https://goodworld.in A website by Madhav Bhope

संत नामदेवांचे अभंग-9 Sant Namdev Abhang-9

namdev

Sant Namdev Abhang-9

संत नामदेवांचे अभंग-9

 

तेराव्या शतकातील थोर संत नामदेव यांची भजनें आपण पाहत आहोत. यापूर्वीच्या 8 भागांमध्ये आपण वैराग्य, विषयासक्ति, देहअभिमान, नामाचे महत्त्व, संतांचे थोरपण, भक्तिरस इत्यादि अनेक विषयांवर नामदेवांचे अभंग पाहिले.

विठू माऊली हे सर्व भक्तांचे विश्रांतिस्थान आहे, तर पंढरी नगरी ही विठोबाच्या वास्तव्याने पावन झालेली नगरी, म्हणून सर्व संतांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. सगळ्या संतांनी पंढरीचा महिमा अनेक प्रकारे वर्णन केला आहे.

पंढरीचा महिमा वर्णन करतांना नामदेव महाराज म्हणतात-

अवघी हे पंढरी सुखाची मांदुस | माझा स्वप्रकाश रत्न हरि

धन्य संतजन तेथींचे पारखी | ज्यां झाली ओळखी विठ्ठलनामीं

अनुभवूनि चित्तीं पाहिलें विवेकें | धरिले पुंडलीकें हृदयकमळीं

त्रिभुवन खेळण प्रेमाचें कोंदण | करूनि भूषण भोगितसे

युगें गेलीं परी पालट चि नाहीं| नित्य शुद्ध पाहीं तेज:पुंज

पाहतां नित्यनवें ध्यातां चित्त निवे | म्हणोनि नामा जीवें विसंबेना

 

मांदुस म्हणजे किमती ऐवज ठेवण्याचे संदूक किंवा पेटी. पंढरी हे सुखाचे मांदुस आहे, कारण तिथे स्वयं प्रकाश रत्न ‘हरि’ आहे.

____________________________________

पंढरीचें सुख जिहीं अनुभविलें | भावें अनुसरले विठ्ठलपायीं

काया वाचा मनें रंगले चरणीं धरियेला मनीं पांडुरंग

नामाचेनि बळें उडविलीं साधनें तोडिली बंधनें संसाराची

मुक्तिपद कोणी नेघे फुकासाठीं | हिंडे वाळवंटीं दीनरूप

योगियांचे घरीं रिघे काकुळती अव्हेरिले संतीं म्हणोनियां

ऐसे भक्तराज देवा वंद्य झाले | तें एक राज्य केलें पुंडलीकें

हर्षे निर्भर नामा नाचे महाद्वारी | कीर्ति चराचरी वर्णितसे

 पंढरीच्या सुखाचे वर्णन करतांना नामदेव महाराज म्हणतात- पंढरीचे सुख ज्यांनी अनुभवले आहे, त्यांच्यासाठी मुक्तिपद म्हणजे काहीच नाही. पंढरीचे सुख मिळालेले भक्त मुक्तिपद फुकटही घेत नाहीत. ते मुक्तिपद बिचारे पंढरीच्या वाळवंटात, संतांनी अव्हेरले म्हणून दीनवाणे फिरते आणि मग योगीजनांकडे जाते!

____________________________________

अवघी हे पंढरी सुखाची वोवरी | अवघा घरोघरीं ब्रह्मानंद

अवघा हा विठ्ठल सुखाचा चि आहे | अनुसरे तो लाहे सर्व सुख

पहावा अवघा नयनीं ऐकावा श्रवणीं | अवघा ध्यावा ध्यानीं अवघ्या मनें

अवघिये आवडी अवघा गावा गीतीं | अवघा सर्वांभूती तो चि आहे

अवघा हा जाणावा अवघा हा मानावा अवघा वाखाणावा अवघी वाचा

अवघा वोळखोनि अवघा गिळिजे मनें अवघा हा चि होणें म्हणे नामा

____________________________________

नामदेव महाराज म्हणतात, पंढरीस जाऊन जीवन्मुक्त व्हावे- आपले सर्वस्व विठ्ठलाला अर्पण करावे आणि विठ्ठलाचे प्रेमसुख घ्यावे.

पंढरीस जावें जीवन्मुक्त व्हावें विठ्ठला भेटावे जिवलगा

काया वाचा मन चरणीं ठेवावें | प्रेमसुख घ्यावें सर्वकाळ

सुखाचें साजिरे श्रीमुख पहावें जीवें उतरावें निंबलो

बाहेरी भीतरी कैवल्य आघवें वाचे बोलवे ब्रह्मानंदु

चिरंजीव नामा कंठीं धरी प्राण | करी तुझें ध्यान रात्रंदिवस

 

___________________________________

आणि पंढरीच्या पांडुरंगाची नामदेव महाराजांनी रचलेली खालील आरती ही तर जगप्रसिद्ध आहे आणि घरोघरी आणि सगळ्या मंदिरांत विठ्ठलाची म्हटली जाणारी सगळ्यात लोकप्रिय आरती आहे.

