक्स तारीख आत्ताच आमच्या ह्या पत्रकार मित्रांसमोर सांगा. म्हणजे त्यानुसार आम्हालाही पुढचं पाऊल उचलता येईल. तसं पाहिलं तर, मी नको नको म्हणत असतानाही एक छोटसं पाऊल माझ्या या मित्रांनी आज उचललंच आहे. बहुदा तुमचं त्याकडे लक्षच गेलेलं नसावं.”

असं बोलून दैनिक लोकमत, दै. सामना, दै. सकाळ अशा प्रमुख वर्तमानपत्रांत “वैजापूरच्या स्टेट बँकेत एटीएम घोटाळा” अशा मथळ्याखाली छापून आलेली दोन पॅराग्राफची छोटीशी बातमीच जमदाडेंनी मला दाखविली. सकाळी घाईघाईत पेपर चाळताना माझ्या नजरेतून ती बातमी सुटली असावी, मात्र बँकेच्या स्टाफने नक्कीच ती बातमी पाहिली असणार आणि केवळ मला आणखी मनस्ताप नको म्हणून माझ्याकडे त्या बातमीचा कुणीही उल्लेख केलेला नसावा.

“हे बघा, मी तुम्हाला यापूर्वीच सांगितलं आहे की तांत्रिक बिघाडामुळे एटीएम रूम मधील सीसीटीव्ही रेकॉर्डिंग सध्या उपलब्ध नसून एक दोन दिवसात औरंगाबाद येथून टेक्निशियन आल्यावर सीसीटीव्ही फुटेज तपासूनच पुढील निर्णय घेता येईल.”

माझ्या या उत्तरावर डोळे बारीक करीत मिशीवरून हात फिरवित निळू फुलें सारख्या धूर्त, बेरकी आविर्भावात जमदाडे म्हणाले..

“आणि समजा, तांत्रिक बिघाडामुळे अथवा अन्य काही कारणाने ते रेकॉर्डिंग झालेच नसेल किंवा ते झालेले रेकॉर्डिंग अस्पष्ट, अंधुक असेल, तर अशावेळी तुम्ही काय करणार ?”

जमदाडेंनी असा प्रश्न विचारताच चमकून जाऊन मी त्यांना प्रतिप्रश्न केला..

“पण तुम्हाला अशी शंका का येते आहे ?”

जमदाडे क्षणभर चपापले पण लगेच स्वतःला सावरून घेत म्हणाले..

“तुम्हीच म्हणालात ना की सीसीटीव्ही रेकॉर्डिंग मध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे म्हणून.. आणि तांत्रिक बिघाडात असं काहीही होणं शक्यच आहे.”

“ठीक आहे, तुम्ही म्हणता तशी परिस्थिती उद्भवलीच तर बँकेच्या नियमानुसार आणि वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशानुसार पुढील निर्णय घेतला जाईल.”

माझ्या या उत्तराने जमदाडेंचे जराही समाधान झाले नाही. त्यांचा बँकेत येण्याचा उद्देशच मुळी लोक जमवून, आरडा ओरडा करून, माझ्यावर दबाव टाकणे हा होता. ताडकन उठून उभे रहात माझ्याकडे बोट रोखून ते गरजले..

“बस झाला तुमचा वेळकाढूपणा ! उद्या सकाळी साडे दहा वाजता जर मला माझे पैसे परत मिळाले नाहीत तर दुपारी स्थानिक पुढारी, पत्रकार आणि वृत्तवाहिन्यांचे (News channel) प्रतिनिधी यांच्यासह बँकेत येऊन तुम्हाला घेराव घालणार आहे. त्यानंतर टीव्ही आणि वृत्तपत्रांतून बँकेची जी प्रचंड, घोर बदनामी होईल त्यासाठी सर्वस्वी तुम्हीच जबाबदार असाल. त्यामुळे तुम्हाला जो काही निर्णय घ्यायचा आहे तो आजच घ्या.. येतो आम्ही.. !!”

दाणदाण पावले आपटीत, तावातावाने आपल्या दोन्ही मिशांना करकचून पीळ देत आपल्या पत्रकार मित्रांसह खुशालराव जमदाडे निघून गेले.