युगें अठ्ठावीस विटेवरी उभा | वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा

पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलें गा | चरणी वाहे भीमा उद्धरी जगा

जयदेव जयदेव जय पांडुरंगा । रखुमाईवल्लभा राहीच्या वल्लभा पावे जिवलगा

तुळसीमाळा गळां कर ठेवून कटीं | कांसे पीतांबर कस्तुरी लल्लाटी

देव सुरवर नित्य येती भेटी | गरुड हनुमंत पुढें उभे राहती

ओंवाळूं आरत्या कुरवंड्या येती | चंद्रभागेमाजीं सोडुनियां देती

दिंड्या पताका वैष्णव नाचती | पंढरीचा महिमा वर्णू मी किती

आषाढी कार्तिकी भक्‍त जन येती | चंद्रभागेमाजीं स्नानें जे करिती

दर्शनहेळामात्रें तयां होय मुक्ति । केशवासी नामदेव भावें ओवाळिती

____________________________________

मागील एका अभंगात “वेदाध्ययन करिसी तरी वैदिक चि होसी | परी वैष्णव न होसी अरे जना” असे म्हणून नामदेव महराजांनी “नामा म्हणे नाम केशवाचें घेसी | तरी चि वैष्णव होसी अरे जना” असे सांगून, वेगवेगळ्या ज्ञानशाखा, किंवा व्यवसाय या वैष्णव होण्याला उपयोगी नाहीत, पण केशवाचे नाम घेतले तर मात्र केशवरूप होशील असे सांगितले आहे, त्याच धर्तीवर, वेगवेगळ्या पंचमहाभूतांचे ध्यान केले तर तद्रूप होशील पण केशवास ध्यायले तर केशवरूप होशील असे आपल्या मनाला बजावले आहे.

पृथ्वी ध्यासी तरी पृथ्वी चि होसी | परी केशव होसी अरे मना

आप ध्यासी तरी आप चि होसी | परी केशव होसी अरे मना

तेज ध्यासी तरी तेज चि होसी | परी केशव होसी अरे मना

वायु ध्यासी तरी वायु चि होसी | परी केशव होसी अरे मना

आकाश ध्यासी तरी आकाश चि होसी | परी केशव होसी अरे मना

नामा म्हणे जरी केशवासी ध्यासी | तरी चि केशव होसी अरे मना

____________________________________

संसारात असतांना केशवाचे ध्यान कसे करायचे असा जर कोणाला प्रश्न पडला असेल तर त्याचे उत्तर दोन उदाहरणें देऊन नामदेव महाराजांनी खाली सांगितले आहे-

वावडी दुरीच्या दुरी उडतसे अंबरीं हातीं असे दोरी परी लक्ष तेथें

वावडी म्हणजे पतंग. पतंग आकाशात दूर उडतो, कुठे कुठे जातो, पण त्याचा दोर उडवणाऱ्याच्या हाती असतो. त्यामुळे अशी कल्पना केली आहे की  पतंगाचे लक्ष तो कितीही उंच गेला तरी आपल्याला धरणाऱ्या हाताकडे असते. तसे आपले लक्ष आपण संसारात कुठल्याही भलत्या कामात असले तरी लक्ष मात्र आपले आपण ज्याचे अंश आहोत, त्या देवाकडे असले पाहिजे.

वरील अर्थ हा मला ज्याप्रमाणे लावता आला तसा इथे सांगितला आहे. जाणकारांनी यावर अधिक प्रकाश टाकावा.

दुडीवरी दुडी पाण्या निघाली गुजरी | चाले मोकळ्या करीं परी लक्ष तेथें

धनलोभ्यानें धन ठेवियलें दूरी | वर्ते चराचरी परी लक्ष तेथें

नामा म्हणे असावें तियां व्यापारी | लक्ष सर्वेश्‍वरीं ठेवूनियां

वरील पतंगाच्या उपमेलाच अजून स्पष्ट करणारा हा अभंग अगदी नितांतसुंदर आहे. जुन्या काळातील लोकांना हे चित्र सहज डोळ्यांसमोर येऊ शकेल. पूर्वीच्या काळी नदीवरून किंवा पाणवठ्यावरून लांबून पाणी आणावे लागायचे. तेंव्हा ते आणणाऱ्या स्त्रीचे कसब बघण्यासारखे असायाचे. एकावर एक अनेक हंडे घेऊन ती पाणी आणायला जायची. येतांना ते पाण्याचे सगळे हंडे एकावर एक ठेवून, दोन्ही हात मोकळे ठेवून, आपल्या सख्यांबरोबर ती गुजरी (खेड्यातील स्त्री) मस्त गप्पा मारीत येत असते. एकीकडे रस्त्यावरचे खड्डेही चुकवीत असते. पण तिचे मुख्य लक्ष हे आपल्या डोक्यांवरील हंड्यांकडे असते. आणि त्यांचा तोल सांभाळीत ती चालते आणि भांड्यातील पाणी अजिबात सांडू देत नाही. किंवा दुसरी उपमा एखादा धनलोभी असतो, तो बाहेरून त्याची सर्व कामें करीत असला तरी त्याचे लक्ष किती धन येते आहे याकडे असते.  तसेच संसारात, आपली रोजची कर्तव्यें तर चोख बजावायची पण चित्त मात्र श्रीहरीकडे ठेवायचे हे कसब सवयीने जमते.  

_____________________________________

खालील अभंग हा आमच्या शालेय शिक्षणात कुठल्या तरी वर्षाला मराठी विषयात होता असे आठवते. हृदयात श्री हरि असेल तर संसाराची अग्निबाधा होणार नाही, अशा अर्थाचा हा अभंग आहे.

अग्नि जाळी तरी जळती पांडव | हृदयी माधव म्हणोनियां

अग्नि जाळी तरी जळती गोपाळ | हृदयी देवकीबाळ म्हणोनियां

अग्नि जाळी तरी जळे हनुमंत | हृदयीं सीताकांत म्हणोनियां

अग्नि जाळी तरी जळे पैं सीता | हृदयी रघुनाथ म्हणोनियां

अग्नि जाळी तरी जळे प्रल्हाद  | हृदयी गोविंद म्हणोनियां

नामा म्हणे स्वामी स्मरावें गोविंदा | चुके अग्निबाधा संसाराची

पुढील भागात आपण ईश्वराच्या प्राप्तीसाठी साधकाची होणारी तळमळ व्यक्त करणारे नामदेवांचे अभंग आहेत, ते पाहणार आहोत.

माधव भोपे 

संत नामदेवांचे अभंग-8 Sant Namdev Abhang-8

namdev

Sant Namdev Abhang-8

संत नामदेवांचे अभंग-8

तेराव्या शतकातील थोर संत नामदेव यांची भजनें आपण पाहत आहोत. यापूर्वीच्या 7 भागांमध्ये आपण वैराग्य, विषयासक्ति, देहअभिमान, नामाचे महत्त्व, संतांचे थोरपण, इत्यादि अनेक विषयांवर नामदेवांचे अभंग पाहिले.

या काळात, म्हणजे गेल्या ८-९  शतकांत भारताच्या विविध भागात होऊन गेलेल्या संतांपैकी प्रायः सगळे संत हे आपआपल्या इष्ट देवाच्या सगुणरूपाच्या भक्तिरसाने ओतप्रोत भरलेले दिसतात. संत नामदेव सुद्धा विठ्ठलाच्या भक्तिरसात आकंठ बुडालेले होते. आपली कनवाळू माऊली, सावळी विठाई हिचे वर्णन करतांना त्यांच्या वाणीला विशेष बहर येतो. सगुण भक्तीचे वर्णन करणारे काही अभंग हे खरोखर अनुभवायचे आहेत.

विटेवरी उभा दीनांचा कैवारी भेटावया उभारी दोन्ही बाह्या

गुणदोष त्यांचे पाहे चि डोळां भेटे वेळोवेळां केशिराज

ऐसा दयावंत घेत समाचार | लहान आणि थोर सांभाळितो

सर्वांलागी देतो समान दर्शन | उभा तो आपण सम पायीं

नामा म्हणे तया संतांची आवडी भेटावया कडाडीं उभा चि असे

दीनांचा कैवारी असा पंढरीनाथ हा दोन्ही हात उभारून भक्तांना कडकडून भेटायला उत्सुक असा उभा आहे.


वेदासी कानडा श्रुतीसी कानडा | विठ्ठल उघडा पंढरिये

नाम बरवें रूप बरवें दर्शन बरवें कानडियाचें

नामा म्हणे तुझें अवघें चि बरवें त्याहुनी बरवें प्रेम तुझें

 

भक्तवत्सल असा पंढरीनाथ, वेदांना आणि श्रुतीला अगम्य (कानडा) आहे, पण पंढरीमध्ये मात्र तो उघडा आहे. कोणालाही प्राप्य आहे. त्याचे नांव ही अत्यंत गोड आहे, आणि रूप तर त्याहूनही गोड आहे. देवाचे नाम आणि रूप तर गोड आहेच, पण त्याहूनही त्याचे प्रेम हे अत्यंत उत्कट आहे. (या प्रेमाची गोडी मात्र संतच जाणतात).

कृष्णाला विविध रूपांमध्ये पाहणारी खालील रचना ही ‘पाळणा’ म्हणून प्रसिद्ध आहे.

मुक्‍ताफळनथ नाकीं | चरणीं ल्याली वाळे वांकी

पीतांबरें अंग झांकी | कृष्णम्मा माझी

खांद्यावरी कांबळी | पायघोळ लांबली

पांघरली धाबळी | कृष्णम्मा माझी

गाईपाठीं लागली | पळतां नाहीं भागली

माय बहीण चांगली | कृष्णम्मा माझी

देहुडा पाउलीं उभी माझी माउली

विश्रांतीची साउली | कृष्णम्मा माझी

उभी नीट वीटेवरी शोभे भींवरेचे तीरी

नामयाची कैवारी | कृष्णम्मा माझी

खालील ‘गवळण’ ही सकाळच्या मंगल प्रभात कार्यक्रमात आपण पूर्वी कित्येकदा ऐकली  असेल.  या रचनेचा अर्थ प्रथमदर्शनी समजण्यास अवघड असला, तरी ही  रेडिओवर लागल्यानंतर मन एका वेगळ्याच विश्वात जायचे हे मात्र खरे.

रात्र काळी घागर काळी | यमुनाजळें हीं काळीं वो माय

बुंथ काळी बिलवर काळी | गळां मोतीं एकावळी काळी वो माय

मी काळी कांचोळी काळी | कांस कांसली ते काळी वो माय

एकली पाण्याला नव जाय साजणी ।सवें पाठवा मूर्ति सांवळी गो माय

विष्णुदास नाम्याची स्वामिनी काळी | कृष्णमूर्ति बहु काळी वो माय

ही गवळण येथे ऐकू शकता  

आठवणीतली गाणी या मराठी गीतांचे छान संकलन असलेल्या वेबसाइट वर हे उपलब्ध आहे.

https://www.aathavanitli-gani.com/Song/Ratra_Kali_Ghagar_Kali

 ही गवळण दत्ताराम गाडेकर यांनी संगीतबद्ध केली आहे. गायक गोविंद पोवळे आणि प्रभाकर नागवेकर हे आहेत. पण यातील स्त्री गायिका कोण हे समजले नाही.

‘बुंथ’ या शब्दाचा अर्थ आहे आवरण किंवा ओढणी, डोक्यावरून सर्व शरीरावर आच्छादनार्थ घेतलेले वस्त्र. बिलवर म्हणजे बांगडी, एकावळी किंवा एकसर म्हणजे एकेरी मोत्यांची किंवा मण्यांची माळ. काचोळी म्हणजे चोळी. या शब्दाचा अर्थ पूर्वीच्या काळातील लोकांना माहित आहे.