आणि डोकं गच्च धरून मी जागच्या जागी बसून राहिलो. या प्रकरणाची कोंडी फुटता फुटत नव्हती. एकीकडे हवालदार जमदाडे विनाकारण इरेस पेटून घाईला आले होते तर दुसरीकडे या संकटातून मार्ग काढण्याचे माझे सारे प्रयत्न एक तर संपुष्टात आले होते किंवा लांबणीवर पडले होते. शेवटचा निकराचा प्रयत्न म्हणून एटीएम टेक्निशियन श्री. डोंगरेंना अनेकदा, अगदी वारंवार कॉल केला परंतु त्यांनी एकदाही माझा कॉल उचलला नाही.

शेवटी, उद्या काय व्हायचं ते होवो, आता या प्रकरणात आणखी मनस्ताप करून घ्यायचा नाही असं मनाशी ठरवून उदास अंतःकरणाने रूमवर झोपायला निघून गेलो.

दुसऱ्या दिवशी सकाळी सवयीनुसार लवकरच जाग आली. पण आज नेहमीसारखं वैजापूर गावालगतच्या नारंगी सारंगी डॅमच्या काठी मॉर्निंग वॉकला जाण्याची इच्छाच झाली नाही. त्यामुळे कितीतरी वेळ तसाच आळसावल्यागत बिछान्यावर पडून राहिलो. शेवटी, जेंव्हा सकाळी साडेनऊ वाजता सिक्युरिटी गार्डचा फोन आला की “तुम्हाला भेटायला कुणी तरी आलं असून त्याचं तुमच्याकडे खूप महत्वाचं आणि अर्जंट काम आहे. त्यासाठी तुम्हाला ताबडतोब भेटायचं आहे असं ते म्हणत आहेत..” तेंव्हा “अरे देवा, आता हे कोणतं आणखीन एक नवीन संकट उद्भवणार आहे ?” या धास्तीनं कसंबसं घाईघाईत तोंडावर पाणी मारून तसाच बँकेत गेलो.

एक अनोळखी तरुण माझ्या केबिनमध्ये माझी वाट पहात बसला होता. मला पाहताच सुहास्य मुद्रेने हस्तांदोलनासाठी हात पुढे करीत तो म्हणाला..

“सर, मी आशिष डोंगरे.. एटीएम टेक्निशियन.. !”

मला आश्चर्याचा सुखद धक्काच बसला.

“सॉरी सर, काल मी माझा मोबाईल घरीच विसरून गेलो होतो. त्यामुळे तुमचा कॉल रिसिव्ह करू शकलो नाही. रात्री उशिरा घरी परतल्यावर तुमचे एवढे सारे मिस कॉल बघितले. तसं तर आज सकाळी मला सिन्नरला जायचं होतं, पण पहिल्यांदा इथलं तुमचं काम करून मगच पुढे सिन्नरला जावं अशी मला तीव्र आंतरिक प्रेरणा झाली. त्यामुळेच मी थेट तुमच्याकडे आलो आहे..”

मला तर जणू देवच पावल्यागत झालं. लगेच त्यांना घेऊन एटीएम रूम मध्ये गेलो. अकाउंटंट आणि हेड कॅशियर साहेब सुद्धा तोपर्यंत बँकेत आले होते. त्यांनाही सोबत घेतलं. विवादित एटीएम व्यवहाराची तारीख आणि वेळ सांगितल्यावर लगेच आशिष डोंगरेने अवघ्या पाच दहा मिनिटांतच बिल्ट-इन कॅमेऱ्यातील पंधरा तारखेच्या रात्री सव्वा नऊ वाजताचं रेकॉर्डिंग बँकेच्या pen drive मध्ये काढून दिलं. Pen drive माझ्या हातात ठेवत तो म्हणाला..

“हे घ्या..! सर्व रेकॉर्डिंग अगदी क्लिअर आणि स्पष्ट आहे. मी काल येऊ न शकल्याने तुम्हाला जो त्रास झाला असेल त्याबद्दल खरोखरीच दिलगीर आहे. मला आता सिन्नरला लवकर पोहोचायचं असल्याने कृपया मला जाण्याची परवानगी द्या..”