काजळकाळ्या रात्री, काळी घागर घेऊन, काळ्याकभिन्न यमुनेचे काळेशार पाणी (रात्रीच्या अंधारात ते पाणीही काळेशार दिसते. आणि तशीही यमुना ही ‘काळी’ म्हणूनच प्रसिद्ध आहे.!) आणायला एक गोपी साजशृंगार करून कृष्णाच्या विचारात त्याला भेटायला निघालीय. काळ्या रंगाचे बिलवर, काळी ओढणी, काळ्या मोत्यांचा एकसर, काळी चोळी तसंच साडी पण काळी. पण एकटीनं अपरात्री जायची भीती वाटते. पण सावळी कृष्णमूर्ती सोबत असल्यावर मग मात्र कशाचे भय उरत नाही अशा अर्थाची ही रचना आहे. थोडक्यात, कृष्णाच्या काळ्या रंगात रंगून निघाल्यानंतर, म्हणजेच द्वैत संपून अद्वैतात स्थिति झाल्यानंतर कशाचे भय उरत नाही असा या गवळणीचा अर्थ असावा असे मला वाटते.

काही इतिहासकारांच्या मते ‘विष्णुदास नामा’ हे एक वेगळे संतकवि सोळाव्या शतकात पंढरपुरात होऊन गेले, त्यांची ही रचना आहे. रचना कोणाची का असेना, पण अत्यंत गूढ अर्थ असलेली अशी ही  रचना आहे.

 खालील एका अभंगात योगी, ज्ञानी यांच्याही पेक्षा भक्तांचे परब्रह्म कसे प्रिय आहे त्याचे खूप छान वर्णन केले आहे.

योगियांचें ब्रह्म शून्य व्योमाकार | आमुचें साकार विटेवरी

दाटुगें नागर कटीं ठेवूनि कर | सर्वस्वें उदार भक्‍तांलागीं

ज्ञानिया सिद्धांतीं लक्षा परी ये। आमुची वाट पाहे अनाथांची

जाप्यकाचें जाप्य नाम मंत्रमय आमुचें भकितप्रिय सांसारिका

नामा म्हणे जीवें करीन ओंवाळणी | झणीं चक्रपाणि दिठावसी

सत्य नित्य युक्‍त शुद्ध बुद्ध मुक्‍त | कारणरहित निरंजन

तें आम्हीं देखिले चर्मचक्षु-दृष्टी | उभा वाळवंटी पंढरीये

वेदां अगोचर तया सहस्रमुखा | तें झालें पुंडलीका लोभापर

परतलिया श्रुति म्हणती नेति नेति । आम्हां गातां गीतीं सांपडलें

स्वरूपाचा निर्धार बोलती पुराणें । शिणलीं दर्शनें विवादती

नामा म्हणे यासी भाव चि कारण | पावावया चरण केशवाचे

ब्रह्म अविनाश आनंदघन । त्याहुनी चरण गोड तुझे

ते जीवें न सोडी अगा पंढरीनाथा । जाणसी तत्त्वतां हृदय माझें

परात्पर वस्तु जे कां अपरंपार | तियेचा साक्षात्कार पाय तुझे

सच्विदानंदघन जेथें हारपठें मन । त्याहुनी चरण गोड तुझे

नामा म्हणे तुझीं पाउठें सुकुमार | तें माझें माहेर विटेवरी

माझिया रे मनें मज उपदेश केला | तो मज बिंबला हृदयकमळीं

निर्वाणींची एक सांगितली खूण | कैवल्य चरण केशवाचे

वेदशास्त्रे स्मृति आणिक पुराणें | पढोनि जाणणें हें चि सत्य

तप अनुष्ठान करोनि साधन | प्रत्यक्ष विधान चरण हे चि

नामा म्हणे मज कळलें अनुभवें । न विसंबें जीवें चरण तुझे

पंढरीचा देव बहुत कोंवळा सगुण सांवळा सारथि हा

सारथि सर्वांचा साक्षिभूत असे | संकटीं सायासे गजेंद्रासी

गजेंद्रासी रक्षी गणिका उद्धरी भिल्ठीणीचे करीं फळें भक्षी

भक्षी सुदाम्याचे पोहे मुष्टिभरी नामा म्हणे हरि गोड मानी

पाला खाऊनियां धाला बहिणीघरीं | भक्‍तालागीं हरि वेडा झाला

सुदाम्याचे पोहे कोरडे चि खाय मटमटा पाहे चहूंकडे

विदुराच्या कण्या खाय धणीवरी झाला बळीचे द्वारीं द्वारपाळ

नामा म्हणे हरीचे कळती पवाडे | नेणों भक्‍तांपुढें वेडा झाला

वरील सर्व अभंग हे भक्तीच्या अत्यंत उन्नत अवस्थेत नामदेवांना झालेल्या अनुभवाचे बोल आहेत एवढे नक्की. आपल्यासारख्यांना हे अभंग वाचून, त्या भक्तिसुखाचा किंचित आभास जरी झाला, तरी धन्य म्हणावे अशी स्थिती आहे.

माधव भोपे 

A special bond

cat-5

Children have great creativity. They try to express their feelings effectively whenever there is an opportunity. My granddaughter Saumya, and her friend Sanvi, found a little cat while wandering in the society while playing. They were instantly attracted by her cuteness and went near the cat. They became friends in no time.