एवढं बोलून Pen drive माझ्या हातात ठेऊन मला साधी आभार मानण्याची संधीही न देता जवळ जवळ धावतच तो नम्र, अदबशीर व हसतमुख एटीएम टेक्निशियन बँकेबाहेर निघून गेला.

मी घड्याळात पाहिलं तर सकाळचे दहा वाजत होते. सकाळी साडेनऊ वाजता अचानक आशिष डोंगरेचं बँकेत प्रकट होणं आणि एटीएम रेकॉर्डिंग काढून देऊन दहा वाजेपर्यंत बँकेतून अंतर्धान पावणं.. हे सारं मला अगदी स्वप्नवत.. जणू एखादा चमत्कार घडून आल्या सारखंच वाटत होतं.

ताबडतोब वैजापूर पोलिस स्टेशनला फोन लावला. इन्स्पेक्टर खराटेंनीच फोन उचलला. त्यांना एटीएम रेकॉर्डिंग उपलब्ध झाले असल्याचें कळवता क्षणीच.. “अरे व्वा ! शाब्बास.. !! हवालदार जमदाडेंना सोबत घेऊन ‘ते’ रेकॉर्डिंग पहायला आत्ता लगेच बँकेत येतो आहे..” असं ते म्हणाले.

रेकॉर्डिंग मध्ये कुणाचा चेहरा आहे हे पाहण्याची इन्स्पेक्टर खराटें प्रमाणेच आम्हा सर्वांना सुद्धा अत्यंत उत्सुकता होती. ठाणेदार साहेब हवालदार जमदाडेंना घेऊन आल्यावर लॅपटॉपला Pen drive लावून रेकॉर्डिंग पहायला सुरुवात केली. ठीक नऊ वाजून पंधरा मिनिटे आणि सोळा सेकंदांनी एक धिप्पाड माणूस दहा हजार रुपये मोजताना दिसला. सुरवातीला त्याच्या चेहऱ्यावर खूप मोठे काळे डाग दिसत होते. नंतर नीट निरखून पाहिल्यावर लक्षात आलं की ते काळे डाग नसून त्या माणसाच्या जाडजूड, भरघोस मिशा आहेत. आता चेहरा नीट दिसू लागल्यावर तर तो माणूस म्हणजे हवालदार खुशालराव जमदाडे हाच होय, हे स्पष्ट झालं.

“अरेत्तिच्या मारी !” अविश्वासानं जमदाडेंकडे पाहत इन्स्पेक्टर खराटे उद्गारले..

“आता ह्याला काय म्हणावं ? ‘उलटा चोर कोतवाल को डांटे’ च्या ऐवजी ‘उलटा हवालदार मॅनेजर को डांटे’ असाच प्रकार झाला हा..! अशी आहे तर ही भानगड ! तरी मला शंका होतीच हा हवालदार एवढा मागे का लागलाय बँक वाल्यांच्या.. हे बाहेर समजलं तर “पोलिसांच्या उलट्या बोंबा” असंच म्हणतील ना सारे गावकरी ?”

हवालदार जमदाडे खाली मान घालून चुपचाप बसला होता. भीतीने व शरमेने त्याच्या तोंडून एक शब्दही बाहेर पडत नव्हता.

आम्ही सारे स्तब्ध होऊन एकटक हवालदार खुशालराव जमदाडेंकडेच पहात होतो. काही वेळ असाच निःशब्द शांततेत गेल्यावर ठाणेदार खराटेंनी केबिनमधील संभाषणाची सारी सूत्रं आपल्या हातात घेतली. पुन्हा हवालदार जमदाडेंकडे वळून ते म्हणाले..

“अरेरे..! काय हे खुशालराव ? पोलिसांची होती नव्हती ती सारी इज्जतच पार मातीत घालवलीत तुम्ही..! खरं म्हणजे हे रेकॉर्डिंग अगदी क्रिस्टल क्लिअर म्हणता येईल इतकं अजिबातच स्पष्ट नाही. तुमच्या ऐवजी दुसरं कुणीही या रेकॉर्डिंग मध्ये असतं तर संशयाचा फायदा देऊन त्याला सहज सोडून देता आलं असतं. पण.. पण.. तुमच्या ह्या जगप्रसिद्ध मिशा आडव्या आल्या ना !!