Nowadays Saumya and Sanvi are constantly talking of the cat, and they have together composed a little poem for their new friend!

I really liked the  poem composed by them. The poem is presented here for the readers of goodworld.in.

Saumya also has her youtube channel Saumyas corner. If you like the poem, you can subscribe to her youtube channel as well!

A Special Bond

We found a little cat

Walking on the road

We loved the the way she sat

Staring at the road

cat-4

We went a little near

But her face had fear

We called her to us

But she didn’t make a fuss

cat-1

She looked at us

with curious eyes

As though a friend

Would say hies and byes

We stroked her gently

She looked very friendly

She cuddled us with love

With her paws like a glove

cat-2

She had soft fur

My eyes felt blur

She was so cute

As relaxing as a flute

Flute

Then we thought of a name

Not one but three

Curo as she was

Full of curiosity

Biscuits ’cause that’s

What we had in our hand

Sunshine as she makes us

Feel very glad

sunshine

We put three biscuits

All in a row

And named those biscuits

Sunshine, Biscuits, Curo

cat-3

She chose two of them

Sunshine and Curo

Then we had a go again

And Sunshine ho ho ho

 

We had a lot of fun

But it’s time to go home

And then she said ‘meow!’

As though  ‘See you soon!’

cat-5

Poem by Saumya Bhope and Sanvi Ranade

संत नामदेवांचे अभंग-7 Sant Namdev Abhang-7

namdev

Sant Namdev Abhang-7

संत नामदेवांचे अभंग-7

यापूर्वीच्या सहाव्या भागात संत नामदेवांनी त्यांच्या अभंगांतून सांगितलेली संताची महति आपण पाहिली.

संत हे सर्वसामान्य जनांसाठी, अवघड विषय अत्यंत सोपा करून सांगत असतात. जशी माऊली आपल्या लेकरांना जेवू घालतांना त्यांच्या तोंडात मावतील असेच छोटे छोटे, चिमणे घास करून भरवते, आणि जे काही दूध भाकरी किंवा भात वगैरे असेल, ते अगदी बारीक कुस्करून त्या मुलाला सुपाच्य करून देते, तद्वतच संत हे सर्वसामान्य जनांना वेदांतातील अवघड ज्ञान, सोपे करून सांगत असतात.

खालील अभंग हा ‘खेळिया’ म्हणून ओळखला जातो. त्याच्यात उपनिषदांतील ‘एकोहं बहुस्यामि’ असे परब्रह्माच्या ठिकाणी झालेले स्फुरण, आणि त्यासाठी ‘अरुप’ असलेले ते, नांव रूपाला आले, आणि कसा खेळ करू लागले, याचे मनोरंजक वर्णन आहे. ‘स्वतःच स्वतःला व्यायले’ ही कल्पना किती सार्थ आहे!

आणि ब्राह्मणाचे पोर एक खेळासी भ्याले, ते बारा वर्ष लपाले रे.. यातून शुकदेवांची गोष्ट सांगितली आहे. शुकदेव हे पोपटाच्या स्वरूपात भगवान शिवांच्या कोपापासून वाचण्यासाठी त्रिभुवनात फिरत शेवटी महर्षि व्यासांच्या आश्रमात आले आणि त्यांच्या पत्नीच्या मुखात प्रवेश करून लपून बसले. महर्षि व्यासांनी त्यांना शिवाच्या कोपापासून वाचविले, आणि शुकदेव व्यासांच्या पत्नीच्या गर्भात शिरले. बाहेरच्या जगात मायेचा संपर्क येईल म्हणून ते १२ वर्ष बाहेरच आले नाही. शेवटी महर्षि व्यासांच्या सांगण्यावरून ते बारा वर्षांनी भीत भीत बाहेर आले, तेंव्हा त्यांची अवस्था बारा वर्षाची बालकाची होती. जन्मल्याबरोबर ते नग्न अवस्थेतच, जंगलाच्या दिशेने पळाले, अशी कथा आहे.

चौतोंड्याचा पोर एक नाऱ्याहि जाण- चार मुखें असलेल्या ब्रह्मदेवाचा पुत्र म्हणजे नारद यांच्याबद्दलही विनोदाने ‘ कुचाळी करुनी पोरे भांडवी आपण राहे वेगळा रे’ असे वर्णन केले आहे! अशाच मिस्किल शैलीत हनुमानाचे आणि श्रीकृष्णाचे वर्णन केले आहे. आणि शेवटी हा सर्व एक खेळ आहे हे सत्य सांगितले आहे.

नव्हे तें चि कैसें झाले रे खेळिया | नाहीं तें चि दिसूं लागलें रे

अरूप होतें तें रूपासी आलें जीवशिव नांव पावलें रे

आपली चि आवडी रुनी खेळिया | आप आपणातें व्यालें रे

ऐक खेळिया तुज सांगितलें ऐसें | जाणूनि खेळ खेळें रे

ब्राह्मणाचे पोर एक खेळासी भ्याले | ते बारा वर्षे लपालें रे

कांपत कांपत बाहेरी आलें | तें नागवें चि पळुनी गेलें रे

चौतोंड्याचा पोर एक नाऱ्याहि जाण | तो खेळियांमाजीं आगळा रे

कुचाली करूने पोरें भांडवी | आपण राहे वेगळा रे

खेळ खेळे परी डायीं सांपडे तो एक खेळिया शाहणा रे

खेळियांमाजीं हनुम्या शाहणा | पडे कामव्यसनीं रे

काम चि नाहीं तेथें क्रोध चि कैंचा | तेथें कैचे भांडण रे

रामा गड्याची आवडी मोठी | म्हणूनि लंके पेणें रे

यादवांचा पोर एक गोप्या भला | तो बहुत चि खेळ खेळला रे

लहान थोर अवघीं मारिलीं | खेळ चि मोडूनि गेला रे

ऐसे खेळिये कोट्यानुकोटी | गणित नाहीं त्यासी रे

विष्णुदास नामा म्हणे वडील हो | पहा देहीं शोधूनि रे

खालील अभंगात, अद्वैत अनुभव आल्यानंतर सुख दुःखाची कोण पर्वा करते, सापाने त्वचा (कात) टाकली आणि बिळात गेला की मग बाहेर राहिलेल्या त्या निर्जीव त्वचेला कोण सांभाळते, अशी अनेक उदाहरणें देऊन, अद्वैत अनुभव सोपा करून सांगितला आहे.