अहो, तुमच्या ह्या गलेलठ्ठ भरभक्कम मिशा पाहून तर कुणी आंधळाही ओळखेल की ह्या रेकॉर्डिंग मध्ये दिसणारा माणूस हा जमदाडे हवालदारच आहे म्हणून..!”

जमदाडे अजूनही खाली मान घालूनच गप्प बसले होते. नंतर आमच्याकडे पहात मोठ्याने हसत इन्स्पेक्टर खराटे म्हणाले..

“अहो, काय सांगू तुम्हाला..!, आमच्या कमिशनर मिश्रा साहेबांना ह्या हलकट जमदाडेच्या मिशांचं एवढं कौतुक की प्रत्येक वेळी वैजापूरला आले की अमिताभ बच्चन स्टाईल ते म्हणायचे.. “मूंछें हो तो जमदाडे जैसी..! वरना ना हो.” पण बघा ना आज त्या मिशांनीच त्याचा घात केला.. मिशांच्या केसांनीच आज त्याचा गळा कापला..”

हास्यविनोद करून केबिन मधील वातावरण हलकं करण्याचा ठाणेदार खराटे आटोकाट प्रयत्न करीत असले तरी अकस्मात बसलेल्या आश्चर्याच्या त्या धक्क्यातून आमच्यापैकी कुणीच अजूनही बाहेर आलेलं नव्हतं. साऱ्यांच्या नजरा मुंडी खाली झुकवून बसलेल्या खुशालराव जमदाडेंवरच खिळलेल्या होत्या. आमची ती अवस्था बघून परिस्थिती सावरून घेत अत्यंत विनम्र आणि समजावणीच्या सुरात ठाणेदार खराटे म्हणाले..

“हे पहा, कधी कधी होतात चुका आम्हा पोलिसांकडूनही..! अशावेळी आपण देखील समजदारी दाखवून उदार बुद्धीने त्यांना माफ केलं पाहिजे. हवालदार जमदाडेंच्या वतीने मी तुम्हा सर्वांची माफी मागतो. आता हवालदार आपली तक्रार मागे घेत असल्याचं तुम्हाला लिहून देतील. तुम्ही देखील हे प्रकरण इथेच मिटवून टाका. चला..! सगळ्या स्टाफसाठी चहा मागवा माझ्या तर्फे, आणि शेवट गोड करा..!”

इन्स्पेक्टर खराटेंच्या ह्या प्रस्तावाला होकारार्थी मान डोलवत मी देखील आपली मूक संमती दर्शवली. प्रकरण विनाकारण वाढवून पोलिसांशी पंगा घेण्याची माझी आता अजिबातच इच्छा नव्हती.

“एटीएम मधून पंधरा तारखेला मीच दहा हजार रुपये काढले होते व त्याचे विस्मरण झाल्याने गैरसमजातून बँके विरुद्ध तक्रार केली होती..”  असे कबूल करून त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करीत बँके विरुद्धची तक्रार मागे घेत असल्याचे हवालदार जमदाडेंनी लिहून दिले.

हे प्रकरण एकदाचं संपलं असं वाटून मी ही सुटकेचा निःश्वास टाकला.

पण.. या एटीएम नाट्याचा तिसरा व शेवटचा अंक अद्याप बाकी होता. तसंच अनेक नवीन पात्रांचा या नाटकात प्रवेश होणंही अजून बाकी होतं..

                        (क्रमश:..4)

                      🙏🏻🌹🙏🏻

ajay kotnis photo1

श्री अजय कोटणीस हे बँकेतील माझे सहकारी असून, स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३८  वर्षांचा प्रदीर्घ अनुभव  असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानकावर खिळवून ठेवतात.  

त्यांना वैजापूर या गावी असतांना आलेला एक अनुभव हा बँकर्स ला किती निरनिराळ्या आणि विचित्र अनुभवांना सामोरे जावे लागते याचे चित्तथरारक वर्णन आहे.