सुखदुःखें दोन्ही आम्हांसी सारिखीं | प्रतीति पारखी मना आली

अंतर्बाह्य एक ब्रह्म चि कोंदलें | दुजेपण गेलें निपटूनि

त्वचा टाकूनियां सर्प गेला बिळीं | मग ते सांभाळी कोण सांगा

ओघ सांडूनिया गंगा सिंधू ठाये | विसरली धाये खळाळाची

नामा म्हणे रात्र जैसी कां पाहिठी | धारणा ते झाली तैसें आम्हां

ब्रम्हानंदाची प्राप्ती झाल्यानंतर इतर गोष्टींची कोण पर्वा करते- याची अजून काही उदाहरणे देतात

निद्रिस्ताचे सेजे साप कां उर्वशी पाहों विषयासी तैसे आम्ही

ऐसी कृपा केली माझ्या केशिराजें प्रतीतीचें भोजें एकसरा

शेण आणि सोनें भासतें समान | रत्न का पाषाण एकरूप

पाया लागो स्वर्ग वरी पडों वाघ | आत्मस्थितीभंग कदा नोहे

नामा म्हणे कोणी निंदा अथवा वंदा झालों ब्रह्मानंदाकार आम्ही

संत मंडळींचे उपकार मानतांना, आकल्प आयुष्य व्हावें तयां कुळां । माझिया सकळां हरीच्या दासा असे म्हणून पुढील अभंगात संतांप्रति आपली कृतज्ञता व्यक्त करतात.

आकल्प आयुष्य व्हावें तयां कुळां माझिया सकळां हरीच्या दासा

कल्पनेची बाधा हो कोणे काळीं | ही संतमंडळी सुखी असो

अहंकाराचा वारा लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकांसी

नामा म्हणे तयां असावें कल्याण | ज्यां मुखीं निधान पांडुरंग

नंतर महाभारतातील एक कथा सांगून, ब्रह्मनिष्ठ वैराग्यशील पुरुषाचे महत्त्व सांगतात.

पत्रावळी काढी वैकुंठनायक | धांवूनियां शुक आला तेथें

दाटी पाहुनी द्वारीं मानसीं विचारी | जावया भीतरी काय काज

वाहे हा प्रसाद स्वहस्तें अनंत | वेंचोनियां शीत घाली मुखीं

घंटानाद वाजे लक्षद्विजपंकिति | अक्षयीं वाजती वेळोवेळां

ऐकोनि विस्मित ऋषिसमुदाव पुसे धर्मराव देवाजीसी

सांगतसे खूण वैकुंठनायक | ब्रह्मनिष्ठ एक आला येथें

तेथूनि उठले धर्म नारायण | बाहेरी येऊन पाहताती

शुकाचिये मिषें व्यासाचा नंदन | सांगतसे खूण जगदीश

धरूनियां करीं नेला तो भीतरीं | नामा म्हणे करी पूजा त्याची

खालील एका अभंगात ज्ञानेश्वरीबद्दल सुप्रसिद्ध ‘एक तरी ओवी अनुभवावी’ हा चरण आला आहे. ज्ञानदेव हे नामदेवांचे समकालीन होते. पण त्यांनी वयाच्या २१ व्या वर्षीच संजीवन समाधी घेतली. त्यांचे वर्णन करतांना ‘ज्ञानराज माझी योग्यांची माऊली’ असे म्हणून, ज्ञानेश्वरीचे महत्त्व वर्णन करतांना, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी । एक तरी ओंवी अनुभवावी असे सांगतात. आणि हे अगदी खरेच आहे. ज्ञानेश्वरी हा युगानुयुगांत एखादाच होणारा असा ग्रंथ आहे. आणि तो नुसताच ‘वाचण्याचा’ नाही, तर ‘अनुभवण्याचा’ आहे, हे ज्ञानेश्वरीचे जाणकार चांगलेच जाणतात.

त्यापुढे जाऊन, नामदेव महाराज आपल्या गुरूंचे-विसोबा खेचरांचे ऋण व्यक्त करतांना म्हणतात- डोळियाचा डोळा उघडला ज्याने- अशा सद्गुरूंचे पाय मी विसंबणार नाही.

ज्ञानराज माझी योग्यांची माउली | जेणें निगमवल्ली प्रगट केली

अध्यात्मविद्येचें दाविलेसे रूप | चैतन्याचा दीप उजळिला

छप्पन्नभाषेचा केलासे गौरव | भवार्णवीं नाव उभारली

श्रवणाचे मिषें बैसावें येऊनि | साम्राज्यभुवनीं सुखी नांदे

नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओंवी अनुभवावी

सद्गुरूसारिखा सोइरा जिवलग | तोडिला उद्वे संसारींचा

काय उतराई होऊं कवण्या गुणें जन्मा नाहीं येणें ऐसें केलें

माझें सुख मज दाखविले डोळां | दिधली प्रेमकळा नाममुद्रा

डोळियाचा डोळा उघडिला जेणें लेवविले लेणें आनंदाचे

नामा म्हणे निकी सांपडली सोय | विसंबे पाय खेचराचे

 

पुढील भागात संत नामदेवांचे आणखी काही अभंग पाहूयात.

माधव भोपे

संत नामदेवांचे अभंग-6 Sant Namdev Abhang-6

namdev

Sant Namdev Abhang-6

संत नामदेवांचे अभंग-6

तेराव्या शतकात महाराष्ट्रात होऊन गेलेले थोर संत नामदेव यांच्या अभंगांविषयी आपण चर्चा करीत आहोत. यापूर्वीच्या चौथ्या आणि पाचव्या भागात भगवंताच्या नामाचे महत्त्व आणि नामाचे सामर्थ्य याबाबत नामदेवांचे अभंग आपण पाहिले.

नामाची गोडी लागायला, सत् संगत- आणि संतांची संगत पाहिजे. संतांचा महिमा सांगणारी काही भजने आपण पाहूयात.

संतपायीं माया धरितां सद्भावें तेणें भेटे देव पोआप

म्हणूनि संतां अखंड भजावें | तेणें भेटे देव पोआप

साधूपाशीं देव कामधंदा करी | पीतांबर धरी वरी छाया

नामा म्हणे देव इच्छी संतसंग | आम्हां जिवलग जन्मोजन्मी

ज्ञानेविण मोक्ष नाहीं हा सिद्धांत | वेद बोले हात उभारोनि

तरी तें चि ज्ञान जाणायालागूनि | संतां वोळगोनि वश्य कीजे

प्रपंच हा खोटा शास्त्रें निवडिला | पाहिजे साक्षिला सद्गुरु तो

नामा म्हणे सेवा घडावी संतांची | व्हावी कृपा त्यांची तें चि ज्ञान

संतांची महति सांगतांना नामदेव महाराज म्हणतात- ‘साधूपाशी देव कामधंदा करी’- आणि अनेक संतांच्या गोष्टींमधून आपल्याला हे दिसते- देव जनाबाईला जात्यावर धान्य दळू लागले, काम करू लागले, संत कबीराचे शेले विणू लागले, चोखोबासोबत गुरे ओढू लागले अशी कितीतरी उदाहरणे सांगता येतील. संतांनी आपला भार पूर्ण देवावर घातलेला असतो. त्यामुळे मग त्यांची पूर्ण जबाबदारी तो घेतो.  

परिसाचेनि संगें लोह होय सुवर्ण | तैसा भेटे नारायण संतसंगे

कीटकी ध्यातां भृंग झाली तो चि वर्ण | तैसा भेटे नारायण संतसंगे

अग्नीस मिळें तें ये परतोन तैसा भेटे नारायण संतसंगे

नामा म्हणे केशवा मज देई संतसंग आणिक कांहीं तुज मागें बापा

 

जसे परिसाचे स्पर्शाने लोखंडाचे सुवर्ण होते, तसेच सामान्य जनांना संतांच्या संगतीने नारायणाची भेट होते, म्हणून नामदेव महाराज म्हणतात हे देवा- मला फक्त संत संगत दे- आणखी काहीही नको.

कडू वृंदावन साखरें घोळिलें | तरी काय गेलें कडूपण

तैसा तो अधम करी तीर्थाटण | नोहे त्याचें मन निर्मळत्व

बचनागरवा दुग्धी शिजविला | तरी काय गेला त्याचा गुण

नामा म्हणे संतसज्जनसंगती | ऐशास हि गति काळांतरीं

kadu vrundavan

कडू वृंदावन नांवाचे फळ असते, जे आयुर्वेदात काही रोगांसाठी औषधीच्या रूपात वापरतात. ते खूप कडू असते. साखरेत घोळले तरी त्याचे कडूपण जात नाही. अधम माणसाने तीर्थाटन केले तरी त्याचे मन निर्मळ होत नाही. बचनाग- हेही एक प्रकारचे विष आहे-ते दुधात शिजविले तरी त्याचा विषारी गुण काही जात नाही. पण नामदेव महाराज म्हणतात, इतके कडू, किंवा अधम असले तरी, अशा लोकांचीही बुद्धि संतांच्या संगतीने पालटू शकते, आणि कालांतराने त्यांनाही योग्य गती मिळू शकते.

धिग धिग तो ग्राम धिग धिग तो आश्रम | संतसमागम नाहीं जेथें

धिग धिग ते संपत्ति धिग धिग ते संतति | भजन सर्वांभूती नाहीं जेथें

धिग तो आचार धिग तो विचार वाचें सर्वेश्‍वर नाहीं जेथें

धिग तें गाणें धिग तें पढणें | विठ्ठठनामनाणें नाहीं जेथें

नामा म्हणे धिग धिग त्यांचें जिणें | एका नारायणेंवांचूनियां

नामदेव महाराज म्हणतात, तो गांव, तो आश्रम काय कामाचा जिथे संत समागम नाही. त्याचा धिक्कार असो. अशी संपत्ति आणि अशी संतती यांचा पण धिक्कार असो.

मंत्र तंत्र दीक्षा सांगतील लक्ष | परी राम प्रत्यक्ष करी कोणी

प्रत्यक्ष दावील राम धरीन त्याचे पाय आणिकांची काय चाड मज

सर्वकर्मी राम भेटविती मातें जीवेंभावें त्यांतें ओवाळीन

नामा म्हणे आम्हां थोर लाभ झाला | सोयरा भेटला अंतरींचा

 

संतांचें लक्षण- संत कसा ओळखावा याबद्दलही नामदेव महाराज सांगतात

संतांचें लक्षण ओळखावया खूण दिसती उदासीन देहभावा

सतत अंतरीं प्रेमाचा जिह्याळा | वाचे वसे चाळा रामकृष्ण

तुझ्या ध्यानीं ज्यांचें सदा भरलें मन | विश्‍व तूं चि म्हणून भजती भावें

ऐसे नित्यानंदें बोधें जें निवाठे | ते जीवावेगळे करीं नाम्या

 

आणि खालील अभंग तर पंडित भीमसेन जोशी यांनी त्यांच्या आवाजात अगदी समर्थपणे गायलेला आपण ऐकतो-

वैष्णवाघरीं सर्वकाळ | सदा झणझणती टाळ

कण्याभाकरीचें खाणें गांठी रामनामनाणें

बैसावयासी कांबळा | द्वारीं तुळसी रंगमाळा

नामा म्हणे नेणती कांहीं चित्त अखंड विठ्ठलपायीं

 

अजून संतांचे लक्षण सांगतांना नामदेव महाराज सांगतात- सगळ्या गोष्टीत सम राहतो- तो खरा संत –

जैसा वृक्ष नेणें मानअपमान | तैसे ते सज्जन वर्तताती

येऊनियां पूजा प्राणी जे करिती | त्याचें सुख चित्तीं तया नाहीं

अथवा कोणी प्राणी येऊनि तोडिती | तया म्हणती छेदूं नका

निंदास्तुति सम मानिती जे संत | पूर्ण धैर्यवंत साधु ऐसे

नामा म्हणे त्यांची जरी होय भेटी | जीवा शिवा गांठी पडुनी जाय

 

आणि मग भक्तांनी सुद्धा हेच गुण अंगी बाणवावेत- लोकांच्या निंदेने व्यथित होऊ नये-

निंदील हे जन सुखे निंदूं द्यावें सज्जनीं स्वभावें क्षोभूं नये

निदास्तुति ज्यासी समान पैं झाली | त्याची स्थिति आली समाधीसी

शत्रु मित्र ज्यासी सम समानत्वें तो चि पैं देवातें आवडला

माती आणि सोनें भासे ज्या समान | तो एक निधान योगिराज

नामा म्हणे ऐसे भक्‍त जे असती | तेणें पावन होती ठोक तिन्ही

 

 

संत नामदेवांचे अभंग खूप आहेत. त्यातील काही निवडक अभंग आपण पाहत आहोत. आचार्य विनोबा भावे यांनी हे निवडक अभंग अनेक वर्षांपूर्वी प्रसिद्ध केले होते, त्या आधारावर आपण ही लेखमाला सुरू केली आहे. यापुढील भागात अजून काही अभंग पाहणार आहोत.

माधव भोपे 

Sankranti Customized Greeting Card

Sankranti-2025-card (1)

Generate your own Greeting Card for Makar Sankranti

Greeting Card Generator

Makar Sankranti Greeting Card Generator

संक्रांतीच्या शुभेच्छा !

तिळगूळ घ्या, गोड गोड बोला! मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!!

- Your Name

मकर संक्रांती हा एक आनंद आणि उत्साहाने भरलेला सण आहे. ऋतूमध्ये होणारा अनुकूल बदल, सूर्याचे उत्तरायण सुरू होण्याचा काळ, त्याच वेळी शेतीतील रब्बी हंगामाची महत्त्वाची कामें संपून थोडा निवांतपणा, या सगळ्यांना साजरा करण्यासाठी पूर्ण भारतात कुठल्या ना कुठल्या नांवाने आणि प्रकाराने हा उत्सव साजरा केला जातो. 

एकमेकांना भेटून शुभेच्छा देणे अपेक्षित असले तरी, आजकाल आधुनिक जीवनाच्या व्यस्ततेमुळे जर असे भेटणे शक्य झाले नाही, तर आपण एकमेकांना शुभेच्छा देणारे ग्रीटिंग नक्की पाठवितो. असे ग्रीटिंग जर नेमक्या, योग्य त्या शब्दात, आणि आपल्या नांवासकट पाठविता आले तर किती चांगले! 

खाली दिलेल्या Greeting Card Generator चा वापर करून तुम्ही आपल्या स्नेही जनांना आणि मित्र परिवाराला असे शुभेच्छा कार्ड पाठवू शकता. 

  1. Select a Sankranti Message या मेन्यू मधून, दिलेल्या १० मेसेजेस पैकी, आपल्याला आवडणारा मेसेज select  करा. लगेच तो मेसेज खालील रंगीत कार्डावर दिसेल. 
  2. Your Name या मेन्यू वर गेल्यावर, तुमचे नांव टाइप करा. तुम्हाला हव्या असलेल्या भाषेत. लगेच तुमचे नांवही त्या कार्डवर दिसू लागेल. 
  3. Download Card या बटन वर क्लिक करा. 
  4. तुमचे customized greeting कार्ड तुमच्या मोबाईल वर किंवा लॅपटॉप वर (तुम्ही लॅपटॉप वरून केले असल्यास) डाउनलोड होईल. 
  5. डाउनलोड झालेले कार्ड open करा. त्यात वर share चे बटन आले असेल. ते वापरून हे कार्ड तुम्ही whatsapp किंवा इतर कुठल्याही प्लॅटफॉर्म वर शेअर करू शकता !
Customized Greeting Card developed  specially for the readers of goodworld.in and goodlifehub.in.